'A Pack Of Lies' - गौरीच्या मुलीचं पुस्तक

Submitted by शर्मिला फडके on 1 May, 2010 - 03:12

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.
उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेऊच शकले नाही. वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमधे गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही.
उर्मिलाचं हे पुस्तक फिक्शन म्हणून लिहिलेलं असलं तरी नि:संशयपणे त्यातली 'जिनी' ही स्वतःची गोष्टच सांगतेय.गौरीच्या 'मी' मधून जशी प्रत्येकवेळी स्वतः गौरीच डोकावत राहिली तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने नॅरेट केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतिचे संबंध उलगडत जातात. आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसती अस्वस्थ नाही मुळापासून हलून गेले.
गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशिलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देशविदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजुतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दलही सर्वांनी आस्थेने, कुतुहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले. मात्र उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका 'जिनी' जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरपट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षितता, कमकुवतपणातून भिरकावले गेले त्या सार्‍याला कळत नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे हे दाखवत रहाते तेव्हा आपली आत्तापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात.
या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण कॅरेक्टर गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकट्याने, कमी पैशांमधे वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्र्ग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकट्या बहिणीला घेउन आईचे नवर्‍यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वतःला सावरणे आणि नंतर मग स्वतःच व्यसनाधिन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे हे सारे वाचताना मला 'अरे.. हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला पण किती वेगळे रंग होते त्याला..' असं सतत वाटत राहिलं.
आईच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे रहाताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरिचे ते लाडके 'विंचुर्णीचे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले.
स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही. गौरीच्या 'चन्द्रिके ग सारिके ग' मधले आई मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर काय प्रतिक्रिया असावी हे मला नाही कळलं.
आईच्या शेवटच्या दिवसांमधे जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते, आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमधे आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे!
उर्मिला या पुस्तकात लिहिते," मी सुद्धा लिहू शकते हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते असे मनापासून वाटते. मात्र हेही तितकचं खरं की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलय ते सांगू शकले नसते."गौरीच्या 'एकेक पान गळावया' मधली राधा यावर काय म्हणाली असती हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला.

मुलांना वाढवताना आपण आपल्या मते खूप आदर्श संकल्पना बाळगल्या आहेत अशी खात्री असली आणि त्यावर आपण कितीही खुश असलो तरी हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम परिचय करुन दिलास शर्मिला! खरंच वाचायला हवं हे पुस्तक. नाण्याची दुसरी बाजू जाणून घ्यायला..

छान ओळख करून दिली आहे पुस्तकाची. Happy

हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला? >> हे तर खरंच लक्षात येत नसावं बहुतेक वेळेला. आणि येत असेल, तेव्हा उशीर झालेला असावा!

वा.. छान पुस्तक ओळख!!!

स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही.>>>> मस्त...

वाचायला हवं हे पुस्तक.

नंद्याला अनुमोदन. शर्मिलाचे शेवटचे वाक्य, रैनाचे वाक्य जास्त पटले.

स्वातंत्र्य, व्यक्तिमत्वाची जोपासना, व्यक्तीस्वातंत्र्य ही सर्व एकेकट्या माणसाची जगण्याची तत्त्व असू शकतात. मुलांची जबाबदारी असताना असं एकेकटं स्वतःपुरतं जगून तुम्ही मुलांवर अन्याय करता हे त्या बुद्धीवादी आणि कणखर व्यक्तींच्या कसं लक्षात येत नाही ह्याचं जाम नवल वाटतं.

पुस्तकाचं नाव अगदी सार्थ ठरावं असाच गाभा दिसतो आहे या पुस्तकाचा. गौरीची पुस्तकं वाचताना मला नेहमीच हा प्रश्न पडत आलाय की तीच्या जवळच्या नातलगांवर विशेषतः मुलांवर तीच्या अशा वागण्याचा काय परीणाम होत असेल. अगदी वाचायला हवं... त्यांच्या दृष्टीकोनातून पाहताना गौरीचं वागणं समर्थनीय वाटणार नाही हे नक्कीच.

स्वातंत्र्य, व्यक्तिमत्वाची जोपासना, व्यक्तीस्वातंत्र्य ही सर्व एकेकट्या माणसाची जगण्याची तत्त्व असू शकतात. मुलांची जबाबदारी असताना असं एकेकटं स्वतःपुरतं जगून तुम्ही मुलांवर अन्याय करता हे त्या बुद्धीवादी आणि कणखर व्यक्तींच्या कसं लक्षात येत नाही ह्याचं जाम नवल वाटतं.>>> पूनम अनुमोदन. एवढंच नाही तर त्या मुलांच्या आयुष्यात ढवळा ढवळ करायची नाही, त्यांना स्वातंत्र्य द्यायचं अशा विचारांनी मुलांपासून त्या अलिप्त कसं राहू शकतात? मुलांची ते स्वातंत्र्य पेलण्याची कुवत आहे किंवा नाही याचा विचार केला नाही का त्यांनी?

'बापलेकी' मध्ये गौरीने 'दिनूचं' व्यक्तिमत्व, त्यांचे एकमेकांमधले भावनिक बंध अतिशय छान लिहीले आहेत. इरावतीबाई प्रवास कराच्या तेव्हा दिनकरराव अगदी आईप्रमाणे मुलांची काळजी घ्यायचे असं गौरींनी नमूद केलं आहे. म्हणजे संगोपनाचे, मुलांची मानसिकता जपण्याचे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होते. स्वतःच्या जडणघडणीत, व्यक्तिमत्वात आईवडिलांनी केलेल्या संगोपनाचा, संस्कारांचा फार मोठा वाटा आहे हे त्या मान्य करतात. असं असताना स्वतःच्या मुलांच्या मानसिकतेची, भावनिक गरजेची जाणिव त्यांना झाली नसेल का? हा गौरीमधाला दोष वगैरे दाखवण्याचा प्रयत्न नाही. कुतूहल म्हणुन प्रश्न विचारले.

>>> कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही.
कसं बोललीस!
मस्त लिहिलंयस. नक्की वाचणार. Happy

<<एवढंच नाही तर त्या मुलांच्या आयुष्यात ढवळा ढवळ करायची नाही, त्यांना स्वातंत्र्य द्यायचं अशा विचारांनी मुलांपासून त्या अलिप्त कसं राहू शकतात? मुलांची ते स्वातंत्र्य पेलण्याची कुवत आहे किंवा नाही याचा विचार केला नाही का त्यांनी?>>
वा अन्जली सुन्दर प्रतिक्रिया

मी मागवलं हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवरून Happy भारतातून मागवण्याइतका धीर नाही आता Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

परिक्षण लिहिल्यावर आणि प्रतिक्रिया वाचून झाल्यानंतर काही विचार मनात आले.

मुलीच्या भरकटलेल्या जीवनशैलीबद्दल गौरी देशपांडेंना एक आई म्हणून दोषी किंवा गुन्हेगार (!) मानावं? मला तसं मानावसं या सगळ्यानंतरही वाटत नाही. उलट माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक खूप कणवेची भावनाच जास्त तीव्रतेने उमटते.
बुद्धिमान आईबापांच्या पोटी जन्माला आल्यावर, त्यांच्या किंवा आजूबाजूच्यांच्या अपेक्षांना पुरे पडताना कोणत्याही मुलाच्या पोटी येतात ते भोग जे उर्मिलाच्या वाट्याला आले तसे त्याही अगोदर गौरीच्याही वाट्याला आले होते. वयाच्या जेमतेम विशीत प्रेमात पडताना आणि शिक्षण अर्धवट सोडून लग्न करताना आणि त्यानंतर घटस्फोट घेताना गौरीलाही आईच्या कमालीच्या नाराजीला तोंड द्यावेच लागले होते. पण ती भरकटली नाही कारण वडिलांचा सहवास हे तर होतेच पण महत्वाचं असं की इरावतीबाईंचे सततचे दौरे आणि त्यांची सांसरिक अनास्था या सगळ्यातून आईचा सहवास जास्त न लाभताही गौरीचे त्यांच्या सोबतचे भावनिक बंध खूप बळकट होते. आपली आई काय लिहितेय, काय संशोधन करतेय याचे महत्व गौरी पुरेपुर जाणून होती.
दुर्दैवाने तसे उर्मिला आणि त्यांच्या बाबतीत झाले नाही. गौरीचा घटस्फोट मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या क्लेशदायक होता. आपल्या एका पोटच्या मुलीला कायमचे दुरावण्याचे दु:ख आणि आर्थिक असुरक्षितता, दुसर्‍या मुलीची संपूर्ण जबाबदारी यांना तोंड देत असताना गौरीने उच्च शिक्षण घेतले, लिहिण्यात करिअर केली. या सगळ्यात आईच्या लेखन कारकीर्दीबद्दलची, एक व्यक्ती म्हणून आईच्या समाजातल्या ओळखीबद्दलची संपूर्ण अनास्था उर्मिलाच्या मनात दीर्घ काळ राहिली. तसं होणं निव्वळ दुर्दैवी होतं. संवादाचा आणि अपेक्षांचा पूल दोन्ही बाजूंनी पुरा व्हावा लागतो. आईमुलाच्या नात्यालाही हे लागू पडतं. लेकीच्या बाबतीत तिने शिक्षण पूर्ण करावे नाहीतर हव्या त्या क्षेत्रात करिअर स्वतःच्या जबाबदारीवर करावी हा एकमेव आग्रह त्यांनी धरला होता जो पूर्ण झाला नाही.
बुद्धिमत्ता, तीव्र सर्जकता आणि संवेदनशिलता यांचं एकत्रित रसायन एक व्यक्ती म्हणून तुम्हाला समाजापासून आणि स्वतःच्याही कुटुंबापासून फार एकाकी करत नेतं. अशावेळी जोडिदार नाहीतर मुलं यांचा समजुतदार भावनिक ओलावाच फक्त तुम्हाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो. गौरीला तो मिळाला नाही आणि त्याची परिणती तिच्या व्यसनाधीनतेमधे झाली. हे सगळं खूप दुर्दैवाचं वाटतय मला. स्वतंत्र विचारांचं हे एक देणं अशा तर्‍हेने चुकवायलाच कां लागावं बाईला?

शर्मिला,
गौरीला दोषी ठरवणारे आपण कोण? तो अधिकार असलाच (आणि ती दोषी असलीच) तर त्यांच्या मुलांचा. पण
>>>>>>>>>.बुद्धिमत्ता, तीव्र सर्जकता आणि संवेदनशिलता यांचं एकत्रित रसायन एक व्यक्ती म्हणून तुम्हाला समाजापासून आणि स्वतःच्याही कुटुंबापासून फार एकाकी करत नेतं. अशावेळी जोडिदार नाहीतर मुलं यांचा समजुतदार भावनिक ओलावाच फक्त तुम्हाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो. गौरीला तो मिळाला नाही आणि त्याची परिणती तिच्या व्यसनाधीनतेमधे झाली.>>>>>>>>>>

ही परत फक्त गौरीची बाजू झाली ना गं? घटस्फोटाचा निर्णय तिचाच होता ना? पण तिच्या निर्णयाचे परिणाम मुलांना भोगावे लागले. तू म्हणते तसं "पण ती भरकटली नाही कारण वडिलांचा सहवास हे तर होतेच पण महत्वाचं असं की इरावतीबाईंचे सततचे दौरे आणि त्यांची सांसरिक अनास्था या सगळ्यातून आईचा सहवास जास्त न लाभताही गौरीचे त्यांच्या सोबतचे भावनिक बंध खूप बळकट होते. आपली आई काय लिहितेय, काय संशोधन करतेय याचे महत्व गौरी पुरेपुर जाणून होती." म्हणजे योग्य संस्कारांचा, विचारांचा, भावनिक आधार तिला होता. मग अशा 'परीपूर्ण' वातावरणात वाढल्यानंतर, वडिलांनी कसे संगोपन केले ते डोळ्यासमेर असताना मुलांच्या गरजा ती खरच समजू शकली नाही का? आणि हे कुतूहल तिच्या बुध्दीमत्तेमुळे, संवेदनाशीलतेमुळे, सर्जनशीलतेमेळे जास्त तीव्र होतं. तू म्हणतेस तसा मुलांबरोबर संवादाचा पूल तिनं बांधण्याचा प्रयत्न केला होता का? उमीला ती गेल्यानंतर पुस्तक लिहावस वाटलं ही गोष्टही बरच काही सांगून जाते.
यात तिचे दोष शोधत नाही गं. पण आतून खूप वाईट वाटतं तिच्याबद्दल आणि तिच्या मुलांबद्दल. तू म्हणतेस तशी भावनिक फरफट झाली असणार तिची. पण मुलांनी अपेक्षा पूर्ण न करणं यात फक्त मुलांचा दोष होता का? मध्ये नेटवर उमीचा एक लेख वाचला होता. गौरी गेल्यावर एका वर्षाने तिनं लिहीला होता. साधं ड्रायव्हिंग लायसन्स मिळून ती अमेरिकेत गाडी चालवू लागली याबद्दल आईने केलेल्या कौतुकाचे तिला अप्रूप वाटले होते. तिचं "घर" म्हणजे "तिची आई" हे वाचल्यावर खरच गलबलून येतं. असो.. ती आवडती लेखिका होती म्हणून तिला जाणून घेण्याची इच्छा आहे.

>> स्वतंत्र विचारांचं हे एक देणं अशा तर्‍हेने चुकवायलाच कां लागावं बाईला?
बाईलाच असं नाही. 'सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके' असणार्‍या सर्वांचंच मला वाटतं हे अपरिहार्य भागधेय आहे.

अंजली, त्या लेखाची लिंक असेल तर दे ना.

गप्पांचं पान? असा ऑप्शन होता हेच लक्षात आलं नाही. आता बदलता येतं कां?

अंजली: घटस्फोटाचा निर्णय तिचाच होता ना? >>>> घटस्फोटाचा निर्णय असा कुणा एकटीचा नसतो. परिस्थितीचा असतो बहुतेकवेळा.

बाकीचं तुझं सगळं पटतय. गौरीबाबतीत एक व्यक्ती म्हणून आणि एक आई म्हणून असा दोन्ही बाजूंनी विचार करताना माझं पारडं कधी या बाजूने जास्त झुकतं कधी त्या. समतोल साधता येत नाही याचंच तर वाईट वाटतं Happy

तू म्हणतेस तसा मुलांबरोबर संवादाचा पूल तिनं बांधण्याचा प्रयत्न केला होता का? >>> 'दिलेस कां प्रेम तु कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे' आठवलं.

शर्मिला , खुप छान ओळख करुन दिलीस उर्मी ची, आणि तिच्या आईची.. (गौरी ला या चश्म्यातून कधी पाहिलच नाही)..
वाचलच पाहिजे हे पुस्तक

Pages