पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

Submitted by ज्ञाती on 3 May, 2010 - 00:05

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)

एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?
१. स्वभावः प्रत्येक पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासुन बनलेला असतो. या पंचमहाभूतांचे गुणधर्म पदार्थात कमी-अधिक प्रमाणात येतात. उदा. जसे तेज महाभूत रुक्ष, तीक्ष्ण, उष्ण आहे. ज्या पदार्थामध्ये तेजोमहाभूताचे आधिक्य असते तो पदार्थ (उदा. मिरे) साधारण तसेच गुणधर्म दाखवतो. उष्ण पदार्थांमध्ये तेज व वायू महाभूतांचे आधिक्य असते. शीत पदार्थांमध्ये जल, आकाश आणि पृथ्वी महाभूताचे अधिक प्रमाण असते.

२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.

शास्त्रकारांनी या गुणधर्माचे वर्णन हजारो वर्षांपुर्वी करुन ठेवले आहे. पदार्थातील पंचमहाभूतांचे कॉम्बिनेशन आजही तसेच आहे. त्यामुळे इतक्या वर्षापुर्वी केलेला अभ्यास जुना झाला, आता नव्याने गुणधर्मांचा अभ्यास व्हायला हवा असे म्हणणे फोल आहे.

प्रत्येक पदार्थ एकतर उष्ण असतो किंवा थंड असतो, अर्थातच उष्णतेचे/शैत्याचे प्रमाण वेगवेगळ्या पदार्थात कमी-अधिक असते. जसे की हिरवे मूग हे किंचित उष्ण आहेत तर मिरे अति-उष्ण आहेत. सुंठ बर्‍यापैकी उष्ण आहे. हे तर-तमत्व पदार्थाच्या पांचभौतिक कॉम्बिनेशननुसार येते. (वेगळे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण म्हणतो ना आज हवामान गरम आहे/कमी गरम आहे/ गरम नाहिये पण थंडीही नाहिये/ खूप थंड हवामान आहे तसंच काहीसं.)

आता वर म्हटले तसे हे गुण म्हणजे पदार्थाचा स्वभाव आहे. एकाच पदार्थातील गुणाचे तारतम्य हे प्रामुख्याने दोन घटकांमुळे बदलते.
१.त्या पदार्थावरील संस्काराने: जसे दही उष्ण आहे. त्यामध्ये पाणी मिसळुन घुसळणे हा अन्नसंस्कार केला असता तयार होणारे ताक हे दह्यापेक्षा कमी उष्ण असते (दह्यापेक्षा कमी उष्ण असले तरी ताक उष्णच आहे).
२. तो पदार्थ सेवन करणार्‍या शरीराची प्रकृती आणि अवस्था:
प्रकृती:- मुळातच पित्ताधिक प्रकृतीच्या व्यक्तीला तुरीची डाळ/दही कधीही, कशाबरोबरही खाल्ले तरी उष्ण पडते.
अवस्था:- शरीरात कफदोषाचे आधिक्या झाले असता (जो मुळात थंड, गुरु अशा गुणांचा आहे) मिरे हे तितके उष्ण पडत नाहीत. कारण त्यातील उष्णत्व हे वाढलेल्या कफाचे पारिपत्य करण्यात खर्ची पडते. याउलट शरीरात उष्णता आधीच वाढलेली असताना घेतले गेलेले साधारण उष्ण द्रव्यही (जसे तिळ-गुळ) बाधते (शरीराला उष्ण पडते). यावरुन लक्षात येते की एखादा पदार्थ केवळ उष्ण किंवा थंड म्हणुन चांगला किंवा वाईट असे वर्गीकरण करणे अशक्य आहे. गरजेनुसार, योग्य प्रमाणात वापरलेली दोन्ही गुणांची द्रव्ये शरीराला तितकीच फायदेशीर आहेत.
३. काळ (अर्थात दिवसाची/ऋतूची अवस्था): भर उन्हाळ्यात तिळगुळाची पोळी किंवा दुपारच्या वेळी आवड म्हणून सूपवर घातलेली किंचितशी मिरपूड उष्ण पडु शकते. तसंच थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी खाल्लेला पेरु थंड पडतो.
४. शरीराच्या विशेष अवस्था जसे आजारपण किंवा गरोदरपण: या अवस्थांमध्ये अतिउष्ण आणि अतिथंड अशा दोन्ही गुणांनी युक्त पदार्थांचा वापर टाळावा. याबाबतच्या काही सामान्य गैरसमजुती पुढीलप्रमाणे:
लहान मुलांना केळे खायला देणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. लहान मुलांमध्ये आधीच कफ दोषाचे आधिक्य असते. त्यात रात्रीच्या वेळी (जेव्हा वातावरणात शीत गुणाचे आधिक्य असते) तेव्हा केळी खाल्ल्यास मुलांना श्वसनसंस्थेशी निगडीत आजार बळावतात जसे सर्दी, खोकला, बाळ-दमा.
गरोदर स्त्रियांनी बदाम, खजुर, केशर असे पदार्थ नियमित खाणे: ह्या उष्ण पदार्थांच्या सेवनाचा बाळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होउ शकतो.

आता नेहमी आहारात येणारी अन्न/औषधी द्रव्ये साधारणपणे उष्ण की शीत ते पाहू.
उष्ण द्रव्ये:
करडई, चुका, मेथी, कारले, वांगे, आंबा, फणस, कवठ, टोमॅटो, ताक, दही, खोबरे, गुळ, तीळ, हिंग, मोहरी, ज्वारी, बाजरी, कुळीथ, उडीद, लसुण, खजूर, तेल, मद्य, सुंठ, मिरे, जिरे, वेलची, ओवा, बदाम, खारीक, जायफळ, अक्रोड, केशर, डिंक, आंबा, पपई, टरबुज, चिंच, जीरे, लवंग इ.

शीत द्रव्ये:
दुध, तूप, लोणी,मध, पाणी, नारळाचे पाणी, उसाचा रस, चिक्कु, सीताफळ, केळे, पेरु, द्राक्षे, सफरचंद, चंदन, वाळा, जेष्ठमध, तांदुळ, नाचणी, लाह्या, बटाटा, रताळे, काकडी, मनुका, सब्ज, गुलकंद, धणे इ.

उष्ण-शीत गुणांबद्दलच्या माहितीची उपयुक्तता: आयुर्वेद हे एक प्रत्यक्षपर शास्त्र आहे. म्हणजेच त्यातील कुठल्याही संकल्पनेचे ज्ञान व्यवहारात उपयुक्त ठरते. उष्ण आणि शीत हे परस्परविरोधी गुण आहेत. शरीरातील उष्णता वाढली असता शीत गुणाचे औषध वापरावे लागते. तसेच शरीरातील शीत गुण वाढला असता उष्ण द्रव्याने त्याचे निराकरण होते. एखाद्या व्यक्तीला डोळ्याला रांजणवाडी येउन डोळ्याची आग होत असेल तर घरात उपलब्ध असलेले थंड द्रव्य/औषध (जसे ज्येष्ठमध, तूप, लोणी) वापरुन लगेच उपचाराला सुरुवात करता येते.त्याचप्रमाणे काही वेळा वयस्कर माणसांचे एसीमध्ये जाउन आल्यावर पाय दुखतात. अशा वेळी थंड गुणाने झालेल्या या त्रासावर लगेच शेकणे हा गरम उपाय करता येतो. आधीच अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती माहीत असेल तर त्या दृष्टीने गरम पदार्थांचे जाणीवपुर्वक सेवन केले जाते.

लेख आणि उत्तरे ही माझ्या अल्पमतीप्रमाणे देण्याच्या प्रयत्न केला आहे. यात उणीवा असल्यास त्या वैयक्तिक मर्यादा समजाव्यात, शास्त्राच्या नव्हे. Happy

(टीपः काही दिवसांपुर्वी एका बातमीफलकावर झालेल्या चर्चेतून या लेखाचा मुहूर्त लागला. अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेल्या/ले शंका/प्रश्न यांचे स्वागत आहे. ( आयुर्वेदावर विश्वास नसलेल्यांना त्याची महती पटवुन देणे हा लेखाचा उद्देश नाही. )

प्रकाशनपूर्व प्रूफरीडिंगसाठी सिंडरेला, अश्विनी यांचे मनापासून आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञाती,
अभ्यासपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.
दही उष्ण, ताक पण थंड नाहीच तर कमी उष्ण असे तू लिहीलय. असे असतांना आपण उन्हाळ्यात ताक, दही जास्त खातो थंडीच्या दिवसात नाही असे का?
हा लेख गुलमोहोरासोबतच आरोग्य विषयक ग्रूप मध्ये पण हवा म्हणजे भविष्यात सगळ्यांना लवकर सापडू शकेल.

आधीच अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती माहीत असेल तर त्या दृष्टीने गरम पदार्थांचे जाणीवपुर्वक सेवन केले जाते. >> म्हणजे काय ?
एखाद्याची जर अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती असेल तर एकुणच शरीरात आम्ल वाढले आहे ना?
मग त्याचा आहार कसा हवा?

छानच लेख. वेलची सुद्धा उष्ण पदार्थांमधे मोडते? आणि ताकाच्या उष्ण गुणधर्माबद्दलही जाणून घ्यायला आवडेल.

ज्ञाती, चांगली माहिती आहे. लेखाबद्दल (आणि शंकांचे स्वागत केल्याबद्दल) धन्यवाद.

मला एखादा पदार्थ उष्ण किंवा थंड आहे, असे म्हटले जाते तेव्हा नेहमीच संभ्रम पडतो. शेवटी मी ढोबळपणे ज्यात अधिक कॅलर्‍या तो उष्ण असे गृहीत धरले होते (ज्याद्वारे शरिराला अधिक ऊर्जा मिळू शकते). पण तीही व्याख्या चुकीचीच आहे म्हणायची. कारण या लेखाप्रमाणे तूप इ. पदार्थ थंड आहेत.

दही खाल्यावर थंड वाटते, काही प्रमाणात तहानही भागते. अति झाले तर सर्दी होते. आग होणे, चक्कर येणे वगैरे होत नाही. मग ते उष्ण कसे?

तुमच्याकडून आणखी सविस्तर माहिती वाचायला आवडेल.

आंबा थंड की उष्ण?

मला सारखी अ‍ॅसिडीटी होते. आंबे प्रचंड आवडतात पण लगेच उष्णतेचा त्रासही होतो तोंड येणे, डोळ्याच्या कडांवर बारिक फोड वै. Sad

लेख चान आहे. पण ही माहिती कितिशी बरोबर आहे? सकाळ मध्ये बालाजी तांबेंचा आलेला लेख वाचला म्हणुन एक शंका.
http://www.esakal.com/esakal/20100409/4924463358725616676.htm
ह्यात मध थंड म्हणुन दिल आहे. मग पदर्थाचा खरा गुण कसा ओळखायचा?

रुनी, लेख आरोग्य गृपमध्ये हलवण्याची विनंती अ‍ॅडमिनना केली आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे एकुण २० प्रकारचे गुण आहेत, प्रत्येक पदार्थात उष्ण/शीत याखेरीज उरलेल्या १८पैकी इतरही गुण असतात. दह्यामध्ये उष्ण च्या जोडीला गुरु, अभिष्यंदी, अम्लविपाकित्व, स्निग्ध असे गुण असतात व या सर्व गुणांचा एकत्रित परिणाम दह्याचा परिणाम म्हणुन पहायला मिळतो. ताक दह्याच्या तुलनेत अल्प उष्ण लघु आणि मुख्यतः मधुरविपाकी अशा गुणांचे आहे. त्यामुळे त्यांच्या परिणामात फरक आहे.
(विपाक म्हणजे पदार्थ पुर्णपणे पचल्यावर त्याच्या शरीरावर परिणाम कोणत्या रसाप्रमाणे होतो. मधुर (गोड), अम्ल (आंबट) आणि कटु (तिखट) असे तीन विपाक संभवतात.)

असे असतांना आपण उन्हाळ्यात ताक, दही जास्त खातो थंडीच्या दिवसात नाही असे का?>>>उन्हाळ्यात ताक पिण्याचे प्रयोजन तहान शमवुन भुक वाढवणे हे असते. जरी उष्ण असले तरी मधुर विपाकामुळे फारसे पित्त वाढवत नाही. थंडीच्या दिवसात वातावरणाच्या विरुध्द म्हणुन गुरु स्निग्ध,उष्ण गुणाचे दही खाणेही ठीकच.

चिंगी, आंबा उष्ण, स्निग्ध तसेच गुरु गुणांचा आहे.

रिमा तो टायपो दुरुस्त केला आहे.

छान आहे लेख. दही मला थंड वाटतं होते. हंगामानुसार निसर्ग आपल्यासाठी फळे भाज्या पिकवितो. हंगामात येणार्‍या फळांचे भांज्याचे सेवन करावे असे म्हणतात. पण आंबा हा इतका उष्ण असून तो उन्हाळ्यात का येतो?

थंड पदार्थांची आणखी नावे:
काकडी
चिंच

उष्ण-
मनूका
बदाम
पपई
काजू
मसाले सर्वंच बहुदा

थंड पदार्थांची नावे आणखी सुचवा..

उत्तम लेख, ज्ञाती!! खूपच उपयोगी आहे.

शीत पदार्थांमधे जीरं आणि सब्जा बी पण आहे नं? तसचं गुलकंद हा पण उन्हाळ्यात जास्त उपयोगी आहे.

एकदम मस्त लेख!! खूप उपयोगी पडणारा आहे!
माझ्या नवर्‍याला बराच काळ उष्ण म्हणजे तापवलेले गरम पदार्थच वाटत होते.. Proud अर्थात ते तसे नाहीये हे सांगितले, पण मग नक्की कसे आहे हे काही सांगता येईना. हा लेख दाखवते त्याला.

सायली, तुझ्या लेखाचे फायनल व्हर्शन बघायला आले आणि हे प्रश्न पाहीले. मी उत्तर दिले तर तुझी हरकत नाही ना? लेख छानच झाला आहे.

>>एखाद्याची जर अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती असेल तर एकुणच शरीरात आम्ल वाढले आहे ना?
मग त्याचा आहार कसा हवा?

अ‍ॅसिडिटी होते तेंव्हा पित्त एकतर तीक्ष्ण गुणाने वाढते किंवा अम्ल. अम्ल असेल तर आंबट, खारट, तेलकट इ. खाणे (लोणची, कैरी इ.) टाळावे. तीक्ष्ण गुणाने असेल तर तिखट, गरम (चटण्या, चहा इ.) टाळावे.

>>कारण या लेखाप्रमाणे तूप इ. पदार्थ थंड आहेत
तूप हे विलक्षण गुणधर्माचे द्रव्य आहे. प्राय: ते उष्ण आहे त्यामुळे अग्निदीपनाचे काम उत्कृष्टरित्या करते. परंतु त्याच्या प्रभावामुळे (विशिष्ट गुण) ते पित्तघ्न द्रव्यांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरते. तसेच संस्काराने ते शीत होऊ शकते. उदा: ज्येष्ठमध घृत, शतधौत घृत इ.

>>वेलची सुद्धा उष्ण पदार्थांमधे मोडते?
वेलची थंड आणि लवंग उष्ण असा बोलीभाषेत प्रघात आहे परंतु वेलची थंड म्हणजे लवंगेपेक्षा शीतल परंतु मूळात ती उष्णच. थोडी कमी उष्ण इतकेच.

>>दही खाल्यावर थंड वाटते, काही प्रमाणात तहानही भागते. अति झाले तर सर्दी होते. आग होणे, चक्कर येणे वगैरे होत नाही. मग ते उष्ण कसे?
खूप चांगला प्रश्न. दही पण फार विचित्र गुणधर्माचे आहे म्हणून आयुर्वेदाने ते शक्यतो टाळायला सांगितले आहे. दह्याने सर्दी होते हे खरं आहे. गुरू (पचायला जड), स्निग्ध ह्या गुणांबरोबरच अभिष्यंदी हा खास गुण (खरं म्हणजे दोषच) केवळ दह्यात आढळतो त्यामुळे दही खाल्याने कफप्रकोपाची लक्षणे दिसतात. आणि अम्लविपाकी असल्याने ते पित्तही वाढवते. उलट ताक घर्षणाच्या संस्काराने बहुउपयोगी बनते. मधुरविपाकी असल्याने पित्तावर काम करते. दीपन ह्या गुणधर्माने भूक वाढवते. मूळव्याधीच्या रूग्णांना तर ताक हे अमृताप्रमाणे उपयोगी पडते.

बी, आंबा उष्ण असला तरी मधुर रसाचा असल्याने थोड्या प्रमाणात खाल्ला तर पित्ताचेही शमन करतो जे उन्हाळ्यात वाढण्याची शक्यता जास्त असते. तेंव्हा आंबा उन्हाळ्यात नक्कीच खावा. त्याचा फायदा होतोच. पण त्याच्या उष्ण गुणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः आत्यधिक पित्त प्रकृती असेल तर अतिरेक करू नये.

आवर्जून वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद Happy
सब्जा, थंड आहे, जीरे उष्ण आहेत. वरच्या यादीत हेही अ‍ॅड करते. गुलकंद शीतच.

अश्विनी थॅन्क्स तुलाही Happy विपाक आणि प्रभाव याबद्दल वेगळ्याने लिहीते.

ज्ञाती, आयुर्वेदातील बेसिक्स चांगले मांडले आहेत.

औषधात (किंवा आहारात देखिल) ही तत्वे वापरायची असतील तर ती संख्यातमक असणे आवश्यक आहे. उदा. मध चांगला जरी म्हंटले तरी एका बैठकीत किलोभर खाणे योग्य नाही. त्या संबंधात मला अनेक प्रश्न आहेतः
> प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत
(१) हे सर्व गुण सारख्या महत्तेचे आहेत, की उष्ण-शीत जास्त महत्वाचे आहेत?

> उष्ण पदार्थांमध्ये तेज व वायू महाभूतांचे आधिक्य असते.
(२) प्रत्येक (किंवा अनेक) पदार्थांमध्ये पंचमहभुतांचे प्रमाण नेमके किती आहे, हे कुठे दिलेले आहे का?
उदा.: ताक ४०% तेज, ४५% वायु, ५% आकाश, ५% पृथ्वि, ५% जल?

> प्रत्येक पदार्थ एकतर उष्ण असतो किंवा थंड असतो, अर्थातच उष्णतेचे/शैत्याचे प्रमाण वेगवेगळ्या पदार्थात कमी-अधिक असते.
(३) pH प्रमाणे ही तत्वे एकाच ओळीत मांडता येतात की द्विमीत कागदावर क्ष हा ७०% उष्ण आणि ५% शीत आहे असा चार्ट बनवता येतो? pH मध्ये मीठ (किंवा कोणतेही क्षार) न्युट्रल असते, तसे काही पदार्थ न्युट्रल असतात का?

> त्या पदार्थावरील संस्काराने: जसे दही उष्ण आहे. त्यामध्ये पाणी मिसळुन घुसळणे हा अन्नसंस्कार केला असता तयार होणारे ताक हे दह्यापेक्षा कमी उष्ण असते
(४) म्हणजे पंचमहाभुतांचे प्रमाण कमीअधीक होते का? १०० ग्राम दह्यात, २५० मि.लि पाणी मिसळवल्यास नेमका किती फरक पडतो हे कसे शोधायचे? इतर १८ गुणांवर काय फरक पडतो? ते न कळल्यास साईड-इफेक्ट्स होऊ शकतात का?

> शीत द्रव्ये: दुध, तूप,
(५) शीत दुधाचे उष्ण दही, व ते कढवल्यावर शीत तूप असे कसे?

मलाही एक प्रश्न पडला.
नवीन पदार्थांचे गुणधर्म ठरवण्याचं शास्त्र काय आहे? उदा. हे गुणधर्म निश्चित केले तेव्हा कदाचित टोमॅटो भारतात पोचलाही नसेल. असंच उद्या एखादं नवीन फळ 'आयात' झालं, तर त्याचे गुणधर्म कसे ठरतात?
मांसाहाराबद्दल तू काही लिहिलेलं नाहीस. तो सरसकट उष्णच असतो का?

आस्चिग, खूप छान प्रश्न आहेत. लिहीते विस्ताराने.

(१) हे सर्व गुण सारख्या महत्तेचे आहेत, की उष्ण-शीत जास्त महत्वाचे आहेत?
उष्ण-शीत हे विसातले दोन गुण आहेत, सर्वच गुण तितकेच महत्वाचे आहेत. या लेखाचा उद्देश उष्ण-शीत ह्या संकल्पना समजावण्याचा आहे. त्यामुळे इतर गुणांवर भाष्य केलेले नाही.
प्रत्येक पदार्थ हा पाच महाभूतांचे एक युनिक कॉम्बिनेशन असतअर्थात त्यात या दोन गुणांखेरीज आणखीही गुण असतात.
पदार्था रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव असतो. (व्याख्या पुढीलप्रमाणे)
रस: मधुर, अम्ल, लवण (खारट), कटु (तिखट), तिक्त (कडु), कषाय (तुरट)
वीर्यः म्हणजे पदार्थाचा शरीरावर अंतिम परिणाम : उष्ण किंवा शीत.
विपाकः जाठराग्निने पाचन केल्यावर पदार्थाचा बदललेला परिणामी रस: मधुर्/अम्ल/कटु
प्रभावः पदार्थाचा विशेष गुण, कार्यकारणभावाने अनाकलनीय असतो पण परिणामाने समजुन येतो.
पदार्थ त्यातल्या कोणत्या गुणाने कार्य करतो ते महत्वाचे. (म्हणजे रसाने की वीर्याने की विपाकाने की प्रभावाने) अर्थातच याचे वर्णन ग्रंथात आहे. उदाहरणार्थ तूप हे मधुर विपाकाने व शीतवीर्याने पित्ताचे शमन करते. म्हणुन तुपाचे हे दोन गुणधर्म महत्वाचे. उष्ण गुणाचे द्रव्ये अग्नी वाढवतात. तूप मात्र प्रभावाने अग्नी वाढवते.
तुमच्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर द्यायचे झाले तर पदार्थाचा प्रमुख गुण (ज्याने तो कार्य करतो) तो सगळ्यात महत्वाचा.

२.प्रत्येक (किंवा अनेक) पदार्थांमध्ये पंचमहभुतांचे प्रमाण नेमके किती आहे, हे कुठे दिलेले आहे का?
>>असे मोजुनमापून प्रमाण कुठेही दिलेले नाही. ग्रंथात क्वचित तरतमवाचक शब्दात वर्णन आहे. अभ्यासाने/अनुभवाने (स्वतःवर्/रुग्णावर) समजुन घ्यावे लागते.

(३) pH प्रमाणे ही तत्वे एकाच ओळीत मांडता येतात की द्विमीत कागदावर क्ष हा ७०% उष्ण आणि ५% शीत आहे असा चार्ट बनवता येतो? pH मध्ये मीठ (किंवा कोणतेही क्षार) न्युट्रल असते, तसे काही पदार्थ न्युट्रल असतात का?
>> माझ्यामते ही तत्वे एकाच ओळीत मांडता येतील. (एका बाजुला उष्ण, उष्णतर, उष्णतम तर एका बाजूला शीत, शीततर, शीततम असे) द्विमीत चार्ट करता येणार नाही. कारण एकाच पदार्थात उष्ण आणि शीत हे दोन्ही गुण असू शकत नाहीत.

काही पदार्थ न्युट्रल असतात का?>> नक्कीच. काही पदार्थ असे आहेत की जे म्हणावे इतके उष्ण ही नाहीत आणि म्हणावे इतके शीतही नाहीत. जसे हिरवे मूग. अर्थात मीठाचा पी एच ० असा नक्की सांगता येतो, तसे मोजमाप करणे अवघड आहे. एक नक्की, अशा न्युट्रल पदार्थाचा कार्य करण्याचा मुख्य गुण हा उष्ण-शीत यापेक्षा वेगळा असणार जसे मूगाचा मुख्य गुण लघु म्हणजेच पचायला हलका हा आहे.

(४) म्हणजे पंचमहाभुतांचे प्रमाण कमीअधीक होते का?
>> अर्थातच. हेच बघा दह्याचे ताक करताना आपण स्वतः नाही का त्यात पाणी (जलमहाभूत) अ‍ॅड करत?

१०० ग्राम दह्यात, २५० मि.लि पाणी मिसळवल्यास नेमका किती फरक पडतो हे कसे शोधायचे?
>> नेमके मोजणे अवघड आहे. एक लक्षात घ्या गुण हे कर्मानुमेय आहेत. म्हणजेच त्यांचे प्रमाण, मोजमाप हे होणार्‍या परिंणामावर ठरते जे इन टर्न मनुष्याची प्रकृती, अवस्था अशा अनेकविध गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे जरी तुम्ही हे मोजलेत तरी नंतरचे व्हेरीएबल्स खूप आहेत. यासाठीच रुग्णाचे प्रकृती परीक्षण हा आयुर्वेदीय निदान आणि चिकित्सेचे महत्वाचे अंग आहे.

इतर १८ गुणांवर काय फरक पडतो?
>> फरक नक्कीच होणार. काय ते कोणता संस्कार आहे त्यावर अवलंबून आही. जसे पाणी घालून घुसळल्याने दह्याचे होणारे ताक पचनाला हलके (लघु) बनते, जेव्हाकी दही हे पचनाला जड (गुरु) असते.

ते न कळल्यास साईड-इफेक्ट्स होऊ शकतात का?
होऊ शकतात. याचाच अर्थ टेक्निकली कोणतेही द्रव्य कशातही मिसळून तयार होणारी डीश हे नेहमी आरोग्यकारक असेलच याची खात्री नाही. याकरिताच वेगवेगळे पदार्थ कुणी खावे, केव्हा खावे, किती प्रमाणात खावे, कशाबरोबर खावे याचे वर्णन शास्त्रात दिलेले आहे.

नवीन पदार्थांचे गुणधर्म ठरवण्याचं शास्त्र काय आहे? उदा. हे गुणधर्म निश्चित केले तेव्हा कदाचित टोमॅटो भारतात पोचलाही नसेल. असंच उद्या एखादं नवीन फळ 'आयात' झालं, तर त्याचे गुणधर्म कसे ठरतात?
>> नवीन पदार्थाचे गुणधर्म हे कर्मानुमेयच आहेत. त्याच्या सेवनाने शरीरावर होणारा परिणामांचा अभ्यास करुन ते ठरवावे लागते. अशा नवीन पदार्थाबद्दलच्या प्राथमिक माहितीवरूनही साधारण अंदाज करता येउ शकतो. जसे की पदार्थ कसा तयार होतो ( जसे फळ हे झाडाच्या पान/ मूळापेक्षा गुरु असते). साबुदाणा हा पचायला जड आहे हे अनुभवाने लगेच कळते. ईडली-डोसा हे प्रकार उडीद डाळ असल्याने व आंबवलेले पचायला जड व पित्तकफकर आहेत.

नवीन पदार्थांचे गुणधर्म ठरवण्याचं शास्त्र काय आहे?>> या विषयात संशोधनाला बराच वाव आहे Happy

मांसाहाराबद्दल तू काही लिहिलेलं नाहीस. तो सरसकट उष्णच असतो का? > साधारणपणे उष्ण, गुरु (त्यातही शरीराचा कोणत्या भागाचे मांस आहे त्यावर ते किती गुरू हे अवलंबून आहे) हे मांसाचे प्रमुख गुण आहेत. मासे हे विशेषकरुन कफकर सांगितले आहेत.

ज्ञाती, छान माहितीपूर्ण लेख! Happy

उसाचा रस मी इतके दिवस उष्ण समजत होते आणि म्हणून प्यायचा टाळत होते.
ताक हे कमी उष्ण आहे ही माहितीही नव्यानेच समजली. (एवढे दिवस शीत समजून चालले होते!)

उष्ण पदार्थांचे उष्ण गुणधर्म/ शीत पदार्थांचे शीत गुणधर्म कमी करण्यासाठीही आयुर्वेद त्यांचे सेवन करताना त्या त्या पदार्थाला विशिष्ठ प्रक्रिया करून मग खाण्यावर, किंवा त्यात अन्य काही पदार्थ मिसळून खाण्यावर भर देतो, जेणेकरून त्यांचा प्रकृतीस कमीत कमी अपाय होईल.
उदा : दही कायम घुसळून घ्यावे असे सांगितले जाते, ते ह्यासाठीच का? किंवा बदाम भिजवून खाण्यावर भर दिसतो. तसेच आमरसात तूप घालून खायला सांगतात. पेरू, सफरचंद इ. शीत, कफकारक फळांवर मिरपूड घालून खाणे.

कृपया ह्यावरही लिहिशील का?

तसेच डोंगरी आवळा, तुळशीचे बी, दुधी भोपळा, कोहळा, चंदनबटवा ह्या भाज्या शीत आहेत व हळद, सिमला मिरची, आले, शेवगा, शेपू, मिरच्या, शिंगाडा उष्ण आहेत ना?

उष्ण पदार्थांचे उष्ण गुणधर्म/ शीत पदार्थांचे शीत गुणधर्म कमी करण्यासाठीही आयुर्वेद त्यांचे सेवन करताना त्या त्या पदार्थाला विशिष्ठ प्रक्रिया करून मग खाण्यावर, किंवा त्यात अन्य काही पदार्थ मिसळून खाण्यावर भर देतो, जेणेकरून त्यांचा प्रकृतीस कमीत कमी अपाय होईल.उदा : दही कायम घुसळून घ्यावे असे सांगितले जाते, ते ह्यासाठीच का? किंवा बदाम भिजवून खाण्यावर भर दिसतो. तसेच आमरसात तूप घालून खायला सांगतात. पेरू, सफरचंद इ. शीत, कफकारक फळांवर मिरपूड घालून खाणे.
>> अगदी बरोबर Happy
कोणत्या दोषाचे आधिक्य असेल तर ताक कसे सेवन करावे हे याचे उत्तम उदाहरण आहे.
वाताधिक्य असताना: सुंठ व सैंधव घालुन घ्यावे
पित्ताधिक्यातः साखर
कफाधिक्य असताना: सुंठ, मिरे, पिंपळी घालून घ्यावे.

डोंगरी आवळा, तुळशीचे बी, दुधी भोपळा, कोहळा, चंदनबटवा ह्या भाज्या शीत आहेत >> बरोबर.
हळद, सिमला मिरची, आले, शेवगा, मिरच्या उष्ण आहेत.
शिंगाडा थंड आहे.
(तरी शेपु, चंदनबटवा याबद्दल खात्री करुन पुन्हा सांगते.)

Pages