रानभाज्या - कुलू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 July, 2009 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुलूच्या ३-४ जुड्या (ह्यातील वरची हिरवी पात घ्यायची मध्ये जर दांडा, काडि असेल तर काढायची व खालील पांढरा भाग चिरताना घ्यायचा नाही. ही भाजी धुवून, चिरून घ्यावी)
२ कांदे चिरून
पाव वाटी कोणतीही डाळ. (चणाडाळ असेल तर भिजवून घ्यावी)
२-३ ओल्या मिरच्या चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग,
अर्धा चमचा हळद
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
खवलेले ओले खोबरे पाव वाटी
२ मोठे चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेल गरम करुन त्यात लसुण मिरचीची फोडणी द्यायची मग हिंग, कांदा हळद घालून परतवायचे. लगेच चिरलेला कुलू आणि डाळ घालून परतवून वाफेवर ही भाजी शिजवत ठेवावी. डाळ शिजत आली की मिठ, साखर घालावी. परत परतवून ३-४ मिनीटांनी ओल खोबर घालून गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही भाजी पिठ पेरूनही करता येते
डाळ न घालता साधीही चांगली लागते.
ही भाजी कोवळीच घ्यावी खालील फोटोतील भाजी उशीरा घेतल्याने जरा जून आहे.

कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
भारंगी - http://www.maayboli.com/node/9381

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलू
SDC10371.jpg

यालाच कोचिंदा पण म्हणतात. पोटासाठी चांगली असते हि भाजी. पण कोवळीच घ्यावी. नंतर जून झाली कि शिजत नाही.

तू मुंबईत आहेस का?
शनिवारी दादरला भरपूर ठिकाणी ही भाजी विकायला ठेवलेली पाहिली. मी माझ्या घराजवळ कुर्ल्याला एका भाजीवाल्याकडून घेतली.

पुण्यात कुठे मिळेल, काही सांगू शकत नाही. माझ्या सासरी विदर्भातही ही भाजी खातात, त्याला धान भाजी म्हणतात.

आमच्याकडे पण स्वच्छच असते भाजी जास्त नाही धुवायला लागत. कारण पाऊस पडल्यामुळे ह्या भाज्या धुवुनच निघतात. हो पण त्या एक एक पाती वेगळी करुन साफ करायला लागतात.
अमी अग कदाचित जिथुन भाज्या काढतात ती जमिण टणक असेल म्हणुन भाजीला माती राहत असेल. किंवा भाजीवाल्या साफकरुन आणत नसतील.

मी सरळ लसणीची फोडणी करुन तेलावर परतली आणि मग दाण्याच कुट घातल थोडसं . छान लागली.

बरीच धुवावी लागली भाजी Sad

मेघा अमेरीकेचा आणि माझा अजुन काहीच संबंध आला नाही. त्यामुळे मी काहीच सांगु शकत नाही. तु अमेरीकेतील इंडीयन्सना विचार. त्यांना माहीत असेल.

जागू , दिनेशदा मी काल हि भाजी मार्केट मध्ये बघितली. हिला पोकळी ची भाजी म्हणतात का?
असेच काही नाव सांगितले भाजीवाली ने. आईने फोनवर हेच नाव असते असे सांगितले. पोकळीची भाजी वेगळी असते का? वर फोटोतील भाजीसार्खीच दिसत होती
भाजी घ्यायची होती पण पुन्हा येईपर्यंत संपून गेली होती.

आमच्याकडे फोडशिची भाजी म्हणतात या भाजीला.
माझ्या सासरी ही भाजी मोसमात पहिल्यांदा केली कि देवापुढे ठेवतात.

आईने त्यात सुका जवळा टाकलेला. मस्त झालेली भाजी!!

हैला.. ही भाजी तर मी चायनीज भाजीच समजत होते आत्तापर्यंत..आणी तशीच स्टर फ्राय करून खात होते.. अशी करून पाहीन आता..

आम्ही पण याला फोडशिची भाजी म्हणतो. माझी बहिण या पावसाळी भाज्या खुप करते. कालच माझ्या बहिणीने मला ही भाजी स्कायप वर दाखवली, म्हणुन मला ही भाजी माहीत झाली. ती याची भजी करणार होती.....नेहमीच्या कांदा भजी सारखीच पण कांद्याबरोबर ही भाजीही चिरुन ती टाकते.

आज हुशारीत दोन जुड्या आणल्या . निवडायला 5 मिनिटे आणि भाजी धुवायला 30 मिनिटे लागली. फार माती होती. एकेक पात धुतलं.
भाजीवाल्या ताईने फोडशीची भाजी म्हणून सांगितले.