फुजीसान - अर्थात माऊंट फुजी

Submitted by cybermihir on 20 September, 2008 - 03:26

भारतात किंवा भारतीयांच्या मनात हिमालयाला जे स्थान आहे, तेच स्थान जपानमधे फुजी पर्वताला आहे. किंबहुना जपान्यांनी ह्या फुजी पर्वताला देवत्व बहाल केले आहे. नुसते फुजी न म्हणता फुजीसान म्हणतात. सान हा प्रत्यय कुठल्याही जीवंत किंवा निर्जीव वस्तुला आदराने बोलावण्यासाठी वापरला जातो. तर, अश्या अनेक वैशिष्ट्यांनी परिपुर्ण असा हा जपानमधील सर्वात उंच पर्वत, कुठल्याही बाजुने बघितले तरी सम-द्विभुज त्रिकोणासारखा एकच आकारात दिसणारा ... वर्षातले ८ ते ९ महीने टोपीसारखे बर्फ पांघरलेला हा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे खरच एक चमत्कार आहे. वारीला जाऊन आल्यासारखे जपानी फुजीसान चढायला जातात. जपानला येणार्‍या प्रत्येकाला ह्या पर्वताबद्दल कुतुहल असतेच. असेच कुतुहल गेली अनेक वर्षे माझ्या मनात होते .... अजुनही आहेच. पण कधी जायला जमले नाही हे खरे. एकतर वर्षातुन उन्हाळ्याचे फक्त २ महिनेच ह्या पर्वतावर जाता येते. आणि माझी जपानची वारी नेहेमी ते २ महिने सोडुनच व्हायची. सध्या जरा जास्त काळासाठी जपानमधे वास्तव्य केल्यामुळे ह्या वेळेला फुजी चढायचा योग आला. आला म्हणण्यापेक्षा मी तो आणला.

जुलै - ऑगस्ट ह्या २ महीन्यातच फुजीसान चढता येतो. इतर वेळी तो रस्ताच बंद ठेवतात. फुजीसानवर चढाई करायची तर खूप तयारी करावी लागते. एकतर तिथले वातावरण आणि हवा अतिशय विचित्र आहे. एकदम लहरी. कधी खूपच पाऊस असेल तर कधी अचानक मस्त ऊन पडेल, कधी तुफानी वार्‍यामुळे उभे राहणे सुद्धा कठीन होईल, तर कधी एकदम थंडी वाजयला लागेल. त्यामुळे मरणाच्या उकाड्यातसुद्धा चढायला जाताना थंडी, पाऊस, वार्‍यापासुन संरक्षण करणारे कपडे घेऊन जावेच लागतात. साधारण मध्यापर्यंत गाडीने किंवा बसने जाता येते आणि पुढे ६-७ तासांची चढण. ती मात्र चांगलीच दमछाक करणारी चढण आहे. जपानमधे साधारण २-३ छोट्या ट्रेक्सचा अनुभव असल्यामुळे, जपानी लोक माणसांची किती काळजी घेतात ते माहीत होते आणि तसलाच प्रकार फुजीसानवर पण असणार असा माझा अंदाज होता. जरी तो बर्‍याचश्या प्रमाणात खरा ठरला असला ... तरी फुजीसान म्हणजे 'कुठलाही' पर्वत नाही हे मात्र पदोपदी जाणवत होते. पाचव्या थांब्यापर्यंत गाडीने जाऊन मग ६, ७, ८, ९ असे एक एक थांबे सर करत १० पर्यंत गेले की आपण विवरापाशी पोचतो. थांबे म्हणजे मधे मधे विश्रांतीसाठी बांधलेल्या टपर्‍या. तिथे राहता येते, नुसते चहा-कॉफी घेता येते किंवा थोडा वेळ आराम करता येतो. चढायला एक रस्ता आणि उतरायला दुसरा. अर्थात ते बरच आहे, कारण चढण्याच्याच रस्त्याने उतरावे लागले असते तर आत्ताच्या गर्दीच्या ५% सुद्धा गर्दी दिसली नसती.

एका शनिवारी मी जायचे ठरवले. हवामानाचा अंदाज बघितला तर जोरदार पावसाची शक्यता होती. आणि तो अंदाज दुर्लक्ष करण्याचे धाडस फक्त भारतातच करता येते. तरीपण विचार केला ... बघु म्हटलं, सह्याद्रीमधे भटकंती केल्याचा किती फायदा झालाय .. का नुसत्या अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालोय. बरोबर कुणी येण्याची शक्यता नव्हतीच. एकटाच निघालो. संध्याकाळी ६ च्या सुमारास बसने टोक्योहुन निघालो. साडेआठच्या सुमारास ५व्या थांब्यापाशी पोचलो. तिथे बसचा थांबा, वाहनतळ याबरोबरच काही दुकाने, विश्रांतीगृहे, भोजनालये होती. हवा एकदम मस्त होती. खूप धुकं होतं. वरती किती थंडी असेल याचा अंदाज येत होता. बसमधुन उतरुन कपडे वगैरे बदलले. माझा अवतार अगदी बघण्यासारखा होता. २ टि-शर्टस, थंडी वाजू नये म्हणुन त्यावर जर्कीन, खाली शॉर्ट आणि त्यावर जीन्स. आणि ह्या सगळ्यावर पावसाचा त्रास होऊ नये म्हणुन रेनकोट आणि अंधारात रस्ता दिसण्यासाठी विजेरी. निघण्याची तयारी केली .... आणि चालायला सुरुवात करायची .... पण कुठुन ते समजेचना. धुकं इतकं दाट होतं की १५-२० फुटांपलिकडचे काही दिसत नव्हते. थोडावेळ नुसताच इकडे-तिकडे भटकून कुठे वर चढायचा रस्ता दिसतोय का ते बघितले ... पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी बसमधुन उतरलेल्या इतर घोळक्यांच्या मागोमाग जायचा प्रयत्न केला ... तो सुद्धा जरासा फसला. कारण काही लोक भोजनालयांमधे जायचे, काही दुकानांमधे. शेवटी यश आले. एक घोळका २ दुकानांच्या मधुन पलिकडे गेला तेव्हा तिथे 'चढुन जाणार्‍यांसाठी सुचना' असलेला फलक दिसला. आणि मी पण हुश्श केले.

रात्रीचे ९ वाजले होते. सुरुवातीला बराच वेळ सरळ रस्ता होता. आजुबाजुला खूपच दाट धुके आहे हे चांगलेच जाणवत होते. कारण डोक्याला बांधलेल्या विजेरीमधुन पडणारा प्रकाश समोर १० फुटांवर एखाद्या भिंतीवर पडल्यासारखा दिसत होता. थोडेसे अंतर चालून गेल्यावर मग चढण सुरू झाली .... आणि पहील्या पाचेक मिनीटातच दमछाक झाली. वेग कमी झालाच पण एकुण अंदाज सुद्धा आला काय प्रकार असेल याचा. अर्थात तो अंदाज किती चुकीचा होता ते ही नंतर समजले, कारण सुरुवातीची चढण म्हणजे फक्त 'ट्रेलर' होते. 'असली शिनेमा' तर चांगलाच खतरनाक होता. जरा वेळाने लगेचच ६वा थांबा आला. मला जरा आश्चर्य वाटले कारण साधारण एकेका तासाच्या अंतरावर एक एक थांबा आहे अशी माझी समजूत होती. आणि तेव्हा फक्त अर्धा तासच झाला होता. मला वाटले की माझा वेग चांगला आहे आणि अश्या तर्‍हेने आपण तीनेक तासात वर पोचू शकू. ६व्या थांब्यानंतर जरा चढण थोडी अवघड झाली आणि माझा वेग सुद्धा मंदावला. जरी पाऊस नव्हता तरी कपड्यांच्या ओझ्याने आणि दम लागल्यामुळे घाम येऊन आतुन ओला होत होतो आणि धुक्यामुळे बाहेरुन. तसाच हळूहळू थांबत थांबत सातव्या थांब्यापर्यंत पोचलो. तेव्हा सुद्धा एकुण सव्वा - दिड तास झाला होता. मी माझ्यावरच खुश होऊन जरा तिथे विश्रांतीला थांबलो. १० मिनीटे थांबुन परत चढाईला सुरुवात केली आणि मग निसर्ग आपले एक एक प्रताप दाखवू लागला. चढण पण हळूहळू खडी चढण होऊ लागली. आत्तापर्यंत साधी सरळ पायवाट होती. आता खडकाळ प्रदेश सुरू झाला होता. हातांनी खडकांचा आधार घेत घेत चढत होतो. धुके कमी झाले होते पण ढग होतेच भरपुर. आकाश काही दिसत नव्हते पण निदान जरा फुजीसानचे दर्शन व्हावे ही इच्छा होती, ती काही सफल झाली नाही. काही वेळापुरते का होईना पण ढगांनी चंद्राला खिडकीतून डोकावयाची संधी दिली, आणि त्याने सुद्धा तेवढ्या वेळेचा सदुपयोग करून सर्व ढगांना एक चंदेरी झालर लावून बहार आणली. खरच त्यावेळेला मला माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही याची आणि असता तरी माझी चांगला फोटो काढण्याची कुवत नाही याची कीव आली. आता मात्र चालणे कमी आणि विश्रांती जास्त असे होत होते. मजल दरमजल करत कसाबसा आठव्या थांब्यापर्यंत पोचलो. तेव्हा घड्याळात बघितले तर १२ वाजले होते. म्हणजे एकुण तीन तास लागले इथपर्यंत यायला. अशीच चढण कायम राहीली तर माथ्यावर पोचणार की नाही अशी काळजी वाटायला लागली.

थोडा वेळ थांबून परत चढायला सुरूवात केली. चढण्याचा वेग फारच मंदावला होता आणि विश्रांतीचे प्रमाण तितकेच वाढले होते. धुके नव्हते पण पाऊस अधुन मधुन आतपर्यंत चौकशी करुन जात होता. रेनकोट ओला तर झाला होताच, पण त्याचबरोबर जर्कीनसुद्धा ओले झाले होते. सुदैवाने आतले कपडे कोरडे असल्याने फारसा त्रास होत नव्हता .... पण बूट आणि पायमोजे ओले झाल्याने वैताग आला होता. त्यात परत थंडीसुद्धा वाढली होती. रेनकोटची टोपी डोक्यावरून चार्ली चॅप्लीनच्या पँटसारखी सतत पडत होती. त्यामुळे कानटोपी ओली होत होती. तिच्याकडे पण बघायचे, आतले कपडे कोरडे कसे राहतील याचा पण विचार करायचा आणि खडकांचा आधार घेत घेत चढत पण रहायचे अशी तिहेरी कामे एका वेळेला करावी लागत होती. दम लागला म्हणुन एका ठिकाणी जरा बसलो तर झोपच लागली तिथे बसल्या बसल्या. साधारण अर्धा तास झोपलो होतो ... तसाच उघड्यावर पाऊस - वार्‍यात. फु़जीसान चढायची ती शेवटची संधी असल्याने बरीच गर्दी होती. आणि त्यात आता सगळ्यांचाच वेग कमी झाल्याने ट्रॅफीक जाम झाले होते. जपानी लाईनी लावण्यात पटाईत असल्याने लाईन सोडून कुणी पुढे जात नव्हते.

असच हळू हळू हळू करत नवव्या थांब्यापर्यंत पोचलो, तेव्हा अगदीच त्राण गेले होते. त्यात परत पावसाने चांगलीच खोलवर चौकशी केली होती. शेवटी तिथे १००० येन भरून तासभर विश्रांती घ्यायचे ठरवले. नुसते टपरीवर तासभर बुड टेकवायचे १००० येन ऐकुन आधी आश्चर्य वाटले आणि नंतर निराश !! पण दुसरा काहीच मार्ग नव्हता. थंडी, वारा आणि पाऊस यांचा सतत मारा चालू होता. पायसुद्धा 'मी' म्हणत होते. आतमधे गेल्यावर अंगावरचा जामानिमा काढुन ठेवला, बूट काढले तेव्हा जरा बरे वाटले. एवढ्या उंचीवर विजेची काही सोय नसताना विद्युतजनित्राच्या सहाय्याने ती खोली गरम केली जात होती. ते बघितल्यावर मात्र प्रत्येक गोष्ट सर्वसाधारण किमतीच्या ३ पट का याचे उत्तर मिळाले. बाहेर एवढी थंडी असताना मस्त गरम वाफाळता कोको किंवा मक्याच्या कणसाचे सूप प्यायल्यावरच्या भावना शब्दात वर्णन करणे अवघड !!

तासभर तिथे आराम केल्यावर परत चढुन जायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण खाली जायचे दोर आधीच कापले गेले होते. आठव्या थांब्यावरुन खाली जायचा रस्ता होता. त्यामुळे आता वरती जाण्याशिवाय पर्याय नव्हता. निघालो. शेवटचा टप्पा खूपच अवघड होता. अगदी कसोटी होती. शब्दश: चालणे कमी आणि थांबणं जास्त होत होतं. आता स्वच्छ उजाडलं होतं. म्हणजे ४ वाजले होते. रस्ता नीट दिसत होता. ढगांची दाटी इतकी होती की सुर्योदय दिसणे तर शक्यच नव्हते ...पण निदान पाऊस तरी नको होता. तो नेमका चारी दिशांनी बरसत होता. असाच भिजत भिजत चालता चालता कधीतरी माथ्यावर पोचलो. पण काहीच आनंद झाला नाही. जे दृश्य आठव्या किंवा नवव्या थांब्यावरुन दिसत होतं तसच माथ्यावरुन. फक्त हा माथा आहे असे सांगणर्‍या एका फलकाचा फरक होता. मला एक सेकंद कळेना की एवढा अट्टाहास कशासाठी? पावसात भिजून आजारी वगैरे पडलो तर कोण आहे बघायला? पण काही प्रश्न अनुत्तरीतच असतात .... त्यातच मजा असते. कारण Opportunity knocks once !! इतकी वर्षे जपानला येऊन फुजीसान नुसता लांबुनच बघत होतो. जवळ जायला काही जमले नव्हते. या पुढे सुद्धा कधी संधी मिळेल माहीत नाही. तेव्हा केवळ ही संधी सोडायची नाही म्हणुन! मनाची इच्छा आहे म्हणुन!! हात-पाय धड आहेत म्हणुन !!!

वेळ बघितली ... साडेचार वाजले होते. धुकं होतंच. आणि त्यात वरती कुठे बसायला पण नीट जागा नव्हती. छोट्या-छोट्या टपर्‍या होत्या ... पण परत १०००येन देण्याची इच्छा नव्हती. मग ५-१० मिनीटे असच इकडे-तिकडे धुकं बघत भटकलो. आता खाली उतरायचे पण कुठून ते कळेचना. कुठे काही फलक वगैरे दिसेना. टपरीवर जाऊन कुणाला विचारावे तर त्याचे सुद्धा पैसे मागतील की काय ही भिती ! तितक्यात माझ्याबरोबरच चढायला सुरुवात केलेला एक घोळका दिसला. सहज विचार आला की ते पण कदाचित उतरायच्या तयारीत असतील, म्हणुन त्यांच्यामागोमाग गेलो. आणि खाली उतरायचा एक रस्ता दिसला. उतरण खूपच सोपी होती. पण सगळीकडे अर्धा-अर्धा फुटाची काळी वाळू होती. पाय दुखत होते, पण सहसा गड उतरताना दगडांमुळे हादरे बसुन ते बधिर होऊन जातात, असे काही होत नव्हते. भुसभुशीत माती असल्याने गालिच्यावरुन चालल्यासारखे वाटत होते. अर्थात त्या मातीमधे पाय रुतत होते .... जसं काही कुणीतरी पाय धरुन ठेवतय. त्यामुळे उतार असुनही वेग कमी होता.

उतरायला सुरुवात केली खरी पण थोडेसे उतरुन आल्यावर शंका आली की आपण बरोबर मार्गावर आहोत ना ? कारण परत टोक्योला जाण्यासाठी सहज आणि सोपी अशी मला एकच वाट ठाऊक होती, किंबहुना मी त्या मार्गावरच्या बसचे वेळापत्रक वगैरे नीट बघुन आलो होतो. दुसर्‍या कुठल्या वाटेने उतरलो असतो तर कदाचित खूप फिरुन जावे लागले असते. कुणाला विचारावे तर दुरदुरपर्यंत कुणी दिसत नव्हते आणि या रस्त्यावर मधे मधे थांबे पण नव्हते. अर्धा-एक तास उतरल्यावर एक थांबा लागला आणि तिथे काही माणसे दिसली. त्यांना विचारल्यावर समजले की सवयीप्रमाणे मी रस्ता चुकलो आहे आणि पुर्वेच्या बाजुने उतरण्याऐवजी दक्षिणेकडच्या बाजुने उतरणार आहे. आता आली का पंचाईत!!! पण त्याने सांगितले की खाली गेल्यावर टोक्योला जाण्यासाठी गाड्या आहेत आणि तिथेच सविस्तर माहिती मिळेल. मग 'आता जे काय होईल ते बघू' अशी मनाची समजुत घालुन परत उतरायला लागलो.

आता जरा धुके विरळ होत होते आणि पुढे-मागे २-४ टाळकीसुद्धा दिसायला लागली. पाऊस काय थांबायला तयार नव्हता. पण पावसात नखशिखांत भिजलो होतो तरी आता थंडी वाजत नव्हती. दोनेक तास उतरल्यावर मग तो रुक्ष मातीचा रस्ता संपला आणि अगदी आपल्या सह्याद्रिसारखी दगड-गोटे, झाडं, पाण्याचे ओहोळ असलेली वाट लागली. उतरण संपत आल्याची जाणीव झाली. तरी अजुन अर्धा तास लागणार होता या बाजुच्या पाचव्या थांब्यापर्यंत पोचायला. मग पाय ओढत ओढत अर्ध्या तासात तिथपर्यंत पोचलो आणि हुश्श केले. तिथल्या टपरीवर जाऊन आधी बसची वगैरे चौकशी केली. पायथ्यापर्यंत जायला बस होती ... थोडा वेळ होता. मग मस्तपैकी त्याच टपरीमधे जाऊन जरा आराम करावा, ओले कपडे बदलून कोरडे व्हावे, काहीतरी खाउन घ्यावे असा विचार केला. आत जाऊन बॅग उघडली तर आतमधे सगळे काही पुर्ण ओलेचिंब झाले होते. अक्षरश: पिळल्यावर बदाबदा पाणी निघालं. शेवटी अंगावर एकच टि-शर्ट आणि पायजमा ठेऊन बाकीचे सगळे काढुन टाकले. बूट पण काढायचे होते पण दुसरा काही पर्याय नव्हता ... मग तिथे रबरी सपाता विकत घेतल्या. त्या सुद्धा मापाच्या नव्हत्या .. पण गरजवंताला अक्कल नसते आणि डोळेही नसतात हा नवीन धडा शिकलो. त्या कपड्यांवर टोक्योला पोचलो तेव्हा माझा अवतार खरच 'अवतार' झाला होता. बूटांचे आणि जीन्सचे मात्र खूपच हाल झाले होते. त्या भुसभुशीत मातीत पाय रुतून जीन्स गुडघ्यापर्यंत मातीमय झाली होती. तशीच जीन्स आणि बूट बॅगमधे टाकले. थोडा कोको आणि बिस्कीट खाल्ले. जरा आराम केला. तोपर्यंत ९ वाजले. बसची वेळ झालीच. इथुन बस पायथ्यापर्यंत जाते आणि मग तेथून टोक्योपर्यंत जायला बस किंवा रेल्वेचे पर्याय उपलब्ध आहेत ही माहिती मिळाली होती. मी बसमधे बसलो तेव्हा फक्त ४ जण होते, पण निघेपर्यंत अगदी खचाखच भरली. थंडी असल्याने खिडक्या बंद होत्या आणि दारे तर बंद असतातच. सगळेच व्यवस्थित भिजलेले होते, त्यामुळे एक सामुदायिक विचित्र वास तयार झाला होता. पण काही पर्याय नव्हता. तसाच तासाभराचा प्रवास करुन पायथ्यापाशी आलो. तिथे पुढच्या प्रवासाची चौकशी केली तर लगेचच बस होती. थेट टोक्यो. प्रचंड आनंद झाला. आता मस्तपैकी २ तास झोप.

१२ च्या सुमारास टोक्योला पोचलो. झोप झाल्यामुळे शिणवटा किंवा थकावट जाणवत नव्हती. पण पुढे आठवडाभर मात्र अंग चांगलेच दुखत होते. अर्थात त्याचे काही वाटत नव्हते. उलट अभिमानच वाटत होता. एकट्याने चढुन जाण्याचा सिंहगडानंतर पहिलाच प्रयत्न होता. पण सिंहगडाची वाट-न्-वाट माहीत होती. हा अनुभव वेगळाच होता. काहीच माहीत नव्हते. ३४०० मीटर ऊंचीचा हा पर्वत आहे, पण पाचव्या थांब्यापासुन नक्की किती चढुन गेलो ते आजतागायत माहीत नाही.

टोक्योला पोचता-पोचताच कंपनीतील एका सहकार्‍याचा फोन आला. भारतातुन आमच्या कंपनीमधील एक सहकारी, एक मैत्रीण काही दिवसांसाठी जपानला आली आहे. त्यामुळे तिला भेटायचे, जेवायला जायचे ठरले. एकुणच फुजीसान बद्दल एक आकर्षण असल्याने आणि त्यात परत माझ्याकडुन सगळे वर्णन ऐकून तिला सुद्धा जावेसे वाटले आणि पुढच्या शनिवार-रविवारी परत फुजीसानचा कार्यक्रम ठरवून आम्ही आपापल्या घरी गेलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>पुढच्या शनिवार-रविवारी परत फुजीसानचा कार्यक्रम ठरवून आम्ही आपापल्या घरी गेलो.

त्या दुसर्‍या ट्रीपचं वर्णन पार्ट २ मध्ये येणार आहे कां? म्हणजे मागच्या चुकांवरुन तू काय काय शिकलास हे कळेल. Wink

इतकी वर्ष जपानला राहून फुजीसानची एकही ट्रीप 'सफल' झाली नाही. जायला निघाल्यावर प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने अर्ध्या रस्त्यातून मागे फिरावं लागलं. मग फुजीच्या नाकावर टिच्चून डायरेक्ट एवरेस्टलाच जाऊ म्हणून नाद सोडून दिला. Wink

सायो,
अग एका ट्रिपचे वर्णन लिहायला मला महिना लागला. दुसर्‍या ट्रिपला कधी मुहुर्त लागतोय काय माहीत. बघु .. जमले, वेळ मिळाला तर लिहीन नक्की. पण अगदी थोडक्यात सांगायचे तर आधीच्या चुका परत करण्याची किंवा होण्याची वेळच आली नाही. तो एक वेगळाच अनुभव होता त्यामुळे परत नवीन चुका केल्या.
=== I m not miles away ... but just a mail away ===

मिहीर, एखाद फुजीसानच दर्शन घडवणार चित्र टाक ना!
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

मिहीर, मस्त लिहिलयस रे... Happy
(हे जरा आधी लिहून प्रवासवर्णन स्पर्धेत टाकायचं ना.. Uhoh )

फोटो पण टाक असतिल तर...

मिहीर.. मस्त वाटलं वर्णन वाचुन... एकट्याने जायचे म्हणजे जरा धाडसीच..

मस्त रे. कोणी नाही तर सरळ एकटाच गेलास, याला म्हणतात खरा डोंगरमित्र... छान लिहिल आहेस

>>>>> पण पाचव्या थांब्यापासुन नक्की किती चढुन गेलो ते आजतागायत माहीत नाही.

सुरुवातीला लक्षात ठेवायचा प्रयत्न होतो, पण नन्तर धाप आणि दमल्यामुळे डोके बधिर होते! त्यात पुन्हा धुक्यामुळे आजुबाजुला काहीच दिसत नसल्याने, काय चाललो नि किती चाललो याला अन्तराच्या सापेक्ष अर्थच रहात नाही! आमची अशीच अवस्था "जरन्डेश्वरा"वर झाली होती!

छान लिहिले आहे! एकट्याने जायचा अनुभव जबराच! Happy
(मागे कधीतरी कान्द्या पण गेलेला बहुतेक याच ठिकाणी, त्याचा फोटो सहित वृत्तान्त असेल कुठेतरी, वाचलेला आठवतोय)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मिहीर,
नेहमीपेक्षा अगदी वेगळा अनुभव आणि म्हणुनच वेगळे प्रवासवर्णन. छान लिहीले आहेस.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
I'm not dumb. I just have a command of thoroughly useless information
- CALVIN & HOBBES QUOTES

लोकहो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कुणीतरी चांगले लिहीण्याबद्दल सुचना करेल असे वाटले होते.

कुलदिप, अरे ह्या ट्रिपला फोटो काढले नाहीत. खूप धुके होते ना ... काही शक्यच नव्हते. पण त्याच्या पुढच्या आठवड्यात गेलो होतो तेव्हाचे काही फोटो आहेत. ते टाकतो लवकरात लवकर.

ITgirl, दुसरा भाग बघू कधी जमतय ते. लिहीण्याची सवय नसली की प्रचंड वेळ लागतो आणि मग जितका जास्त वेळ लागेल तितका त्यातला उत्साह कमी होतो.

adm, बरोबर आहे, पण नाही जमले. लिहायला खूपच वेळ लागला. आणि प्रवासवर्णन स्पर्धेबद्दल मला माहिती नव्हती. अर्थात काहीही आमिष नसताना केवळ फुजीसान बद्दल सगळ्यांना माहिती व्हावी म्हणुन लिहीले, म्हणुन ते थोडेफार वाचनीय झाले आहे. स्पर्धेसाठी म्हणुन लिहीले असते तर लिखाणाचा दर्जा खूपच खालावला असता.

नात्या, gs, फुजीसान चढायची बरेच वर्षं इच्छा होती. पण काही सफल होत नव्हती. या वेळेस ही संधी सोडली असती तर न जाणो परत कधी मिळाली असती की नाही.

रुनी, लिम्बू ... धन्यवाद. कांद्या गेला असेल कारण तो सुद्धा जपानात बरीच वर्षे होता.

दुसरा भाग लिहीण्याचे जमेल की नाही माहीत नाही ... पण फोटो टाकेन तेव्हा थोडीफार माहिती पण लिहीन.
=== I m not miles away ... but just a mail away ===

राम राम!

तेव्हाचे काही फोटो आहेत. ते टाकतो लवकरात लवकर.>>> टाका साहेब मी वाट बघतोय!
कुणीतरी चांगले लिहीण्याबद्दल सुचना करेल >> हे बघ सुचना नाही ना म्हणजे चांगले आहे अस समज आणि आणखी हव्या असतील तर ये रे पुण्यात, पार्ल्यात, न्यु जर्सी, एल. ए.......... ;).... Wink

विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्
पात्रत्वाद धनमाप्नोति धनाद् धर्मः तत सुखम्...

असाच भिजत भिजत चालता चालता कधीतरी माथ्यावर पोचलो. पण काहीच आनंद झाला नाही>>>>>

मिहिर लिहिलंय तर मस्तच. पन या एकाच वाक्याने सगळं काही नलिफाय करून टाकलंस बघ.. Happy

खरं तर असा अनूभव जवळपास सर्वच प्रसिध्द ठिकाणांवर येतो. ती जागा जर दुर्गम, चढाची किंवा त्रासाची असेल, तर तिथे जाईस्तोवर इतके वैतागतो आपण, की त्या ठिकाणाबद्दल आपसूकच अपेक्षा वाढते. पण ते ठिकाण निसर्गाप्रमाणे स्वत:ला बदलणार, आपण पहायला गेलो म्हणून नाही. मग- यात काय बुवा एवढे पहण्यासारखे, कौतूक करण्यासारखे असे प्रत्यक्ष म्हणालो नाही तरी मनात येऊन जातंच..!

त्या विशिष्ट वेळेला आपण 'सापेक्षता' जरा विसरतो, हे खरं. बर्‍याच वेळी असंही झालं आहे, की तिथून निघून आल्यानंतर मला त्याचं स्थानमहात्म्य जाणवतं.

माथेरानचा प्रसिध्द झिम्मड पाऊस बघायला खास जावं, पण संततधार किंवा मुसळधार पावसामूळे बाहेरच पडता येऊ नये, कुबट वातावरणात हॉटेलमध्येच बसायला लागावं, शेवटी वैतागून- कसला भिक्कार वीकेंड गेला- अशी बोंब मारत परत येणं- हे माझ्याबाबतीतही घडलं आहे.. Happy

त्यामूळे प्रत्येक गोष्टीत, कोणत्याही परिस्थितीत, ते ठिकाण एन्जॉय करण्याचा निश्चय काहींचा असतो. हा क्षण पुन्हा येणार नाही याची त्यांना जाणीव असते. मग ते पुर्ण तयारी करून, त्या ठिकाणाची ऐतिहासिक, भौगोलिक इतर सर्व माहिती मिळवून वाचून ठेवतात. अशा लोकांचा मला तरी हेवा वाटतो..!

असो.
पण एकूणात छान लिहिलंस रे. पुन्हा लिही.. Happy