चलो शिवाजी पार्क - विराट मेळावा

Submitted by मंजूडी on 30 January, 2010 - 13:50

लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक

गाड्या भरभरून आले सगळे लालूला भेटायला...

कुठे?? शिवाजीपार्कात...

शिवाजीपार्कात?? बालेकिल्ल्याच्या सम्मोर??

होय, होय.... लालूभेटीसाठी जमले मराठमोळे लोक शिवाजीपार्कात... बालेकिल्ल्याच्या सम्मोर Wink

अहो कोण लालू काय विचारताय... आपली मायबोलीकर लालू.... कोल्हापूरची अस्सल मराठमोळी लालू.

लालू उर्फ शर्मिलाच्या भारतभेटीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या गटगला खालील मायबोलीकर आपापल्या कुटूंब कबिल्यासकट हजर होते:-

१.लालू उर्फ शर्मिला
२.शर्मिला फडके
३.रैना + श्री. रैना
४.भ्रमर
५.विनय भिडे
६.मन्या2804
७.मनिषा लिमये
८.अश्विनी के
९.ललिता प्रीति
१०.असुदे
११.mayuri1
१२.आशुतोष0711
१३.नीलवेद
१४.साधना
१५.आनंदसुजू
१६.मंजूडी
१७.डू आय
१८.गजानन +सौ. गजानन + आरोही
१९.सुजा
२०.थंड
२१.मनी
२२.मेधा2002
२३.किरू +सौ. किरू + आर्या
२४.आनंद मैत्री
२५.घारूअण्णा
२६.नीलू + मैत्रीण

वरील लोकांशिवाय माझ्या माहितीप्रमाणे पूनम आणि नीरजाने फोनरूपाने उपस्थित राहून गटगचा आनंद लुटला. (अजून कोणी फोन केला असेल तर सांगा रे)

वरच्या यादीत कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझ्या स्मरणशक्तीचा दोष समजा. Wink

ह्या प्रसिद्ध उसगावकर व्यक्तिमत्वाला भेटायला शब्दशः गाड्या भरून लोक आले. ठाण्याहून सुटलेल्या आशूतोषच्या गाडीतून तब्बल सहा मायबोलीकर बसून आले. केळकरांच्या मांडीवर आपले १३१२ बसलेले.. त्यामुळे गाडी उजव्या बाजूला कलंडेल की काय अशी भिती वाटून नीलला पुढच्या सीटवर डावीकडे बसवण्यात आले होते. नीलच्या मागे साधना....... आणि एकूणच गाडीचा समतोल साधण्यासाठी मला गाडीच्या बरोब्बर मध्यभागी बसवले होते. (उत्सुक इच्छुकांचं समाधान झालं का? Wink ) अमित देसाईची गाडी लेडीज स्पेशल होती, बायकांच्या बडबडीला कंटाळून की काय पण परत येताना सगळ्या लेडीज बायकांना त्याने अतिशय धूर्तपणे आशूतोषच्या गाडीतून पाठवून दिले.

कार्याध्याक्ष रैनाचं हे पहिलंच गटग.. आणि त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून तिचं दडपण वाढत चाललेलं.... मायबोलीकरांना ओळखायचं कसं? येतो सांगून मायबोलीकर आलेच नाहीत तर काय करायचं? भेटण्याच्या ठिकाणावरून काही गोंधळ नाही ना होणार? इतक्या लोकांचा पाहूणचार कसा करायचा? शिवाजीपार्कात काही खायला मिळतं का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांनी तिच्या भोवती फेर धरलेला.. पण कुठलाही गोंधळ न होता गटग अतिशय उत्साहात पार पडलं.

आयडी शर्मिला असूनही तिला कोणीच त्या नावाने हाक मारत नाही हे पाहून लालूने उसगावी पोचल्यावर आपला आयडी बदलण्याचा इरादा जाहीर केला. (शर्मिला फडकेचा जीव भांड्यात पडला Wink )
रैनाला मुंबई गटगसाठी कायमस्वरूपी कार्याध्यक्ष करण्याचा ठराव बहुमताने पास करण्यात आला. Wink
मंजू आपली जबाबदारी पूर्ण करेल की नाही ह्या भितीने रैना पिशव्या भरून बटाटेवडे घेऊन आली. अश्विनीने केक आणण्याची परंपरा याही वेळी जपली. वडे आणि केक हादडल्यावर लालू बाटल्या घेऊन आली. (पाण्याच्या) Wink उशीरा पोचणार्‍यांना वडे मिळाले नाहीत, अर्थातच.
लालू आणि आशूतोषने भरपूर चॉकलेट्स आणली होती.

घारुअण्णांचं नेहमीप्रमाणे मोठेमोठे बेत रचणं चालू होतं. नील एकच श्रोता होता आणि केवळ मान डोलावण्यापलिकडे आपल्याला काही पर्याय नाहीये हे त्याला कळून चुकलं होतं. Wink

निघताना रैनाने मला एकच प्रश्न विचारला, "अमितच्या मते मी मायबोलीच्या व्यसनाधीन आहे, ह्याबद्दल तुझं काय मत आहे?"
पण इतके सगळे मायबोलीकर बघून अमित ह्याच्यापुढे रैनाला असं म्हणणार नाही ह्याबद्दल मला खात्री आहे. Happy

आर्या आणि आरोहीने मस्त मिरवून घेतलं. फार गोड बाहुल्या आहेत त्या...

इतर मायबोलीकर वृत्तांत लिहितीलच.... पण जे मायबोलीकर पहिल्यांदाच अश्या गटगला उपस्थित राहिले त्यांनी आपल्या अनुभवावर किमान चार ओळी तरी लिहाव्यात अशी नम्र विनंती. Happy

गुलमोहर: 

अर्रर्र.. हे प्रकाशित झालं वाटतं. उपस्थित आयडी विसरायला होऊ नयेत म्हणून कालच रात्री लिहून ठेवलं होतं. मला वाटलं अपूर्ण ठेवलं असेन Happy
हरकत नाही. उद्या पूर्ण करेन

येउ द्या. मला वाटले उपस्थितांची लिस्ट ही क्रमशः करावी लागते की काय? Happy

मला वाटले उपस्थितांची लिस्ट ही क्रमशः करावी लागते की काय? >>> खरयं ते.... मी अजूनही पार्कात पोहचण्याची वाट पहातोय... Sad

अंक पहिला

[प्रवेश पहिला]

तुतारीच्या ललकारीसोबत रंगमंचावरचा पडदा सर्रकन वर जातो! एका विस्तीर्ण मैदानाची पार्श्वभूमी. रंगमंचाच्या उजव्या बाजूला मंचाकडे पाठ केलेला म्हणजेच मैदानाकडे मुख असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ विशाल पुतळा. रंगमंचाच्या मागे डाव्या बाजूला श्री गणेशाचे शांत मंदिर. मंदिराचा दरवाजा बंद आहे. आजूबाजूचा परिसर पार्कातल्या नेहमीच्या किलबिलीने चुळबुळतोय. रंगमंचावर मात्र स्तब्धता. इतक्यात विंगेतून दोन पात्रे एका बालिकेस कडेवर घेऊन दबकत दबकत अवतीर्ण होतात. मंदिराच्या समोर येतात. पुन्हा थोडे उजवीकडे सरकतात. आपण आता रंगमंचावरच्या बरोबर मध्यावर आहोत याची खात्री पटल्यावर काही वेळा इकडेतिकडे पाहिल्यासारखे करतात. पुन्हा न पाहिल्यासारखे करत पार्कातच फिरत असल्यासारखे करतात.

पहिले पात्र : हुश्श्य!
दुसरे पात्र : हं! अजून कोणीही उगवलेलं नाही. तरी म्हणत होते - अजून वेळ आहे. ती दुसरी वेशभूषा करून कशी दिसतेय हे एकदा मला पाहता आलं असतं घरातून निघण्यापूर्वी!
पहिले पात्र : (पुटपुटल्यासारखे करत) अगं पण सगळ्यात आधी तू तीच वेशभूषा केली होतीस ना?
कडेवरची बालिका: ऊं ऊं ऊं!

(इतक्यात समोरच्या कट्ट्यावर साताठ जणांचा एक घोळका असलेला त्यांना दिसतो. ही दोघे थोडे रेंगाळल्यासारखे करत, थोडे आपण त्या घोळक्याकडेच जात आहोत असे दाखवत तिकडे सरकतात. पण घोळक्याकडून कसलाच प्रतिसाद न आल्याने पुन्हा आपण पार्कातच फिरत असल्यासारखे दाखवत डाव्या विंगेतून बाहेर पडतात.)

[प्रवेश दुसरा]

(रंगमंचावर कोणीच नाही.)

मगाच्या पहिल्या पात्राचा आवाज: हॅलो, भ्रमा अरे कुठे आहेस?
दूरध्वनीवर पलीकडून : अरे आम्ही आता माहिम सिग्नलला पोचलोत! हे आलोच.
पहिले पात्र : कोण कोण आहात?
दूरध्वनीवर पलीकडून : मी, रैना, मन्या, अमित.
पहिले पात्र : बरे. इथं अजून कोणी पोचल्याचं कळलं का तुम्हाला?
दूरध्वनीवर पलीकडून : हो. लालू.
पहिले पात्र : पण इथं तर ती दिसत नाहीय कुठे.. आणखी कोणी?

दूरध्वनीवर पलीकडून :नाही, थांब आता आम्हीच येतोय! तोपर्यंत तिथे खेच कोणाची तरी!

(ट्याँऽऽऽऽव असा आवाज असलेले संगीत वाजते)

पहिले पात्र (स्वगत) (चडफडत) : कोणीच नाही तर कोणाची खेचायची?
(प्रगट) बरे या लौकर.

(मंचावर अंधार होतो. काही क्षणांत मंचाच्या, मंदिर आणि पुतळा यांच्यामध्ये असलेल्या दरवाजावर प्रकाशझोत स्थिरावतो. तिथली स्तब्धता आणखी गहरी करणारी इटालीयन धाटणीची एक धून वाजते. इतक्यात डोळ्यांवर काळा चष्मा लावलेली, केस मोकळे सोडलेली एका हातात कसलीशी पिशवी आणि दुसर्‍या काखेत दुसरी पिशवी मारलेली शुभ्र वेशभूषेतली एक व्यक्ती अगदी आरामात एकेक पाहूल टाकत
आजूबाजूचा परिसर अगदी निवांतपणे न्याहाळत प्रवेश करते. मंचावर मधोमध आल्यावर त्याच निवांतपणे डाव्या बाजूला वळते आणि मंदिराच्या दरवाजाकडे आपला मोर्चा वळवते. मंदिराचा दरवाजा बंद आहे असं पाहून चेहर्‍यावर कसलेच भाव न दाखवता डावीकडाचा परिसर मान वर करून न्याहाळत उभी राहते.

डावीकडून पहिली ती दोन पात्रे येताना दिसतात. इतक्यात त्यातले एक पात्र ओरडते.
"ती बघ लालू!"

ती चष्माधारी व्यक्ती त्याच संथपणाने डोळ्यावरचा चष्मा उतरवून एका हातात घेते. दुसर्‍या हातातली पिशवी सांभाळत काही काळ या दोघांकडे सावध नजरेने काही क्षण पाहते.)

लालू (उत्तेजीत स्वरात) : ओ आ!
दुसरे पात्र : आ ओ!

लालू : अरे मी हिला पाहिलं तिकडून इकडे जाताना (बारीक झालीय आधीपेक्षा). पण मी ओळखलंच नाही तुम्हाला! तुझ्यात किती बदल झालाय! मला वाटलं हीच कोणी मायबोलीकरीण असावी आणि ती आपल्या नवर्‍याला बरोबर घेऊन आलीय!

(पहिले पात्र म्हणजे मी अवाक! एव्हाना कडेवरची बालिका लालूच्या हातातल्या पिशवीवर कब्जा मिळवून त्यातला मऊ जिराफावर कब्जा करते.

इतक्यात एक उंच थोडेसे टक्कल असलेला गौरवर्णी इसम अजून एका पुस्तकधारी आणि चष्मेधारी सभ्य गृहस्थांबरोबर प्रवेश करतो. त्यांच्यापाठोपाठ आणखी एक जोडपे हातात गरमागरम बटाटेवड्यांचा पुडा सांभाळत कमालीच्या लगबगीने प्रवेश करतात. यापुढचा वृत्तांत आता तेच लिहितील.)

गजा, वा सुरुवात मस्त केलस !! Happy
बाकी कालचा गटग खरच विराट् झाला. मजा आली सर्वांना भेटून Happy
फोटो पाठवा रे पटापट. Happy

जीडी, मस्त सुरुवात Lol

आगामी वृत्तांतकारांनो, हाच फॉरम्याट पुढे कायम ठेवा.

(अवांतर : इतके दिवस मला गजानन देसाई आणि रैना या दोन आयड्यांचे मालक/मालकिण मध्यमवयीन असतील असं वाटत होतं उगीचच.)

ललिता- मी मध्यमवयीन नाही असं बारीकमध्ये म्हणल्याबद्दल तुझे धन्यवाद Wink
गजानन खरंच मलाही मध्यमवयीन वाटायचा.

सही लिहीत आहेस गजानन ( आता तुम्ही म्हणणार नाही कारण तू मध्यवयीन (दिसत) नाहीस हे सिद्ध झाले). Wink

मंजू- यादी केलीस ते बरं झालं.

भ्रमर, मन्या (ते मात्र खरोखरीच मवयीन आहेत. Wink आणि आम्ही पोचलो, तिथे लालु यो वेषात आणि चि.आरोही हे दोघंच एकदम चकाचक दिसत होते. बाकी आम्ही सर्व इतर लोकं साधी राहणी, उच्च विचारसरणी इ. इ..... आम्ही सर्वजण हाय हॅलो करतोय तोवर

तितक्यात तिकडे मनिषा लिमये,मयुरी, केश्विनी असे हेवी ड्युटी (आयडी !!!!!)अवतरले. मनिषानी भ्रमरला "तू भ्रमर आहेस? पण तुझे टक्कल कुठे आहे" असा नाजुक प्रश्न पहिल्या फटक्यात विचारला.
आणि ही कोण असं माझ्याकडे आपादमस्तक पहात.
ही? ही रैना
म्हणजे कोण ?
अगं ही आजची (हंगामी)कार्याध्यक्ष
ही???????( मनिषाच्या चेह-यावर इतका भ्रमनिरास होता की आजतागायत मी, मी आहे याबद्द्ल कोणी इतके दु:खी झालेले पाहिले नाही). तिचा बदलणा-या भावनांनी दाटुन आलेला इस्टमन कलर चेहरा पाहत आम्ही हसत सुटलो.

गजानन सही लिहितो आहेस!

मजा आली काल जिटिजीला. संयुक्तातल्या सदस्य मैत्रिणींसोबतचे इंटरअ‍ॅक्शन सोडल्यास बाकी बहुतेक आयड्यांची आधीची काहीच ओळख (म्हणजे त्यांच्या मायबोलीवरील पर्सनॅलिटीबाबत) नव्हती त्यामुळे आयडी आणि चेहरे यांच्या ओळखीत माझ्याकडून काहीच अपेक्षाभंग वगैरे झाला नाही हे बरय Proud .
मात्र इतके सारेजण येतील याची खरोखरच कल्पना नव्हती. मागे एकदा पृथ्वीमधे जिटिजी झालं होतं त्यात अनेक मायबोलीकर भेटले होते त्यातले या ग्रूपमधे नव्हतेच कोणी (एकजण होता त्याचे परत नाव विसरले) त्यात नीरजा, अजय, नंदिनी वगैरे होते. त्याही आधी खूप पूर्वी उपास, सानिका, डॅफोडिल्स, सव्यसाची वगैरेंसोबतही एक जिटिजी झालेलं लक्षात होतं. तो ग्रूप अजूनच वेगळा होता. मुंबईतल्या एकूण तीन मायबोली जिटिजीला जाऊन प्रत्येकवेळी नवा ग्रूप भेटला याची खूपच मजा वाटतेय. मात्र या तिन्ही वेळी मायबोलीकरांचा उत्साह, गडबड्-बडबड अगदी तसाच सेम होता.
टॅक्सीतून उतरल्यावर अगदी समोर एक स्मार्ट युवती मायबोली टीशर्ट आणि थ्रीफोर्थ घालून उभी असलेली दिसली. तिच्यामागे मोठ्ठा मुलामुलींचा ग्रूप आपापसात गप्पा करत उभा होता. ही सेन्टर ऑफ अ‍ॅट्रेक्शन शर्मिला उर्फ लालू असणार हे गृहितच धरुन मी तिला हाय केलं तर ती चकितच झाली की मी तिला कसं ओळखलं. आता तो खरंतर फ्ल्यूक ठरला पण मी आपले नाम ने नाम को पेहचान लिया वाले डायलॉग मारुन घेतले :P. शर्मिला, रैना, मंजू आणि गजानन सोबत छान गप्पा झाल्या. रैनाची कथा नुकतीच वाचल्याने तिला भेटायची उत्सुकता होतीच. शी इज वन फाइन यंग वुमन. व्हेरी स्वीट! गजाननला माझा जुन्या मायबोलीवरचा क्लासिक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सबद्दलचा एक पुरातन बीबी अजून आठवतो हे पाहून मला अगदी भरुनबिरुन यायचे बाकी होते. थॅन्क्स गजानन फॉर युअर काईन्ड वर्ड्स! ललिता, मनिषा, साधना, शीतल, सुजा यांच्याशीही छान ओळख झाली.
मिस्टर रैना म्हणजे अमितही न कंटाळता गप्पांमधे सामिल होता हे खूपच छान वाटलं. गजानन आणि किरु सुद्धा सहकुटुंब आले होते आणि त्यांच्या बेटर हाव्ज खरोखरच बेटर आहेत Proud दोघांच्या चिमुरड्या लेकी तर फार गोड आणि शहाण्या होत्या.
दीपक कुलकर्णी उर्फ डुआयला संयुक्ताच्या ओन्ली विमेन ग्रूपमधे काय चालतं याबद्दल खूप उत्सुकता दिसली आणि तो त्यात त्याच्यासारख्या होतकरु मुलांना प्रवेश नाही म्हणून बराच नाराजही वाटला. त्याची नाराजी शर्मिलाकडे पोचवली लगेच तर तिला घाबरुन त्याने पलटीच मारली नाही असं काही नाही म्हणायचं मला म्हणून. शेवटी संयुक्तामधे सगळ्या काकू आहेत तेव्हा तु काही फारसे मिस करत नाहीस त्याचे सभासद्त्व नाही मिळाले म्हणून असे सांगितले तेव्हा त्याची समजूत पटल्यासारखे दिसले. मिळून सार्‍याजणी मासिकाने आता आपले धोरण मिळून सारेजण असे पुरुष वाचकांनाही सामावून घेणारे केले आहे तसं करण्याची वेळ संयुक्तावर नजिकच्या काळात येऊ शकते याची लालूला त्यानिमित्ताने जाणीव झाली असणार Proud
रैनाने तिकडच्या काही मायबोलीकरांसाठी शर्मिलाकडे जी पुस्तकं दिली होती ती जाम इंटरेस्टींग होती. निवांत संध्याकाळ होती, छान वारा होता. चान्स मिळाला असता तर तिथेच एसपीच्या कट्ट्यावर ती वाचत बसले असते. पण मायबोलीकरांची गडबड, फोटोग्राफी वगैरेमुळे हायपीचला पोचली होती आणि कट्ट्यावरचे रेग्यूलर रहिवासी सिनियर सिटिझन्स बराच वेळापासून आधी कुतूहल आणि मग नाराजी वगैरे दर्शवायला लागली होती तेव्हा तो बेत रहित केला. मग एकेकाने काढता पाय घ्यायला हळूहळू सुरुवातही केलीच. लालूने मला प्रभादेवीला जायचे होते म्हणून लिफ्ट दिली तेव्हा कारमधे अजून एका संयुक्ता सभासदाची सायाची ओळख झाली.
एकंदरीतच शनिवारची ही संध्याकाळ छान लक्षात राहील. मजा आली. त्याच दिवशी परतीचे फ्लाईट असूनही शर्मिलाने इतका वेळ जिटिजीला दिला त्याबद्दल तिचे कौतुक आणि आभार!

मिळून सार्‍याजणी मी फार आधीपास्न वाचतो बरं का Proud त्याबरोबरच मावा (MAVA) वगैरेही... त्या बद्दल नंतर कधीतरी बोलतो..

दोन चार ठळक वैशिष्ट्ये... Proud Biggrin

घारू अण्णा वेळेत (६.३०) धुरांच्या रेषा हवेत काढत जीटीजीस पोहचले. पोचल्यानंतर चॉकलेट्स खाऊन झाल्यावर म्हणतात कसे अरे ही लाजो ना... Proud अर्थात उत्सवमुर्तींनी हे ऐकलं नाही (म्हणून इथं लिहितोय)

रैनांनी माझी ओळख असुदे म्हणून केली! Happy

प्रीतीजी मीना प्रभूंचे दोन शब्द ऐकण्यासाठी लवकर गेल्या. त्या आधीच अश्विनी ह्यांचे केक वाटपाचे कार्य समाप्त झाले अन् त्याही मला जायचय असं सांगून निघून गेल्या.

नंतर उरलेल्या माबोकरांची बैठक नंतर जिप्सीत झाली. तिथं राहून राहून मी कॅमेरा का नेला नाही असा प्रश्न मला सतावत होता. Proud

कारण होतं तीन देवीयाँ!!

शिवाजी पार्कातली मराठमोळी मंडळी पाहून त्या सर्वांना लवकरात लवकर मायबोलीत सामिल करून घ्यावं असं मला प्रकर्षान जाणवलं.

रैनाचे संयोजन कौशल्य पाहून तिलाच परमनंट कार्याध्यक्षीण करावयाचा प्लॅन नंतर घारूअण्णांनी केला.

माझ्या व श्री. केळकर ह्यांच्या ब्यागांची पळवा पळवी करून परतीच्या प्रवासात आशुतोष व असुदे ह्यांच्यात रेस लागली होती.. जी अर्थात असुदेंनी जिंकली.

Light 1 दिवे घ्या भरपूर Wink

मनिषानी भ्रमरला "तू भ्रमर आहेस? पण तुझे टक्कल कुठे आहे" असा नाजुक प्रश्न पहिल्या फटक्यात विचारला. >>>> अय्यो ! हे तर माझ्या तोंडून निघून गेलं. एकदा भ्रमानेच म्हटलं होतं की त्याला टक्कल आहे. म्हणून मी टक्कल आणि भ्रमर यांचा मेळ घालायचा प्रयत्न करत होते (म्हणजे या व्यक्तीला टक्कल दिसत नाही म्हंजे हा भ्रमा नाही असं मला वाटलं). त्यावर भ्रमा म्हणाला आहे आहे. (डोंबल त्याचं ! मागील बाजूस एवढास्सा चांदवाच आहे, पूर्णचंद्र किंवा अष्टमी नाहिये ).

शैलजा, रैनाने मनिषाचं नाव घेतलं असताना तू कसं गं ओळखलंस की हे मीच विचारलं होतं म्हणून? Proud

जी अर्थात असुदेंनी जिंकली.<<<<

जिंकली बिंकली काय नाय हा
आम्ही तुमचा फोन आल्यामुळे वाटेत थांबुन त्या ब्यागा परत केल्या......आमच्या मनाचा मोठेपणा हो , दुसरं काय Proud

अय्यो ते वाक्य तू म्हणलं होतंस का अश्विनी ? सॉरी हाँ मनिषा.
(शैलजानी कसं ओळखलं ?)

शर्मिला भारी वृत्तांत. शर्मिलाचे कार्यक्षेत्र आणि त्या संपादित करत असलेली मासिकं याबद्दल सर्वांनी त्यांना नक्की विचारा. मी अवाक झाले ऐकुन.शर्मिला यावर एक लेख लिहाच.
आणि शर्मिलानी आपल्याला कॉलेजातील मुली असल्याचे सांगताच पुढीलप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या
मंजू आणि मी: आँ. बापरे. वाटत नाही हाँ खरंच
अमित (नवरा): आपली कधी पोचेल ? आपण शाळेच्या अ‍ॅडमिशनमध्येच गारद झालोत. ( गाडीतून येताना भ्रमर आणि आम्ही शाळाप्रवेश या जिव्हाळ्याच्या विषयावर खूप चर्चा करुन झाली होती).

नीलवेदनी तेवढ्या वेळात मला माबो टीशर्ट विकला. माबोटीशर्टसमितीला खंदे विपणन कार्यकर्ते लाभलेत. Light 1 Proud

एक ऊंच चष्मेवाला मुलाला सगळे पिडत होते. तो कोण ? आनंद?
घारूअण्णा पिक्चर आणि खादाडी संपल्यावर सुमारे साडेसहा वाजता आले. तीळगूळ कुठाय असं त्यांनी लगेच विचारलं.
मयुरीनी अक्षरशः आपलं जरबकौशल्य एकत्रित करुन लोकांना फोटोसाठि एकत्रित केलं. लोकांना लग्गेच असुदेला घरी एक बोटही उचलावं लागत नसणार येवढी कार्यतत्पर सहचारिणी असल्यावर याची खात्री पटली Proud Light 1
चि. कुलदीप यानी मला ओळख, मला ओळख, टीशर्ट वाच असं सांगीतलं. त्याला लगेच ५ बायकांनी वाचून घेतलं. टीशर्टावर- पाऊस कधीचा पडतो या ओळी. म्हणलं ग्रेस इतके हसरे आणि उत्साही? आणि इथे काय करतायेत?
तेवढ्यात मंजूनी विकेट घेतली : अगं त्याच्या पोटाकडे पाहू नका बायांनो असं ती म्हणाली.
साधनाला तिच्या रेड हेअर मुळे आणि फोटोमुळे लग्गेच ओळखंल. आणि साधना आणि मंजू आणि अश्विनी त्यांच्या त्यांच्या फोटोसारख्याच दिसतात. जिज्ञासुंनी खात्री करुन घ्यावी.
सौ पूनम आणि सौ नीरजा यांनी फोनवरून प्रेमानी चौकशी केली. वी मिस्ड देम.
किरू दुपारी दोन पासून निघाल्याची हव्वा होती. ते ५ला येऊन पोहोचले. त्यांची कन्या ही रॉकस्टार आहे. त्या पिल्लाला आपल्याकडे घेण्यासाठी रांग लागली.
ललिता पण अखंड गप्पा मारत होती.
विनय भिडे मला तिनदा दुरुन कोणीतरी दाखवला. Happy
आशुतोष (काका) हे त्यांच्या गाडीतून किती लोकांना घेऊन आले होते याची शेवटपर्यंत गणती झाली नाही. त्यांनी खूप सुंदर पॅपिरस वर काढलेली चित्र आणली होती. धन्यवाद आशुतोष. तुम्ही शेवटपर्यंत गालातल्या गालात मंद हसत का होता हो ?

Pages