कोकणवाटांचा पाऊस-थरार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 21 July, 2010 - 06:57

"ए भाऊ, अरे किती गुटखा खाशील! चांगला नाही बरं तब्येतीला. तू ऐक माझं.. सोडून दे असली वाईट सवय! अरे, तरुण वय आहे तुमचं, ह्या वयात कशी रे अशी व्यसनं करता पोरं तुम्ही! ते काही नाही, तू आजपासून गुटखा कमी करायचास.... " आमच्या अंदाजे वय वर्षे पासष्टच्या प्राध्यापिकाबाई आमच्या कोकणप्रवासासाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्सच्या चालकाला खडसावत होत्या.

त्यांचेही बरोबर होते म्हणा! जेमतेम तेवीस-चोवीस वय असेल त्याचं... आणि दर अर्ध्या तासाला एक गुटख्याची पुडी त्याच्या तोंडात रिकामी होत होती. पुढे प्रवासात त्याची इतर माहितीही समजली. बालाजी त्याचं नाव. शिक्षण दहावीपर्यंत असावं. पोटापाण्यासाठी दक्षिणेकडच्या एका छोट्याशा गावातून पुण्यात आला, ड्रायव्हिंग शिकला, परवाना मिळवला आणि प्रवासी कंपनीच्या ट्रॅक्स गाड्यांसाठी चालकाच्या नोकरीवर रुजू झाला. दर महिन्याला गावी पैसे पाठवायचे की झाले! ह्या नोकरीतच त्याला गुटख्याचे व्यसन लागले. पण आमच्या प्राध्यापिकाबाईंच्या प्रेमळ समजावण्यानंतर त्याने गुटखा खाणे कमी करण्याचे वचन त्यांना दिले.

आमच्या ह्या प्राध्यापिकाबाईंची हीच तर खासियत होती व आहे. बोलण्यातील आर्जव, मृदुता व कळकळ यांमुळे त्या आजही विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांच्या व्यासंगाविषयीतर काय सांगावे! आज त्यांच्या क्षेत्रातील अतिशय मान्यवर व विद्वान संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे.

तर अशा ह्या आमच्या लाडक्या प्राध्यापिकाबाईंच्या मार्गदर्शनाखाली बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही आठ विद्यार्थी हरिहरेश्वर - महाड - पाली प्रवासास ऐन पावसाळ्यात निघालो होतो. आपापले नित्य अभ्यासक्रम, नोकऱ्या सांभाळून अभिमत विद्यापीठात हौसेने शिकायला येणाऱ्या आमच्या ह्या ग्रुपमधील लोकसुद्धा अतिशय उत्साही. दर आठवड्याला किंवा महिन्यातून एक-दोनदा तरी पुण्याच्या आजूबाजूच्या प्राचीन स्थळांना, देवळांना, लेण्यांना भेट देणे, त्यांची माहिती जमविणे, त्यावर चर्चा करणे इत्यादी गोष्टींत अग्रेसर. आमचा हा उत्साह पाहूनच वयाने व श्रेष्ठतेने एवढ्या ज्येष्ठ असलेल्या आमच्या प्राध्यापिकाबाई आमच्याबरोबर ह्या प्रवासासाठी येण्यास तयार झाल्या होत्या.
हरीहरेश्वरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली होती. वाटेत हिरव्या रम्य निसर्गाने डोळे सुखावले होते. पाऊस बऱ्यापैकी होता. घाटात जरा जास्तच होता. पण आता पावसाळ्याचेच दिवस आणि सहलीचा मूड... मग कोण पर्वा करतो? बालाजीच्या प्रवासी ट्रॅक्समधील अचंबित करणाऱ्या 'मसाला' हिंदी गाण्यांच्या कॅसेट्सवर पोट धरधरुन हसत आणि मनोभावे शेरेबाजी करतच आम्ही मुक्कामी पोहोचलो. आमच्या एका मित्राने त्याच्या परिचितांमार्फत एका घरगुती ठिकाणी आमची उतरायची व्यवस्था केली होती. छोटेखानी टुमदार बंगलीतल्या एका खोलीत मुली स्थिरावल्या, एक खोली मुलांनी पटकावली तर एक खोली आमच्या प्राध्यापिकाबाईंसाठी राखीव होती.

पहिल्याच तासाभरात ग्रुपमधील दोन मुलींनी बंगलीत शिरलेल्या दोन बेडकांना उड्या मारताना पाहून किंकाळ्या फोडून व इकडून तिकडे उड्या मारून सर्वांची करमणूक केली. येथे स्नानगृह व शौचालय बंगलीपासून थोड्या अंतरावर ताडामाडांच्या आडोशाला होते. ग्रुपमधील इतर मुलांनी मग त्या मुलींना चिडवत वाटेतील काल्पनिक साप-विंचू-गोमींची अशी काही भीती घातली की त्या सतत सगळीकडे पाय आपटत, तोंडाने आवाज करत चालत होत्या. त्या रात्री पावसाच्या जोरदार सरींचा कौलारू छतावरचा आवाज ऐकत ऐकतच आम्हाला झोप लागली.

दुसरे दिवशी सकाळी नाश्ता, स्नान वगैरे उरकून आम्ही हरिहरेश्वराचे दर्शन घेतले. तेथील पिंडीच्या वैशिष्ट्याविषयी आमची चर्चा करून झाली. मंदिराशेजारच्या नागलिंगम झाडांच्या पायाशी पडलेल्या शिवाच्या पिंडीसमान आकार असलेल्या सुंदर फुलांचा सुगंध भरभरून घेतच आम्ही हरिहरेश्वर सोडले. आता आम्हाला पालीजवळच्या बौद्ध गुंफांमधील काही गुंफा पाहण्याची उत्कंठा होती.

काही अंतर गेल्यावर गाडीत अचानक काहीतरी बिघाड झाला. बराच वेळ खाटखूट करूनही गाडी बधेना. धक्कापण देऊन झाला तरीही ती ठप्पच! तेव्हा मोबाईलचा जमाना नसल्यामुळे इतर पर्याय फारसे नव्हते व पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यात वाहनांची व माणसांची वर्दळ कमीच होती. मग वाटेतल्याच एकदोन माणसांना दादापुता करून, विनवून आमच्या वाहनचालकाने एका माहितगार माणसाला बोलावले. दोघांनी मिळून गाडीच्या बॉनेटमध्ये डोकी खुपसून बरीच खुडबूड केल्यावर आमची गाडी एकदाची स्टार्ट झाली.
एव्हाना आम्हाला उशीर झाला होता आणि पावसाचा जोरही बराच वाढला होता. पण ज्या लेण्यांसाठी खास पुण्याहून आलो त्यातील एखादे लेणेतरी पाहिल्याशिवाय परत फिरायला मन राजी होत नव्हते. आमच्या प्राध्यापिकाबाई तर कान्हेरीच्या जंगलात कसल्याही सोयींशिवाय एकट्या राहिलेल्या धाडसी संशोधिका. त्यांच्या धाडसाच्या वेगवेगळ्या कहाण्या तर आम्हाला स्फूर्तिस्थानीच होत्या. त्यांना हा असला पाऊस म्हणजे किरकोळ होता. आमचा वाहनचालक तरीही जरा नाराज होता. त्याला परत फिरायचे होते. पण आम्हाला त्या रपारपा कोसळणाऱ्या पावसातही आतापर्यंत स्लाईडस, फोटोग्राफ्समध्ये पाहिलेली लेणी प्रत्यक्षात पाहायची होती. अखेर तडजोड मान्य करून आमच्या प्राध्यापिकाबाईंनी त्या धो धो कोसळणाऱ्या पावसात एका पर्यटकांकडून दुर्लक्षित अशा लेण्यांपर्यंत आम्हाला नेले.

आमच्या वाहनचालकाने डोंगराच्या जितक्या जवळ जाणे शक्य होते तिथपर्यंत गाडी नेली. पुढे तर सगळा चिखलच होता. प्राध्यापिकाबाईंना आम्ही वाटेची स्थिती पाहून वाहनचालकासोबत थांबायची विनंती केली आणि त्यांनीही ती मान्य केली.

आम्ही आपापले रेनकोट गुंडाळून घोटा-घोटा चिखलातून वाट काढत, घसरत एका शेताच्या बांधापाशी पोचलो. शेताच्या बांधावरून डगमगत पुढच्या शेताकडे.... सगळीकडे भातपेरणी चालू होती. गुडघाभर पाण्यात, भातखाचरांत उभे राहून डोक्यावर इरले पांघरलेल्या बायाबापड्या शहरी वेषांत, अशा पावसात आम्हाला डोंगराकडे घसरत, धडपडत जाताना कुतूहलाने बघत होत्या. एके ठिकाणी आम्हालाही भातखाचरांमधून रस्ता काढायला लागला. बुटांमध्ये गेलेल्या पाण्याचे जड ओझे सांभाळत आम्ही अखेर धापा टाकत लेण्यापाशी पोहोचलो. शेकडो वर्षांपूर्वी इतक्या आडबाजूला, जंगलात भरभक्कम पाषाणातून ह्या गुंफा उभ्या राहिल्या. त्या शिल्पींचे, कारागिराचे, येथे वास करणाऱ्या बौद्ध भिख्खुंचे कौतुक करावे तेवढे थोडे असे मला वाटते. शहरी जीवनाला व सुखसोयींना चटावलेल्या माझ्या मनाला त्यांच्या खडतर आयुष्याची कल्पनाही अशक्य वाटते. आम्ही भेट देत असलेल्या गुंफांमध्ये फार कलाकुसर, कोरीव काम नव्हते. मात्र त्यांच्या ओबडधोबडपणातही त्यांचे सौंदर्य लपून राहत नव्हते.

शिलालेखाची अक्षरे पुसट होती. त्यातील ब्राह्मी लिपीतील अक्षरे ओळखताना काय आनंद झालेला! गुंफेच्या फार आतही जाववत नव्हते, कारण सगळीकडे वटवाघळांचा मुक्त संचार होता. आमच्या अशा आगंतुक येण्यामुळे विचलित होऊन ती बिचारी उगीचच इकडून तिकडे घिरट्या घालत होती. जाळीजळमटे तर ठिकठिकाणी दिसत होती. इतर लेणी- गुंफांमध्ये येतो त्याचप्रमाणे येथेही एक प्रकारचा ओलसर, दमट, कुंद वास भरून राहिला होता. त्यातच वटवाघळांच्या व भटक्या कुत्र्यामांजरांच्या विष्ठेच्या दुर्गंधाची भर! थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुन्हा घसरत घसरत उतरणीच्या मार्गाला लागलो. थोडेफार वाळलेले कपडे-बूट पुन्हा एकदा चिखल, पाणी, पाऊस यांच्यात बुचकळून निघाले.

आमच्या गाडीपाशी सगळेजण परत पोहोचेपर्यंत पावसाचा जोर खूप वाढला होता. ओल्या, कुडकुडत्या अंगांनी चोहोबाजूंनी कोसळणाऱ्या त्या पावसाचे स्तिमित करणारे रूप गाडीच्या धुकंभरल्या काचांतून न्याहाळत आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. जाताना वाटेत कमी वर्दळ होती तर परत येताना शुकशुकाट होता. दुपारचे चार - साडेचार झाले असूनही दुकाने, टपऱ्या बंद होती. क्वचितच एखाद्या दुकानाची फळी किलकिलती दिसे. आमची दुपारची जेवणे झाली नसल्याने गाडीत सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती. पण वाटेत एकही हॉटेल उघडे नव्हते. शेवटी एका हातगाडीवरून केळी विकत घेतली. तिथल्या लोकांनी सांगितले की लवकर निघा, पलीकडच्या गावातील रस्ते जलमय झाले असून कधीही येथील रस्तेदेखील पाण्याखाली जातील. आता मात्र आमच्या गोटात जरा गडबड उडाली. वाहनचालक बालाजी तर जाम नर्व्हस झाला होता. एक तर आम्ही त्याला बोलून बोलून त्याचा गुटख्याचा खुराक निम्म्यावर आणायला लावलेला, सायंकाळ होऊन अंधार पडू लागलेला, पावसाचा जोर कायम, पुढे घाट आणि गाडीखालचा रस्ता कधी जलमय होईल ह्याचा नेम नाही!! त्यातच गाडी कधी दगा देईल सांगता येत नाही, गाडीत एक ज्येष्ठ महिला, दोन किंचाळणाऱ्या मुली व बाकीचे जीव मुठीत धरून बसलेले प्रवासी! तो नर्व्हस झाला नाही तरच नवल! येथील अंधार म्हणजे काळाकुट्ट अंधार होता. कारण वीज तुटल्यामुळे गावे अंधारात होती. रस्त्यांवरही उजेड नाही. आमच्या गाडीने घाट चढायला सुरुवात केली. पलीकडून एक ट्रक येत होता, त्याचा चालक थोडं थांबून ओरडला, "दरडी कोसळाय लागल्याती, नीट जावा... "!!

आमचे धाबे दणाणले होते. पण कोणीही एकमेकांना मनातले टेन्शन जाणवू देत नव्हते. गाडीत मात्र शांतता होती. अचानक एक दगड वाटेत आल्याने गाडी थोडी उडली व मागे बसलेली एक मुलगी गाडीच्या मागच्या दरवाज्यावर आदळली.... आणि काय आश्चर्य! तो दरवाजा धाडकन उघडला आणि आमची मैत्रीण निम्मी बाहेर, निम्मी आत. ती व तिची दुसरी मैत्रीण किंकाळ्या फोडत असतानाच चालकाने गपकन ब्रेक हाणून गाडी थांबविली, तोवर इतरांनी त्या मुलीला आत ओढले होते. ते दार व्यवस्थित लॉक केल्यावर पुन्हा घाटातून मार्गक्रमणा सुरू झाली. आत ती मुलगी शॉकमुळे रडू लागली होती. बाहेर पाऊस, धुके, अंधार ह्यांचे साम्राज्य होते. समोरचे अजिबात धड दिसत नव्हते. डोंगराच्या बाजूने गाडी चालवावी तर दरडींची भीती व समोरचा रस्ता अंधारात गडप झाला होता.

पुन्हा एकदा वाहनचालकाने अचानक ब्रेक मारून गाडी थांबविली. स्टियरिंग व्हीलवर डोके ठेवून तो दोन मिनिटे तसाच स्तब्ध बसला. आम्हाला टेन्शन की आता ह्याला काय झाले? त्याची अवस्था आमच्या ग्रुपमधील वयाने चाळिशीच्या आसपास असलेल्या आमच्या एका सहाध्यायींनी बरोबर ओळखली. त्यांनी त्याला पाणी प्यायला दिले. पाठीवर धीराचा हात फिरवला व म्हणाले, "तू काळजी करू नकोस. मी बसतो तुझ्या शेजारी आणि सांगतो तुला रस्ता कसा आहे ते. तू अगदी सावकाश घे गाडी. अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला!"

एकही शब्द न बोलता खिडक्यांपाशी बसलेल्या सर्वांनी आपापल्या पोतड्यांमधून विजेऱ्या काढल्या, पावसाची पर्वा न करता खिडक्या उघडल्या व हात बाहेर काढून गाडीच्या आजूबाजूच्या व गाडीसमोरच्या रस्त्यावर त्यांचे प्रकाशझोत टाकत वाहनचालकाला रस्ता पुढे कसा आहे वगैरे सांगायला सुरुवात केली. मधल्या रस्त्यात बहुधा दरड कोसळलेला भागही होता, पण आमचे पूर्ण लक्ष गाडीवानाकडे, रस्त्याकडे व त्याला दिशादर्शन करण्याकडे एकवटले होते. विजेऱ्या खिडकीतून बाहेर धरून धरून व माना तिरप्या करून करून त्यांना रग लागली होती. पण अशा परिस्थितीत कोण माघार घेण्यास धजवणार!

अखेरीस धीम्या गतीने, कण्हत कुंथत आम्ही एकदाचा तो घाट ओलांडला. वाहनचालकाच्या जीवात जीव आला. ह्यावेळी त्याने गाडी न थांबविता सराईतपणे गुटख्याची पुडी तोंडात रिकामी केली. आम्ही फक्त एकमेकांकडे सूचकपणे पाहिले पण त्याला त्यावरून छेडले नाही. पुढचा प्रवास वेगात आणि सुरळीत झाला. पुण्याला पोहोचेपर्यंत रात्रही बरीच झाली होती. पण त्याचे कोणालाच काही विशेष वाटले नाही. घाटातल्या त्या काही तणावभरल्या क्षणांनी आम्हाला बरेच काही शिकविले. दुसऱ्या दिवशी घरात उबदार वातावरणात बसून घाटात दरडी कोसळण्याच्या व आमच्या वाटेतील गावांचा पुरामुळे इतर गावांशी संपर्क तुटण्याच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या वाचताना अंगावर शहारा आल्यावाचून राहिला नाही.

--- अरुंधती

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरूंधती हो ग अगदि थरारक.
कोक्णातला पाउस खरच इतका मुसळधार अस्तो ना. बाहेर जाण कठीणच.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! Happy

मंदार, पावसाळ्यात कोकणात जायची मजा अनुभवायची होती ना! अनुभवली हो पुरेपूर! Proud

सायो, अगं ह्या लेखांमुळे घरच्यांना पण कळत आहे मी बाहेर काय काय दिवे लावलेत ते! कारण असे काही घडल्यावर घरी त्याबद्दल मी कधीच फारसे बोलले नाही! पुढची ट्रीप नाहीतर परवानगीअभावी कॅन्सल करावी लागली असती!

दिनेशदा, अजूनही काही थरार अनुभव आहेत माझ्या पोतडीत! Proud
थरारदेव/देवी प्रसन्न आहे की नाही माहीत नाही, पण रक्षणकर्ता जो परमेश्वर आहे तो तरी आतापर्यंत अशा अनेक प्रसंगांमध्ये पाठीशी उभा राहिलाय एवढे नक्की! Happy

अकु, कसला थरारक अनुभव.

घाटातल्या अंधाराचा आमचा ही अनुभव भयाण आहे. मागच्याच वर्षी जानेवारीत औरंगाबादहून येताना ठरवूनही निघायला लेट झाला. त्यात आमावस्या. आणि घाटात पोचेस्तोवर संध्याकाळचे ७ वाजलेच. मग काय ड्रायव्हरच्या कौशल्यावर आणि देवावर हवाला ठेवून तो घाट पार केला. पोटात नुसते गोळे येत होते. त्यात असे ऐकले होते की सुनसान रस्त्यांवर आजूबाजूच्या दरीत कधी कधी काही दांडगट लोक काठ्या वै. घेऊन बसतात. एखादे वाहन (जीप्/सुमो/स्कॉर्पिओ) वै. अडवून लुटतात म्हणे. त्यामुळे तर जाम टरकली होती. सगळे (मी, मोदक, साबा, साबु, लहान दीर) चिडीचूप बसलो होतो. मनातल्या मनात रामरक्षेचा जप अखंड चालू होता. वळणावरून वळताना पुढच्या वळणावरच्या वाहना प्रकाशझोत दिसायचा तेव्ह्ढाच काय तो उजेड. जेव्हा घाट संपून रेग्युलर रोडला लागलो तेव्हाच जीव भांड्यात पडला.

अकु! कसले वेडे धाडस करता गं तुम्ही लोक?
कोकणातले घाट...व त्यात पाऊस, अंधारी गावं! भयानकच !

निंबे...औरंगाबादजवळ कन्नडचा घाट म्हणतेस का तु?
तिथेही लुटमार होते हां फार! आम्ही धुळ्याला असतांना एकदा औरंगाबाद पैठण अशी ट्रीप काढली होती...सगळे घरचेच ! त्यावेळी आमच्याकडे अँबेसेटर कार होती....परततांना पाऊस सुरु झाला आनि घाटाच्या चढणीवरच एक गाव आहे तिथे गाडी बंद पडली...गाडीत अचानक खुप धुर ! आई, बाबा, मी नि माझे तिघे लहान बहिण-भाऊ! बर तर बर एका मानलेल्या मामाला सोबत घेतल होतं! त्याच दिवशी महाराष्ट्रातले लाइट गेले होते म्हणे! आणि नुकतच आठेक दिवसांपुर्वी तिथे दरोडेखोरांनी २५-३० गाड्या अडवुन लुटल्या होत्या! मग त्या गावातच सरकारी डाक बंगला शोधुन, तिथल्या रखवालदाराला काही पैसे देउन व्हरांड्यात रात्र काढायची परवानगी मिळाली....! अजुनही आठवलं की शहारा येतो बै!

निंबे...औरंगाबादजवळ कन्नडचा घाट म्हणतेस का तु? >> मला घाटांची आणि रस्त्यांची तितकीशी माहीती नाही. Sad औरंगाबादहून मुंबईकडे येताना जो घाट लागतो तो.

निंबुडा, कुट्ट अंधारात, अनोळखी भागात घाटातील रस्त्यावरून, चोरी-दरोडे होणार्‍या भागात आणि खासगी वहानाने जाताना खरंच जाम रिस्क असते. मी सहज कल्पना करु शकते काय अवस्था झाली असेल! (खुद पे बीती ;-))

आर्या.... गेले बरं ते दिवस!!! आता मीही प्रवासाला जायचे म्हटले की सतरा प्रकारच्या चौकशा, खातरजमा करुन मगच निघते! Proud

योगेश, राखी, विशाल धन्यवाद प्रतिसादाबद्दल! एकेक वय असतं असल्या उद्योगाचं.... दुसरं काय! Wink Proud