बाकी शून्यः कमलेश वालावलकर

Submitted by टवणे सर on 27 January, 2010 - 23:50

स्पॉइलर वार्निंगः पुस्तक वाचले नसल्यास ही पोस्ट वाचू नये.

मराठीत मी वाचलेल्या काही सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक. पहिल्याच पानापासून जबरदस्त पकड घेत हे पुस्तक एका विशिष्ट वेगाने जयदीप सरदेसाई नावाच्या इंजिनिअर-पत्रकार-सेल्समन-दारुडा-वेश्याबाज माणसाची कहाणी मांडते. कदाचित ह्या पुस्तकातले ज्युनिअर कॉलेज, आजूबाजूचा परिसर, इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिकची अंबड एमआयडीसी आणि तिथली एक बंगाली लोकांची वरचश्मा असलेली कंपनी अश्या अनेक गोष्टी समान असल्याने हे पुस्तक मला थेटच भावले. त्यामुळे कदाचित बाकी काही गोष्टींकडे कानाडोळा झाला असेल. पण त्यामुळे हे पुस्तक भिडले पण खूप जोरात.

अनेक लोकं करतात म्हणुन सुरु केलेले ग्रॅज्युएशनचे शिक्षण, जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. आणि मग एक विचित्र घुसमट.. त्यात जोडीला उभे राहणारे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न.. कादंबरीच्या नायकाला अधून मधून पडणारे प्रश्न, त्याचे संस्कृती-समाज-व्यक्ति ह्याबाबतची वक्तव्य हे सगळे ह्या मानसिकतेच्या-जडणीच्या(मोल्ड) व्यक्तिचे अतिशय सही सही वर्णन करते. अप्रतिम.

मी आहे म्हणुन जग आहे, माझ्या दृष्टीकोनातून जगाचे अस्तित्व माझ्या जन्माबरोबर सुरु होते आणि मृत्युबरोबर संपते, ज्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण जास्त तो समाज अधिक प्रगत, जातीव्यवथा, आरक्षणाचे समर्थन, जीवनाच्या निरर्थकपणामुळे येणारी टोकाची निराशा ह्या सगळ्याच गोष्टी फार प्रभावीपणे मांडलेल्या आहेत.

अनेकांना हे पुस्तक शिवराळ वाटू शकेल, भडक वाटू शकेल. पण मला स्वतःला तसे एकदाही वाटले नाही. माझ्या कॉलेजात जवळपास इतपत शिव्या अश्या प्रकारच्या सगळ्या मुलांच्या तोंडी असत. स्त्रीदेहाबद्दलचे आकर्षण, मुला-मुलींच्यात असलेले अनैसर्गिक अंतर, लैंगिक अतृप्ती आणि त्यातून येणारी विकृती (मग कधी ती मुलींना वर-खाली अधाशी नजरेने बघण्यातून व्यक्त होते तर दुसर्‍या टोकाला शारिरीक अत्याचारातून) हे देखील तसेच्या तसे आलेले आहे.

लेखक कुठेही कश्याचेही समर्थन करत नाही. नायकाच्या मनःस्थितीचे उदात्तीकरण तर मुळीच करत नाही. पण म्हणुन त्या मनःस्थितीचे, ती मनःस्थिती उद्भवण्यास कारणीभूत घटकांना (समाज, जन्मानेच आलेले गुण इत्यादी) बाइज्जत-बरी पण करत नाही.

बाकी शून्य वाचताना कोसलाची आठवण येणे आणि म्हणुनच तुलना होणे अपरिहार्य. कोसला भाषिक सौंदर्याच्या निकषावर नक्कीच उजवी आहे. भाषेला गोडवा आहे. बाकी शून्य अधिक रखरखीत आहे, लेखक म्हणुन देखील नेमाडे वालावलकरांपेक्षा उजवे आहेत. पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे. दोन्ही कादंबर्‍यातले ठसठशीत साम्य म्हणजे दोन्ही कादंबर्‍या निश्कर्षाप्रती पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या अध्यायात फसतात. निरर्थकतेच्या जाणीवेतून आणि समाजापासून विलग झाल्याच्या भुमिकेतून आलेली निराशा आणि तिचे टोकाचे रुप हे तिथेच सोडून न देता त्याला एक अंतिमता देण्याचा प्रयत्न दोन्ही कादंबर्‍यात फसलेला वाटतो कारण कदाचित ह्याला अंतिमताच नाहिये. बाकी शून्यची अजून एक कमी म्हणजे शेवटी शेवटी ही कादंबरी खर्‍याखुर्‍या प्रतलास (रिआलिस्ट) सोडून जुळवून आणलेल्या घटनांच्या मागे जाते (त्याचे उगाचच लोकांना वाटणारा साधू-चमत्कारी होणे, मिशेल बरोबर राहताना हमाली करणे आणि शेवटी देवयानीबरोबर लग्न).

ऑल इन ऑल, ही एक जबरदस्त कलाकृती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला..

टण्या : मराठीत मी वाचलेल्या काही सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक.
ट्यु : बाकी शून्य हे एक अर्थ शून्य पुस्तक आहे.

होऊन जाऊ द्या.. नातिचरामी - पार्ट २ Proud

मी ट्यु शी सहमत आहे. होऊन जाऊ द्या.
बाकी शुन्य भंपक आणि pseudo इंटुक इंडेक्सावर ब-यापैकी हाय आहे. या आठवड्यात (भांडायला) लिहायला वेळ नाही. पुढ्च्या आठवड्यात लिहीन. Proud

टण्या- छान परिक्षण. सहमत नाही.

अगदी अगदी टण्या. परवाची चर्चा वाचून घेतलं आहे वाचायला.. तू म्हणालास तसंच हातातून ठेवता येत नाही बाजूला. रखरखीत..जबरदस्त.. स्ट्रेट फॉर्वर्ड. झाकपाक नाही.. उगाचंच गोंडसपणे कुरवाळणं नाही. अजून फक्त पाव भाग वाचून झालाय.. खूप वाक्य कोरण्यासारखी पण एकच जबरी पोचलेलं रादर नॉस्टॅल्जिया घेऊन येणारं..
'अडाणचोट जत्रा.'
तुला आणि साजिर्‍याला धन्स, हे पुस्तक वाचायचं राहिल्याची आठवण करुन दिल्याबद्दल. Happy

>>मी ट्यु शी सहमत आहे. होऊन जाऊ द्या.
>>टण्या- छान परिक्षण. सहमत नाही.
मी रैनाशी सहमत आहे (तुमचे) होऊन जाऊ द्या Happy

अत्यंत भंपक आणि कोसलाची भ्रष्ट नक्कल असे मला हे पुस्तक वाटले. शेवटी शेवटी तर इतके कमालीचे भरकटले आहे की लेखकाला गदागदा हलवून जागे करावेसे वाटते. प्रतलाच्याच भाषेत सांगायच तर सुरूवातीपासूनच ही कादंबरी कुठेही कलाकृतीच्या प्रतलावर आहे असे जाणवत नाही आणि शेवटी शेवटी तर ती बाबा कदम छाप मनोरंजनाचे प्रतलही सोडून आणखी खाली घसरते

अनेक लोकं करतात म्हणुन सुरु केलेले ग्रॅज्युएशनचे शिक्षण, जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस..>>>>

टण्या परिक्षण उत्तम लिहिलस रे. Happy
मी एकदाच वाचलय हे पुस्तक. आवडतय न आवडतयच्या रेषेवरच आहे अजुनदेखील.
त्यातल तत्वज्ञानाच प्रकरण आल्यावर मला झेपलच नाही.
पण अगदीच पुस्तक वाचुन वेळ वाया गेला अस नाही वाटल.

जीएस च्या शब्दा शब्दाशी त्यातल्या आकारउकारवेलांटीपूर्णविरामांसकट सहमत.
माझा असा अंदाज आहे की बरेचसे प्रसंग लेखकानी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि जे मनचे घातले आहेत ते फसले आहेत. परिणामी कादंबरी भंपक वाटते.
लेखकांची पात्र सहसा composites असतात. अनुभवांशी कल्पनेची सांगड असते. पण ते ये-यागबाळ्याचे काम नोहे. फसले तर प्रयोगशाळेतल्या प्रयोगाप्रमाणे टेस्ट्युब फुटु शकते. ख-या प्रसंगांना anonymity साठी टोनडाऊन करताना, कल्पनेतील प्रसंग जास्त भडक केले असावेत आणि प्रकरण फुटले आहे.
शेवटातील सर्व प्रसंग खरोखर बेक्कार आहेत. हद्द झाली. James Joyce meets James Hadley Chase type झालं हे.
त्यातली विफलता तर मला आख्ख्या कादंबरीपेक्षा टण्याच्याच शब्दात जास्त भावली.
प्रतल हा शब्द पहिल्यांदा ऐकला. धन्यवाद.

माझा असा अंदाज आहे की बरेचसे प्रसंग लेखकानी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि जे मनचे घातले आहेत ते फसले आहेत. >>> मान्य. संपूर्ण सहमत. म्हणुनच कोसलापण घसरते शेवटी (पांडुरंग गावाकडे परतल्यावर). अर्थात नेमाडेचा लेखक म्हणुन वकुब बराच मोठा आहे वालावलकरपेक्षा.

>> परिणामी कादंबरी भंपक वाटते.>> मतभेद Happy

कोसलाची भ्रष्ट नक्कल आहे हे वाक्य पटत नाही. कोसलाशी साधर्म्य आहे कारण दोन्ही कादंबर्‍या साधारण एका वयाच्या नायकाबद्दल आहेत, विफलता आणि उबग हे सूत्र समान आहे. पण मी आधीही म्हटल्याप्रमाणे कोसलाची शैली, भाषेत केलेले प्रयोग हे अत्युच्च आहेत. बाकी शून्य त्याबाबतीत कुठेही कोसलाची नक्कल नाही. तसेच बाकी शून्यचा काळ हा संपूर्ण वेगळा आहे, कुठेही कोसलासारखे प्रसंग उभे केलेले नाहीत. केवळ विषय साधारण समान आहे म्हणुन नक्कल म्हणणे पटत नाही.

बाकी शून्यमध्ये जो नायक उभा केला आहे ते उभे करणे जबरदस्त आहे. त्याची मानसिकता, त्या मानसिकतेतून त्याच्या मनात येणारे विचार, अर्धवट व्यक्तिकेंद्रीत, अर्धवट सर्जनशील, टोकाचे संवेदनशील व्यक्तिमत्व वगैरे सगळेच. कादंबरी शेवटी सरकतेच (आणि मध्ये एकदा पण सरकते जेव्हा तो पत्रकारिता करतो आणि स्टिरिओटिपिकल देवयानीचे पात्र. तसेच ज्या पद्धतीने तो सेल्समनगिरी करतो ते पण एकदम सिनेमा स्टाइल). पण भंपक नक्की नाही.

राहिल प्रश्न हा की आत्मचरित्रीय लिखाण हे संपूर्णपणे काल्पनिक वा खर्‍या घटना/अनुभव/कथांवर बेतलेले पण कालपनिक पात्रांनी उभे केलेल्या लिखाणापेक्षा कनिष्ट असते का? तर ह्यावर लै काथ्याकूट झालेलाच आहे (नाइपॉल वाचा. तो आत्मचरित्रीय लेखकांना शिव्या घालतो पण त्याची स्वतःची सर्वोत्कृष्ट कादबिस्वास''अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास' आहे हे विसरतो). माझ्यामते आत्मचरित्रीय असो वा काल्पनिक (>> लेखकांची पात्र सहसा composites असतात. अनुभवांशी कल्पनेची सांगड असते. >> ) असो, पुस्तक पुस्तक असते. भले मग तो लेखक केवळ एक पुस्तक लिहून संपेना का.

मी पूर्णविराम.

माझ्यामते आत्मचरित्रीय असो वा काल्पनिक >> गल्लत होते आहे का विचारांची ( मी नीट मांडले नसावे बहूधा. ते आत्मचरित्रात्मक आहे म्हणुन श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. तसं मला मुळीच म्हणायचे नाही. सिद्धहस्त लेखकच ख-याखोट्याचं बेमालुन कॉकटेल बनवून ते पेश करु शकतो असं मला म्हणायचं होतं.) आत्मचरित्रात्मक. असो वा काल्पनिक. ते वाटले पाहिजे अस्सल, जिवंत, प्रत्ययकारी ना? खोटं, नकली वाटुन कसं चालेल ?
All writing is autobiographical at one or another level of abstraction. सुक्ष्म किंवा ठोस कुठल्याही पातळीवर का असेना, शेवटी ते तुमच्याच अनुभवविश्वाशी (directly or indirectly (थ्रु other's experiences, research etc) निगडीत असतं ना?
पुस्तक पुस्तक असते>> अगदी अगदी.
भले मग तो लेखक केवळ एक पुस्तक लिहून संपेना का. >> सहमत. एक धड पुस्तक लिहून पेनाचं टोक मोडून टाकायला कुणाचीच हरकत नसावी.

बाकी शून्यमध्ये जो नायक उभा केला आहे ते उभे करणे जबरदस्त आहे>> काही अंशी सहमत. जबरदस्त नसलं तरी थोडाफार वेगळा आहे. तो नायक अस्सल वाटत नाही, कारण त्यात प्राण फुंकलेले नाहीत, तो वेगळा असण्यासाठीच निव्वळ वेगळा आहे (लेखकाचा ADHD ?), तो कारण नसताना अतिरंजीत आहे, तो लेखकाच्या वैचारीक गोंधळाचा मॅस्कॉट बनून राहतो फक्त. यात फक्त मला एक व्यक्ति म्हणुन असा अनुभव नाही हे variable वजा कर हवं तर माझा पूर्वग्रह म्हणुन, पण पांडुरंग हाडीमाशी खरा वाटतो, तो Old Man ही खरा वाटतो, Raskolnikoff ही. त्यासाठी मला जाऊन खून करायची वा जुगार खेळायची गरज नाही, ती लेखकाची किमया आहे ना ?

पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे>> विस्तारावर जास्त भर दिल्या जातोय का? विस्तार आणि पट हा फक्त एक निकष होऊ शकेल ना ? केवळ विस्तार म्हणजे कलाकृती नाही. नाहीतर जी.ए कुठे पासंगाला पुरले नसते.
विस्ताराने दिपून जाऊन बाकी शुन्यला जास्त मार्क का द्यावेत? उलट नेमाडे जिथे थांबले तिथेच थांबायला हवे होते असं वाटतं. ते त्यांच्यात विस्तारायची प्रतिभा नव्हती म्हणून नव्हे.

पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे>> विस्तारावर जास्त भर दिल्या जातोय का? विस्तार आणि पट हा फक्त एक निकष होऊ शकेल ना ?
>>>>>
मला अंदाज आलाच होता की हे वाक्य गोंधळ उडवेल ह्याचा. हे वाक्य केवळ कोसला आणि बाकी शून्य मधल्या फरकाबद्दल होतं (संख्यात्मक तुलनेकरता). त्या दोन पुस्तकांच्या गुणात्मक तुलनेकरता नव्हते. "पण" ह्या शब्दाने गोंधळ होतोय तेव्हा तो गाळून वाक्य वाचावे. ह्या वाक्याच्या आधीचे 'भाषेचे सौंदर्य' वगैरे वगैरे वाक्य मात्र गुणात्मक तुलनेकरता होते.

पूर्णविराम (पुन्हा एकदा).

पूर्णविराम (पुन्हा एकदा).

>>
असू दे असू दे टण्या. भाषण करून खाली बसलेले लोक देखील पुन्हा उठून भाषण केलेले पाहिलेत आम्ही Proud

असू दे असू दे टण्या. भाषण करून खाली बसलेले लोक देखील पुन्हा उठून भाषण केलेले पाहिलेत आम्ही
>>>

आता हुडाने मला परवानगी दिलीच आहे तर अजून एक महत्वाचा मुद्दा जो आधी मांडायचा राहिला..

समानता ह्या विषयावर ह्या पुस्तकात बराच काथ्याकूट आहे (म्हणजे नायकाच्या मनात).. सुरुवातीला त्याला आपण चांगल्या (पैसेवाल्या, उच्चवर्णीय) घरात जन्माला आणि अनेक लोकांपेक्षा आपल्याला चांगले आयुष्य मिळते आहे (स्वतःचे काहीही कर्तूत्व नसताना) ह्याबद्दल मनात बोचणी आहे. मग कॉलेजात टोनी वगैरे लोकांकडे बघून त्याला थोडा इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स वाटायला लागतो. देवयानी कितीही स्टिरिओटिपिकल उभी केलेली असली तरी तिला स्वतःच्या जन्मदत्त अ‍ॅड्वान्टेजबद्दल बोचणी/गुन्ह्याची भावना नाहिये. आणि तिचे हे दुसर्‍या टोकाला असणे त्याच्यासाठी अधिक धक्कादायक आहे. नायकाच्या विचारांचा हा विरोधाभास, अंतर्गत वाद पुस्तकात बरेचदा पुन्हःपुन्हा येतो. मग वेश्यावस्तीतून पत्रकार म्हणुन जाण्यापासून एक गिर्‍हाईक म्हणुन जाईपर्यंतचा प्रवास ह्या विचाराला समांतर होत गेलाय आणि म्हणुन तो मला खोटा वाटला नाही.

ट्यु : बाकी शून्य हे एक अर्थ शून्य पुस्तक आहे.>> माझे प्रचंड १००% अनुमोदन. टण्या लेका आयुष्यभर काहि वाचू नकोस रे आता Sad

सहमत. एक धड पुस्तक लिहून पेनाचं टोक मोडून टाकायला कुणाचीच हरकत नसावी.>>बाकी माहित नाही पण ह्या पुस्तकानंतर हे केले असेल तर अतिव आनंदाची गोष्ट आहे. Happy

अरे काय हे काय हे. किती जुनं (किंवा जुनाटही चालेल म्हटलेलं) पुस्तक हे आणि आत्ता कुठे चर्चा Proud काही नाहीये त्यात इतकं तावातावाने वाद घालण्याइतकं. पोकळ आहे. नायकाचा प्रवास कुठूनही कुठेही असो तो सहज नैसर्गिक कुठेही वाटत नाही. वालावलकरांनी अमुक एका मार्गाने नायकाला न्यायचाच असं ठरवून चालवल्यासारखं आहे सगळं. अर्थात हे माझं चार वर्षांपूर्वीचं इम्प्रेशन. टण्याने इतकं प्रामाणिकपणे बरंच काही अ‍ॅक्चुअली जाणवलय असं लिहिलय तर परत वाचून बघावं का काय असं वाटायला लागलय. न जाणो.. सांस्कृतिक जाणिवाबिणिवा अजून थोड्या प्रगल्भ वगैरे व्हायच्या राहिल्या असतील तर काहीतरी जाणवेलही खोल.

कॅचर इन द रायचा कोसलामागे भक्कम कणा होता. नेमाडेंनी स्वतःचे अनुभव त्यात जिवंतपणे मिसळले. शिवाय भाषा सुद्धा समर्थपणे वापरली त्यांनी प्रत्येकवेळी. कोसला जिथे संपतं तिथे हा (शून्याचा) प्रवास सुरु होतो यात अजिबात अर्थ नाही. वालावलकरांनी तसम जमवायचा प्रयत्न नक्कीच केला. पण आपल्या मर्यादित कक्षेबाहेरचे अनुभव मांडताना त्यांना दमायला आणि भरकटायला झालय खरं या पुस्तकात.

कॅचर इन द रायचा कोसलामागे भक्कम कणा होता. >> ह्यावर स्वतंत्र लेख लिहिता येईल.. पण तो नंतर कधीतरी.. जे डी सॅलिंजरचे निधन झाले आज.. सेम्युर/रेझ द हाय बीम कार्पेंटर आणि कॅचर सोडून त्यांचे अजून काही प्रकाशित वाचलेले नाही (काही झाले आहे?) आयुष्यभर लिहून बहुसंख्य लेखन प्रकाशित न केलेल्या ह्या लेखकाचे आता काय काय बाहेर येते ह्याची उत्सुकता आहे..

कोसला देखील शेवती शेवटी एवढी ढेपाळलीय की सगळी कादम्बरी खोटीच वाटायला लागते. केवळ भाषिक नाविन्याची चूष यापलिकडे मला त्यात विशेष वातले नाही. परात्मभाव वगैरे नेमाडपंथिय समीक्षकानी शोधलेले शब्द आणि त्यावर तो पांचट काथ्याकूट ज्यावर रंगनाथ पठारेंसारखे गावगन्ना लेखक घाण्याच्या बैलासारखे त्याच त्याच वर्तुळात फेर्‍या मारताहेत. त्यापेक्षा दलित साहित्य कितीतरी खरे...

वाचून येच. संवाद होईल. Proud मीही येतो (कोसला वाचून :फिदी:)

मी वाचलय. मला नाही आवडलं. पण ह्या लेखकाच म्हणणं आवडलं (टण्याच!) एखाद्याला आवडू शकतं अन् एखाद्याला नाही त्यात एवढं तावातावान वाद घालण्यासारखं आहे काय?

दु:ख याच गोष्टीच आहे की या पुस्तकासाठी मी त्यावेळी गौरीच पुस्तक घेतलं नव्हतं. Sad

दु:ख याच गोष्टीच आहे की या पुस्तकासाठी मी त्यावेळी गौरीच पुस्तक घेतलं नव्हतं.>>>>
मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी पुस्तकासाठी नातिचरामी नाही घेतल. Happy

टण्या, मी पुस्तक वाचल नाही, तरीही उत्सुकता म्हणून पोस्ट वाचली

पुढील दोन वाक्यान्नी मला डिवचले व विचारात गुन्तवले
१)>>>>>> जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. आणि मग एक विचित्र घुसमट.. त्यात जोडीला उभे राहणारे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न..

अशी अवस्था आम्ही ज्योतिषी "चन्द्राच्या" योग-कुयोगात शोधतो - सर्वदूर सापडते

२)>>>>>>>निरर्थकतेच्या जाणीवेतून आणि समाजापासून विलग झाल्याच्या भुमिकेतून आलेली निराशा आणि तिचे टोकाचे रुप
इथे मात्र मला जाणिवपूर्वक स्विकारण्याची "वानप्रस्थाश्रमाची" सन्कल्पना आठवली! Happy
(एकविसाव्या शतकात आधीचे शहरी आयुष्य असे घालविल्यावर योग्य वेळेत निराशा वगैरे टाळून वानप्रस्थाश्रम स्विकारणे पूर्वीच्या अर्थाने अवघड असले तरी अशक्य नसल्याने, माझ्या नि लिम्बीपुरती "वानप्रस्थाश्रमाची सोय" तयार करण्यास मी केव्हाच सुरुवात केली आहे)

बाकी तुमचे चालूद्यात! Happy

टण्या लिही तु 'कॅचर इन द राय-कोसला' बद्दल. लवकर लिही. सॅलिंजरचं मी रेझ हाय द रुफ बीम वाचलं अजून एक. आवडलं मला. आणि त्याच्या मुलीचं त्याच्याबद्दलचं ड्रीमकॅचर वाचलं. वियर्ड आहे त्याच्यातून दिसलेला सॅलंजर.
कोसलाच्या शेवटाबद्दलचं हूडनी लिहिलेलं पटलं.

हूड- पहिल्यांदाच तुमच्याशी असहमत.
केवळ भाषिक नाविन्याची चूष यापलिकडे मला त्यात विशेष वातले नाही>>> अत्यंत प्रामाणिकपणे नाही.
आख्खे Post Modern साहित्य मोडीत काढताय एका फटक्यात.
दलित साहित्य खरे वाटते>>> का? त्यातील थेट आणि रक्त (आणि जाणिवा) गोठविणारा संघर्ष, अठराविश्वे दारिद्र्य, भाकरीच्या चंद्रासाठी केलेली कल्पनातीत वणवण, स्वाभिमानाचा परवडत नसलेला शोध सर्व थेट भिडते म्हणुन ?
दु:खाची प्रतवारी अशी लावता येईल का? थेट संघर्षात दोन बाजू तरी असतात. त्यानीच आंतरीक मार्ग सुकर होतो (किंवा झाल्यासारखा वाटतो) ना?
अशा साहित्यात (post modern- टण्या याला मराठीत काय म्हणतात रे?) एक कुठलीही बाजूदेखील नसते, पण म्हणुन अस्तित्वाचा संघर्ष असतोच ना? कोहंम, सोहम..
आता त्यांना आयते गिळायला मिळते आहे बापाच्या जीवावर, फुक्क्टच्या वांझोट्या प्रश्रांच्या रांगोळ्या काढायला जाते काय ? गिरणीत कामाला धाडा, लायनीवर येईल- असे म्हणुन थेट "खोटेपणाचा" शिक्का मारू शकतो आपण ?
मला वाटतं प्रत्येक पिढीचे प्रश्न वेगळे असणारच, विपुलतेचेही.

हूड- पहिल्यांदाच तुमच्याशी असहमत.

>> तुम्हाला तो अधिकार आहेच.
हे भिडणं ज्याच्या त्याच्या आयुष्याच्या प्रोग्रॅमिंगवर अवलम्बून असते.

कोसला देखील शेवती शेवटी एवढी ढेपाळलीय की सगळी कादम्बरी खोटीच वाटायला लागते >> येस! येस! हेच लिहायला आलो होतो.

कोसलाची आधीची पाने जितकी अस्सल वाटली होती, तितकीच निरर्थक, कृत्रिम अशी ही शेवटची पाने. या पानांनी सांगवीकराला न्याय दिला नाही. अजूनही कोसला जेव्हा वाचायला घेईन तेव्हा, हा शेवट गाळूनच वाचेन. आधीच्या पानांनी मेस्मेराइझ झालेल मेंदू त्याच स्थितीत हवा आहे. भ्रमनिरास न होता.

'बाकी शुन्य'च्या शेवटाने कथेला आणि जयदीप सरदेसाईलाही शंभर टक्के न्याय दिला आहे. हे प्रसंग खरे की खोटे याशी मला काही देणे घेणे नाही. पण कित्येक ठिकाणी मी स्वतःला रिलेट करू शकलो. कित्येक ठिकाणी 'अरे, हे पात्र कालच दिसले होते.. परवा भेटलेला मित्र अस्साच आहे की आपला..' असं वाटलं. आपल्या आजूबाजूलाच थोड्याफार फरकाने आढळणारा हा रखरखीतपणा, लौकिकार्थाने विकृती म्हटली जाईल अशा प्रकृती, मुळात लौकिकार्थातला कमअस्सलपणा मी नाकारला, तर मी नतद्रष्ट ठरेन.

भडक आणि अंगावर येणारे प्रसंग आणि भाषा.. म्हणजे काय ते कळलं नाही. चारचौघात सांगू शकणार नाही असे शब्द आणि प्रसंग म्हणजे भडक- असे असेल, आणि ते ज्यात आहे, ती साहित्यकृती अत्यंत मिडिऑकर किंवा वाईट- असे असेल, तर राजा-राणीच्या मवाळ, सर्वमान्य गोष्टी लिहिलेली पुस्तके म्हणजे उत्तम साहित्यकृती ठरतील. हे प्रसंग आणि भाषा त्या नायकाचा, कथेचा आत्मा असेल तर तर ते भडक (किंवा जे काय असेल ते) म्हणून मला मान्य आहे.

एका मित्राला वाचायला दिले तेव्हा त्याचा वासूनाका पेक्षाही मोठा (सांस्कृतिक वगैरे) धक्का बसला. 'असे कधी असते का'- हे मनात घेऊनच वाचायला सुरुवात केली तर असे होणारच. विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका- हा सरदेसाई इथेच, आजूबाजूला कुठे तरी दिसतो, आणि त्याचे असे हे दिसणेच या पुस्तकाचे यश आहे. साहित्यिक मुल्ये, भाषिक सौंदर्य वगैरेचे अनेक निकष ओलांडून हे पुस्तक उजवे ठरते ते या अस्सलणामुळे. 'नातिचरामि' सारखे ढोंग मला तरी 'शुन्य' मध्ये आढळले नाही. शिवाय भडक या शब्दाच्या व्याख्येलाच जागायचं, तर त्यात नातिचरामि अगदी फिट बसेल.

शेवटी शेवटी तर ती बाबा कदम छाप मनोरंजनाचे प्रतलही सोडून आणखी खाली घसरते >> हे विधान हसवणारे, मनोरंजक आहे. ('अशी तुलना सुचणे' हे हसवणारे, मनोरंजक आहे- असेही वाचले तरी चालेल. :फिदी:)

जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. >>>
टण्याच्या या विधानानंतर या बाफवर चर्चा करायचे प्रयोजन राहिलेले नाही, इतके ते 'काँन्क्ल्युडिंग' आहे. Happy

मला बाकी शून्य अजिब्बात पटले नाही. कोसलाबरोबर त्याची तुलना का होतेय हेही समजले नाही.
दोन कलाकृती स्वतंत्र आहेत त्यामुळे तुलना करून हाती काहीच लागणार नाही Happy

वालावलकरांनी अमुक एका मार्गाने नायकाला न्यायचाच असं ठरवून चालवल्यासारखं आहे सगळं.>> या वाक्याशी पूर्ण पणे सहम्त.

रैना, साजिरा सुंदर पोस्ट. Happy बाकी शून्य बद्दल मी काही 'मत' बनवणं जवळजवळ अशक्य वाटायला लागलंय (अजून पुरं व्हायचंय).. बर्‍याच वेळा वाचताना मनोमन पटत गेलं..काही काही वेळा तर आपल्याला जे वाटत होतं ते हेच. हेच शब्द पर्फेक्ट आहेत याला असं वाटलं. आणखी काय हवं? Happy
पण हे काही खरं नाही. सगळं भंपक. माझ्या वाचण्याचं प्रयोजन काय? इथल्या चर्चेचं प्रयोजन काय? मुळात ही उरस्फोड कशासाठी? दुसर्‍याच्या कल्पनाशक्तीला मोजपट्टी लावणारे आपण कोण? त्यानं काय साध्य होणारे? कशानंही काय साध्य होणारे? Proud

Pages