भस्मबीज - भाग ३२
पूर्वभाग
जीपमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याचे स्पष्ट झाल्याने हेगडेंचा हा अपघात नसून अदृश्य शक्तीचा हल्ला असल्याचा संशय अधिक दृढ होतो. सहा-सात महिन्यांपूर्वी बेपत्ता होऊन जंगलात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या ट्रेकरचा या घटनांशी संबंध असावा, असा धागा त्यांच्या हाती लागतो. दुसरीकडे, देवप्पाने अनन्याच्या सुरक्षेसाठी नेहाच्या मदतीने आखलेली गुप्त योजना अमावस्येच्या आठ दिवस आधी निर्णायक टप्प्यावर आणली आहे; त्यासाठी तो स्वतःही वेदनादायक साधना करत आहे. नेहा अनन्याला घेऊन सुप्यातून निघते, तर गुहेत जोगींच्या बोलण्यातून मल्लीला तेराव्या विधीनंतर मिळणाऱ्या खजिन्याचा उल्लेख ऐकू येतो आणि चंद्रिकेच्या पुनरागमनाबाबत कल्लेश्वराने दिलेल्या आश्वासनावर त्याच्या मनात पहिल्यांदाच संशय निर्माण होतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ३३ - चाहूल
चार दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर हेगडे आणि पुत्रन परत कुमठा पोलीस ठाण्यात रुजू झाले होते.
"पुत्रन, एक काम कर. साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी, ऑक्टोबरच्या सुमारास उत्तर कन्नडच्या जंगलात एक ट्रेकर बेपत्ता झाली होती. त्या प्रकरणाची फाईल शोधून काढ."
“साहेब, बहुतेक ते प्रकरण काठगल पोलीस चौकीत नोंदवलं गेलं होतं, तिथली फाईल आपल्याकडे कशी असेल?” पुत्रन म्हणाला.
“काठगल चौकी आपल्या ठाण्याच्याच हद्दीत येते,” हेगडे म्हणाले. “चौकीत प्राथमिक नोंद झाली असली, तरी कुमटा हे मुख्य पोलीस ठाणं आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची प्रत इथल्या नोंदवहीत किंवा रेकॉर्ड रूममध्ये असायला हवी. शोधून बघ. नसेल तर चौकीतून मागवून घे.”
संध्याकाळी पुत्रन फाईल घेऊन परत आला. हेगडेंनी ती काळजीपूर्वक उघडली. पहिल्याच पानावर त्यांची नजर तारखांवर स्थिरावली. १८ ऑक्टोबर २०२५, शनिवार - ट्रेकर बेपत्ता.
त्याखाली पुढची नोंद होती. १९ ऑक्टोबर २०२५, रविवार - जंगलाच्या आतील भागात बेशुद्धावस्थेत आढळली.
ते फाईलची पुढची पानं उलटू लागले. एका पानावर त्यांची नजर थबकली.
शोधपथकाने ट्रेकर जिथे सापडली होती, त्या ठिकाणाचा एक छायाचित्र पुरावा म्हणून जोडला होता. छायाचित्रात जमिनीवर एक मोठा काळा दगड दिसत होता. त्याच्या पृष्ठभागावर पांढऱ्या मातकट रंगाच्या पावडरने (राखेने?) एक उलटा अर्धचंद्र काढलेला होता आणि त्याच्या अगदी खाली ठळकपणे १३ हा आकडा लिहिलेला होता.
हेगडे बराच वेळ त्या छायाचित्राकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात अनेक प्रश्न एकाच वेळी उभे राहिले. त्या ट्रेकरला नेमकं काय दिसलं होतं? ती जवळ जवळ दोन दिवस जंगलात कुठे होती? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, त्या दगडावर चिन्हांकित आकडा काढण्यात आला होता त्याचा अर्थ काय?
हेगडेंनी फाईलमधील ट्रेकरचा संपर्क क्रमांक शोधला आणि तिला फोन लावला.
“हॅलो?”
“नमस्कार. मी कुमटा पोलीस ठाण्यातून सिनियर इन्स्पेक्टर हेगडे बोलतोय. सहा-सात महिन्यांपूर्वी तुम्ही उत्तर कन्नडच्या जंगलात बेपत्ता झालात आणि दुसऱ्या दिवशी बेशुद्धावस्थेत सापडलात. त्या प्रकरणासंदर्भात तुमच्याशी पुन्हा काही बोलायचं आहे.”
पलीकडून काही क्षण शांतता पसरली.
“तुम्हाला शक्य असेल तर उद्या पोलीस ठाण्यात येता येईल का? काही तपशील पुन्हा पडताळून पाहायचे आहेत.”
************************************************************************************************************************
कुमठ्याच्या दिशेने जाणारी गाडी गावाच्या हद्दीत शिरली, तेव्हा संध्याकाळचे ऊन हळूहळू उतरू लागले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नारळ आणि सुपारीच्या बागा पसरल्या होत्या. गावातील ओळखीच्या खुणा दिसू लागताच नेहा खिडकीतून बाहेर पाहू लागली. अनेक दिवसांनी ती पुन्हा आपल्या मामाच्या गावी परतत होती.
काही वेळातच गाडी भागवत निवास समोर येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून मामा बाहेर आले. नेहाला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
“अगं नेहा! ये, ये. कधीपासून वाट बघतोय तुमची!”
"अगं नेहा!" आजींनी पुढे येत नातीला घट्ट मिठी मारली. "बरी आहेस ना? प्रवास नीट झाला का?"
"हो, आजी." नेहा मागे वळली आणि तिने अनन्याला पुढे केलं. "आजी, मामा, ही अनन्या. अभिजित सरांची मुलगी. उद्या तिचा वाढदिवस आहे आणि आम्ही तिला तिच्या बाबांना भेटायला चाललो आहोत. अनन्या, हे माझे मामा आणि आजी."
अनन्याने दोघांना वाकून नमस्कार केला. "नमस्कार."
"तू त्यांना मामाच म्हण," नेहा हसून म्हणाली. "सगळे मामाच म्हणतात."
"नमस्कार, मामा," अनन्या म्हणाली, आणि मामांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
आजींनी मात्र काहीच न बोलता अनन्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला आणि बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिल्या. प्रवासाच्या थकव्यानेही अनन्याच्या चेहऱ्यावरचे तेज कमी झाले नव्हते.
"तुला उदंड आयुष्य लाभो, पोरी. तुझ्या सुखाच्या वाटेत कुणी आडवं येऊ नये.”
मामांनी दोघींचे सामान आत नेले.
“आता आली आहेस तर निवांत राहा. परत जायची घाई करू नकोस.”
अनन्या शांतपणे घर आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. आजींच्या बोलण्यातला मोकळेपणा आणि मामांची आपुलकी पाहून तिलाही घरच्यासारखं वाटू लागलं. पण राहून राहून तिला अभिजितची प्रकर्षाने आठवण येऊ लागली.
रात्रीचे जेवण संपताच नेहाने स्वातीला फोन लावला. अनन्याने फोन घेतला, आईशी थोडा वेळ बोलली, आणि मग थकून माडीवरच्या खोलीत झोपायला निघून गेली.
बाहेर मामा आणि नेहा दिव्याच्या मंद उजेडात शांतपणे बसले होते. "उद्या सकाळी लवकर निघूया," मामा खालच्या आवाजात म्हणाले. "यल्लाप्पा रस्त्याच्या टोकाशी वाट पाहत असेल."
"मला माहीत आहे, मामा."
मामांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत काळजी होती, आणि त्यापेक्षा खोल एक दबलेली भीती. "तुला खरंच खात्री आहे? देवप्पांनी सांगितलेलं सगळं तू समजून घेतलंयस?"
"हो." ती ठाम आवाजात म्हणाली. "तिला काहीही कळता कामा नये, मामा."
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी दुपारी कुमटा पोलीस ठाण्यात एक पंचविशीतील तरुणी आली. प्रवेशद्वारातून आत येताच तिने एकदा आजूबाजूला पाहत सावधपणे आत पाऊल टाकले. तिच्या चेहऱ्यावर संकोच आणि मनात काहीशी धाकधूक स्पष्ट दिसत होती. आत जाऊन ती म्हणाली, “मला इन्स्पेक्टर हेगडेंना भेटायचं आहे. त्यांनी मला बोलावलं होतं.”
हवालदाराने तिचं नाव विचारलं.
“तृप्ती बर्गे.”
काही वेळातच तिला हेगडेंच्या केबिनमध्ये नेण्यात आलं.
“या, तृप्ती. बसा.”
तृप्ती खुर्चीवर बसली, पण तिची नजर सतत दाराकडे जात होती. हेगडेंनी तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला.
“घाबरू नका. तुम्हाला पुन्हा त्या घटनेची आठवण करून द्यावी लागेल, याची मला जाणीव आहे. पण तुम्ही सांगितलेली एखादी गोष्ट आमच्या तपासात महत्त्वाची ठरू शकते.”
तृप्तीने पाण्याचा एक घोट घेतला. “सर, मी त्या घटनेबद्दल मला आठवत होतं तितकं सगळं सांगितलंय. ती घटना माझ्या मेंदूवर अक्षरशः कोरली गेलीय, घटनेतील बारीक बारीक तपशीलसुद्धा मला अजूनही ठळकपणे आठवतायत."
“हरकत नाही. आपण सुरुवातीपासून बोलूया. त्या दिवशी तुम्ही जंगलात कधी पोहोचलात?”
“दुपारी. मी एकटीच ट्रेकिंगला गेले होते. परतीच्या वेळी वाट चुकली. सुरुवातीला वाटलं, पुढे गेल्यावर मुख्य रस्ता मिळेल. पण जसजसा वेळ होत गेला, तसतसं जंगल अधिकच दाट होत गेलं. संध्याकाळ झाली तेव्हा मला जाणवलं की मी पूर्णपणे भरकटले आहे.”
तिने क्षणभर डोळे मिटले.
“मग अचानक मला आग दिसली. थोड्या अंतरावर काही माणसं जमली होती. मला वाटलं, कदाचित गावातले लोक असतील. त्यांच्याकडे मदत मागावी म्हणून मी जवळ गेले. पण...” तिचा आवाज अचानक अडखळला.
“पण काय?” हेगडेंनी विचारलं.
"काही अंतर पुढे गेल्यावर झाडांची दाटी थोडी विरळ झाली आणि समोर एक मोकळी जागा दिसू लागली. त्या मोकळ्या जागेच्या मागच्या बाजूला काळ्या कातळात एक मोठी गुहा होती. गुहेचं तोंड अंधारात हरवल्यासारखं दिसत होतं. तिच्या प्रवेशद्वारासमोर काही दगड आणि वाळलेली लाकडं पडली होती. गुहेच्या अगदी समोर, थोड्या अंतरावर जमिनीवर राखेचं मोठं वर्तुळ आखलेलं होतं आणि त्याच्या मध्यभागी धुनी धगधगत होती आणि त्या खडकासमोर पेटलेल्या धुनीच्या उजेडात अंगाला राख फासलेला, जटांचा भार खांद्यावर पडलेला एक माणूस बसला होता. त्याच्या शेजारी एक बकरा त्याचे चारही पाय बांधलेल्या अवस्थेत आडवा पडलेला आणि तो बकरा डोळे विस्फारून थरथरत होता, जणू त्याला पुढे काय होणार आहे हे आधीच कळलं होतं."
"मी आजूबाजूला नजर फिरवली. गुहेच्या डाव्या बाजूला एक प्रचंड काळा खडक होता. त्याचा पृष्ठभाग इतर खडकांपेक्षा वेगळा दिसत होता. त्यावर वरपासून खालपर्यंत अनेक विचित्र चिरा पडल्या होत्या. काही चिरा सरळ खाली उतरल्या होत्या, तर काही एकमेकांना छेद देत अनोखे आकार तयार करत होत्या. आगीच्या प्रकाशात त्या चिरा एखाद्या अज्ञात लिपीत कोरलेल्या खुणांसारख्या भासत होत्या. मला त्या खडकाकडे पाहून क्षणभर विचित्र अस्वस्थता जाणवली. मात्र, त्याच वेळी आगीभोवती बसलेल्या माणसांच्या हालचालींनी माझं लक्ष पुन्हा तिकडे वेधलं. त्या सगळ्यांच्या मध्यभागी उंच, धिप्पाड माणूस उभा राहिला..."
तृप्तीच्या बोटांची हालचाल अस्वस्थपणे सुरू झाली.
"त्या माणसाने डोळे मिटून खोल, घोगऱ्या आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याचा आवाज वाढत गेला, आणि पुढच्याच क्षणी त्याने बकऱ्याला उचलून धुनीतल्या आगीत फेकलं." हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली, तिने हाताने तोंड दाबलं.
"पुढे." हेगडेंनी विचारले, ते आता थक्क होऊन ऐकत होते.
“तो बकरा जिवंत होता, सर. त्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याच्या आवाजाने जंगल दणाणून सोडले...”
ती पुढे बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
हेगडेंनी तिला थोडा वेळ दिला.
"हवेत जळलेल्या मांसाचा आणि केसांचा उग्र दर्प पसरला. थोड्या वेळाने त्या माणसाने मंत्र म्हणणे थांबवले आणि हातातल्या कवटीत असलेले कसले तरी द्रव्य त्या आगीत टाकताच आग भडकून तडतड आवाज येऊ लागला. मग तो माणूस उठला आणि बाजूच्या एका वृद्ध माणसाला म्हणाला, "याची पूर्ण राख होईस्तोवर आग विझू देऊ नकोस. दोन दिवसांनी अमावास्येला मला ही राख हवीय." आणि तो उठून माझ्याच दिशेने चालत येऊ लागला."
हेगडेंनी विचारलं, “तुम्ही तिथून पळून गेलात?”
तृप्तीने मान हलवली.
“हो. मी सावधपणे मागे सरकण्यास सुरुवात केली. पण पायाखाली एक सुकलेली फांदी आली."
“कोण आहे तिथे?” त्याचा आवाज ऐकताच माझ्या अंगातलं त्राणच गेलं. मागून कोणीतरी जोरात ओरडलं. “पकडा तिला!”
"आणि मग मी तिथून पळत सुटले, मला फक्त एवढं कळत होतं की मला त्यांच्या तावडीतून सुटायचं आहे. मी मागे वळून पाहिलंच नाही. मी धावत होते, फांद्या तोंडावर आपटत होत्या, पायाखाली मुळं अडखळत होती, आणि माझ्या पाठीमागे काहीतरी येत होतं, सर. मला त्याचा आवाज येत नव्हता, पण मला ते जाणवत होतं. "
“तुम्हाला कोणीतरी पाठलाग करत असल्याची जाणीव झाली?”
“हो. सुरुवातीला मला वाटलं, त्या माणसांपैकी कुणीतरी माझ्या मागे येत असेल. मी वेग वाढवला. पण माझ्या मागून येणारा आवाजही वेगाने जवळ येत होता. मी मागे वळून पाहिलं...”
तिने हेगडेंकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आता केवळ भीती नव्हती, तर त्या रात्रीचा दहशतीचा अनुभव पुन्हा जागा झाल्याचं स्पष्ट दिसत होतं.
“तिचा चेहरा दिसला होता?”
तृप्तीने नकारार्थी मान हलवली.
“नाही. पण तिचे डोळे दिसले होते. दोन लालसर ठिपक्यांसारखे. मी जितकी वेगाने धावत होते, तितक्याच वेगाने ती माझ्या मागे येत होती. एकदा तर मला स्पष्ट जाणवलं की कुणीतरी माझ्या खांद्यामागे उभं आहे. मी वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं.”
तिने दोन्ही हातांनी आपले हात घट्ट पकडले.
“त्यानंतर मला काहीच आठवत नाही. दोन दिवसांनी जेव्हा शुद्ध आली, तेव्हा मी रुग्णालयात होते.”
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मामा, नेहा आणि आजीनी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चहा नास्ता आटोपून मामा, नेहा आणि अनन्या अभिजितला भेटण्यासाठी यानाच्या दिशेने निघाले.
मामांनी गाडी चालवण्याची जबाबदारी घेतली होती. नेहा त्यांच्या शेजारी बसली होती, तर अनन्या मागच्या सीटवरून खिडकीबाहेर दिसणारा निसर्ग न्याहाळत होती. सकाळपासूनच आकाश निरभ्र होते.
वाटेत अनन्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोन घेत होती, स्वातीचा, अथर्वचा, आजी-आजोबांचा, आणि सगळ्यांना हसून उत्तर देत होती.
गाडी कुमठ्याच्या बाहेर पडून घाटाच्या रस्त्याला लागली तेव्हा अनन्या खिडकीतून बाहेर पाहत अचानक म्हणाली. "नेहा,बाबा खरंच ट्रेनिंगला गेलेत का?"
नेहाने क्षणभर श्वास रोखला.पण स्वतःला सावरत तिने विचारले, "तुला काय वाटतं?"
"ट्रेनिंगला गेलेला माणूस इतके दिवस एकदाही फोन करत नाही, हे मला पटत नाही," अनन्या म्हणाली. "आणि आई 'रेंज नसते' म्हणते तेव्हा ती माझ्याकडे पाहतच नाही. आतापर्यंत मी काही बोलले नाही, कारण तुम्ही म्हणालात की सगळं बाबांनाच विचारायचं. मी त्यांनाच विचारेन. पण त्याआधी मला थोडी तरी कल्पना द्या."
"अनन्या. तुझ्या बाबांनी एक अवघड साधना सुरू केली आहे, आणि ती पूर्ण होईपर्यंत ते कुठे आहेत आणि काय करत आहेत हे त्यांना कोणालाच सांगता येत नव्हतं. तुम्हाला काळजी वाटू नये म्हणून त्यांनी ट्रेनिंगचं कारण सांगितलं."
"साधना?" अनन्याने भुवया उंचावल्या. "विहिरीजवळ जे झालं, त्याचा याच्याशी संबंध आहे का?"
"आहे," नेहा म्हणाली. मामांनी पुढे पाहतच हळूच मान हलवली, जणू ते उत्तर योग्य होतं. "पण त्याचं पूर्ण उत्तर आज तुला मिळणार नाही. योग्य वेळ आली की तुझे बाबाच तुला सगळं सांगतील. आणि ते जे सांगणार नाहीत, त्यावरून त्यांच्यावर रागावू नकोस. त्यांचाही नाईलाज आहे."
"आणि आईला? तिला माहीत आहे का?"
"थोडं माहीत आहे," नेहा म्हणाली. "पण तुला त्रास होऊ नये म्हणून तिनेही तुला काही सांगितलं नाही."
"ठीक आहे, मी रागावणार नाही." मग थोडं थांबून ती हळू आवाजात म्हणाली, "पण माझ्याशी खोटं बोललेलं मला आवडत नाही."
याना गावातल्या चहाच्या टपरीपाशी रस्ता संपत होता. मामांनी तिथे गाडी थांबवली आणि खाली उतरले. नेहानेही दरवाजा उघडला. तिच्या मागोमाग अनन्या आपली पर्स घेऊन गाडीतून उतरू लागली. आणि त्याच क्षणी...अनन्याचा पाय जमिनीवर पडताच आजूबाजूच्या वातावरणात एक अनाकलनीय बदल घडू लागला.
काही क्षणांपूर्वी डोक्यावर तळपणारा सूर्य अचानक काळ्या ढगांच्या आड गेला. आकाशात एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत काळ्या ढगांनी दाटी केली. अचानक आलेल्या त्या ढगांमुळे परिसरावर एखाद्या काळ्या पडद्यासारखा अंधार पसरला. वाऱ्याने उग्र रूप धारण केले. जंगलातून वाऱ्याचे प्रचंड झोत घोंघावत सुटले. झाडांच्या फांद्या एकमेकींवर आदळू लागल्या, पानांचा प्रचंड आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागला. वाऱ्याच्या वेगाने सुकलेली पाने, धूळ आणि लहानमोठ्या फांद्या हवेत उडू लागल्या. जणू जंगलात एखाद्या अदृश्य शक्तीने प्रचंड वादळ उठवले होते. फांद्यांवर बसलेले पक्षी घाबरून दिशाहीन उडू लागले. काही पक्ष्यांनी झाडांच्या ढोलीत आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींचे थवे घाबरून दूरवरच्या डोंगरांकडे उडाले.
“हे काय...?” अनन्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच आकाशात प्रचंड वीज कडाडली.
क्षणभर संपूर्ण परिसर निळसर-पांढऱ्या प्रकाशाने उजळून निघाला. समोरचा डोंगर, झाडे आणि ते जंगल एखाद्या भयावह चित्रासारखे दिसू लागले. त्यानंतर झालेल्या ढगांच्या गडगडाटाने जणू संपूर्ण डोंगररांग हादरली.
मामांनी चमकून आकाशाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते, "वळीव, हा असा भयानक?"
पण नेहाचे लक्ष आकाशाकडे नव्हते. ती अनन्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. देवप्पांनी दिलेल्या सूचना, अनन्यापासून लपवलेले सत्य आणि इतके दिवस जपलेली योजना... सगळे काही एका क्षणात तिच्या डोळ्यांसमोरून सरकले.
तेवढ्यात पुन्हा एकदा वीज चमकली. यावेळी तिचा प्रकाश जवळच्या डोंगरामागे पसरला आणि काही क्षणांसाठी त्या डोंगराच्या कडेला असलेला एक काळाकभिन्न कातळ स्पष्ट दिसला. त्या कातळावरून काहीतरी सरकत असल्याचा भास नेहाला झाला. तिने डोळे बारीक करून तिकडे पाहिले; पण पुढच्याच क्षणी सगळीकडे पुन्हा अंधार पसरला.
“नेहा, काय झालं?” अनन्याने विचारले.
नेहाने काही उत्तर दिले नाही.
दूरवर जंगलाच्या आतून एखाद्या जंगली पशूच्या डरकाळीप्रमाणे दोन-तीनदा आवाज आला आणि मग अचानक पाहिल्यासारखं सगळं शांत झालं.त्या शांततेत अनन्याला आपल्या कानाजवळ कोणीतरी कुजबुजल्याचा भास झाला.
ती दचकून मागे वळली. “कोण आहे?”
“काय झालं?” नेहाने तत्काळ विचारले.
“कोणीतरी बोललं असं वाटलं.”
“कुणी नाही. तुला भास झाला असेल,” नेहा म्हणाली. मात्र तिलाही आता धास्ती वाटू लागली.
मामांनी दोघींकडे पाहिले. त्यांनाही आता हे केवळ अचानक आलेले वादळ वाटत नव्हते. त्यांनी अनन्याला गाडीजवळच थांबण्यास सांगितले आणि नेहाला नजरेनेच सावध केले.
पण त्यांना माहीत नव्हते की या वादळाची सुरुवात कितीतरी खोलवर, काळाच्या अंधारात झाली होती. ज्या शक्तीने वर्षानुवर्षे आपल्या तेराव्या बळीची प्रतीक्षा केली होती, जिच्या जागृतीसाठी अनेक अमानवी विधी केले गेले होते, तिला अखेर तिच्या प्रतीक्षेचा अंत झाल्याचे जाणवले होते.
तिच्या शेवटच्या बंधनांना आतून तडे जाऊ लागले होते. काळ्या कातळांच्या खोल कपारीत, जमिनीखाली कुठेतरी, राखेच्या थराखाली दडलेली एक अदृश्य हालचाल जागी झाली होती. जणू शेकडो वर्षांपासून बंद असलेल्या एखाद्या घट्ट मिटलेल्या डोळ्याने हळूहळू आपली पापणी उघडली होती.
अनन्या आली होती. आणि तिच्या आगमनाने त्या शक्तीचा आवेग अनावर झाला होता.
अनन्याची एन्ट्री थरारक एकदम !
अनन्याची एन्ट्री थरारक एकदम !
बाबौ !!
बाबौ !!
बापरे !!! आता मला अनन्या ची
बापरे !!! आता मला अनन्या ची काळजी वाटायला लागली. का नेहा तिला घेऊन आली ? उलट अनन्या ला दूर कुठे पाठवायला हवे होते ना ?
नितीनजी पुढचा भाग लवकर टाका . आता उत्सुकता वाढलीय .
खतरनाक!
खतरनाक!
अनन्या आली होती. आणि तिच्या
अनन्या आली होती. आणि तिच्या आगमनाने त्या शक्तीचा आवेग अनावर झाला होता.>>>>>
ज ब र द स्त..
सूक्ष्म डिटेलिंग खूप आवडले.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
उलट अनन्या ला दूर कुठे
उलट अनन्या ला दूर कुठे पाठवायला हवे होते ना ?>> होय. तिला दूरदेशी पाठवायला हवे होते.
As a mom - अशा प्रसंगी मुलीला एकटं सोडलं नसतं आणि संकटाच्या दिशेने तर अजिबात सोडलं नसतं.
कथा थरारक..
कथा थरारक..
शेवटचे वादळ तर डोळ्यापुढे दिसले..
सामी आणि नानबा बरोबर सहमत...
हा भाग सुद्धा मस्तच. यावर जर
हा भाग सुद्धा मस्तच. यावर जर सिनेमा आला तर त्याची सुरुवात अनन्याच्या या एन्ट्रीने व्हायला हरकत नसावी.
सामी, नानबा + १
सामी, नानबा + १
जबरदस्त!
जबरदस्त!
या कथेतील अनन्या म्हटल की फॅमिली मॅन मधील मुलगीच नजरेसमोर येतेय
>>>>या कथेतील अनन्या म्हटल की
>>>>या कथेतील अनन्या म्हटल की फॅमिली मॅन मधील मुलगीच नजरेसमोर येतेय>>>
अगदी बरोबर...
चला casting पण सुरू झालं... कुणी producer आहे का मायबोली वर?
कसली भन्नाट वेब सीरिज होईल.
अनन्या ला नेहा बरोबर पाठवण्या इतका विश्वास नेहा ने स्वाती आणि अभिजीत कडून मिळवला होता, ती आणि तिची आजी, मामा ह्यात जोडले गेलेत त्यामुळे स्वातीने अनन्या ला नेहा बरोबर पाठवण खटकत नाही. एकंदर घडलेल्या गोष्टी नुसार अनन्या आणि अभिजीत यांची भेट होणे ही आवश्यक वाटत.
देवप्पा आणि नेहाचा काय प्लान आहे त्याची उत्सुकता आहे.
Ananya
अनन्या ला पाठवलंय म्हणजे त्यात काहीतरी योजना असणार आणि स्ट्रॉंग कवच असणार तिच्याभोवती
आणि स्वातीला ह्या गोष्टीचा विश्वास असणार की आपल्या मुलीला देवाप्पा काही होऊ देणार नाही
मला नेहा चा रोल काय असेल ह्याची उत्सुकता लागून राहिली आहे
बाबओ
बाबओ
मला वाटतंय कल्लेश्वर चा अंत
मला वाटतंय कल्लेश्वर चा अंत अनन्या कडून होणार आहे म्हणून देवप्पा अनन्या ला येऊ देतोय.