चित्रपटातील मला न आवडलेल्या काही रूढ संकल्पना

Submitted by पशुपत on 4 November, 2026 - 13:02

हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार काळापासून सरसकटपणे वापरल्या गेलेली काही प्रमेय मला फार बालिश वाटत आलेली आहेत . तुमचं त्यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्राथमिक स्वरूपातली दोन-तीन उदाहरणे इथे देतो
१. चित्रपटातील नायिका ही बालिकावस्थेतून तारुण्यात पदार्पण करत असताना देहाने यौनात पोचली तरी मनाने ते अजून बालिकेसारखी अल्लड आणि निष्पाप आहे हे दाखवण्याची हौस हिंदी दिग्दर्शकांमधे पूर्वापार चालत आलेली आहे आणि हे दाखवण्यासाठी ( खरंतर पंधरा सोळा वर्षाची नटी मला आजवर कधीच दिसलेली नाही . तिच्या भूमिकेत ३५~४० वर्षाची प्रगल्भ नटी आपण प्रेक्षकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यांवर सतत मारली गेलेलीआहे आणि ती ते सहनही करत आलेले आहेत) पण त्यातूनही ते अल्लड दाखवण्यासाठी; साधारण आठ नऊ वर्षांच्या मुलांबरोबर लगोरी विटी दांडू सारखे खेळ खेळताना दाखवलेली कित्येक चित्रपटात पाहत आलेलो आहोत.. त्यावेळेला मला ती निश्पाप बालिका वगैरे न वाटता मंदबुद्धीची किंवा स्लो लर्नर वगैरे असावी असेच वाटत आले आहे..

२. बऱ्याच वेळेला चित्रपटातले पात्र तीन-चार दिवस उपाशी राहून अचानक त्याच्यासमोर पक्वानांचं भरलेलं ताट आल्यावर तो ज्या पद्धतीने ते खाताना दाखवतात... म्हणजे हात कोपरापर्यंत बरबटलेले आणि चेहरा कापाळापासून गळ्यापर्यंत बरंबटलेला.. आणि पाहणार्‍याला अतिशय किळस वाटेल अशा पद्धतीने तो खाताना दाखवतात ते बघून मला त्या व्यक्तिरेखा बद्दल आपुलकी किंवा दया न वाटता किळसच वाटते. सर्व आति सुशिक्षित व्यक्तिरेखा अचानक इतक्या गलिच्छ पद्धतीने कशा काय वावरू शकतात आणि तिथे दिग्दर्शकाला तसे ते अपेक्षित का असते आणि ती प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारावे असे का वाटते हे मला खरंच कळत नाही

अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे.. वाचकांना असेच वाटते का? त्यांचे या संदर्भात काय मत आहे हे निश्चित समजून घ्यायला आवडेल.
अशाच प्रकारचे इतर काही प्रसंग कोणाला खुपत आलेले असतील तर त्याही बद्दल प्रतिसादामध्ये लिहायला हरकत नाही !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेंडे नक्षत्र; पूर्वीच्या सिनेमानिर्मात्यांचा अजेंडानच होता बहुतेक हा ...
माझ्या तर मनावर असेल बिंबत चाललं होतं की श्रीमंत असणं हे जवळजवळ गुन्हेगार असल्यासारखाच आहे !

धट्टीकट्टी गरीबी व लुळी पांगळी श्रीमंती. शाळेपासून सगळीकडे ही शिकवण मिळत होती. पुलंसकट अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

दिल चाहता है ने ही प्रतिमा बदलली.

धट्टीकट्टी गरीबी व लुळी पांगळी श्रीमंती >>>>
अगदी अगदी. श्रीमंत असणे हा गुन्हाच होता जवळ जवळ.
त्यातून नायिका श्रीमंत घरची असेल तर मग बघायलाच नको. तिला जमिनीवर आणण्यासाठी तिने गरीब नायकाच्या प्रेमात पडून हालात दिवस काढणे आणि माहेरची मदत न घेणे वगैरे मस्टच होते.
घरी अन्नान्नदशा असली तरी नोकरी शोधत असलेल्या नायकाने सासऱ्याच्या बिझनेसमध्ये नोकरी नाकारणे हे ही. अरे तुला जर कुठेतरी नोकरीच करायची आहे तर सासऱ्याच्या बिझनेसमध्ये का नाही? असा कुणी विचार करायचेच नाही की सासऱ्याला एक विश्वासू एम्प्लॉयी मिळेल?
बायकोने माहेरची मदत घेतली तर लगेच नवऱ्याचा अपमान. तेवढ्याच फाटक्या मित्राकडून मां की दवाईके लिये पैसे घेतील पण असा विचार नाही की आता थोडा कठीण काळ आहे तर घेऊ बायकोच्या माहेरून मदत आणि परतफेड करू.
किंबहुना दोघे मिळून आपल्या आर्थिक स्थितीबाबत काही विचार करताहेत असंही नाही. आर्थिक जबाबदारी कायमस्वरूपी नवऱ्यावर आणि बायकोने एक चतकोर रोटी खाऊन दिवस काढणे, दुःखाची परमावधी म्हणजे माँ के दिये हुए कंगन विकायला लागणे. पण श्रीमंत, सुशिक्षित घरातून आलेल्या बाईने असं म्हणायचं नाही की मी छोटीमोठी नोकरी शोधते आणि संसाराला हातभार लावते.
तेच लग्न न झालेल्या बहिणीचंही. तिनेही नुसतं म्हशीसारखं हुंदडावे, परिस्थिती वाईट झाल्यास चार टिपं गाळावी पण असं म्हणू नये की भैया मलाही कुठे नोकरी मिळेल का बघ.
तेच गरीब घरातून आलेल्या मुलीने उद्योग धंद्यात कसलाही हातभार न लावता सासरघरची श्रीमंती अनुभवायला मात्र कुणाची ना नसायची. किती दुटप्पीपणा?

अनाडी हा राजकपूर आणि नूतनचा सिनेमा. गाणी अविस्मरणीय आहेत.
पण नूतन श्रीमंत घरातील मुलगी असते ती काही कारणाने मोलकरीण असल्याचे खोटे सांगून राज कपूरशी मैत्री करते. आणि जेव्हा हा "गुन्हा" उघडकीस येतो तेव्हा तो हृदयभंग झाल्यासारखे दु:खद गाणे म्हणतो! सगळाच अजब प्रकार!

राज कपूर आलिशान हॉटेलच्या बाहेर एका श्रीमंत माणसाचे खिशातून पडलेले पाकिट प्रामाणिकपणे परत देतो. तो श्रीमंत माणूस (मोतीलाल) त्या हॉटेलातील नाचणार्या, गाणार्या लोकांकडे बोट दाखवून विचारतो " हे लोक कोण आहेत माहित आहे का?"
राज कपूर म्हणतो "नाही."
" ही अशी मंडळी आहेत ज्यांनी त्यांना सापडलेली पाकिटे आपल्याच खिशात घातली."
म्हणजे सगळे श्रीमंत लाटालाटी करून श्रीमंत झाले आहेत. कुणी प्रचंड कष्ट, मेहनत, अफाट प्रतिभा, हुशारी यांच्या जोरावर श्रीमंत झालेले नाहीत!
ही समाजवादी शिकवण स्वतः दिग्दर्शनाच्या जोरावर अफाट श्रीमंत असणारे हृषिकेश मुखर्जी, अभिनयाच्या जोरावर गडगंज श्रीमंत असणारे राज कपूर आणि मोतीलाल यांच्या तोंडून देत आहेत.
धन्य धन्य!

नवपरिणीत जोडपं लाडात येऊन उश्यांची मारामारी सुरू करतं. पहिल्याच फटक्यात उशीतली पिसं बाहेर येऊन आसमंतात उडायला लागतात.
यांच्या उश्या कायम शिवणी उसवलेल्याच असतात.

ही समाजवादी शिकवण स्वतः दिग्दर्शनाच्या जोरावर अफाट श्रीमंत असणारे हृषिकेश मुखर्जी, अभिनयाच्या जोरावर गडगंज श्रीमंत असणारे राज कपूर आणि मोतीलाल यांच्या तोंडून देत आहेत.>> अगदी अगदी!

त्यात राज कपूरचे गाणे नाहीये का 'माना अपनी जेब से फकीर है, दिल से यारो अमीरों के अमीर हैं!'

हिरो हिरॉईन कुठल्याही प्रांतातली, धर्माची असो, गाणे फक्त पंजाबी किंवा उर्दू शब्दांनी भरलेलेच असणार.

हिरोच्या बहीणीच्या ललाटी रेप, असॉल्ट, आत्महत्या, खून , खुनशी सासर हेच लिहिलेले असते. कधी साधे सरळ लग्न होऊन सुखाने नांडते असे झाले तर .....

ही समाजवादी शिकवण स्वतः दिग्दर्शनाच्या जोरावर अफाट श्रीमंत असणारे हृषिकेश मुखर्जी, अभिनयाच्या जोरावर गडगंज श्रीमंत असणारे राज कपूर आणि मोतीलाल यांच्या तोंडून देत आहेत. >>> Lol Lol

त्या उश्यांची मारामारी सुरु झाली की कुणाला शिंका कशा येत नाहीत याचं मला आश्चर्य वाटायचं आणि नंतर कचरा कोण साफ करणार याचं टेन्शन यायचं.

ही समाजवादी शिकवण स्वतः दिग्दर्शनाच्या जोरावर अफाट श्रीमंत असणारे हृषिकेश मुखर्जी, अभिनयाच्या जोरावर गडगंज श्रीमंत असणारे राज कपूर आणि मोतीलाल यांच्या तोंडून देत आहेत. >>> Lol Lol

त्या उश्यांची मारामारी >>> उसवलेल्या उश्या Rofl

मस्त आहे हा धागा आणि प्रतिक्रिया Happy

अजून १ डोक्यात जाणारे म्हणजे- कुठुन तरी अवचित घरी आलेल्या/ संकटातून सोडवून आणलेल्या मुला/मुली ला घरच्यांनी अगदी आग्रहाने म्हणणे- चलो तुम्हे अपना कमरा दिखाती हूं.. Uhoh (हम दिल दे चुके सनम, थम्मा, बाघबान)
ह्यांच्यकडे असा कोणी उपटसुंभ घरात टपकलाच तर त्याला/तिला द्यायला १ रूम असते Angry
ईथे मला बहिणी सोबत & आता नवर्यासोबत रूम शेयर करावी लागते Sad

>> ही समाजवादी शिकवण स्वतः दिग्दर्शनाच्या जोरावर अफाट श्रीमंत असणारे हृषिकेश मुखर्जी, अभिनयाच्या जोरावर गडगंज श्रीमंत असणारे राज कपूर आणि मोतीलाल यांच्या तोंडून देत आहेत.
लोल. खरंय. फॅशनच होती श्रीमंतीला वाईट दाखवण्याची.
श्रीमंत असण्याच्या/होण्याच्या पापाचे थोडेसे प्रायश्चित्त म्हणजे श्रीमंताना आणि श्रीमंतीला शिव्या देणे. तेवढाच गरिबांना मेण्टल रिलिफ.
मला वाटतं यशराज आणि धर्मा यांनी श्रीमंतीला गिल्ट फ्री केलं .

श्रीमंत असण्याच्या/होण्याच्या पापाचे थोडेसे प्रायश्चित्त म्हणजे श्रीमंताना आणि श्रीमंतीला शिव्या देणे. तेवढाच गरिबांना मेण्टल रिलिफ.>>
अगदी!
मेरे हमदम मेरे दोस्त मधे धर्मेंद्र म्हणतो 'मुझे अमीरोंसे सख्त नफरत है!' आणि मग श्रीमंत घरातील शर्मिला मोलकरणीचं सोंग घेऊन येते. तिचं खरं स्वरूप कळल्यावर अर्थातच धर्मेंद्र तिचा रागराग करतो.
नया जमानातील धर्मेंद्रही तसाच आहे, त्याला अमीरांविषयी घृणा आहे. त्यामुळे अमीर घरातली हेमा त्याच्या प्रेमात पडते तेव्हा सुरवातीला तो तिला झिडकारतो, तिच्या श्रीमंतीवरून टोमणे मारतो. पण शेवटी तिची दौलत गरीबांसाठीच वापरायचं ठरवल्यावर त्याचा राग शांत होतो.

मला वाटतं यशराज आणि धर्मा यांनी श्रीमंतीला गिल्ट फ्री केलं .>> ते खरं असलं तरी काही काही वेळा दुसरं टोकही गाठलं गेले. अफाट श्रीमंती, महालवजा घरे वगैरे, वगैरे..

<<<
मला वाटतं यशराज आणि धर्मा यांनी श्रीमंतीला गिल्ट फ्री केलं .>> ते खरं असलं तरी काही काही वेळा दुसरं टोकही गाठलं गेले. अफाट श्रीमंती, महालवजा घरे
>>>>

असेना..
पण त्यातही हेलिकॉप्टरमधून उडी मारून खांद्यावरची बॅग सांभाळत धावत आईला भेटायला येण्याची शाहरुखची कदाचित बॉलीवूडमधील आजवरची सर्वोत्तम फटा पोस्टर निकला हिरो टाईप एन्ट्री लोकल ट्रेनने घरी येणाऱ्या आणि आल्याआल्या आईच्या हातची गरम चहा तयार मिळणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येक मध्यमवर्गीय मुलाला तितकीच जवळची वाटली. आर्थिक स्थितीत फरक का असेना मातृत्वाच्या त्या भावनेने आम्हाला एकाच बिंदूवर आणून जोडले Happy

असा एक धागा होता ना पूर्वी...

पोलिस / क्राईम सीन्स मधे विद्रुप डेड बॉडी किंवा तत्सम काही बघितल्यावर हमखास उलटी करणे
दोन लोक धडकल्यावर पेपर/ हातातल्या गोष्टी वर वरच लयीत उडणे ते खाली उचलायला बसल्यावर डोके आपटणे च

अजून आठवले तर लिहिन

"ही समाजवादी शिकवण", "यशराज आणि धर्मा यांनी श्रीमंतीला गिल्ट फ्री केलं" - सिनेमा समाजाचा आरसा असतो हे गुळगुळीत रेज्ड टू द एन्थ पॉवर वाक्य असलं तरी खरं आहे. यश राज ने सुद्धा सुरूवातीला 'काला पत्थर', 'मशाल' सारखे सिनेमे केले. स्वातंत्र्य मिळाल्यावर च्या काळात समाजवादी राज, नंतर ७० च्या दशकात व्यवस्थेविरूद्ध आलेल्या फ्रस्ट्रेशनमधून उभा राहिलेला अँग्री यंग मॅन विजय आणि नव्वदच्या खुल्या आर्थिक धोरणांनंतर आलेल्या अर्थिक सुबत्तेतला राहूल हे त्या त्या काळाचे प्रॉडक्ट्स होते.

<<<< ७० च्या दशकात व्यवस्थेविरूद्ध आलेल्या फ्रस्ट्रेशनमधून उभा राहिलेला अँग्री यंग मॅन विजय आणि नव्वदच्या खुल्या आर्थिक धोरणांनंतर आलेल्या अर्थिक सुबत्तेतला राहूल हे त्या त्या काळाचे प्रॉडक्ट्स होते
>>>>

म्हणजे अमिताभ आणि शाहरुख एकमेकांच्या काळात जन्माला आले असते तर दोघेही त्या त्या लेव्हलचे सुपरस्टार झाले नसते.

ही समाजवादी शिकवण स्वतः दिग्दर्शनाच्या जोरावर अफाट श्रीमंत असणारे हृषिकेश मुखर्जी, अभिनयाच्या जोरावर गडगंज श्रीमंत असणारे राज कपूर आणि मोतीलाल यांच्या तोंडून देत आहेत.
धन्य धन्य! <<
ते नेते (जुन्या काळातले) किंवा समाजसेवक किंवा गुरु थोडीच आहेत.
जे स्वतः आचरणात आणू तेच चित्रपटात दाखवलं पाहिजे हा अट्टाहास का ?
त्या काळात ज्या विचारधारेला लोकप्रियता मिळेल ते त्यांनी दाखवले.
व्यवसाय आहे तो.
गरीबांसाठी ३००.०० चौ. फुटांची घरं बांधणारा विकासक थोडीच तेवढ्याच आकाराच्या घरात स्वतः रहातो ?

म्हणजे अमिताभ आणि शाहरुख एकमेकांच्या काळात जन्माला आले असते तर दोघेही त्या त्या लेव्हलचे सुपरस्टार झाले नसते.

>>चूक. म्हणजे त्यांनी गाजवलेल्या व्यक्तिरेखा / सिनेमे एकमेकांच्या काळात आले असते तर कदाचित हिट झाले नसते.

दोघेही कलाकार असल्याने ते एकमेकांच्या काळात जन्माला आले असते तर त्यांनी एकमेकांना मिळालेल्या व्यक्तिरेखा साकारल्या असत्या पडद्यावर. आणि याहीपुढे जाऊन मी असं म्हणेन की आता आपल्यासमोर त्यांनी उभे केलेले माईलस्टोन आहेत म्हणून आपल्याला ते एकमेकांच्या व्यक्तिरेखा साकारण्याची आणि हिट होण्याची कल्पना करवत नाही.. पण कदाचित अमिताभचा राहुल आणि शाहरुखचा विजय लोकप्रिय झाला असताही.. who knows?

पण कदाचित अमिताभचा राहुल आणि शाहरुखचा विजय लोकप्रिय झाला असताही.. who knows?
>>>
हे कदाचित तुझे शाहरुख/अमिताभ वरचे प्रेम बोलत असेल पण आई डोन्ट थिंक सो
यशस्वी होणे/स्टार होणे वेगळे..
आणि सुपरस्टार होणे वेगळे..

छे छे.. खरे तर हा वेगळाच विषय आहे. इथे उगाच धागा भरकटायला नको. पण इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणजे लता मंगेशकर कुठल्याही काळात जन्मल्या असत्या तरी गानकोकिळा असत्या, सचिन तेंडुलकर कुठल्याही दशकात जन्माला असता तरी ऑल फॉरमॅट लिजेंड क्रिकेटर असता, पण शाहरुख अमिताभ हे त्या त्या काळात जन्माला आले नसते तर त्यांना अँग्री यंग मॅन आणि किंग ऑफ रोमान्स बनवणारे त्यांचे हुकुमी चित्रपट मिळाले नसते तर ते इतकेच मोठे सुपरस्टार असते का? मला जेन्युइनली याबाबत शंका आहे.
यावर अमिताभचे चाहते दुखावले गेल्यास क्षमस्व. शाहरुखच्या चाहत्यांचा ठेका मीच घेतला असल्याने ते सोडा.
अर्थात शाहरुख हे व्यक्तिमत्व चित्रपटांच्याही पलीकडे आहे. ती एक कमालीची ब्रिलियंट व्यक्ती आहे हे मान्य करूनही त्याआधी त्याला ओळख त्याच्या हुकुमी चित्रपटांनीच दिली आहे हे नाकारता येत नाही.

Pages