पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

Submitted by ज्ञाती on 3 May, 2010 - 00:05

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)

एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?
१. स्वभावः प्रत्येक पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासुन बनलेला असतो. या पंचमहाभूतांचे गुणधर्म पदार्थात कमी-अधिक प्रमाणात येतात. उदा. जसे तेज महाभूत रुक्ष, तीक्ष्ण, उष्ण आहे. ज्या पदार्थामध्ये तेजोमहाभूताचे आधिक्य असते तो पदार्थ (उदा. मिरे) साधारण तसेच गुणधर्म दाखवतो. उष्ण पदार्थांमध्ये तेज व वायू महाभूतांचे आधिक्य असते. शीत पदार्थांमध्ये जल, आकाश आणि पृथ्वी महाभूताचे अधिक प्रमाण असते.

२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.

शास्त्रकारांनी या गुणधर्माचे वर्णन हजारो वर्षांपुर्वी करुन ठेवले आहे. पदार्थातील पंचमहाभूतांचे कॉम्बिनेशन आजही तसेच आहे. त्यामुळे इतक्या वर्षापुर्वी केलेला अभ्यास जुना झाला, आता नव्याने गुणधर्मांचा अभ्यास व्हायला हवा असे म्हणणे फोल आहे.

प्रत्येक पदार्थ एकतर उष्ण असतो किंवा थंड असतो, अर्थातच उष्णतेचे/शैत्याचे प्रमाण वेगवेगळ्या पदार्थात कमी-अधिक असते. जसे की हिरवे मूग हे किंचित उष्ण आहेत तर मिरे अति-उष्ण आहेत. सुंठ बर्‍यापैकी उष्ण आहे. हे तर-तमत्व पदार्थाच्या पांचभौतिक कॉम्बिनेशननुसार येते. (वेगळे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण म्हणतो ना आज हवामान गरम आहे/कमी गरम आहे/ गरम नाहिये पण थंडीही नाहिये/ खूप थंड हवामान आहे तसंच काहीसं.)

आता वर म्हटले तसे हे गुण म्हणजे पदार्थाचा स्वभाव आहे. एकाच पदार्थातील गुणाचे तारतम्य हे प्रामुख्याने दोन घटकांमुळे बदलते.
१.त्या पदार्थावरील संस्काराने: जसे दही उष्ण आहे. त्यामध्ये पाणी मिसळुन घुसळणे हा अन्नसंस्कार केला असता तयार होणारे ताक हे दह्यापेक्षा कमी उष्ण असते (दह्यापेक्षा कमी उष्ण असले तरी ताक उष्णच आहे).
२. तो पदार्थ सेवन करणार्‍या शरीराची प्रकृती आणि अवस्था:
प्रकृती:- मुळातच पित्ताधिक प्रकृतीच्या व्यक्तीला तुरीची डाळ/दही कधीही, कशाबरोबरही खाल्ले तरी उष्ण पडते.
अवस्था:- शरीरात कफदोषाचे आधिक्या झाले असता (जो मुळात थंड, गुरु अशा गुणांचा आहे) मिरे हे तितके उष्ण पडत नाहीत. कारण त्यातील उष्णत्व हे वाढलेल्या कफाचे पारिपत्य करण्यात खर्ची पडते. याउलट शरीरात उष्णता आधीच वाढलेली असताना घेतले गेलेले साधारण उष्ण द्रव्यही (जसे तिळ-गुळ) बाधते (शरीराला उष्ण पडते). यावरुन लक्षात येते की एखादा पदार्थ केवळ उष्ण किंवा थंड म्हणुन चांगला किंवा वाईट असे वर्गीकरण करणे अशक्य आहे. गरजेनुसार, योग्य प्रमाणात वापरलेली दोन्ही गुणांची द्रव्ये शरीराला तितकीच फायदेशीर आहेत.
३. काळ (अर्थात दिवसाची/ऋतूची अवस्था): भर उन्हाळ्यात तिळगुळाची पोळी किंवा दुपारच्या वेळी आवड म्हणून सूपवर घातलेली किंचितशी मिरपूड उष्ण पडु शकते. तसंच थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी खाल्लेला पेरु थंड पडतो.
४. शरीराच्या विशेष अवस्था जसे आजारपण किंवा गरोदरपण: या अवस्थांमध्ये अतिउष्ण आणि अतिथंड अशा दोन्ही गुणांनी युक्त पदार्थांचा वापर टाळावा. याबाबतच्या काही सामान्य गैरसमजुती पुढीलप्रमाणे:
लहान मुलांना केळे खायला देणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. लहान मुलांमध्ये आधीच कफ दोषाचे आधिक्य असते. त्यात रात्रीच्या वेळी (जेव्हा वातावरणात शीत गुणाचे आधिक्य असते) तेव्हा केळी खाल्ल्यास मुलांना श्वसनसंस्थेशी निगडीत आजार बळावतात जसे सर्दी, खोकला, बाळ-दमा.
गरोदर स्त्रियांनी बदाम, खजुर, केशर असे पदार्थ नियमित खाणे: ह्या उष्ण पदार्थांच्या सेवनाचा बाळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होउ शकतो.

आता नेहमी आहारात येणारी अन्न/औषधी द्रव्ये साधारणपणे उष्ण की शीत ते पाहू.
उष्ण द्रव्ये:
करडई, चुका, मेथी, कारले, वांगे, आंबा, फणस, कवठ, टोमॅटो, ताक, दही, खोबरे, गुळ, तीळ, हिंग, मोहरी, ज्वारी, बाजरी, कुळीथ, उडीद, लसुण, खजूर, तेल, मद्य, सुंठ, मिरे, जिरे, वेलची, ओवा, बदाम, खारीक, जायफळ, अक्रोड, केशर, डिंक, आंबा, पपई, टरबुज, चिंच, जीरे, लवंग इ.

शीत द्रव्ये:
दुध, तूप, लोणी,मध, पाणी, नारळाचे पाणी, उसाचा रस, चिक्कु, सीताफळ, केळे, पेरु, द्राक्षे, सफरचंद, चंदन, वाळा, जेष्ठमध, तांदुळ, नाचणी, लाह्या, बटाटा, रताळे, काकडी, मनुका, सब्ज, गुलकंद, धणे इ.

उष्ण-शीत गुणांबद्दलच्या माहितीची उपयुक्तता: आयुर्वेद हे एक प्रत्यक्षपर शास्त्र आहे. म्हणजेच त्यातील कुठल्याही संकल्पनेचे ज्ञान व्यवहारात उपयुक्त ठरते. उष्ण आणि शीत हे परस्परविरोधी गुण आहेत. शरीरातील उष्णता वाढली असता शीत गुणाचे औषध वापरावे लागते. तसेच शरीरातील शीत गुण वाढला असता उष्ण द्रव्याने त्याचे निराकरण होते. एखाद्या व्यक्तीला डोळ्याला रांजणवाडी येउन डोळ्याची आग होत असेल तर घरात उपलब्ध असलेले थंड द्रव्य/औषध (जसे ज्येष्ठमध, तूप, लोणी) वापरुन लगेच उपचाराला सुरुवात करता येते.त्याचप्रमाणे काही वेळा वयस्कर माणसांचे एसीमध्ये जाउन आल्यावर पाय दुखतात. अशा वेळी थंड गुणाने झालेल्या या त्रासावर लगेच शेकणे हा गरम उपाय करता येतो. आधीच अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती माहीत असेल तर त्या दृष्टीने गरम पदार्थांचे जाणीवपुर्वक सेवन केले जाते.

लेख आणि उत्तरे ही माझ्या अल्पमतीप्रमाणे देण्याच्या प्रयत्न केला आहे. यात उणीवा असल्यास त्या वैयक्तिक मर्यादा समजाव्यात, शास्त्राच्या नव्हे. Happy

(टीपः काही दिवसांपुर्वी एका बातमीफलकावर झालेल्या चर्चेतून या लेखाचा मुहूर्त लागला. अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेल्या/ले शंका/प्रश्न यांचे स्वागत आहे. ( आयुर्वेदावर विश्वास नसलेल्यांना त्याची महती पटवुन देणे हा लेखाचा उद्देश नाही. )

प्रकाशनपूर्व प्रूफरीडिंगसाठी सिंडरेला, अश्विनी यांचे मनापासून आभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञाती, धन्यवाद Happy

चांगल्या उत्तरांमुळे अजुन प्रश्न विचारल्या जाणार. चालेल ना?

(१) उष्ण-शीत अशी जोडी असेल तर, सर्व २० गुण १० जोड्यांमध्ये मांडता येतील का?

(२) जरी पंचमहाभुतांचे प्रमाण ४०,४५,५,५,५ असे सांगता येणार नसले तरी जर ४०+/-१०, ४५+/-१०, ५+/-५ ... असे नेहमीच्या काही वस्तुंचे असेल तर एखादा चार्ट खुप उपयोगी ठरु शकेल. दुधादुधातही (गाईच्या, बकरीच्या वगैरे) फरक असणार, बहुदा त्या जनावरांनी काय खाल्ले यानेही फरक पडणार (जसे इथे rBST-free दुध मिळते तसेच कमी शीत वगैरे प्रकार दुधांमध्ये असावेत).

(३) विशिष्ठ गुण असलेले पदार्थ कृत्रिमरित्या बनवता येतील का? पंचमहाभुतांचे जर काही एकक असेल तर असे बहुदा शक्य होऊ शकेल. पण माझ्या मते पंचमहाभुते ही abstract आहेत. की रसायनशास्त्रातील elements प्रमाणे त्यांचे गुणधर्म मनुष्यप्रकृतीला मधे न आणता मांडत येतात?

ज्ञाती, धन्यवाद. Happy

अस्चिग, लेखावरून आणि आधीच्या उत्तरांवरून हे 'आडाखे' आहेत असं वाटतंय. कुठेच figures and/or proportions दिलेली दिसत नाहीत.
शिवाय हे गुणधर्म absolute दिसत नाहीत. पदार्थ, हवामान आणि ग्रहण करणार्‍याचं constitution / त्यावेळच्या आरोग्याची स्थिती या (आणि कदाचित अशा आणखीही) परिमाणांचा (parameters) तो परिपाक दिसतो आहे.

ज्ञाती, हाच विचार पुढे नेला तर भारतातले 'आडाखे' पूर्णपणे निराळं हवामान असणार्‍या देशात (उदा. अमेरिकेत) जसेच्या तसे लागू होणार नाहीत, बरोबर?

अस्चिग, तुमच्या प्रत्येक प्रश्न विस्ताराने घ्यायचा झाल्यास स्वतंत्र लेखाचा विषय आहे Happy थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते.

(१) उष्ण-शीत अशी जोडी असेल तर, सर्व २० गुण १० जोड्यांमध्ये मांडता येतील का?
हो. २० गुण पुढीलप्रमाणे:
गुरु-लघु
मंद-तीक्ष्ण
शीत-उष्ण
स्निग्ध-रुक्ष
श्लक्ष्ण-खर
सांद्र-द्रव
मृदु-कठीण
स्थिर-सर
सूक्ष्म-स्थूल
विशद-पिच्छिल

व्याख्या आणि उदाहरणे सवडीने लिहीते.

(२) जरी पंचमहाभुतांचे प्रमाण ४०,४५,५,५,५ असे सांगता येणार नसले तरी जर ४०+/-१०, ४५+/-१०, ५+/-५ ... असे नेहमीच्या काही वस्तुंचे असेल तर एखादा चार्ट खुप उपयोगी ठरु शकेल.
= एक पर्याय म्हणजे पदार्थांचे वर्गीकरण पांचभॉतिकत्वानुसार करणे. यात किमान पार्थिव, आप्य, तेजस, वायवीय आणि नाभस असे डॉमिनेट करणारे महाभूत तरी कळेल. (पण इतर महाभुतांबद्दल नाही कळणार.) ग्रंथांमध्ये पार्थिव वगैरेंचे गुणधर्म कसे असतात ते लिहीले आहे.
उदा. गंध असणे हा पार्थिव पदार्थाचा महत्वाचा गुण आहे. अर्थातच जटामांसी/वेखंडासारखे द्रव्य पार्थिव आहे.

दुधादुधातही (गाईच्या, बकरीच्या वगैरे) फरक असणार, बहुदा त्या जनावरांनी काय खाल्ले यानेही फरक पडणार>> अवश्य. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, हत्तीण, उंटीण या प्रत्येक प्रकारचे दूध थोडेफार वेगळे असते.
उदा. शेळीचे दूध तुलनेने पचायला हलके असते. तर म्हशीचे दूध पचायला जड. यात त्या प्राण्याची वैशिष्ट्ये, आहार याने फरक पडतो.

(३) विशिष्ठ गुण असलेले पदार्थ कृत्रिमरित्या बनवता येतील का? पंचमहाभुतांचे जर काही एकक असेल तर असे बहुदा शक्य होऊ शकेल. पण माझ्या मते पंचमहाभुते ही abstract आहेत. की रसायनशास्त्रातील elements प्रमाणे त्यांचे गुणधर्म मनुष्यप्रकृतीला मधे न आणता मांडत येतात?
= प्रत्येक पदार्थ हा पाचही महाभूतांपासून बनलेला असतो. म्हणूनच त्यांना महाभूत म्हटले आहे. पाच जर द्रव्यात नसतील तर द्रव्याचे अस्तित्व संभवत नाही. म्हणजे पाणी हा पदार्थ घेउ. नि:शंकपणे त्यात जलमहाभूताचे प्रमाण अधिक आहे, (इतके अधिक की पाणी म्हणजेच जलमहाभूत असा समज होण्याची शक्यता आहे) तरीही त्यात इतर महाभूते आहेत. मग कदाचित ते प्रमाण ९६+१+१+१+१ असे असेल.

लेखावरून आणि आधीच्या उत्तरांवरून हे 'आडाखे' आहेत असं वाटतंय. कुठेच figures and/or proportions दिलेली दिसत नाहीत.शिवाय हे गुणधर्म absolute दिसत नाहीत. पदार्थ, हवामान आणि ग्रहण करणार्‍याचं constitution / त्यावेळच्या आरोग्याची स्थिती या (आणि कदाचित अशा आणखीही) परिमाणांचा (parameters) तो परिपाक दिसतो आहे.
>>> अतिशय नेटका निष्कर्ष Happy हेच सर्व शिकवणे अपेक्षित असते बीएएमएस अभ्यासक्रमात Happy या सर्वाचे अ‍ॅप्लीकेशन करुन रुग्णाची चिकित्सा करायची असते.

धन्यवाद! Happy

म्हणजे ही ten dimensional space झाली. २० पेक्षा बरीच सुलभ.
वेळ मिळेल तेंव्हा/तसा व्याख्या, व उदाहरणे जरुर द्या.

व्वॉव! कसली अफलातून माहिती आहे.
ज्ञाती, माहितीबद्दल धन्यवाद aschig ची संशोधक वृत्ती त्याला असे प्रश्न विचारायला भाग पाडत आहे, जे प्रश्न खरेतर मलाही पडले आहेत (म्हणजे, aschig ची पोष्ट वाचल्यावर :))

जसे तु एका पोष्ट्मध्ये म्हणालीस की दह्यामध्ये पाणी (जलतत्त्व) घातल्यामुळे त्यात त्याचा प्रभाव वाढतो तसेच बाकिच्या महाभूतांचा परिणाम वाढवायला त्यांचे रीप्रेझेन्टेटीव्ह पदार्थ आहेत का?

बहुतेक 'अग्नि' साठी अग्निसंस्कार करायचा असेल. मग पृथ्वी, वायू व तेज ह्यांसाठी काय?

ज्ञाती
मस्त माहिती. मला पण स्वाती व आशिष सारखे प्रश्न पडलेत. आव्होकाडो, किन्वा, ओट्स, लेट्यूस, हॉर्स रॅडिश, ऑलिव्ह ऑइल इत्यादीचे गुणधर्म कसे अभ्यासले जातात ? भारतातली कॉलेजेस किंवा इतर संस्था याबाबत काही करतात का ?

बर्‍याच भागात आंबा उष्ण असला तरी रात्रभर थंड पाण्यात बुडवून ठेवल्याने त्याची उष्णता कमी होते असं मानतात. असे काही उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत का ? ( जसे दही घुसळणे वगैरे ) . रोजच्या वापरातील पदार्थांचे गुणधर्म मॅनिप्युलेट करण्याबद्दल पण सवडिने लिही .

मेधा
आव्होकाडो, किन्वा, ओट्स, लेट्यूस, हॉर्स रॅडिश, ऑलिव्ह ऑइल इत्यादीचे गुणधर्म कसे अभ्यासले जातात ?
= आधी म्हटले तसे यात अनुभवाने अनुमान काढणे हा एकच पर्याय आहे. त्यातही एखादा नवीन पदार्थ घेतला तर त्याच्या सदृश माहितीच्या पदार्थाशी तुलना करुनही मदत होते. जसे ऑलिव्ह ऑइल हे तेलच असल्याने तेलाचे जे साधारण गुणधर्म असतात जसे की स्निग्ध, उष्ण ते त्यात असणार हे अनुमान काढता येते. किंवा लेट्युस बरेचसे कोबीसारखे असल्याने तेही आप्य द्रव्य आहे (शीत, स्निग्ध) असा अंदाज बांधता येतो.
यावर खरंच अभ्यासाची गरज/ वाव आहे.
केवळ विषयाचे ज्ञान म्हणून नव्हे तर अनेक भारतीय(भारतीयच का, आयुर्वेदावर विश्वास असणारे, त्यानुसार आचरण करणारे कुणीही) जगभरात अनेक ठिकाणी अनेक नवीन पदार्थांचे (ज्यांचे वर्णन ग्रंथात नाही) सेवन करत आहेत. तेव्हा या सर्वांच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा अभ्यास होणे महत्वाचे आहे.

भारतातली कॉलेजेस किंवा इतर संस्था याबाबत काही करतात का ?
= कल्पना नाही. भारतात तर सीसीआयएम ची आयुर्वेदाच्या डिग्रीला मान्यता नाही अजून Sad
मी इथे येण्यापूर्बी असा प्रयत्न झालेला नव्हता, गेल्या पाच वर्षात काही प्रोग्रेस मला माहिती नाही.

बर्‍याच भागात आंबा उष्ण असला तरी रात्रभर थंड पाण्यात बुडवून ठेवल्याने त्याची उष्णता कमी होते असं मानतात. असे काही उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत का ?
= पाण्याच्या शीत गुणाच्या संपर्काने (हा ही एक संस्कार आहे ) उष्णता कमी होउ शकते. हा उपाय कुठे लिखित स्वरुपात असल्याचे ऐकिवात नाही. पण असे अनेक उपाय ग्रंथात आहेत (एकत्र नाहीत पण विषयाच्या अनुषंगाने विस्कळीत स्वरुपात नक्कीच आहेत.)

जसे तु एका पोष्ट्मध्ये म्हणालीस की दह्यामध्ये पाणी (जलतत्त्व) घातल्यामुळे त्यात त्याचा प्रभाव वाढतो तसेच बाकिच्या महाभूतांचा परिणाम वाढवायला त्यांचे रीप्रेझेन्टेटीव्ह पदार्थ आहेत का?बहुतेक 'अग्नि' साठी अग्निसंस्कार करायचा असेल. मग पृथ्वी, वायू व तेज ह्यांसाठी काय?
= किरण, अस्चिग च्या ३ र्‍या प्रश्नाच्या उत्तर पाहशील का?

हाच विचार पुढे नेला तर भारतातले 'आडाखे' पूर्णपणे निराळं हवामान असणार्‍या देशात (उदा. अमेरिकेत) जसेच्या तसे लागू होणार नाहीत, बरोबर?
= नवीन प्रदेशातल्या हवामान, पिकणारे धान्य-फळे यानुसार बदलतील. तरी मनुष्याची प्रकृती इथे महत्वाची आहेच ( माझ्यासारखे लोक, जे भारतात जन्मले, वयाचा बराच काळ तिथे घालवला त्यांना लगेच केवळ आता इथे अमेरिकेत आहेत म्हणून लगेच हवामानानुसार रोज मांसाहार केला तर नाही झेपणार.)

खूपच छान माहिती. प्रश्न विचारणार्‍याचे कौतुक!!

आणि ज्ञातीचे देखील कौतुक. अजिबात न कंटाळता प्रश्नाची उत्तरे देतेय म्हणून. अजून लिहि गं!!

ज्ञाती,
थोडे विषयांतर आहे, पण केळे अमेरिकेमधे मुलाना देऊ नका (constipation होत असल्यास) असे सांगतात; आणि भारतात, केळे सारक म्हणुन रात्री झोपताना खावे, असे सांगतात. हे कसे?

ज्ञाती, उत्तम माहितीपूर्ण लेख आणि उत्तरे. अश्वीनीने पण छान पुरवणी जोडली आहे.

माझ्या एका नातेवाइकांना सांधेदुखीवर दही पूर्ण वर्ज सांगितले होते पण दुपारच्या जेवणात एक वाटी ताक आवर्जून घ्यायला सांगितले होते. हा विरोधाभासामागचे कारण अश्विनीने दिलेल्या माहितीमुळे उलगडले (आम्ल व मधुर विपाक).

संस्काराबाबतीत एक प्रश्ण - पाश्चिमात्य शास्त्रांनुसार रासायनीक प्रक्रिया झाल्यानंतरच पदार्थाचे गुणधर्म बदलतात, भौतिक प्रक्रियेने नाही. असे असताना घुसळण्यासारख्या भौतिक प्रक्रियेने ताकाचे गुणधर्म दह्याच्या गुणधर्मापेक्षा कसे वेगळे होतात?

पाश्चिमात्य शास्त्रांनुसार रासायनीक प्रक्रिया झाल्यानंतरच पदार्थाचे गुणधर्म बदलतात, भौतिक प्रक्रियेने नाही. असे असताना घुसळण्यासारख्या भौतिक प्रक्रियेने ताकाचे गुणधर्म दह्याच्या गुणधर्मापेक्षा कसे वेगळे होतात?
= तुमच्या प्रश्नातंच याचे उत्तर आहे. दोन शास्त्रे व त्यांचे निकष भिन्न आहेत. रासायनिक प्रक्रिया झाल्यावर पदार्थात बदल होतो यातील प्रत्येक शब्द व ही संकल्पना वेगळ्या शास्त्राची आहे, आयुर्वेदाची नव्हे. मूळात दोन्ही शास्त्रांना अभिप्रेत पदार्थ या शब्दाचा अर्थ अतिशय भिन्न आहे. प्रत्येक शास्त्र (जसे ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र) त्या शास्त्राच्या परिभाषेत समजुन घेणे हाच संकेत आहे. वर दिलेली माहिती आयुर्वेदाच्या सिध्दांतांवर आधारित आहे. दुसर्‍या शास्त्राच्या सिद्धांताची सत्यता त्यात पारखायला गेल्यास केवळ गोंधळ उडतो.
भौतिक प्रक्रियेने ताकाचे गुणधर्म दह्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे होतात ही फॅक्ट आहे (दुसर्‍या शास्त्राच्या निकषांनुसार काही बदल झाला नसला तरीही) आणि ती अनुभवास येते.

ज्ञाती, उष्णता वाढल्यास शीत गोष्टी आहारात घेतल्या तर अनेकदा कफाचे अधिक्य होते (मलातरी) मग कफाचे विलयन करायला उष्ण गोष्टी.. असं चक्र चालू होतं. हे कसं ब्रेक करायचं?

उष्णता वाढल्यास शीत गोष्टी आहारात घेतल्या तर अनेकदा कफाचे अधिक्य होते (मलातरी) मग कफाचे विलयन करायला उष्ण गोष्टी.. असं चक्र चालू होतं. हे कसं ब्रेक करायचं?
= कुठेतरी गणित चुकतंय. पुढच्या वेळी उष्णता वाढली की ग्रॅजुअली आहार-विहारात बदल कर, एकदम नको. नेहमीपेक्षा कमी थंड गोष्टीने काम होतंय का बघ.
उष्णता वाढली की शीत गोष्टी घेणे हा त्यावरचा उपाय आहे, पण पहिला उपाय आहे उष्ण गोष्टी घेणे बंद करणे. ते करून बघ. त्यानेच कदाचित त्रास कमी होईल.

>>पाश्चिमात्य शास्त्रांनुसार रासायनीक प्रक्रिया झाल्यानंतरच पदार्थाचे गुणधर्म बदलतात, भौतिक प्रक्रियेने नाही. >>असे असताना घुसळण्यासारख्या भौतिक प्रक्रियेने ताकाचे गुणधर्म दह्याच्या गुणधर्मापेक्षा कसे वेगळे होतात?

>= तुमच्या प्रश्नातंच याचे उत्तर आहे. दोन शास्त्रे व त्यांचे निकष भिन्न आहेत. रासायनिक प्रक्रिया झाल्यावर >पदार्थात बदल होतो यातील प्रत्येक शब्द व ही संकल्पना वेगळ्या शास्त्राची आहे, आयुर्वेदाची नव्हे. मूळात दोन्ही >शास्त्रांना अभिप्रेत पदार्थ या शब्दाचा अर्थ अतिशय भिन्न आहे. प्रत्येक शास्त्र (जसे ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र) त्या >शास्त्राच्या परिभाषेत समजुन घेणे हाच संकेत आहे. वर दिलेली माहिती आयुर्वेदाच्या सिध्दांतांवर आधारित आहे. >दुसर्‍या शास्त्राच्या सिद्धांताची सत्यता त्यात पारखायला गेल्यास केवळ गोंधळ उडतो.

माधव, काही भौतीक वटणार्या प्रक्रिया पण बदल घडवु शकतात. उदा. उष्णतेमुळे पदार्थांचे स्ट्रक्चर बदलु शकते. घुसळण्याच्या पद्धतीमुळे मात्र (बहुदा) केवळ काही खुप मोठ्या (macroscopic पण डोळ्यांना न जाणवणार्या) साखळ्या तुटु शकतील (उदा. live cultures च्या).

ज्ञाती, आधिच्या काही प्रश्नांमधुन पदार्थाची परिभाषा आयुर्वेदाप्रमाणे काय आहे हेच जाणुन घ्यायचा प्रयत्न मी करतो आहे. रसायनशास्त्रात अणु-रेणु, ईलेक्ट्रॉन्स, आयोनीक बॉण्ड्स वगैरे द्वारा नेमके काय व कसे बदल होतात हे दर्शवता येते.

एखाद्या गोष्टीचा वेगेवेगळ्या व्यक्तिंवर थोडा वेगळा प्रभाव पडु शकेल, पण त्यांना देण्याआधी जी प्रक्रिया होते ती सापेक्ष नसणार, आणि त्या मुळे नेमके काय बदल होतात हे सांगयची काही तरी पद्धत असायला हवी. उदा. ताकातील लोणी म्हणजे दुधातील स्निग्ध पदार्थ. त्याचे तुप बनवतो तेंव्हा जी बेरी बनते ती म्हणजे दुधातील प्रथीने.

ज्ञाती, माधवी डोंगरेंनी केळ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे प्लीज. सफरचंदाबाबतही मला तोच प्रश्न आहे. अमेरिकेत सफरचंद मलावरोधावर उपाय म्हणून वापरायला सांगतात. अगदी लहान बाळांनाही अ‍ॅपल ज्यूस द्यायला सांगतात. आणि भारतात बरोबर उलटे सांगितले जाते.

केळ्याबाबत मला कळलेली माहिती अशी की जास्त पिकलेले केळे बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून खावे आणि जरा कच्चे / अर्धवट पिकलेले केळे हे जुलाब होत असतील तर उपाय म्हणून खावेत. ही ऐकीव माहिती आहे. खरे खोटे काय ते क्लिअर करून घ्यायला आवडेल मला.
माहिती खूपच छान आहे ज्ञाती. धन्स हे सगळे आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल.

ज्ञाती,चांगला लेख. रुनीचाच प्रश्न मलाही पडलेला. घरी सगळेच जेवणानंतर ताक पितात आणि 'रोज प्यावं, पोटाला थंड बरं असतं' हे ही वर म्हणतात. पण उत्तर मिळालं. धन्यवाद.

Pages