२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः भाग १३

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2010 - 04:17

कुठे झाडेच लावा, कुठे खड्डेच खणा, अंग मोडेल अशी कामे! खायला अ‍ॅल्युमिनियमची जुनाट, पोचे गेलेली अस्वच्छ थाळी अन त्यात सकाळी नाश्त्याला एक रोट, दुपारी आमटी नावाचे पाणी अन दोन चपात्या अन एक चिक्की अन त्यानंतर एकदम रात्री एक पुन्हा त्याच थाळीत एखादी उसळ, गूळ आणि जीभेवर सहन न होणारी रोटी!

पंखा, बेड, असल्या गोष्टी रद्दच! उन्हाळा असेल तर रात्रभर अंगातील कुडता काढून हाताने हलवत डास पळवत बसत जागे राहायचे आणि थंडी असेल तर भिंतीला अंग चिकटवून गुडघे पोटाशी घेऊन कुडकुडत जागे राहायचे! पावसाळ्यात गळणारे छत अन माश्या!

सतत कुणाच्या न कुणाच्या मारामार्‍या, शिवीगाळ! कुणीतरी सुटून जायचा प्रयत्न करणे अन मग एका खास 'सगळा नक्शा उतरवणार्‍या अंधार्‍या अन खिडकी वगैरे नसलेल्या खोलीत' तीन दिवस अन्नपाण्याविना राहणे!

कारागृहात होता..... साहू.. रेश्मा.. थापा..

किती? .....चार वर्षे!

आपल्या चेंबरच्या आतील भिंतीवर पाल नावाचा प्राणी सापडणे ही अत्यानंदाची बाब होती तेथील कैद्यांच्या दृष्टीने! कारण ती पाल जिवंत जाळून तिचा धूर इनहेल केल्यावर त्यांना जगातील कोणत्याही ड्रगपेक्षा जास्त नशा व्हायची अन ती टिकायचीही काही तास!

गस्तीवरच्या हवालदाराकडून 'सुटल्यावर इतके इतके देईन' या वचनावर बिड्या, माचीस आणि कधीकधी.. चक्क बाटली..

स्त्री हा प्रकारच दिसत नसल्यामुळे जे काय करायचे असेल तर साथीदारांशीच..

त्यात दोन पार्ट्या! त्यांचे एकमेकांशी वितुष्ट! घाणेरडे, अस्वच्छ अन जवळपास मानसिक आघात झालेले विकृत कैदी! कुणी पाच वर्षांसाठी, कुणी दोन, कुणी दहा तर कुणी तहहयात..

केवळ विसाव्या वर्षी लाभलेले हे वातावरण साहूच्या मनावर आणखीनच विलक्षण आघात करून गेले.

मात्र... या चार वर्षात एक क्षणही असा नव्हता जेव्हा त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला होता.

भानू वॉझ डेड.. ही वॉझ किल्ड.. किल्ड बाय साहू..

साहूला आजही रात्री तो प्रसंग आठवला...

===================================

शालनदीदीने बाहेर बसून उच्चारलेले नाव आणि नुकतेच स्नेहाला पळवून आणण्याचा पश्चात्ताप होऊन पहिल्यांदाच दारू पीत असलेला साहू ...

तो क्षण.. अवर्णनीय क्षण होता तो....

काहीही चूक नसताना.. राउरकेलाच्या अत्यंत साध्या, गरीबीच्या मात्र निखळ आनंदाच्या जगातून माय लेकरे थेट पुण्यातील या नरकात पोचलेली होती पंधरा वर्षांपुर्वी.. राउरकेलाचा एक माणूस आला नव्हता या पंधरा वर्षात.. कुणाला कळलेच नव्हते की कळूनही आले नव्हते हेही माहीत नव्हते..

बुधवार पेठेच्या बाहेर एक आयुष्य आहे आणि त्यात एकेकाळी आपणही मोडत होतो ही भावना तुटलेल्या काचेच्या तुकड्यासारखी क्षणोक्षणी काळजाला टोचायची अन काळीज अदृष्यपणे बंबाळ व्हायचे.. ..

आईला काय दोष देणार? तीच बिचारी त्या राक्षसावर विश्वास ठेवून आलेली होती. तिला होतेच कोण स्वतःचे? आपण तीन चार वर्षाचे.. आपण निदान पुरुष तरी आहोत.. आपण आज वाटले तर इथून पळायचा प्लॅन तरी करू शकतो.. आईने काय करायचे? तेही बरोबर स्वतःचा अबोध मुलगा असताना?? काय करणार ती?? आपल्याला खायला मिळावे म्हणून बिचारीने इस्माईल अन गंगाबाईचा त्रास सहन केला, उपासमार सहन केली! नंतर वेलकमचे अत्याचार... आणि शेवटी वेलकममधेच मृत्यू... लाथा बुक्या खाऊन मृत्यू.. शेवटचा एक शब्द आपल्याशी बोलायलाही जिवंत राहिली नाही बिचारी... काय वाटले असेल तिला मार खाताना? कशी ओरडली असेल?? किती किंचाळली असेल?? की .. की शब्दच फुटू शकला नसेल?? आपल्या नावाने हाक मारली असेल का?? बेटा.. बेटा साहू.. मुझे बचारे... बहोत मार रहे है ये लोग मुझे... म्हणाली असेल?? केवळ तीस एक फुटांवर बाहेरच्या बाजूला आपण आहोत हे माहीत असून आपल्याशी संपर्क साधू शकली नाही ती... एक मात्र केले तिने.. आपण निदान जाणते होईपर्यंत तरी स्वतःला कसेतरी जगवले तिने... नाहीतर... आपल्या सहाव्या, सातव्याच वर्षी ती गेली असती तर.. काय झाले असते आपले???

आणि... हे सगळे ज्याच्यामुळे झाले तो ***** भानू आज... पंधरा वर्षांनी आला आहे डिस्कोवर...

पुढचा पेग ड्राय घशात ढकलून भयानक शिवशिवणार्‍या हातांना कंट्रोल करत साहू बाहेर आला.. आणि दोघांची नजरानजर झाली..

गोपी तिथे बसलेला होता. त्याला साहूची नजर पाहून परिस्थितीचे गांभीर्य समजले. हळूहळू पाय टाकत तो दारात, भानूच्या मागच्या बाजूला जाऊन उभा राहिला. कोणत्याही परिस्थितीत भानूला इथून व्यवस्थित जाऊ द्यायचे नाही ही प्रतिज्ञा त्याने स्वतःच्याच मनात केली.

साहू नावाचा हा मुलगा बाहेर आल्यानंतर एकंदर परिस्थितीत काहीतरी फरक पडलेला आहे आणि आपल्यावरचा फोकसच गेलेला आहे हे त्या भानूच्या भाचीला लक्षात आले. पण पळून जाणे शक्य नव्हते. ती फक्त टकामका बघत होती.

शालनदीदीने तिला जवळ घेतले. ती रडवेला चेहरा करून घाबरून बघत होती. पण शालनने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवल्यावर तिला जरा धीर आला. सगळेच त्या दोघींकडे बघत होते.

शालन - क्या नाम है तेरा?
ती - उमा
शालन - उमर?
उमा - सोला
शालन - मेरी उमर पता है बेटी?

उमाने नकारार्थी मान हलवली.

शालन - सैंतीस.. और मै तेरा सालकी थी जब आयी थी..

उमा अविश्वासाने शालनकडे पाहू लागली.

शालन - ये तेरा मामा है??
उमा - हं..
शालन - क्या बोलके उठाके लाया तुझे ये वहांसे..

आता उमा अबोल झाली. भानू बोलायला लागला. भानूला अजून साहूची भीती वगैरे वाटतच नव्हती.

भानू - ये राउरकेलाकी नही है.. ये बॉम्बेकी है.. मेरी बहन मरगयी.. इसका बाप दारूकेलिये मेरेसे पैसा लेता था.. बहुत कर्ज होगया.. फिर मैने पैसा देना बंद किया.. उसने पाव पकडलिये मेरे... फिर मैने इसके साथ ** लगाना चाहा तो उसने इसको मेरे पास भेजदिया.. बादमे मैने इसे वापस भेजाही नही.. आठ दिनके बाद सीधा फोरास रोड.. बाईस हजार कम लगे इसलिये तेरे पास लेके आया..

अतर्क्य राक्षसी विधाने करत होता भानू! आणि त्याच्या शब्दागणिक साहूच्या अनंत वेष्टने असलेल्या स्फोटक मनावर ठिणग्या पडू लागल्या होत्या. शालनच्या मनात स्त्री जातीचा, तेही जबरदस्तीने वेश्या बनवलेल्या स्त्रीचा प्रातिनिधीक राग ओसंडून वाहू लागला होता. पण चेहर दोघांचेही अजूनही शांतच होते.

त्यातच हे सगळे ऐकत असलेली रेखा जिन्यावरून पुढे दारात आली. भानूच्या मागे आता गोपी अन रेखा असे दोघे होते. गजू केव्हाच आत झोपायला गेलेला होता. दोन, तीन मुली इकडे तिकडे करत होत्या.

साहू गरजला..

साहू - गजूचाचा.....

पाचच सेकंदात गजू दचकून बाहेर आला. गजूचे शरीर पाहून आणि साहूचा आवाज ऐकून मात्र भानू हादरला. पण आपल्याला काही करतील असे मात्र त्याला वाटत नव्हते. तो पुढे येऊन बिनदिक्कत खुर्चीत बसला. गजू एकदा भानूकडे आणि एकदा उमाकडे पाहात म्हणाला..

भानू - क्या हुवा रे??
साहू - स्नेहा...

स्नेहाही पहुडलेली होती. ती धावत बाहेर आली. स्नेहाला याने का हाक मारली असावी हे शालनच्या लक्षात येत नव्हते.

साहू - स्नेहा.. ये तेरी सहेली है.. उमा.. तेरेसे एखाद साल छोटी होगी.. इसको लेके.. तुम दोनो गजूचाचाके साथ फरासखाने पे जाओ.. पवारसाहबको मिलो...आजके बाद डिस्कोपे जबरन धंदेवाली बनायी हुवी एकभी लडकी नही आयेगी.. डिस्को बंद होगया तोभी चलेगा.. जाओ...तुम दोनो आझाद होगयी हो.. अच्छी जिंदगी बसर करो...

भानू ताडकन उठलेला असतानाच आत्यंतिक चपळाईने साहूने बरोबर त्याच्या दोन मांड्यांमधे खच्चून लाथ घातली.

श्रीकृष्ण टॉकीजची अख्खी गल्ली क्षणभर स्तब्ध झाली भानूची भयानक किंकाळी ऐकून..

गजूने स्नेहा अन उमाचे पटकन मनगट धरले अन काही कळायच्या आत तो डिस्कोतून बाहेर पडलाही..

किमान तीन ते चार मिनीटे लागली भानूला भानावर यायला... आणि मग.. आपण उगाचच भानावर आलो असे त्याला वाटले..

गोपी नावाच्या 'जबरदस्तीने हिजडा म्हणून जीवन जगायला भाग पडलेल्या' मात्र वर्षानुवर्षांचा क्रोधाचा लाव्हा मनात जपणार्‍या पुरुषाने सगळा राग भानूवर काढला. त्याचा खरे तर काही संबंधच नव्हता. पण साहू अगदी लहान असल्यापासून त्याचे साहूवर प्रेम होते. आत्यंतिक प्रेम! आणि साहू आजवर नव्हता असा या माणसावर का चिडलेला आहे हेही गोपीला व्यवस्थित माहीत होते.

गोपीने पोटात मारलेल्या लाथांमुळे भानू जागच्याजागी ओकला आणि शेवटी तोंडातून रक्ताचा ओघळही बाहेर आला. निपचीत पडून श्वास घेणार्‍या भानूकडे अत्यंत विद्रूप रागीट चेहरा करून बघत असलेल्या साहूने त्याला उठवून कसाबसा उभा केला आणि भिंतीला टेकवला. डिस्कोवर कोणतेही हत्यार नव्हते. फक्त ललिता वेलकमवर रमासेठला अर्धमेला करून निघाली होती तेव्हा तिथून एक गज तिने हातात ठेवलेला होता तेवढा मात्र होता. साहूने तो गज स्वतःच्या खोलीतून आणला. कदाचित डोक्यात मारला असता भानूच्या तर चार, पाच फटके मारायला लागले असते कवटी फुटेपर्यंत! साहूने तो गज सर्व ताकदीनिशी भानूच्या पोटात खुपसला. एक साधा आवाजही... एक साधा आवाजही न करता भानू गजाला लटकत लटकत खाली घरंगळला आणि रेखा आणि शालनने जीवाच्या आकांताने ते भयानक दृष्य पाहून किंकाळ्या फोडल्या. रंगमहाल आणि जमाईराजाच्या सगळ्या मुली डिस्कोकडे धावल्या होत्या. साहू अजून पालथ्या पडलेल्या भानूवर भान सोडून वार करतच होता. वेडा झाला होता तो. पोटात गज आतपर्यंत घुसल्यावरच भानू गतःप्राण झालेला होता.

एका स्फोटकाची चुणूक बुधवार पेठेने पाहिली होती. डिस्कोतील सगळ्या मुली किंचाळ्या फोडत बाहेर धावल्या होत्या. गोपी डोक्याला हात लावून भयानक चेहरा करून भानूच्या पडलेल्या प्रेताकडे अन अजूनही वार करत बसलेल्या साहूकडे पाहात होता.

भानू पसरीचा... राउरकेला येथे स्थायिक असलेला आणि स्त्रीला वेश्या बनवून त्यावर गुजराण करणारा एक नरराक्षस खलास झालेला होता..

वार करून करून थकलेल्या साहूने शेवटी गज फेकला आणि खाली बसून तो भेसूर रडू लागला.. भावनेच्या भरात आपण काय केले याची जाणीव झाली होती त्याला.. आणि केवळ अर्ध्याच तासात साहूला अटक झाली..

त्या रात्री गजू, गोपी आणि भोला सोडले तर डिस्कोवर एकही मुलगी झोपली नाही. त्याच रात्री काय, पुढचे पंधरा दिवस कुणी आलेच नाही डिस्कोवर! नुसता तपास चालला होता. साहूवर खुनाचा आरोप सरळ सरळ सिद्ध होत होता. गोपीने एकही वार केला नाही हे साहूने ठासून सांगीतल्यामुळे अन डिस्कोकडे बघायला निदान गोपी तरी राहावा हे वाटल्यामुळे कुणीच गोपीबद्दल काहीही न बोलल्यामुळे गोपी निर्दोष समजून सुट्टाच ठेवण्यात आला होता.

साहूने झालेला प्रकार 'गोपीबद्दल अवाक्षर न काढता' तसाच्या तसा सांगीतल्यामुळे पोलीस कस्टडीत त्याला मारहाण वगैरे झालीच नाही. मात्र सगळ्या मुलींचे परवाने तपासले गेले. सगळ्यांकडे व्हॅलीड परवाने होते. त्यात पुन्हा स्नेहा अन उमाला साहूने सोडून दिलेले होते हे टायमिंगच्या दृष्टीकोनातून गजू आधीच फरासखान्यावर पोचला हे पाहून पोलिसांच्याही मनात किंचित सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच होता.

भानूच्या बाजूने कंप्लेंट करायला कुणीच नसल्यामुळे सरकारी पक्ष फिर्यादी झाला होता... आणि... साहूचे वकीलपत्र घेतले होते.... त्याला त्याच्या लहानपणी बाजा देणार्‍या.. नाना साठे या ग्राहकाने.. आणि नाना साठेच्या वकीलपत्रासकट सगळा खर्च उचला होता मुक्ती संघटनेच्या स्मिता जोशींनी...

केस उभी राहिली होती. फिर्यादी पक्षाने 'निष्पाप प्रौढाची क्रूर हत्या' असा आरोप ठेवून फाशीची मागणी केली होती.

आणि तीन महिन्यांनी नाना साठेचे जज्जांना उद्देशून असलेले समारोपाचे भाषण पेपरांमधून दुसर्‍या दिवशी जसेच्या तसे छापून आले होते..

" जज्जसाहेब, वरवर भांडणातून झालेला खून असे स्वरूप वाटणार्‍या या केसची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. पार्श्वभूमी नोंदवल्याशिवाय या केसकडे पाहणे ही कदाचित मोठी चूक ठरू शकेल. माझ्याकडून मी पुरावे अन नोंदी सादर केलेल्या असल्या तरी मी आधीच म्हंटलेले आहे की माझ्या अशीलाने गुन्हा कबूल केलेला आहे. त्यामुळे माझा अशील खुनी आहे की नाहीच असे माझ्यादृष्टीने या केसचे स्वरूप नसून आपल्या शासनप्रणालीतील कायद्यांमधील अनंत पळवाटांमुळे एखादा निरागस मुलगा पुढे खुनी कसा होतो असे या केसचे स्वरूप आहे.

साहू शामन थापा असे या तरुणाचे खरे नाव! शामन म्हणजे त्याचे वडील साहू केवळ दोन वर्षांचा असताना वारले. साहूची आई ललिता आणि साहू या जगाच्या पाठीवर एकाकी झाले. शामनला कुणीही नातेवाईक नव्हते. ललिता या स्त्रीचे माहेर आसाममधे होते. घरची गरीबी असल्यामु़ळे एकदाच्या मुली उजवून टाकल्या कॉ आपण मोकळे झालो या विचाराने ललिताचे तिच्या तेराव्याच वर्षी लग्न झाले होते आणि ती पंधरा किंवा सोळा वर्षांची असताना साहू हा मुलगाही तिला झाला.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या शासनाच्या सर्व योजना कुचकामी ठरल्याचे आपण सगळेच पाहतो. त्याचप्रमाणे बालवयात मुलीचा विवाह होऊ नये यासाठी असलेल्या योजनांचे मोठमोठाल्ले फलक पुणे अन मुंबईसारख्या शहरात जागोजागी असतात, पण ओरिसातील राउरकेलासारख्या गावात या फलकांना जागाच मिळत नाही. आणि मिळाली तरी कुणी वाचत नाही अन वाचले तर अंमलात तर काहीच येत नाही.

साहेब, सतरा ते अठरा वर्षाच्या विधवेने, जिला एक दोन वर्षांचा मुलगा आहे आणि नवर्‍याने मरताना काहीही फारशी बचत मागे ठेवलेली नाही.. तिने सरकारकडे उदरनिर्वाहाच्या किंवा संरक्षणाच्या साधनाची मागणी करण्यासाठी दार ठोठावले तर तिला काय मिळू शकेल? कुठेतरी हैदराबाद किंवा पंजाबातील विधवा मंडळात काम वगैरे! म्हणजे जिथे आपले कुणीच नाही तिथे निघून जायचे! मग अशा विधवेने काय करायला हवे? कुणाकडेच ठोस उपाय नाही.

ललिताने दुर्दैव स्वीकारून शामन होता त्याच कामावर कमी पगारात नोकरी स्वीकारली. शेजार्‍यापाजार्‍यांच्या जीवावर साहूला ठेवून ती बिचारी दहा दहा तास राबायची. साहू लहान असल्यामुळे तो एक जबाबदारीच होऊ शकत होता. बाकी काहीच होणे त्याला त्या वयात शक्य नव्हते.

सहा महिने हाता तोंडाची गाठ कशीबशी घालताना ललिताच्या मनातील तारुण्यसुलभ भावना संपून गेलेल्या होत्या. उरलेले आयुष्य हे केवळ कसेबसे जगायचे आहे हा विचार प्रामुख्याने तिचे मन व्यापू लागला होता.

त्यातच तिची ओळख मयत भानू पसरीचा याच्याशी झाली. मुळचा पंजाबी असलेला हा माणूस ललिताहून दहा वर्षांनी मोठा होता. ज्या कंत्राटदाराकडे ललिता कामावर होती त्या कंत्राटदाराचा मित्र असलेला भानू आता ललिताला पाहायला रोजच तिथे यायला लागला. हळूहळू तिच्याशी बोलायला लागला. साहेबांचे मित्र म्हणून सुरुवातीला आदराने बोलणारी व वागणारी ललिता हळूहळू भानूच्या तोंडातून खास आपल्यासाठी बाहेर पडणारे स्तुतीचे शब्द ऐकायची वाट पाहू लागली.

मानवाने मानवासाठी केलेल्या कोणत्याही कायद्यांपेक्षा निसर्गाचे कायदे श्रेष्ठही असतात व ते लागू होणे न होणे हे मानवाच्या नियंत्रणातही नसते.

ललिता आता रोजच कामावर जाण्यात जास्त रस घेऊ लागली कारण तिला उद्देशून भानू एखादेतरी चांगले वाक्य बोलायचाच! कोणत्या स्त्रीला आपल्याला सुंदर म्हंटलेले आवडत नाही? त्यात ललिताला तर कुणीच नव्हते. रोजच दिसणारा भानू हा आपल्यापेक्षा वयाने व पैशांनी खूपच मोठा असला तरीही वागायला अतिशय सभ्य व चांगल्या कुटुंबातील आहे हे ललिताने जाणलेले होते.

हळूहळू ललिता भानूच्या कह्यात येऊ लागली. आता तीहूनच त्याच्याशी काही ना काही बोलू लागली. कंत्राटदाराच्या नजरेआड बाहेर त्यांच्या भेटी सुरू झाल्या.

आणि ललिताने समाजापासून लपवून स्वतःचे असे एक आयुष्य निर्माण केले ज्यात फक्त ती, साहू आणि भानू होते. तिने मनाने भानूला सर्वस्व अर्पण केलेले होते.

दोन, तीन महिन्यातच भानूचे रग कळायला लागले. कधी अती मद्यपान तर कधी वादविवाद! शेवटी मद्य सोडण्यासाठी मदत करणारी एक मोठी संघटना पुण्यात आहे असे सांगून तिघेही पुण्यात आले आणि बुधवार पेठेत असलेल्या डिस्को नावाच्या इमारतीतील गंगाबाईशी भानूने ललिताच्या देखत अकरा हजार रुपयांचा सौदा करून ललिताला तिच्या मुलासकट म्हणजे आरोपीसकट बुधवारात विकून टाकले.

आपला कायदा, आपले कायदेपंडीत आणि आपल्या सर्व यंत्रणा .. ही घटना घडली तेव्हा त्यापासून पुर्णपणे अनभिज्ञ होत्या. हे साहजिकही आहे. तक्रारच झाली नाही तर यंत्रणेला समजणार कसे??

मात्र.. तक्रारच होऊ शकत नाही अशा घटना घडत असतात आणि त्या घटना घडवणारे आणि तक्रार होऊ न देणार लोक या जगात असतात हे तपासून सिद्ध करायला मात्र आपल्या यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरल्या.

रोजच्या रोज वेश्यावस्तीत गस्त घालणारे हवालदार आहेत, संघटना आहेत, सामान्य नागरिकांनाही सगळे दिसतच असते. ललिता अन साहूला जबरदस्तीने या नरकात ढकलले गेले आहे ही घटना, हा सगळ्यात मोठा गुन्हा तब्बल वीस वर्षे लपतो??? कसा काय लपतो?? आरोपी आरोपी कसा झाला हे तपासायची इच्छाच फिर्यादी पक्षाला नाही हे दुर्दैवी आहे.

आपल्या कुटुंबातील मुलींकडे पाहून कुणी शिट्टी मारली तर आपण धमक असली तर जाब विचारू शकतो. ललिताने काय करायचे?? ना सरकारी पक्षाकडे उत्तर ना डिपार्टमेंटकडे!

आपण जिथे आणलो गेलो आहोत त्या बुधवार पेठेपासून केवळ हाकेच्या अंतरावर फरासखाना नावाचे मोठे पोलीस स्टेशन आहे ही माहितीसुद्धा ललिताला नसेल अन तिला एका खोलीत अडीच दिवस अन्नपाणी न देता कोंडून ठेवले असेल अन कोठेवाल्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केले असतील आणि तिच्या देखत तिच्या मुलाचाही अमानवी छळ झालेला असेल तर जज्जसाहेब... कोणती आई असेल जी स्वतःचे मन मारून स्वतःच्या मुलासाठी वेश्याव्यवसाय स्वीकारणार नाही?? कोणती आई??

पाच वर्षाच्या साहूला हेही कळत नव्हते की आईची इथे राहण्याची इच्छा आहे की नाही?? पहिल्या दिवसापासून त्याने आईला रोज वेगवेगळ्या माणसांची शेज सजवताना पाहिले आहे. आपल्या घरातील मुले काय करतात? तिन्हीसांजा झाल्या की रामरक्षा म्हणतात, पाढे म्हणतात, शुभंकरोती म्हणतात! साहू काय करायचा? आईकडे आज नवीन गिर्‍हाईक आले आहे म्हणून डिस्कोवरून उतरून श्रीकृष्ण टॉकीजपाशी जाऊन इतर बायकांना निरखणे अन त्याच वातावरणाला स्वतःच्या रक्तात भिनवणे एवढेच करू शकायचा तो.

रोज उठल्यापासून अत्यंत गलिच्छ परिसर, अत्यंत अस्वच्छ खाद्यपदार्थ, अत्यंत अश्लील, ग्राम्य भाषा आणि शिव्या, रोज आक्रोश, रोज मारामार्‍या, रोज किळस येईल असे सजणे, शिक्षणाचा पत्ता नाही, पैसे मिळवण्याचा एकच मार्ग उरलेला तो म्हणजे दलाली, पुरुषांना तृतीयपंथी बनवून जबरदस्तीने धंदा करायला लावणे, आई या नात्याची आईला कित्येकदा नग्नावस्थेत पाहिल्यामुळे सगळी शुद्धताच गेलेली...

काय होणार साहू? कोण होणार?

आज फिर्यादी पक्षाने त्याला गुन्हेगार ठरवून टाकले. अमानवी, राक्षसी, सैतान, हैवान अशा पदव्या बहाल केल्या. कुणी निर्माण केला हा हैवान.. हा सैतान??

साहेब, खून व्हायच्या पाचच मिनिटे आधी मयताने विकायला आणलेल्या त्याच्या भाचीला साहूने फरासखान्यावर पाठवून सोडून दिलेले होते. ही हैवानीयत आहे? हा राक्षसीपणा आहे?

आणखीन एक इमारत आहे वेलकम नावाची! तिथल्या एका स्नेहा नावाच्या लहान मुलीला पैसे देऊन तिथून सोडवून आणून फरासखान्यात पाठवले साहूने.. हे अमानवी कृत्य आहे? की तिला त्या वयात शरीरविक्रय करायला लावणे हे अमानवी कृत्य आहे. की असे करणार्‍यांवर काहीही लक्ष न ठेवणे ही आपल्या यंत्रणांची बेजबाबदार वागणूक आहे?

आधीच सांगीतल्यानुसार भानू हा तोच माणूस होता ज्याच्यामुळे साहू या नरकासमान विश्वात ढकलला गेलेला होता. असा हा भानू आणखीन एका अशाच अबोध मुलीला विकायला पुन्हा आलेला पाहताच साहूचा भडका उडाला.

मला कुतुहल आहे हे जाणून घेण्याची की त्या भानूच्या भाचीला आणि स्नेहाला पाचच मिनिटे फरासखान्यावर पाठवून सोडून दिलेले असताना फरासखान्यावर त्यांच्या सुटकेसाठी काय प्रयत्न झाले??

काहीही प्रयत्न झाले नाहीत जज्जसाहेब! काहीही प्रयत्न झाले नाहीत. त्या मुलींकडे लक्षही दिले गेले नव्हते वीस मिनीटे! मात्र खून झाल्याचे कळताच सगळी यंत्रंणा डिस्कोत धावलेली होती.

मग जर खून वगैरे न करता, एवढेच काय साधा हातही न उगारता साहूने केवळ पोलीसकंप्लेंट केली असती की असा असा भानू नावाचा एक माणूस स्वतःच्याच अजाण भाचीला विकायला माझ्याकडे आलेला आहे तर काय झाले असते??

प्रत्यक्ष मुली चौकीवर येऊन जिथे त्यांच्याकडे लक्षच न देणारी यंत्रणा आपण सांभाळतोय आणि पोसतोय तिथे साहूच्या त्या तक्रारीला काय वाचा फुटली असती हे जाणून घ्यायचे मला फार कुतूहल आहे.

तरीही खून तो खूनच आहे हे वाक्य फिर्यादी पक्ष बोलणारच! माझा प्रश्न असा आहे की साहू आणि ललिताच्या निरागस भावविश्वाचा खून झाला तेव्हा फिर्यादी पक्ष काय बोहल्यावर चढलेला होता? फरासखान्यावरील सगळे वर्दीवाले आपापल्या बायकोच्या मिठीत झोपले होते?? की बुधवारातच लाईन मारत हिंडत होते?? आज खटला दाखल करतायत! खून झाला म्हंटल्यावर सगळ्या स्त्रियांचे परवाने वगैरे लगेच तपासले. कुणी हे तपासले असेल तर कृपया मला दाखवावे की त्या स्त्रीला इथे आणताना तिच्या इच्छेने आणले होते याचा पुरावा तिच्याकडे किंवा कोठेवालीकडे सापडला का???

न्याय! न्यायदान! मोठे मोठे शब्द!

जज्जसाहेब, मी स्वतः ग्राहक म्हणून बुधवार पेठेत अनेकदा गेलेला माणूस आहे हे विधान कदाचित खळबळ माजवेल. पण मी या स्त्रियांचे आयुष्य जवळून पाहिलेले आहे. न्यायदानाच्या पुस्तकांमधे पानेच्या पाने शोधून न्याय करण्याची आपल्या न्यायदान यंत्रणेची स्वतःचीच पात्रता नाही. कारण पुरावे लागतात, साक्षी लागतात!

पुरावे पाहून, साक्षी ऐकून, ज्युरींची मीटिंग बोलवून, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आणि चहा पिता पिता अन सिगारेट ओढता ओढता काय निर्णय द्यायचा ते ठरवून बुधवार पेठेत अत्यंत अमानवी आणि अन्यायकारक पद्धतीने आणल्या जात असलेल्या लहान वयातील मुलींवर आणि त्यांच्या अनैतिक मुलांवर आपली यंत्रणा न्याय करू शकत नाही हे आपला पूर्ण सन्मान ठेवूनही मला खेदाने म्हणावेसे वाटते.

पुणे शहरात बलात्कारांचे आणि छेडाछेडीचे प्रमाण इतर सर्व शहरांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे महत्वाचे कारण हे आहे जज्जसाहेब की असे गुन्हे करणार्‍यांना स्वतःच्या फँटसीज अ‍ॅप्लाय करायला बुधवार पेठ पुणे ४११००२ हे ठिकाण उपलब्ध आहेत. येथे खूप ललिता आहेत. खूप साहू आहेत.

आजवर एक लहान मुलगी, जिचेह नाव ललिता होते, तिला तिच्या लहान मुलासकट बुधवारात विकणारा आणि दुसर्‍या लहान मुलीला म्हणजे स्वतःच्याच भाचीला पुन्हा विकायला आणणारा भानू पसरीचा हा खरा आरोपी असायला हवा याकडे आपली यंत्रणा डोळेझाकच करणार हे उघड आहे कारण.. ती पुस्तकांवर चालते. आणि आयुष्य खरे असते. प्रत्यक्ष असते. ते पुस्तके वाचून जगता येत नसते. आयुष्य पुस्तकांवर चालू शकतच नाही. भानू पसरीचा मेला ही आपल्या समाजासाठी झालेली अत्यंत चांगली घटना आहे.

वास्तविक मी असतो तर साहूचा जाहीर सत्कार केला असता किंवा त्याला निवडणूकीचे तिकीट मिळावे अशी शिफारस केली असती.

माझे आरोपी पक्षाकडून केलेले हे समारोपीय भाषण म्हणजे साहूला निरपराध ठरवण्याचा कुचकामी प्रयत्न नसून साहू असा का झाला आणि मयत मरणेच कसे चांगले होते हे सांगण्याचा समर्थ प्रयत्न आहे. तसेच, आपल्या दुबळ्या यंत्रणेला असे खून का होतात हे जाणून घ्यायची इच्छाच नसून उलट पुस्तकात सांगीतल्याप्रमाणे समोर आलेल्याला शिक्षा द्यायचा सोपा मार्ग हवा असतो हे सिद्ध करण्याचा समर्थ प्रयत्न आहे.

जज्जसाहेब, आरोपी साहू शामन थापा याने मयत भानू पसरीचाला मारून न्यायदानाच्या कामात आधीच मोलाचा वाटा उचललेला आहे. हे करायला हवे होते आपल्या पोलीस खात्याने आणि तेही केव्हाच! पंधरा वर्षे झोपा काढून अन खून ह्झाल्याशिवाय हलायचेच नाही अशी पॉलिसी धारण करून काय न्यायदान होणार!

आता त्याला काय न्याय मिळतो हा प्रश्न राहिलेला आहे. सर्वांदेखत, रागाच्या भरात, पोलादी गज निर्दयपणे भानूच्या पोटात खूपसून भानूला मारणे हे कृत्य निश्चीतच एक क्रूर खून म्हणून प्रोजेक्ट केला जाऊ शकेल आपल्या समाजासमोर! मात्र त्या क्रौर्याला जन्म देणारा भानूच होता, कारणीभूत भानूच होता, भानू हा एक राक्षस होता, एका निरागस आई मुलाच्या आयुष्याचा व माहीत नाही आणखीन किती जणांच्या आयुष्याचा त्याने नरक बनवलेला होता.

साहूने केलेले कृत्य आयुष्यभर मनात साठलेला क्रोधाचा लाव्ह्याला आऊटलेट मिळाल्याने केले. साहूचे या समाजावर, समाजातील कदाचित कित्येक अजाण तरुणींवर आणि त्यांच्या कुटुंबावर अतोनात उपकार झालेले आहेत.

साहूला कायद्यानुसार शिक्षा मिळणार हे वकील म्हणून मलाही ज्ञात आहेच. पण ही शिक्षा अशी असावी एवढीच विनंती की साहूला पुन्हा एक सामान्य नागरिक व सुजाण नागरीक म्हणून आयुष्य व्यतीत करण्याची संधी देणारी असावी! "

ना साठे खाली बसले तेव्हा मुक्ती संघटनेच्या सभासदांनी सुरू केलेला टाळ्यांचा कडकडाट मग सगळ्यांनीच उचलून धरला आणि कोर्टाच्या बाहेरही ऐकू गेला.

सहा वर्षे! सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली साहूला..

आणि आज सकाळी दहा वाजता ध्यानीमनी नसताना चारच वर्षे झालेली असताना एक हवालदार गजांपाशी येऊन म्हणत होता..

"ए.. उठे.. शिक्षा संपली तुझी.. जा आता.. मूळ गावी जा अन नीट जग.. नोकरी बिकरी कर जरा.. "

आठ तासांनी सर्व फॉर्मॅलिटीज संपवून बाहेर आलेल्या साहूने रिक्षात बसत सांगीतले..

"२०३ डिस्को, बुधवार पेठ"

हबकलेला रिक्षावाला सुसाट निघाला बंडगार्डन पुलावरून...

२०३ डिस्को.. नक्षाच पालटला होता इमारतीचा..

अख्खी गल्ली दाढी अन केसांचे जंजाळ वाढलेल्या अन डोळे खोल गेलेल्या साहूकडे धक्का बसून पाहात होती. रंगमहाल अन जमाईराजा हे वाडे तसेच होते अजून.. भीमची भज्यांची गाडीही तशीच होती. संध्याकाळचे सात वाजलेले होते..

जिना चढून साहू वर पोचला तेथे कबीर बसलेला होता..

कबीरने साहूला बरेच क्षण निरखून पाहिले.. आणि मग ओळखले..

कबीर - अरे?? साहू?? आगया तू??

खरे तर कबीर वचकलेला होता. नाही म्हंटले तरी साहू एक खून पचवून पुन्हा पाचच वर्षात सरळ तिथेच आलेला होता. मात्र आत्ताची त्याची अवस्था बघता याक्षणी तो काही करेल असे मुळीच वाटत नव्हते.

साहू खोलीचे निरीक्षण करत होता. हे अपेक्षित होतेही! साहू निघून गेल्यावर एकट्या शालनदीदी आणि गजूच्या जीवावर डिस्को कितीवेळ चालणार! साहूने स्नेहाला पळवून पराक्रम केल्यामुळे अमजद वचकून तरी होता. तसेच मुंगूसला साहूने आत घालवलेले असल्यामुळेही वचकून होता. पण नंतर कोण घाबरणार?

साहू - शालनदीदी कहां है??

कबीर खूप वेळ हसला आणि टिचक्या वाजवत त्याने आपला उजवा हात आकाशाकडे नेला..

साहू कोरड्या ठण्ण डोळ्यांनी बघत होता. एक अश्रूही नाही.

साहू - किसने मारा?

ती मेली म्हणजे कुणीतरी मारलेलेच असणार असा त्याचा समज झालेला होता.

कबीर - मारनेकी जरूरत नही पडी.. सड गयी थी.. अपनेआप मरी..
साहू - और रेखा??
कबीर - जमाईराजामे सड रही है वो भी.. भूखी रहती है.. महिनोंमे कोई नही जाता उसके पास..
साहू - गोपी???
कबीर - वेलकमके तयखानेमे.. एक हाथ टूटा है..
साहू - कैसे??
कबीर - अमजदभाईपे हाथ उठाया था उसने..
साहू - और... गजू चाचा??
कबीर - हमारे साथ काम करता है..
साहू - क्क्या???
कबीर - दुगने पगारपे..

साहू विषण्ण मनाने जिना उतरायला लागलेला असताना वरून कबीर म्हणाला..

कबीर - वो तेरेको साडी पहनायी थी वैसे पहनेगा क्या?? दो चार ग्राहकतो आयेंगेही दिनके..

जिना उतरून भीमच्या गाडीवर एक प्लेट भजी खाऊन साहू जमाईराजाकडे वळला. नवीन मुली, ज्या दारात होत्या, त्यांनी त्याला हाकलून द्यायचा प्रयत्न केला. कारण तो अत्यंत ओंगळवाणा दिसत होता. पण त्याने 'रेखा' हा एकच शब्द तोंडातून काढल्यावर त्यांना गेल्या पाच वर्षात रेखाने सांगीतलेले सगळे किस्से आठवले अन गुपचूप त्यांनी त्याला वाट दिली. हा साहूच असणार याबाबत त्यांना क्षणभरही शंका वाटलेली नव्हती. एका मर्डररला कसे अडवणार आपण??

रेखा... तब्बल चार वर्षांनी दिसलेली रेखा.. खरे तर दिसत जवळजवळ तशीच होती पण... तिचे शरीर आतून पूर्णपणे सडलेले असणार याची साहूला कल्पना होती... आणि तिने त्याला पाहिले आणि त्याही परिस्थितीत दोघांनी एकमेकांना घातलेले आलिंगन अख्ख्या जमाईराजाला हलवून गेले. एक डोळा नव्हता ज्यात पाणी आले नव्हते..

दुसर्‍या दिवशी दाढी, आंघोळ आणि व्यवस्थित नाश्ता करून साहू जेव्हा जमाईराजाच्या दारात आला तेव्हा.. कबीर वरून खिडकीतून त्याच्याकडे बघत कुत्सित हसत होता...

साहू पच्चकन जमीनीवर थुंकला आणि म्हणाला..

त्यानंतर साहू जे म्हणाला त्यात कोणतीही दर्पोक्ती नव्हती. खिशातून कंगवा काढून सहज केस विंचरावेत अशा आविर्भावात त्याने वाक्य उच्चारले होते. एकदम ऑथोरिटेटिव्हली..

साहू - पाच दिनमे डिस्को चलाने आ रहा हूं मै कबीर... साडी पहननेकी आदत डाल.. तुझे छक्का बनाया तो कमसेकम तेरा आधा खर्चा तो निकलेगा..

भीमच्या भज्यांच्या गाडीपासून ते श्रीकृष्ण टॉकीजपर्यंत...

जेवढ्या मुलींनी आणि येणार्या जाणार्‍या ग्राहकांनी हे वाक्य ऐकलं होतं ते सगळे खदाखदा हसत होते..

साहूच्या मागे उभ्या असलेल्या जमाईराजाच्या सगळ्या मुली तर हे धाडस बघून अवाकच झालेल्या होत्या..

आणि रागाचा आविर्भाव जरी तोंडावर दाखवत असला तरी मनातून धसकाच घेतलेल्या कबीरने जेव्हा खाडकन स्वतःची खिडकी बंद केली तेव्हा... साहूच्या मागच्या बाजूने एक खांद्यावर पडला त्याच्या..

"बनायेगा??? बनायेगा उसको हिजडा?? सचमुच बनायेगा??? मै मदद करुंगी तेरी ... जो बोलेगा वो करुंगी.. स्साल्ला ***** कबीर... बना उसको हिजडा साहू.. बना उसको हिजडा...."

वय वाढल्यानंतर उपयोग संपल्यामुळे वेलकमवर अमजदकडून अतीव छळ झाल्यामुळे कायमची पळ काढून जमाईराजावर आलेली .... सलोनी... काल रात्री पासून दिसलीच नव्हती साहूला..

गुलमोहर: 

वाचतानाच काटा येतोय्..प्रत्यक्ष अशी वस्ती दिसली तर दुसरीकडे मान फिरवून आपल्या मार्गाने जाणारे आम्ही ... पण आता तुमच्यामुळे अगदी वेगळ्याच विश्वाची ओळख होत आहे..

(लाईटली घ्यावेत कृपया) - मीही मान फिरवूनच जातो, पण लिहावेसे मात्र वाटले. आपल्या सच्च्या प्रतिसादाचे अनेक आभार! 'श्वे', आपलेही आभार!

-'बेफिकीर'!

काल स॑ध्याकाळी ऑफीस मधुन निघायला उशीर झाला....रात्रीचे ९:१५-९:३० झाले असावेत..... माझी गाडी (उशीर झाल्यावर कार ड्रॉप असतो) बुधवार पेठ २ च्या अगदी जवळुन चालली होती....आणि एकदम माझी नजर ललिता आणि साहूला शोधायला लागली....
....बेफिकीर तुमच॑ लेखन अतिशय जबरदस्त आहे......सगळीच्या सगळी पात्र॑ जिव॑त झाली आहेत्....आपली वाटायला लागली आहेत॑.....
पण॑ आता थोड॑ थोड॑ वाईट॑ वाटत॑य्.....कथा शेवटाकडे जी चाललीय॑.....

प्रतिसाद देयचा होताच. उशिर केला.

छान लिहिता. आपल्या छोट्या छोट्या दुखापेक्षा हे वास्तव भयानक आहे.

सॉरी, थोडंसं विषयांतर!... मला माहीतेय की तुम्ही आतापर्यंत डिस्कोच्या लिखाणात आकंठ बुडाला होतात... आणि ही लेखमालिकाही १-२ भागांत संपेलच... नवीन विषय डोक्यात आहे? क्या करे चस्का लगा है एक के बाद एक्...पढनेका...

एक बाप! >>> आश्चर्याचा सुखद धक्का बसलेली बाहुली... Happy

जनरली जूनच्या तिसर्‍या आठवड्यात फादर्स डे असतो... आणि त्याच दरम्यान तुमची ही कादंबरी चालू झाल्यास खूप आनंद होईल.

बाप रे! मध्ये बापाचा धाक आणि आई गं! मध्ये आईचं कळवळणारं ह्रदय या गोष्टी कोणीही न शिकवताच आपण शिकतो... पण त्या धाकाच्या मागे लपलेलं अपार प्रेम आपल्याला कळत नाही जेव्हा आई तुम्हाला जन्माला घालताना अतीव वेदनांशी झुंजत असता, तेवढ्याच अस्वस्थपणे बाहेर येरझार्‍या घालणारा बापच असतो...

नजरेत तरळणारा अभिमान जाणवत नाही जेव्हा तुम्ही उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे पार करत असता...
तुमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणारा बापच असतो....
आपली स्वप्ने आपल्या मुलांच्या रूपाने पूर्ण होण्याची आस बाळगणारा बाप असतो...
मुलगी सासरी निघाली की लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडणाराही एक बापच असतो...

मी मुलगी असल्याने "बाबा" या शब्दाशी जास्त अ‍ॅटॅच्ड आहे कदाचित.... खूप खूप वाट पाहतेय नवीन कादंबरीची...
धन्यवाद!

befikir,

wait watale hote ki ata 2 kiwa 3 ch part aahet manun, pannnnnn
khup chan watale ki navin kadambari aahe Happy

kharach wed lagale aahe, tumhi lihawe ani amhi wachawe- he asech aayush aasawe ase watate.

ha hi bhag agdi maet jamlay, ata ajun wachato sahu kahi kartoy te, Disko parat milawanya sathi Happy

मानवाने मानवासाठी केलेल्या कोणत्याही कायद्यांपेक्षा निसर्गाचे कायदे श्रेष्ठही असतात व ते लागू होणे न होणे हे मानवाच्या नियंत्रणातही नसते.

खरय्.....अगदी....