चित्रपटातील मला न आवडलेल्या काही रूढ संकल्पना

Submitted by पशुपत on 4 November, 2026 - 13:02

हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार काळापासून सरसकटपणे वापरल्या गेलेली काही प्रमेय मला फार बालिश वाटत आलेली आहेत . तुमचं त्यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्राथमिक स्वरूपातली दोन-तीन उदाहरणे इथे देतो
१. चित्रपटातील नायिका ही बालिकावस्थेतून तारुण्यात पदार्पण करत असताना देहाने यौनात पोचली तरी मनाने ते अजून बालिकेसारखी अल्लड आणि निष्पाप आहे हे दाखवण्याची हौस हिंदी दिग्दर्शकांमधे पूर्वापार चालत आलेली आहे आणि हे दाखवण्यासाठी ( खरंतर पंधरा सोळा वर्षाची नटी मला आजवर कधीच दिसलेली नाही . तिच्या भूमिकेत ३५~४० वर्षाची प्रगल्भ नटी आपण प्रेक्षकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यांवर सतत मारली गेलेलीआहे आणि ती ते सहनही करत आलेले आहेत) पण त्यातूनही ते अल्लड दाखवण्यासाठी; साधारण आठ नऊ वर्षांच्या मुलांबरोबर लगोरी विटी दांडू सारखे खेळ खेळताना दाखवलेली कित्येक चित्रपटात पाहत आलेलो आहोत.. त्यावेळेला मला ती निश्पाप बालिका वगैरे न वाटता मंदबुद्धीची किंवा स्लो लर्नर वगैरे असावी असेच वाटत आले आहे..

२. बऱ्याच वेळेला चित्रपटातले पात्र तीन-चार दिवस उपाशी राहून अचानक त्याच्यासमोर पक्वानांचं भरलेलं ताट आल्यावर तो ज्या पद्धतीने ते खाताना दाखवतात... म्हणजे हात कोपरापर्यंत बरबटलेले आणि चेहरा कापाळापासून गळ्यापर्यंत बरंबटलेला.. आणि पाहणार्‍याला अतिशय किळस वाटेल अशा पद्धतीने तो खाताना दाखवतात ते बघून मला त्या व्यक्तिरेखा बद्दल आपुलकी किंवा दया न वाटता किळसच वाटते. सर्व आति सुशिक्षित व्यक्तिरेखा अचानक इतक्या गलिच्छ पद्धतीने कशा काय वावरू शकतात आणि तिथे दिग्दर्शकाला तसे ते अपेक्षित का असते आणि ती प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारावे असे का वाटते हे मला खरंच कळत नाही

अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे.. वाचकांना असेच वाटते का? त्यांचे या संदर्भात काय मत आहे हे निश्चित समजून घ्यायला आवडेल.
अशाच प्रकारचे इतर काही प्रसंग कोणाला खुपत आलेले असतील तर त्याही बद्दल प्रतिसादामध्ये लिहायला हरकत नाही !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तिला त्या निमित्ताने प्यायचा असतो म्हणून पिते. म्हणजे नंतर 'मै उनके गुस्से मे पागल होकर बहक गयी थी इसलीये मैने ये गुस्ताखी की' म्हणू शकेल.

आणखीन असंच एक नेहमीचंच अजिबात डोक्यात जाणारा प्रसंग म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळचे हिरोईनचे वाक्य "मेरे कपडे किसने बदले"
मुळात कपडे बदलायचेच कशाला?

बहुतेक आधीचा प्रसंग चित्रित केल्यानंतर दुसरा प्रसंगाच्या चित्रिकरणात खूप काळ जात असावा आणि कपडे पटवाल्याचे लक्ष न राहिल्यामुळे पुढचा प्रसंग वेगळ्याच कपड्यात चित्रित गेल्यामुळे बहुधा हा संवाद घालत असावेत !

नवीन हिंदी सिनेमा (गेले २०-२५ वर्ष म्हणा) मधे हिंदी पात्रांच्या तोंडी गाणी “पंजाबी” असण्याबद्दल आधी लिहिले आहेच. अजून काही न आवडलेल्या निर्बुद्ध फ़िल्मी संकल्पना :

♣ लग्न म्हणजे event. अगदी “फेरे” सुरु होईपर्यंत त्या कपल ला (आणि आपण प्रेक्षकांनाही) लग्न होईल आणि आधी ठरलेल्या-ठरवलेल्या दोन व्यक्तींमधेच होईल याबद्दल खात्री नसणे. ऐनवेळी नवरी किंवा नवरामुलगा बदलणे किंवा त्यांचा विचार बदलणे. This is very stupid; in fact outright insulting to the clear minded generation we have - आताची शहरी मुले नीट ५-७ वर्ष रिलेशनशिप, कित्येकदा लिव्ह इन वगैरे करून मग लग्न करतात. Arranged marriage असेल तर आधीच नीट, सुस्पष्ट बोलून घेतात. सिनेमातली मात्र still not sure till the moment of वरमाला-फेरे आणि “दोस्ती को रिश्तेदारी में बदलने” चे नवे वर्जन आपल्या माथी मारायला बघतात 😁

♣ करण जोहर नी पुरुषांना ओढण्या-दुपट्टे घालायला लावले. ते एखाद्याच जागी असते तर ठीक पण आता नॉर्म झालाय. वर आता स्त्री-पुरुषांचे सलवार सूट सेम टू सेम - पैठणी, वल्वेट, झरदोजी लाल हिरवे ब्लिंग ब्लिंग विथ ओढणी. एखाद्या शाहरुख ला कधीतरी तसा दुपट्टायुक्त सलवार कुर्ता शोभला म्हणून किरकोळ काडी पैलवानाला ते घालून उगाच raping our retinas. Why why why ?

तरी बरे अजून हीरो ने “पैरी पौना” करतांना ओढणी डोक्यावरून पदरासारखी घेतांना दाखवत नाहीत. दाखवतीलही, कुणी सांगावे.

♣ कुठल्याही करियर वुमन असलेल्या पात्राचे पर्सनल लाइफ कंटकाकीर्ण, रडके असणे - abusive childhood, मद्यपी बाप, divorced parents वगैरे. तिने स्वत: भसाभसा सिगरेटी ओढणे, दारू पिणे - त्याशिवाय स्त्री ला उत्तम करियर करताच येत नाही यांच्या मते. पोलिस असतील तर स्त्री- पुरुष समानता आहे, दोघांना लागू.

♣ मोठी टिकली लावणारी बाई कज्जाग (च) असणे. ऐतिहासिक थीम च्या सिनेमाला या नियमातून सूट असते. बिंदी बिझनेस वाल्या ताई आणि ते मिश्या वाले गुरुजी आठवतात एकदम.

♣ मेनस्ट्रीम सिनेमात गे पात्राचे हिडीस चित्रण किंवा पुरुषांनी स्त्रीवेष करून केलेली सो कॉल्ड कॉमेडी. नवीन दमाचे चित्रपटकर्ते हे थोडे बदलत आहेत ही जमेची बाजू.

♣ हिंदी-मराठी सिनेमातला “बिझनेस” म्हणजे बोर्ड मीटिंग ! मागे स्क्रीनवर वर वर जाणारा ग्राफ असलेले एक ppt पेज. झाले. क्लाएंट मीटिंग असतात पण कमीच. त्यातही “डील” असे म्हणून शेकहँड करतात फक्त. झाला फ़िल्मी बिझनेस आणि फैला हुआ कारोबार. 😄

♣ गंभीर / महत्वाच्या संवादाच्या प्रसंगात प्रचंड ढाण ढाण background music ! हे तर प्रत्येक सिनेमात होत चालले आहे. बघणाऱ्याला एखादा डायलॉग स्पष्ट ऐकू आला तर यांचे ऑस्कर हुकेल जणू.

♣ जेवण - सिनेमातली पात्रे कधी जेवतांना बघा. ते पदार्थाला हात लावतच नाहीत. चुकून एखादा तुकडा तोडतांना दाखवलेच तर तो तुकडा शेंगदाण्याच्या आकाराचा असतो आणि पुढचे सव्वातीन मिनिट तो चाऊन चाऊन खातांना दाखवतात. लागलीच तोंडही पुसतात. कोण खातं असं ? Stupid.

♣ सिनेमात दाढी करणाऱ्या पुरूषांचाही असाच वांधा आहे. चेहऱ्यावरचा पांढरा फेस न धुताच टॉवेलने फेस (pun intended 😜 ) पुसला की झाले ! इतक्या वर्षात हजारो सिनेमे बघूनही कुणालाच हे खटकू नये? दुरुस्त करता येऊ नये ? आम्ही कधीचेच electric shaver वर आलोत हे अजून अंग्रेज़ों के जमाने में आहेत.

♣ हिंदी सिनेमात पोलिसांची मराठी नावे नेहेमी शिंदे,जाधव, गायतोंडे. सिनियर पोलीस ऑफ़िसर = करमरकर, आगाशे, केळकर. अरे तुमचे exposure कमी असेल तर मुंबई पोलिसांची वेबसाइट तरी डोळ्याखालून घालायची ना ?

जाऊद्या…. शिकायतें ही शिकायतें.

अनिंद्य Lol

इथे कोणी अजून पिक्चर मध्ये कामवाल्या बायका फक्त मराठी दाखवलेल्या असतात हे लिहिले नाही का? मराठी पुरुष तर कुठे दिसतच नाहीत. सारखे आपले खन्ने किंवा मल्होत्रे Lol

आणि बहुतेक अरुणा इराणी नंतर आलेले लक्षण - कामवाल्या बायका मराठी पण जरा सेन्शुअल नऊवारी नेसलेल्या असतात. आणि लाडीकपणे येऊन साहेबSSS असे म्हणतात.

याचे मधे फार पेव फुटले होते. आता जरा कमी झाले आहे पण संपले नाही पूर्ण.

एक गँगस्टर असतो. त्याला त्याच्यापेक्षाही फालतू दिसणारी हिरॉइन दिसते. ती एकदा त्याच्याकडे पाहते. बास्स! निघाले लगेच सजदे करायला. मेरी दुवाओंमे तू, मेरी ख्वाईशोंमे तू, मेरी फुकलिशोंमे तू, मेरी सरगोशियोंमे तू, मेरी खरगोशियोंमे तू ई.ई.
नाहीतर मधेच जन्नत, फरिश्ते वगैरे मंडळी येतात. किंवा "मेरे मौला..." ची आळवणी. फॅमिली डॉक्टर सारखे यांचे फॅमिली मौला असावेत वगैरे मी इतरत्र लिहीले आहेच.

एका पिक्चर मधे तर फलटण मधली टिचकुले-गणपुले जोडी सुद्धा सजदे वगैरे करते.

* वरती एक दोन उर्दू सारखे वाटणारे शब्द मी स्वतःचे घातलेत Wink

खरगोशियों में >>> Lol

टॉवेलने फेस पुसणे - इतक्या वर्षात हजारो सिनेमे बघूनही कुणालाच हे खटकू नये
>>>> हिंदी चित्रपट पाहून बायकोच्या गालाला आपला फेसाळ गाल घासून माफक छेडछाड करणे आणि इंग्लिश चित्रपट पाहून एक बाय एक फुटाच्या जागेत आपण व हॅले बेरीसदृश नायिका उभी राहून तिने आपली दाढी करून वर टॉवेलने फेस पुसतेय अश्या रंगीन हसरतें इलेक्ट्रीक शेव्हर वापरून पूर्ण होतील का?

अनिंद्य, अगदी अगदी!

कंटकाकीर्ण >> वा! किती वर्षांनी ऐकला हा शबुद.

दाढीचा फेस थेट टॉवेलला पुसणे - हो हे अगदीच डोक्यात जातं. बर्‍याच सिनेमात बघितलं आहे.

'धोंडो भिकाजी जोशींपासून' आजवर बऱ्याच लोकांच्या डोक्यात गेल्या तरी या गोष्टी सुरूच आहेत.
असा मी असा मी मधला "हमारी जिंदगी मे मुहब्बत का परेशान" डायलॉग आठवा Happy .

<<<वरती एक दोन उर्दू सारखे वाटणारे शब्द मी स्वतःचे घातलेत>>> हाहाहा...

“सरगोशियोंमे” नाही तरी “खरगोशियोंमे” ला अगदी उर्दू नाही तरी “फा”रसी म्हणणं “फा”रशी अतिशयोक्ती ठरणार नाही. Happy

…मेरी खरगोशियोंमे तू ..,, 😄

… यांचे फॅमिली मौला असावेत…

हे मात्र खरेच असे असते. कुलगुरु / कुटुंबाचे गुरु सारखे.

ओळखपाळखही नसलेल्या किंवा जुजबी ओळख झालेल्या मुलीभोवती एकट्याने किंवा ग्रुपने नाचून जर कोणी तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर त्यास भारतीय दंडविधान कलम अन्वये छेड काढणे किंवा विनयभंगाच्या गुन्ह्याखाली थेट अटक होऊ शकते. पण ९० च्या दरम्यान अनेक हिंदी चित्रपटांत हिरोंना असे शुद्ध गुन्हेगारी कृत्य करून हिरॉईन त्याच्या प्रेमात पडते असे दाखवले जात असे. तो थेट डोक्यात जाणारा पायंडा पडला होता. असले सिनेमे उलट कुप्रवृत्तीला प्रोत्साहन देत असंत. सुदैवाने नंतरच्या काळात हे प्रकार बंद झाले.

आजकाल आणखीन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे पहिल्याच डेटला रेस्टॉरंट मध्ये खायला बसलेले असताना गालाला किंवा ओठाला अन्नपदार्थ लागलेला समोरच्याला दिसून येतो तो हाताने पुसणे !!

पूर्वीच्या सिनेमांमध्ये हमखास नवपरिणीतांचा प्रसंगअसे.
तो ऑफिसमध्ये जायला निघाला की ती पाकीट, रुमाल आणि सुई दोरा घेऊन हजर! शर्टाचे वरचे तुटलेलं बटण उभ्याउभ्याच शिवून दाताने दोरा तोडणे; ही तर प्रणय प्रसंगाची पर्वणी होती !

गालाला किंवा ओठाला अन्नपदार्थ लागलेला समोरच्याला दिसून येतो तो हाताने पुसणे >>> अगदी अगदी.
मुळात चारचौघांत खाताना एवढा अजागळपणा कोण करतं? आणि कपडे धुताना, इस्त्री करताना, घडी घालून ठेवताना समजत कसं नाही बटणं लूज झाल्याचं?

>>> आणि कपडे धुताना, इस्त्री करताना, घडी घालून ठेवताना समजत कसं नाही बटणं लूज झाल्याचं?

त्यानंतर होते ते

तशीच अशोक सराफ ची एक अभिनयातली लकब अशीच अतिशय कंटाळवाणी झालेली आहे. ती म्हणजे ; तो कुणाशी तरी बोलत असतो; आणि तो समोरचा माणूस त्याला काहीतरी विशेष गोष्ट सांगतो ; किंवा इकडे इकडे बघत असताना त्याला अचानक वेगळेच काहीतरी दिसते.. तेव्हा अशोक सराफचा अभिनय असा असतो .. आधीची वाक्य ऐकत असताना सहज कॅज्युअल एक्सप्रेशन्स देत असतो. पुढचे धक्कादायक वाक्य ऐकून सुद्धा तो त्याच्या आधीचीच रिएक्शन कंटिन्यू करतो आणि नंतर एक दोन क्षणानंतर झटका बसून परत मागे येतो आणि आश्चर्यचकित होऊन बघायला लागतो.. अशी एकदम बदललेली एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर येतात..
हे सांगण्यासाठी बरीच वाक्ये लिहायला लागताहेत , पण हे सगळे साधारण एक दोन सेकंदात पडद्यावर घडते. हे झटका तंत्र त्यांनी इतका वेळा वापरलेले की आता त्याच्या अभिनया आधीच आपल्याला कळतं हा असं करणार आहे !
अतिशय इरिटेटिंग वाटते अता मला हे बघताना

हपा, फेफ Happy

नव्या पॅटर्न्सपैकी एक डोक्यात जाणारा म्हणजे हिरॉइन कोणत्याही धर्माची असली तरी तिच्या स्वप्नातले लग्न चर्च मधे लागते ते पांढरे वेडिंग ड्रेस वगैरे घालून.

दुसरा म्हणजे ओकारी डिटेलिंग. एखाद्या व्यक्तीला उलटी होत आहे इतकी माहिती प्रेक्षक म्हणून आम्हाला बास आहे. नक्की काय काय मटेरियल आहे या माहितीचे प्रेक्षक काय करणार? उलट खाताना वगैरे बघवत नाहीत असले सीन्स. पूर्वी रोमॅण्टिक सीन नंतर दोन फुले आपटताना दाखवत तसा काहीतरी नवीन मेटॅफॉर शोधायला हवा उलटीचा.

हो. ओकारी डिटेलिंग, आणि जेंटस युरिनल मधले गप्पा किंवा फायटिंग सीन्स याचा पूर आलाय.दोन्ही अगदीच बघवत नाहीत.उलटी चे थोडे सूचक दाखवले तरी चालू शकते.पण नाही.त्यांना ते ओटस पॉरिएज प्यायला देऊन अगदी डिटेल दाखवतात.

आणि गंमत म्हणजे हे युरिनल खोलीतले प्रसंग किंवा कमोड मध्ये तोंड खूपसून उलटी करणारे प्रसंग नेमकं आपण ताट घेऊन समोर जेवायला बसलेलो असतानाच समोर येतात !!!

आपण ताट घेऊन समोर जेवायला बसलेलो असतानाच समोर येतात !!! # हार्पिकची जाहिरात पण (विषयांतराबद्दल क्षमस्व)

जुन्या हिंदी सिनेमात स्थूलपणावरून केलेले विनोद नको वाटतात. विशेषतः टुणटुण उर्फ उमा देवीवर केलेले विनोद.
तिच्या स्थूलपणाबरोबर मुद्दाम बेसूर आवाजात गाणे म्हणायला लावून विनोदनिर्मिती करणे.
ज्या बाईने अफसाना लिख रही हूं सारखी छान गाणी गायली आहेत तिच्यावर पोटासाठी स्वतःचे हसे करून घ्यावे लागते हे त्रासदायक वाटते

तीच गोष्ट दारूड्या माणसाला (केश्तो मुखर्जी, क्वचित ओम प्रकाश) बरळायला लावून त्यावर विनोद कंटाळवाणा वाटतो. तोचतोचपणा येतो.

मराठीत मधू आपटे नामक नट आपल्या तोतरेपणाचा विनोदासाठी वापर करत असे तेही नको वाटते.

जुन्या हिंदी सिनेमात श्रीमंत घरातील व्यक्ती अनेकदा असे कुठलेतरी व्यंग असणारे दाखवून विनोद निर्मिती केली जाते. उलट गरीब घरातील नायक नायिका ह्या मात्र कायम सद्गुणाच्या पुतळा/पुतळ्या असतात. तेही असेच चाकोरीबद्ध वाटते.

Pages