उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ९ - 'चांग-ला' आणि पेंगॉँग-सो ... !

Submitted by सेनापती... on 21 August, 2010 - 07:21

कालच्या थोड्या विश्रांतीच्या दिवसानंतर लडाखमध्ये समरस होत आलो होतो. आज एक मोठे लक्ष्य गाठायचे होते. जगातील तिसरा सर्वोच्च रस्ता 'चांग-ला' (१७५८६ फुट) फत्ते करून भारत - चीन सीमेवरील 'पेंगॉँग-सो'चे सौंदर्य अनुभवायचे होते. 'सो' (त्सो) म्हणजे तलाव. लडाखमधल्या प्रेक्षणीय स्थळापैकी महत्वाचा असा हा लेक आज आम्ही बघणार होतो. पहाटे-पहाटे ४:३० वाजता उठलो आणि आवरा-आवरी केली. चहा-कॉफी बरोबर ब्रेड-बटर पोटात ढकलले. ५ ला निघायचे होते ना. पण सर्वांचे आवरून गेस्टहाउस वरुन निघायला ५:४५ झाले. तसा फ़क्त ४५ मिं. उशीर झाला होता पण ही ४५ मिं. आम्हाला चांगलीच महागात पडणार होती. का म्हणताय... पुढे कळेलच की. अजून एक मिनिट सुद्धा न दवडता आम्ही पुन्हा एकदा मार्ग घेतला मनालीच्या दिशेने. कालपासून आम्ही गाडी बदलली होती. नवा ड्रायव्हर लडाखी होता.

६:१५ च्या आसपास पुन्हा एकदा शे आणि ठिकसे गोम्पा पार करत आम्ही 'कारू'ला पोचलो. चीन सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या ह्या मार्गावरची ही पहिली चेक पोस्ट. पहाटे-पहाटे आम्ही तेथे पोचलो तेंव्हा सर्व जवान परेडसाठी निघाले होते. आर्मी ग्रीन कलरचे वुलन जॅकेट आणि वुलन कैपमध्ये ते सर्वजण एकदम स्मार्ट दिसत होते.

तिथून पुढे निघालो आणि थोड़े पुढे जातो न जातो तो मागुन अमेय साळवी आम्हाला जोरात हार्न देऊ लागला. मी थांबलो पण अमेय म्हात्रे बराच पुढे निघून गेला होता. मला वाटले बाइकला परत काही झाले की काय. पण नाही, अभीने मागुन फोन केला होता की परमिट क्लिअरन्ससाठी त्याला पुन्हा कारू पोस्टला मागे जावे लागेल. बायकर्सना थांबवले नव्हते आर्मी पोलिसांनी मात्र त्यांनी गाडी अडवली होती. अमेय म्हात्रे तर पुढे निघून गेला होता पण मी आणि अमेय साळवी तिकडेच थांबलो. आमचे बाइक नंबर्स अभीकडे असल्याने आम्हाला मागे जायची गरज नव्हती. बराच वेळाने पुढे गेलेला अमेय म्हात्रे परत येताना दिसला. बहुदा त्याला आणि पूनमला कळले असावे की अरे.. आपल्यामागुन तर कोणीच येत नाही आहे. ६ की.मी पुढे जाउन म्हणजे जवळ-जवळ 'शक्ती'पर्यंत पुढे जाउन आला तो. ७ च्या आसपास मागुन सर्वजण आले आणि मग आम्ही पुढे निघालो. जास्तीत जास्त वेगाने पुढे सरकून वेळ कव्हर करायची हा आता आमचा प्रयत्न होता.

काही मिनिटांमध्ये १३५५० फुट उंचीवर 'शक्ती' या ठिकाणी पोचलो. अमेय इकडूनच तर परत आला होता. आणि याच ठिकाणाहून सुरू होतो जगातील तिसरा सर्वोच्च पास. 'चांग-ला'चा रस्ता फोटू-ला इतका चांगला नसला तरी नमिके-ला सारखा खराब सुद्धा नव्हता. पहिलाच नजारा जो समोर आला तो बघून तर मी अवाक होतो. दूरपर्यंत जाणारा तो सरळ रस्ता टोकाला जाउन डावीकडे वर चढत जात होता आणि चांगला ३-४ की.मी.चा U टर्न घेउन मागे फिरत होता.

हा ड्रायव्हर चांगला होता. हवी तशी गाडी मारत होता. सर्वजण एकाच पेस मध्ये कुठेही न थांबता बाइक्स दामटवत होते. माझ्यामागून शमिकाची आणि अभीच्या मागुन मनालीची धावती फोटोग्राफी सुरू होती पण अमेय आणि कुलदिप यांना मात्र फोटो घ्यायला थांबावे लागायचे. पण मग तो गेलेला वेळ ते कव्हर करायचे. तो एक मोठा U टर्न मारून आम्ही थोडे वर पोचलो. बघतो तर काय ... अजून तसाच एक U टर्न. आधीचा डावीकडे होता आणि हा उजवीकडे इतकाच काय तो फरक. आणि तो U टर्न चढून वर गेलो की पुढे अजून एक डावीकडे वळत जाणारा प्रचंड असा C टर्न. मनात म्हटले हा 'चांग-ला' चांगलाच आहे की. मागच्या खालच्या बाजूला दुरवर शक्ती गावाबाहेरील शेती दिसत होती. मनोहारी दृश्य होते ते. आजुबाजुला सर्व ठिकाणी ना झाडे ना गवत पण बरोबर मध्यभागी हिरवेगार पुंजके.

ते दृश्य मागे टाकुन आम्ही पुढे निघालो. दुसऱ्या U टर्नच्या मध्ये आपण पोचतो तेंव्हा आपण १७००० फुट उंचीवर असतो. ह्याच ठिकाणी 'चांग-ला'ची पहिली चेकपोस्ट लागते. 'सिंग इज किंग' असे लिहिले आहे इकडे. २ सिख लाइट इंफंट्रीचे एक प्लाटून स्थित आहे. इथपासून रस्ता थोडा ख़राब आहे. कितीही वेळा रस्ता बनवला तरी बर्फ पडला की सर्व काही वाहून जाते आणि परिस्थिति जैसे थे. तेंव्हा BRO ने इकडे रस्ते किमान ठिकठाक करून ठेवले आहेत. जसजसे वर-वर जात होतो तसा रस्ता अजून ख़राब होत जात होता. मध्येच एखाद्या वळणावर बाइक वाहत्या पाण्यामधून घालावी लागायची तर कधी पाण्यामुळे वाहून गेलेल्या खडबडीत रस्तामधून. असेच एक डावे वळण लागले. वाहत्या पाण्यामधून उजव्या बाजूने रापकन बाइक काढली आणि मग पुढे जाउन थांबलो. बाकीचे सुद्धा सिंगल सीट तेवढा भाग पार करून आले आणि मग पुढे निघालो. 'शक्ति' पासून सुरू झालेला चांग-ला संपतच नव्हता. एकामागुन एक U टर्न आणि चढतोय आपला वर-वर. कारूपासून निघून ४३ किमी. अंतर पार करून पुढे जात-जात अजून २ मोठे U टर्न पार करत आम्ही अखेर चांग-ला फत्ते केला. उंची १७५८६ फुट. फोटू-ला मागोमाग गाठलेली सर्वोच्च उंची. तो क्षण अनुभवायला आम्ही थोडावेळ तिकडे थांबलो.

वर पोचल्या-पोचल्या दिसला तो इंडियन आर्मीने लावलेला बोर्ड. १७५८६ फुट उंचीवर काय करावे आणि काय करू नये हे त्या बोर्डवर स्पष्टपणे लिहिले आहे. वरती चांग-ला बाबाचे मंदिर आहे. येथे असणाऱ्या सर्व जवानांचे आणि येणाऱ्या सर्व पर्यटकांचे चांग-ला बाबा भले करो अशी मनोकामना येथे आर्मीने केली आहे.

२ सिख लाइट इंफंट्रीचे अजून एक प्लाटून वरती आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी इकडे सर्व सोई आहेत. शौचालय आहे, वैद्यकीय सुविधा आहे. खायला हवे असेल तर इकडे एक छोटेसे कॅंटीन आहे. चहा मात्र आर्मीतर्फे मोफत दिला जातो. अर्थात बिनदुधाचा बरं का.. त्या ठिकाणी दूध आणणार तरी कुठून नाही का!!!

बाजुलाच एक छोटेसे शॉप आहे. तिकडे पेंगोंग संदर्भातले काही टी-शर्ट्स, कप्स, मिळतात. आम्ही सर्वांनी आठवण म्हणुन काही गोष्टी विकत घेतल्या. तिकडे हरप्रीतसिंग नावाचा जवान होता. त्याच्याबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या. गेल्या २ वर्ष ते सर्वजण तिकडे आहेत. फारसे घरी गेलेले नाहीत. तो आता घरी जाणार आहे. चांगली २ महीने सुट्टी आहे. खुशीत होता तो. आम्हाला सांगत होता. "बास. अब कुछ दिन और. ३ गढ़वाल आके हमें रिलीफ करेगी. फिर मै अपने गाव जाऊंगा छुट्टी पे." त्याला शुभेच्छा दिल्या आणि परत येताना भेटू असे म्हणुन तिकडून निघालो. आता लक्ष्य होते चुशूल येथील 'तांगसे' पार करून 'पेंगॉँग-सो' गाठणे...

९:३० वाजत आले होते. आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. ११ वाजायच्या आत 'शैतान नाला' काहीही झाला तरी पार करणे गरजेचे होते. चांग-ला वरुन निघालो आणि पलिकडच्या 'सोलटोक' पोस्टकडे उतरलो. आता पुढचे लक्ष्य होते ४० की.मी पुढे असणारे 'तांगसे'. ८०-९० च्या वेगाने आता त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमच्या गाड्या भरधाव वेगाने दौड़त होत्या. उजव्या हाताला नदीचे पात्र, डाव्या हाताला मिनिटा-मिनिटाला रंग बदलणाऱ्या उंच डोंगरसरी आणि समोर दिसणारे निरभ्र मोकळे आकाश. क्षणाक्षणाला वाटायचे की येथेच थांबावे. थोडावेळ येथील निसर्गाचा आस्वाद घ्यावा.

पण नाही. शैताननाला डोक्यात शैतानासारखा नाचत होता. तो गाठेपर्यंत आता कोठेही थांबणे शक्य नव्हते. १०:४५ च्या आसपास 'तांगसे' (तांगत्से) ला पोचतो न पोचतो तोच मागुन अजून काही बाइक्सचे आवाज येऊ लागले. काल पेट्रोलपंपवर भेटलेला पुण्याचा ग्रुप होता. सर्व गाड्या MH-12. त्यातले अर्धे पुढे निघून गेले तर काही मागे होते. तांगत्से चेकपोस्टला एंट्री केली आणि भरधाव वेगाने शैताननाल्याकडे सरकलो. चांग-ला नंतरच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटी' म्हणतात. येथे स्थित असणाऱ्या रेजिमेंटला 'चुशूल वॉर्रीअर्स' असे म्हणतात. सध्या येथे गढवाल रेजिमेंटची पोस्टिंग आहे. चांग-लापासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी चुशूल वॉर्रीअर्स कडे आहे.ज्यावेळी मी ह्या ठिकाणावरुन पास झालो तेंव्हा 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज दिसली. आणि माझ्या मनात लोकसत्तामध्ये वाचलेली एक बातमी आठवली. जी जागा मला आयुष्यात एकदा तरी बघायची होती आज त्या ठिकाणी मी आलो होतो. ती बातमी.. तो लेख.. जसाच्या तसा इकडे देतो आहे.

*****************************************************
'चुशूल' हे नाव भारताच्या युद्धविषयक इतिहासात सदैव अभिमानाने घेतले जाईल असे...

सियाचेनजवळ रजांगला सीमेवर तांगत्से नामक चौकी आहे. त्या चौकीच्या हद्दीतलं हे ठिकाण. १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं, तेव्हा मेजर सैतानसिंहांची ११८ जवानांची तुकडी तिथं होती. १८ नोव्हेंबरचा तो दिवस होता. चिनी सैन्याच्या तुकडय़ा तांगत्से चौकीवर कब्जा मिळवून रजांगलच्या सीमा सुरक्षा चौकीकडेआक्रमण करायला लागल्या, तेव्हा याच सैतानसिंहानं आपल्या ११८ जवानांना, प्राणांचं बलिदान देण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत १३ व्या कुमाऊँ रेजिमेंटचे ते जवान पुढे सरकत होते. पण लांब पल्ल्याच्या तोफांचा वापर करत पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांपुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. अशातच एक गोळी सैतानसिंहांच्या दिशेनं आली आणि तिनं त्यांचा वेध घेतला. हरफुलसिंह नामक हवालदारानं ते पाहिलं आणि त्यांना उचलून मागच्या बाजूस नेण्याचा प्रयत्न केला. सैतानसिंहांनी त्याला रोखलं. त्यांनी त्याला तांगत्से चौकीच्या दिशेनं दारूगोळा आणण्यासाठी पिटाळलं आणि जखमी अवस्थेत झुंज सुरूच ठेवली.

हरफुलसिंह तांगत्सेला पोचला, ती चौकी आपण गमावली असल्याचं त्याच्या लक्षात आलं, तिथले सैनिक लेहकडे गेल्याचं त्याला कळलं. मेजर सैतानसिंहांना आपली गरज आहे याचं स्मरण होताच हरफुलसिंह माघारी फिरला. पण परत येईपर्यंत त्याला पाहावं लागलं ते धारातीर्थी पडलेलं सैतानसिंहांचं कलेवर. ते दिवस बर्फाच्या वादळाचे होते. युद्धबंदी झाल्यावर भारतीय सैन्यातील काही मंडळी तिथं पोचली तेव्हा बर्फाखाली गाडले गेलेले सैतानसिंहाचे आणि त्यांच्या ११६ साथीदारांचे मृतदेह त्यांना मिळाले. त्या सर्वावर अंत्यसंस्कार करून मंडळी परतली. ग्रीष्म ऋतु सुरू झाला, तसं बर्फ वितळायला लागलं. त्या चौकीवर पुन्हा एकदा भारतीय सैनिक गेले तेव्हा तिथे अनेक चिनी सैनिकांचे मृतदेह पडले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या मृतदेहांची मोजणी करण्यात आली, तेव्हा ११०० चिनी सैनिकांना मरणाला सामोरं जावं लागलं असल्याचं निष्पन्न झालं. मेजर सैतानसिंहांचा तो पराक्रम पुढल्या वर्षी ‘परमवीर चक्रा’चा मानकरी ठरला.

मेजर सैतानसिंहाची ही आठवण आजही तिथं अभिमानानं सांगितली जाते. सैतानसिंहाचा आत्मा आजही त्या चौकीच्या आसपास फिरत असतो अशी समजूत आहे. आणि त्यामुळेच त्याचा गणवेश, त्याचं सामान, त्याच्या वापरातील वस्तू आजही त्याच्या सहकाऱ्यांनी जशाच्या तशा जपून ठेवल्या आहेत. त्याचा पगार म्हणे आजही त्याच्या नातेवाईकांना पूर्वीसारखाच दिला जातो. त्या युद्धात सैतानसिंह मेजर होता. युद्धात धारातीर्थी पडतानाही त्याचा हुद्दा तोच होता. आता बढत्या मिळत मिळत तो ब्रिगेडियरच्या हुद्याला जाऊन पोचला आहे. अन्य सैन्याधिकाऱ्यांप्रमाणेच त्यालाही तंबू आहे. त्याच्या सेवेत सैनिक आहेत. त्याच्या वाहनावर आजही चालकाची नियुक्ती आहे. तो सुटीवर जायला निघतो तेव्हा त्याचं अंथरुण-पांघरुण, सामान घेऊन एक सैनिक त्याला जवळच्या रेल्वे स्थानकावर सोडायला जीप घेऊन निघतो. सुटी संपायचा दिवस येतो तसं त्याला आणण्यासाठी जीप रेल्वे स्थानकावर जाते, जीपमध्ये कुणीतरी बसलं आहे अशा थाटात त्याचे सहकारी ती जीप घेऊन परत येतात. सैतानसिंहाच्या निवृत्तीच्या दिवसापर्यंत हा प्रकार असाच सुरू होता. आता बहुधा तो थांबला आहे. पण हे सारं वाचायला मिळालं ते ‘जम्मू काश्मीरचा सफरनामा’ या श्रीकांत जोशी लिखित पुस्तकात. (पृष्ठ क्र. ७२ आणि १०१ वर)
*****************************************************

चुशूल ग्लेशिअरमधून वाहून येणाऱ्या त्या प्रवाहाला म्हणजे नाल्याला 'मेजर शैतानसिंह' यांचे नाव दिले गेले आहे. तिकडे पोचलो तेंव्हा ११:३० वाजले होते आणि शैतान नाला हा काय भयाण प्रकार आहे ते समोर दिसत होते. हा तर रस्तामध्ये घुसलेला नाला होता. नाही नाही.. दगडगोटयानी भरलेला उतरत नाल्यापलीकडे जाणारा रस्ता...!!! नाल्यामध्ये चांगले फुट दिडफुट पाणी वाहत होते. बाइकवरुन हा पार करायचा??? तसे सहज शक्य होते.आम्ही अंदाज लावला. १२ वाजत आले आहेत म्हणजे आता ग्लेशिअरमधून वाहुन येणाऱ्या पाण्याची पातळी पुढच्या २-३ तासात नक्की वाढणार आहे. आत्ता गाड्या टाकल्या तरी परत येताना त्या काढता आल्या नाहीत तर ??? लटकलो ना... आता कळले सकाळच्या ४५ मिं. चे महत्त्व. आम्ही जरा तासभर लवकर येथे पोचलो असतो तर बाइक्स घेउन अजून ४ की.मी पुढे पेंगॉँग-त्सो पर्यंत जाता आले असते. आता मात्र बाइक्स एकडेच ठेवणे भाग होते. आर्मीचा एक ट्रक होता त्यात बसलो आणि शेवटचे ४ की.मी. त्या ट्रकने प्रवास करून 'पेंगॉँग-सो' पर्यंत पोचलो. असा प्रवास मी जन्मात कधी केलेला नाही ना कधी करेन. एक-न-एक हाड निखळून पडते आहे की काय असे वाटत होते.

शैताननाल्याचा हा एक फोटो. फोटो बघून तुम्हाला कल्पना येइल की हे काय प्रकरण होत ते...

'पेंगॉँग-सो'ला पोचलो तेंव्हा दिवसाभराचे पडलेले सर्व कष्ट विसरलो होतो. अगदी हे सुद्धा की आम्ही पहाटे ५ नंतर काहीही खाल्लेले नाही आहे. पेंगॉँग-सो - वर्णन करता येणार नाही असे सौंदर्य. जिथपर्यंत आपली नजर जाईल तितक्या दूर-दूर पर्यंत केवळ निळेशार पाणी. त्या पाण्याला सिमा घालायची हिम्मत फक्त त्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये. अवर्णनातीत असे पांढरेशुभ्र सुंदर आकाश आणि त्या आकाशाचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब.

खरे सांगायचे तर माझ्याकडे अजून शब्दच नाहीत ते सौंदर्य तुमच्यासमोर मांडायला. पेंगॉँग-सो हा भारत चीन सीमेवर आहे. ६० टक्के चीनमध्ये तर ४० टक्के भारतात आणि गंमत म्हणजे हा तलाव खाऱ्या पाण्याचा आहे. हिवाळ्यात जोरदार हिमवर्षाव सुरू झाला की हा संपूर्ण तलाव गोठतो. इकडच्या उन्हाळ्याच्या सुरवातीला बर्फ वितळून शैताननाला रौद्ररूप धारण करतो. ह्या संपूर्ण वेळात इकडे कोणीही जा-ये करू शकत नाही. जून नंतर थोडे फार पलीकडे जाता येते. इकडे थांबायला खुपच कमी वेळ मिळाला होता. आम्हाला घेउन आलेला ट्रक परत जाउन पुढच्या लोकांना इकडे आणणार होता त्यामुळे आम्हाला आता निघावे लागणार होते. मन मारून ट्रकमध्ये बसलो आणि इकडे लवकरच पुन्हा येणार असे नक्की केले. फक्त येणार नाही तर इकडे किमान १ दिवस राहणार. त्या ट्रकमधून पुन्हा एकदा शैतान नाल्यासमीप पोचलो. त्या ४०-४५ मिं. मध्ये प्रवाह वाढलेला जाणवत होता. बरं झाला बाइक्स पाण्यात नाही टाकल्या ते. बाइक्स ताब्यात घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. दुपारचे २ वाजत आले होते आणि आता सर्वांना भूका लागल्या होत्या.

एके ठिकाणी होटेलचा तंबू लावलेला दिसला. त्याच्याकडे फक्त मॅगी होते. त्याला म्हटले आण बाबा जे काय आहे ते. काहीतरी जाऊदे पोटात. आधी चांग-ला आणि मग शैताननाला दोघांनी चांगलीच वाट लावली होती. थोड़ा थकवा जाणवत होता. आता बायकर्स चेंज केले आणि ३च्या आसपास आम्ही निघालो पुन्हा एकदा लेहकडे. तांगसे, सोलटोक ह्या भागातले नदीचे पात्र वाढलेले कळत होते. मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने थोड़ा वेळ वाया गेला. मध्येच एके ठिकाणी एक मोठा प्रस्तर लागला. त्याचा आकार बेडकासारखा होता. त्याला आम्ही 'चांग-ला बेडूक' असे नाव दिले.

परतीच्या मार्गावर कुठेही न थांबता आम्ही पुन्हा एकदा 'चांग-ला'ला पोचलो तेंव्हा ६ वाजत आले होते. तिकडे पुन्हा हरप्रीतसिंग बरोबर परत थोड्या गप्पा मारल्या. शक्तिला पोचायला अजून २१ की.मी.चा घाट उतरून जायचे होते. त्या उतारावर बायकर्स तर सुसाटच पण आमचा गाडीवाला पण भन्नाट सुसाट मध्ये गाडी उतरवत होता. शक्ती - कारू पार करत ८:३० वाजता लेहमध्ये पोचलो. दिवसाभरात काय खाल्ले होते? २ चहा आणि १-२ मॅगी बास...!!! तेंव्हा ज़रा ठिक जेवुया म्हणुन पुन्हा एकदा ड्रीमलैंडला गेलो. बटर चिकन, चीज-गार्लिक नान आणि सोबत जीरा राईस असे तब्येतीत जेवलो. ११ च्या आसपास पुन्हा गेस्ट हाउसला आलो तेंव्हा अंगात त्राण नव्हते. झोपायच्या आधी मीटिंग मात्र झाली. अभीने मात्र सर्वांची खरडपट्टी काढली. सकाळी झालेल्या थोड्या उशिरामुळे पेंगोंगला जास्त वेळ देता आला नव्हता म्हणुन तो बराच अपसेट होता. ५-६ तास बाइक वरुन इतके अंतर पार करून गेलो आणि भोज्जा करून परत आलो असे काहीसे आज झाले होते. बायकिंगला मात्र कैच्याकै भारी मज्जा आली होती. खरच आम्ही अजून लवकर निघायला हवे होते. पण जे झाले ते झाले.. आता पुढे ही काळजी घ्यावी लागेल हे मात्र नक्की होते. १२ वाजून गेले होते आणि सुरू झाला होता १५ ऑगस्ट. भारताचा स्वतंत्रता दिवस. उदया लवकर उठून आम्हाला लेहच्या पोलो ग्राउंडला परेड बघायला जायचे होते. तेंव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत निद्रेच्या अधीन झालो.

पुढील भाग : १५ ऑगस्ट ... सैनिकहो तुमच्यासाठी... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट! छान लिहिला आहे हा प्रवासदेखील! चुशूल आणि सैतानसिंहाची शौर्यकथा, आर्मी जवानांनी मरणोपरान्तही त्यांची जपलेली बडदास्त देखील भारीच!

मस्तच!!!!
सैतानसिंहासारखीच कथा नथु-ला पास जवळ असलेल्या बाबा हरनामसिंग मंदिराची आहे. हरनामसिंग हा जवान होता, थंडीच्या दिवसात भारतीय आणि चिनी सैन्य बॉर्डर सोडुन मागे जातात. हरनामसिंग आजतागायत बेपत्ता आहे, त्यालाही अजुन आर्मीचा पगार चालु आहे, त्याच्या बराकीत त्याची गादी वगैरे रोज व्यवस्थित केली जाते. त्याचं सुट्टीतलं ट्रेन बुकिंग वगैरेही अजुनही केलं जातं, थोडक्यात त्याच्या आर्मीतल्या सुविधा अजुनही तशाच चालु आहेत.
थंडीत त्या प्रदेशात भारतीय आणि चिनी सैन्य बॉर्डरवर गस्त घालीत नाहीत. पण कित्येकदा चिनी सैन्याकडुन भारतीय सैन्याला रेडिओ संदेश आलेत की तुमचा एक जवान बॉर्डरवर फिरताना दिसतोय. आर्मीने नथु-ला सीमेवर त्याचं मंदिर उभारलय.

आशुतोष... आधी मी सुद्धा ह्या २ गोष्टींबाबत जरा गफलत करत होतो पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत ही खात्री नंतर पटली. कारगिल युद्ध मिडीयाच्या माध्यमाने समोर आल्याने सैनिकांबद्दल जवळीक साधता आली लोकांना... मात्र त्या आधीच्या सर्व युद्धातील सैनिक तसे उपेक्षितच.... Sad

मस्त लिहिल आहेस. पेंगॉँग-सो काय अप्रतिम सुंदर आहे !

तो शैतानसिंह चा लेख छानच. त्यांची नंतरही ठेवलेली आठवण आणि बडदास्त पाहुन अगदी गहिवरुन आलं.
<भारतीय सैन्याला रेडिओ संदेश आलेत की तुमचा एक जवान बॉर्डरवर फिरताना दिसतोय. आर्मीने नथु-ला सीमेवर त्याचं मंदिर उभारलय.> व्वा! हरनामसिंग आणी असेच हजारो सैनिक खरच गस्त घालत अस्तील नाही तिथे!