बाकी शून्यः कमलेश वालावलकर

Submitted by टवणे सर on 27 January, 2010 - 23:50

स्पॉइलर वार्निंगः पुस्तक वाचले नसल्यास ही पोस्ट वाचू नये.

मराठीत मी वाचलेल्या काही सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक. पहिल्याच पानापासून जबरदस्त पकड घेत हे पुस्तक एका विशिष्ट वेगाने जयदीप सरदेसाई नावाच्या इंजिनिअर-पत्रकार-सेल्समन-दारुडा-वेश्याबाज माणसाची कहाणी मांडते. कदाचित ह्या पुस्तकातले ज्युनिअर कॉलेज, आजूबाजूचा परिसर, इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिकची अंबड एमआयडीसी आणि तिथली एक बंगाली लोकांची वरचश्मा असलेली कंपनी अश्या अनेक गोष्टी समान असल्याने हे पुस्तक मला थेटच भावले. त्यामुळे कदाचित बाकी काही गोष्टींकडे कानाडोळा झाला असेल. पण त्यामुळे हे पुस्तक भिडले पण खूप जोरात.

अनेक लोकं करतात म्हणुन सुरु केलेले ग्रॅज्युएशनचे शिक्षण, जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. आणि मग एक विचित्र घुसमट.. त्यात जोडीला उभे राहणारे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न.. कादंबरीच्या नायकाला अधून मधून पडणारे प्रश्न, त्याचे संस्कृती-समाज-व्यक्ति ह्याबाबतची वक्तव्य हे सगळे ह्या मानसिकतेच्या-जडणीच्या(मोल्ड) व्यक्तिचे अतिशय सही सही वर्णन करते. अप्रतिम.

मी आहे म्हणुन जग आहे, माझ्या दृष्टीकोनातून जगाचे अस्तित्व माझ्या जन्माबरोबर सुरु होते आणि मृत्युबरोबर संपते, ज्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण जास्त तो समाज अधिक प्रगत, जातीव्यवथा, आरक्षणाचे समर्थन, जीवनाच्या निरर्थकपणामुळे येणारी टोकाची निराशा ह्या सगळ्याच गोष्टी फार प्रभावीपणे मांडलेल्या आहेत.

अनेकांना हे पुस्तक शिवराळ वाटू शकेल, भडक वाटू शकेल. पण मला स्वतःला तसे एकदाही वाटले नाही. माझ्या कॉलेजात जवळपास इतपत शिव्या अश्या प्रकारच्या सगळ्या मुलांच्या तोंडी असत. स्त्रीदेहाबद्दलचे आकर्षण, मुला-मुलींच्यात असलेले अनैसर्गिक अंतर, लैंगिक अतृप्ती आणि त्यातून येणारी विकृती (मग कधी ती मुलींना वर-खाली अधाशी नजरेने बघण्यातून व्यक्त होते तर दुसर्‍या टोकाला शारिरीक अत्याचारातून) हे देखील तसेच्या तसे आलेले आहे.

लेखक कुठेही कश्याचेही समर्थन करत नाही. नायकाच्या मनःस्थितीचे उदात्तीकरण तर मुळीच करत नाही. पण म्हणुन त्या मनःस्थितीचे, ती मनःस्थिती उद्भवण्यास कारणीभूत घटकांना (समाज, जन्मानेच आलेले गुण इत्यादी) बाइज्जत-बरी पण करत नाही.

बाकी शून्य वाचताना कोसलाची आठवण येणे आणि म्हणुनच तुलना होणे अपरिहार्य. कोसला भाषिक सौंदर्याच्या निकषावर नक्कीच उजवी आहे. भाषेला गोडवा आहे. बाकी शून्य अधिक रखरखीत आहे, लेखक म्हणुन देखील नेमाडे वालावलकरांपेक्षा उजवे आहेत. पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे. दोन्ही कादंबर्‍यातले ठसठशीत साम्य म्हणजे दोन्ही कादंबर्‍या निश्कर्षाप्रती पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या अध्यायात फसतात. निरर्थकतेच्या जाणीवेतून आणि समाजापासून विलग झाल्याच्या भुमिकेतून आलेली निराशा आणि तिचे टोकाचे रुप हे तिथेच सोडून न देता त्याला एक अंतिमता देण्याचा प्रयत्न दोन्ही कादंबर्‍यात फसलेला वाटतो कारण कदाचित ह्याला अंतिमताच नाहिये. बाकी शून्यची अजून एक कमी म्हणजे शेवटी शेवटी ही कादंबरी खर्‍याखुर्‍या प्रतलास (रिआलिस्ट) सोडून जुळवून आणलेल्या घटनांच्या मागे जाते (त्याचे उगाचच लोकांना वाटणारा साधू-चमत्कारी होणे, मिशेल बरोबर राहताना हमाली करणे आणि शेवटी देवयानीबरोबर लग्न).

ऑल इन ऑल, ही एक जबरदस्त कलाकृती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< इथल्या चर्चेचं प्रयोजन काय? मुळात ही उरस्फोड कशासाठी? दुसर्‍याच्या कल्पनाशक्तीला मोजपट्टी लावणारे आपण कोण? त्यानं काय साध्य होणारे? कशानंही काय साध्य होणारे? >>>
म्हणजे शेवटी बाकी शुन्य असं म्हणायचं आहे का ? Proud

म्हणजे शेवटी बाकी शुन्य असं म्हणायचं आहे का ? >> Proud Proud ते तर लेखकानं आधीच म्हटलय की. प्रत्येक वेळेला आपण काही वेगळं म्हणायलाच पाहिजे असं थोडीच आहे? Wink

मग एकाच वाक्यात पुस्तक लिहिता येत नाही का? सर्व बाकी शून्य आहे म्हणून? त्याला एवढे वळसे कशाला पाहिजेत? उगीच शाई कागद आणि अनेक वाचक्-तास यांचा अपव्यय Angry

एका वाक्यात तत्वज्ञान लिहून टाकले लिहिले तर त्याला ग्रॅव्हिटी येत नाही. शिवाय एका वाक्याच्या पुस्तकांवर मायबोलीवर किंवा इतरत्र चर्चा झालेली आठवत नाही. शिवाय एका वाक्याची पुस्तके मुळात प्रकाशक छापतील की नाही त्याची शंका वाटते. शिवाय एका वाक्याची पुस्तके छापली, तरी ती लिहिणार्‍या अन वाचणार्‍यांच्या डोक्याची पण शंका वाटते. Proud

वालावलकरांनी अमुक एका मार्गाने नायकाला न्यायचाच असं ठरवून चालवल्यासारखं आहे सगळं.>>>>
ह्या वाक्यातून नक्की काय म्हणायचे आहे?
प्रत्येक लेखक/लेखिका त्याला ज्या मार्गाने नायक/नायिका जायला पाहिजे त्याच आणि त्याच मार्गाने त्याला चालयला लावणार.. वाचणार्‍यांना जसे नायकाने चालावे तसे जर पुस्तकात असावे असे वाटत असेल तर त्यांनी स्वतःच लेखक बनावे की.. कशाला ते दुसर्‍या लेखकांची पुस्तके वाचायची.

शिवाय एका वाक्याच्या पुस्तकांवर मायबोलीवर किंवा इतरत्र चर्चा झालेली आठवत नाही.> इथेही चर्चा "टण्या"ने लिहिलय म्हणून झालीये, वालवालकरांनी लिहिलय म्हणून नाही Happy

फॅब्रिकेटेड, मार्केट डिमांड समोर ठेऊन लिहीलेले त्यामूळे ठरवून 'धक्कादायक'. भंपकपणाच्या बाबतीत याची तुलना फक्त 'नचिकेताचे आख्यान' (अर्थात भंपकपणात याचा दर्जा बाकी शून्यपेक्षा फार वरचा आहे) किंवा 'द व्हाईट टायगर' बरोबर होईल.

इथेही चर्चा "टण्या"ने लिहिलय म्हणून झालीये, वालवालकरांनी लिहिलय म्हणून नाही >> इथे काय, मेघना पेठे जे लिहितात, त्याचीही चर्चा होते. वालावलकर तर फारच दूरची गोष्ट. Proud

आगाऊला संपूर्ण अनुमोदन! 'नचिकेताचे आख्यान' हे खरोखरच अजून एक ठरवून लिहिलेले, फॅब्रिकेटेड, भंपक पुस्तक. रैना म्हणतेय तसं स्यूडो इंटुक पणाचा पोकळ आव आणून लिहिलेले. या आख्यान मालिकेची तर त्रिधारा आहे म्हणे. न.आ.च्या तुलनेत 'बाकी शून्य'चा काही भाग तरी निदान प्रामाणिक उतरलाय.

छ्या छ्या , या वालावलकराच्या...

आता पु.लं ची दोन तीन पुस्तके कितव्यांदा तरी वाचणे आवश्यक आहे.
टण्या , तुही वाच दोन पाणे पुलंची. जरा आराम पडेल तब्येतीला.... Proud

टण्या , तुही वाच दोन पाणे पुलंची. जरा आराम पडेल तब्येतीला.>>> Lol
एक्झॅक्टली, 'बाकी शून्य' वरा उतारा म्हणून निदान पुलंचं 'एक शून्य मी' तरी वाचच

एक्झॅक्टली, 'बाकी शून्य' वरा उतारा म्हणून निदान पुलंचं 'एक शून्य मी' तरी वाचच>>ROFL शीर्षक तरी प्रामाणीक आहे Wink

मित्रांनो, एक शून्य मी' जरूर वाचा. 'प्रश्नचिन्हा' खालचे टिंबाबद्दलचे विधान खूपच मार्मिक आहे. तसेच एका गरिब मुलीला दुकानदार १० पैशाचे तेल देत नसतो तेव्हा पुलंनी घेतलेली भूमिका, स्वता दिवाळीत तेलाची पणती लावणार नाही हा निर्णय हे सारे मन हेलावून टाकते.

टण्या , तुही वाच दोन पाणे पुलंची. जरा आराम पडेल तब्येतीला....
टण्या ,सकाळी दोन पाने, दुपारी दोन पाने अन रात्री झोपताना दोन पाने न विसरता वाच हं, लक्शात ठेवून....

टण्या ,सकाळी दोन पाने, दुपारी दोन पाने अन रात्री झोपताना दोन पाने न विसरता वाच हं, लक्शात ठेवून....
>>>>
ते बाकी एक शून्य पाठवून द्या मला.. पत्ता पाठवतो.. रोज सकाळ, दुपार आणि रात्री झोपताना दोन पाने वाचून काही फरक पडला तर लिहितो इथे नक्की.. Happy

टण्या ,सकाळी दोन पाने, दुपारी दोन पाने अन रात्री झोपताना दोन पाने न विसरता वाच हं, लक्शात ठेवून....
>>>>
पाण्याबरोबर घ्यायची हं ...

नातीचरामीची माझी कॉपी गिफ्ट म्हणून पाठवू का -
>> मला पण मला पण.. (वाचलं नाहिये अजून!)
बाकी शून्याची पण पाठवा कॉपी.. (kidding)

चर्चा वाचून मज्जा आली.. आता दोन्ही पुस्तकं वाचायलाच पाहिजेत!

येथे फक्त विषयाबद्दल (बाफच्या) चर्चा अपेक्षित आहे.. इतर चर्चा वपूविपूल मध्ये करा.. Happy

चर्चा बाफबद्दलच आहे त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल आहे.पहिल्या महायुद्धाची कारणे व परिणाम यामधे परिनामाची चर्चा विषयाला धरूनच असते. तसे पुढील परिणाम हे बीबी ला धरूनच आहेत....

मोठे शून्य ' हे आम्हाला टेक्स्टबुकात होते त्यामुळे मी ठाम Proud

http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html

घ्या. नंदननी ऑलरेडी कॅचरची आणि कोसल्याची तुलना करुन ठेवली आहे.
जबरीही रे नंदन. आता तू बाकी शून्य वाचच. दुर्दैवाने तुझं मत टण्याच्या मताशी जुळलं तर मी नाईलाजाने बाकी शून्य पुन्हा वाचायला घेईन. Proud

Pages