दर्जेदार कथा

Submitted by हर्ट on 3 August, 2010 - 05:42

माझ्या वाचक मित्रांनो तुमची एक मदत हवी आहे. इथे सिंगापूरमधे आम्ही मराठी साहित्य वाचनाचा कार्यक्रम करतो आहे येत्या गणेशोत्सवाच्या वेळेस. यावेळी फक्त कथा (लघुकथा ज्या १० ते १२ मिनिटात वाचून होतील इतका त्यांचा आवाका) वाचणार आहोत.

आपल्या साहित्यात अनेक कथासंग्रह आहेत. काही जुन्या लेखकांचे तर काही नवीन लेखकांचे. काही कथासंग्रहामधील सर्वचं कथा वाचनिय आहेत तर काही कथासंग्रहातील निवडक कथा वाचनिय आहेत. शिवाय कुठली कथा चांगली बरी हे सापेक्ष देखील आहे. तरीही तुम्हाला जी कथा खूप आवडली. वेगळी वाटली. त्यातून काही शिकायला मिळाले. अशा कथांची, त्या लेखकांची, पुस्तकांची नावे इथे लिहा. जेणेकरुन मला माझ्या कार्यक्रमासाठी त्याचा उपयोग होईल शिवाय वाचकांना देखील त्या कथा मिळवून वाचाव्याशा वाटतील. धन्यवाद.. आभारी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्य लटपटीत - एकेक पान गळावया
तुती- हिरवे रावे
मोनिका गजेंद्रगडकरांची एखादी कथा
धाकल्या माडगुळकरांच्या बनगरवाडी तील काही भाग किंवा त्यांची एखादी कथा
अगदी जुनी जोश्यांची 'शेवग्याच्या शेंगा'?

(पानवलकरांची एखादी- कोणीतरी सुचवेलच. )

पानवलकरांच्या कथेशी फटकून असलेली त्यांची ''उगीच' ही एक छोटीशी कथा.. औदुंबर संग्रहातली.. तसेच जीएंच्या सिनेमा, फेड ह्या दोन कथा अशा वाचनासाठी उत्तम (संग्रहः कुसुमगुंजा).. कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी 'निरोप' (कुसुकगुंजा) ही अतिउत्तम..

रैना, टण्या आणि मिनोती - छान.. अशीचं मदत हवी आहे.

आता आणखी मदत करा कृपया -
रैना - 'शेवग्याच्या शेंगा'ची स्कॅन प्रत पाठवं शक्य तितक्या लवकर कारण सरावाला वेळ कमी आहे.
टण्या - उगीच ही कथा पाठवं.
मिनोती - एकचं लहान मुलगी वाचते आहे आणि तिला बखर बिम्मची मधील एक कथा दिली आहे. तू मला मागे एकदा स्कॅन प्रत पाठवली होती यावेळीही मदत करते आहे. छान!

फेड मागच्या वर्षी वाचली आहे. शारदा संगीत वाचण्याचा यावेळी विचार करतो आहे.

रैना, टण्या - माझा मेल आयडी - ykakad@gmail.com असा आहे.

मित्रहो, अजून नवीन कथांची नावे येऊ द्या.

तुला सादर करायच्या असतील कथा तर नुसती कथा आवडली म्हणून सादर करतोय असं करू नकोस. आवडलेली कथा जाहिर वाचन/ सादरीकरण यासाठी योग्य असेलच असं नाही, जिथे सादर करायच्या त्या लोकांसाठी योग्य असतीलच असंही नाही. याचा विचार जरूर करणे हा एक फुकट सल्ला.

आठवल्या काही कथा तर कळवीन.

नी, धन्यवाद. कुठल्या कथा निवडायच्या याचा विचार नक्कीचं होतो दरवेळी. त्यासाठी पहिली भेट ठरलेली असते अगदी. काही वाचक दोन कथा निवडतात त्यातली मग जास्त चांगली घेतली जाते.

तुझ्या परिने मदत कर.

मृ, फक्त रुढार्थाने जे लेखक आहेत त्यांचीचं कथा वाचावी असा नियम आहे या कार्यक्रमाचा आणि तो खरे तर असायलाचं हवा.

बी,
सॉरी रे नाहिये माझ्याकडे Sad
आणखी काही आठवल्या त्या अशा
- गौरींची कलिन्गड
- अरविंद गोखल्यांची 'मंजू'
- स्मृतिचित्रेतील काही भाग
- आहे मनोहर तरी तील काही भाग
- मातोसरी- आमचा बाप अन आम्ही

खरं तर कथा म्हणल्यावर पुंडलिक किंवा गाडगीळांची एखादी यायला हवी. फक्त मी सुचवू शकत नाही कारण पुरेसे वाचन नाही.

नीरजेला अनुमोदन. कथा वाचणे वेगळे, आणि सादर करणे वेगळे. कारण सादर करताना स्वतःचा नाही, तर ऐकणार्‍यांचा विचार करावा लागतो. कथा या प्रकारात उत्कृष्ठ किंवा उत्तम असलेल्या साहित्यप्रकाराचे सादरीकरण उत्तम होईलच असे नाही; आणि सादरीकरण उत्तम होऊन प्रचंड टाळ्या मिळालेली कथा 'कथा' या साहित्यप्रकाराच्या निकषांत बसून उत्तम ठरेलच याची खात्री नाही. जीएंच्या कथा सादर करून पोपट करून घेण्याचा प्रकार मी स्वतः अनुभवला आहे. कथा 'सादर' करायच्या असतील, तर जीए किंवा पानवलकरांच्या फंदात पडू नये. शंकर पाटील, मिरासदार किंवा माडगुळकरांच्या कथा निवड. यांच्या कथांचे जनमानसातले स्थान निराळेच आहे. प्रस्थापित कथाकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात अनेक दशके नाव मिळवले आहे. नवीन (आणि यशस्वी पण) कथाकार अनेक आहेत. पण कथा 'सादर' करायची म्हणल्यावर किती गर्दी आणि उत्सुकता तयार करायची, त्यावर सारे अवलंबून आहे.

साजिरा, तू म्हणतोस त्या सगळ्यांचा अगदी सारासार विचार केला जातो कारण लोकांना अशा कार्यक्रमात भाग घ्यायला आणि श्रोता म्हणून बोलवायला दोन्हीला प्रवृत्त करणे फार अवघड आहे. म्हणून हा कार्यक्रम खूप विचारविनिमय आणि प्रयत्न करुन आम्ही करतो. हे चवथे वर्ष आहे. तू कथा सुचवं मित्रा.

रैना, हरकत नाही. अजून कथांची नावे सांगितलीस त्याबद्दल आभारी आहे.

गौरींची कलिन्गड >> ही वाचनासाठी अप्रतीम आहे. सुप्रियाने इथे वाचेलेली अजुन लक्षात आहे.

गौरीची एक कथा वाचली आहे मागिल वर्षी - आहे हे असे आहे - मधली. वपु पण एकदा वाचले आहे. जी. ऐ. पण वाचले आहेत. हे लेखक तर आहेतचं सोबतीला पण अजून नवीन लेखक .. त्यांच्या कथा मी शोधत आहे. मेघना पेठेंच्या कथा छान असतात पण खूप दीर्घ आहेत त्या.. वेळ अपुरा पडेल.

सानियाची एखादी लघुकथा, विजय तेंडूलकरांची एखादी लघुकथा, मंगला गोडबोलेंची एखादी लघुकथा, रत्नाकर मतकरींची एखादी लघुकथा कुणाला आठवते का? जी ७ ते १२ मिनिटात पुर्ण होऊ शकेल वाचून.. विचार करुन कृपया सांगा.

श्याम मनोहरांचे एकही पुस्तक मी वाचलेले नाही. जर त्यांच्या कथांबद्दल कुणी काही माहिती देऊ शकेल तर बरे होईल.

कथांचा कार्यक्रम असल्यामुळे निवडक वेचे/भाग वगैरे यावेळी आम्ही नाही वाचणार आहोत.

धन्यवाद!

साजिरा अणि नीधपला अनुमोदन.
शाम मनोहर वाचनासाठी नकोच, नाट्यीकरण चांगले होऊ शकते.
मतकरींची 'जेवणावळ'; अर्थात वेळेचे बंधन असेल तर थोडेफार आणि योग्य एडीटींग आवश्यक.
नविन लेखकांपैकी भारत सासणेंची कथा निवडा.
मंगला गोडबोलेंची 'एक आडवी रेघ' नावाची एक कथा आहे ती जरुर पहा.
तुम्हाला परदेशी लेख़कांची मराठीत अनुवादित कथा नको आहे का?

आगाऊ, अनुवादित कथा चालतील. तू नावे सुचवं. मागे एकदा गौरीची कथा किंचीत आम्ही एडीट केली होती वेळेत बसविण्यासाठी कथेला कुठलीच इजा न होऊ देता.

आगाऊ, 'जेवणावळ', 'एक आडवी रेघ' ह्या कथा तू स्कॅन करुन मला जर पाठवू शकलास तर फार मोठी मदत होईल. वर माझा आयडी दिला आहे. नसेल शक्य होत तर मी अन्य माध्यमांचा विचार करेन. धन्यवाद.

नीधप, धन्यवाद.

स्वाती राजेच्या काही गोष्टी छान आहेत. कथासंग्रह/ अंक कशाचंही नाव आठवत नाहीये. माझ्याकडे तिने दिलेल्याच झेरॉक्स होत्या. तिचा नंबर सापडला तर फोनून विचारते.

यातील काही कथा वाचायला नक्की किती वेळ लागेल हे मला सांगता येणार नाही.

रिक्ता - अरविंद गोखले
कातरवेळ - अरविंद गोखले
संस्कार - लता सप्रे ( ~ १५ मिनीटे )
आंघोळ - प्रिया तेंडुलकर ( ~ १५ मिनीटे)
बातमी - दि बा मोकाशी ( ~ ८ मिनिटे)
आता कुठे जाशिल टोळंभट्टा - गौरी देशपांडे ( ~ २० मिनीटे )
अंतराय - शांताराम ( ~ १२ मिनिटे)
भेट - जी ए कुलकर्णी ( ~१० मिनिटे)

अजून आठवल्या तर सांगेनच.

बी,
गणेशोत्सवाचे संपुर्ण दिवस तुम्ही हे वाचण ठेवणार आहात का? की फक्त एक दिवस आहे? वरती बर्‍याच लोकांनी कथा सुचवल्या आहेत त्यांचे विषय आणि आशय सगळंच वेगळं वेगळं आहे.
जर एखादाच दिवस वाचन होणार असेल तर सर्वसाधारण सर्व वयोगटाला आवडेल अशी कथा निवडता येईल.
जर दररोज कथावाचन होणार असेल तर दर दिवशी कथांची कॅटेगिरी बदलून रोज वेग-वेगळ्या विषयांवरच्या कथांचे वाचन करता येईल. त्यात एक दिवस, महिलांसाठीच्या, काही वीरकथा, विनोदी लेखन, मुलांसाठीच्या, वृद्धांसाठी.. अशा अनेक कथा सादर करता येतील.
माझ्या मते
पुलंचे एखादे व्यक्तिचित्रण
मोनिका गजेंद्रगडकरांची अक्षरश: कोणतीही कथा
त्रिपदीतले कोणतेही प्रकरण
शारदासंगितातले 'परचक्र'

दक्षिणा,
२ तासांच्या कार्यक्रमामधे निवदेनासहित एकून १० ते १२ कथा वाचण्याचा मानस आहे. कार्यक्रम रात्री ८ ते १० या शांत वेळी होतो. बहुतेक कामाचाचं दिवस मिळतो यासाठी. रोज रोज एक कथा असे नाही. एकाच दिवशी सर्व कथा एका पाठी एक असे वाचन्/सादरीकरण होते. जवळपास ७५ ते १०० इतका श्रोतावर्ग असतो. यावेळी फक्त लघुकथा अशी थीम ठेवली आहे. त्यामुळे इतर दुसरे साहित्य नको आहे. धन्यवाद. तुला सुचेल तसे सांग.

येत्या साहित्य संमेलनासाठीच्या एक उमेदवार गिरिजा कीर या कथाकार आहेत आणि कथाकथनही करतात, त्यांच्या अनेक कथा.