गझलची तोंडओळख

Submitted by kaaryashaaLaa on 15 September, 2008 - 18:35

मित्रांनो,

कार्यशाळेबाबतीत तुम्ही दाखवलेल्या उत्साहामुळे आम्हालाही हुरूप आला आहे. गुरुवारपर्यंत आणखी 'दर्दी' आपल्यासोबत येतीलच.
तोवर नवीन मित्रमैत्रिणींना गझलची तोंडओळख करून द्यायला सुरुवात करू या का?
त्यानिमित्ताने आपलीही उजळणी होवून जाईल.

किंवा असं करू. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू.
काय आहे, काही गोष्टींची आपल्या मनात उगाच भीती बसलेली असते. एकतर कविता म्हणजे उत्स्फूर्त अभिव्यक्ती. तिला मात्रा / छंद / लघु / गुरू असल्या कोष्टकात कोंबून बसवायला नको वाटतं! प्रेम असेल, वंचना असेल, राग असेल, मनात आलं - म्हणून मोकळं झालं..

पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली..#

अजूनही आठवून मी मोहरून जातो.. किती किती लाघवी तुझा तो नकार होता!!#

बोलणे माझे जरा ऐकून घे तू.. मी खुळा नाही, तर्‍हेवाईक नाही!!#

अर्थ लागेलही पुढेमागे - चल प्रतिज्ञा तरी त्रिवार करू!*

मग आता जर मी तुम्हाला सांगितलं, की पहिली ओळ भुजंगप्रयातात आहे, दुसरी हिरण्यकेशी, तिसरी मंजुघोषा आणि चौथी स्त्रग्विणी वृत्तात आहे, तर त्यामुळे त्यांची मजा कमी होते का? उलट लयीत वाचलेल्या सुंदर सुंदर ओळी आपोआप लक्षातही राहतात ना?

सोपं असतं हो!
र्‍हस्व अक्षर हे लघु किंवा १ मात्रा. दीर्घ अक्षर गुरू किंवा २ मात्रा.
म्हणजे अ/इ/उ स्वर असणारी अक्षरं लघु तर आ/ई/ऊ/ए/ऐ/ओ/औ हे स्वर असणारी अक्षरं गुरू असतात.
वृत्त पाहताना लघु 'ल' असा तर गुरू 'गा' असा लिहीतात.

म्हणजे 'पहाटे' शब्दात प हा लघु आहे, तर हा आणि टे गुरू आहेत. म्हणून हा शब्द झाला 'ल गा गा'.
'बोलणे' झाला 'गा ल गा'

आता 'अर्थ' शब्द उच्चारून पहा. दोन्ही अक्षरं लघु खरी, पण उच्चार 'ल ल' च्या जवळचा आहे की 'गा ल' च्या?
नियम असं सांगतो की शब्दात लघु अक्षरानंतर जोडाक्षर आलं, तर त्या लघुचा गुरू होतो.
म्हणून 'अर्थ' हा 'गा ल' शब्द आहे.
तसंच अनुस्वार असलेलं अक्षर गुरू असतं. म्हणून वंदना हा शब्द 'गा ल गा' असा ऐकू येतो पहा.

खरं सांगू का? आपण कवी मंडळी शब्दांवर प्रेम करतोच. त्यांचा अर्थ जसा भावतो, तसाच त्यांच्या 'नादा'कडे जरा कान दिला ना, की अगदी सहज लक्षात येतं हे.
ही पायरी जितकी सोपी, तितकीच महत्त्वाची आहे. एकदा लघु गुरू समजले, म्हणजे वृत्त समजणं अगदी सोपं आहे!

पुढच्या पोस्ट मधे वृत्ताबद्दल बोलूच.
पण त्या आधी एक छोटीशी परीक्षा देऊ या?
आपलं पूर्ण नाव लिहून त्यातली लघु आणि गुरू अक्षरं ओळखायची.
कुठे अडलं तर आम्ही आहोतच मदतीला.

(टीपः
# या ओळी सुरेश भटांच्या आहेत.
* ही ओळ वैभव जोशींची आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा रेगे
गा ल गा गा गा

बरोबर आहे का? मेल मिळाल्याच कळवल्याबद्दल धन्यवाद.

अरे वा! चला चला सुरुवात झाली Happy

चिन्नु
गा ल

झक्की
गा गा (लघु पुढे जोडाक्षर.)
म ना स ज्ज ना भ क्ति पं थे चि जा वे त री श्री ह री पा वि जे तो स्व भा वे
ल गा गा गा गा गा गा गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा गा गा गा
जमले का?

अनिलभाई
गालगागा

दोन लघु चा एक गुरु.. Happy

म ना स ज्ज ना भ क्ति पं थे चि जा वे त री श्री ह री पा वि जे तो स्व भा वे
लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा
- अनिलभाई

शलाका माळगावकर
लगागा गालगालगा (हो! कर=लल=गा. काय बाई नावं तरी.... आगगाडीसारखं लांबलचक आणि तेही 'लगा लगा' कुठेतरी निघाल्यासारखं....)

पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली

लगागा लगागा लगा गाल गागा ..लगा गालगागा लगा गाल गागा

लगागा लगागा लगागा लगागा..लगागा लगागा लगागा लगागा

म्हणजे शब्द माहित नसले तरी चालीत असे म्हंटले तर गाणे होते.
आपण कवी मंडळी शब्दांवर प्रेम करतोच.
मग ते हिंदी असोत, इंग्रजी असोत वा चुकून मराठी असले तरी!

तर या गझला आहेत, याला भाषेचे बंधन नाही.
प्रेम असेल, वंचना असेल, राग असेल, मनात आलं

या सगळ्याला भाषा नसते!

सज्जना, पंथेचि, स्वभावे, या शब्दांतील 'ज्ज', 'पं', नि 'स्व' हे लघु कसे?
मना सज्जना ... तर शार्दूल विक्रिडीत मधे आहे, ती भुजंगप्रयातसारखी कशी होईल?

भुजंगप्रयात म्हणजे
पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली.
लगागा लगागा लगा गा लगा गा.. लगा गा लगागा लगा गाल गागा
लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा
हे भुजंगप्रयात ना?

मिनोती कुंदरगी
लगागा गाललगा ?

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

जयश्री अंबासकर
ल ल गा गा गा ल गा असं बरोबर आहे का......?

की

गा गा गा गा गा ल हे बरोबर आहे Wink

रवी हिरोळीकर
लगा लगागागा / लगागालल

ही कार्यशाळा सुरू केल्याबद्दल धन्यवाद..

म्हणजे माझी प्रतिभा इतके दिवस अडुन राहिलेली असे नाही, मुळातच ती नाहीय, पण ब-याच ठिकाणि हे लगागालगागा वाचायचे आणि ते काय आहे तेच कळायचे नाही... Happy

आता गझल लिहिता आली नाही तरी तिचे व्याकरण तरी जराजरा कळेल Happy

गालगा....

कौतुक शिरोडकर
गालल लगाललल

शैलजा, चिन्नु, अनिलभाई, दाद, मिनोती, आफताब, कौतुक : बरोबर

चिन्नु : हे विशेषनाम असल्याने न्नु ह्रस्व लिहायचा की दीर्घ हे तुमच्यावर आहे पण उच्चार करताना तुम्ही त्याचा उच्चार 'चिन् नु' असा करता का 'चिन् नू' असा करता ते ठरवा आणि तसेच लिहा...

झकी : मनाचे श्लोक हे भुजंगप्रयात मध्येच आहेत...
सज्जना मधील ज्ज चा आघात आधीच्या 'स' वर होतो त्यामुळे तो गुरू होतो आणि ज लघु होतो
वर दिलेले 'अर्थ' हे उदाहरण पहा...

अजून काही उदाहरणे स्त, तारम्य, युक्त, र्दनकाळ इथे 'म, त,यु आणि क' सारे गुरू आहेत..
पंथेचि मधला पं गुरूच आहे. वर लिहिल्याप्रमाणे अनुस्वार असल्याने तो गुरू आहे..
स्वभावे मधला स्व जोडाक्षर असला तरी उच्चारताना तो आपण लघु च उच्चारतो.. म्हणून 'स्व' लघु च.. उदा. स्वतःचे, त्वरण ह्यात सुद्धा 'स्व' आणि 'त्व' लघुच

दाद : माळगावकर ची फोड 'गा ल गा ल ल ल' अशी करणेच चांगले नंतर वृत्तात बसवताना कुठले दोन लघु एकत्र करून गुरू करायचे ठरवता येईल..

जयश्री : वरील नियमाप्रमाणे इथे य गुरू होईल कारण त्यावर श्र चा आघात होत आहे.. म्हणताना आपण य वर जोर देऊन 'जयश्री' म्हणतो..

तेच जर जय श्रीराम असेल तर हे दोन सुटे शब्द असल्याने श्री च्या आघात य वर होत नाही आणि य लघु च राहतो

ज्यांना वेळ आहे त्यांनी आपापली नावे एखाद्या वॄत्तात गुंतवा बघू आता Happy

एवढं लगालगा करून उशीरच झाला म्हणायचा मला. Sad

'संघमित्रा'
गा ल गा गा : मंजुघोषा वाटतंय.

गौरी काकडे
गा गा गा ल गा : पिवळे पुस्तक उघडावे लागणार.

शाळेत असताना दहावी पर्यंतच हे वृत्त वगैरे कडे बघितले गेले.. आता त्यातले काहीच आठवत नाही आहे. पण प्रयत्न तर करुन बघायलाच पाहिजे..

हिम्सकूल
गागागाल

हिमांशु कुलकर्णी
लगाल ललगागा...

मला एक ओळ मात्र कायमची लक्षात राहिली आहे
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारीक...

आणि हे नाव कसे काय गुंतवणार वृत्तात... फारच काही तरी अवघड सांगता राव तुम्ही...

आणि वृत्तात गुंतवण्यासाठी सगळी वृत्तं तर माहिती पाहिजेत ना.. ती पण कुठे असतील तर सांगा.. म्हणजे मग त्यानुसार कोणत्या वृत्तामध्ये नाव फिट करता येईल ते कळेल...

आणि हो ते मात्रा गण वृत्त आणि अक्षर गण वृत्त असे काही तरी वाचले आहे फार पूर्वी ते पण जरा समजवा.. नाही तर ते काय असते ते शोधण्यासाठी दहावीचे मराठीचे पुस्तक शोधावे लागेल..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

किती कठीण गृहपाठ Sad सायकल चालवायला शिकतोय आत्ताशी, एकदम विमान कसं चालवणार? Sad

मयूरेश कंटक

लगागाल गालल

जमलं का गुर्जी? Happy

मी पण आहे गं सन्मे उशीरा तुझ्याबरोबर..

मीनु
गाल

मी ना क्षी ह र्डी क र
गा गा गा गा ल ल ल

वृत्तात गुंफवायचं?
कुठली कुठली असतात वृत्त?
त्यांचे लघुगुरु काय असतात. ..? हे कुठे शोधु.
याचं पुस्तक असतं काय पिवळ्या रंगाचं?

आयटे कार्टे तुला वृत्तांचा अभ्यास करायला सांगीतलं तर सायकली आणि विमानांशी खेळत बसलीये. वा SSSSSSSSSSS अजून रागवू का ?
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अरे अरे असे घाबरू नका... गृहपाठ सक्तीचा नाहीये.. केलाच पाहिजे असे नाही... Happy

वॄत्तांविषयी माहिती लवकरच टाकत आहोत..

शैलजा, एक आठवड्यात आपण विमान चालवणार आहोतच (गझल लिहिणार आहोत) तेव्हा आधार सोडून सायकल चालवायचाच हा एक प्रयत्न होता बाकी काही नाही...

संघमित्र, हिम्सकूल, मयूरेश - बरोबर

मिनु
मीनाक्षी हर्डीकर हे गा गा गा गा गा ल ल होईल... डी गुरू आहे ना.. डी वर असलेल्या रफार मुळे ह गुरू झाला हे मात्र बरोबर ओळखलेस..

श्यामली..... गालगा
कामिनी केंभावी....लगागा गागागा (?)

ए श्यामले, 'मि' लघु लिहीते आणि गुरु का म्हणते गं ?.. गंडवते का आम्हाला..?

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

ते कामिनी.. श्यामली सारखेच होणार ना?? वेगळे कसे...
कामिनी
गालगा....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

मीनू Happy

गुरुजी, गृहपाठ केला तर आम्हालाच जास्त नीट समजेल, तेह्वा तो करायची इच्छा आहेच, पण वृत्ताबद्दल जरा जास्त सांगितलेत तर बर होईल, खरच.

अरे वा सगळे नीट अभ्यास करताय वाटत Happy ::P
बरोबरे तसच हाय ते........ टायपो टायपो

टायपो टायपो ठीकसे टायपो
गालगा गालगा गालगा गालगा

श्यामली म्हणते ठीकसे टायपो
गालगा गालगा गालगा गालगा

==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

जमला जमला मतला जमला रे हिम्या तुला.. पुढचा शेर येऊ दे आता

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

जोडण्या लगाल सर्व हो तयार तू सुधीर
गाल चाच धाक सोड आणि जोड आज धीर

हे कुठल्या वृत्तात बसतं का?

एक आठवड्यात गजल पण लिहिता येणार? क्रॅश कोर्स Happy
हे लगालगा गालात आजचा दिवसच आहे का? रोज पुढची पुढची पायरी शिकवणार का?
--
उद्यापासुन वृत्त शिकवणार?
गागागागा गाल गालगाल? चुकलंय बहुतेक Sad
--
अश्विनी
गालगा

मला शैलजाला नसे जाण काव्यी
लगा गालगागा लगा गाल गागा

शिकावे तरी, आळशी फार बाई
लगागा लगा गालगा गाल गागा

जम्या?? Proud

हिम्सकूल म्हणते म्हणजे ललगा होईल... तिथे सांगते करा म्हणजे गालगा होईल आणि बसेल लयीत आणि गालगा * ४ ह्या वृत्तात..

सुधिर मस्तच गाल * ८ अशी रचना होईल... वृत्ताचे नाव माहित नाही मला...

अश्विनी
उद्यापासून वृत्त शिकवणार?
लगागागाल गाल लललगाल (सू दीर्घ केला आहे :))

शैलजा एकदम बराबर जम्या Happy

नाव गुंफलेली उदाहरणे बघा...
सहज गंमत आहे... अर्थ काही नाही ह्याला

वैभव जोशी म्हटला घेऊ गझलेची ही शाळा Happy
स्वाती आंबोळेंचा पक्का मात्रांचा ह्या ताळा Happy

गा गा* १४

भल्या पहाटे मिलिंद छत्रे उठून बसला Happy
म्हणे स्वतःला, 'लिहून पाहू, सुचेल मतला' Happy

लगालगागा * ३

नचिकेत आठवले म्हणे अभ्यास वृत्तांचा करा Happy
गा गा ल गा * ४

वृत्तांविषयी अजून माहिती लवकरच टाकू

Pages