पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

Submitted by ज्ञाती on 3 May, 2010 - 00:05

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)

एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?
१. स्वभावः प्रत्येक पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासुन बनलेला असतो. या पंचमहाभूतांचे गुणधर्म पदार्थात कमी-अधिक प्रमाणात येतात. उदा. जसे तेज महाभूत रुक्ष, तीक्ष्ण, उष्ण आहे. ज्या पदार्थामध्ये तेजोमहाभूताचे आधिक्य असते तो पदार्थ (उदा. मिरे) साधारण तसेच गुणधर्म दाखवतो. उष्ण पदार्थांमध्ये तेज व वायू महाभूतांचे आधिक्य असते. शीत पदार्थांमध्ये जल, आकाश आणि पृथ्वी महाभूताचे अधिक प्रमाण असते.

२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.

शास्त्रकारांनी या गुणधर्माचे वर्णन हजारो वर्षांपुर्वी करुन ठेवले आहे. पदार्थातील पंचमहाभूतांचे कॉम्बिनेशन आजही तसेच आहे. त्यामुळे इतक्या वर्षापुर्वी केलेला अभ्यास जुना झाला, आता नव्याने गुणधर्मांचा अभ्यास व्हायला हवा असे म्हणणे फोल आहे.

प्रत्येक पदार्थ एकतर उष्ण असतो किंवा थंड असतो, अर्थातच उष्णतेचे/शैत्याचे प्रमाण वेगवेगळ्या पदार्थात कमी-अधिक असते. जसे की हिरवे मूग हे किंचित उष्ण आहेत तर मिरे अति-उष्ण आहेत. सुंठ बर्‍यापैकी उष्ण आहे. हे तर-तमत्व पदार्थाच्या पांचभौतिक कॉम्बिनेशननुसार येते. (वेगळे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण म्हणतो ना आज हवामान गरम आहे/कमी गरम आहे/ गरम नाहिये पण थंडीही नाहिये/ खूप थंड हवामान आहे तसंच काहीसं.)

आता वर म्हटले तसे हे गुण म्हणजे पदार्थाचा स्वभाव आहे. एकाच पदार्थातील गुणाचे तारतम्य हे प्रामुख्याने दोन घटकांमुळे बदलते.
१.त्या पदार्थावरील संस्काराने: जसे दही उष्ण आहे. त्यामध्ये पाणी मिसळुन घुसळणे हा अन्नसंस्कार केला असता तयार होणारे ताक हे दह्यापेक्षा कमी उष्ण असते (दह्यापेक्षा कमी उष्ण असले तरी ताक उष्णच आहे).
२. तो पदार्थ सेवन करणार्‍या शरीराची प्रकृती आणि अवस्था:
प्रकृती:- मुळातच पित्ताधिक प्रकृतीच्या व्यक्तीला तुरीची डाळ/दही कधीही, कशाबरोबरही खाल्ले तरी उष्ण पडते.
अवस्था:- शरीरात कफदोषाचे आधिक्या झाले असता (जो मुळात थंड, गुरु अशा गुणांचा आहे) मिरे हे तितके उष्ण पडत नाहीत. कारण त्यातील उष्णत्व हे वाढलेल्या कफाचे पारिपत्य करण्यात खर्ची पडते. याउलट शरीरात उष्णता आधीच वाढलेली असताना घेतले गेलेले साधारण उष्ण द्रव्यही (जसे तिळ-गुळ) बाधते (शरीराला उष्ण पडते). यावरुन लक्षात येते की एखादा पदार्थ केवळ उष्ण किंवा थंड म्हणुन चांगला किंवा वाईट असे वर्गीकरण करणे अशक्य आहे. गरजेनुसार, योग्य प्रमाणात वापरलेली दोन्ही गुणांची द्रव्ये शरीराला तितकीच फायदेशीर आहेत.
३. काळ (अर्थात दिवसाची/ऋतूची अवस्था): भर उन्हाळ्यात तिळगुळाची पोळी किंवा दुपारच्या वेळी आवड म्हणून सूपवर घातलेली किंचितशी मिरपूड उष्ण पडु शकते. तसंच थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी खाल्लेला पेरु थंड पडतो.
४. शरीराच्या विशेष अवस्था जसे आजारपण किंवा गरोदरपण: या अवस्थांमध्ये अतिउष्ण आणि अतिथंड अशा दोन्ही गुणांनी युक्त पदार्थांचा वापर टाळावा. याबाबतच्या काही सामान्य गैरसमजुती पुढीलप्रमाणे:
लहान मुलांना केळे खायला देणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. लहान मुलांमध्ये आधीच कफ दोषाचे आधिक्य असते. त्यात रात्रीच्या वेळी (जेव्हा वातावरणात शीत गुणाचे आधिक्य असते) तेव्हा केळी खाल्ल्यास मुलांना श्वसनसंस्थेशी निगडीत आजार बळावतात जसे सर्दी, खोकला, बाळ-दमा.
गरोदर स्त्रियांनी बदाम, खजुर, केशर असे पदार्थ नियमित खाणे: ह्या उष्ण पदार्थांच्या सेवनाचा बाळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होउ शकतो.

आता नेहमी आहारात येणारी अन्न/औषधी द्रव्ये साधारणपणे उष्ण की शीत ते पाहू.
उष्ण द्रव्ये:
करडई, चुका, मेथी, कारले, वांगे, आंबा, फणस, कवठ, टोमॅटो, ताक, दही, खोबरे, गुळ, तीळ, हिंग, मोहरी, ज्वारी, बाजरी, कुळीथ, उडीद, लसुण, खजूर, तेल, मद्य, सुंठ, मिरे, जिरे, वेलची, ओवा, बदाम, खारीक, जायफळ, अक्रोड, केशर, डिंक, आंबा, पपई, टरबुज, चिंच, जीरे, लवंग इ.

शीत द्रव्ये:
दुध, तूप, लोणी,मध, पाणी, नारळाचे पाणी, उसाचा रस, चिक्कु, सीताफळ, केळे, पेरु, द्राक्षे, सफरचंद, चंदन, वाळा, जेष्ठमध, तांदुळ, नाचणी, लाह्या, बटाटा, रताळे, काकडी, मनुका, सब्ज, गुलकंद, धणे इ.

उष्ण-शीत गुणांबद्दलच्या माहितीची उपयुक्तता: आयुर्वेद हे एक प्रत्यक्षपर शास्त्र आहे. म्हणजेच त्यातील कुठल्याही संकल्पनेचे ज्ञान व्यवहारात उपयुक्त ठरते. उष्ण आणि शीत हे परस्परविरोधी गुण आहेत. शरीरातील उष्णता वाढली असता शीत गुणाचे औषध वापरावे लागते. तसेच शरीरातील शीत गुण वाढला असता उष्ण द्रव्याने त्याचे निराकरण होते. एखाद्या व्यक्तीला डोळ्याला रांजणवाडी येउन डोळ्याची आग होत असेल तर घरात उपलब्ध असलेले थंड द्रव्य/औषध (जसे ज्येष्ठमध, तूप, लोणी) वापरुन लगेच उपचाराला सुरुवात करता येते.त्याचप्रमाणे काही वेळा वयस्कर माणसांचे एसीमध्ये जाउन आल्यावर पाय दुखतात. अशा वेळी थंड गुणाने झालेल्या या त्रासावर लगेच शेकणे हा गरम उपाय करता येतो. आधीच अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती माहीत असेल तर त्या दृष्टीने गरम पदार्थांचे जाणीवपुर्वक सेवन केले जाते.

लेख आणि उत्तरे ही माझ्या अल्पमतीप्रमाणे देण्याच्या प्रयत्न केला आहे. यात उणीवा असल्यास त्या वैयक्तिक मर्यादा समजाव्यात, शास्त्राच्या नव्हे. Happy

(टीपः काही दिवसांपुर्वी एका बातमीफलकावर झालेल्या चर्चेतून या लेखाचा मुहूर्त लागला. अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेल्या/ले शंका/प्रश्न यांचे स्वागत आहे. ( आयुर्वेदावर विश्वास नसलेल्यांना त्याची महती पटवुन देणे हा लेखाचा उद्देश नाही. )

प्रकाशनपूर्व प्रूफरीडिंगसाठी सिंडरेला, अश्विनी यांचे मनापासून आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाळा, मेंदी थंड,गवती चहा नक्की उष्ण > बरोबर आहे.

अश्विनी डोंगरे, अगो= केळे थंड, पचायला जड आणि विष्टंभी आहे (मलबद्ध करणारे) जुलाब होत असतील तर मुलांना द्यावे. सर्दी, खोकला झालेले असताना, रात्रीच्या वेळी आणि आधीच मलबद्धता असल्यास देऊ नये.

सफरचंद सारक (मल पातळ करणारे) आहे. सफरचंद थंड असल्याने तेही केळ्याप्रमाणेच सर्दी-खोकला असताना मुलांना मुळीच देऊ नये.

(लहान मुलांमध्ये झालेले थोडेसे जुलाब्/मलबध्दता गुटीतील औषधांनी दूर होते.
जुलाब होत असल्यास मुरुडशेंग, सुंठ, जायफळ याचे वेढे वाढवावेत.
शी घट्ट होत असल्यास हिरडा, बाळहिरडा, नागरमोथा याचे वेढे वाढवावेत. )

छानच आहे लेख. मी यावर श्री चौधरी यांनी लिहलेले ( गाला पब्लीशर्स ) चे पुस्तक वाचले आहे. या सर्वच विषयावर या पुस्तकात चांगली माहिती, तक्ते आणि अन्न पदार्थाचा औषधी उपयोग यावर आहे.

ज्ञाती , जिरे थंड असते ना? उष्णता झाल्यावर आणि उन्हाळ्यात जिर्‍याचे पाणी पिण्याने कमी होते. पण तु तर लिहिले आहेस कि जिरे उष्ण. म्हणजे ते पाण्यात टाकल्याने त्याची उष्णता कमी होते का? कि जिर्‍याचे असे काहि वेगळे गुणधर्म आहेत?

मानुषी, मेघ, सावली, नितीनचंद्र धन्यवाद.

जिरे हे अल्प उष्ण आहेत. अर्थात ते टाकून पाणी उकळले म्हणजे पाणी अगदी किंचित उष्ण परिणामी पाचक बनते. ताप आलेला असताना पचनशक्ती कमी झालेली असते, अशा वेळी पाणीही पचवायची तसदी शरीराला पडु शकते, म्हणून असे जिरे सिद्ध पाणी दिले जाते.

धणे आणि सुपारीबद्दल जरा वेळाने लिहीते.

उत्तम लेख. अतिशय माहितीपूर्ण. धन्यवाद ज्ञाती.

मला कल्पना नाही की हा प्रश्न इथे योग्य आहे की नाही. पण तरी विचारते:
जेवताना पाणी प्यावे की न प्यावे? की ते सुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बदलत असते? मध्येच पाणी प्यायल्याने आपण खात असलेल्या अन्नावर फरक पडतो का? असेल तर काय पडतो?
या बाबतीत टोकाची वागणारी धडधाकट माणसे भेटली आहेत, तेव्हा तो गोंधळ नेहेमीच असतो.

जेवणापूर्वी पाणी पिउ नये. जेवताना व जेवण झाल्यावर थोडेथोडे पाणी प्यावे. जास्त पाणी पिल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.

<< आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा. >>
खूप धन्यवाद ज्ञाती. मला हा प्रकार कधीच कळला नव्हता. आत्ताशी उलगडा झाला. Happy
प्रश्नोत्तरे पण मस्त. पहिल्या वाचनात काही भाग जरा टँजंट गेला. सवडीने पुन्हा वाचीन.

ज्ञाती ,

उद्द्बोधक लेख. जन सामान्याना पदार्थांच्या अन्गभुत गुणांची माहीती करुन दिल्या बद्द्ल शतशः आभार !

प्रत्येक पदार्थ तसेच तीन दोष हे सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेले असतात.
हे तीन दोष ( वात, पित्त व कफ) प्रत्तेकाच्या शरीरात असतात.

त्रिदोष संतूलनातील बिघाड हेच रोगाचे मूळ कारण आहे आणी त्रिदोष संतूलन हे या रोगावरील उपाय.

bacteria & virus अपल्या चोहु कडे मुक्त वावरत असतात, जेंव्हा त्रिदोष संतूलन बिघडते तेंव्हाच
ईंफे़क्शन होते,
उदा, बर्ड फ्लु जेंव्हा आला होता, तेंव्हा कोणीच बर्ड फ्लु ची लस टोचुन तयार नव्हता. ह्याचा अर्थ सर्वांनाच
बर्ड फ्लुची लागण व्हायला पाहीजे होती. पण तशी परीस्थीती आली नाही. सर्वांनाच त्याची लागण झाली नाही.
फक्त काही लोकानांच बर्ड फ्लु ची लागण झाली व फक्त काहीच त्याचे बळी पडले.
आजच्या शास्र्तात अजून ही Immunity ची व्याख्या व मोजण्याचे माप नाहीय. माझ्या मते Immunity ची
व्याख्या ही त्रिदोष संतूलन च्या खुप जवळ जाणारी असावी.

जाणकारानी या वर प्रकाश टाकावा.

चांगला लेख आणि चर्चा.

मला बरेच वर्षांनी पुन्हा हायपर अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरु झाला आहे. आता वरील चर्चेमुळे पुन्हा आहारात बदल सुरु करेन. आधी यासाठि देशात असताना आयुर्वेद डॉ. च्या मार्गदर्शनाखाली उपाय केले आहेत. ते अनुभव आणि इकडे डॉ. चे औषध पण सुरु आहे. सध्यातरी फायदा होतो. लवकरात लवकर औषधापासून मुक्ती मोडवर यायचं आहे.
मला फळं (केळं वगैरे) यावेळी आहारात फारशी आणता येणार नाहीयेत कारण मॉर्निंग शुगर हाय व्हायला लागली आहे. (इतर कारणं डॉ. ला माहित आहेत) तर बघुया कितपत जमतंय. नारळ पाणी मात्र सुरु केलं पुन्हा. इकडे केफिर म्हणून एक आपल्या ताकासारखं एक पेय मिळतं ते इंट्रोड्युस केलंय इतक्यात. कुणी आणखी काही खाण्याविषयक अ‍ॅडिशन्स असतील तर नक्की लिहा. प्रयत्न करेन.

धन्यवाद ज्ञाती. Happy

मस्त लेख आहे . सवडीने परत एक्दा वाचेन .
पण डोक्यातला गोन्धळ आणखी वाढला आहे Sad .
लेकाला दहि प्रचंड आवडते.
रोज दूपारी जेवताना एक वाटी ताजं दही लागत त्याला . मी ही त्याला दही चान्गलं म्हणून आवडीने खाउ घालते.
प्रश्न पडला आहे , मी काही चुकत तर नाही ना .

वेका, पित्त वाढल्याने जर हार्टबर्न्स होत असतील तर कोरडे चिरिओज सकाळीच उठून खाल्ले तर फायदा होतो. प्रोसेस्ड फूड आहे तेव्हा शुगर-बिगर बघशीलच. रोल्ड ओट्स + थंड दूध यानं पण फायदा होतो. अर्थात हे तात्पुरता आराम देणारे घरगुती उपाय आहेत.

आभार्स सिंडरेला. यु इज म्हणिंग राइट. प्रोसेस्ड फुड्चे कार्ब्ज बघावे लागतात. त्या वैतागानेच पित्त वाढेल असं वाटतं आणि इकडच्या थंडीत पित्त मॅनेज करायचा अ‍ॅडिशन्ल वैताग असो. मला एक ब्राउन राइस क्रिस्पी मिळालेत ते पण बरे आहेत.

ऑन अ साइड नोट सध्या दिवस मॅनजेबल झाले तरी रात्री पोटात जळजळ होते Sad बघुया एन्डोस्कोपीचा एक पर्याय आहे त्यासाठी डॉ. थोडे दिवस थांबलेत. विश मी लक.

मि ५ महिन्यन्चि गरोदर आहे. मला सध्या छातीत खूप कफ झाला आहे. तरी मधातून सुंठ व मिरपूड चे चाटण घेतले तर चालेल का.

Pages