लग्नातल्या गमतीजमती

Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25

एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.

सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)

तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्‍या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)

या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुई, विनय Biggrin
आमचं लग्न गोरज मुहूर्तावर झालं, त्यामुळे लग्नविधी सगळे नाईटमारून करावे लागले. रात्रीचा १.५ वाजला तरी यांच दळण संपेना. आम्ही जांभया देत देत लग्नविधी सांगीतल्याबरहुकुम करत होतो त्यामुळे कित्ति कित्ती एडिटावं लागलं असं विडियोवाला नंतर म्हणाला. शेवटी मी न राहवून भटजींना "अजून किती वेळ हो" असं विचारलं. नववधूने असं विचारल्यावर ते बेशुद्ध पडायच्या बेतात होते. त्या गडबडीत आता मला सात फेरे होते की पूनम म्हणते तसे तिन ते आठवत नाहिये. घरी जाउन ती भीषण सीडी शोधेन म्हणत्ये. Proud

Biggrin
रैना माझंही लग्न असंच अवेळी झालंय. सकाळी छान रजिस्टर लग्न, मग संध्याकाळी रिसेप्शन अन रात्री सा.बाईंच्या आग्रहाखातर आर्यसमाज + पंजाबी पद्धतीने फेरे वैगरे. तर त्या फेर्‍यांचा मुहुर्त रात्री २ वाजताचा होता, अन बिदाई पहाटे ३.३० -३.४५ ला. भटजी सोडले तर बहुतेक सगळेच अर्धवट झोपेत होते. अगदी सगळ्यांचे जांभया देतानाचे फोटो आहेत अल्बममध्ये.
झोपेमुळे मलापण आम्ही नक्की काय काय विधी केले ते आठ्वत नाही. Proud एकुणच आमचं लग्न जवळपास आठवडाभर चाललं होतं. टाकेन एक एक करुन वेगवेगळे किस्से.

झोपेमुळे मलापण आम्ही नक्की काय काय विधी केले ते आठ्वत नाही.

ते असू दे. एखादे अपत्य झाल्यावर लग्ना नंतर काय केले ते जन्मभर आठवत राहील! Light 1 Wink

माझ्या मुलीच्या लग्नात योग्य वेळ आल्यावर, मुलाच्या करवलीनेच नवर्‍यामुलाला हार घालायचा प्रयत्न केला!!
दुसर्‍या एका लग्नात नवर्‍या मुलाच्या शेल्याची नि नवरीच्या पदराची गाठ करवलीने एव्हढी घट्ट बांधली की नंतर ती सोडवता, सोडवता सगळ्यांच्याच नाकी नऊ आले. बरे, भारीपैकी शालू, तो कात्रीने कापणार कसा?
Happy

होना अल्पना.
मुलाच्या करवलीनेच नवर्‍यामुलाला हार घालायचा प्रयत्न केला>> Biggrin
नंणदेच्या लग्नात भट्जी जरा येडे होते असं त्यांच मत आहे. त्यांनी कन्यादान करणा-या काकांनाच जिजाजींच्या बोटात अंगठी घालायला सांगीतली म्हणे. तो फोटो पाहून (पुरुषानी पुरुषाला अंगठी घालायचा प्रसंग) अमेरिकेत लोकं त्यांना प्रचंड चिडवतात.

माझ्या मामेबहीणीच्या लग्नात मामेभावाला नवरीसाठी गजरे आणायला पाठवले. गजर्‍याची ऑर्‍डर आधीच देवून ठेवली होती. हा जाऊन झेंडूच्या फुलाचे हार घेवुन आला. ते पुडकं आम्ही अगदी लास्ट मिनीट नवरीला मांडवात पाठवायच्या वेळी उघडले. मग नंतर भावाची कानउघडणी झाली यावरून. तो म्हणे त्या फुलवाल्यानेच दिले ते हार मी काय करू.

सही आहेत एक एक किस्से....
लग्नात एक विधी असा असतो कि होमात लाह्या कि काहितरी टाकयच्या असतात. तेव्हा नवर्‍यामुलीने उभ राहुन टाकायच्या आणि नवर्‍याने बसुनच. भटजी माझ्या लहानपणापासुन ओळखीचे होते त्यामुळे त्यांना सरळ विचारल 'मी का म्हणुन उभ रहायच सारख सारख??' Proud त्यांना काही उत्तर सुचल नाही का काय सांगितल मला आत्ता आठवत नाही पण नंतर नवर्‍याच उत्तर 'पुर्वी मुली लहान असत न त्यामुळे त्यांचे हात पोचत नसतील म्हणुन त्यांनी उभ रहायच' Uhoh

आपल्याकडे लग्नात कानपिळी असते. माझ्या लग्नात माझ्या भावाने इतका करकचून नवर्‍याचा कान पिळला होता. माझा लग्नातला सगळ्यात आवडता विधी. Happy

आमच्या लग्नात आदल्या रात्री सावंतांची गाडी मुंबईहून उशीरा आली. पण ते लोक पोचण्याआधी संदीपचा एक मित्र (म्हणे!) हॉलवर पोचला. आम्ही वाटच बघत होतो सावंत आणि कंपनीची.
हा माणूस आला तो डायरेक्ट वधूपक्षाच्या रूमकडेच आला. माझ्या मामाने त्याला अडवलं. कोण काय इत्यादी विचारलं. तो म्हणाला सावंत आहेत ना इथे. मामाचा खाक्या पक्का कोकणस्थी. सगळं स्पष्ट विचारल्याशिवाय सोडलं नाही.
कोण सावंत?
संदीप सावंत. आहेत का ते आत?
अजून पोचले नाहीत मुंबईहून. येतील. तुम्ही बसा.
मला मिसेस सावंतांना भेटायचंय.
(इथपर्यंत त्याने वधूपक्षाच्या रूमच्या दारापर्यंत मजल मारली होती. त्याने हाक मारली.)
सावंत?
मी प्रश्नार्थक बघू लागले.
मिसेस सावंत ना?
(अजून नाही. लग्न उद्या आहे. पण मी आडनाव बदलणार नाहीये त्यामुळे मिसेस सावंत म्हणता येणार नाही इत्यादी सगळं मी मोठ्या मुश्कीलीने मागे परतवलं.)
हं!
मी संदीपचा पार्ल्यातला मित्र आहे. अमुक अमुक नाव. मी उद्या येऊ शकणार नाहीये तर तुम्हा दोघांसाठी हे गिफ्ट आणलंय ते आत्ताच देतो. आणि मी निघतो.
अहो आम्ही आहेर घेणार नाही आहोत. इति मी.
नाही असं म्हणू नका. घ्याच. संदीप पार्ल्यातला खूप चांगला मित्र आहे माझा.

(इथे माझी विनाकारण ट्यूब पेटली. संदीपच्या पार्ल्यातल्या मित्रांना मी तेव्हा ओळखत नव्हते पण ते सगळे व्यवस्थित महाटवाळ आहेत असं ऐकून होते. त्यामुळे त्यांच्यापैकीच कुणीतरी माझी फिरकी घेत असावं असं मी समजले.)
तुम्ही असं करा. संदीप मित्र आहे ना तुमचा मग तो येईपर्यंत थांबा आणि मग तो आल्यावर त्याला भेटूनच जा.
थांबलो असतो पण मला उद्या पहाटे खूप महत्वाची मिटींग आहे. त्यामुळे थांबता येणार नाही. पण संदीप ओळखेल मला.

इत्यादी त्याने सुरू केले आणि हटायचे नाव घेईना ना. बर नवरीमुलगी मीच असल्याने दम देणे वगैरे प्रकार मी टाळत होते दोन तीन दिवसासाठी. त्यात हा संदीपच्या ग्रुपपैकी आहे म्हणजे आत्ता मी कूल नाही राह्यले तर पुढे सगळे मला पिडणार याची खात्री होतीच. Happy

शेवटी मामा मधे आला. त्याला तसंही मोठ्याने बोलायची सवय आहे. त्या सवयीचा उपयोग करून घेत त्याने त्या माणसाला गोड गोड बोलत बाहेर हॉलमधे नेलं. आणि एका खुर्चीवर बसवून त्याचा अक्षरशः इंटरव्ह्यू घेतला. त्यात त्याने रात्री मिनिस्टरबरोबर आणि उद्या सकाळी एका उद्योगपतीबरोबर मिटींग आहे असंही सांगितलं.

एकदाची सावंत मंडळी आली. मग उशीर झाला होता त्यामुळे सगळे विधी आणि पटापट जेवणं उरकली गेली. तोवर त्याच्याकडे लक्ष नव्हते कुणाचे. जेवण झाल्यावर पान खात खात संदीप आणि माझा एक भाऊ हॉलच्या गेटशी गेले तेव्हा संदीपला तो माणूस भेटला. तो बाहेरून येत होता. संदीप त्याला म्हणे अरे तू इकडे काय करतोयस? तर तोही संदीपला म्हणे तू इकडे काय करतोयस? माझ्या भावाला आधीचा किस्सा माहीत असल्याने तो एव्हाना जामच गांगरला होता.
संदीप म्हणाला माझं लग्न आहे उद्या सकाळी इथे.
तो - अरे हो हो. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय.
संदीप - आम्ही आहेर घेणार नाही आहोत.
तो - तरी घेच. मला उद्या येता येणार नाही.

बोलत बोलत ते सगळे हॉलमधे आले. मी तिथेच बसले होते. माझ्या आणि संदीपच्या हातात एकेक उंची सेंटची बाटली खुपसून तो प्राणी निघून गेला.

आम्ही सगळेच गांगरलेलो होतो.

बर दुसर्‍या दिवशी पण हा इसम लग्नाला आला होता. मोठं गिफ्ट आणायचं होतं पण जमलं नाही. मुंबईत आलात की देतो म्हणून निघून गेला.

शेवटी संदीपला विचारलं तेव्हा कळलं की तो पार्ल्यातलाच आहे. शाळेत होता पण काही मित्र म्हणवण्यासारखा नाही. आणि शाळेनंतर कधी भेटलाही नाही. पण त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्याचं ऐकलं होतं असं संदीप म्हणाला.

लग्नाला ८ वर्ष होत आली तरी अजून परत कधी त्या व्यक्तीची भेट घडलेली नाही.

माझ्या लग्नातला भटजी अत्यंत खडूस होता. ते गळ्यात घातलेल्या हारामध्ये लाल मुंग्या होत्या. लग्नाचे विधी चालू असताना मी हार काढून ठेवत होते तर भटजी चक्क ओरडला.

नंतर वरपक्षाच्या रूमकडे आल्यावर सासर्‍यानी माझी लाल झालेली मान आणि पाठ बघितली आणि मग भटजीची जी बिनपाण्याने केली. लक्ष्मीपूजन करताना ते सर्व सीडीमधे आलय आणि गाणं वाजतय.. "मै पिया तेरी तू माने या ना माने..."

हा किस्सा माझ्या आईने मला सांगितला............आई-बाबांच्या लग्नातला....
main भटजींच्या हाताखाली assistant म्हणून अगदी तरूण (जेमेतेम १८ वर्षांचा) मुलगा आला होता. भटजी असल्याने धोतर-सदरा-टोपी असा त्याचा वेष होता. मध्येच लग्नाचे विधी चालू असताना माझ्या बाबांना त्या भटजींना काहीतरी सांगायचे होते तर बाबांनी त्यांना "अहो आजोबा...." अशी हाक मारली. तो तरुण बिचारा इतका लाजला की बास रे बास. ओशाळवाण्या तोंडाने म्हणाला "अहो माझे लग्न देखील झालेले नाही हो अजून.....". माझ्या आईला असले हसू कोसळले की विचारता सोय नाही. वास्तविक तो तरुण मुलगा माझ्या आईचा student होता. आई tuition मध्ये शिकविण्यास जात असे. तेव्हा तिच्या वर्गात हा होता. त्यामुळे आईने नंतर पूर्ण विधी होइस्तोवर त्या मुलाच्या नजरेस नजरही नाही मिळवली.

माझ्या एका चुलतभावाचे लग्न मध्य प्रदेशात सारणी या ठिकाणी (गावी) झाले. माझ्या वहिनीचे हे गाव. लग्न झाल्या झाल्या वर्‍हाड परतीच्या प्रवासासाठी निघणार होते म्हणून वधूकडील मंडळींनी लग्नाचे रिसेप्शन लग्नाच्या आदल्या रात्रीच ठेवले होते! सर्व वर्‍हाडी मंडळींची सोय वधूकडच्या लोकांनी ओळखीच्या काही लोकांच्या रिकाम्या बंगल्यांमध्ये केली होती. लग्नाच्या दिवशी सकाळी एक परीट सुध्दा वराकडच्या लोकांसाठी ऑर्गनाईझ केला होता. विवाहदिनी सकाळी सकाळी परीट ''इस्त्रीसाठी काही कपडे आहेत का'' विचारायला आला. चुलतभाऊ व त्याचे मित्र, सर्वांनी हौसेहौसेने ते लग्नात घालणार असणार्‍या पॅन्ट्स ''औरभी कडक इस्त्री कर के लाना'' म्हणून त्या परीटाकडे सोपवल्या. एक तास गेला, एकाचे दोन, दोनाचे तीन तास झाले... आणि त्यानंतर लग्नाची घटिका जवळ येत चालली तरी परीटाचा पत्त्याच न्हाय!!!! सर्व मित्र व भाऊ करुण चेहर्‍याने, बाकीचे सर्व आवरून, कमरेला टॉवेल गुंडाळून बसलेले!!!! मुलीकडचे लोक ही मुले तयार व्हायला इतका वेळ का घेत आहेत म्हणून परेशान! कोणी विचारायला आले तर हे लोक दार लावून बसलेले! मग मुलीकडच्या कोणालातरी ही परटाची बातमी समजली, त्याने त्या परटाला कॉलर धरून आणले. पहिली नवरदेवाची पॅन्ट इस्त्री करून घेतली! मग तिथेच परटाने इस्त्री करायच्या राहिलेल्या उरलेल्या पॅन्ट्सना इस्त्री मारली. जसजशी इस्त्री पुरी व्हायची तसतशी गरमागरम इस्त्रीची पॅन्ट घालून ऐन मे महिन्याच्या भाजून काढणार्‍या उन्हाळ्यात भावाचे दोस्त सजून धजून लग्न मांडवात एन्ट्री घेत होते.

भावाला सर्वांनी त्या पॅन्ट प्रकरणावरून नंतर भरपूर चिडवून घेतले!!

मी शाळेत असतांनाचा हा किस्सा. आमच्या कॉलनीतच एक लग्न होते, ऐन लग्न लागायच्या थोडा वेळ आधी मांडवात सगळे जमलेले असतांना लग्नघरच्या लोकांना कळले की ते लग्न लावण्यासाठी भटजींनाच बोलवायला विसरले. Proud
मग आमच्या शेजारी रहाणार्‍या कुलकर्णी काकांना, तुम्ही ब्राम्हण आहात तर आता तुम्हीच लग्न लावा म्हणून मागे लागले. ते काका बिचारे सांगून सांगून थकले की अहो मला काही विधी माहित नाहीत मी लग्न लावणारा भटजी नाही, तो वेगळा असतो. इ.इ. तरी ते लोक ऐकायला तयारच नव्हते,काही होत नाही तुम्हीच लग्न लावा असे करत बसले. मग शेवटी २ तासांनी कुठूनतरी एक भटजी पकडून आणला आणि लग्न लावले गेले.

आम्हि जुळ्या बहिणी
माझ्या लग्नात माझ्या सासर कडचे लोक
फसले[ माझ्या बहिणी ला मी समजुन ]
न तिच्या लग्नात तिच्या सासर कड्चे लोक फसले [मला ति समजुन
खुप मज्जा आलि

आमच्या गावात लग्न केंव्हाही करता येतं. म्हणजे मुलं बाळं झाल्यावर अगदी १०-१५ वर्ष एकत्र संसार केल्यावरहि लग्न करता येतं. एकदा असंच माझ्या एक मित्राच्या आई वडिलाच लग्न होतं. आमच्याकडे तेंव्हा घरी जाऊन लग्नाचं निमंत्रण (तोंडी) देण्याची पद्धत होती ( आजही काहि प्रमाणात आहेच). तर मी आणि माझा मित्र गावातील प्रत्येक घरी जाऊन लग्नाचं निमंत्रण देत होतो. आमच्या गावाचा तलाठि नुकताच (१-२ महिने) नागपुरहुन कुडकेल्लीत आला होता. मी आणि मित्र तलाठ्याच्या दारात उभे. तलाठिन बाईनी विचारलं. काय रे पोरानो कोण पाहिजे?. मी मित्राकडे बोट दाखवत " याच्या आई बाबाचं उदया लग्न आहे, तुम्हाला निमंत्रण दयायला आलो".
आईवडलांच्या लग्नाचं निमंत्रण दयायला त्यांचाच मुलगा येतो हे ऐकुन बाई चॅट पडल्या. पोट धरुन हासत सुटल्या.

आमच्या गावात लग्न केंव्हाही करता येतं. म्हणजे मुलं बाळं झाल्यावर अगदी १०-१५ वर्ष एकत्र संसार केल्यावरहि लग्न करता येतं. >>> कुठे चालतो हा प्रकार? Uhoh
ऐकावं ते नवलंच! :-०

मधुकर..तुम्हाला सेपरेट एक लेख टाकायला पाहिजे या किंवा अजून काही चालीरीती ज्यांच्याबद्दल साधारणपणे कोणाला माहिती ही नसते. असं काही सोशियॉलॉजी चा अभ्यास करताना वाचलं होतं..

माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात तिच्या मुंडावळ्या जरा सैल झाल्या आणि सारख्या खाली सरकत होत्या. नवरदेवाच्या लक्षात आल्यावर त्याने पटकन तिच्या जरा मागे उभं राहुन नीट बांधुन दिल्या. बहिण बिचारी लाजून 'अरे नको नको...मी सांगते कुणाला तरी' म्हणतेय आणि आम्ही सगळे हसतोय. फोटो पण आहे त्यांचा तसा. (हा किस्सा आधी सांगितला असल्यास सगळा दोष वाढत्या वयाचा :फिदी:)

Pages