गव्हाचा खिचडा (यम्म्मीSSSS)

Submitted by नानबा on 18 March, 2010 - 14:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

गहू,
तूप
हिरव्या मिरच्या
लसूण
कोथिंबीर
मीठ
पाणी

क्रमवार पाककृती: 

गहू भिजत घालायचे - नंतरचे दोन ते तीन दिवस, ते स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घालायचे.
आता त्यातून थोडासा चिक बाहेर यायला लागेल (आणि चव पण छान आंबूस होईल)
तिसर्‍या/चौथ्या दिवशी मिक्सर मधून भरड फिरवून घ्यायचे (दलियाच्या सारखे जाड झाले पाहिजेत हे)
मग कूकरमधे मिरच्या,लसूण,जीरे (एकत्र ठेचून), मीठ आणि पाणी आणि हे भरडलेले गहू घालायचे - एक शिट्टी झाली (कुकरच्या क्षमतेनुसार कमी जास्त शिट्ट्या करा - तत्व हे की कण्या शिजल्या पाहिजेत, पण एकजीव व्हायला नकोत. खाताना कणी दाताखाली तर आली पाहिजे, पण शिजली नाहिये आणि कष्ट करून चावायला लागतेय असं नको व्हायला) की आधीच सरबरीत नसेल तर पाणी घालून सरबरीत करायचं, थोडिशी साखर घालायची (चवी नुसार मीठ अ‍ॅडजस्ट करायचं).
ह्याला एक उकळी आली आणि कन्सिस्टन्सी पाण्यासारखी न रहाता पातळ पण दाट झाली, की वर तूप आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून गरमगरम खायची.

वाढणी/प्रमाण: 
माहित नाही! ;)
अधिक टिपा: 

१. असाच बाजरीचा पण करतात खिचडा.. शेजारच्या आजी करायच्या - त्यामुळे कधी करून नाही पाहिला..
२. जर गहू भिजवून सगळे सोपस्कार करायची इच्छा नसेल तर शॉर्टकट असा:
गव्हाऐवजी डायरेक्ट दलिया कूकरला लावायचा, आणि मग उकळी यायच्या वेळी लिंबू पिळायचं आंबूसपणा साठी. हे पण छान लागतं - पण वर दिलेल्या गव्हाच्या कृतीइतक नाही - कारण त्यातला आंबूसपणा गव्हानं स्वतः अ‍ॅक्वायर केलेला असतो.. मस्त लागतं त्यामुळे!
३. दिवसातून एकदा गव्हातलं पाणी नक्की बदलत रहा - नाहितर गव्हाला वास येईल (मी जवाबदार नाही बरका! :P)
४. गव्हाचं स्टेटस बघून २ दिवस पाणी बदलायचं का तीन दिवस ते ठरवा (पण मिनिमम दोनदा पाणी बदल - म्हणजे तीन दिवस गव्हाचं भिजणं आवश्यक असतं असा अनुभव आहे)
५. तूपानं मस्त चव येते.. शक्य असेल तर स्किप करू नका.. वजनाची काळजी असेल तर तुमच्या बोलमधे वासापुरतं तूप घाला, पण घालाच!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच ज्वारीचा केला तर चांगला होइल का? घरी ज्वारी आहे म्हणुन विचारतेय.
>> थोड्याशा ज्वारीची ट्राय कर, आम्हालाही सांग .. Wink
आणि पेटंट घे त्याचं ... (माझ्याकडे ज्वारी नाही, नाहीतर प्रयोग करून नक्की सांगितलं असतं.. पण बाजरी, गहू दोन्हीचं करतात - म्हणजे ज्वारीचं चांगलं लागायलाही हरकत नसावी!)

हिर्वि मिरची विसरलीस का? थोडे तांदूळ पण चांगले लागतात त्यात.
>> नाही ग. मिरची म्हणजे हिरवी मिरची अशा अर्थानं लिहिलेलं.. सुधारलं आहे..
आणि तांदूळ पण भिजवायचे का डायरेक्ट टाकायचे गहू/ज्वारी/बाजरी शिजवताना?

मस्त पौष्टिक पा.कॄ.टाकत्येस!
>> धन्स ग तोषवी. ह्यात भाज्या सदृश्य फारसं काही नसतं.. पण आरोग्यदायी फायबर भरपूर!
हे फायबर वाईट कोलेस्टरॉल कमी करायला मदत करतं!

नानबा! गहु ३ दिवस भिजवायचे म्हणजे 'कुरडई'ला भिजवतो तस का?मग ३ दिवसानी दळल्यावर ते चिकट नाही का होत Uhoh कि गहु कोरडे करून दळायचे?.

छान पाकृ! मला करून नाही पाहता येणार, गहू वगैरे मिळणे अवघड आहे!

अगं, तू पाकृच्या नावात यम्मी वगैरे लिहील्याने कदाचित पाकृ शोधायला त्रास पडेल असं वाटतंय. मला तर बर्‍याचदा पाकृच सापडत नाहीत, म्हणून विचार आला डोक्यात.

मस्त. इथे हैद्राबादेत त्यात खीमा/ मट्न व गरम मसाला घालतात. येथील पेट डिश आहे. वन डिश मील मध्ये पण येइल नाही का? पण नाने, किती हे घरकाम करतेस ग. थोडी झोप घे दुपारी Happy

नानबा, सही पाकृ! Happy
मंजुताई, ज्वारी भिजवू नकोस, वर नानबाने सांगितले आहे ना दलियाच्या खिचडीबद्दल तसे कर. आई करते एकदम यम्मी!

निबंध, करून बघ.. आणि नंतर कधीतरी चुन्नुच्या पद्धतीनं.. कुठली पद्धत चांगली हे ज्ञान तुला अनुभवातून आणि आम्हाला आपसूकच मिळेल Wink (इथे टाक मात्र नक्की!)

मामी, अहो ह्या सगळ्या आत्ता केलेल्या कृत्या नाहियेत... काही आत्ता.. काही पूर्वी..
थोडी झोप घे दुपारी >> हाफिसात तेवढच तर काम आहे सध्या! Wink

नानबा असाच बाजरीचा करतात. (मी मागे लिहिली होती कृति) तो मसालेदार असतो.
गहू भिजवलेले पाणी टाकायचे नाही. ते प्यायले तरी चालते. किमान भाजी आमटीत वापरावे.

निबंध, भिजवलीस आहेस ज्वारी तर मग त्याच्या पापड्याच कर. Happy म्हणजे मग तूझा नेहेमीचं घरकाम केल्यावर उरणारा वेळ सत्कारणी लागेल... Proud

नानबा असाच बाजरीचा करतात. (मी मागे लिहिली होती कृति) तो मसालेदार असतो.
>> दिनेशदा लिंक द्या की शक्य असेल तर!

भारी आहेस की..
>> मी नाही ग, मातोश्री!

कुरडईचं पीठही असंच भिजवतात..
>> आहाहा.. नको त्या आठवणी!!! खावसं वाटायला लागलंय! (तेल घालूनही मस्त लागतं!)

अगं, तू पाकृच्या नावात यम्मी वगैरे लिहील्याने कदाचित पाकृ शोधायला त्रास पडेल असं वाटतंय
>> हो का? अग, पण शब्दखुणांचा उपयोग नाही का होणार?

मग ३ दिवसानी दळल्यावर ते चिकट नाही का होत
>> पाणी ओतून फिरवायचे मिक्सर मधून, पण गहू पूर्ण कोरडे नाही करत...
अग, जे काही असतं ते यम्मी होतं बघ!!!!

वाचल्यावर रहावलचं नाही. घरी इथे गहू तर नसतो माझ्याकडे, म्हणून आज लगेच दलिया वापरून बनवला खिचडा. अहाहा..:) एरवी जेवायचं म्हटलं की नखरे करणार्‍या लेकानेही खूप आवडीने खाल्ला.
आता गहू आणून करणार.

हि मी अगदी पहिली पहिली लिहिलेली कृति. पण माझी नव्हती (म्हणून इथेच लिहितोय) थोर कवयित्री शांता शेळके, यानी खुप वर्षांपुर्वी कालनिर्णय मधे लिहिली होती.
ती साधारण अशी,
दोन कप बाजरी, पाण्याचा लात लावून सडायची (धुवून निथळून, ओलसर असतानाच मिक्सरमधून जरा फिरवली तरी चालते ) आणि पाखडून कोंडा काढायचा. हि कृति फ्क्त बाजरीतला कोंडा निघण्यापुरतीच करायची. बाजरी बारिक करायची नाही.
मग ती भिजत घालायची. त्या बरोबर वेगवेगळे, मूठ मुठ भर तांदूळ, चण्याची डाळ, आणि शेंगदाणे भिजत घालायचे.
तेलाची फोडणी करून त्यात उभा चिरलेला कांदा परतायचा. त्यात काळा मसाला व आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचे. मग त्यात पाणी ओतायचे. त्याला उकळी आले कि तांदुळ, डाळ आणि दाणे वैरायचे.
ते शिजले की बाजरी टाकायची. मीठ टाकून शिजू द्यायचे. मग तूप घालून खायचा.
हा प्रकार कूकरमधे चांगला होतो. पण थंडीत खायला छान.
शिळा झाला तरी चांगला लागतो. बाजरी उष्ण पडत असेल तर डाळ, तांदुळ वाढवता येतात. यातच मसाला न घालता, दूध गूळ घालूनही हा खिचडा चांगला लागतो.
आज अनेक वर्षानंतर, त्यांच्या अवीट गाण्यांसारखीच, हि कृति पण लक्षात आहे.

दिनेशदा आता एक अडाणी शंका मी काल रात्री ज्वारी भिजवली आहे त्याचा कोंडा नाही काढला तर चालेल का? म्हण्जे नुसताच ओबड-धोबड मिक्सीमधुन काढले तर चालेल का?

तुझ्या कृत्या सोप्या व चविष्ट व पौष्टीक असतात नानबा. ही पण करुन पाहीन. ह्यात भाज्या नसल्या तर बाजुला वाडगाभर कोशिंबीर करुन ठेवेन. प्रोटिन्स साठी डाळसुप वगैरे ठेवीन. झाले समतोल.
काल ती गोधुकीमा केली. छान लागली.

अहाहा आत्ताच केला ज्वारीचा खिचडा एकदम यम्मी Happy
आता माझी रेसिपी - ज्वारी एक वाटी, ह.डाळ, तांदुळ, आणि शेंगा प्रत्येकी एक मुठ असे सगळे वेगवेगळे भिजवले. ज्वारी दोन दिवस बाकीचे सगळे एक रात्र भिजवले. सकाळी तांदुळ ,डाळ पहिले मिक्सीमध्ये पाण्याबरोबर भरड वाटुन घेतली नंतर ज्वारी, कढीपत्ता, हि.मिरची थोडाजास्तवेळ (थोडी जास्त बारिक)मिक्सिमध्ये पाण्याबरोबर भरड वाटुन घेतली. मी कोंडा काढले नाही. मग कुकरमध्ये फोडणी करुन त्यात बारिक चिरलेला कांदा, लसुण घातले. नंतर वरिल धान्य, शेंगा, १/२ चमचा मेथी पावडर, मीठ, कोथिंबिर घालुन, तीन वाट्या पाणी घालुन एक उकळी आली की कुकर लावला आणि एका शिट्टीनंतर ग्यास बंद केला. गरम-गरम खिचडा, तुप व लोणच्याबरोबर खाल्ला. Happy थोडे थंड झाल्यावर दह्याबरोबर पण मस्त लागला.
दिनेश, नानबा धन्यवाद! आज इथे ६ इंच स्नो झाल्यामउळे थंडीत गरम-गरम खायला मजा आली. Happy

नानबा, ही रेसेपी सार्वजनिक कर ना. मी खिचडा म्हणून सर्च दिला तर दिसलीच नाही रेसेपी. (मग आधी पोह्याच्या उकडीचा सर्च दिला आणि तिथून तुझ्या पाऊलखुणांमधून इथे आले. Wink )

करून बघितला खिचडा. एकदम प्रेमात पडलेय पदार्थाच्या! २-३ दिवस आधी भिजवून ठेवणे सोडले तर एकदम सोप्पाय पदार्थ. बरोबर एखादे सॅलड घेतले की बासच!