भस्मबीज - भाग ३१
पूर्वभाग
अनन्याच्या जन्मतिथीचा तेराव्या बळीशी असलेला संबंध देवप्पा अभिजितला उघड करून सांगतो; मात्र भस्मबीजाच्या अंतिम विधीपर्यंत अनन्याचेच रक्षण होणार असल्याचे स्पष्ट करतो. कल्लेश्वराची पंधरा रात्रींची उग्र तारा साधना पूर्ण होते आणि देवी त्याला अभय देते, पण तिच्या शक्तीचा वापर दुसऱ्याला इजा करण्यासाठी न करण्याची कठोर अट घालते. दरम्यान, हेगडेंना पडक्या देवळात सापडलेल्या हाडांचे अवशेष मानवी असल्याचे वैद्यकीय तपासणीत समजते आणि ते जुन्या स्मशानाचा शोध घेण्याचे ठरवतात. कल्लेश्वराला पोलिसांनी आपल्या विधीच्या वस्तूंना हात लावल्याचे समजताच तो त्यांच्यावर अदृश्य शक्तीने हल्ला चढवतो; जीपला अपघात घडवून चालकाचा मृत्यू होतो, तर हेगडे आणि पुत्रन कसाबसे बचावतात. हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला हल्ला असल्याची खात्री हेगडेंना पटते
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ३२ - पुढचं पाऊल
हेगडे आणि पुत्रन यांनी एकमेकांच्या खांद्याचा आधार घेत रस्त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. प्रत्येक पावलांवर हेगडेंच्या बरगड्यांत कळ उठत होती, कपाळाच्या जखमेतून रक्त अजूनही ठिबकत होतं आणि पुत्रनच्या सोलवटलेल्या हातावरचं रक्त सुकून काळसर पडत चाललं होतं.
काही अंतर चालून गेल्यावर हेगडेंच्या मोबाईलला नेटवर्कची रेघ दिसली. त्यांनी थरथरत्या हाताने पोलीस ठाण्याचा नंबर लावला आणि अपघाताचं ठिकाण सांगितलं. पलीकडून आलेलं उत्तर त्यांना अपेक्षित होतंच: ठिकाण दुर्गम आहे, कच्चा रस्ता आहे, आणि मदत पोहोचायला बराच वेळ लागेल.
त्यांनी क्षणभर विचार केला आणि त्यांना देवप्पाची आठवण झाली. देवप्पाचा नंबर त्यांच्याकडे नव्हता, पण भागवतांकडे होता, आणि भागवतांचा नंबर त्यांच्या फोनमध्ये होता.
"भागवत, हेगडे बोलतोय," ते धापा टाकत म्हणाले. "आम्ही यानात आहोत, आमचा अपघात झालाय. पोलिसांची मदत यायला वेळ लागेल. जरा देवप्पाला सांगाल का?, आम्हाला मदत हवी आहे, तातडीने."
"साहेब, तुम्ही सुखरूप आहात ना?" मामांनी काळजीच्या स्वरात विचारले.
"नशिबाने जिवंत आहोत. बाकी नंतर सांगतो."
फोन ठेवून ते रस्त्याच्या कडेला एका झाडाच्या बुंध्याला टेकून बसले.
थोड्याच वेळात दूरवरून दुचाकीच्या इंजिनाचा आवाज ऐकू आला. आणि वळणावरून यल्लाप्पा धुळीचा लोट उडवत प्रकट झाला. त्याने दुचाकी थांबवली, दोघांकडे एक नजर टाकली अधिक काही न विचारता त्याने पुत्रनला आणि मग हेगडेंना दुचाकीवर बसवलं आणि हळूहळू देवप्पाच्या झोपडीकडे नेलं. कच्च्या रस्त्यावरून जाताना हेगडेंना झाडांच्या सावल्या वळवळत असल्यासारख्या वाटल्या आणि त्यांना वारंवार वाटत होतं की त्यापैकी एखादी सावली त्यांच्याकडे पाहतेय.
झोपडीजवळ पोहोचल्यावर देवप्पाने त्यांना पाहिलं, "बसवा त्यांना ओसरीवर," तो यल्लाप्पाला म्हणाला. "पाणी आण. आणि आतून औषधाचं गाठोडं घे."
त्याने स्वतः हेगडेंच्या डोक्यावरची जखम निरखून पाहिली. कोमट पाण्याने रक्त पुसलं, आणि वाटीतलं हिरवट, उग्र वासाचं वाटण जखमेवर लावलं. हेगडे दात ओठ खात राहिले, पण त्यांनी आवाज काढला नाही. खांद्यावर आणि पाठीवर पट्ट्या बांधल्या गेल्या आणि पुत्रनच्या हाताच्या जखमांवरही तेच औषध लागलं. थोड्याच वेळात दोघांच्या अंगातली थरथर कमी होऊ लागली. देवप्पाने त्यांच्या हातात पाण्याचे तांबे दिले.
तेवढ्यात अंगणाच्या कोपऱ्यातून अभिजित जपातून उठून त्यांच्याकडे आला, त्याने दोघांना पाहिलं त्याला काही क्षणांपूर्वी जपात जाणवलेली अस्वस्थता आठवली, आणि तो गप्प उभा राहिला.
"काय झालं?" असे विचारत देवप्पाच्या शेजारी बसला.
हेगडेंनी रस्त्यावरची काळी आकृती, ब्रेक न लागणं, स्टिअरिंग हातात न राहणं आणि जीप उलटल्यावर झाडांच्या गर्दीतली ती सावली, सगळं सांगितलं.
अभिजितच्या कपाळावर आठ्या उमटल्या, "हेगडे सर, साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी याच परिसरात एक ट्रेकर बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी ती अचानक जंगलाच्या आतल्या भागात बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्या वेळी तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं, हेही स्पष्ट झालं नव्हतं."
हेगडेंनी वर पाहिलं."तुला त्या घटनेबद्दल आणखी काही माहिती आहे का?" ते म्हणाले. "ती नेमकी कुठे बेपत्ता झाली होती? आणि सापडली तेव्हा तिची अवस्था कशी होती?"
"नाही, सर. पण त्या घटनेचा आणि आत्ताच्या घटनांचा काही संबंध असू शकतो, असं मला वाटतं."
हेगडे काही क्षण गप्प राहिले. अपघात, जंगलातल्या विचित्र घटना, राखेतली स्मशानं, तेरावी रात्र आणि आता एक बेपत्ता ट्रेकर. हे धागे एकमेकांशी जोडलेले असण्याची शक्यता त्यांना नाकारता येत नव्हती. त्यांनी मनाशी ठरवलं, त्या ट्रेकरचा माग काढायचा.
************************************************************************************************************************
हेगडे आणि पुत्रण यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी रस्त्याच्या वळणाआड दिसेनाशी झाली, तेव्हा संध्याकाळच्या मावळत्या सूर्याची शेवटची तिरीप अंगणातल्या तुळशीवृंदावनावर पडली होती. काही क्षणांपूर्वी माणसांची वर्दळ आणि बोलण्याचे आवाज असलेल्या त्या जागेवर पुन्हा शांतता पसरली होती. मात्र ती शांतता नेहमीसारखी नव्हती. तिच्या आत कुठेतरी एक अनामिक अस्वस्थता दडलेली होती.
अभिजित पुन्हा चटईवर जाऊन बसला होता. त्याने डोळे मिटले होते आणि जप सुरू केला होता, पण त्याच्या मनाची एकाग्रता वारंवार ढळत होती. यल्लाप्पा दाराजवळ उभा राहून बाहेरच्या वाटेकडे लक्ष ठेवून होता. देवप्पा मात्र ओसरीच्या खांबाला पाठ टेकवून डोळे मिटून बसला होता. त्याच्या छातीतली कळ आज नेहमीपेक्षा अधिक तीव्र झाली होती. त्याने सावकाश हात छातीवर ठेवला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला. पण ती वेदना काही केल्या कमी होत नव्हती.
कल्लेश्वराने अखेर आपला खेळ उघडपणे खेळायला सुरुवात केली होती.
आतापर्यंत तो आडोशाने वार करत होता. कधी स्वप्नांतून, कधी सावल्यांच्या माध्यमातून, तर कधी जंगलातल्या अंधाराचा आधार घेऊन तो आपले डाव टाकत होता. पण आज त्याने थेट पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला होता. याचा अर्थ स्पष्ट होता. त्याला आता कोणत्याही परिणामाची भीती उरली नव्हती. आणि ज्याच्या मनातून भीती निघून जाते, तो माणूस किती टोकाला जाऊ शकतो, याची देवप्पाला पुरेपूर जाणीव होती.
त्याला काही दिवसांपूर्वी अभिजितशी झालेला संवाद आठवू लागला.
त्या दिवशी अभिजित प्रचंड अस्वस्थ झाला होता. रागाने त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यांत साचलेले अश्रू तो कसाबसा रोखून धरत होता.
“मग आता काय करायचं, देवप्पा? आपण असंच किती दिवस वाट पाहत बसायचं?” त्याने जवळजवळ हताश होऊन विचारलं होतं.
देवप्पा त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला होता, “कल्लेश्वरच्या आधी आपल्याला त्या अंतिम विधीचं खरं स्वरूप समजून घ्यायचं आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत तेरावा बळी मिळता कामा नये. आणि त्यासाठी अनन्याला सुरक्षित ठेवण्याचा मार्गही आपल्याला शोधावा लागेल.”
ते शब्द आठवताच देवप्पाच्या चेहऱ्यावर एक क्षीण, गूढ हास्य उमटलं. कारण त्या वेळी त्याने अभिजितपासून एक महत्त्वाची गोष्ट लपवली होती. अनन्याला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग त्याला आधीच सापडला होता. इतकंच नव्हे, तर त्या दिशेने त्याने नेहाच्या मदतीने एक योजना आखूनही ठेवली होती.
मात्र त्या योजनेची अंमलबजावणी तातडीने करता येणार नव्हती. त्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागणार होती. काही गोष्टी ठरलेल्या क्रमानेच घडणं आवश्यक होतं. त्यात थोडी जरी घाई झाली, तरी संपूर्ण डाव उधळला जाण्याची शक्यता होती. देवप्पाला हे माहीत होतं की या योजनेची खरी ताकद तिच्या गुप्ततेत आणि योग्य क्षणी उचलल्या जाणाऱ्या पावलात होती.
आणि तो क्षण आता फार दूर नव्हता. अमावस्येला अजून आठ दिवस बाकी होते.
देवप्पाने पुन्हा डोळे मिटले. त्याच्या मनात नेहासोबत झालेल्या चर्चेतील काही शब्द पुन्हा उमटले. योजनेचा विचार करताच त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधानाची छटा उमटली; पण लगेचच छातीत उठलेल्या तीव्र वेदनेने वाकला. त्याने खांबाचा आधार घेत स्वतःला सावरलं.
त्याच वेळी अंगणाच्या पलीकडून एखाद्या सुकलेल्या फांदीचा आवाज झाला.
यल्लाप्पा ताडकन वळला. त्याने अंधारात नजर रोखली. काही क्षण तो तसाच उभा राहिला, पण पुन्हा काहीच आवाज झाला नाही.
“काय झालं?” देवप्पाने डोळे न उघडताच विचारलं.
“काही नाही. बहुतेक एखादं जनावर असेल,” यल्लाप्पा म्हणाला. मात्र त्याची नजर अजूनही जंगलाच्या दिशेनेच होती.
देवप्पाने अनेकदा अनुभवले होते की संकट येण्यापूर्वी निसर्गही काही क्षणांसाठी आपला नेहमीचा क्रम बदलतो.
बाहेर अंधार आता पूर्णपणे पसरला होता. दूरवर रातकिड्यांचा आवाज सुरू झाला होता. अभिजितच्या जपाचा मंद स्वर अंगणात घुमत होता. त्या स्वरात एक विलक्षण स्थैर्य होतं.
देवप्पाने समोरच्या जंगलाकडे पुन्हा एकदा पाहिलं. कुठेतरी त्या अंधारात कल्लेश्वरही आपल्या पुढच्या चालीची तयारी करत असणार होता. त्याला वाटत होतं की खेळ आता त्याच्या हातात आला आहे. कदाचित देवप्पानेही त्याला तसंच वाटू दिलं होतं.
पण या वेळी देवप्पाचा डाव वेगळा होता. तो कल्लेश्वरला रोखण्याचा प्रयत्न करणार नव्हता; त्याला ज्या मार्गाने पुढे जायचं होतं, त्याच मार्गावर त्याची वाट बदलणारी एक गोष्ट आधीच ठरवली गेली होती.
आता फक्त योग्य क्षणाची प्रतीक्षा होती. आठ दिवस. देवप्पाने मनातल्या मनात ती संख्या पुन्हा उच्चारली.
आठ दिवस. फक्त आठ दिवस, आणि मग खरा खेळ सुरू होणार होता.
************************************************************************************************************************
यानाच्या दाट जंगलातल्या गुहेसमोर पेटलेल्या धुनीची आग आता मंदावली होती. अधूनमधून एखादी ठिणगी उडत होती आणि तिच्या क्षीण प्रकाशात गुहेच्या भिंतींवर विचित्र सावल्या उमटत होत्या. कल्लेश्वर एका मोठ्या दगडाला पाठ टेकवून बसला होता. त्याचा श्वास अजूनही जड होता. मात्र आज दुपारी जीप कोसळताना त्याला जो आनंद झाला होता, तो अजूनही त्याच्या मनातून पूर्णपणे ओसरला नव्हता.
तेवढ्यात गुहेखाली जाणाऱ्या वाटेवरून पावलांचा आवाज ऐकून कल्लेश्वरने डोळे उघडले. सहा जोगी सावधपणे वर चढून येत होते. गुहेपासून काही अंतरावर पोहोचल्यावर ते थांबले. त्यांच्या चेहऱ्यांवर भीती आणि संभ्रम स्पष्ट दिसत होता.
त्यांच्यातील सर्वांत वृद्ध जोगी पुढे आला. त्याने जमिनीला हात टेकवून कल्लेश्वराला नमस्कार केला. “बाबा, पडक्या देवळात पोलिसांची धाड पडली. आता तिथे जाण्याची सोय राहिलेली नाही.”
“मला माहीत आहे,” कल्लेश्वर शांतपणे म्हणाला. “आज दुपारी जंगलाच्या रस्त्यावर त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.”
त्याचे शब्द ऐकताच जोगींच्या चेहऱ्यांवर दचकलेले भाव उमटले. त्यांच्यापैकी एकाने नकळत दुसऱ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेतील भीती कल्लेश्वरच्या नजरेतून सुटली नाही. त्याच्या ओठांवर एक विकट हास्य उमटलं.
“घाबरू नका. ते पुन्हा येतील, तेव्हा मी त्यांच्यासाठी तयार असेन.” त्याने क्षणभर थांबून त्या सहा जोग्यांकडे पाहिलं. “सध्या थोडे दिवस तुम्ही गुहेच्या खालच्या खडकांपाशी राहा. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. आत गुहेत पाऊल टाकायचं नाही आणि मल्लीशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही. त्याच्याशी बोलायचंही नाही. समजलं?”
“जी, बाबा,” वृद्ध जोगीने मान खाली घालत उत्तर दिलं.
“आणखी एक गोष्ट,” कल्लेश्वर किंचित पुढे झुकला. त्याचा आवाज आता अधिक कठोर झाला होता. “रस्त्यावर, गावाकडे जाणाऱ्या वाटेवर आणि देवळाच्या आसपास रोज नजर ठेवायची. कोण येतंय, कोण जातंय, कुठे पोलिस दिसतात का, याची मला प्रत्येक वेळी खबर मिळाली पाहिजे. तुमच्या निष्काळजीपणामुळे माझ्या कामात अडथळा आला, तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील.”
जोगींनी एकमुखाने मान हलवली. वृद्ध जोगीने पुन्हा एकदा जमिनीला हात लावून नमस्कार केला आणि ते सहाही जण सावकाश खाली उतरू लागले.
गुहेच्या तोंडाशी उभ्या असलेल्या मल्लीने हे सगळं दुरून पाहिलं होतं. जोगी नजरेआड होताच तो कल्लेश्वरजवळ आला.
“बाबा, हे जोगी इथे कशाला आलेत?”
“मल्ली, त्यांना राहायला दुसरी जागा उरलेली नाही म्हणून ते इथे आले आहेत. तू त्यांच्या नादी लागू नकोस. आपल्या कामाकडे लक्ष दे.”
मल्लीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. त्याला आणखी काही विचारायचं होतं, पण कल्लेश्वरच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याने स्वतःला रोखलं. तो पुन्हा गुहेच्या आत निघून गेला.
कल्लेश्वरने आपली नजर धुनीकडे वळवली. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा विचार करताना त्याच्या मनात एक विचित्र समाधान दाटून आलं होतं. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला कोणाचाही धाक वाटत नव्हता. ना पोलिसांचा, ना देवप्पाचा आणि ना आपल्या गुरूंनी कधीकाळी दिलेल्या इशाऱ्यांचा.
मात्र गुरूजींचे ते जुने शब्द त्याच्या स्मरणात पुन्हा जागे झाले. त्यांच्या आवाजातली ती कटुता आणि आपल्याला कमी लेखणारी नजर त्याला अजूनही आठवत होती. ज्या सामर्थ्याला गुरूंनी कधीच त्याच्या आवाक्यात येऊ दिलं नव्हतं, ते सामर्थ्य आता त्याच्या हाताशी येत होतं, असा त्याचा समज झाला होता.
त्याने धुनीत हात घातला आणि मूठभर राख उचलून मुठीत घट्ट दाबली. बोटांच्या फटीतून राख खाली सांडू लागली.
“आता मला कुणीच थांबवू शकत नाही,” तो स्वतःशीच पुटपुटला. धुनीतली शेवटची ठिणगी चमकून विझली.
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी कुमठ्याच्या सरकारी रुग्णालयातल्या बिछान्यावर हेगडे छताकडे पाहत पडले होते. डोक्यावर पट्टी होती, डाव्या खांद्यावर पट्टी होती आणि प्रत्येक श्वासाबरोबर बरगड्यांत ठणका बसत होता. देवप्पाच्या झाडपाल्याच्या औषधाचा तिखट वास अजूनही त्यांच्या कपड्यांत होता.
शेजारच्या बिछान्यावर पुत्रन कपाळावर पट्टी बांधून गप्प बसला होता. चालकाच्या घरी बातमी कळवण्याचं काम हेगडेंनी रात्रीच स्वतः केलं होतं.
"पुत्रन," ते हळू आवाजात म्हणाले, "जीप वळण्याआधी तू काय पाहिलंस, ते पुन्हा सांग."
"साहेब, रस्त्याच्या मधोमध एक काळी आकृती उभी होती. मी ओरडलो, 'ब्रेक मार!' आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला, पण गाडी थांबली नाही. ती आपोआप डावीकडे वळली."
"आणि मी ती आकृती नंतर पाहिली," हेगडे म्हणाले. "आपण जीपमधून बाहेर फेकले गेल्यावर झाडांच्या गर्दीत. मी वळून पाहताच ती नाहीशी झाली."
दुपारी ठाण्यातला एक हवालदार जीपचा अहवाल घेऊन आला. गाडी गेल्याच महिन्यात गॅरेजमध्ये तपासली गेली होती, आणि आता मेकॅनिकने लिहिलं होतं की ब्रेकचं तेल पुरेसं होतं, पाईप कुठेही तुटलेला नव्हता आणि स्टिअरिंगचा रॉडही सुरक्षित होता. गाडीत कोणताही दोष नव्हता.
थोड्या वेळाने एसपींचा फोन आला. "हेगडे, अपघात म्हणून नोंद करा आणि पुढच्या कामाला लागा."
"साहेब, मी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करतो, कारण सध्या कायद्याने तेवढंच करता येतं," हेगडे ठामपणे म्हणाले. "पण हा तपास करण्याचा पर्याय मी खुला ठेवेन."
फोन ठेवल्यावर त्यांनी उशाखालची डायरी काढली. पहिल्या पानावर "जुने स्मशान" हे शब्द होते, त्याखाली त्यांनी नवे शब्द लिहिले: गाडीत कोणताही दोष नव्हता, पाईप सुरक्षित, स्टिअरिंग ठीक, तरीही दोन्ही यंत्रणा एकाच वेळी निकामी.
त्यांना देवप्पाचे शब्द आठवले: "तिथे काहीतरी अनैसर्गिक आहे, कुणीतरी जे तुम्हाला बघत असतं." पडक्या देवळात त्यांना जाणवलेली ती अदृश्य नजर, आणि काल झाडांच्या गर्दीत उभी असलेली सावली, दोन्ही एकाच दिशेने बोट दाखवत होत्या.
मग त्यांनी अभिजितचे शब्द आठवले. सहा-सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली ट्रेकर, दुसऱ्या दिवशी सापडलेली, बेशुद्धावस्थेत. डायरीतल्या त्या दोन ओळींखाली त्यांनी आणखी एक शब्द लिहून त्याभोवती वर्तुळ काढलं: ट्रेकर.
हा अपघात नव्हता, हेगडे स्वतःशीच पुटपुटले, आणि त्या बेपत्ता ट्रेकरचा या सगळ्याशी काहीतरी संबंध असणारच होता.
************************************************************************************************************************
९ मेची रात्र होती. अंगणात अंथरलेल्या चटईवर अभिजित पद्मासन घालून जप करत बसला होता. त्याच्या व्रताचा सव्विसावा दिवस होता. गेल्या पंचवीस दिवसांच्या अखंड साधनेने त्याच्या शरीरात आणि जाणिवांमध्ये विलक्षण बदल घडू लागले होते. श्रवणशक्ती इतकी तीक्ष्ण झाली होती की डोळे मिटलेले असतानाही अंगणाबाहेरच्या झाडांवर कोणत्या फांदीवर कोणता पक्षी बसला आहे, हेही त्याला सहज ओळखता येत होतं.
त्या रात्रीही तो नेहमीप्रमाणे जपात मग्न होता. आजूबाजूच्या जंगलातून येणारे रातकिड्यांचे आवाज, अधूनमधून होणारी पानांची सळसळ आणि दूरवरून ऐकू येणाऱ्या निशाचर पक्ष्यांच्या हाका त्याच्या कानांवर पडत होत्या. पण या सगळ्या आवाजांमधून त्याचं लक्ष वेधून घेतलं ते झोपडीच्या आतून येणाऱ्या देवप्पाच्या श्वासांनी. त्याचं लक्ष नकळत झोपडीकडे वळलं. देवप्पा आतल्या अंधारात काहीतरी गुप्त साधना करत असल्याची त्याला जाणीव होत होती. त्याचा प्रत्येक श्वास जड झाला होता. छातीच्या खोलवरून तो श्वास बाहेर पडताना त्यासोबत एक दबलेलं कण्हणंही ऐकू येत होतं. काही वेळा श्वास इतका मंद व्हायचा की देवप्पाने श्वास घेणंच थांबवलं आहे की काय, अशी शंका अभिजितच्या मनात यायची. पण पुढच्याच क्षणी पुन्हा एक दीर्घ, वेदनांनी भरलेला श्वास ऐकू यायचा.
अभिजितचं मन अस्वस्थ झालं. जप थांबवून आत जावं आणि देवप्पाची चौकशी करावी, असा विचार त्याच्या मनात अनेकदा आला. मात्र देवप्पाने आपल्या साधनेत कोणताही व्यत्यय आणू नये, अशी सक्त सूचना त्याला आधीच दिली होती. त्यामुळे त्याने स्वतःला आवरलं आणि पुन्हा मंत्रोच्चारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.
पण त्या रात्री त्याची वाढलेली श्रवणशक्तीच त्याच्यासाठी त्रासदायक ठरली होती. इतर वेळी कदाचित त्याच्या कानांपर्यंत पोहोचलाही नसता असा देवप्पाचा प्रत्येक कष्टदायक श्वास आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता.
पुढचे जवळजवळ दोन तास तो आवाज त्याच्या कानांत घुमत राहिला. अभिजितचा जप सुरू होता, पण त्याच्या मनाचा एक भाग सतत झोपडीच्या आतल्या अंधारात अडकून पडला होता.
देवप्पा नेमकी कोणती साधना करत होता? आणि त्यासाठी त्याला इतक्या वेदना का सहन कराव्या लागत होत्या?
या प्रश्नांची उत्तरं अभिजितकडे नव्हती. मात्र एक गोष्ट त्याला हळूहळू जाणवू लागली होती. कल्लेश्वरशी होणाऱ्या अंतिम संघर्षाची तयारी केवळ तो एकटाच करत नव्हता. देवप्पाही त्याच्या नकळत काहीतरी करत होता आणि त्या तयारीची किंमत त्याला स्वतःच्या शरीराने मोजावी लागत होती.
************************************************************************************************************************
१२ मे - सुपे
संध्याकाळी अनन्या आपली छोटीशी बॅग भरत होती. तिने दोन-तीन दिवस पुरतील इतके कपडे व्यवस्थित घड्या घालून बॅगेत ठेवले. कपड्यांच्या घड्यांमध्ये तिने आपली वहीही अलगद सरकवून ठेवली. दारात उभी असलेल्या स्वातीची नजर तिच्या त्या कृतीवर पडली, पण तिने काही विचारलं नाही. अनन्या गेल्या काही दिवसांपासून थोडी शांत झाली होती. तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे स्वातीलाही समजत नव्हतं.
स्वातीने अभिजितशी फोनवर बोलूनच हा निर्णय घेतला होता. नेहा दुसऱ्या दिवशी सुप्याला येणार होती आणि अनन्याला सोबत घेऊन जाणार होती. दोन-तीन दिवसांनी त्या दोघी परत येणार होत्या.
दुसऱ्या दिवशी नेहा ठरल्याप्रमाणे वाड्यात आली. प्रवासाचा थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, पण तिच्या डोळ्यांत एक विलक्षण शांतता होती. ती नेहमीप्रमाणे हसून स्वातीला भेटली.
"हाय नेहा, कशी आहेस?" स्वाती म्हणाली, "“आई, बाबा, ही नेहा. अभिजितसोबत ऑफिसमध्ये काम करते. तुम्हाला मी तिच्याबद्दल सांगितलं होतंच. आणि नेहा, हे अभिजितचे आई-बाबा.”
नेहाने दोघांना आदराने नमस्कार केला.
“नमस्कार काकू, नमस्कार काका.”
"सुखी राहा पोरी." बाबांनी आशीर्वाद दिला. अभिजितच्या आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"सांभाळून जा बरं का. आन आमच्या अनुची काळजी घ्या." बाबा म्हणाले.
नेहानेही हसून मान हलवली. “तुम्ही काळजी करू नका. अनन्याची काळजी घेईन.”
तेवढ्यात अनन्या आपली छोटी बॅग घेऊन बाहेर आली. नेहाने पुढे होऊन तिच्या हातातून बॅग घेतली.
“झालं का सगळं आवरून?” तिने प्रेमाने विचारलं.
“हो,” अनन्या म्हणाली.
“नेहा, तुम्ही दोघी पोहोचल्यावर मला रोज फोन करा. आणि जिथे जाणार असाल तिथे फोनला नेटवर्क नसेल, तर तसं आधीच कळव. उगाच माझा जीव टांगणीला लागू देऊ नकोस,” स्वातीने काळजीच्या स्वरात सांगितलं.
“नक्की, स्वाती. काळजी करू नकोस. आम्ही पोहोचल्यावर लगेच फोन करेन,” नेहा म्हणाली
बाहेर पडण्यापूर्वी अनन्या आजोबांच्या जवळ गेली. त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, " मी वाट बगतुय बरका तुझी. काम झालं की लगीच निघायचं बघा."
अनन्याच्या मनात एकदम कालवाकालव झाली. तिला त्यांना घट्ट मिठी मारावीशी वाटत होती, पण तिने स्वतःला सावरलं. चेहऱ्यावर हसू आणत तिने त्यांचा निरोप घेतला.
नेहा आणि अनन्या वाड्याबाहेर पडल्या. दारात उभी राहून स्वाती त्यांना जाताना पाहत होती. रस्त्याच्या वळणावर त्या दोघी दिसेनाशा झाल्यावरही ती काही वेळ तिथेच उभी राहिली.
************************************************************************************************************************
गेल्या चार दिवसांपासून मल्लीला धड झोप लागली नव्हती. गुहेच्या खालच्या बाजूला जोगींनी पेटवलेल्या धुनीचा धूर आणि आगीच्या ज्वाळांचा उजेड रात्रभर वरपर्यंत पोहोचत असे. त्यासोबतच जोगींच्या दबक्या आवाजात सुरू असलेल्या कुजबुजीने गुहेतील शांतता भंगत असे. कल्लेश्वर मात्र आपल्या साधनेच्या प्रचंड थकव्यातून अजून पूर्णपणे सावरला नव्हता. तो धुनीसमोरच बसल्या जागी डोळे मिटून पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि शरीराची निश्चल अवस्था पाहून तो गाढ झोपेत आहे की ध्यानावस्थेत, हेही ओळखणं कठीण होतं.
त्या रात्रीही मल्लीला झोप येत नव्हती. तो सावकाश उठला आणि कोणाच्याही नजरेस न पडता गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. तिथून खाली पाहिल्यावर खडकाळ जमिनीवर पेटलेल्या आगीभोवती जोगी वर्तुळ करून बसलेले दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यांवर आगीचा लालसर प्रकाश पडला होता. ते आपापसांत कुजबुजत होते.
त्याच वेळी एका तरुण जोग्याचा आवाज मल्लीच्या कानावर पडला. “तेरावी रात्र आली की बाबांना खजिना मिळेल आणि आपणही मालामाल होऊ!”
त्याच्या बोलण्यावर जवळ बसलेल्या वृद्ध जोग्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं.
“गप्प बस! उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस,” तो दबक्या पण दरडावणाऱ्या आवाजात म्हणाला.
एवढं बोलून त्याने सहज मान वर केली आणि गुहेच्या दिशेने पाहिलं. त्याची नजर आपल्यावर पडल्याचं जाणवताच मल्ली झटकन मागे सरकला आणि गुहेच्या भिंतीच्या आडोशाला जाऊन उभा राहिला. काही क्षण तो तिथेच निश्चल उभा राहिला. खाली पुन्हा कुजबुज सुरू झाल्याची खात्री झाल्यावरच त्याने सावधपणे बाहेर डोकावून पाहिलं.
तेरावी रात्र! ते शब्द त्याच्या मनात घुमू लागले.
आतापर्यंत त्याने बारा विधी केले होते. प्रत्येक विधीनंतर त्याला सहन कराव्या लागलेल्या वेदना, शरीरावर उमटलेल्या जखमा आणि मनावर कोरले गेलेले भय त्याला आठवू लागले. पण प्रत्येक वेळी बाबा त्याला एकच आश्वासन देत होते, तेरावा विधी पूर्ण झाला की चंद्रिका परत येईल. तिच्या परतीसाठीच आपण हे सगळं सहन करत आहोत, यावर त्याने आजवर विश्वास ठेवला होता.
पण आता या जोग्यांच्या बोलण्याने त्याच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न निर्माण झाला होता.
चंद्रिकेच्या परतीचा आणि खजिन्याचा काय संबंध होता? बाबांनी त्याला कधीही खजिन्याबद्दल सांगितलं नव्हतं. उलट, प्रत्येक विधीचं कारण म्हणून त्यांनी त्याच्यासमोर चंद्रिकाचं नाव ठेवलं होतं. मग हे जोगी कोणत्या खजिन्याबद्दल बोलत होते? आणि तेराव्या विधीनंतर त्यांना नेमकं काय मिळणार होतं?
हा भागही मस्तच.
हा भागही मस्तच.
मस्त. पुढचे भाग पटापट टाका,
मस्त. पुढचे भाग पटापट टाका, उत्सुकता ताणली गेलीय.
हा भाग हि उत्कंठावर्धक झालाय.
हा भाग हि उत्कंठावर्धक झालाय. बेपत्ता ट्रेकर चा उल्लेख पहिल्यांदाच आलाय ना ?
अनन्या ला घेऊन नेहा कुठे जाणार आता ?
तारखे सकट गोष्टी घडताना
तारखे सकट गोष्टी होत आहेत, ते वाचताना माझ्या हृदयाचे ठोके वाढतात.
थरार वाढत जाणार आहे.
१४ ला अनन्या याना मधे असेल, १६ ला अमावस्या, बहुतेक कल्लू ला त्यादिवशी कळेल १३ वी बळी.
नेहा आणि देवप्पा अनन्या ला कसे सुरक्षित ठेवतात ते बघायचं.
सुरुवातीला ट्रेकर चा उल्लेख
सुरुवातीला ट्रेकर चा उल्लेख होता जेंव्हा अभिजीत याना बद्दल माहित जमवत होता
वाचत आहे . पुढच्या भागांना
वाचत आहे . पुढच्या भागांना जास्त वेळ लावू नका. उत्सुकता वाढली आहे.
अवांतर: माझ्या घरच्या जवळ कलेश्वर स्टोर नावाचे दुकान आहे. इतके दिवस त्याच काही वाटत नव्हते. आता ही गोष्ट सुरू झाली तेव्हा पासून त्याचे नाव कल्लेश्वर असेच वाचले जात आहे
तेव्हा पासून त्याचे नाव
तेव्हा पासून त्याचे नाव कल्लेश्वर असेच वाचले जात आहे Happy>
कल्लू नको म्हणूस म्हणजे झालं
(No subject)
ट्रेकर विसरलो होतो. आन्देव
ट्रेकर बद्दल विसरलो होतो 🙈
आन्देव
जबरदस्त
जबरदस्त
अवांतर: माझ्या घरच्या जवळ
अवांतर: माझ्या घरच्या जवळ कलेश्वर स्टोर नावाचे दुकान आहे. इतके दिवस त्याच काही वाटत नव्हते. आता ही गोष्ट सुरू झाली तेव्हा पासून त्याचे नाव कल्लेश्वर असेच वाचले जात आहे ---- मी तर इथेही कल्लेश्वरच वाचले
उत्कंठावर्धक आहे
उत्कंठावर्धक आहे
गोष्ट आवडली आहे आत्तापर्यंत,
गोष्ट आवडली आहे आत्तापर्यंत, पण स्वातीने मुलीला एकटीला सोडले.हे काही पटलेले नाही..
जबरदस्त उत्कंठावर्धक झाला आहे
जबरदस्त उत्कंठावर्धक झाला आहे हा भाग.
अगदी चित्र उभे राहते समोर.
आता उत्सुकता आणखी वाढली.