भस्मबीज - भाग ३०
पूर्वभाग
अनन्याच्या वाढत्या प्रश्नांमुळे स्वाती अस्वस्थ होते, तेव्हा नेहा तिला वाढदिवशी अभिजितला भेटायला नेण्याचे आश्वासन देते. कल्लेश्वराच्या उग्र तारा साधनेत आठव्या रात्री एका स्त्रीची गूढ सावली प्रकट होते, तर इन्स्पेक्टर हेगडे पडक्या देवळात संशयास्पद तांत्रिक साहित्य आणि हाडांचे अवशेष शोधतात. देवप्पा मल्लीच्या मनातील चंद्रिकेच्या आठवणी जागवून कल्लेश्वराविषयीचा संशय वाढवत असतो. अनन्या आणि अथर्व यांच्याकडून घडलेल्या घटनांचे धागे मिळत असतानाच अनन्या चौदा मे रोजी वडिलांना भेटायला येण्याचा हट्ट धरते. मात्र तिचा वाढदिवसच अधिक मासाच्या अमावास्येला बेपत्ता झालेल्या सातव्या स्त्रीच्या तारखेशी जुळत असल्याचे लक्षात येताच अभिजित हादरतो आणि तेरावा बळी अनन्या तर नाही ना, ही भीषण शंका त्याच्या मनात निर्माण होते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ३१ - अभय की शाप?
अभिजित काही क्षण देवाप्पाकडे नुसताच पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा संताप आता अस्वस्थतेत बदलला होता. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. डोळ्यांत रागापेक्षा भीती अधिक होती.
“म्हणजे हे सगळं तुम्हाला आधीपासून माहीत होतं?” त्याचा आवाज कापत होता. “अनन्या... माझी मुलगी... तिच्या जन्मतिथीचा आणि तेराव्या बळीचा संबंध तुम्हाला माहीत होता? तरीही तुम्ही मला काहीच सांगितलं नाही?”
“तुम्हाला कल्पना आहे का, माझ्या मनात काय चाललंय? मी इथे बसून साधना करतोय आणि तिकडे माझ्या मुलीच्या जिवावर बेतलंय! आणि कुणी मला त्याची साधी कल्पनाही दिली नाही.”
शेवटचं वाक्य बोलताना अभिजितचा आवाज दाटून आला. त्याने चेहरा दुसरीकडे वळवला. डोळ्यांत साचलेलं पाणी त्याला लपवता येत नव्हतं.
“माझा तुमच्यावर किती विश्वास होता पण तुम्हीच माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंत. अजून किती गोष्टी आहेत ज्या मला माहीत नाहीत? माझ्या कुटुंबाबद्दल, अनन्याबद्दल, नेहाबद्दल... अजून काय लपवलंय तुम्ही?”
देवाप्पाने त्याला न थांबवता त्याचा सगळा उद्रेक शांतपणे ऐकून घेतला. मग तो म्हणाला,“अभिजित, तुझ्या मनात जे प्रश्न आहेत, ते योग्यच आहेत. आणि तुझा रागही योग्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घे. मी तुला सत्य सांगितलं नाही, याचा अर्थ मी तुझ्या मुलीच्या जीवाची पर्वा करत नाही, असा होत नाही.”
“मग का लपवलंत?”
“कारण त्या वेळी तुला सत्य कळलं असतं, तर तू आज इथपर्यंत पोहोचू शकला नसतास. मला तुला त्या सत्याला सामोरं जाण्याइतका समर्थ बनवायचं होतं.”
"तू जेव्हा दुसऱ्यांदा मला भेटायला आला होतास त्याचवेळी मला समजले होते की तुझी मुलगी भस्मबीजाच्या विधीतील तेरावी बळी आहे."
अभिजितने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.
“येन पूर्वं निरुद्धं तद् भस्मबीजं महाबलम् ।
तत्कुलोत्थां बलिं कन्यां विना सिध्येन्न तद्विधिः ॥
यावत्सा स्वपद्भ्यां नैति विधेः सन्निधिमन्तिमम् ।
तावद्भस्मबीजं तु तां रक्षिष्यति न संशयः ॥”
देवाप्पाने हळू आवाजात श्लोक उच्चारला.
"ज्याने पूर्वी त्या महाबलशाली भस्मबीजाला रोखलं होतं, त्याच्याच कुळातील कन्या बळी म्हणून मिळाल्याशिवाय त्याचा विधी पूर्ण होणार नाही. जोपर्यंत ती स्वतःच्या पायांनी विधीच्या अंतिम सान्निध्यात येत नाही, तोपर्यंत हे भस्मबीज तिचं रक्षण करेल, यात संशय नाही. हे त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं आहे," तो पुढे म्हणाला. "कल्लेश्वराकडे ते पान नाही. आमच्या रक्षक कुळाकडे पिढ्यान पिढ्या त्याची प्रत जतन करून ठेवली आहे."
“म्हणजे अनन्याच तेरावी बळी आहे?” अभिजितने अधीरपणे विचारलं.
"अनन्याची जन्मतिथी, तिचं कुळ आणि या श्लोकातील संकेत... हे सगळं एकाच दिशेने बोट दाखवतंय.”
"पण मग कल्लेश्वर का तिच्या जीवावर उठलाय?" अभिजीतने वैतागून विचारले.
"कारण शेवटच्या पानावर लिहिलेल्या कुठल्याच गोष्टीची त्याला माहीती नाही, आता येणाऱ्या अमावस्येनंतर त्याला हळूहळू संकेत मिळू लागतील आणि मग कदाचित त्याला अंतिम बळीविषयीचे सत्य कळेल."
“मग आता काय करायचं?”
“तेच, ज्यासाठी तू इथे आला आहेस. साधना पूर्ण करायची. कवच सिद्ध करायचं. कल्लेश्वरच्या आधी आपल्याला त्या अंतिम विधीचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. त्याला तेरावा बळी मिळू द्यायचा नाही. आणि त्यासाठी अनन्याला सुरक्षित ठेवण्याचा मार्गही शोधायचा आहे.”
अभिजित काही क्षण शांत राहिला. मग त्याला अचानक आठवलं. त्याने पूर्वी अनेकदा विचारलेला प्रश्न ज्याला दरवेळी उत्तर टाळलं गेलं होतं तो परत एकदा विचारला,
“आणखी एक गोष्ट विचारायची आहे. आपण मागच्या वेळी मुंबईला परतत होतो, तेव्हा तुम्ही नेहाशी कन्नडमध्ये काहीतरी बोललात. त्यानंतर तिचा चेहरा एकदम बदलला होता. ती इतकी हादरली होती की तिने तोंडावर हात ठेवला होता. तुम्ही तिला नेमकं काय सांगितलं होतं?”
देवाप्पाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. त्याने नजर खाली वळवली.
"सगळे धागे एकमेकांत गुंतलेत, अभिजित. अनन्या, नेहा, मल्लि, त्या बारा स्त्रिया आणि भस्मबीज... यांपैकी कोणताही धागा स्वतंत्र नाही. पण प्रत्येक धाग्याचं टोक तुला एकाच वेळी दाखवलं, तर त्यांची गुंतागुंत तुला समजणार नाही. योग्य वेळी प्रत्येक गोष्ट उलगडेल.”
अभिजितने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनातील प्रश्न संपले नव्हते उलट आता त्यांची संख्या वाढली होती. मात्र देवाप्पाच्या शब्दांनी त्याला एक गोष्ट पुन्हा जाणवून दिली होती; अनन्याला वाचवायचं असेल, तर आधी स्वतःला या लढाईसाठी पूर्णपणे तयार करणं आवश्यक होतं.
त्याने समोर ठेवलेल्या भस्मशैलाकडे पाहिलं. काही वेळापूर्वी त्याला ती केवळ एक रहस्यमय वस्तू वाटत होती. आता तिच्याशी त्याच्या मुलीचं आयुष्य जोडलं गेलं होतं.
************************************************************************************************************************
नवव्या रात्रीपासून राखेवर उमटलेली ती स्त्रीची सावली वर्तुळाच्या काठावर उभी राहण्याऐवजी हळूहळू आत सरकू लागली. दहाव्या रात्री ती काठापासून एक वीतभर आत आली होती, आणि समोरच्या दिव्याची ज्योत आता सरळ उभी राहतच नव्हती, ती सावलीच्या दिशेने इतकी कलत होती की कल्लेश्वराला वाटलं ती कुठल्याही क्षणी विझेल. पण त्याने मंत्र थांबवला नाही.
बाराव्या रात्री, जेव्हा त्याची माळ शेवटच्या आवर्तनाकडे येत होती, तेव्हा त्याच्या उजव्या गुडघ्यावर कुणाचा तरी थंड तळहात हळूच टेकला. त्या थंडाव्याने कल्लेश्वरच्या अंगावरचे केस उभे राहिले. तो डोळे न मिटता, थरथरत्या आवाजात मंत्र म्हणत राहिला, आणि पहाटे जेव्हा त्याने आसन सोडलं, तेव्हा राखेचं वर्तुळ आधीसारखंच अभंग होतं. आणखी तीन रात्री उरल्या होत्या, आणि त्या तीन रात्रींनंतर समोर येणाऱ्याला काय उत्तर द्यायचं, हे अजूनही कल्लेश्वरने पूर्णपणे ठरवलं नव्हतं.
************************************************************************************************************************
कुमठ्याच्या ठाण्यात परतल्यावर हेगडेंनी त्याच संध्याकाळी सर्व वस्तूंचा रीतसर पंचनामा केला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कवटी आणि हाडं एका कापडात गुंडाळून स्वतः सरकारी रुग्णालयात नेली. तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने हातमोजे चढवून ती हाडं टेबलावर मांडली, बराच वेळ एकेक तुकडा उलटून पाहिला, आणि मग चष्मा नाकावर सरकवत म्हणाला, “हे माणसाचं आहे, साहेब. मांडीचं हाड आणि कवटी दोन्ही प्रौढ माणसाची आहेत, आणि फार जुनी आहेत. किती जुनी, मृत्यू कसा झाला, स्त्री की पुरुष, हे मी इथे सांगू शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला हे फॉरेन्सिकला पाठवावं लागेल, आणि त्याचा निकाल यायला काही आठवडे लागतील.”
“हरकत नाही,” हेगडे म्हणाले, आणि त्यांनी ते सर्व परत गुंडाळून घेतलं. बारा बेपत्ता स्त्रियांच्या फाईली त्यांच्याकडे होत्या, पण त्यांच्या आधारावर कोणतीही अधिकृत चौकशी उघडण्यासाठी पुरावा लागत होता, आणि आता पहिल्यांदा त्यांच्या हाती काहीतरी ठोस पुरावा मिळाला होता. ठाण्यात परतताना जीपमध्ये त्यांनी पुत्रनला विचारलं, “ते जोगी म्हणत होते की बाबा रात्र रात्र नदीकाठी बसतात. याना जंगलातून नदी वाहते, तिच्या काठावर कुठे असं ठिकाण आहे का, जिथे रात्री तो बाबा अशी साधना करत असेल?”
पुत्रन हळू आवाजात म्हणाला, “साहेब, नदीकाठी एक जुनं स्मशान आहे. फार काळापासून तिथे कुणी दिवसासुद्धा जात नाही. गावकरी म्हणतात की तिथे रात्री दिवे पेटलेले दिसतात. आणि कधी कधी भयंकर आवाजसुद्धा येतात.”
हेगडेंनी खिशातली छोटी डायरी काढून त्यात लिहिले - जुने स्मशान.
************************************************************************************************************************
साधनेची पंधरावी रात्र. कल्लेश्वराने नदीकाठच्या राखेच्या वर्तुळात दक्षिणेकडे तोंड करून लाल वस्त्रावर आसन घातलं, दिवा लावला आणि माळ हातात घेतली. जे येणार होतं त्याची भीती वाटली तरी त्याला सामोरं जायचंच आहे, हे त्याने मनाशी पक्कं केलं होतं.
एकेक आवर्तन पूर्ण होत होते तसे माळ ओढताना तो डाव्या हातातली एकेक कवडी उजवीकडे सरकवत मंत्रांचा हिशेब ठेवत होता. रात्र पुढे सरकली तसा नदीचा आवाज दूर विरत गेला, आणि चाळीसाव्या आवर्तनानंतर झाडांची पानंही हलायची थांबली. एकेचाळीसाव्या आवर्तनाच्या मध्यावर दिव्याची ज्योत अचानक सरळ उभी राहिली आणि त्याच क्षणी राखेच्या वर्तुळाच्या काठावर, एक सोळा - सतरा वर्षांची मुलगी प्रकट झाली. अतिशय रूपवान, अंगावर साधं काळं वस्त्र आणि मोकळे सोडलेले केस. अंगावर कुठलाही दागिना नव्हता. फक्त तिच्याभोवती फिकट निळसर प्रकाश पसरला होता. तिच्या डोळ्यात असं काहीतरी होतं की त्यांच्याकडे जास्त वेळ पाहणं कल्लेश्वरला जमलं नाही. त्याचा श्वास घशातच अडकला, पण गुरुजींचे शब्द त्याला आठवले: ती बोलेल, पण एकावन्न आवर्तन पूर्ण होईपर्यंत तिला उत्तर द्यायचं नाही.
"तु मला का बोलावलंस?" ती मुलगी म्हणाली. तिच्या बोलण्याची ढब १६ वर्षांच्या मुलीसारखी असली तरी आवाज मात्र खूपच धीरगंभीर होता.
कल्लेश्वराने उत्तर दिलं नाही. त्याने डोळे न मिटता जप चालू ठेवला. मुलगी तिथेच उभी राहिली, जणू तिला कसलीच घाई नव्हती. त्याच्या कपाळावरून घाम ओघळत होता आणि डोळ्यांतून पाणी वाहत होतं, पण त्याने माळ सोडली नाही. शेवटी एकावन्नाव्या आवर्तनाचा शेवटचा मणी त्याच्या बोटांतून सरकला आणि त्याने माळ मांडीवर ठेवली.
"देवी" कल्लेश्वर त्या मुलीचे अप्रतिम लावण्य बघत थरथरत्या आवाजात म्हणाला.
"बोल, कशासाठी मला आवाहन केलंस?" त्याच्या भिरभिरत्या नजरेला नजर देत ती मुलगी म्हणाली.
"मला माझ्या शत्रूंपासून संरक्षण हवं आहे, आणि अभय. प्रत्येक साधनेच्या वेळी भीती मला मागे ओढते. ती आता नको."
"तथास्तु," आणि मग रोखून त्याच्याकडे बघत ती तीक्ष्ण शब्दात म्हणाली, "पण लक्षात ठेव, कल्लेश्वरा. ही शक्ती तुझ्या रक्षणासाठी आहे. चुकूनही तिचा वापर स्वतःच्या रक्षणाऐवजी दुसऱ्याला विनाकारण इजा करण्यासाठी केलास, तर तो तुझा शेवटचा दिवस असेल."
तो काही बोलणार इतक्यात मुलगी त्या निळसर तेजात हळूहळू विरून गेली. दिव्याची ज्योत एकदा थरथरली आणि पुन्हा नेहमीसारखी झाली. कल्लेश्वरने मोठा श्वास सोडला, आणि त्याला जाणवलं की इतकी वर्षं छातीवर असलेलं भीतीचं एक जुनं ओझं निघून गेलं आहे.
पण देवीचे शेवटचे शब्द त्याच्या मनातून जात नव्हते. दुसऱ्याला इजा केली तर तो तुझा शेवटचा दिवस असेल. ते ऐकताना त्याला पुन्हा वाटलं की गुरुजींनी आपल्या शक्तीला बांधून टाकलं आहे. त्यांनी ही साधी, फक्त स्वतःच्या रक्षणाची साधना सांगण्याऐवजी अघोरी साधना सांगायला हवी होती, जिच्या बळावर आपण शत्रूचा विध्वंस करू शकलो असतो. तो काही वेळ तसाच उभा राहिला. मग त्याने दिवा विझवला, माळ आणि कवड्या गोळा केल्या आणि गुहेच्या दिशेने चालू लागला.
कित्येक वर्षांत पहिल्यांदा कल्लेश्वराला कशाचीच भीती वाटत नव्हती, आणि गुरुजींबद्दलची जुनी कटुता मात्र पुन्हा जागी झाली होती.
************************************************************************************************************************
यानाच्या खोल जंगलात एका गुहेत कल्लेश्वर धुनीसमोर बसला होता. गुहेत सर्वत्र राखेचा उग्र वास पसरला होता. धुनीतून निघणाऱ्या धुराच्या लोटांमध्ये त्याचा चेहरा मधेच अदृश्य होत होता. हातातली रुद्राक्षाची माळ त्याच्या बोटांमधून संथपणे सरकत होती. ओठांवर मंत्राचे अस्पष्ट उच्चार सुरू होते.
अचानक त्याची बोटं थांबली. त्याने डोळे उघडले. काही क्षण समोर बसलेल्या कावळ्यांकडे एकटक पाहत राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने माळ बाजूला ठेवली आणि धुनीतल्या राखेवर हात फिरवला.
“पोलिस...” तो पुटपुटला.
त्याच्या डोळ्यांत एकाएकी संतापाची ठिणगी चमकली.
मंदिरात कुणीतरी आलं होतं. तिथे ठेवलेल्या वस्तूंना हात लावला गेला होता. त्यांपैकी काही वस्तू तिथून नेण्यात आल्या होत्या. कल्लेश्वरला त्याची जाणीव झाली होती. जणू त्या वस्तूंशी जोडलेला अदृश्य धागा कुणीतरी ओढून धरला होता आणि त्याची कंपने थेट त्याच्यापर्यंत पोहोचली होती.
त्याने राखेने माखलेली बोटं मुठीत आवळली.
“माझ्या विधीला हात लावण्याचं धाडस?”
त्याचा आवाज गुहेत घुमला. त्याने धुनीत काहीतरी टाकलं. ज्वाळा अचानक उंच उसळल्या. लालसर प्रकाशात त्याचा चेहरा अधिकच भयावह दिसू लागला.
“जंगलात आलेत खरे... पण आता परत कसे जातात ते बघतो.”
त्याने पुन्हा डोळे मिटले. ओठांवर मंत्र सुरू झाला आणि गुहेतील धुनीचा धूर जणू एखाद्या जिवंत प्राण्यासारखा वळवळू लागला.
************************************************************************************************************************
८ मेची दुपार.
यानाच्या जंगलाकडे जाणारा निर्जन कच्चा रस्ता अजगरासारखा सुस्त पडला होता. दोन्ही बाजूंना उंच झाडांची दाटी होती. फांद्यांच्या जाळीतून सूर्यप्रकाशाचे तुरळक कवडसे जमिनीवर पडत होते. रस्त्यावरच्या वाळलेल्या पानांवरून जीपची चाकं जाताना किरकिर आवाज होत होता.
पोलिसांची जीप संथ गतीने जंगलात शिरली. ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर इन्स्पेक्टर हेगडे आणि पुत्रन बसले होते. जंगलातील जुन्या स्मशानाचा तपास करण्यासाठी ते पुन्हा त्या भागात आले होते.
“साहेब, मागच्या वेळी जे पाहिलं ते आठवलं की अजूनही अंगावर काटा येतो,” पुत्रन खिडकीबाहेर पाहत म्हणाला. “त्या मंदिरात काहीतरी विचित्र आहे.”
“विचित्र गोष्टींची भीती वाटून तपास थांबवायचा नसतो, पुत्रन,” हेगडे म्हणाले. “आपल्याला तिथे काय चालतंय ते शोधायचं आहे.”
“पण त्या वस्तू... आणि त्या हाडांचं काय?”
“त्यासाठीच तर परत आलो आहोत.”
जीप पुढे सरकत राहिली. काही अंतर गेल्यावर मोबाईलचं नेटवर्क पूर्णपणे गायब झालं. रस्त्याच्या कडेला असलेली झाडं अधिक दाट होत गेली. पक्ष्यांचे आवाजही हळूहळू थांबले. आता ऐकू येत होता तो फक्त जीपच्या इंजिनाचा घरघराट आणि चाकांखाली चिरडल्या जाणाऱ्या पानांचा आवाज. तेवढ्यात रस्त्याच्या मधोमध काहीतरी काळं दिसलं.
“साहेब, समोर...” ड्रायव्हरने हेगडेंकडे पाहत सांगितलं.
पुत्रनने पुढे नजर टाकली. रस्त्यावर एक काळसर आकृती उभी असल्यासारखी दिसत होती.
“ब्रेक मार!” तो ओरडला.
ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला. पण जीप थांबण्याऐवजी अचानक डावीकडे झेपावली.
“अरे! काय करतोयस?” हेगडे ओरडले.
“साहेब, स्टिअरिंग फिरत नाहीये!” ड्रायव्हर घाबरून ओरडला.
त्याने दोन्ही हातांनी स्टिअरिंग पकडून ते सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण चाकं जणू कुणी दुसरीच शक्ती वळवत होती. जीप रस्त्याच्या कडेला घसरली. टायर मातीवरून घासत गेले. ड्रायव्हरने पुन्हा ब्रेक दाबला. यावेळी ब्रेकचा पेडल पायाखाली पूर्ण खाली गेला, पण जीपचा वेग कमी झाला नाही.
“हँडब्रेक लाव!” हेगडे ओरडले.
ड्रायव्हरने हात पुढे केला; पण त्याच क्षणी जीप एका मोठ्या दगडावर आदळली. जोरदार धक्क्याने तिघांचीही शरीरं पुढे फेकली गेली. पुत्रनचं डोकं दरवाज्याला आदळलं. हेगडे मागच्या सीटवरून पुढे फेकले गेले. जीप आता रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल उताराकडे वेगाने झेपावत होती.
“उडी मार! बाहेर पड!” हेगडे किंचाळले.
पुत्रनने दरवाजा उघडला आणि स्वतःला बाहेर झोकून दिलं. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवर आदळत काही फूट घसरत गेला. हेगडेही दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर पडले. जमिनीवर कोसळताना त्यांच्या खांद्याला जोरदार मार बसला.
पण चालकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जीपने एका झाडाच्या बुंध्याला जोरदार धडक दिली. पुढचा भाग आतपर्यंत घुसला. काचा फुटून हवेत उडाल्या. धडकेच्या जोराने जीप एका बाजूला कलंडली आणि पुन्हा उतारावर घसरत गेली. अखेर एका प्रचंड खडकावर आदळून ती उलटी झाली.
क्षणभर कानठळ्या बसवणारा आवाज झाला. त्यानंतर सगळं शांत झालं.
हेगडे जमिनीवर पडलेले होते. त्यांच्या कपाळातून रक्त वाहत होतं. श्वास घेणंही कठीण झालं होतं. त्यांनी कसेबसे डोळे उघडले. समोर झाडांच्या फांद्यांमधून आकाशाचा एक छोटासा तुकडा दिसत होता.
“पुत्रन...!” त्यांचा आवाज क्षीण होता.
काही अंतरावरून खोकल्याचा आवाज आला. “साहेब... मी इथे आहे!” पुत्रन कसाबसा उठण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कपाळाला जखम झाली होती आणि हाताला रक्त लागलं होतं. पण तो शुद्धीवर होता.
हेगडे उठले. वेदनेने आणि अचानक बसलेल्या धक्क्याने त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. त्यांनी उलटलेल्या जीपकडे पाहिलं.
“ड्रायव्हर कुठे आहे?”
पुत्रनने जीपकडे धाव घेतली. ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे चिरडला गेला होता. दरवाजा आत वाकला होता. काचांचे तुकडे सर्वत्र विखुरले होते.
“अरे! ऐकू येतंय का?” पुत्रनने काचेतून आत डोकावत हाक मारली.
काहीच उत्तर आलं नाही. त्याने दरवाजा ओढण्याचा प्रयत्न केला. तो हलला नाही. हेगडेही त्याच्या मदतीला आले. दोघांनी मिळून दरवाजा खेचला, पण तो लोखंडाच्या वाकड्या सांगाड्यात अडकून बसला होता.
“साहेब, जरा बाजूला व्हा!”
पुत्रनने खिडकीतून आत हात घालून ड्रायव्हरची नाडी तपासण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात काही क्षण तसाच थांबला. मग त्याने हळूच मान हलवली.
“साहेब...”
हेगडे ड्रायव्हरच्या निश्चल चेहऱ्याकडे पाहत स्तब्ध उभे राहिले होते. काही मिनिटांपूर्वी त्यांच्याशी बोलणारा माणूस आता त्यांच्यासमोर मृत पडला होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नव्हती.
पुत्रनने डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर धक्का आणि अपराधीपणाची छाया होती.
“साहेब, हे... हे कसं झालं? स्टिअरिंग आपल्या हातात नव्हतंच. मी स्वतः पाहिलं. ड्रायव्हर प्रयत्न करत होता, पण जीपवर कुणा दुसऱ्याचंच नियंत्रण होतं!”
हेगडे काही बोलणार इतक्यात त्यांच्या अंगावरून थंड झुळूक गेली. दुपारच्या उन्हातही त्या जागी अचानक थंडी पसरली होती. त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं. रस्त्याच्या पलीकडे, झाडांच्या गर्दीत एक सावली हेगडेंवर नजर रोखून उभी होती.
“कोण आहेस तू?” हेगडे ओरडले.
त्या आकृतीने किंचित मान तिरकी केली. पुढच्याच क्षणी झाडांच्या पानांत सळसळ झाली. हेगडेंनी क्षणभर नजर वळवली आणि पुन्हा त्या दिशेला पाहिलं, तेव्हा तिथे कुणीच नव्हतं.
“साहेब... काय झालं?” पुत्रनने विचारलं.
हेगडेनी मृत ड्रायव्हरकडे पाहिलं आणि पुन्हा त्या सावलीकडे.
“आपण इथून निघायला हवं. लगेच.”
“पण जीप... आणि ड्रायव्हर...”
“मदत बोलावू. आधी इथून बाहेर पडू.”
ते दोघे रस्त्याकडे चालू लागले. प्रत्येक पावलागणिक हेगडेंच्या मनात एकच विचार अधिकाधिक ठाम होत होता; हा अपघात नव्हता. कुणीतरी जाणीवपूर्वक त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ते दोघे वाचले होते, तो केवळ योगायोग होता की त्या अदृश्य शक्तीची काही वेगळीच इच्छा, हे त्यांना समजत नव्हतं.
त्याच वेळी गुहेत कल्लेश्वरने डोळे उघडले.
त्याच्या ओठांवर विकट हास्य होतं. समोरच्या धुनीतली राख आता पूर्णपणे शांत झाली होती. त्याने हात पुढे करून राखेचा एक चिमूटभर भाग उचलला आणि पुन्हा धुनीत टाकला.
“वाचले...” तो स्वतःशीच म्हणाला. आवाजात समाधानापेक्षा चीड अधिक होती.
अरे देवा !
अरे देवा !
मला वाटलं होत रक्षक कुळात अधिक अमावास्येला जन्मलेल्या मुली मधे भास्माबीजाला रोखण्याची सुप्त शक्ती असेल आणि म्हणून कल्लू अनन्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता.
कथेतील हा ट्विस्ट भीतीदायक आहे आणि काळजी वाढतेय.
नेहा ची भूमिका काय असेल ह्याची उत्सुकता अजून वाढली.
बिचारे पोलिस मात्र हकनाक बळी जातील की काय.
मागील दोन तीन भागांपेक्षा
मागील दोन तीन भागांपेक्षा थोडा डार्क झालाय हा भाग..
उत्सुकता वाढली आहे की हे सगळे धागे एकत्र कसे येणार...
जबरदस्त थरार वाढतच जातोय
जबरदस्त
थरार वाढतच जातोय
काय होणार आहे पुढे? मला
काय होणार आहे पुढे? मला वाटतंय आता संघर्ष अटळ आहे.
उत्कंठा वर्धक.
वरच्या तीनही प्रतिसादांना
वरच्या तीनही प्रतिसादांना प्लस 1
झकास
झकास
पोलीस गडबडले असणार. एकदम वन डाऊन
जबरदस्त झाला आहे हा भाग. एका
जबरदस्त झाला आहे हा भाग. एका दमात वाचून काढला.
आता फारच उत्सुकता लागून राहिली आहे.
जबरदस्त झालं हा भाग.
जबरदस्त झालं हा भाग.
कल्लूला वरदान मिळालं भीती नष्ट व्हायचं पण देवीने एक अंकुश पण ठेवला वरदान देताना. कदाचीत तोच घात करेल कल्लूचा.
तोपर्यंत हे भस्मबीज तिचं रक्षण करेल, यात संशय नाही
>>>>> भस्मबीज कि भस्मशैल !
आबा
आबा
>>>>> भस्मबीज कि भस्मशैल !
मलाही वाटलं काहीतरी चुकल्या सारख, भस्मशैल असायला हवं तिथ.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
@आबा, manya अनन्या ही भस्मबीजाची तेरावी आणि शेवटची बळी आहे, आणि तिच्याशिवाय विधी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून विधीची वेळ येईपर्यंत भस्मबीजच तिचं रक्षण करतं.
जबरदस्त झाला आहे हा भाग. एका
जबरदस्त झाला आहे हा भाग. एका दमात वाचून काढला.
आता फारच उत्सुकता लागून राहिली आहे.
म्हणून विधीची वेळ येईपर्यंत
म्हणून विधीची वेळ येईपर्यंत भस्मबीजच तिचं रक्षण करतं.
>>>> ओके
धन्यवाद नितीन
धन्यवाद नितीन
खूप विचारपूर्वक लिहिता तुम्ही.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत