'A Pack Of Lies' - गौरीच्या मुलीचं पुस्तक

Submitted by शर्मिला फडके on 1 May, 2010 - 03:12

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.
उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेऊच शकले नाही. वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमधे गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही.
उर्मिलाचं हे पुस्तक फिक्शन म्हणून लिहिलेलं असलं तरी नि:संशयपणे त्यातली 'जिनी' ही स्वतःची गोष्टच सांगतेय.गौरीच्या 'मी' मधून जशी प्रत्येकवेळी स्वतः गौरीच डोकावत राहिली तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने नॅरेट केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतिचे संबंध उलगडत जातात. आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसती अस्वस्थ नाही मुळापासून हलून गेले.
गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशिलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देशविदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजुतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दलही सर्वांनी आस्थेने, कुतुहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले. मात्र उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका 'जिनी' जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरपट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षितता, कमकुवतपणातून भिरकावले गेले त्या सार्‍याला कळत नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे हे दाखवत रहाते तेव्हा आपली आत्तापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात.
या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण कॅरेक्टर गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकट्याने, कमी पैशांमधे वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्र्ग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकट्या बहिणीला घेउन आईचे नवर्‍यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वतःला सावरणे आणि नंतर मग स्वतःच व्यसनाधिन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे हे सारे वाचताना मला 'अरे.. हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला पण किती वेगळे रंग होते त्याला..' असं सतत वाटत राहिलं.
आईच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे रहाताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरिचे ते लाडके 'विंचुर्णीचे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले.
स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही. गौरीच्या 'चन्द्रिके ग सारिके ग' मधले आई मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर काय प्रतिक्रिया असावी हे मला नाही कळलं.
आईच्या शेवटच्या दिवसांमधे जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते, आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमधे आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे!
उर्मिला या पुस्तकात लिहिते," मी सुद्धा लिहू शकते हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते असे मनापासून वाटते. मात्र हेही तितकचं खरं की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलय ते सांगू शकले नसते."गौरीच्या 'एकेक पान गळावया' मधली राधा यावर काय म्हणाली असती हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला.

मुलांना वाढवताना आपण आपल्या मते खूप आदर्श संकल्पना बाळगल्या आहेत अशी खात्री असली आणि त्यावर आपण कितीही खुश असलो तरी हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातीला पूर्ण अनुमोदन. खूप नसल्या तरी थोड्याफार अपेक्षा होत्या या पुस्तकाकडून. शर्मिलाच सुंदर परिक्षण, मी वर टाकलेला उमीचा लेख खूप प्रामाणिक, आतून आल्यासारखा वाटला त्यामुळे, 'गौरीची मुलगी' - हा criteria नको लावायला पण तरीही मी लावलाच होता -. आई मुलीचं नातं हे गुंतागुंतीचंही असतं हे खरंच. त्यात गौरी आणि उमी ... दोघींचा दृष्टीकोन वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण जाणवला तो सूर 'मी अशी झाले नसते, जर आईनं नीट लक्ष दिलं असतं तर...' किंवा 'ज्या चुका मी केल्या त्याला सर्वस्वी मी जबाबदार नाही' असा काहिसा वाटला. निम्मं पुस्तक संपलं तरी ठोस काहीही हातात येत नाही. एकीकडे हे आत्मचरित्र नाही असं म्हटल्यामुळे मग कादंबरी फुलवायला थोडी लिबर्टी घेता आली असती, त्याचा फायदा झाला असता. Fiction or Non fiction हे नक्की ठरवता न आल्यामुळे लेखिकेचा गोंधळ झाला आहे असं वाटतं. त्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहून 'स्वतःची गोष्ट' म्हणून लिहीलं असतं तर - कादंबरी म्हणून तरी- पुस्तक चांगलं होऊ शकलं असतं.

लीला चंदावरकर चा चंदेरी दुनियेत वाचला असेल.. ते वाचताना नेहमी मला हेच वाटायचा कि तिच्या मुलांचे काय झाल असेल..

ोणालाच दोष देता येत नाही .. कारण एकदा तुम्ही प्रतिभे कडे वळायला लागले आणि एक स्त्री म्हणून स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य जगता .. तिथेच सगळ संपतं. (?????) . मुक्त विचार, वैयक्तिक स्वातंत्र्य वैवाहिक जीवनाच्या चौकटीतून राहून करणं फार कठीण असत.. ते सगळ्यांना जमेलच असेल नाही .. जेव्हा तुम्ही ते बंधनं तोडता त्याचे परिणाम भोगावेच लागतात ..कोणाला तरी .. (गौरीच्या बाबतीत बंध तोडल्या नाही गेले आणि वडिलांची बाजू भक्कम असेल म्हणून हि तिला इतका त्रास झाला नसेल)

पण हे भोगावेच लागतात असा का होता.. एका मुलीला आई मिळाली (तिला जशी पाहिजे तशी ) नाही असून सुद्धा .. कारण काही हि असो . हे कनेक्शन जेव्हा होत नाही खूप खूप त्रास होतो .. लहान मुल त्या वयात डोक्यात किडा घालून घेतो तर गुंता सुटायचा प्रश्नच येत नाही . मग उजळणी होत राहते.. असा भरकट लेला जीवन सावरायल बराच वेळ जातो .. एकदा सुजन झाल्यवर भले हि तुम्ही माफ करून द्याल पण नासलेल बालपण परत मिळत नाही .. हि खंत लागून राहते..

स्वतःच्या आयुष्यासाठी दुसर्याला दोषी ठरवू शकत नाही हि जाणीव खूप मोठं झाल्यवर येते.. आपण त्या वळणावर आल्यवर कळत कि घटस्फोटाचा निर्णय बरोबर असू हि शकतो.. ह्या भावनेतून मुक्त होण्यासाठी उर्मिला नि पुस्तक लिहिलं असावं अस जाणवतं

स्वाती Happy पुस्तक आवडले नाही याबद्दल आश्चर्य वाटले नाही. पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा या कशाहीपेक्षा मला या पुस्तकातून, त्यातल्या दोन ओळींच्या मधून जी गौरी दिसली तिच्यासंदर्भातच फक्त मी पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावर अस्वस्थ होत राहिले आणि मुख्यतः त्याबद्दलच खरं तर मला लिहायचं होतं जास्त. पण बहुतेक पुस्तकाबद्दल अवास्तव अपेक्षाच निर्माण झाल्या असाव्यात फक्त यातून. असं म्हणायला हवं कदाचित की तटस्थ परिक्षणापेक्षा हा एक वैयक्तिक पातळीवरचा अनुभव जास्त होता. माझं चुकलं. तसं लिहायला हवं होतं.
गौरी देशपांडे गेल्यावर तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी तिच्याबद्दल लिहिलेलं 'गौरी मनातली' पुस्तक वाचलं तेव्हा राहून राहून मनात यायचं की कशामुळे गौरीला दारुचं इतकं व्यसन लागलं आणि ते हाताबाहेर जात चाललय हे कळूनही कोणीच या सगळ्या जवळच्यांपैकी त्याला अटकाव का घातला नाही? असं कोणतं कौटुंबिक दु:ख किंवा नैराश्य गौरीच्या मनात होतं की एरव्ही इतकी स्वतंत्र, सेन्सिबल, बुद्धिमान असणारी ही बाई तिच्या मानसिकतेमधलं पुरुषी अवलंबन टाळूच शकली नाही आणि आपल्याला एकटेपणा झेपत नाहीये हे कळूनही जपान, कोरिया सारख्या तिला तिच्या आवडत्या साहित्यिक जगतापासून दूर फेकणार्‍या देशांमधे फिरत राहिली नवर्‍याच्या मागे? माझ्या मनातल्या या प्रश्नांचा सिक्वेन्स उर्मिलाच्या पुस्तकातून तुकड्या तुकड्यानी दिसत राहिलेल्या गौरीमधून बर्‍यापैकी पूर्ण होत गेला. पुस्तक त्या दृष्टीने मला नक्की अवडलं. प्रामाणिकपणाही आवडला पुस्तकातला. त्याचबरोबर मग गौरी आणि तिची मुलगी यांच्या मधल तुटकपणा, विसंवाद नक्की का, कशाकरता आणि त्यात एक आई म्हणून गौरीचा आणि एक मुलगी म्हणून उर्मिलाचा सहभाग यांचा विचारही पुस्तक वाचत असताना करत राहिले, धड काही संगत न लावला आल्याने अस्वस्थ झाले आणि मग त्यातून वरचा रिव्ह्यू लिहिला गेला.

...

शर्मिला फार प्रांजळपणे लिहीतेस. लेख तर आहेच पण ते वर लिहिलेलं उत्तरही.
मस्तच लिहीलंयस.
पुस्तक आवडेल की नाही माहित नाही. कारण तू म्हणालीस म्हणून वाटलं होतं आवडेल. पण नंतर स्वातीनं का आवडलं नाही हे व्यवस्थित स्पष्ट केलंय पण त्यामुळेच काही अपेक्षा न ठेवता वाचू शकेन कदाचित. म्हणूनही आवडू शकेल. (कन्फ्युज.कॉम Happy ) गौरीसाठी म्हणून असं नाही पण उमीचं एकूण लाईफ गौरीच्या कथेतल्या पात्रांशी साम्य सांगेल म्हणून तरी वाचणार.

संघमित्रा,
गौरीसाठी म्हणून असं नाही पण उमीचं एकूण लाईफ गौरीच्या कथेतल्या पात्रांशी साम्य सांगेल म्हणून तरी वाचणार.>>>> अपेक्षाभंग होईल. हे पुस्तक 'उमी'चं आहे, वाचणार असशील तर मग उमीसाठीच वाच. यात गौरी नाही दिसत ना तिच्या कथेतली पात्रं (निरगाठी सोडल्यास). परिस्थितीमुळे 'मी अशी वागले' असं काहिसं जाणवतं. असो... तू पुस्तक वाचल्यानंतर बोलू Happy

For any of you who are interested, my new book, Kashmir Blues was released in June. If any of you read A Pack of Lies, I'd be interested in knowing what you thought - Sharmila's piece on the book brought up a lot of comments, but they were all from people who had not read my book...

उमि, नविन पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी, वर स्वाती आंबोळे आणि अंजली ह्यांनी पुस्तक वाचूनच अभिप्राय दिले आहेत.

Pages