२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - अंतीम भाग - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2010 - 08:02

"साहू.. रेश्मा.. थापा.. "

"बाप नही है क्या? या बहोत है?"

".........."

"काय रे ***?"

"....."

"पत्ता बोल"

"२०३, डिस्को... बुधवार पेठ.. पुणे २"

आजही रात्री पंचवीस वर्षाचा साहू फरासखान्यात हजर झाला होता. आळीत काही झाले की ज्या तीन चार टाळक्यांना पकडायचे त्यात साहू सगळ्यात सोपा! त्यात आणखीन हा यादवाड सबइन्स्पेक्टर नवीन होता. साहू आईचेच नाव लावतो ही माहिती त्याला असिस्टंटने दिली. बराच वेळ चौकशी करून अन शिवीगाळ करून काही साध्य झाले नाही पाहिल्यावर साहूला सोडले, बाकीचे दोघे तिथेच थांबले.

काही नाही.. कुठल्यातरी गिर्‍हाईकाचा रेखाबरोबर वाद झाला होता अन झालेल्या भांडणाचे पर्यवसान किरकोळ मारामारीत होऊन शेवटी त्या गिर्‍हाईकाने तक्रार नोंदवली होती. त्याचे म्हणे आदल्या रात्री घड्याळ तिथेच राहिले होते. साहूला माहीत होते. रेखा प्रामाणिक होती. पण त्या माणसाला काही पटेना! त्याने शिवीगाळ केला, मग काही पोरींनी त्याला शिव्या दिल्या.. मग झाली मारामारी! आजूबाजूच्या बघ्यांपैकी साहू, नवीन अन गोपी या तिघांना आत घेतले.

यादवाडला कुणीतरी त्या गिर्‍हाईकाचे आजवरचे अनुभव लक्षात घेता तो घड्याळाबद्दल खोटे बोलत असणार हे सांगीतल्यावर त्या गिर्‍हाईकालाच झाप पडली अन साहूला सोडून देण्यात आले. नवीन अन गोपी यांना पुढच्या कागदपत्रांपुरते थांबवले. साहूला माहीत होते, शेवटी त्या गिर्‍हाईकाकडूनच शे पाचशे घेणार अन कागद फाडून टाकणार!

पासोड्या विठोबापाशी नवी कोरी ब्रिस्टॉल घेऊन एक कचकचीत झुरका मारल्यावर साहूचे लक्ष गेले श्रीकृष्ण टॉकीजकडे! आज जरा वातावरण मंद मंदच वाटत होते.

रात्रीचे साडे दहा वाजले होते. एका बंद दुकानाच्या पायरीवर साहू बसला. त्या पायरीवर बसले की खाली रस्त्यात एक नाणे कुणीतरी ठोकून ठेवले होते ते नेहमी दिसायचे साहूला. आता ते नाणे किती पैशांचे होते हे जरी दिसत नसले तरीही....

पाच वर्षांचा असताना .... ते नाणे पाच पैशांचे आहे.... हे साहूने व्यवस्थित पाहिले होते...

नाण्याकडे बघता बघता अलगदच साहूचे मन पोचले... भूतकाळात...
------------------------------------------------------------------------

कादंबरीची सुरुवात जिथे झाली होती तिथे आपण आता पोचलो आहोत.

------------------------------------------------------------------------

गोपी! या निमित्ताने गोपी तरी भेटला होता. दोघांनी एकमेकांना पोलिसांच्या समोरच मिठ्या मारल्या होत्या. गोपीने एकाच हाताने मिठी मारली होती बिचार्‍याने! आणि गोपी हळूच कानात कुजबुजलाही होता. "वेलकमपे कभी मत आना साहू, लेकिन मै, गजू और तुम मिलके अमजदको खतम करदेंगे"! गोपीला मारलेली मिठी सुटेचना! वेलकमला जाऊन त्याला भेटण्याचे धाडस मूर्खपणाचे ठरले असते. आज दोघांच्याही डोळ्यातून अश्रू बरसले होते. जुन्या पोलिसांना मात्र त्याचे कारण माहीत होते.

गोपीच्या त्या विधानांचा अर्थ बराच वेळ लावत बसला होता साहू! कुठे हा यादवाड सब इन्स्पेक्टर आणि कुठे आई वेलकमवरून डिस्कोला आली तेव्हाचा वरचा साहेब यादवाड! अजून साले आपल्यालाच पकडतात. आत्ता तर आतून बाहेर आलो आपण! रेखाचा वाद श्रीकृष्ण टॉकीजसमोर झाला तरी गोपीला उगाचच धरले. गोपी! चाळीस वर्षाचा हात तुटका गोपी! कशाला जिवंत ठेवलं होतं त्याला कुणास ठाऊक! मरायला आलाच आहे म्हणा!

पण... वेलकमवर कधीही येऊ नको हे ठीक आहे. पण.. अमजदला कसं काय मारणार म्हणतो हा? आणि मुख्य म्हणजे.. गजूचाचाला कसा काय गृहीत धरतोय हा?

गजूचाचाला एकदा गाठायलाच हवा.. आत्ता कुठे असेल? कबीर डिस्को बघतोय म्हणजे गजूचाचाला वेलकमवर ठेवलेले असणार! जावे? करावा हा मूर्खपणा?? नकोच.. इतकी घाई नाही आहे.

आपण परत आल्याची बातमी सर्वत्र पसरलेली आहे पहिल्याच दिवशी! तरीही गजूचाचा भेटायला आला नाही याचा अर्थ सरळ आहे. त्याची इच्छाच नव्हती भेटायची किंवा... कबीरला घाबरत होता.

पण.. साहू हा सगळा विचार करत असताना त्याचे नशीब मात्र वेगळाच विचार करत होते...

नशीबाने गजूचाचाला कधीच साहूच्या शेजारी आणून बसवलेही होते. आपल्याच तंद्रीत नाण्याकडे पाहात असलेल्या साहूला शेजारी कोण बसले आहे म्हणण्यापेक्षाही शेजारी कुणी बसलेले आहे हेच कळले नव्हते. आणि अचानक उद्गार कानावर आले..

गजू - ये ले साडी.. चल्ल... पहनाते है.. उस हरामी कबीर को...

पाच वर्षे! पाच वर्षांच्या गॅपनंतर तो आवाज तसाच्या तसा होता. गजूने हातात दिलेली साडी तशीच ठेवून साहू अवाक होऊन गजूचाचाकडे बघतच बसला होता.

गजू - और अभ्भी पहनाते है... चल्ल.. तेरीही राह देखरहा था मै.. बदला तो तुझेही लेना है ना..????

पाच वर्षांनी मारलेल्या त्या मिठीमधे काय नव्हते? जणू बाप परत मिळाला होती साहूला.. अजून काय पाहिजे??

गजूच्या दणकट शरीरावर आपली मान विसावणारा साहू कितीतरी वेळ हमसून हमसून रडत होता. मात्र.. गजूचा एक अश्रूही निघाला नव्हता. त्याचे डोळे लागले होते श्रीकृष्ण टॉकीजच्या भिंतीकडे शुन्यात लागल्यासारखे! येणारे जाणारे विचित्र नजरेने त्या जोडीकडे पाहात होते.

बराच वेळाने एकमेकांची ख्यालीखुशाली विचारून झाली. ख्यालीही नव्हती आणि खुशालीही! शालनदीदीचा उल्लेखच झाला नव्हता बोलण्यात! फक्त तिला अमजदने जबरदस्तीने वेलकमवर नेऊन अती छळले एवढेच कळले होते. ते ऐकूनच साहू स्फुंदून रडला होता. किती केले त्या बाईने! आपल्या आईपेक्षाही किंचित मोठीच! एकदाही हिशोबात गडबड नाही, आपल्याकडे नेतृत्व देताना मुलाकडेच ते दिल्यासारखे भाव, हेवादावा नाही, कोणत्याही अवघड प्रसंगात आपले बौद्धिक घेऊन आपल्याला नवी मानसिक उभारी देणारी बाई ती.. आपल्या सूचनेवरून अमजदकडे जाऊन स्नेहाला चक्क घेऊनही आली होती...

मात्र! कबीरचा बदला मी एकटाच घेईन हे साहूने गजूला सांगीतले. गजूला उलट अभिमानच वाटला. पण त्याने साहूला लागेल ती मदत मागण्याची आज्ञाच केली होती.

आणि गजू निघून गेला होता. वेलकमचा संरक्षकच अजूनही आपल्या बाजूने आहे ही कल्पना साहूला फार म्हणजे फारच आवडली होती. हीच नेमकी वेळ होती कबीरला अद्दल घडवण्याची. मुंगूस म्हणे तीन वर्षांपुर्वीच मेला होता. त्यामुळे साहू सूड न घेता आल्याच्या दु:खात हळहळत होता. पण कबीर होता. चांगला धडधाकट होता. त्याची स्त्री बनवायला मजा येणार होती. आणि नंतर..

साहू जमाईराजाकडे वळला. आपल्या खोलीत गेल्यावर त्याला दिवसभरात पहिल्यांदाच रेखा नाराज दिसली.

आपल्याला आल्या आल्या दुसर्‍याच दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलावले म्हणून नाराज झालेली असावी असा साहूचा कयास होता. पण ती काही खुलेना.. शेवटी त्याने तिला जवळ बसवले..

साहू - क्या हुवा है रेखा.. ऐसे क्युं चुपचाप??
रेखा - कुछ नही..
साहू - एक बात बताऊं.. उन दिनोसे आजकलही ज्यादा खूबसूरत लगने लगी है तू..
रेखा - उसकी वजह है..
साहू - क्या??

रेखा उठली आणि खिडकीपाशी गेली.

साहू - क्या हुवा? बोल ना??
रेखा - पेटसे हूं.. तीन महिने होगये..

ज्या बातमीने सर्वसामान्यांकडे पेढे वाटले जातात त्या बातमीने बुधवारात सुतक पाळले जाते. गर्भ राहणे!

खच्ची झालेला साहू मान खाली घालून जमीनीकडे बघत बसला होता. रेखाला रोग होताच! तो मुलालाही होणार ही शक्यता खूपच होती. या मुलाला जन्म देण्यात अर्थच नव्हता. काय हे दैव आपले!

साहू - किस.. किससे..???

रेखाने खिडकीबाहेरची नजर न हटवत अत्यंत व्यथित स्वरांमधे सांगीतले..

रेखा - ....कबीर... और कौन??

धमन्यांमधून रक्त उसळायला लागले होते साहूच्या! आत्ता समोर कबीर असता तर कदाचित त्याचा भानूच झाला असता. एकमेव प्रेयसी! तिलाही असाध्य व्याधी! त्यात ती पाच वर्षे आपल्यासोबत नव्हतीच! आणि ती पाच वर्षे अत्यंत हलाखीची गेली होती. साहू आत्ता तिच्याच अत्यंत तोकड्या मिळकतीवर गेले दोन दिवस जगत होता.. आणि त्यात ही बातमी..

खाडकन निश्चय करून उठलेल्या साहूला रेखाने शपथ घालून अडवले तेव्हा कुठे तो पुन्हा पलंगावर बसला.

रेखा - ये .. ये बच्चा.. रखते है साहू..

धक्का बसलेला साहू रेखाच्या त्या क्रूर विधानावर थक्क होऊन रेखाकडे पाहात होता.

साहू - जानती है क्या कहरही है?? जानती है उसकी जिंदगी क्या होगी?? दस साल भी जियेगा के नही पता नही.. क्या बक रही हो रेखा??
रेखा - ये... मेरा बच्चा है साहू.. मै अगर और छे महीने जिंदा रही तो इसका जनम होगा.. इसमे तुझे मै दिखती रहुंगी..
साहू - लेकिन.. इसमे.. उस कबीरका.. हरामीका..
रेखा - सिर्फ बापही सबकुछ नही होता है साहू.. तू भी तो मांका ही नाम लगाता था ना?? और.. ये भी सोच के.. किसी और ग्राहकसे मुझे ये बच्चा होता तो शायद.. हम जानतेभी नही के किससे...

वीस मिनीटे दोघेही एकमेकांच्या मिठीत स्फुंदून स्फुंदून रडत होते. 'मै अगर छे महीने और जिंदा रही तो'! काय वाक्य होते हे! किती सहज तोंडातून बाहेर पडलेले वाक्य! किती अगतिकता! मरायची किती इच्छा! बुधवार पेठ पुणे २.. ! बाकी काही नाही..

मात्र साहू तिला दूर करून म्हणाला..

साहू - तू अगर सच्ची मां है तो इसको जनम नही देगी.. और.. अब मुझे मत रोक.. मै जा रहा हूं कबीरके पास..

अंगातील ताकद कमी पडल्यामुळे साहूला न थांबवू शकलेली रेखा त्याच्या जाण्याकडे बघून शेवटी हमसाहमशी रडायला लागली. निदान मुलाचा जन्म होईपर्यंत तरी साहू जिवंत राहावा अशी तिची इच्छा होती. पण आता काही सांगता येत नव्हते.. साहू डिस्कोवर गेल्यावर काय होईल ते... मुळीच सांगता येत नव्हते. धडपडत रेखा उठली अन मुलींना एकत्र करून जमाईराजाच्या दारावर आली. नुसतिच टकामका डिस्कोकडे बघत राहिली. सलोनीला त्याचा अर्थ व्यवस्थित समजला होता. साहूची साथ द्यायला ती लंगड्याच पायांनी जमेल त्या वेगात डिस्कोकडे धावली. सलोनी वर जाऊनही आता पंधरा मिनीटे झाली होती. कुणी ओरडत नव्हते की भांडत नव्हते. कसलाच आवाज नव्हता.

हळूहळू बाकीच्या मुली पांगायला लागल्या. रेखा मात्र डोळे निश्चल करून डिस्कोकडे पाहात बसली होती. तिला सगळा इतिहास माहीत होता. बाकीच्या मुलींना माहीत नव्हता. अर्धा तास झाला. अजूनही काहीही होत नव्हते. एक दोन गिर्‍हाईके आत गेलेली होती. बाहेर मात्र कुणीच आलेले नव्हते. काय चाललंय काय??

शेवटी हिय्या करून रेखा निघाली. साहूवर कितीही प्रेम असले तरीही आपल्या गर्भाचा विचार करूनच ती थांबली होती इतका वेळ! आता थांबण्यात अर्थ नव्हता...

आणि डिस्कोच्या दारात पाऊल टाकताना.. तिला आजवरच्या बुधवार पेठेतील वास्तव्यातील सगळ्यात मोठा धक्का बसला होता..

रक्ताचा एक साधा ओघळही नसूनही धड पाऊलही टाकता येत नसलेला कबीर.. साडी नेसून खाली उतरत मृतवत नजरेने सगळ्यांकडे बघत होता... आणि मागून सलोनी त्याला शिवीगाळ करत धक्के देत होती... आणि त्याही मागून.. अत्यंत कृद्ध नजरेने उतरत असलेल्या साहूच्या हातात लाकडी दंडुका होता.. आणि सलोनी विद्रूप चेहरा करत कर्कश्श ओरडत सगळ्या गल्लीचे लक्ष वेधत होती...

"अय.. देखोरे.. छक्का आया छक्का वेलकमका.. अमजदका छक्का है ये.. बहुत सस्तेमे है... देखो देखो"

कबीरला समोरासमोर मारायला साहू हा काही धर्मयोद्धा नव्हता. कबीर एका खूप आतल्या खोलीत असताना चपळाईने तेथे पोचलेल्या साहूने लाकडाचा पहिला प्रहार त्याच्या डोक्यात केला होता. त्यानंतर त्याने त्याला बाहेर ओढत आणत खाली दाबून धरून अनेक गुद्दे मारले होते. पन्नाशीच्या पुढे गेलेल्या आणि व्यसनांच्या अतिरेकाने पोकळ झालेल्या कबीरच्या त्या शरीराला तो मार सोसू शकत नव्हता. काही कळायच्या आतच साहूचा पुढचा वार होत होता. अत्यंत बेसावध होता कबीर! आणि ओरडताच येत नव्हते. त्यातच सलोनी आली आणि तिने त्याचे कपडे टराटरा फाडले. हे सगळे दारातच चाललेले असल्यामुळे आतले आत अन बाहेरचे बाहेर राहिलेले होते. सगळे अवाक होऊन कबीरच्या परिस्थितीकडे पाहात होते. त्यातच त्याला साडी गुंडाळली. आणि खाली गल्लीत साहूची अत्यंत बदनामीकारक धिंड काढली तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्ण टॉकीजची गल्ली स्तब्ध झाली.

केदारी चौक ओलांडताना फार काळजी घ्यावी लागली. ते दृष्य सामान्य माणसांना दाखवण्यासारखे नव्हते. फार घाईघाईत लक्ष्मी रोड क्रॉस करून वरात वेलकमच्या रस्त्याला लागली. आणि..

वेलकम...! पाच वर्षांनी साहू तिथे येत होता. शरीफाबी अजूनही वेलकमलाच आहे असे त्याला समजले होते. वेलकमच्या इमारतीसमोर उभा राहिलेल्या साहूने मागे वळून चहाच्या दुकानाकडे पाहिले म्हातारा केव्हाच मरून गेला होता. त्याचा मुलगा ते दुकान चालवत होता.

तोहफामधून भोला सुसाट वेगाने साहूकडे आला. काय झाले असेल याची कल्पना आल्यावर त्याने कबीरला वेलकमसमोरच बडवायला सुरुवात केली. एवढे होते तोवर रमासेठ वरून खाली आला.

रमासेठ! चार हजारमे फुल्ल नाईट.. यालाच मारून आपली आई आपल्याला घेऊन पळालेली होती.. साहूने भयानक नजरेने रमासेठकडे बघितले. त्याचेही वय झालेले होते. कबीरला भोलाच्या सुपुर्द करून साहूने रमासेठवर प्रहार सुरू केले.

आता तर गर्दीही थांबून बघत होती.

रमासेठ पळूही शकला नाही. अख्खे तोहफा रस्त्यावर उतरले होते. मागच्या बिल्डिंगमधल्या मुलीही आल्या होत्या. त्यांच्यातील काहींनी तर सलोनीलाही बडवून काढले. कबीर तर सगळ्यांचाच मार खात होता.

आणि तेवढ्यात तिघांनी साहूला धरले, उचलले आणि सरळ... वेलकमच्या तळघरात नेले..

तोच अंत.. आपला तोच दुर्दैवी अंत आहे हे साहूला समजले होते.. कसातरी वाट काढत अन वेदना सोसत दोन मिनिटांतच कबीरही तिथे पोचला.. त्याने साहूवर थुंकून पहिल्यांदा साहूला मारायला सुरुवात केली. तिथे आधीच असलेला गोपी मधे पडला. त्याने बिचार्‍याने उगीचच मार खाल्ला इतरांचा.. रमासेठ धावत धावत आत आला आणि ओरडला..

"अमजदभाई आरहेले है.. अब तू भी गया.. तेरी मां के जैसा.. ******"

चूक झाली होती. खूप मोठी चूक झाली होती. रेखाचे ऐकायला हवे होते. हे धाडस अजिबात करायला नको होते. आपण संपलेलो आहोत. आपल्याला मदत करायला आता गजूही येऊ शकत नाही आणि गोपी तर काही करूच शकत नाही. ही सलोनी आत आलीय पण तीच मार खातीय! काय करणार? आपण काय करणार??

तेवढ्यात धावत धावत रेखा आली आतमध्ये! आणखीनच नको ते झाले होते. ही तर अजिबातच इथे यायला नको होती. काय करायचे?? एकेक माणूस येऊन फटके लावून जातोय..

हळूहळू साहूला बराच मार बसायला लागला. साहूच्या किंकाळ्या ऐकून रेखा अन गोपी मधे पडले की त्यांना मार लागत होता. रेखाला काही होत नाही ना इकडे लक्ष देताना साहूची त्रेधातिरपीट होत होती..

भोलाही मदतीसाठी आत आला होता. पण ती त्याची चूक होती. आता कबीरने एकाला मदतीला घेऊन भोलाला पिटायला सुरुवात केली.

मगाशी बाहेर जमा झालेल्या तोहफा आणि मागच्या इमारतीतील मुलींपैकी एकही इथे यायचे धाडस करू शकत नव्हती. काय होणार आहे याचा सगळ्यांनाच अंदाज आलेला होता. आणि अमजदला मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहात होत्या सगळ्या..

तेवढ्यात...

.... अमजद आला.. आपला अवाढव्य पण म्हातारा होत असलेला देह सावरत आणि दुनियेतला सगळा क्रोध दोन घार्‍या डोळ्यांमधे सामावत अमजदने साहूकडे पाऊल टाकले आणि रेखा अमजदच्या पायावर कोसळली..

रेखा - मत मारो साहब.. मत मारो.. भूल होगयी.. ये देखिये.. मेरे पेटमे बच्चा है.. कबीरकाही है.. मत मारीये साहू को..

आणि अमजदने साहूला सोडून रेखाच्याच पोटावर लाथ घातली.. खच्चून! आणि त्याचक्षणी...

साहू... रेश्मा... थापा...

या विदारक स्फोटकातील आजवर बसलेली सगळी वेष्टने क्रॉस करून एक मोठी ठिणगी आतवर पोचली .....

बुधवार पेठेतील आजवरचा सगळ्यात मोठा स्फोट झाला..

साहूने एका ढांगेत अमजदला गाठून आपल्या उजव्या हाताची बोटे सरळ अमजदच्या डोळ्यांमधे खुपसली..

अमजदभाई..

.... बुधवार पेठेतील सगळ्यात जास्त राक्षसी व्यक्तीमत्व अमजद एखाद्या डोंगरासारखा नाचत भयानक किंकाळ्या फोडत होता.. तोपर्यंत वरून स्नेहा आणि भानूची भाची या दोघीही धावत आल्या..

हे काय?? ... या गेल्याच नाहीत?? का???

का नाही गेल्या या??

साहूचा क्षणभर विश्वासच बसेना स्वतःच्या डोळ्यांवर...

आणि आणखीन अविश्वसनीय गोष्ट घडली... त्या दोघींनी येऊन घाबरून जायच्या ऐवजी तोहफातील आपल्या ज्या मैत्रिणी रस्त्यावर काळजीने उभ्या होत्या त्यांना ओरडून सांगीतले..

"अंदर आओ.. वेलकम खतम करदो.. "

गोपी आणि भोलाने तिथल्या तिघांच्या हातातून सुटून रमासेठची शुद्ध घालवली होती.. कबीर आधीच मार खाऊन बर्‍यापैकी लुळा पडलेला होता.. वेदना कशाबशा सहन केलेली रेखा उठून कबीरला कशानेतरी बडवायला लागली. वेलकमवरचे इतर तिघे अमजदला घाईघाईने बाहेर घेऊन जायला लागले. ते वेलकमवर नवीन होते. ऐकून त्यांना साहू माहीत होता. पण हा पोरगा इतका भयंकर असेल याची त्यांना कल्पना नव्हती. आणि आत्ता त्यांच्या दृष्टीने प्रायॉरिटी होती अमजदला वाचवणे.. त्याचे उपचार!

आणि त्या तिघांना बाहेरून आत आलेल्या बायका बुकलू लागल्या. एकच हाहाकार उडाला. कुणीतरी पोलिसात धावले. आता सगळि गल्लीच आंधळ्या अमजदवर आणि कबीर अन रमासेठवर राग काढू लागली. मागच्या इमारतीतील बायकाही आल्या.

सर्व शक्तिमान पुरुषांना त्या क्षणी समजत होते.. बायका एक झाल्या तर काय करू शकतात.

अमजदच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. वरून काही बायकांनी शरीफाला बडवत खाली आणले.

आता खरे तर साहू फक्त बघतच होता.. आणि गजूचाचा आला..

लांबवर कुठेतरी गेलेला गजूचाचा आला.. त्याने काहीतरी हत्यार आणलेले असावे.. त्याने ते कबीरच्या पोटात खुपसले.. कबीर थंड झाला.. बुधवार पेठेतील एक हीन व्यक्तीमत्व आज संपले.. त्या पाठोपाठ गजू आपल्याकडे धावतोय हे पाहून रमासेठ रस्त्यावर धावत गेला आणि साहू त्याच्यामागून धावला..

आणि साहूला कधीही विश्वास बसणार नाही असे दृष्य दिसले..

अत्यंत विचित्र दिसणारी.. घाणेरडी दिसणारी.. अकालीच साठ वर्षाची असावी अशी वाटणारी..

शालनदीदी.. रमासेठच्या पुढ्यात उभी होती..

कबीर खोटे बोलला होता.. तिला भयानक छळून शेवटी अमजदने मागच्या इमारतीत शिफ्ट करून टाकले होते.. तिथे तिची उपासमार चालू झाली होती..

आज बुधवार पेठेतील सगळा चांगुलपणा एकत्रित झाला असावा..

अमजदला फरफटत रस्त्यावर आणलेल्या मुलींनी आणि बाहेरच्या मुलींनी पाहता पाहता रमासेठ आणि अमजदला केवळ हाताच्याच माराने निव्वळ पाच एक मिनीटांत .. खलास केलेले होते..

लांबवर सायरन ऐकू येत होता..

एकमेकांना भेटायलाही वेळ नव्हता..

रेखाला भेटून साहू म्हणाला की मुलाला जन्म दे.. आणि जगलीस तर माझे नावही दे.. आणि नंतर गोपीकडे सांभाळायला ठेव..

गोपी आणि गजूला फक्त मिठीच मारली त्याने..

आणि शालनदीदीसमोर मात्र..

आजवरचा वीस वर्षांमधला सगळा धीर संपला साहूचा.. भर रस्त्यात सगळ्यांसमोर त्याने कदाचित बुधवारातील सध्याची सगळ्यात घाण वेश्या असलेल्या शालनदीदीच्या पायांवर रडत रडत डोके ठेवले..

दोघांनी क्षणभरच मिठी मारून एकमेकांच्या डोळ्यात पाहिले.. रेखाने पुन्हा साहूला मिठी मारली..

पाचही जणांनी एकमेकांना गच्च धरून ठेवले.. आणि शेवटी स्नेहा आणि भानूच्या भाचीने त्यांना वेगळे करून सांगीतले..

"पुलीस आ रही है.. भागीये भैय्या"

भैय्या! नेहानंतर ती हाक आज ऐकली होती साहूने.. श्रीनाथ टॉकीजच्या रस्त्याने त्याच क्षणी या रस्त्याला वळत असलेल्या निळ्या मेटॅडोरकडे पाहून साहू केदारी चौकाकडे पळाला..

एकच क्षण! केवळ एकच क्षण त्याने आपल्या गल्लीच्या दिशेला पाहून हात जोडले आणि मनातल्या मनात आपल्या आईला सांगीतले..

"मी सुड घेतला आई.. मी सूड घेतला"

आणि त्याचक्षणी समोर दिसत असलेल्या चालत्या पी.एम.टी. बसमधे त्याने उडी मारली आणि ..

पंचवीसच मिनिटांनी साहू स्टेशनवर पोचला होता..

कोणतीतरी शेअर गाडी घेऊन खिशातील होते नव्हते ते सगळे पैसे ड्रायव्हरला देऊन ...

साहू.. रेश्मा... थापा..

मुंबईला निघाले होते.. मिळेल त्या गाडीने रस्ते बदलत बदलत ते दुसर्‍या दिवशी ओरिसाला जायला निघणार होते..

फक्त त्यावेळेस त्यांना हे माहीत नव्हते की..

रेखावर प्रेम करून आपणही स्वतःला व्याधीग्रस्त करून घेतलेले आहे...

बुधवार पेठ अजूनही तशीच आहे.. तिथे हेच सगळे रोज होत आहे.. अनेक साहू आहेत.. अनेक ललिताच्या रेश्मा होत आहेत.. अनेक शालन नष्ट होत आहेत..

आपण छान जगतोय म्हणा.. आपल्या मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी डोनेशन देतो.. हॉटेलमधे जेवतो.. पिक्चर बघतो.. नवे घर घेतो.. लग्न वगैरे करतो.. आईला आई मानतो.. बहिणीला बहीण.. आपण...

आपण आणि ते...

मधे फक्त लक्ष्मी रोड... आपल्यासारख्यांनी जाताना मुरडलेली नाके बघायला लक्ष्मी रोड अजून तसाच पडलेला आहे....

सिटि पोस्टावरून पुढे गेलात तर साहूचे कथानक लक्षात ठेवा एवढ्च विनंती करू शकतो मी...

साहू... रेश्मा... थापा...

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २...

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २...

ही कादंबरी लिहीताना मला वास्तव समोर यावे म्हणून अनेकदा अश्लाघ्य उल्लेख लिहावे लागले याबद्दल मी सर्व वाचक व मायबोली व्यवस्थापनासमोर दिलगीर आहे.

मायबोली व्यवस्थापनाने मला ही कादंबरी प्रकाशित करू दिली याबद्दल मी ऋणी आहे.

सर्व सहृदय वाचक, प्रतिसादक व सुचना करणारे किंवा चुका सांगणारे यांच्या प्रेमळ प्रोत्साहनाशिवाय मी हे लिखाण करूच शकलो नसतो. त्यांचे आभार मानणे माझ्या क्षमतेमधे नाही.

-'बेफिकीर'!

अप्रतिम! पुन्हा एकदा हॅट्स ऑफ. या कादंबरीने अज्ञात, टाळू पाहणार्‍या विश्वाची ओळख करून दिलीत.
धक्क्यांवर धक्के बसत गेले, आशेचा किरण पण दिसला, माणसाच्या मनाचे अनेक पैलू कळाले.

जबरदस्तच.

हम्म... सूडनाट्य असे पूर्ण झाले तर.. कादंबरी खूप चटका लावणारी, पण काही ठिकाणी अतिरंजित वाटली.. कदाचित हे विश्वची वेगळे म्हणूनही असेल.
बर, आता पुढे काय लिहीणार?? Happy

अप्रतिम कादंबरी भूषणराव......... काहिसा फिल्मी .. परंतु समर्पक शेवट......

तुम्हाला अन तुमच्या प्रतिभेला.. सलाम !!!

डॉ.कैलास

संपली????
वेगळ्या,विचित्र विश्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद्.अजून साहू डोळ्यासमोरच आहे

आणि हो...... माबो त लॉग ईन होताना ,२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ चा पुढचा भाग वाचायचा आहे ही उत्सुकता मनात असायची..... आता उद्या पासून आम्ही काय वाचायचे????

डो.कैलास

उद्यापासून किंवा आजपासूनच कैलासराव.. ...

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप

आपल्या प्रतिसादांचे व सर्वांच्याच प्रतिसादांचे मनापासून अनेक आभार!

-'बेफिकीर'!

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप

धन्यवाद '' बेफिकिर''........ तुम च्या कदंबरीच्या प्रतीक्षेत ही एक वेगळीच मजा असते....
पुनश्च धन्यवाद.

डॉ.कैलास

@ रुपाली

'' नेहा'' करेक्ट आहे..... स्नेहा आत्ताची मुलगी आहे.... नेहा...... ट्रेनखाली मारण्यात आलेलि मुलगी होती जिला पळून जायला ''साहू'' ने मदत केली होती.

डॉ.कैलास

आणि खाली गल्लीत साहूची अत्यंत बदनामीकारक धिंड काढली तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्ण टॉकीजची गल्ली स्तब्ध झाली.>>> इथे कबीर पाहिजे ना??

वा बेफिकीर. एक अत्यंत वेगवान कादंबरी. तुमचे सादरीकरन उत्कृष्ट होते. मध्ये काहीशी फिल्मी वळनाची पण तरीही सुंदर. तुमचे लेखन वाचकांना नेहमीच वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणते.

बेफिकिर, खुपच सुन्दर लिहित तुम्ही... Amazing...
जर तुमच्या सारखी लेखन शैलि असति तर मनातल्या प्रतिक्रिया इथे शब्दात उतरवु शकले असते...
खरच सांगते, रोज office ला आल्यावर पहिले मायबोलि वर भाग आलाय का हे बघायची इतकी सवय लागलिये, कि २ दिवस भाग नाहि आला कि पुढे काय होणार आहे, या विचाराने रात्रि स्वप्नं पण तशिच काहितरि पडायची.... :):)
व्यसन लागलय तुमचा लिखाण वाचायचं..... झकासच.......

<< तोपर्यंत वरून स्नेहा आणि भानूची भाची या दोघीही धावत आल्या..

हे काय?? ... या गेल्याच नाहीत?? का???

का नाही गेल्या ?>>

का नहि गेल्या त्या?

बकि अप्रतिम कादंबरी बेफिकीर...
अप्रतिम वर्णन.. अप्रतिम कथा.. खुप आवडली..

बर झाल सम्पली. ही कादम्बरि कधी सम्पते अस वाटत होत. दिपुची सम्पु नये वाटायच. फर भयानक होती. पण वाचली बर का पुर्ण. मळमळुन यायच वाचताना. मला वाटत ह्यातच कादम्बरीच यश आहे.

अरे बापरे...विश्वास बसत नाहीये....शेवट बराच फिल्मी वाटला पण पूर्ण कादंबरी अफलातून...तोडच नाहीये.
तुमचा लिखाणाचा झपाटा तर काय बोलायलाच नको. पाठोपाठ तीन कादंबऱ्या आणि पुढच्या कादंबरीचा विषय तयार..म्हणजे अशक्यच आहात....
बेफिकीर असेच बेफिकीर लिहीत जा...या सगळ्या कथावस्तूंमागची तुमची कळकळ, तुमचा संदेश पोहोचतोय असे वाटते.
बाकिच्यांचे माहिती नाही पण मी तरी फार अस्वस्थ झालोय. प्रत्यक्षात कितपत उतरेल हे आत्ताच सांगू शकत नाही पण या नरकयातनेत खितपत पडलेल्या लोकांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा बळावली आहे.

खूपच वेगवान आणि उत्सुकतापुर्ण लेख आहे तुमचं. एका वेगळ्या विश्वाची ओळख झाली तुमच्यामुळे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

मलाही आवडली कादंबरी. नवीन भाग आला रे आला की उत्सुकतेने वाचून काढत होते. काही काही डिटेल्स खूप अंगावर आले पण विषयच असा होता त्यामुळे अपरिहार्यच होतं ते.

मला पण आवडली. आणि तुम्ही न चुकता रोज नविन भाग टाकत होता ते खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे वाचनातली लिंक न तुटता कादंबरी enjoy करता आली. नविन लेखनासाठी शुभेच्छा!

बेफिकिर,
आवडली कादंबरी.
रचना म्हणतेय त्या प्रमाणे अगदी नियमित नवीन भाग टाकल्यामुळे कंटिन्युटी राहिली.
वातावरण निर्मिती सुरेख होती सगळ्या भागांची.

वरच्या सर्वांशी सहमत !! कादंबरीचा वेग, बांधणी आवडली.
पुढील कादंबरीच्या प्रतिक्षेत.

बेफिकीर, वाचताना खरंच अंगावर काटा येत होता. अतिशय सुन्न करणारी होती कादंबरी.
तुमचा लिखाणचा वेग, वातावरण निर्मिती, सगळंच नेहेमीप्रमाणे उत्कृष्ठ. तुम्ही खूप जीव तोडून लिहीता हे तुमच्या सगळ्याच लिखाणात दिसतं.

आम्हा मध्यमवर्गीयांच्या विश्वापेक्षा वेगळं विश्व म्हणून ही कादंबरी कुतुहलानं वाचली..
काही गोष्टी मला शक्यतेच्या पलिकडल्या वाटल्या.. पण निवांत एसीत बसून माझं असं वाटून घेणं आणि ह्या अनोळखी विश्वातली शक्याशक्यता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात.

कादंबरी उत्कंठावर्धक तर आहेच - त्याचबरोबर, समाजातल्या ज्या घटकाचा कधी विचारही नव्हता केला, त्याचा विचारही करायला लावतेय.

ह्या विषयावरच्या धुंद रवीच्या 'कुमारिका' ह्या कवितेवर सायली आणि गिरीश कुलकर्णींनी टाकलेली माहिती (ही कादंबरी वाचून कुणाला काम करायची इच्छा झाली तर म्हणून टाकतेय.. बेफिकिर/सायली/गिरीश, तुम्हाला अस्थानी वाटल्यास सांगा, काढून टाकेन) :

प्रतिसाद सायली | 1 June, 2010 - 01:12
अहमदनगर मधे गिरिष कुलकर्णी नावाचा एक महान माणुस आणि त्यांचे काही सहकारी, वेश्या आणि त्यांच्या मुलांसाठी काम करतात. कामाबद्दलची कुठलिही माहिती नसताना, आर्थिक पाठबळ नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे काम सुरु केलं .आज जवळ्जवळ २० वर्ष हे काम चालु आहे. स्नेहालय नावाची त्यांची संस्था आहे. आज त्यांच्या कामाचं स्वरुप एवढं व्यापक आहे की नगर मधे एकही अल्पवयिन वेश्या नाही. एकही second generation वेश्या नाही. वेश्यांची मुलं,मुली शिकुन बाहेर पडुन स्वतःच्या पायावर उभी राहतयत, त्यांची लग्न होतायत. त्यांचं mostly १५ ते २० august शिबिर आहे. मला नक्की तारखा कळल्या की मि कळवेन. आणि हे काम ते सगळे जणं स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळुन , घर संसार सांभाळुन करतायत. त्या माणसाशी थोडा वेळ बोललं तरी खुप सहि वाटतं खरं म्हणजे शब्दांच्या पलिकडचं वाटतं, इतकं करुनही जमीनीवर पाय आहेत. इतकं करुनही खुप खुप करण्याची इच्छा आहे . प्रचंड तळमळ आहे. त्यांची भेट , त्यांचं भाषण ही फक्त अनुभवायची चीज आहे.
कोणाला इच्छा असेल तर स्नेहालयचा फोन नम्बर माझ्याकडे आहे.

प्रतिसाद गिरीश कुलकर्णी | 1 June, 2010 - 04:28

शिरीष/सायकोट : नगरच्या गिरीश कुलकर्णींना मीही ओळखतो. तुमच्या पोस्टच्या निमीत्ताने एक चांगली आठवण जागी झाली. आम्ही आमच ब्रांच ऑफीस नगरला सुरु होणार होतं त्यावेळची गोष्ट. सगळी करतात तस अशा उदघाटनात एक जंगी पार्टी -गाजावाजा वैगरे करणार असतील या अपेक्षेने मी शाखा सुरु करायला गेलो अन एक अविस्मरणीय आठवण घेऊन आलो. आमच्या लोकांनी पार्टी-गाजावाजा याऐवजी तो पैसा स्नेहालयच्या मुलांना द्यायच ठरवल होतं. याच श्रेय आमच्या लोकल मॅनेजर अन त्या टीमला... मला तिथे जाईपर्यंत माहीतच नव्हत की यावेळेस असा काही अनुभव येणारय म्हणुन. ऑफीसची फित कापून मग आम्ही स्नेहालयला गेलो अन तिथल सगळ बघुन जे वाटल ते शब्दात मांडणं कठीण.. मी एका ओझरत्या भेटीसाठी नगरला आलेलो ते चक्क रात्री अकरा वाजेपर्यंत स्नेहालयात थांबलो. कुलकर्णी , त्यांचे बंधु सगळे जातीन मला दाखवत होते. त्या चिमुरड्यांनी काढलेली स्पर्धेतली चित्र आजही मला आठवतात.. मी सगळी मोबाईलच्या कॅमेर्‍यात घेऊन आलो. कधी टाकीन माबोवर...
तिथल्या वास्त्यव्यात कुलकर्णींनी आपला प्रवास सांगितला अन मला आपण किती छोटे राहून गेलो याची जाणीव झाली. एकदा रस्त्यात मारहाण करुन टाकलेली बाई भेटते काय - तिला हे मदत करतात काय- मग दलाल अन सगळे कुलकर्णींना त्रास कसे देतात तिथुन ते स्वत:च्याच घरातल्या एका खोलीतुन हे काम सुरु करुन त्यांनी आता ते खुप मोठ्या पातळीवर नेलय. मला वाटत फिरोदियांनी दिलेल्या जमिनीवर स्नेहालय आता मोठ्या रुपात उभ आहे.मदतीचा ओघही वाढलाय. आता कुलकर्णींनी तिथे दवाखाना- शाळा सगळ केलय. एडसग्रस्त अन नॉर्मल मुलं असे दोन सहनिवास आहेत. अगदी परदेशातन लोकं येऊन तिथे दोन्-दोन महीने राहून श्रमदान करुन जातात अस कुलकर्णी सांगत होते. कुणा मायबोलीकरांना जायचे असल्यास तिथे रहायची सोय स्नेहालय परीसरातच आहे. रात्री त्या चिमुरड्यांबरोबर जेवतांना-खेळतांना तुम्हाला कळतं कुलकर्णींनी काय निर्माण केलय ते.

मला दरवर्षी स्नेहालयकडुन येणारं वाढदिवासाच्या शुभेच्छांच पत्र हे माझ त्यादिवशीच मोठ बक्षीस असत हे सांगणे नकोच

या वेळेस पुर्ण कादंबरी वाचल्यावर प्रतिसाद द्यायचा असे ठरवले होते !!
अ प्र ति म , मनाला भिडणारी, नि:शब्द करणारी, वेगळ्या विश्वाचे वास्तव समोर आणणारी सुरेख कादंबरी!!!! (माफ करा, मला अजुन वर्णन करण्यासाठी शब्द आठवत नाहिये!! )

रोज office ला आल्यावर तुमची कादंबरी वाचणे हा नित्यक्रम झालेला आहे! तुमच्या तिन्ही कादंबर्‍या अ प्र ति म!!!

हॅट्स ऑफ!! तुमचं लि़खाण फक्त माबो वरच नाही तर जगासमोर यावं असे मला वाटतं!
श्रीनिवास पेंढारकर - एक बाप >> अरे वा, वाट बघतेय..

Pages