राधा गौळण

Submitted by अभय आर्वीकर on 26 May, 2010 - 12:10

राधा गौळण

डोईवर घागर खांदी दुपट्टा
पाठीशी वेणी
भरीतसे राधिका पाणी....... ॥धृ॥

हलवित हात कमर लचकते
पैंजण वाजत हळूच दचकते
नाकी नथणी,लोंबतं कुंडलं
झुलतसे कानी ........॥१॥

चालत बोलत रूप मिरवते
शोधित कान्हा नजर फ़िरविते
कान्हाईची आठव झाली
झुरतसे नयनी ........॥२॥

तितुक्यातच हा रांगत आला
परमात्म्याचा संगम झाला
अभय जनांनी रूप लोचनी
साठविले ध्यानी ........॥३॥

गंगाधर मुटे
...................................................
१९८०-८५ च्या सुमारास मी लिहिलेली गौळण. ’’गौळण" एक लोभसवाणा काव्यप्रकार. गोकुळात श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत ज्या कृष्णलीला केल्यात त्याचे रसभरित गेयरूपी वर्णन म्हणजे ’’गौळण". पवित्र आणि वासनारहित प्रेमाचे प्रतीक म्हणजे "गौळण". पण या काव्यप्रकाराची फारशी दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नसावी.
जाणकारांनी या काव्यप्रकाराविषयी अधिक प्रकाश टाकला तर आवडेल.
...................................................

गुलमोहर: 

मुटेसर मस्तच.....
गौळण शब्दाविषयी कंफ्युजन ("गौळण" की "गवळण". हे दोन्ही शब्द कधी कुठे वापरतात?)

"गौळण" की "गवळण". हे दोन्ही शब्द कधी कुठे वापरतात?

ते मला पण नक्की माहीत नाही.
पण
या काव्यप्रकाराला "गौळण"
आणि
व्यक्तिला संबोधतांना गवळण म्हणत असावेत. (कदाचित)

जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा.

मुटेजी,
हे वाचुन गझलेमधली राधा डोळ्यासमोर उभी केलीत तुम्ही !
Happy

हलवित हात कमर लचकते
पैंजण वाजत हळूच दचकते
नाकी नथणी,लोंबतं कुंडलं
झुलतसे कानी ........॥१॥

माझ्या मते हे अस पैंजण्,कानात्,नाकात (मोठाले) नथणी,कुंडल घालणारे काही लमाणी आणि बंजारा जातीच्या स्त्रिया, इतरांच्या मानाने महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसतात ..

सुंदर ! कान्हा - राधा हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत माझ्या.
'गौळण' शब्दाचं 'गवळण' हे अपभ्रंशित/बोली भाषेतलं रूप असेल. ( असं मला वाटतं !)