हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १९

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2010 - 06:20

या कादंबरीचे शेवटचे तीन ते चार भाग उरलेले आहेत. नक्की किती ते आत्ता तरी माहीत नाही. सर्व वाचकांच्या व प्रतिसादकांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापासून अनेक आभार!

-'बेफिकीर'!
----------------------------------------------------------------------------------

सर्वांदेखत गेटवरच खोदून खोदून सगळे विचारल्यावर सगळ्यांनाच एकदमच दिपू अन काजलची कहाणी केव्हापासून चालू आहे ते समजले होते. सगळे अवाकच झाले होते.

राम रहीम ढाब्यावरचे ते दोन दिवस अत्यंत तणावाचे होते. प्रत्येकाची मनस्थिती भिन्न भिन्न होती. दिपू हा असा मुलगा नव्हता ज्याला साखरूप्रमाणे काही शिक्षा द्यावी अन सुधारतो का पहावे. दिपूने एकहाती ढाबा चालवलेला होता. तेही काशीनाथ अचानक निघून गेल्यावर अन अबू चाचाबरोबर नाशिकला असताना! त्यानंतर दिपू ढाब्यावरील इन्डिस्पेन्सिबल मुलगा झालेला होता. त्याचे प्रकरणही साखरूसारखे क्षुल्लक नव्हते.

प्रत्येकाचे स्वतःचे विचार चाललेले होते.

यशवंतच्या दृष्टीने दिपू हा त्याचा अत्यंत लाडका मुलगा होता. कित्येकवेळा दिपूने चिवड्याच्या दुकानाच्या संदर्भात मदत केलेली होती. वर दिपू इतक्या लहान वयात इतके महत्वाचे काम ढाब्यावर करतो याचे यशवंतला कौतुक होते. आणि त्याचवेळी याचा आपल्या मुलीवर डोळा आहे याचा त्याला अत्यंत राग आला होता. दिपूने ढाब्यावर काम करणे तूर्त बंद ठेवले होते. ढाबा मात्र चालूच होता नेहमीप्रमाणे, पण तणावात होते सगळे! यशवंतच्या दृष्टीने दिपू कितीही कर्तबगार असला तरी मराठा जातीचा नव्हता आणि घरातून हाकलून दिलेला व चाचाचा आश्रित होता. त्याला अजून स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. कर्तबगारी दाखवायची होती. केवळ भटारखाना मॅनेज करणे हे महत्वाचे नव्हते. घर बांधायला पाहिजे होते. जवळ बर्‍यापैकी बचत असणे आवश्यक होते. दिपूकडे यातले काहीच नव्हते. दिपूला ढाब्याव्यतिरिक्त कुठेही जगणे शक्य नाही असे यशवंतचे मत होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो काजलहून लहान होता. नाशिकला गेल्यावर चाचाने स्वतः यशवंत अन सीमाशी बोलून स्वतःच्या मुलासाठी काजलला मागणी घातली होती. चाचाच्या बायकोलाही खूप आनंद झाला होता. काजलसारखी मनमिळाऊ, प्रेमळ अन अतिशय सुंदर मुलगी सून म्हणून आल्यास तिला कोण अभिमान वाटणार होता. आणि यशवंत अन सीमाच्या आनंदाला तर पारावारच राहिला नव्हता. चाचासारखा भरपूर पैसेवाला, एक गाजलेला ढाबा चालवणारा माणूस व्याही म्हणून मिळणे ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यात पुन्हा काजल नाशिकसारख्या सुधारलेल्या शहरात राहायला जाणार हे उत्तमच! आपलेही बस्तान ढाब्यावर आणखीनच नीट बसेल असेही त्या दोघांना वाटले होते. आणि मुख्य म्हणजे अमित, अमितची आई अन चाचा यांच्यात काही म्हणजे काहीच बोट दाखवण्यासारखे नव्हते.

सीमाकाकूला जातीचे फारसे नसले तरी तिला स्वतःचा विश्वासघात झाल्यासारखे वाटत होते. आत्तापर्यंत ज्या दिपूचे ती कौतुक करत होती त्याने तिच्या मुलीला फूस लावली असे तिचे मत होते.

सीमाकाकूला दिपूचे कमी कौतुक नव्हते. पण हा प्रकार झाल्यावर तिच्या मनातील सर्व कल्पनांना तडे गेले होते. अमितसारखे स्थळ चालून आलेले असताना हा प्रकार व्हावा या दुर्दैवावर ती अश्रू ढाळत होती. तिला काजलच्या बेजबाबदार वागणुकीचा भयानक राग आला होता. मात्र या प्रसंगानंतर होणार काय या काळजीने तिला ग्रासलेले होते. तिला अजूनही चाचाकडून अमितसाठी मुलीला मागणी घालण्याची अपेक्षा होती पण मनात वाटत होते की तसे आता होणार नाही.

चाचाची बायको हे प्रकरण झालेले कळल्यानंतर स्वतः जातीने ढाब्यावर आली होती. तिने मनातून काजलला केव्हाच रद्द केलेले होते. ती मनाने वाईट नव्हती. पण कोणत्याही कारणास्तव, मुलगी कितीही स्वभावाने व रुपाने चांगली असली तरीही असला प्रकार झाल्यावर जाणूनबुजून ते स्थळ स्वीकारण्यास तिचा नकार होता. काय म्हणून स्वीकारायचे? उद्या लग्नानंतर कुणाला कुणकुण लागली की झाला का इज्जतीचा बट्याबोळ?

आणि चाचा? चाचाने गेले काही वर्षे यशवंत, सीमा अन काजलचे वागणे पाहिलेले होते. दिपूचेही वागणे पाहिलेले होते. हा एक प्रकार सोडला तर चाचाच्या दृष्टीने दिपू हा अक्षरशः हिरा होता. पण त्याचवेळेस तो केवळ आपला एक आश्रित आहे, आपण थारा दिला नसता तर तो आज कुणीच नसता हेही त्याला आठवत होते. आपल्या स्वतःच्या मुलाची, अमितची अन दिपूची कुठेच तुलना नाही हे त्याला माहीत होते. काजल अत्यंत लाघवी अन अत्यंत सुंदर मुलगी होती. तिला मागणी घालून खरे तर चाचाने यशवंत अन सीमाला उपकृतच करून ठेवले होते. कारण कितीही सुंदर असली तरीही काजलला अचानक लक्षाधीशाचे स्थळ मिळेलच असे काही नव्हते. आजवर आलेली स्थळेही साधारणच होती.

काजल जर आपली सून झाली तर यशवंत अन सीमा तहहयात ढाब्यावर राहतील अन जास्त जबाबदार्‍या घेत राहतील हे सूज्ञ चाचाने ओळखले होते. मनाने स्वार्थी नसला तरीही हा एक फायदा त्याला जाणवत होताच. एकच मुलगा आहे, पुढे मागे ढाबाही त्यालाच द्यायचा आहे, अबूला अर्धे पैसे देऊन टाकले की मोकळे! मग अशा परिस्थितीत मुलाचे सासू सासरे जर सतत इथे राहिले तर त्याला मार्गदर्शनही मिळत राहील अन साथही! शेवटी जावयाचे पाहावे लागणारच की! राहणीमानाच्या दृष्टीकोनातून आपण यशवंतपेक्षा कितीतरी मोठे आहोत. त्यामुळे नाही म्हंटले तरी काजलही दबूनच राहील कायम! चाचाचे विचार चाललेले होते. पण दिपूचे काय करायचे? अगदी तसेच म्हंटले तर त्याची काही चूक नाहीये. या वयात ही आकर्षणे असणारच! एवढेच काय अमित स्वतः इथे असता तरी काजलवर भाळलाच असता. मागे सुट्टीत आला होता तेव्हाही तिच्याशी बोलायला जायचाच की! मग केवळ दिपू अनाथ, आश्रित आहे म्हणून त्याच्या प्रेमाचा बळी जाऊ द्यायचा हे स्वार्थी वागणे नाही का ठरणार? पण मग? आपल्या शब्दाची काय किंमत राहिली? आपण सगळ्यांदेखत यशवंतला अन सीमावहिनीला शब्द दिला आहे. तुझी मुलगी माझी सून करून घेईन म्हणून! म्हणजे.. थोडक्यात.. दिपूला वेगळे करायलाच हवे. तिच्यापासून तरी! ढाब्यावर राहिला काय अन.. नाही नाही.. दिपू ढाबा सोडून तरी कुठे जाणार?? त्याने ढाबा किती मेहनतीने सांभाळला आहे... तेही या वयात.. काहीतरी योग्य डिसीजन घ्यायला हवा..

इकडे अबूबकर वेगळेच विचार करत होता. त्याच्या दृष्टीने चाचाने पुर्वीच्या काळी जर स्वत:च्या सख्ख्या बहिणीचे, भावनाचे, लग्न अबूशी करून द्यायला तयारी दाखवली असेल तर चाचाने यशवंतला जातपात पाळू नको असे हक्काने सांगायला हवे होते. अमितला काय, हजारो सुंदर मुली सांगून आल्या असत्या. चांगल्या मोठाल्ल्या घरातल्या!

अबूच्या दृष्टीने दिपूचा हक्क डावलला जाणे योग्य नव्हते. अर्थात, जर काजलला ते मान्य असेल तरच! अबूने एकेकाळी असेच बेभान प्रेम केलेले होते. प्रेमाची, विरहाच्या दु:खाची सार्थ जाणीव अबूला होती. पण या निर्णयात आपण फार पडणेही योग्य नाही हेही त्याला कळत होते. शेवटी, चाचा अन अमितवर त्याचा कितीही हक्क असला तरी हा लग्नाचा, आयुष्याचा प्रश्न होता. आपल्या मताला शेवटी तितकीच किंमत मिळून अपमान होण्यापेक्षा काय काय होते ते पाहावे असा त्याचा विचार होता.

प्रदीप डांगे अन वैशाली एकमेकांशी चर्चा करत होते. वैशालीच्या मते दिपू अन काजल बेजबाबदारपणे वागले होते अन त्याचा तिला तीव्र धक्का बसलेला होता. काहीही झाले तरी काजलने आधी मनातले आईपाशी किंवा कुणा जवळच्याशी बोलायला पाहिजे होते. दिपू हा लहानही होता अन नासमझही! त्याच्या बरोबर असे काही करण्याआधी काजलने विचार करायला हवा होता असे तिला वाटत होते. मात्र प्रदीप उलट बोलत होता. त्याच्यामते दिपू अत्यंत कर्तबगार मुलगा होता. कित्येकदा गल्ल्यावरून आत पाहताना त्याला दिपूच्या हालचालींमधून अन वागण्यामधून प्रकट होणारी जबाबदारीची जाणीव, इमानदारी, कर्तव्यदक्षता अन प्रगतीची इच्छा जाणवत होती. केवळ दिपू अनाथ अन ठेवलेला मुलगा आहे म्हणून तो कुणीच नाही किंवा कुणीच होणार नाही असे समजणे पद्याला अयोग्य वाटत होते. मात्र जातीच्या बाबतीत यशवंतचे म्हणणे त्याला नेमके पटत नसले तरी तो प्रश्न यशवंतचा आहे हे त्याला मान्य होते.

बाळू अन मनीषा यांच्या घरी वेगळेच चालले होते. बाळूच्या मते काजल इतकी सुंदर होती की ती अमितच्याच घरी शोभली असती अन हे लहानपणचे प्रेम केवळ शारिरीक आकर्षण होते, जे पुढे विसरले गेले असते. आत्ता दिपूचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नव्हती अन त्याला समजावून सांगायला हवे होते. दिपू पुढे हे सगळे विसरून जाईल याची बाळूला खात्री होती. मात्र मनीषा.. एक सेकंदासाठीही यशवंत अन चाचाच्या बाजूने विचार करत नव्हती. ती म्हणत होती की बाळू स्वतःसुद्धा जवळपास अनाथच असताना अन पद्यानेच ढाब्यावर आणलेल्या मुलांपैकी एक असताना तिने केवळ वैशालीच्या म्हणण्यावर बाळूशी लग्न केलेले होते. आधी कुठे काय माहीत होते आपल्याला एकमेकांवर? आणि मुख्य म्हणजे दिपू आमच्या घरी राहिलेला आहे अन तो अक्षरशः चमत्कार आहे हे मनीषा परोपरीने सांगत होती बाळूला. काही झाले तरी काजल दिपूलाच मिळायला हवी असे तिचे मत होते.

वैशालीची सासू अन बाळूची मावशी वयाने सगळ्यात मोठी होती. तिच्या मते अजून दिपूचा विवाह होणे किंवा त्याचे कुणाशी ठरणे हे तितके योग्य नव्हते. दिपू वयाने अजून मोठा व्हायला हवा होता. जातपातीचे तिला फारसे नसले तरी दिपू काजलला अयोग्य आहे असे तिचे मत होते.

झरीनाचाचीला असे वाटत होते की ही सगळी काजलची चूक आहे. पण यशवंत अन सगळ्यांसमोर हे कसे बोलणार? आपल्यालाच मारतील! काजलने दिपूला भुरळ पाडलेली आहे असे तिने ठरवून टाकले होते. दिपू हा तिच्यामते गुणी मुलगा होता. अध्यात न मध्यात कुणाच्या! पण झरीनाचाचीच्या मुलाला मात्र तसे वाटत नव्हते. भुलोबाहून मध्यरात्री त्यांना ढाब्यावर पोचवताना हे दोघे खूप हसत होते अन हातात हात घेऊन मागून येत होते, अंतरही बरेच राहायचे हे तो झरीनाचाचीला सांगत होता.

अंजना अन काशीनाथ मात्र कंप्लीटली दिपू अन काजलच्या बाजूचे होते. काहीका असेना, दिपू भटारखाना एकहाती चालवू शकत असेल तर तो जगात कशाचेही सोने करेल असे त्यांचे मत होते. आणि प्रेम याच वयात होत असते, ते खोटे कसे समजायचे हा त्या दोघांचा निरागस प्रश्न होता. अर्थात, प्रेम का होते याची काशीनाथला नेमकी जाणीव नसली तरी बर्‍यापैकी जाणीव गेल्या काही वर्षात आलेली होती. त्यात पुन्हा दिपूचे त्यांच्यावर महत्वाचे उपकार होते जे दोघेही कधीच विसरू शकत नव्हते. दिपूने अंजनाचा तो प्रसंग जर रामरहीम ढाब्यावर सांगीतला असता तर गुजरातपर्यंतच्या ड्रायव्हर्स अन कंडक्टर्सना ते माहीत होऊन सगळ्या बॉम्बे आग्रा रोडच्या महाराष्ट्र पॅचवर काशीनाथची अन अंजनाची बेअब्रू होऊ शकली असती.

दिपूचे उपकार, सहाय्य अन साथ तर अनेकांना होती. मुख्य म्हणजे अबू! जेव्हा दिपू भटारखाना लढवत होता तेव्हा अबूला काही बघावेही लागायचे नाही. नाही म्हंटले तरी पन्नाशीनंतर किती काम करणार? चाचा आपला गल्ल्यावर असायचा म्हणून ठीक आहे. पण भटारखान्यात एवढे काम करायचा माणसाला कधीतरी कंटाळा येणारच की?

अंजना अन काशीनाथवर तर दिपूचे उपकार होतेच! पण मनीषाताईचे आयुष्य बिघडता बिघडता दिपूमुळेच सावरले गेले होते.

समवयीन मुलांना तर दिपूने कित्येकदा मदत केलेली होती. मन्नू दिपूचा फॅनच होता. तशीच झरीनाचाचीही! इतकेच काय, सीमाकाकू अन यशवंतला, केवळ ते काजलचे आईबाबा आहेत म्हणून नव्हे तर.. मनाचा चांगुलपणा म्हणून दिपूने अनेकदा मदत केलेली होती.

दिपूबद्दल एक समीर सोडला तर कुणाला कसलीच तक्रार नव्हती. समीरला काजल हवी होती, पण आपल्याला ती कधीच मिळणार नाही हे एक दोन प्रसंगातच ढाब्यावर असतानाच त्याला माहीत झाले होते. नंतर तिला बघून त्रास होतो म्हणून तो पगारावरून भांडून वडाळी भुईला दुसर्‍या ढाब्यात कामाला लागलेला होता. त्यानंतर तो केवळ दोनच दिवसांनी पुन्हा राम रहीम ढाब्यावर इतक्या विचित्र प्रसंगामुळे आला होता की समीर या ग्रूपमधे कसा हा प्रश्नच कुणाला पडला नव्हता. समीरला फक्त इतकेच आठवत होते की जीपमधे काजलच्या शेजारी त्याला बसायला मिळाले होते.

झिल्या, विकी अन दादू हे जरी संभ्रमात असले तरीही दिपू अन काजल या दोघांबाबतही त्यांना आस्था होती. कुणाचेच वाईट होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अमित, चाचाचा मुलगा, हा त्यांचा चांगला मित्र झालेला होता. तो होताही झिल्याच्याच वयाचा! अमितच्या वागण्यात कधीही कसलाच गर्व नसायचा. उलट खांद्यावर हात टाकून तो गप्पा मारायचा सगळ्यांशी!

आणि काजल???

रडून रडून डोळे सुजले होते. चेहरा लाल झाला होता. पण डोळ्याचे पाणी काही थांबत नव्हते. तिला एका खोलीत बसवून ठेवलेली होती. सीमाचे अन यशवंतचे तिच्यावर कडक लक्ष होते. सीमा तिला सतत ओरडत होती अन सीमाने मुलीवर नीट लक्ष ठेवले नाही असे समजून यशवंत सीमाला टोचून बोलत होता. सीमाही त्यामुळे रडत होती. घराचे घरपणच गेले होते. काजल मात्र एक अक्षर बोलत नव्हती. दोन दिवसात तिने जबरदस्तीने पाजलेला दोन कप चहा अन तीन बिस्कीटे व काल रात्री तसाच जबरदस्तीने कोंबलेला चार घास वरण भात सोडला तर काहीही खाल्लेले नव्हते.

काजलच्या मनात वादळी वेगाने विचार चाललेले होते. आज रात्री चाचाने मीटिंग बोलवलेली आहे मोठ्या माणसांची! त्यात लहान फक्त आपण अन दिपूच आहोत. आपल्याबद्दल काहीतरी निर्णय होणार आहे. आणि आई बाबांच्या वागण्यातून तर अजिबात वाटत नाहीये की तो निर्णय आपल्यासाठी चांगला असणार आहे.

आजची चर्चा! एकच संधी आहे. यात आपण आपल्या दिशेने निर्णय वळवण्यात यशस्वी झालो पाहिजेत. नाहीतर खरच पळून जावे लागेल. अमितबद्दल तर तसे काही कधी वाटलेही नाही. दिपूशिवाय एकही विचार मनात येत नाही. आज रात्री खरच दिपूला घेतील का चर्चेत? की नाहीच घेणार? की आपल्यालाही नाहीच घेणार? कदाचित हेच सगळे मिळून निर्णय घेतील! मग काय करायचे? दिपूला कसे भेटायचे? कधी भेटता येईल? त्याच्या मनात काय विचार चालले असतील? बाबा जाऊन त्याला पुन्हा तर मारत नसतील ना? परवा त्याला अंगभर मार पडला आहे. कुणी निदान मलम तरी लावत असेल का त्याला? की सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले असेल? की?? ... की?? दिपू नाहीच्चे ढाब्यावर? त्याला हाकलून तर दिलेले नाही ना? दोन दिवसात काहीच कसे ऐकू आले नाही त्याच्याबद्दल! आपल्याला नेमके परवाच कशाला सुचले वडाळी भुईच्या शंकराला जायचे. शंकर पावला तर नाहीच, उलट शापच मिळाला. ढाब्यावर एक तरी माणूस असा असेल का? की जो आपली साथ देईल चर्चेत? की?? एक दिवस कुठतरी, कसेतरी भेटून अमितलाच सगळे सांगावे? पण.. त्याला त्याचे काहीच वाटले नाही तर? किंवा तोही ...आपल्यावर भाळला तर?

दीपक अण्णू वाठारे!

बॉम्बस्फोट होत होते दिपूच्या मनात! तो जो स्वत:च्या खोलीत जाऊन बसला होता तो अजून बाहेरच आला नव्हता. पद्याने प्रेमाने त्याच्या खोलीत खायचे पदार्थ कालपासून दाराच्या खालच्या फटीतून सरकवले होते. अक्षरशः भुकेने ग्लानी आल्यावर त्याने त्यातले काही शिळे झालेले पदार्थ तसेच घशाखाली ढकलले होते. प्यायचे पाणी न पिता बाथरूममधील नळाचे पाणी पीत होता तो. मनात अक्षरशः स्फोट होत होते त्याच्या!

का म्हणून? का म्हणून आम्हाला नाही एक होऊ द्यायचे? का वेगळे व्हायचे? केवळ चाचाला काजल सून म्हणून हवी आहे म्हणून? केवळ मी यशवंतचाचाच्या जातीतला नाही म्हणून??

आणि.. या वेदनांचे काय? आपल्याला साधे कुणी हेही विचारत नाही? की किती लागले आहे तुला? काय झाले सगळ्यांना? अंजना आपली साथ देणार म्हणाली होती? का आली नाही आपल्याला किती लागलंय बघायला? मनीषा ताई??? तिला काय झालं? बाळूने काही कान भरले की काय तिचे? पण... ती तशी नाहीच्चे! ती का नाही आली? आणि विकी? पहिल्या दिवसापासून आपला मित्र असलेला विकी? तो कुठे गेला? अबूबकरला आपली इतकी चीड आली असेल? का? त्यानेही प्रेम केलेच होते की? तो का नाही आला. पद्या दाराखालून ताट सरकवतोय जेवणाचं! पण .. मला इतकं लागलंय.. साधं कुणी डॉक्टरकडेही नेत नाही? हा.. हा राम रहीम ढाबा मी चालवतो ... मला... कुणी विचारतच नाही??

दिपू क्षणाक्षणाला कूस बदलून आपले दुखरे अंग स्वतःच चोळत होता. प्रत्येक वेदनेला त्याचे काजलवर दुप्पटीने मन जडत होते. आणि.. गणपतचाचा अन यशवंत मनातून तितक्याच वेगाने उतरत होते..

दोन्ही पाय अन डावा हात सुजलेला होता. पाठीत काहीतरी भयंकर लागलेले होते. पोटही ढवळून निघत होते. डोळ्याच्या अगदी कडेला बहुधा जखम झाली होती. उठवतही नव्हते.

आणि.. ढाबा आपला चालूच आहे? काशीनाथचाचा सगळा खाना बनवतोय? अबूबकर दारू पितोय? का? मी संपलो सगळ्यांच्या दृष्टीने?

काजल... काजल... काजल...

काजल कुठे आहे? गावाला घेऊन गेले की काय तिला? काही समजतच नाही. कसे भेटायचे तिला? आपण दार उघडले तर तिच्याकडे कुणी जाऊच देणार नाही आपल्याला. कधी भेटायचे? कसे भेटायचे? आज म्हणे मीटिंग आहे. कसली मीटिंग? तुझे प्रेम कसे अमान्य आहे हे सांगणार असेल चाचा! मग त्यासाठी मीटिंग कशाला हवी?

काजलबरोबर पळून जायचे ठरवले होते. उठताही येत नाहीये.. काजल.. कुठे आहेस? इथे.. ढाब्यावर असलीस तर.. एक हाक तरी मार की मला.. काजल..

आई.. आईगं... मला खूप लागलंय गं.. येतेस का स्वतःहून इथे?? कुणीही कळवणार नाही तुला.. खूप मारलंय गं मला त्या तिघांनी.. अन नंतर यशवंतचाचानेही मारलं.. येतेस?? ये ना... मला.. मला.. इथे कुणीही नाही गं आई.. झरीनाचाची.. मनीषाताई.. कुणीही नाही.. आई.. ये गं राम रहीम ढाब्यावर...

-----------------------------------------------------------------------

कुणाच्याही घरात पंधरा माणसे एका वेळी बसतील अशी जागा नव्हती. त्यामुळे मीटिंग नेहमीच्याच जागी, म्हणजे ढाब्याच्या मागे व खोल्यांच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेत घ्यावी लागत होती. त्यामुळे सगळ्यांनाच सगळे ऐकू येणार होते. रमण कुठेतरी इमर्जन्सीमुळे गेलेला होता.

आणि त्यामुळेच.. चाचाची सक्त ताकीद होती. झिल्या, विकी, दादू, मन्नू आणि साखरू.. यांनी एक शब्दही मधे बोलायचा नाही. दिपू अन काजलने जेवढे विचारले जाईल तेवढेच बोलायचे.... आणि....

... आणि बाकी कुणालाही मधे बोलायचे असेल तर आधी चाचाला विचारायचे...

सरळ होते.. दिपू अन काजलच्या प्रेमाची आज थट्टा होणार होती मीटिंगमधे..

अगदी झरीनाचाची अन तिचा मुलगाही येऊन बसले होते. अबू अंधारातही पीतच होता. मात्र तो मीटिंगच्या वर्तुळापासून लांब, साधारण तीस एक फुटावर एकटाच बसला होता. चाचा एकटाच खुर्चीवर बसला होता.

चाचाने तोंड उघडले.. अन सन्नाटा पसरला.. स्वर शांत होता त्याचा नेहमीप्रमाणे..

चाचा - जो हुवाय.. सबको पताय.. दिपूने काजलला भुरळ पाडली हय.. हे वाईट हय.. वय लहान हाये दोघांचेबी..

प्यार होतंच! नाही असं नय! पर प्यार करताना आंधळ्यागत करायचं नय! आपल्याला शोभेलशा मुलीशी प्यार करायचं! आपण किती वयाचे, आपण किती कमवतो.. आपण कोन हय.. सगळं बघायला पाहिजे..

तुला इथे ठेवून घेतला..तेव्हा तुझ वय होतं अकरा.. पळून आलावतास.. घरातून हाकाललावता तुला.. नाही आई सगी.. नाय सगा बाप.. तरीही ठेवला हितं.. या.. या झरीनाने आंघोळ करण्यापासून सगळं पढिवलं तुला.. काय?? तवा मी ठेवला नस्ता हितं तर?? कुठ असतास तू आज? क्या खाता था तू? कहा सोता था? मैच रख्खा तेरेको.. उसका ऐसा सीला दिया हय तुने..

तेरेको यहा खाना खिलाया पयले दिन... सब छोकरा लोग तेरेको अपनेमेसे एक मानने लगगये.. हाये का नय? तेरा कलको मर्डरबी होयेंगा तो कोई कंप्लेन बी नय करेंगा... तेरेको इतना प्यार मिला के तू अपनी मा के साथ बी नय गया.. सबने देखाय इधर वो किस्सा.. तेरे आईने हमकोच मारनेको वो मुस्तफाको लाया इधर..

सारा खाना बनाना सिखाया अबूने.. अब कोनसेबी ढाबेपे जायेंगा तो तेरेको काम मिलेंगा.. राम रहीम ढाबेका आचारी करके... कौन किया ये सब?? मै और अबू.. क्या था तू?? क्या था? एक अनाथ बच्चा था.. जिसका कोय बी नय.. मै और अबू तेरे बाप बने.. मा बने.. ये.. ये पद्याने तेरेको आजबी सुबय खाना पहुचाया.. मेरेको मालूम नय ऐसा नय.. लेकिन मै बोला नय.. किसीको भूका नय रखनेका ढाबेपे.. पद्या तेरेसे अब्बी उतनाच प्यार करताय.. हर कोई करताय..

ये यशवंत बार बार मेरेको बोलता... के तू इतना छोटा होके बी तेरेको कैसे रख्खा.. मै बोलता था.. काम बी अच्छा करताय और मनका बी अच्छाय.. क्या??

तेरेको ये उमरमे इतना बडा कमरा अकेलेको दिया.. विकी, दादू, मन्नू, साखरू अबीबी एकेक कमरेमे तीन तीन लोगां रयते.. तेरेको शेपरेट.. कायको?? क्युंकी तेरा काम ज्यादा बडाय करके.. तू खाना बनाताय करके..

तू अठरा बरस का हुवा तो तेरा एक पैसा बी नय रख्खा.. तू सोच बी नय सकता ऐसा पैसा मिला तेरेको.. तेरा पगार मन्नू और साखरूसे कितना ज्यादाय..आं??

तू गाव जारहा था.. मै और अबू मिलके तेरेको खरीदारीका पैसा दिया.. तिकीटका पैसा दिया..

तू पंक्चरबी निकाल सकताय.. करके तेरेको तीनसौ रुपिया बढाया ... येतो तेरेको मालूमच नय..

कुछ बी करनेका.. तो तेरेलिये औरोंसे ज्यादा करनेका.. तेरेवास्ते पद्याने मुस्तफाका मार खाया.. क्या संबंध हय पद्याका तेरेसे? फिर बी मार खाया..

ये सब हमलोगांका प्यार था.. वैसे तो तू इतना छोटा हय के तेरेसे बात करनेका मेरेको जरूरत बी नय.. कौन पुछेंगा मेरेको अगर काजलको मैने बहू बनाया.. कौन पुछेंगा अगर तेरेको यांसे निकालदिया नौकरीसे तो? कौन पुछेंगा? हय कोई तेरा? तेरे सबकुछ हमच हय.. और.. तू.. तू इस तरहाके कामां करताय..

काजलसे छोटा हय तू.. कायको देखने लगा उसकी तरफ?? अबी फुलपँट पहननेका उमर नय.. प्यार करनेको चला.. वो बी मै एक बार छोड देता .. लेकिन.. लडकी अपनेजैसी तो होनी मंगतीय ना..

ही कुठल्या खानदानातली.. दिसायला कशी.. आपण कनत्या जातीचे.. आपला पगार किती.. आपलं खानदान काय.. फासे पारधी काका अन धनगर बाप.. धनगर सावत्र मा..

देख बेटा.. तू सगळ्यांचा लाडकायस म्हणून महत्वाचं सांगतो..

जिंदगीत आपली पायरी नय सोडायची माणसानं.. लय म्होह असतात आजूबाजूला.. हे आत्ताच्या उमरचं प्रेमबिम खरं नसतंय.. दोन महिन्यानं भुलजायेंगे तुम लोगां.. बर का काजलबेटी.. आपले आई बाप जे आपल्यासाठी सोचतायत ते भोत चांगलं असतं.. तेच चांगलं असतं.. त्यात कल्याण असतं ...

दिपू.. अबी तू जा अपने कमरेमे.. और ये सब भूल जा.. अबी तेरी उमर नय हय प्यारबिर करनेकी.. कल सुभासे कामपे लग जा.. मै खुद तीन चार बरसके बाद तेरी शादी करायेंगा..

और... जानेसे पयले.. एक बार यशवंत और सीमाभाभीको बोलके जा.. सॉरी बोलनेका.. गलती हुवा करके बोलनेका.. और बोलनेकाके.. काजलके बारेमे ऐसा फिर नय सोचेंगा.. आजसे वो मेरी बहन हय बोल.. देख बेटा.. जहा और जिस मुहल्लेमे अपन रयतेय ना.. वहाकी हर लडकीको बहन मानते हय..

याला काय अर्थ आहे? चाचाच्या या वागण्याला काही अर्थच नव्हता. त्याने डिसीजनच घेऊन टाकला होता. सन्नाटा पसरलेला होता. दिपूच्या इवल्याश्या मनात स्फोट घडत होते. काजलच्याही! दोघांना एकमेकांचा नसला तरी स्वतःचा पूर्ण अंदाज होता. आज मीटिंगमधे भल्याभल्यांना झोपवायचे दोघांनीही मनातच ठरवून टाकले होते. इतर काही पर्यायच उरलेला नव्हता. दुसरा मात्र कसा वागेल ते सांगता येत नव्हतं! आणि.. दिपूने पहिला बॉम्ब टाकला....

दिपू - आप और.. अबूभी.. एकच मुहल्लेमे रयते थे ना?????

खाड!

ध्यानीमनी नसताना एखाद्याने समोरून येऊन मुस्काडात मारावी तसे झाले चाचाला! अबूने त्या दिवशी सांगीतलेली त्याची कहाणी दिपूच्या आत्ता अशी उपयोगी पडत होती. आणि.. मुख्य म्हणजे.. वय, मान कसलाच मुलाहिजा न बाळगता दिपूने सर्वांदेखत हा प्रश्न विषारी नजरेने विचारला होता.

थरथरत होते चाचाचे सगळे अंग क्रोधाने! पण भीती दुसरीच होती! आत्ता दिपूला फटका बिटका दिला अन अबू चवताळला तर? मग आपली काही धडगत नाही. इतक्या जणांसमोर अबू आपली हालत करून टाकेल नुसत्या बोलण्यानेच! कारण आपली बहीण, म्हणजे भावना, हिच्याबाबतीत तो फार हळवा आहे.

काजल थक्क होऊन अन आनंदी होऊन दिपूकडे पाहात होती. आणि लांबवर कुठेतरी.. अबूच्या मनातलाच प्रश्न दिपूने विचारल्यामुळे पिता पिताच अबूने मनातल्या मनात दिपूची पाठ थोपटली होती.

चाचा - देख दिपू.. ज्यादा बात नय करनेका. तेरी उमर भोत कम हय...
दिपू - भोत अहसान हय आपके चाचा मेरेपे.. हय ना?
चाचा - क्या मतलब?
दिपू - मला हितं ठिवला.. पाळला.. अनाथ होतो.. कोनच नव्हतं..
चाचा - मग??
दिपू - तुमी... नसतात तर.. मग.. अमितला कुणी पाळलं असतं असं...???? अबूने???

आता मात्र हद्द झाली. चाचा उठलाच. पण चाचाचा आविर्भाव पाहून पद्या आधी धावला अन त्याने आपल्या अंगाने दिपूला झाकले. मन्नू, साखरू, झिल्या, विकी, दादू अन चाचाची बायको अवाक होऊन दिपूच्या धाडसाकडे बघत होती.

पद्या - मारो मत चाचा.. पयलेच भोत माराय उसको उन लोगां..

तब्बल पाच मिनिटांनंतर थरथरणारा चाचा शांत होऊन पहिल्या जागी बसला. पद्या म्हणाला...

पद्या - देख दिप्या... तेरी उमरबी कम हय और तेरी जातबित बी अलगच.. ऐसे खयालां छोडदे बेटा..
दिपू - अबू और चाचाके बहनकी जात एकच थी क्या???

अबू मनातल्या मनातच हसला. अजून त्याने मधे पडावे असे काहीच झालेले नव्हते. पण आज त्याला चाचाचा अ‍ॅप्रोच अजिबातच पसंत नव्हता.

चाचाचे मात्र बी.पी. वाढलेले होते. आता त्याची बायको बोलू लागली...

चाची - देखो.. सब लोग देखो... कसा बोलतोय.. इथंच कामाला.. आमीच ठेवलाय अन बोलतोय आमालाच.. अबूभावजी.. तुम देखरहे क्या?? वन्सं और तुम्हारे बारेमे क्या बोलताय ये..

अबू अजूनही लक्ष देत नव्हता. पण आता कुणीतरी बोलायलाच हवं होतं. यशवंत म्हणाला..

यशवंत - देख दिपू.. तू अबी काजलके बारेमे सोचेंगा तो भोत बुरा होयेंगा.. अबीतक आमी शांत आहोत..

दिपू खरे तर घाबरायला हवा होता. झाले उलटेच..

दिपू - काजलकी मेरेसे शादी नय बनायी तो भोत बुरा होयेंगा यशवंतचाचा.. अबीतक मै शांत है...

झरीनाचाचीसुद्धा हादरली. यशवंत दिपूकडे जायला रागाने उठलेला असतानाच पद्याने त्यालाही आवरले.

यशवंत - अरे ये है कोन स्साला? आं? ये है कोन?? साला बाप का पता नय.. आईका पता नय.. जातका पता नय.. कितने बाप है इसके वोबी पता नय.. कहाका है.. यहा कायको आयेला है.. कायको इसको इधर रख्खेला है.. कुछ पता नय.. स्साला मेरेसामने जबान चलाता है??

दिपू थंड बसलेला होता. काजल बोलू शकते हे अजून मीटिंगमधे कुणाला जाणवलंच नव्हतं..

काजल - तुम कहांके है बाबा?? अमेरिकाके???

खण्णकन गालावर जोरदार थप्पड बसली सीमाकाकूची.. तरीही.. एक अश्रूही निघाला नाही की साधा हुंदकाही..

दिपू - काजलपे हाथ उठायेंगे तो ..
यशवंत - क्या करेंगा रे ****** क्या करेंगा..

शिवी देत पुन्हा यशवंत दिपूकडे धावणार तोवर पुन्हा पद्याने त्याला आवरला होता. पद्याच्या ताकदीपुढे यशवंत अन चाचाची ताकद कमीच पडणार होती.

आता वैशालीची सासू बोलली.

वैशाली - मी काय म्हणतीय.. पोरं लहान आहेत.. दमानं घ्या.. मारामारी कशाला करायचीय?? काय गं काजल बेटा.. तुला समजत नय का? अमितच्या घरी किती सुखात राहशील.. केवढं मोठ घर.. केवढं घराणं.. अं??.. शोधून नय भेटायचं.. अगं हे प्रेम काही खरं नसतं.. त्या त्या वयात वाटतं.. ऐक बेटी.. आत्ता बाबा सांगतायत तसं कर.. कल्याण होईल.. दिपू.. तू पण.. तू पण ऐक चाचाचं.. आजवर किती प्रेमानं सांभाळलं त्याने तुला.. वडिलांसारखाय तो तुझ्या..

दिपू - तुमचा संबंध काय?

काय??? दिपूने विचारले? काय बोलतोय का काय हा मुलगा? इतक्या मोठ्या बाईला?

सगळे अवाक होऊन पाहात होते दिपूकडे.. बाळूला अन वैशालीला ते अजिबात आवडलेले नव्हते. दोघेही पटकन दिपूच्या विरुद्ध पार्टीत पडले...

दिपू - तुम्हारेको खुदका बेटा नय संभालनेको आया.. दुसरोंके बेटोंको कायको बोलरही हय..

आता बाळू उठला जागचा. पण पद्याकडे पाहून पुन्हा खाली बसला. वैशालीच्या डोळ्यात पाणी आले. अजूनही आपल्या पहिल्या नवर्‍याचा उल्लेख होतो हे पाहून तिचा अपमान झालेला होता. पद्यालाही हे आवडले नव्हते. पण त्याचे दिपूवर निरतिशय अन आंधळे प्रेम होते. आणि त्याला दिपूचा मुद्दाही पटलेला होता. ज्या माणसांचा संबंध नाही त्याच्यासमोर असली मीटिंग कशाला घ्यायची? जी दोन घरे लग्नाशी संबंधीत आहेत त्यांनीच भेटायचे. चाचाच्या मूर्खपणावर पद्या नाराज होता.

एक मात्र झालं होतं दिपूच्या बोलण्यामुळे! आता यानंतर कुणीही बोलण्याआधी 'आपला या विषयाशी संबंध किती आहे' ते तपासून मगच बोलणार होतं!

मात्र तसे तपासून बिपासून घेण्याची झरीनाचाची या अडाणी अन फक्त मनाच्या व्यवहारांना समजणार्‍या बाईला काय भीती?

झरीनाचाची - लेकिन मेरेको दिपूकी गलती नय लगरही इसमे..

आता या वाक्याचा अर्थ काय समजायचा? दिपूची चूक नाही म्हणजे कुणाचीच चूक नाही असे मानायचे की दुसर्‍या कुणाचीतरी चूक आहे असे मानायचे? काही वेळ विचार करून सीमाकाकूने मनातील भीती व्यक्त केली.

सीमाकाकू - म्हंजे काय म्हणायचंय तुम्हाला?
झरीनाचाची - मै इतनाच बोल रही... की जबतक कोई लडकी..

यशवंतचाचाने 'ए' असे जोरात ओरडत झरीनाचाचीला गप्प बसवले. मात्र, ते तिच्या मुलाला आवडले नाही. पण या सगळ्यांसमोर तो अन त्याची आई गरीब होते. तो तिला 'चल मां, अपन नय बोलेंगे इसमे' म्हणल्यावर मात्र झरीनाचाची उसळली अन यशवंतवरच भडकली.

झरीनाचाची - क्या रे?? आं?? क्या 'ए' क्या 'ए'?? आं? कब आया तू यहां?? दो चार साल होगये तेरेको.. मै यहा पीचले सैतालीस सालसे रह्यरही.. क्या?? सैतालीस.. और ये ढाबा जब बना ना तब मेरी जमीनका एक टुकडा मेरे मरदने इसमे बेचदिया शराब पीनेके वास्ते.. पीती तो मै बी हय.. लेकिन उसको बडी आदत.. मर गया वो पीपीके.. उसने दारूकेलिये ये जमीन बेची.. मै नही कय रही थी.. पर सुना नय.. बादमे मेरेको इसीच ढाबेपे काम करनेकी नौबत आयी.. क्या समझा.. गणपतचाचाको भी मालूम नय ये.. तू आया कल.. और मेरे उपर चिल्लाताय?? आं?? .. मै वो ओढेके पास बार बार कायको जाती पताय?? मेरी जमीन वहीच है.. अब इसको बेची हय हमलोगां.. इतनासाच टुकडा थाय.. वोबी गयाच..

झरीनाचाचीची दणदणीत शरीरयष्टी अन खणखणीत आवाज ऐकून सीमाकाकूच काय यशवंत अन चाचाही चरकले. या बाईच्या नादाला लागण्यात अर्थ नव्हता. तिची शिवराळ भाषा चाचाने एकदोनदा ऐकलेली होती. अन भुलोबाची वस्ती ढाब्याच्या विरुद्ध जाणे परवडणारे नव्हते. तिच्या मुलाला मात्र आज आपल्या आईसमोर गणपतचाचाही गप्प बसला हे पाहून मनातच आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

पण एकंदर विषारी वातावरण झालेले होते.

झरीनाचाची बोलू शकते तर आपण का नाही हे सगळ्यांच्याच मनात येत होतं. पण दिपूलाही चरकत होते सगळे! पण अंजना कशाला चरकेल?

अंजना - देख बाई काजल.. तेरा नय पता.. मै होती तो.. मै तो भाग जाती इसके साथ...

तिला म्हणायचे एक होते अन झाले दुसरेच! आपण इतक्या मोठ्या मोठ्या लोकांमधे एक तर बोलायलाच नको होतं हे तिला कळत होतं! पण डायरेक्ट चाचाला किंवा सीमाकाकूला कसं सांगायचं काहीही? म्हणून मग तिने आपापल्या परीने विचार करून सर्वांदेखत चुकून काजललाच भलता सलता सल्ला दिला. बोलून झाल्यावर मात्र तिला जाणवले, आपली चूक झाली.

सीमाकाकू जी उसळली..

सीमा - काय गं ये भवाने?? आं?? भूक भागत नय तुझी स्वतःचं घर नासून? आं? दुसर्‍यांची घरं नासवतेस?? तुझ्या नवर्‍यासारखा नय माझा जावई.. काजल बरी पळून जाईल..

हे फारच वैयक्तिक होऊ लागलं होतं! अंजना मात्र अचानक सीमाकाकूवर सॉलिड डाफरली.

अंजना - ये.. तोंड सांभाळ.. चिवडे विकून नय मोठे झालो.. ढाबेच्या ढाबे चालिवतोय नवरा माझा.. त्या चाचाची श्रीमंती बघून भाळलीयत दोघं..

आता यशवंतच्या वर्मी घाव बसला. चाचाही अंजनाकडे डोळे वटारून पाहायला लागला. मात्र आयुष्यात प्रथमच, म्हणजे अगदी प्रथमच काशीनाथला आपल्या बायकोच्या त्या वाक्याने सद्गदीत झाल्यासारखं वाटलं! तो कित्येक क्षण तिच्याकडे बघतच बसला. हिला आपल्याबद्दल इतका अभिमान वाटतो??

यशवंत उसळून बोलायला लागणार तोच काशीनाथ सरळ त्याच्या समोर जाऊन उभाच राहिला कंबरेवर हात ठेवून..

यशवंत - ये मधल्या.. हो बाजूला..
काशीनाथ - काय बोलायच ते मर्दाशी बोल.. बाईमाणसाशी बोलायचं नय..

ही हासण्याची वेळ नव्हती. काशीनाथच्या या विनोदावर अक्षरशः कुणीही हासलं नाही. चरकले मात्र सगळे! कारण आत्ता काशीनाथचा चेहरा जसा विलक्षण भयानक दिसत होता तस फक्त अंजनाने दिपू लहान असताना ती त्याच्याशी खेळ करताना काशीनाथने मारल्यावर पाहिला होता.

काशीनाथचा आविर्भाव पाहून मात्र यशवंत, सीमा, चाचा अन चाचाची बायको सगळेच हादरले.

अबू अजूनही इकडे न बघताच पीत बसला होता लांबवर!

गणपतचाचाला 'लवकरच आपल्याला अबूची गरज लागणार आहे' याची जाणीव होऊ लागली होती. कारण पद्याचे दिपूवरचे अंध प्रेम त्याला माहीत होते. त्यात काशीनाथ अन अंजना दिपूच्या बाजूने झाले होते. बायको म्हणत होती हेच खरे हे त्याला पटले. उगाच मोठा चेअरमनचा आव आणून खुर्चीवर बसून मीटिंग बोलावून राहिला होता. दिपू इतका पॉप्युलर असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. त्यात काजलने नवा सुरुंग लावला.

काजल - दिपूसे नय करनेकी तो नय करती शादी.. फिर मेरेको शादीच नय करनेकी..

यशवंत अन सीमासमोर आता परिस्थिती अशी होती की काजलला काही बोलावे तर काशीनाथ मधे पडणार अन दिपूला काही बोलावे तर पद्या! त्यात पुन्हा काशीनाथ यशवंतच्याही 'तथाकथित व त्याच्याच व्याख्येप्रमाणे' वरच्या जातीतला होता. त्यामुळे काशीनाथला तसा उल्लेख करून दुखावणे शक्य नव्हते.

मनीषाला 'आपल्याला जीभ आहे व आपल्याला मतही आहे' याचा तितक्यातच साक्षात्कार झाला. ती अंजनाकडे पाहून बोलू लागली.

मनीषा - हमारे यां रयता था ना दिपू.. इतना शहाणा आहे.. सगळं काम करायचा बिचारा.. आम्ही बहिणींनी इंग्रजी सुद्धा शिकवलं त्याला.. आता अनाथ आहे त्याच्यात त्याचा काय दोष म्हणा?? पण.. जी कोण मुलगी त्याची बायको होईल ना?? सोनं होईल तिच्या आयुष्याचं सोनं..

दोन दिवस तडफडत आपल्याच खोलीमधे बसलेल्या दिपूला आत्ता उलगडा झाला. मनीषाताई मोठ्या माणसांच्या भयाने बोलत नव्हती. शक्य असतं तर तिने आपल्याला अन काजलला पळवूनही नेलं असतं! त्याला भरून आलं! आहे.. कुणीतरी आहे आपलं इथेही..!

खरे तर हा प्रॉब्लेम चाचा अन यशवंतने चुटकीसरशी सोडवला असता. एक दिवस सरळ काजलला घेऊन नाशिकला जायचं अन रजिस्टर्ड लग्न लावून टाकायचं! नंतर रिसेप्शन करता येतंच! पण गणपतचाचाला स्वतःच्या इमेजसाठी स्वतःचे विचार, दिपूवर केलेले उपकार सगळ्यांसमोर वाचून दाखवायचे होते, जेणे करून अमितच्या वैवाहिक आयुष्यात कुणी दिपूचा उल्लेख केलाच तर 'काजलच्या आयुष्यातील एक व्हिलन' असा करेल हे त्याला हवं होतं! त्याचवेळी, यशवंतने कायमस्वरुपी ढाब्यावर वास्तव्य करावं व अमितची बायको अमित अन एकंदर सासरासमोर नमणारी असावी हेही त्याला हवं होतंच! पण प्रकार उलटला होता. तेवढ्यात त्याच्या बायकोने अंजना, झरीनाचाची अन मनीषाकडे बघत मनातील व्यथा अत्यंत विचित्र पद्धतीने मांडली.

चाची - मै बी इनको क्या कह रही हय.. अब इतना सब होगया काजलका और दिपूका.. अब हमारेको यहीच एक स्थळ है क्या.. अमितचं लग्न काय होणार नय? पन्नास मुली येतील चांगल्या घरच्या..

हा एक तिसराच बॉम्ब पडला. जे एक होते त्यांच्यातच भेद निर्माण झाला. दरी पडली. यशवंत अन सीमाकाकू दुखावले गेले.

यशवंत - कयना क्या चाहरही हय भाभी आप?
सीमा - वहीच ना.. आमच्या मुलीला मागणी तुम्हीच घातलीय..

हा वाद वाढू नये म्हणून चाचाने बायकोला सर्वांसमोर झापले. ती सरळ अपमानित झाल्यामुळे उठून आपल्या खोलीत निघून गेली.

अजूनही अबू काहीही बोलत नव्हता.

पण काजल मात्र शांतपणे पण तितक्याच तिखटपणे बोलली.

काजल - आई.. होनेवाली सासको तो मै चाहियेच नय.. कैसे नांदेंगी वहांपें?

पोपट झाला होता सगळ्यांचा! प्रकरण चाचाच्या हाताबाहेर गेले होते.

सीमाने काजलला बदडायला सुरुवात केली. काशीनाथ मुळीच मध्ये पडला नाही. दिपू धावला होता पण पद्याने त्याला धरला. शेवटी यशवंतलाच काजलची कीव आली अन त्याने तिला सीमापासून दूर केले.

आत्तापर्यंत चाचा चवताळला होता. असला प्रसंग ढाब्यावर त्याच्या हयातीत कधी घडला नव्हता. आपणच कामावर ठेवलेल्या लोकांकडून आपणच काय अपमान सहन करायचे??

चाचा भयानक चवताळून बोलला.

चाचा - यशवंत, ये लास्ट टायम है.. मै तेरी बेटी बहू बनानेको मांग रहा.. अगर तू हा कय रहा हय.. तो दिपू.. तू अबीके अबी नौकरी छोडदेनेका.. अबी मतलब अबी.. कल सुभा नय.. कल धोपर नय.. अब्बी.. तेरा जो बी हिसाब हय.. घेऊन जा.. पुन्हा तोंड दाखवायचं नय.. काय समजलास?? चल उठ.. ओ यशवंत.. तुम राजी है क्या..

यशवंत - मै तो हयच.. सीमाबी हय.. इतना बडा झगडा कायको करनेका.. हमारी बेटी.. तुम्हारा बेटा..

चाचा - अय दिप्या... चल निघ.. हा ढाबा तुझ्यासाठी नय आता.. चल.. चल ऊठ..

क्षणात दिपूची नोकरी गेली होती. सर्वत्र सुनसान अन अत्यंत धक्कादायक व दु:खद शांतता होती.

अबू... ...... अजूनही..... काहीही बोलत नव्हता...

आजवर राम रहीम ढाब्यावर जे कधीही झाले नव्हते ते आज झाले होते..

एकाची नोकरीच गेली होती..

तेही.. मालकाने स्वतःच प्रेमाने पाळलेल्या मुलाची.. एका अनाथाची..

तो.. पुन्हा अनाथ झाला होता.. तोच तो दिपू.. ज्याने..

एकेकाळी अख्खा ढाबा आपल्या इवल्याश्या हातांनी चालवला होता..

पंधरा मिनिटांनी .. दीपक अण्णू वाठारे.. पुन्हा हाकलले गेलेले .. पुन्हा जगाच्या शाळेत ढकलले गेलेले..

आपले किरकोळ सामान घेऊन चाचापाशी आले..

चाचाकडे खोलीची चावी देऊन चाचा, अबू, पद्या, काशीनाथ, झरीनाचाची या पाचजणांना वाकून नमस्कार केला.... काजल मृतवत डोळ्यांनी शुन्यात पाहात होती.. न रडत होती.. न बोलत..

दिपू तिच्यासमोर जाऊन उभा राहिला...

दिपू - जाता मै.. जा रहा मै.. लेकिन.. शादीमे आयेंगा.. मै अनाथ है ना.. किसीकेभी शादीमे नाचताय मै..

लाखो करोडो हुंदके दोघांच्याही मनात आतमध्येच गाडले जात होते....

आणि दिपू चार पावलेही पुढे गेला नसेल तेव्हा काहीच झाले नाही अशा थाटात.. आळस बिळस देत.. हातातली बाटली लांबवर फेकून देत... जांभई देत..

दैत्य अबूबकर यांनी शब्द उच्चारले..

अबूबकर - मेराबी हिसाब कर डाल किट्टू..

गुलमोहर: 

मी पहिली
हुश्य आता निवांत वाचते.
बादवे, हल्ली माय्बोलीला भेट दिल्यावर पहिलं नाव मी 'बेफिकीर' शोधते. उगीचच कादंबरी मिसायला नको.

आई गं..बिच्चारे दिपु आणि काजल.... Sad
मला अजीबात वाटत नाही कादंबरी लांबली आहे बेफिकीर..उलट शेवटचे तीन-चार भाग राहिलेत..नंतर दिपु आम्हाला भेटणार नाही..याचे दु:ख होत आहे..ड्रीमगर्लला पण असंच म्हणायचं आहे ना?

हा भाग पण मस्त झालाय.
आणि बादवे या कादंबरीचे शेवटचे तीन ते चार भाग उरलेले आहेत अस म्हणू नका. फार छान लिहिता तुम्ही. इतक्या लवकर संपली कादंबरी संपली तर आमच्या सारख्या वाचकांच काय होणार?
पुलेशु

भन्नाट वेग आहे राव तुमचा आणि लेखन शैली तर अप्रतिम आहे.
<< अबू अंधारातही पीतच होता. मात्र तो मीटिंगच्या वर्तुळापासून लांब, साधारण तीस एक फुटावर एकटाच बसला होता. >>
मला थोडी कल्पना आलिच होति ह्या ओळी वाचुन कि असच काहितरी होणार अस.
आता अबु दिपुला दत्तक घेणार कि काय हिच एक शन्का रहिलि आहे.
शेवटी प्रेम हे प्रेमच असत कि २ वर्षानी काय नि ४० वर्षानी काय प्रेम कधी बदलत नाहिच......
लवकर शेवट करु नका................(अजुन थोडी ताणवलीत तरी चालेल.)
पु.ले.शु.
तब्बेतिची काळजी घ्या...........
आणी आपली नवि कादम्बरी कधी सुरु करताय..................
धन्स.......

शेवटचे ३-४ भाग!!! Sad Sad Sad काय बोलू आता Sad नका ना असं करू Sad

बाकी, आजच्या भागाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे... किती वेगवेगळे पैलू आहेत आजच्या भागाला!!!

दिपूविषयीची सगळ्यांची मतं... दोन प्रेमी जीवांच्या लग्नात वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळ्या कारणांनी असलेला विरोध आणि समर्थन, मग मिटिंगमध्ये ह्याच लोकांचे आपाआपल्या मतांनुसार व्यक्त होणे हे अतिशय सुसंगतपणे मांडले आहे. इतकी पात्र असतांनाही ही सुसंगती कुठेही बिघडत नाही, यात तुमच्या लेखनशैलीबरोबरच स्मरणशक्तीचे सुद्धा कौतुक करायला हवे...

काजल आणि दिपूची तडफदार उत्तरे पाहून खरंतर धक्क्यावर धक्के बसले...पण लहान / किशोरवयातील मुलांना दुखावले की रिअ‍ॅक्ट होतांना ते कसलीही भिडभाड ठेवत नाहीत. त्यातून प्रेमाच्या मामल्यात तर कोणत्याही वयातली लोकं कोणालाही दुखावायला मागेपुढे पहात नाहीत, ह्याचा सर्वांनाच कधी ना कधी अनुभव आला असेलच, हा सगळा विचार करता काजल-दिपूची रिअ‍ॅक्शनही नैसर्गिकच वाटली...

शेवटी, ह्या सगळ्या ताणाच्या प्रसंगानंतर अबूची पंचलाईन वाचून मोठ्ठाच रिलिफ मिळाला... आजचा दिवस शांततेत जाईल आता.. धन्यवाद Happy

आजचा दिवस शांततेत जाईल ..................... शक्यच नाही,

पूढचे भाग वाचल्याशिवाय कोणताच दिवस शांततेत जाणार नाही.

कळावे, लोभ असावा.

तुम्हि खूप सुन्दर लिहित आहात्..या कथानकावर १ सुन्दर चित्रपट बनु शकेल....

आजचा भाग खूपच सुन्दर आहे....

छान आहे हा भाग. पण कादम्बरी सम्पवु नका आताच. हि एकता कपूरची सिरियल नाही, मान्य पण जरा आणखी चालु देत. दिपु आणि काजलला जरा सन्धी दया. ते स्वताला प्रुव्ह करु देत. शिवाय इतकी पात्र आहेत तर स्टोरी आणखी खुलु दया. प्लिज सम्पवु नका.

बादवे, हल्ली माय्बोलीला भेट दिल्यावर पहिलं नाव मी 'बेफिकीर' शोधते. <<< मी देखिल Happy
मस्त रंगलीय कथा.
अबूबकर - मेराबी हिसाब कर डाल किट्टू.. <<< या वाक्याने धीर आलाय आणि पुढे काय होईल याची उत्सुकताही Happy

जबरदस्त !

बेफिकीर!! खरं तर कादंबरी संपल्यावर एकदमच प्रतिसाद द्यावा असे ठरले होते. पण हा भाग इतका अप्रतिम झाला आहे, की बस्स.
खरीखुरी प्रेमप्रकरणे कशी असतात, त्यांचे (सर्वसामान्य) परिवारात कसे प्रतिसाद उमटतात, मानवी स्वभावाचे बारीकसारीक कंगोरे कसे असतात इ. बाबत तुमचे निरीक्षण दाद देण्याजोगे आहे.

तुम्ही खरोखर दुनिया पाहिली आहे !

वादच नाही.

('स्टोरीटेलिंग', 'कादंबरी' इज यॉर जॉनर, माय फ्रेंड ! प्लीज डेव्हलप इट !!)

माझ्याकडे शब्दच नाहित !! अप्रतिम !!! उत्कंठा वाढतेय !!!
<<या कथानकावर १ सुन्दर चित्रपट बनु शकेल....>> अनुमोदन
एखादी मालिका पण बनु शकेल...आजच्या रटाळ आणि कंटाळवाण्या मालिकांपेक्शा तुमची कलाकृती तर केव्हाही श्रेष्ठ, सर्वोत्तम ! माझ्याकडे खरच शब्दच नाहित..समजुन घ्या, प्लीज..:)

सर्व वाचक व प्रतिसादकांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनापासून अनेक आभार!

मायबोलीच्या व्यवस्थापनाचा मी ऋणी आहे.

-'बेफिकीर'!