गुलाबी शर्ट

Submitted by अर्जुन ..✍️ on 9 November, 2026 - 01:47

घड्याळाचा काटा जसजसा दहाकडे सरकत होता, तशी माझी तडफड आणि धडधड वाढत चालली होती. आजही कॉलेजला उशीर होणार, असंच दिसत होतं. कितीही केलं तरी हातातलं काम संपत नव्हतं. शेवटी ते तसंच टाकून मी पटकन दोन घास पोटात ढकलले आणि सायकलला टांग मारून कॉलेजच्या दिशेने निघालो. घरापासून कॉलेज तीन-चार किलोमीटर लांब असल्यामुळे घरच्यांनी माझ्यासाठी एक जुनी सायकल घेतली होती.
आज गणिताचे सर त्रिकोणमितीचा चॅप्टर सुरू करणार होते. उशिरा पोहोचलो तर काहीच ताळमेळ लागणार नाही, या विचाराने मी जीव खाऊन पेडल मारत होतो. कॉलेजच्या गेटपाशी पोहोचलो आणि एका बाजूच्या सायकल स्टँडवर घाईघाईने सायकल लावू लागलो. तेवढ्यात चुकून बाजूच्या सायकलला धक्का लागला.
त्याच क्षणी एका मुलाने मला अडवलं आणि तो मुद्दाम भांडण उकरून काढू लागला. मी मात्र तिथून कसं निसटता येईल, याचाच विचार करत होतो. पण तो काही केल्या ऐकायला तयार नव्हता. इतक्यात लाल्या मध्ये पडला आणि त्याने त्या मुलाची कॉलर पकडली.
"अरे, अन्या बोलला ना, चुकून झालं! कशाला राईचा पर्वत करतोयस? पुन्हा याच्या वाटेला गेलास, तर बघ... या लाल्याशी गाठ आहे तुझी!"
लाल्या आला आणि सगळं चित्रच बदलून गेलं.
लाल्या, मी आणि मक्या, आम्ही तिघं शाळेपासूनचे दोस्त. कॉलेजमध्येही एकत्रच होतो. मक्या म्हणजे आमच्या तिघांमधला अभ्यासात सर्वांत हुशार विद्यार्थी.
मक्याचे वडील इंजिनीअर होते आणि आई गावातल्या शाळेत शिक्षिका. त्यामुळे घरचं वातावरण एकदम सुसंस्कृत होतं. घरी त्याला सतत नवीन नवीन पुस्तकं वाचायला मिळायची. लाल्याचे वडीलदेखील बँकेत कामाला होते आणि मोठा भाऊ इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात होता. एके काळी तो आमच्या कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता!
पण लाल्या मात्र या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा. त्याला फिरण्याची आणि कलेची भारी आवड. त्यामुळे बॅगेत अजूनही पेन्सिल आणि रंग घेऊन तो फिरायचा. रंगांची अचूक पारख असलेला, आमच्या तिघांमधला तो एकदम अवलिया आणि रंगीत माणूस होता.
आम्ही दोघं वर्गात पोहोचलो, तर मक्या नेहमीप्रमाणे आधीच पुढच्या बाकावर जाऊन बसला होता. आम्ही मागच्या बाकावर कुठे जागा मिळते का, ते बघत होतो. तेवढ्यात सर वर्गात आले आणि त्रिकोणमितीच्या चॅप्टरला सुरुवात झाली.
वर्गात फक्त फळ्यावरच्या खडूचा खरखर आवाज येत होता. सगळेजण आपापल्या वहीत sin, cos ची सूत्रं लिहून घेत होते. लाल्याची मात्र काहीतरी दुसरीच चुळबुळ सुरू होती. तो वहीत कसलंतरी चित्र काढत बसला होता.
त्याचं लक्ष नाही, हे कळताच सरांनी तिकडून जोरात एक खडू लाल्याच्या दिशेने भिरकावला. तो बरोबर त्याच्या डोक्याला लागला आणि लाल्या खडबडून जागा झाला.
"त्रिकोणमितीचं सूत्र सांग!" सरांनी त्याला विचारलं.
लाल्या माझ्या वहीत डोकावून sin, cos पुटपुटू लागला.
"शाब्बास!" सर उपरोधाने म्हणाले. "तू तुझ्या मोठ्या भावाकडून काहीतरी शिक. गणितात पैकीच्या पैकी मार्क असायचे त्याला. इंजिनीअर व्हायचंय ना तुला? मग जरा वर्गात लक्ष दे."
यानंतर मात्र लाल्या जणू काही झालंच नाही, अशा आविर्भावात पुन्हा फळ्याकडे बघत वहीत गणितं लिहून घेऊ लागला. तास संपला आणि सर बाहेर गेले, तसा लाल्याने सुटकेचा निःश्वास टाकला.
✦ ✦ ✦
त्या दिवशीही संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर आम्ही तिघं नेहमीसारखे कॉलेजच्या बाहेरच्या कट्ट्यावर बसलो होतो. ती आमची खास जागा होती. कधीकधी तिथेच बसून आम्ही चहा प्यायचो आणि डब्यातला खाऊ वाटून खायचो. मी कितीही नको म्हटलं, तरी मक्या आणि लाल्या माझ्यासाठीही काहीतरी घेऊन यायचे.
मक्याने लाल्याकडे बघत हसून विचारलं,
"आज कोणाचं चित्र काढत होतास रे? आम्हालाही दाखव की तुझी वही."
लाल्याने हाताची बाही वर सरकवत म्हटलं,
"अरे, एवढी काय घाई आहे? पूर्ण झालं की पहिल्यांदा तुम्हालाच दाखवीन. तुम्ही तर माझे जिवलग आहात, यार... तुम्हीच तर माझं कॉलेज आहात!"
"अरे बास, किती ते कौतुक!" मक्या म्हणाला. "पण जरा अभ्यासात लक्ष दे, लाल्या. सायन्समध्ये आहोत आपण आणि पुढच्या वर्षी बारावी आहे."
"अरे, मला तर इकडे यायचंच नव्हतं रे!" लाल्या म्हणाला. "पण आमचे घरचे काही ऐकत नाहीत. पाठवलं त्यांनी मला इकडे. इंजिनीअर होऊन काय वेगळं करणार आहे रे? नोकरी आणि पैसेच कमवायचे आहेत ना? ते तर सगळेच करतात... खरं सांगू, माझं मन नाही रमत त्या वर्गात. आणि किती ते पाठांतर करायचं, किती लक्षात ठेवायचं?
"कधीकधी वाटतं, घरी जाऊन सांगावं की मला आर्ट स्कूलला ॲडमिशन घेऊन द्या. मला चित्रकलेत इंटरेस्ट आहे. पण माझं ऐकतं तरी कोण? आमच्याकडे इंजिनीअर सोडून दुसरा कोणता विषयच नाही. कुठेही गेलं तरी सगळ्यांचं एकच पालुपद, 'पुढच्या वर्षी बारावी आहे, अकरावी बेस आहे, आत्तापासूनच अभ्यासाला लागा.' यापलीकडे कोणी काही बोलतच नाही."
मक्याने विषय बदलत लाल्याला आणि मला विचारलं,
"या वर्षाच्या दिवाळीत काय करणार आहात रे तुम्ही?"
पुढच्याच आठवड्यात दिवाळी होती.
लाल्या कट्ट्यावर उभा राहिला आणि दोन्ही हातांनी वेगवेगळे हावभाव करत म्हणाला,
"मी तर या वर्षी मोठा किल्ला बनवणार आहे बघ! तोही थेट प्रतापगडाची प्रतिकृती असेल!"
"एवढा वेळ आहे का रे तुझ्याकडे लाल्या? आणि अभ्यास कधी करणार?" मक्याने विचारलं.
लाल्याने कट्ट्यावरून खाली उडी मारली आणि म्हणाला,
"अभ्यास तर रोजचाच आहे, पण किल्ला वर्षातून एकदाच होतो आणि दिवाळीसुद्धा!"
माझ्याकडे मात्र सांगण्यासारखं काहीच नव्हतं. मी फक्त त्यांच्या हसण्यात सामील झालो आणि मनातलं दुःख लपवू लागलो. शेवटी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या घराच्या दिशेने निघालो.
घराकडे परत जाताना अंधार पडू लागला होता. थंडीचे दिवस जवळ आले असल्याने सूर्य लवकर मावळायचा. मी रस्त्याने जाताना बंगल्यांवरची लायटिंग आणि टांगलेले आकाशकंदील न्याहाळत चाललो होतो. दिवाळी अगदी उंबरठ्यावर आली होती. आठवडाभरातच कॉलेजला सुट्टी लागणार होती, पण ती शाळेसारखी मोठी नसायची; फक्त एकच आठवडा मिळायचा.
घरापाशी पोहोचलो, तेव्हा अंधार चांगलाच दाटला होता. आमच्या घरात अजून विजेची सोय नव्हती. फक्त एक रॉकेलची चिमणी मिणमिणत होती.
मी सायकल बाजूला लावली आणि खांद्यावरची पिशवी उतरवत आईला विचारलं,
"आई, यंदा दिवाळीला मला नवीन शर्ट मिळेल का गं?"
"तुझे बाबा आले की त्यांनाच विचार," आई कपाळावर आठी घालत म्हणाली. "इथे दिवाळी साजरी करायला पैसे नाहीत. अजून फराळाचा पत्ता नाही आणि घरात तेलाचा डबाही रिकामा आहे; आणि तुला कपड्यांची हौस सुचतेय? तुला कॉलेजला जायला मिळतंय, तेच खूप आहे."
"माझ्या कॉलेजवर सारखं का येता तुम्ही? असं काय घोडं मारलंय त्याने तुमचं?" मी वैतागून म्हणालो.
तिकडे आईने चुलीतली लाकडं पुढे सरकवत सुस्कारा सोडला.
"अरे अन्या, तुझ्या बाबांना वाटतं की तू कॉलेजमध्ये वेळ वाया घालवतोयस. आतापासून कुठेतरी कामाला लागलास, तर चार पैसे हातात येतील आणि घराला हातभार लागेल. किती दिवस पुस्तकांची पानं उलटत बसणार? पुस्तकं वाचून पोट भरतं का रे बाळा? मलाही वाटतं तू शिकून मोठा व्हावास, पण खपाटीला गेलेल्या पोटाला अन्नच नसेल, तर नवीन कपड्यांची हौस कुठून करायची? तुझं कॉलेज आपण कसंबसं ओढतोय. त्यात ते पूर्ण वेळ असतं, म्हणून तुझे बाबा जास्त चिडतात. हाताला काम नाही रे त्यांच्या... आणि वरून या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतायत, त्या वेगळ्याच!"
"तरी मी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी दुकानात काम करतोच आहे ना? आणि कॉलेजला जायच्या आधीही करतोच," असं बडबडत मी बाहेर अंगणात येऊन बसलो.
बाहेर अंधार दाटला असला, तरी आकाशात काही तारे चमकत होते. त्यांच्याकडे पाहून वाटलं, आपण कधी असे चमकणार? मनात असे विचार सुरू असतानाच गणिताच्या सरांनी दिलेला अभ्यास आठवला.
मी आत गेलो आणि चिमणीच्या बाजूला बसून गणितं सोडवू लागलो. चुलीच्या धुराने आणि चिमणीच्या काजळीने वरचा पत्रा काळाकुट्ट झाला होता. घर माळावर असल्यामुळे सुसाट वाऱ्याचा आवाज सतत यायचा आणि त्या वाऱ्याने चिमणीही अधूनमधून विझून जायची.
असा आमचा अंधार आणि उजेडाचा लपंडाव रोजच सुरू असायचा.
आज केमिस्ट्रीच्या सरांनी टायट्रेशनबद्दल सांगितलं होतं आणि उद्या त्याचं प्रॅक्टिकलही घेणार होते.
✦ ✦ ✦
दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकलचा दिवस उजाडला. केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांच्या प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये एक स्वतंत्र इमारत होती. सर्वांत खालच्या मजल्यावर केमिस्ट्रीची लॅब, पहिल्या मजल्यावर फिजिक्स आणि सर्वांत वरच्या मजल्यावर बायोलॉजीची लॅब, असा त्यांचा क्रम होता.
आधीच केमिकल्सच्या अवघड इंग्रजी नावांनी, फिजिक्सच्या चक्रावून टाकणाऱ्या नियमांनी आणि बायोलॉजीमधल्या प्राण्यांच्या व वनस्पतींच्या विचित्र नावांनी आमचं डोकं पार भंडावून सोडलं होतं. आम्ही आपले जमेल तसा त्यांचा उच्चार करायचो आणि कधीकधी स्वतःचेच ते उच्चार ऐकून आम्हालाच हसू यायचं.
केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये पाऊल ठेवलं की वेगवेगळ्या केमिकल्सचे उग्र वास नाकात शिरायचे. भिंतीच्या चारी बाजूंना आणि मध्यभागी सिमेंट व कडप्पा दगडाची मोठी टेबलं मांडलेली होती. त्यावर प्रॅक्टिकलचं साहित्य असायचं.
सरांनी प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप बनवले होते. नेमक्या त्याच दिवशी आमच्या बॅचेस बदलल्या होत्या. त्यामुळे आमच्या समोरच्या टेबलावर मुलींचा एक ग्रुप उभा होता.
कॉलेजला येऊन एवढे दिवस झाले होते, पण मुलींच्या इतक्या जवळ उभं राहून प्रॅक्टिकल करण्याची ही पहिलीच वेळ होती. माझी तर धडधड वाढली होती. काय बोलायचं, कसं वागायचं, काहीच कळत नव्हतं. तिकडे मक्या गावातल्या शिकवणीला जायचा, त्यामुळे त्याला या सगळ्याची सवय होती. तिथे मुलं आणि मुली एकत्र बसायची.
पण लाल्या... लाल्या त्या दिवशी वेगळ्याच दुनियेत होता. शर्टचं वरचं बटण उघडं, कॉलर थोडीशी दुमडलेली आणि सायकलची चावी करंगळीत गोल गोल फिरवत, एखाद्या सिनेमातल्या हिरोने एन्ट्री मारावी तसा त्याने लॅबमध्ये प्रवेश केला. त्याचा तो रुबाब बघून कोणालाही वाटलं असतं की केमिकल्स खेळवणं आणि प्रॅक्टिकल करणं हे याच्या डाव्या हाताचा खेळ आहे!
तिकडे सर कोणत्या केमिकलपासून आपल्याला धोका आहे आणि लॅबचे नियम काय, हे गंभीरपणे समजावून सांगत होते. पण लाल्या आणि मक्याची मात्र मागे काहीतरी वेगळीच कुजबुज सुरू होती. समोरच्या त्या मुलीही सारख्या आमच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या.
मी सरांची नजर चुकवून हळूच मान वळवली, तर नेमकी माझी नजर समोरच्या मुलींच्या ग्रुपवर गेली. आणि माझ्या पोटात एकदम भीतीचा गोळाच आला!
सरांचं सांगून झाल्यावर सगळेजण आपापल्या प्रॅक्टिकलमध्ये व्यस्त झाले. लाल्याचं मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. जणू सगळी केमिकल्स त्याच्याच डोक्यात मिसळली होती आणि आत काहीतरी वेगळीच रिॲक्शन सुरू झाली होती!
आपल्याला सगळं काही ठाऊक आहे, अशा आविर्भावात तो समोरच्या मुलींच्या ग्रुपला दाखवत प्रॅक्टिकल करत होता. काचेची सगळी साधनं गोळा केल्यानंतर ब्युरेटमध्ये केमिकल भरायचं होतं; पण हे सगळं करताना त्याचं लक्ष मात्र समोर उभ्या असलेल्या एका 'जलपरी'वर होतं. तिच्याशी नजर मिळवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता.
इकडे मी बावरलेल्या अवस्थेत माझं जर्नल शोधत होतो. तेवढ्यात माझी नजर अचानक समोरच्या मुलीवर खिळली. ती नेमकी माझ्याच समोरच्या टेबलावर उभी होती.
ती खाली मान घालून शांतपणे प्रॅक्टिकलची जुळवाजुळव करत होती. पहिल्यांदाच वर्गातल्या एखाद्या मुलीला इतक्या जवळून पाहण्याचा योग आला होता, तेही या प्रॅक्टिकलच्या निमित्ताने.
तिचा चेहरा एकदम नितळ आणि टवटवीत होता. केसांची सुंदर घट्ट वेणी आणि त्यात माळलेलं एक छोटंसं गुलाबाचं फूल... कपडे स्वच्छ, नीटनेटके, इस्त्री केलेले. तिने त्या दिवशी घातलेला गुलाबी रंगाचा ड्रेसही तिच्यावर छान खुलून दिसत होता. तिचं सगळंच कसं आखीव, रेखीव आणि सुरेख होतं.
तिच्याकडे पाहताच नकळत माझा हात माझ्या शर्टच्या चुरगळलेल्या कॉलरकडे गेला. माझ्या त्या चुरगळलेल्या शर्टाकडे पाहून मला स्वतःचीच थोडी लाज वाटली. आदल्या दिवशी आईशी झालेला संवाद आणि घरातली गरिबी आठवून काळजाचा ठोका चुकला.
ती याच वर्षी आमच्या कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेऊन आली होती. तिचं ते रूप पाहून माझी नजर वारंवार तिच्याकडेच ओढली जात होती. लॅबच्या त्या वातावरणात माझ्या मेंदूमध्ये मात्र एक वेगळाच केमिकल लोचा सुरू झाला होता.
मनात विचारांचं चक्र सुरू असतानाच अचानक मक्याने मला जोरात हलवलं.
"अन्या, ए अन्या! जर्नल सापडलं का तुझं? अरे, किती वेळापासून आवाज देतोय तुला?"
मक्याचे ते शब्द कानावर पडताच मी दचकून भानावर आलो.
तिकडे लाल्याची स्वारी भलतीच खूश होती. समोरच्या मुलीकडे पाहण्याच्या नादात त्याचं प्रॅक्टिकलकडे दुर्लक्ष होत होतं. पिपेटने केमिकल घेताना त्याचं लक्ष कामात नव्हतं. निष्काळजीपणे हाताळताना पिपेटमधलं केमिकल उडालं आणि त्याचे काही थेंब थेट त्याच्या तोंडात गेले.
आमच्या सगळ्यांची एकच पळापळ सुरू झाली.
"अरे लाल्या! काय करतोयस?" मक्या जोरात ओरडला.
लॅब असिस्टंट घाईगडबडीत आमच्या टेबलावर आला. त्याने लगेच सरांना बोलावलं. कोणतं केमिकल होतं, याची खात्री करून सरांनी तातडीने योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं. लाल्याला तोंड धुण्यासाठी आणि आवश्यक मदत मिळण्यासाठी लॅबमधून बाहेर नेण्यात आलं.
लाल्या मात्र तोंड वाकडं करत म्हणत होता,
"अरे देवा! किती कडू आहे हे केमिकल!"
त्याची अवस्था पाहून आम्हाला काळजीही वाटत होती आणि त्याच्या त्या चेहऱ्याकडे पाहून हसूही आवरत नव्हतं. त्यामुळे सगळ्या लॅबमधली मुलं आणि मुली आमच्याकडे बघत होती.
आमची एक वेगळीच फजिती झाली होती.
"चव घ्यायला हा काय लिंबू सरबत वाटलं का रे तुला?" असं म्हणत सरांनी लाल्याला चांगलंच सुनावलं.
त्यानंतर मात्र त्या दिवशी आमच्या ग्रुपचा प्रयोग तिथेच थांबला.
सगळी धावपळ शांत झाल्यावर मी नकळत समोर पाहिलं. बाकीच्या मुली खुदुखुदू हसत होत्या. वेणीत गुलाब माळलेल्या त्या मुलीने मात्र मान खाली घालूनच ओठांवर आलेलं हसू लपवायचा प्रयत्न केला.
तेवढंच, फक्त तेवढंच पुरेसं होतं...
त्या संध्याकाळी घरी परतताना सायकलचे पेडल जणू आपोआप फिरत होते. त्या दिवशी तर मी हवेतच तरंगत घरी आलो होतो. रात्री चिमणीच्या त्याच मिणमिणत्या उजेडात जर्नल उघडून बसलो, तरी अक्षरं काही दिसत नव्हती. बाहेर वाऱ्याचा आवाज आणि आत मात्र एक वेगळीच शांतता... त्या शांततेत माझं मन मात्र केमिस्ट्रीच्या लॅबमध्येच हरवून गेलं होतं.
दिवाळीची एका आठवड्याची सुट्टी कॉलेजमधून मिळाली होती. पण त्यानंतर पुन्हा जादा क्लासेस सुरू होणार होते. या एका आठवड्याच्या सुट्टीत कॉलेज बंद राहणार, म्हणजेच मक्या आणि लाल्याची भेटही होणार नव्हती आणि आमच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारणंही जमणार नव्हतं. याच विचाराने मी थोडा हिरमुसलो होतो.
✦ ✦ ✦
सुरुवातीचे दोन दिवस घरची आणि दुकानाची साफसफाई करण्यातच गेले. मी तर अगदी दुकानाच्या माळ्यावर चढून साफसफाई करत होतो. तिकडे आईने जमेल तशा पैशात किराणा आणून दिवाळीची तयारी सुरू केली होती. आम्ही भावंडं दिवसभर तिला जमेल तशी मदत करायचो.
माझा लहान भाऊ तर बाबांच्या मागेच लागला होता. त्याला फटाके आणि फटाक्यांची बंदूक हवी होती! त्यासाठी तो अधूनमधून आईच्या कुशीत जाऊन रडतही होता. शेवटी एके दिवशी बाबा त्याला सायकलवरून गावात घेऊन गेले आणि त्यांनी त्याला बाराची फटाक्यांची बंदूक घेऊन दिली.
मीही त्यांच्यासोबत गेलो होतो. त्याच वेळी बाबांनी मला समोरच्या दुकानातून रांगोळी आणण्यासाठी पाठवलं. पण नेमकं तिथे मला वर्गातील काही मुली रांगोळी खरेदी करताना दिसल्या. अगदी रंगीबेरंगी आणि छान छान कपड्यांमध्ये त्या तिथे बरीच खरेदी करत होत्या.
मी मात्र त्यांची नजर चुकवून एका झाडाच्या मागे लपलो आणि त्या कधी निघून जातात, याची वाट पाहू लागलो. त्या गेल्यानंतर मी पटकन रांगोळी घेतली आणि पुन्हा बाबांच्या सायकलजवळ येऊन उभा राहिलो.
घरी परतताना माझी नजर कापडाच्या दुकानात टांगलेल्या नवीन कपड्यांकडे सारखी जात होती.
'असाच एखादा नवीन शर्ट माझ्याकडे असता, तर मीही किती छान दिसलो असतो!'
याच विचारात मी घरी पोहोचलो आणि पुन्हा कामाला लागलो.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आईने आम्हा सर्वांना उठवलं. बेसनच्या पिठात उटणं कालवून आमच्या अंगाला लावलं. सुवासिक तेल डोक्याला लावून केसांची छान मालिश केली. घरात खूप दिवसांनंतर एक सुखद सुगंध दरवळत होता. त्यानंतर मोती साबणाने आम्ही अभ्यंगस्नान केलं.
मी माझा एक जुनाच शर्ट अंगावर चढवला आणि घरासाठी व दुकानासाठी झेंडूच्या फुलांचे हार बनवायला बाहेर बसलो. काम करता करता सकाळचे अकरा वाजले होते.
तेवढ्यात लांबून मला सायकलवरून लाल्या येताना दिसला आणि त्याच्या मागच्या सीटवर मक्या सुद्धा बसला होता. लाल्या आणि मक्या येताच माझा लहान भाऊ लाल्याच्या नवीन सायकलकडे पळाला. लाल्या मला त्याची नवीन कोरी सायकल दाखवायला आला होता. सायकलच्या हँडलला एक मोठा डबा आणि एक पिशवीसुद्धा टांगलेली होती.
फराळाचा डबा त्याने आमच्या घरी नेऊन दिला आणि माझ्याकडे बघत म्हणाला,
"अन्या, तुला तर भारीच हार बनवता येतात रे! फुलांचं दुकान टाकलं ना, तर वर्गातल्या सगळ्या पोरी तुझ्याकडेच हार घ्यायला येतील बघ..."
असं बोलून तो हसू लागला.
"लाल्या, तू कधी काय बोलशील याचा नेम नाही बघ," असं म्हणत मी त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याची नवीन सायकल पाहू लागलो.
तेवढ्यात लाल्याने त्या पिशवीतून एक नवीन शर्ट बाहेर काढला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला,
"हा शर्ट घे, पटकन बदलून ये. आपल्याला गावात राऊंड मारायला जायचं आहे."
तिकडे मक्या मात्र माझ्या लहान भावासोबत काहीतरी खेळण्यात मग्न होता.
मी म्हणालो,
"लाल्या... तुला कोणी सांगितलं रे नवीन शर्ट आणायला? आणि मला न विचारताच तू असं काही करणार का?"
"जा पटकन आणि शर्ट बदलून ये!" लाल्या म्हणाला.
लाल्याने अगदी मला हवा तसाच शर्ट आणला होता.
मी पुन्हा विचारलं,
"लाल्या, एवढा महागडा शर्ट कसा काय आणलास रे तू? आणि एवढे पैसे कुठून आणले?"
"अन्या, आपला पॉकेट मनी कधी कामाला येणार रे? आणि मक्याने त्याचा गल्ला फोडला, तेव्हा कुठे आम्ही दोघांनी मिळून हा शर्ट घेतला. हे तुझे दिवाळी गिफ्ट आहे!"
लाल्या म्हणाला.
ते ऐकताच माझं मन एकदम भरून आलं. मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. मी तसाच आत गेलो, शर्ट बदलला आणि बाहेर आलो.
लाल्या नवीन सायकलवर, मक्या त्याच्या मागच्या सीटवर आणि मी माझ्या जुन्या सायकलवर, असे आम्ही तिघं गावात फेरफटका मारण्यासाठी निघालो. त्यानंतर आम्ही सायकली घेऊन कॉलेजच्या बाहेरचा आमचा कट्टा गाठला. माझ्याकडे बघून लाल्या म्हणाला,
"हा गुलाबी रंगाचा शर्ट भारीच दिसतोय रे तुझ्यावर... काय मक्या, बरोबर ना?"
मक्याने हसत हसत आणि एका वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहत म्हटलं,
"हो... त्या इस्त्री केलेल्या गुलाबी ड्रेसपेक्षाही भारी दिसतोय."
मी थोड्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत विचारलं,
"कोणता इस्त्री केलेला ड्रेस?"
मक्या आणि लाल्या दोघेही माझ्याकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले.
"त्या दिवशी केमिस्ट्री लॅबमध्ये तुला काय झालं होतं रे? एवढा का हसत होतास?"
मी म्हणालो,
"मी? कुठे काय..."
लाल्या लगेच म्हणाला,
"अन्या, केमिकल माझ्या तोंडात गेलं होतं रे, डोळ्यात नाही! आणि त्याच दिवशी मी ओळखलं होतं की तुला गुलाबी रंग आवडतो. आता तू लॅबमध्ये कोणाकडे बघून हसत होतास, हे तुलाच चांगलं ठाऊक आहे!"
मला काय बोलावं तेच सुचेना. मी फक्त हसून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण या दोघांना काही गप्प बसायचं नव्हतं. त्यांची चेष्टा सुरूच होती.
त्या दिवशी नवीन शर्ट घातल्याचा आनंद तर होताच; पण त्यापेक्षाही जास्त आनंद होता तो माझ्या मित्रांनी माझ्यासाठी केलेल्या गोष्टीचा.
त्या मुलीसमोर माझी होणारी घालमेल, माझा चुरगळलेला शर्ट आणि माझी परिस्थिती या सगळ्या गोष्टी माझ्या मित्रांनी बरोबर ओळखल्या होत्या. मला कसलीही पुसटशी कल्पना न देता या दोघांनी माझ्यासाठी हा शर्ट घेतला होता. त्या शर्टाची किंमत किती होती, हे मला माहीत नाही; पण त्यामागची त्यांची भावना मात्र खूप मोलाची होती.
हा फक्त दिवाळीचा नवीन शर्ट नव्हता; तो माझ्या मैत्रीने दिलेला एक अनमोल ठेवा होता.
माझी दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली, ती फक्त लाल्या आणि मक्यामुळेच! त्या दिवशी माझं मन एका अनामिक आनंदाने आणि समृद्धीने भरून गेलं होतं... कारण माझ्या दोन्ही बाजूंना लाल्या आणि मक्या हक्काने बसले होते; आणि सोबत लाडू, चिवडा, चहाचा कप आणि आमच्या मनसोक्त गप्पा होत्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे कथा.
< माझ्या मैत्रीने दिलेला एक अनमोल ठेवा होता > अगदी खरंय.

<ती याच वर्षी आमच्या कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेऊन आली होती > हे अकरावीच्या वर्षाचं वर्णन आहे ना? म्हणजे अकरावीच्या सगळ्याच मुलांनी त्या वर्षी नवी अ‍ॅडमिशन घेतली होती. कॉलेजच्या वर्णनावरून ते सीबीएसई सारखं शाळेला अ‍ॅटॅच्ड असलेलं ज्युनियर कॉलेज वाटत नाही.

भरत - अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
हो, तुम्ही बरोबर ओळखले आहे. अकरावीमध्ये ज्यावेळी मुले आणि मुली पहिल्यांदाच कॉलेजमध्ये एकत्र येतात, त्यावेळी त्यांच्या मनात जे काही विचार येतात, ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
आजही बऱ्याच ठिकाणी मुलांची आणि मुलींची शाळा वेगळी असते आणि नंतर कॉलेजमध्ये ते एकत्र येतात...

महेंद्र सर ( manya)- अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. कॉलेजमधील मित्रांची स्टोरी आहे, त्यामुळे नक्कीच याचा पुढील भाग लिहिण्याचा प्रयत्न करेन