हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 23 April, 2010 - 01:23

भन्नाटच प्रकार होता ढाबा म्हणजे! दिवसातून सहा हक्काच्या बसेस थांबणार. त्यात एक एम्.पी. अन बाकीच्या महाराष्ट्रातील! या बसेसमधून एकंदर सरासरी २२५ पब्लिक उतरणार! त्यातल्या स्त्रिया साधारण ७५ पैकी पंचवीस सोडल्या तरी बाकीचे दिडशे, पावणे दोनशे लोकांमधे निदान सात हजाराची विक्री होणार! कारण या गाड्या सहसा जेवायला म्हणूनच थांबायच्या. सहा कंडक्टर, सहा ड्रायव्हर आणि एम्.पी. चा एक एक्स्ट्रॉ ड्रायव्हर धरून अकरा जण रोज जेवणार! या गाड्या इतर ढाब्यांवर जाऊ नयेत म्हणून या अकरा जणांना बिसलरी पाणी अन एक सरप्राईज डिश हे मिळणार! मुद्दाम समोरच्या बाजूला एक पंक्चरचे दुकान उभे करायला अब्दुलला सांगीतलेले होते.

या पंक्चरच्या दुकानामुळे एक वेगळाच फायदा होत होता. आजूबाजूच्या सात ते आठ किलोमीटर परिसरातील वाहनाने कुणालाही 'पंक्चर कुठे काढून मिळेल' असे विचारले की ते 'राम रहीम ढाबा' असे सांगायचे.

राम रहीम ढाबा! हा ढाबा त्या परीसरातील तीन ढाब्यांपैकी एक होता. तीनही ढाबे दोन दोन किलोमीटर अंतरांवर असल्यामुळे स्पर्धा फारशी होऊच शकत नव्हती. अब्दुलच्या पंक्चरच्या दुकानामुळे दिवसात तीनशे रुपयांची विक्री करणारे गिर्‍हाईक यायचे साधारणपणे! बाकी वेळ अब्दुल ढाब्यावर पडी़क असायचा.

या शिवाय नाशिक मालेगाव हा प्रवास स्वतःच्या वाहनाने करणारे अन पिंपळगाव (बसवंत) व शिरवाड (कुसुमाग्रजांचे) या गावांमधील काही असे लोक ज्यांना लांब जाऊन पार्टी करायची असायची, त्यातले काही राम रहीम ढाब्यावर यायचे. ती विक्री साधारण चार एक हजारांची व्हायची! कारण एक ग्रूप पार्टीला आला तरी दोन चिकन हंडी म्हणजेच पाचशे रुपये झाले. एकंदर दहा, बारा हजारांपैकी सगळा म्हणजे सगळा खर्च वजा केला तर किमान अडीच हजार रुपये मालकाला रोजचे सुटायचे. ही मिळकत अगदीच किरकोळ होती. पण हा ढाबाही सामान्यच होता. इतकंच, की ढाब्याच्या मागे बारा महिने वाहणारा एक ओढा होता अन त्याचे पाणी बर्‍यापैकी चांगले होते. त्यामुळे वापराच्या पाण्याचा प्रश्न नव्हता. एकंदर वेटर्स म्हणून चार अन आतला स्टाफ तीन, तसेच एक आपला उगाचच गुरखा, ज्याच्याकडे शिट्टी होती, असा आठ स्टाफ होता. हे सगळे लोक ढाब्याच्या मागे असलेल्या पाच खोल्यांमधे राहायचे. मालकाला एक खोली! त्या अक्राळविक्राळ भयंकर दिसणार्‍या उघड्याबंब माणसाला एक खोली, पद्याला एक खोली, बाकी वेटर्स अन गुरखा वगैरेंना दोन खोल्या! त्या अक्राळविक्राळ माणसाला एक स्वतंत्र खोली का होती कुणास ठाऊक!

एकाचीही फॅमिली तिथे नव्हती. ढाब्यावर दारू विकत मिळायची नाही. परवाना नव्हता. पण कुणी स्वतः आणली तर बाहेर गार्डनमधे, म्हणजे बसमधून उतरलेल्यांना काहीही त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या लोकांना बसता यायचे. त्यांचा धिंगाणा फार वाढला वगैरे तर पद्या किंवा मग स्वतः मालकच शांत बसण्याची विनंती करायचे. मात्र शिवीगाळ, मारामारी वगैरे झाली तर तो अक्राळविक्राळ माणूस नुसता येऊन तेथे उभा राहायचा. आपोआप सगळे शांत व्हायचे.

दहा, अकरा वर्षाचे असताना आपण काय करत होतो असा विचार केला तर अनेक गोष्टी आठवू शकतील. शाळेत जायचो. मित्र मैत्रिणी असायचे. अभ्यासाचा वैताग! मधूनच बाबांनी हॉटेलमधे वगैरे नेणे, वाढदिवसाच्या भेटी, खेळण्यात तासनतास घालवणे, परिक्षा, सुट्ट्या, गावाला काका मामांकडे वगैरे जाणे किंवा तेथली भावंडे येणे, भांडणे, रुसणे, कट्ट्या, हसणे, धडपडाट! हजारो गोष्टी!

दिपू मात्र एका पातेल्यातील रस्सा ढवळत होता.

हा त्याचा दुसरा दिवस ढाब्यावरचा! काल त्याला दोन चार ऑर्डर घेण्याचे काम सांगीतल्यावर मग तो छोटा आहे हे पाहून त्याला मागच्या एका खोलीत जाऊन झोपायला सांगीतले मालकांनी! पद्याने स्वतः येऊन त्याला कुठूनतरी एक चटई अन एक कांबळं दिलं! त्या खोलीत फॅन होता.

आणि ती न संपणारी रात्र! बाहेर नुसता आवाजच आवाज! आत दिपू एकटा बिचकून झोपायचा प्रयत्न करत असलेला! काय करत असेल मनीषाताई? स्वातीताई? आपल्याला शोधत असतील काका! आपण बावळटपणा केला. काय गरज होती त्या मोठ्या मुलाला मारायची? नक्की पकडणार आता आपल्याला.

बाहेर खुट्ट वाजलं तरी त्याला शंका यायची चौकशी करत करत कुणीतरी आपल्यापर्यंत पोचलेल दिसतंय! आवाज लांब जाईपर्यंत तो निरखून कानोसा घेत होता.

पण मुळात आपल्याला पळून जायची काय गरज होती? त्या मुलाने किंवा कुणीही पकडलं असतं तरी काका होते की काळजी घ्यायला? आपल्याला काही इतकं मारलं वगैरे नसतं! काय झालं असेल त्या मुलाला? मेला असेल? छे! असा कसा मरेल? आपण पाहिलं तेव्हा डोक दाबून खाली बसत होता.

हे कुठलं गाव आहे? आपण कुठे आहोत? काकू आत्ता रडत असतील. स्वाती ताई अन मनीषा ताईही रडत असतील. सगळे शोधत असतील आपल्याला.

पण आपली आई? ती काय करत असेल?

कसलं भारी जेवण होतं! पाण्याचीच चव जरा.... पण! रस्सा एकदम भारीच होता.

या लोकांची नजर नाही पाहून उद्याच्या उद्या सटकायला पाहिजे इथून! वडाळी भुईला जायचं! तेवढं बसवर लिहिलेल असतं! मुहरवाडी का लिहीत नाहीत काय माहिती! की?? मुहरवाडीची चौकशी करून तिथेच जाऊयात? पण पैसे? तिकीट कसं काढणार? कुणाकडे मागता येतील का?

छे! काय भयंकर माणूस आहे तो! अगडबंब! काळाकभिन्न! उंच, धिप्पाड, जाडच्या जाड! त्याच्याकडे बघावसंही वाटत नाही. कसला नुसता पातेलीच्या पातेली उचलतो. हा माणूस जर तुकारामकाकाच्या विरुद्ध गेला तर? कुस्तीच होईल. तुकारामकाका बोंबलत पळत सुटेल!

आपल्याला घेतलं कसं पण नोकरीवर? नुसतं ऑर्डर घेत फिरायचं? चांगलंय की? फक्त त्या माणसाशी बोलावे लागेल इतकेच! पण बाहेरूनच! आपण आपलं आपल्या खोलीत येऊन जेवायचं!

पण म्हणजे... आपण .. नोकरी करायची? काका काकू सांभाळायला असताना?

नाही. उद्या निघायचं! कसले आवाज करतात बाहेर? आपटतात नुसती पातेली. काय हसतायत, काय ओरडतायत? लोक यायचे थांबले वाटते.

बघायचं का? हळूच जाऊन? .... नको! कुणी पाहिलं तर आपल्याच नादाला लागायचे.

विचार करता करताच बैंगन मसालाची सुस्ती पसरायला लागली अन दिपू झोपून गेला. त्याला स्वतःला जाग आली तेव्हा इतकी मस्त झोप झाली होती की त्यालाच भीती वाटली. आपण झोपलेलो असताना कुणी येऊन आपल्याला पकडून नेलं असतं तर? किती वाजलेत कुणास ठाऊक?

खोलीच दार उघडं होतं! शेजारी कुठलीही गादी, पांघरुणं काहीच नव्हतं! हे काय? आपण एकटेच होतो खोलीत? मग इतकी मोठी खोली आहे कशाला? कसले आवाज येतायत बाहेर???

बाहेरचे दृष्य पाहून मात्र अंगावर सर्रकन काटा आला. तो अक्राळविक्राळ माणूस सरळ एका हातात एका कोंबडीची मान धरून दुसर्‍या हाताने सुरी फिरवत होता. बाजूला दोन कोंबड्या आधीच मरून पडल्या होत्या. दोन जिवंत कोंबड्या दुसर्‍या बाजूला एका बास्केटमधे होत्या अन समोर दिसणारे दृष्य पाहून त्या भीतीने थिजलेल्या दिसत होत्या. दोन मांजरे अन दोन कुत्री त्या मेलेल्या कोंबड्यांच्या जवळ यायचा प्रयत्न करत होती. पण तो माणूस नुसता तोंडानेच असे 'हाड' म्हणत होता की त्या कुत्र्याची अन मांजराची जवळ जायची हिंमतच होत नव्हती. काही कावळे तेथे उगीचच घिरट्या घालत होते. मरत असलेली कोंबडी नरड्यातून केविलवाणे आवाज काढत होती.

कालच्या मुलांपैकी एक मुलगा पंचा गुंडाळून भांग पाडत होता. त्याची आंघोळ झालेली असावी. दुसरा एक मुलगा दात घासत होता. रेडिओवर कुठलेतरी टुकार गाणे लागले होते. मालक आपल्या खोलीतून बाहेर येऊन वर आभाळाकडे पाहून हात जोडून काहीतरी पुटपुटत होता. बहुतेक त्याचीही आंघोळ झालेली असावी अन तो सूर्याची प्रार्थना करत असावा.

काल रात्री काही कळलेच नाही? किती घाणेरडी जागा आहे ही ढाब्याच्या मागची? उघडं गटार काय, कुत्री मांजरी काय, कावळे काय, उंदीर काय! हा माणूस कोंबडी काय मारतोय अन तिची पिसं इकडे तिकडे पडलीयत!

चिकन असं करतात? अशीकोंबडी मारून? बाप रे! हा राक्षस असावा.

तेवढ्यात मालकाने दिपूकडे पाहिलं! मालकाने अचानक कुणालातरी हाक मारली.

'चाची, ये पोरगं उठ्या.... इसको धोनेको ले जा'

भिंतीपलीकडून एक काळीकुट्ट, जाडजुड बाई उगवली. तिच्या चेहर्‍यावर 'हा कोण किडा' असे भाव होते.

झरीना चाची! पन्नाशीचे एक दणदणीत, खणखणीत व्यक्तींमत्व!

ती फक्त सकाळी दोन तास यायची! या सगळ्या स्टाफचे कपडे धुणे, यांची जेवणाची कालची भांडी घासणे अन खोल्या झाडून घेणे वगैरे!

जवळपासच्याच एका वस्तीत राहणारी होती. तिचा एक वेगळाच फायदा मालकाला व्हायचा. ढाब्यावर येणार्‍यांपैकी काहींना तितर आवडायचे. तितर पकडणे तितके सोपे नव्हते. पण झरीनाचाचीचा मुलगा लीलया तितर पकडायचा. ढाब्यावर रोज दोन, तीन तितर तरी सर्व्ह व्हायचे. पाटीच लावली होती, ससा व तितरही मिळेल! आणि झरीनाचाचीला तितर विकण्याचे पैसे मिळायचे.

पण पैसे देऊनही आपल्याला हवे तेव्हा तितर मिळू शकणार नाही याची रास्त जाणीव मालकाला असल्यामुळे तो झरीनाचाचीला जरा जपून वागवायचा. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की भलेभले घाबरायचे.

यही है क्या रे वो ब्याद?

झरीनाचाचीचा आवाज ऐकूनच दिपू घाबरला. बहुधा ही बाई आपल्याला उगाचच पिटणार असावी. तो मागे सरकला.

चाची - चल बेटा.. न्हाले

तिने एका ढांगेत त्याचे बखोट पकडले अन त्याला काही समजायच्या आत जवळचा एक टॉवेल हातात घेऊन त्याला ओढत नेऊ लागली. ही अशी स्वागतपूर्ण आंघोळ दिपूने यापुर्वी कधीच केलेली नव्हती. त्यातही, एका बाईसमोर? आणि तेही तीच ओढत नेतीय? तो रडवेला होऊन 'मै नई नहायेगा' म्हणाला पण चाचीचे लक्षच नव्हते.

मरत असलेल्या कोंबड्याची धडपड आणि आपली धडपड फार वेगळी नाही हे त्याही परिस्थितीत दिपूला जाणवले. तो फक्त घाबरून खेचल्यासारखा तिच्यामागे धावू लागला. बहुधा मालकाने 'नवा मुलगा आलाय' असे तिला आधीच सांगीतले असावे अन त्यांचा काहीतरी प्लॅन आधीच झाला असावा.

पाच सात मिनिटे झाली तरी दोघे आपले चालतच होते. जायचंय कुठे? हवा भलतीच गार झाली होती. कसला तरी आवाज येऊ लागला होता.

चाची तोंडाने कुणालातरी शिव्या देत होती अन एका हाताने त्याला खेचत होती. जणू दिपू म्हणजे एक चाकं असलेली बॅग होती जी घाईघाईत गाडीत टाकायची होती.

आणि....

आहा! एका वळणावर चाची अचानक वळली अन समोरचे दृष्य पाहून दिपूला काय करावे हेच समजेना!

केवढा सुंदर ओढा! किती पाणी! किती छान पाणी! इथे?? की नदी आहे ही एखादी?

आता चाचीचे ओढणे त्याला ओढणे वाटेनासेच झाले. तो स्वतःच पावले उचलू लागला.

चाचीने त्याला ओढ्याच्या काठापाशी आणून एका मोठ्या दगडावर बसवले. टॉवेल काठावर ठेवला. एक लोटा तिच्या हातात होता. त्याच्यातच एक साबणाची वडी होती.

चाची - कपडे निकाल
दिपू - क्या करनेका?
चाची - नंगा नाचनेका है तेरेको! समझता नय? न्हानेका तुने...
दिपू - मै नहालेगा.. तुम जाओ
चाची - बडा धरमिंदर है क्या? उतार शर्ट

शर्ट उतार असे म्हणपर्यंत चाचीने त्याची हाफपँट खाली खेचलीही होती. आता चड्डीच खाली गेल्यावर शर्ट काढला काय अन नाही काढला काय! दिपूचा विरोध संपला.

चाची - ये ओढा है.. इसलिये पहिली बारको मै आयी... कलसे नही आयेंगी.. ये देख.. ये पत्थरसे हिलनेका नही... हिलेगा तो डूबके मरेगा... समझा??? .... ये तपेला ऐसे पानी लेके उलटा कर... साबून लगा... और कमसे कम आधा घंटा न्हा यांपर.. उठनेका नय... क्या??? मै इधरच है.. देखरहेली है तेरेको.. कैसे न्हाता है... चल न्हा...

राम तेरी मधे मंदाकिनीला वाटली नसेल इतकी दिपूला लाज वाटत होती. एक तर अंगावर चिंधी नाही. त्यात ही बाई! अन त्यात ही एखादा पिक्चर बघावा तशी एकाग्रचित्ताने आपल्याकडे बघतीय! काय आवश्यक आहे अशी आंघोळ? इथून एक बादली भरून ढाब्यावरच्या बाथरूममधे आंघोळ नाही का करता येणार? पण आपल्या अंगात नाही ताकद! आपण आहोत अकरा वर्षाचे! ठरवले तर ही बाई बुचकळून काढेल आपल्याला या ओढ्यात!

आणि त्याने पहिला तांब्या घेतला आणि तो सगळंच विसरला. चाची बसलीय, आपण निसर्गावस्थेत आहोत, हा एक ढाबा असून आपण इथे उगीचच पोचलो आहोत, आपल्याला पळून जायचं आहे.... सगळं!

पाण्याचा स्पर्शच असा होता की प्रथमच त्याला जाणवले की खोल्यांमधल्या खुराड्यातल्या मोरीत कसेबसे दोन तांबे घेणे अन या ओढ्यावर आंघोळ करणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.

थंड! पण थंड असूनही कसा काय न जाणे, उबदारही! झुळझुळीत!

किमान अर्धा तास ही चाचीची अट कधीच संपली होती. दहा मिनिटांनतर चाची स्वतःच बाहेर ये बाहेर ये म्हणून कंटाळून उठून गेली होती अन तिने एका पोराला तिथे लक्ष ठेवायला पाठवलं होतं! त्या ढाब्यावरच्या मुलाला हे नवीन नव्हतं! ते स्वतःही वेळ घालवता येतोय म्हणून निवांत दिपूकडे बघत बसलं होतं! आणि दिपूचं सुपरव्हायझर बदलला आहे याकडे लक्षच नव्हतं!

बर्‍याच वेळने दिपू बाहेर आला. तेव्हा तो पद्या का कोण तो आंघोळीला आला होता. दिपूला वाटलं हा तर आलाच आहे, तो दुसरा राक्षस कसाई यायच्या आत इथून सुटावं!

दिपू पळत खोलीत गेला. तिथे त्याला मालकाने एक दुसरी जुनी चड्डी अन एक टीशर्ट दिला. दिपूने आरशात पाहिले. तेवढ्यात मालक त्याला म्हणाला...

बेटा, चल... नाश्ता करले....

काय शब्द होते ते! दिपूला पळून जाण्याच्या स्वतःच्या विचारांची लाज वाटली. आपल्याला आंघोळ घालतायत, कपडे देतायत, पंखा असलेल्या खोलीत झोपवतायत, हवा तितका वेळ पाण्यात खेळू देतायत, कालही जेवायला दिलं अन आजही देतायत... मग आपल्याला इथून.. जायचं कशासाठी आहे?

किती निरागस प्रश्न होता हा! इतक्याश्या वयातही आईपासून ताटातूट झाल्यानंतर कांबळेंकडे कितीही माया मिळूनही ते मनात राहिलेच होते की प्रेमाने का होईना.. पण आपल्याला इथे 'ठेवले' आहे. उद्या कदाचित नाहीत ठेवणारही! हे काही आपले घर नाही. आणि.. जे आपले घर वाटायचे तेही आपले घर नाही. म्हणजे.. आपल्याला घर नाही आहे. तो अक्राळविक्राळ राक्षस हा एकच तर प्रॉब्लेम आहे इथे! त्यचे नंतर बघता येईल! पण इथे न राहण्याचं कारण काय आहे? मनीषाताईची आठवण येतीय... जाऊच... शेवटी तेच आपलं घर!

इतकी उलटसुलट मते विजेसारखी चमकून जात होती मनात!

नाश्ता करायला सगळे एकाच ठिकाणी जमले होते. भटारखान्यात! पुन्हा तेथे जाताना दिपूला तो वास असह्य झाला. सगळे गोल करून बसले होते. पद्या खटाखट ऑम्लेट्स टाकत होता. एकेकाच्या पानात एकेक पडत होते. पोळीबरोबर सगळे ऑम्लेट्स खात होते.

आणि तो राक्षस तंद्री लागल्यासारखा पानात दिसेल ते खात होता. एकदा तर त्याने नुसती चटणीच तोंडात टाकली. लहान बाळांना बुवांची वगैरे भीती वाटते तशी दिपूला इतका मोठा असूनही त्याची भीती बसली होती. आजूबाजूचं सगळं विसरून दिपू टक लावून त्याच्याकडे बघत होता.

आणि बाकीचे दिपूकडे!

अचानक मालकाने विचारले

तुझे नाव काय बेटा???

मालक दिपूकडे बघत असताना त्या राक्षसाने मालकाची ताटली हळूच उचलून स्वतःची रिकामी ताटली तिथे ठेवली अन मालकाच्या ताटलीतले ऑम्लेट खाऊ लागला. हे दिपूने पाहिले होते तसे आणखीन एकदोघांनी पाहिले होते. ते हसू लागले. दिपूला वाटले आपल्याला हसतायत.

दिपक अण्णु वाठारे

शादी हुई तेरी????

संपूर्ण ग्रूप खदाखदा हसत होता. हा प्रश्न त्या राक्षसाने विचारला होता.

मालक - ये क्या? तुने मेरी थाली उठाली?
राक्षस - तुम उससे बात कररहे थे... खानेपे अन्याय नय करनेका...

सगळे हसत होते, पद्यासकट!

मालक - थाली भी खायेगा क्या?
राक्षस - यहाँके रोटीसे तो आरामात टूटेगी...
मालक - बनाता कौन है रोटी??
राक्षस - तंदूर किसने लाया....

मालक उठला. बाकीचे हसत होते. मालक अजिबात हसत नव्हता. दिपूला काहीच समजत नव्हते. आता या दोघांमधे जुंपणार हे नक्की वाटत होते त्याला. मालकाने उठून पद्या करत असलेलं एक ऑम्लेट सरळ दुसर्‍या एका ताटलीत घेतलं अन खायला बसला.

मालक - ये तेरा मुहरवाडी कहाँ पे है?

हा मालकाचा प्रश्न दिपूला उद्देशून होता. पण राक्षस मधेच बोलला.

राक्षस - वही है...
मालक - कहा पे?
राक्षस - जहापे है वहा... गाव ऐसा भागता नही किधर... ए आम्लेट दे रे...

झरीनाचाचीसुद्धा भांडी घासताना हसत होती. दिपूला मालक चिडल्यासारखे वाटले. ते उठून गेले.

आता दिपूपुढे एक पोळी अन ऑम्लेट ठेवण्यात आले.

पद्या - चपाती और खायेगा क्या?
राक्षस - हां! चार!
पद्या - आपसे नय... बच्चेसे पुछरहा मै..
राक्षस - मै किधर तेरेको बतारहेला है?? मै कहरहा चार आम्लेट चाहिये और...

हा राक्षस अजिबात हसत नव्हता. मालकही अजिबात न हसताच निघून गेले होते. फक्त झरीनाचाची अन बाकीची सगळी मुले खो खो हसत होती.

दिपूची सुरुवातीची भीती किंचित कमी झाली होती. मगाशी कोंबडी मरताना पाहिल्यामुळे तो ऑम्लेट कमी अन पोळी जास्त खात होता. टक लावून राक्षसाकडे बघत बघत घास तोंडात ढकलत होता.

राक्षस - चाय...
पद्या - इतनाही? और् नही लेंगे आम्लेट?
राक्षस - मै? मै आम्लेट नय खाता
पद्या - तो अबीतक क्या खा रहे थे??
राक्षस - मुझे लगा तू कलकी रोटी तेल मे डुबोके गरम करके दे रहा था...

आता दिपूलाही हसू आले.

हा राक्षस विचित्रच वाटत होता. भयानक खात होता अन हसवत होता. स्वतः मात्र गंभीर!

आणि तासाभराने उलगडा झाला. विकी नावाच्या एका पंधरा वर्षाच्या मुलाने दिपूला कहाणी सांगीतली.

मालकाचं नाव गणपत आहे. त्या राक्षसाच नाव अबूबकर! त्याला अबू म्हणायचे! पण अबू अन गणपत हे जिवश्च कंठश्च मित्र होते. मालेगावमधील एका दंगलीत अबूबकरने गणपतची फॅमिली स्वतःच्या घरात लपवून वाचवली होती. नंतर असल्या गावात राहायलाच नको म्हणून दोघे नाशिकला शिफ्ट झाले होते. अबूबकरच्या घरी फक्त त्याची म्हातारी आई अन एक लहान भाऊ जमीर होता. गणपतच्या घरी बायको अन एक मुलगा, साधारण तेरा चौदा वर्षांचा! अमित!

मालेगावला असतानाच त्यांनी आपापली हॉटेल्स चालवली होती. गणपतचं साई स्नॅक्स सेंटर अन अबूबकरचं बिर्याणी हाऊस! मात्र लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे नाशिकला गेल्यावर त्यांनी ढाब्यासाठी योग्य अशी जागा शोधली. वडाळी भुई पासून अर्ध्या पाऊण तासावर एक चांगली जागा होती. ओढा होता. गार्डन करायला भरपूर जागा होती. पाणी होते. लाईट अर्थातच पोचलले होते. जवळचे अगदीच लहानसे गाव तीन किलोमीटरवर अन मोठे गाव म्हणजे पिंपळगाव (बसवंत) किंवा शिरवाड दोन्ही वीस पंचवीस मिनिटांवर! या रस्त्याला बर्‍यापैकी वाहतूकही होती अन एस्.टी च्या एकंदर बावीस गाड्या इथून जायच्या.

अबूबकरची नॉनव्हेजमधे खासियत होती. गणपतकडे व्यवस्थापनाचे कौशल्य चांगले होते. कर्जबिर्ज काढून पाच वर्षांपुर्वी भागीदारीत हा ढाबा उभा राहिला. अक्षरशः तीन वर्षांमधे कर्ज फिटलंही! एस्.टी. वाल्यांपैकी चार, पाच जणांना टेस्ट आवडली. माऊथ टू माऊथ पब्लिसिटी झाली. तीन गाड्या थांबायच्या त्या सहा गाड्या थांबायला लागल्या. आजूबाजूच्या गावांमधे जाहिरात झाली. सुखा चिकन, चिकन फ्राय आणि मटन मुघलाई या डिशेस लोकांमधे गाजल्या. थंडगार वारा, बसायला प्रशस्त जागा, आवडते मित्र, एखादी बाटली, चिकन किंवा मटन हंडी! पब्लिक आता पार्टीला खास लांबून यायला लागलं! त्यातच आणखीन दोन ढाबे उभे राहिले. आधी गणपत अन अबूला जरा काळजी वाटली. पण ते ढाबेही चांगले असूनही सगळ्यांनाच गिर्‍हाईक मिळायला लागले. याचे कारण ते दोन्ही ढाबे एकेका गावाला बरेच जवळ असल्यामुळे गावातील लोक रात्री जेवायला तिथे जास्त यायचे. आणि नुकतेच गाव सोडून हायवेला लागलेले ड्रायव्हर्स राम रहीम ढाब्यावर थांबणे पसंत करायचे.

गणपत आणि अबू दोघेही साधारण पंचेचाळीस वर्षांचे होते. कोणतीही जाहिरात न देता सगळा स्टाफ जमा झाला होता. सुरुवातीला स्वतः गणपत गिर्‍हाईक बघायचा. मग पद्या हा एक गावाकडचा मुलगा आणला. त्याने विकीला आणलं अन पाठोपाठ बाळ्या आला. पद्या असेल पंचविशीचा! विकी अन बाळ्या साधारण पंधरा सोळा वर्षांचे होते. दादू, समीर अन झिल्या हे तिघे ढाबा तीन वर्षाचा झाल्यावर पिंपळगाव (बसवंत) येथून आयात करण्यात आले. तरी ते कधी गावाला जायचेच नाहीत. तेही चवदा ते सोळा या वयोगटातलेच होते.

रमण हा गुरखा उगाचच शायनिंग मारायला ठेवला होता. रात्रभर ढाबा जागाच असल्यावर चोर येणार कधी? आणि आले तरी चोरणार काय? पातेली? की चिकन? पण रमणच्या अंगावर हिरवा युनिफॉर्म, एक शिट्टी वगैरे होतं! तो आपला एखादी गाडी किंवा बस आली की शिट्टी मारत धावायचा अन हात हलवत येऊदे येऊदे करायचा. पण उगाचच असलेल्या रमणवरही सगळ्यांचे प्रेम होते. रमणही असेल साधारण पन्नाशीचा!

पहाटे तीन ते दुसर्‍या दिवशी पहाटे तीन असे ढाब्याचे टायमिंग होते. म्हणजे थोडक्यात चोवीस तास! त्यात सकाळपासून रात्री सात पर्यंत तीन मुले बाहेर अन दोन आत लागायची. त्यावेळेस एक बाहेरचा मुलगा अन एक आतला हे झोपायचे किंवा इतर काहीतरी करायचे. शिफ्ट्स ठरवून ठेवलेल्या असायच्या. ढाब्याला सुट्टी नव्हती. गणपत मध्यरात्री दोनला झोपायचा अन सकाळी साडे सहाला उठायचा. दुपारी परत तो तासभर झोप काढायचा.

मात्र राक्षस कधी झोपायचा हे अजून काही मुलांना माहीतच नव्हते. पद्या म्हणायचा की तो पहाटे तीनला झोपतो अन साडे पाचला उठतो अन दुपारी चार ते साडे सहा असा पुन्हा झोपतो. पण धुलिया गाडी चालू झाल्यापासून तर तो दुपारच झोपलेला कुणी पाहिलाच नव्हता.

पोलिस, स्थानिक नेते यांना खुष ठेवणे, संपूर्ण पर्चेस, बँक व्यवहार, सगळ्यांचे पगार, एस्.टी. त काही लोकांना पर्सनली भेटून जास्तीतजास्त गाड्या ढाब्यावर थांबायची विनंती करणे ही कामे गणपतकडे होती. गणपतला सगळेच ढाब्याचा प्रमुख समजायचे. तो होताच प्रमुख. पण सगळ्यांना मनात हेही माहीत होते की गणपत स्वतःच अबूबकरला फार महत्वाचा समजतो. अगदी त्याच्याहीपेक्षा! कारण अबूच्या हाताची चव आणि त्याचा वावर! दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेम होते. लहानपणापासूनचे जिगरी दोस्त होते दोघेही.

आलेल्या मालातून किमान पस्तीस प्रकारचे विविध पदार्थ बनवणे, संपूर्ण भटारखाना एकट्याने सांभाळणे, कोंबड्या मारणे अन आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या जीभेला पुर्ण संतुष्ट करत असतानाच ढाब्यावर सतत हास्याची बरसात चालू ठेवणे ही कामे अबू करायचा. तो बाहेर बघायचाच नाही. बाहेरच्या ऑर्डर्स वगैरे सुरुवातीला गणपत बघायचा. पद्या आल्यावर गणपत गल्ल्यावर बसू लागला. मग विकी, बाळ्या वगैरे आल्यावर पद्या कॅप्टन झाला. क्वचित कधी गणपत कामानिमित्त नसला तर गल्ल्यावर पद्या बसायचा. आणि मग झिल्या कॅप्टन व्हायचा. पण अबू मात्र भटारखान्याच्या दोन बाय दोन च्या काळ्याकुट्ट खिडकीतून आपले तोंड सतत दाखवत आतच बसायचा.

रोलिंग पद्धतीने त्यांची कामे चालायची. आज हा आत, तर आठवड्याने तो बाहेर्च्या ऑर्डर्स घेणार! कुणाचीही काहीही तक्रार नाही. त्याला कमी काम आहे, मला जास्त असा आरोप नाही. हेवेदावे नाहीत. सगळ्यांनी गणपतचे ऐकायचे. तो म्हणेल त्या दिशेला जायचे. तो नसला तर पद्या सांगेल तसे वागायचे.

मात्र, बर्‍याचदा वेळ अशी यायची की पद्याच काय, गणपत स्वतःच अबूबकर सांगेल तसा वागायचा.

राक्षस! अबूबकरसाठी हे नाव जरा कमीच होते. पावणे सहा फूटाच्या किंचित वर, सावळा, प्रचंड देह, मिशा कानापर्यंत पोचलेल्या, मनगट म्हणजे लाकडी खांब वाटावा असं!

पण.. अबूबकर ही ढाब्याची जान होती.
अबू आहे म्हंटल्यावर नुसते हसणे हे समीकरण इतके ठरलेले होते की थांबणार्‍या एस्.टी.चे स्टाफही मुद्दाम भटारखान्याच्या खिडकीजवळ जेवायला बसायचे. त्याची नुसती बडबड ऐकूनच थकवा जायचा.

राक्षस होता खरा, पण विनोदी राक्षस होता.

आणि तो कुणाचीही काहीही थट्टा करायचा. गणपत तर त्याचे टारगेटच होते. त्याने गणपतची सर्वांसमक्ष थट्टा केली नसेल असा एक तास जायचा नाही. इतर पोरे तर वाटच बघत असायची आता हा काय बोलणार याची! आश्चर्य म्हणजे गणपत अवाक्षर बोलायचा नाही. हसायचा नाही, पण चिडायचाही नाही. अबू ग्राहकांची, स्टाफची सगळ्यांची थट्टा करायचा.

रामरहीम ढाबा वजा अबूबकर म्हणजे शुन्य होते.

अन त्यात दिपूला आणखीन एक मौलिक माहिती मिळाली.

दोन वर्षांपासून गणपत अन अबूमधे सगळ्यांदेखत पैज लागलेली आहे. अबूच्या जोकवर ज्या दिवशी गणपत हसेल त्या महिन्यापासून गणपतने सगळ्यांचा पगार पंचवीस टक्के वाढवायचा.

अक्षरश: अबूने जोक टाकला की सगळे गणपतकडे निरखून बघायचे. त्याचा ओठही वाकडा व्हायचा नाही. अजब संयमाने तो जणू कीर्तन ऐकत आहोत किंवा अल्जीब्राचा तास आहे तसा इकडे तिकडे बघायचा. अख्खा ढाबा खदाखदा हसत असेल तरी गणपत गंभीर! आणि हळूहळू ही वार्ता एस्.टी.चे लोक अन काही नेहमीचे ग्राहक यांच्यातही पसरली होती. आत्ता मुद्दाम ते अबूच्या जोकवर जोरात हसायचे अन गणपतकडे बघायचे. अगदी सुतकी कळा नसली तरी गणपत फारच गंभीर चेहरा करून बसलेला असायचा.

पद्या कॅप्टन असल्याने अन सतत बाहेर असल्याने तो गणपतकडे कायम लक्ष द्यायचा. जरा जरी ओठ हसरा झाला तरी मला सांग असे अबूने त्याला सांगून ठेवले होते.

पण छे! अबूच्या जोकवर हसायचे नाही याची गणपत इतकी काळजी घ्यायचा की तो हसणेच विसरून गेला होता. काहीही झाले तरी तो हसायचा नाही.

याचा अर्थ तो गंभीर झाला असा नव्हता. तो गाणी ऐकायचा, सगळ्यांना प्रेमाने वागवायचा! फक्त हसायचा नाही. खरे तर दोन वर्षात सगळ्यांचे पगार दहा दहा टक्क्याने आधीच वीस टक्क्याहून जास्त वाढलेही होते. पण तत्व म्हणजे तत्व! गणपत हसणार नाही!

पद्या, विकी, बाळ्या, दादू, समीर अन झिल्या! एक पोरगं घरी जायचं नाही. महिनोनमहिने! ढाबा म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग झाला होता. नुसती धमाल! गणपत अन अबूच अकाउंट एकच होत. गणपत अर्धे अर्धे पैसे काढून नाशिकला जाऊन आपल्या अन अबूच्या कुटुंबाला देऊन यायचा. महिन्यातून एकदा! गणपतची बायको अन मुलगा महिन्यातून दोन वेळा ढाब्यावर येऊन जायचे. तेवढीच भेट! अबूने तर बाप मेल्यापासून घरी फक्त एक चक्कर टाकली होती. आई सावत्र होती अन धाकटा भाऊ हा तिचा सख्खा मुलगा होता. जमीर, त्याचा धाकटा भाऊ! खूप अंतर होतं! जमीर असेल पंचवीस वर्षांचा! अबू पंचेचाळीस आणि आई पंचावन्न! जमीरशी फारसे पटायचे नाही. पण अबू आपल्या पैशातील काही भाग मात्र कुटुंबासाठी जबाबदारी समजून द्यायचा. हे काम गणपतच करायचा कारण अकाउंटवर दोघांच्याही सह्या चालत असल्या तरी अबूला बँकेत जायल वेळच नसायचा.

हळुह़ऊ अबूने आपल्या कामात पद्या अन झिल्या यांना बर्‍यापैकी तयार केले होते. पण गणपत बाहेर गेला की पद्या गल्ल्यावर आणि झिल्या कॅप्टन म्हंटल्यावर अबूवर आत ताण यायचा कारण विकी अन दादू नवशिके पडायचे.

एक मात्र होतं! गणपतला सगळे चाचा म्हणायचे, एक अबू सोडून, कारण तो गणू म्हणायचा! आणि अबूने सांगून ठेवले होते की त्याला स्वतःला कुणीही चाचा म्हणायचे नाही. फक्त अबू म्हणायचे! पण मुलांना डोकं होतं! जरी गणपतला चाचा अन अबूला अबू म्हणत असली तरी अबूशी बोलताना 'तुम, तुम' करायची नाहीत. त्याचा उल्लेख कायम 'आप' असाच व्हायचा. अबूबद्दल नितांत आदर होता सगळ्यांना!

आता दिपूला समजलं! त्या राक्षसाला वेगळी खोली का आहे ते!

सकाळी नऊ वाजता गणपतने सगळ्यांना भटारखान्यात पुन्हा बोलावले. तो बोलू लागला.

गणपतचाचा - देखो. ये बच्चा कलसे आया है! इसका नाम दिपक अण्णू वाठारे करके है! इसको दिप्या बोलनेका! क्या? ये यही रहेगा! ये छोटा है अभी! इसको कामपे नही लगानेका है! दो तीन सालके बाद काम शुरू करेगा ये! तबतक इसको सबकुछ सिखानेका! अबू, तुम्हारे पास रहेगा ये पोरग्या! इसको सिखाओ! और इसको किसिने कुछ बोलनेका नही! ये नया भी है और छोटा भी है! मा बापने हकालेला है फालतूमे! अब इसका मा और बाप दोनो अबू है और मै भी है! तुम सब इसके बडे भाई है! इसके साथ टाईम मिलेगा तब तब खेलनेका! इसको जो चाहिये वो खानेको देनेका! ना नय करनेका! दादू, तेरे साथमे रहेगा ये कमरेमे! रमणको बोल, आजसे इधर सोयेगा वो! ये बच्चा अंदर सोयेगा!

अब सब मिलके प्यारसे अपनी कोई भी चीज इसको गिफ्ट करके देदो! अपना रिवाज है ना? इसको अपनापन महसूस होनेको होना.. क्या? पद्या?? क्या देरहा तू..??

दीपक बघतच बसला होता.

पद्याने हळूच डोक्यावरची टोपी काढली अन जवळ येऊन दिप्याच्या डोक्यावर ठेवली. सिनिऑरिटीप्रमाणे मग एक एक जण यायला लागला.

विकीने जवळचे एक छोटे बॉलपेन लावले दिपूच्या खिशाला. बाळ्याने त्याच्याकडे एक स्वामी समर्थांचा पाकीटात मावेल इतका छोटा फोटो होता तो दिप्याच्या खिशात ठेवला. दीपक हरखला होता.

मग दादू आला. 'आजसे मेरे साथमे रहेगा हां? मै और तू भाई है' असे म्हणत खिशातून एक मळकट रुमाल काढून दिप्याच्या गळ्यावर ठेवला. समीरने एक च्युइंगगम त्याच्या खिशात राहिले होते ते दिप्याला दिले. दिपक बावळटासारखा पण मनापासून हसत होता. शेवटी झिल्या आला. त्याने कंगवा दिला.

चाचा - हां! बहोत अच्छा! अब ये दिप्याके लिये तालिया...

सगळ्यांनी स्वागत म्हणून टाळ्या वाजवल्यावर दीपक खराखुरा लाजला.

झरीनाचाची तशी गरीब होती. तिने दिले काही नसले तरी जे दिले ते अमोज होते. तिने नुकतेच ऐकले होते की दिप्याला आई वडिलांनी हाकलले आहे. तिने नुसतेच उठून त्याला जवळ घेतले व त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

एक विशिष्ट चेहरा अन एक विशिष्ट शरीर म्हणजेच आई का? आई तर कोणत्याही रुपात भेटतेच की?

दिप्याला त्यादिवशी झालेला हा खूप महत्वाचा साक्षात्कार होता.

झरीनाचाचीला बिलगताना तिचा स्पर्श त्याला त्याची सावत्र आई, कांबळे काकू, स्वाती ताई अन मनीषाताईची आठवण करून गेला. इतकंच काय, कसं का होईना पण खायला तरी द्यायची म्हणून विशालची आईही त्याला आठवली.

एवढ्याश्या कोमल मनात प्रचंड उलथापालथी झाल्या. सगळ्या बायका अशा आईसारख्याच कशा असतात? आणि तशा असतात तर मग.... आपल्याला... आईची आठवण यायला हवीच असे ... असे कुठे काय आहे??

मग अबूबकर जवळ आला. त्याने खिशातून पन्नास रुपये काढून दिप्याला दिले. दिप्याला त्याक्षणी काय वाटले अन कसे वाटले माहीत नाही. मागे एकदा कुणीतरी म्हातार्‍या नातेवाईक बाईने पैसे हातावर ठेवल्यावर दिपूच्या आईने त्यांना नमस्कार केला होता. हे त्याला आत्ता आठवले. दीपक क्षणार्धात अबूच्या पाया पडला. अबूने त्याला उठवले व त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

हाही स्पर्श तसाच? हा तर पुरुष आहे? त्यात पुन्हा... राक्षस आहे.. याचाही स्पर्श झरीनाचाची... की.. काकू किंवा मग.. आपल्याच आईसारखा... असे कसे??

प्रेम! शुद्ध प्रेम असले की कोणताही स्पर्श आईच्या स्पर्शाच्या पातळीवर जाऊन पोचतो.

राम-रहीम ढाब्यात आल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी शिकलेला पहिला नियम दीपक अण्णू वाठारेने मनात कोरून ठेवला.

पळून जायचं होतं ना आपण? ... मग?? मग यांच प्रेम कशाला घेत बसलो?? की... पळून वगैरे.. आता... जायचच नाहीये... असं तर....

गणपतचाचा पुढे झाला. दिपू बघत होता.

गणपतचाचानेही त्याला पैसे दिले. दिप्या त्याच्याही पाया पडला.

सगळे आपापल्या खोली गेले. दिप्या दादूबरोबर कॉमन रूममधे आला व एका कोपर्‍यात बसून राहिला. बराच वेळ तो तसाच बसला होता. बाहेर आता आवाज वाढू लागले. होते. दिप्याकडे बघायला आता कुणालाही वेळ नव्हता. दादू केव्हाच बाहेर गेला होता. एक दोन गाड्या थांबल्यासारखे वाटत होते. रमण गुरख्याची शिट्टी ऐकू यायला लागली होती.

हे वातावरण? की ते..??? स्वाती ताई, मनीषा ताई.. कॅरम.. पत्ते! इंग्लिश... की?? मटर पनीर... गरम रोटी... की.. महुरवाडी...??? की या मिळालेल्या भेटी... की.. मन्नूकाकाचा मार... का मग.. विशालच्या दप्तरात थोटुक टाकायचं...

नुकत्याच घडलेल्या घटनांनी मनावर आत्यंतिक प्रभाव टाकला.

श्रीयुत दीपकराव अण्णू वाठारे यांनी आजवरच्या अकरा वर्षांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय स्वतःचा स्वतः घेतला.

पळून जायचं नाही. राम-रहीम ढाबा... इथेच राहायचं!

राम-रहीम ढाब्याला आज एक नवा सवंगडी मिळाला होता...

आणि ...

भटारखान्यात जाऊन दिप्या अबूला विचारत होता....

भेंडीमसालामे..................... लसहन कितना डालनेका??

गुलमोहर: 

व्वा..हा भाग ही छानै ..जास्त वाट पाहायला न लावता पटकन दुसरा भाग आला.. उत्सुकता अजून वाढली पुढ्च्या भागाबद्दल

<<<प्रेम! शुद्ध प्रेम असले की कोणताही स्पर्श आईच्या स्पर्शाच्या पातळीवर जाऊन पोचतो.>>>
मस्त! मस्त!!मस्त!!!
दिपूचे ढाब्यावर स्वागत...फार छान जमलाय हा ही भाग!