बाकी शून्यः कमलेश वालावलकर

Submitted by टवणे सर on 27 January, 2010 - 23:50

स्पॉइलर वार्निंगः पुस्तक वाचले नसल्यास ही पोस्ट वाचू नये.

मराठीत मी वाचलेल्या काही सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक. पहिल्याच पानापासून जबरदस्त पकड घेत हे पुस्तक एका विशिष्ट वेगाने जयदीप सरदेसाई नावाच्या इंजिनिअर-पत्रकार-सेल्समन-दारुडा-वेश्याबाज माणसाची कहाणी मांडते. कदाचित ह्या पुस्तकातले ज्युनिअर कॉलेज, आजूबाजूचा परिसर, इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिकची अंबड एमआयडीसी आणि तिथली एक बंगाली लोकांची वरचश्मा असलेली कंपनी अश्या अनेक गोष्टी समान असल्याने हे पुस्तक मला थेटच भावले. त्यामुळे कदाचित बाकी काही गोष्टींकडे कानाडोळा झाला असेल. पण त्यामुळे हे पुस्तक भिडले पण खूप जोरात.

अनेक लोकं करतात म्हणुन सुरु केलेले ग्रॅज्युएशनचे शिक्षण, जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. आणि मग एक विचित्र घुसमट.. त्यात जोडीला उभे राहणारे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न.. कादंबरीच्या नायकाला अधून मधून पडणारे प्रश्न, त्याचे संस्कृती-समाज-व्यक्ति ह्याबाबतची वक्तव्य हे सगळे ह्या मानसिकतेच्या-जडणीच्या(मोल्ड) व्यक्तिचे अतिशय सही सही वर्णन करते. अप्रतिम.

मी आहे म्हणुन जग आहे, माझ्या दृष्टीकोनातून जगाचे अस्तित्व माझ्या जन्माबरोबर सुरु होते आणि मृत्युबरोबर संपते, ज्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण जास्त तो समाज अधिक प्रगत, जातीव्यवथा, आरक्षणाचे समर्थन, जीवनाच्या निरर्थकपणामुळे येणारी टोकाची निराशा ह्या सगळ्याच गोष्टी फार प्रभावीपणे मांडलेल्या आहेत.

अनेकांना हे पुस्तक शिवराळ वाटू शकेल, भडक वाटू शकेल. पण मला स्वतःला तसे एकदाही वाटले नाही. माझ्या कॉलेजात जवळपास इतपत शिव्या अश्या प्रकारच्या सगळ्या मुलांच्या तोंडी असत. स्त्रीदेहाबद्दलचे आकर्षण, मुला-मुलींच्यात असलेले अनैसर्गिक अंतर, लैंगिक अतृप्ती आणि त्यातून येणारी विकृती (मग कधी ती मुलींना वर-खाली अधाशी नजरेने बघण्यातून व्यक्त होते तर दुसर्‍या टोकाला शारिरीक अत्याचारातून) हे देखील तसेच्या तसे आलेले आहे.

लेखक कुठेही कश्याचेही समर्थन करत नाही. नायकाच्या मनःस्थितीचे उदात्तीकरण तर मुळीच करत नाही. पण म्हणुन त्या मनःस्थितीचे, ती मनःस्थिती उद्भवण्यास कारणीभूत घटकांना (समाज, जन्मानेच आलेले गुण इत्यादी) बाइज्जत-बरी पण करत नाही.

बाकी शून्य वाचताना कोसलाची आठवण येणे आणि म्हणुनच तुलना होणे अपरिहार्य. कोसला भाषिक सौंदर्याच्या निकषावर नक्कीच उजवी आहे. भाषेला गोडवा आहे. बाकी शून्य अधिक रखरखीत आहे, लेखक म्हणुन देखील नेमाडे वालावलकरांपेक्षा उजवे आहेत. पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे. दोन्ही कादंबर्‍यातले ठसठशीत साम्य म्हणजे दोन्ही कादंबर्‍या निश्कर्षाप्रती पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या अध्यायात फसतात. निरर्थकतेच्या जाणीवेतून आणि समाजापासून विलग झाल्याच्या भुमिकेतून आलेली निराशा आणि तिचे टोकाचे रुप हे तिथेच सोडून न देता त्याला एक अंतिमता देण्याचा प्रयत्न दोन्ही कादंबर्‍यात फसलेला वाटतो कारण कदाचित ह्याला अंतिमताच नाहिये. बाकी शून्यची अजून एक कमी म्हणजे शेवटी शेवटी ही कादंबरी खर्‍याखुर्‍या प्रतलास (रिआलिस्ट) सोडून जुळवून आणलेल्या घटनांच्या मागे जाते (त्याचे उगाचच लोकांना वाटणारा साधू-चमत्कारी होणे, मिशेल बरोबर राहताना हमाली करणे आणि शेवटी देवयानीबरोबर लग्न).

ऑल इन ऑल, ही एक जबरदस्त कलाकृती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाची सी.टी.सी २ ...४....६....८.....१०....१२.लाख..आणि पुढे ...पण शेवटी बाकी शून्यच !

मि इथे नविन आहे, त्यमुले माराठि लिखानाच्या चुका माफ करा.......

मला बाकि शुन्य वाचुन बरेच दिवस झालेत....त्यात तो एक आत्म्हत्या करनारा मुलाचा भाग अनि त्याच् तत्व्ज्ञान मला बिल्कुल पट्ल् नाहि.

आनि शेवति त्या देवायनि चि काहिच गरज नव्हति. पुस्तक वाच्तन लेखकाच भ्यानक टोकाच इमजिनेशन च जानवत होत.

एकाओल्कखिच्या मित्रा ला तर सोफ्त पोर्न टोन देन्याचा प्रयत्न केलय अस वातल....

पुस्तक जबरदस्त भन्नाट लिहिन्याचा जबरदस्ति प्रयोग केलाय अस सारख वाटत रहात......

""""लेखक म्हणुन देखील नेमाडे वालावलकरांपेक्षा उजवे आहेत."""
हे तु सागणार का आम्हाला..
टन्या हे वाक्य फारच चमत्करिक वाटले...!!!!!

Pages