माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर !

Submitted by अनिंद्य on 12 May, 2022 - 03:54

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

4BD282D1-1FD5-4AA5-8419-0D78BD3E28FC.jpeg

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.

जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.

हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.

सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :

१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.

दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.

२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?

३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.

४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.

५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..

६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.

७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.

2962BDB9-033A-43E5-821D-FC667A1EDB73.jpeg८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...

९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.

१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.

११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.

१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !

१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !

मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.

कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.

ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड Happy )

आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..

समाप्त

* * *

(लेखातील चित्रे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.. गावरान आज्या लेकीबाळी हो, पोराहो अशा हाका घालत वाट्टेल ते पदार्थ करतायत चीज वगैरे घालून डोक्यावरचा पदर सावरत.….

हो हो, फार विनोदी वाटते ते 😁

… तोंडात टाकल्या वर लगेच हाताने छान ची खूण झालीच पाहिजे.…

हो, साधारण एक दशांश सेकंदात. ही अशी 👌

सोबत मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार !

चंपाकली, बेसन लाडू नाही पण मला “उपवास स्पेशल” पदार्थ पिडत आहेत सध्या- उपासाची कचोरी, उपासाची पुरी, उपासाची मिसळ, उपासाची भेळ, उपासाचा बटाटेवडा, रताळ्याचे गुलाबजाम, साबुदाण्याचे थालीपीठ, उपासाचा पिज़्ज़ा, उपासाचे पापड, उपासाची बर्फी, उपासाचे लाडू, करंज्या, चकल्या … हे नी ते …

हे कमी की काय म्हणून “वर्षभर / दररोज उपासाचे पदार्थ मिळणारी ठिकाणे” म्हणून अजून काही व्लॉग्ज्. … “उपाशी” व्लॉगर्स मोकाट सुटले आहेत फीड मधे.

इतके खा खा खायचे असेल तर उपास करायचा तरी कशाला?

मी तर उभ्या आयुष्यात एकही उपास केला नाही, करत नाही. मग मला का ही पीडा ?? क्यों, why, कशाला ?

पापा मम्मी किचनमध्ये मम्मीचा मुलगा तिला ऑफिसमधून येताना भूक लागलीय म्हणून फोन करतो आणि ती फटाफट गरमागरम वेगवेगळा नाश्ता बनवते.
घरी असेल तर पोळी भाजी/तूपसाखर/पोळीचा लाडू निमूट खा. नाही तर एखादं फळ, चणे फुटाणे चिक्की खा. तोवर रात्रीचा स्वयंपाक होत आहे/अर्धा झाला आहे, जेवायलाच बस एवढेच ऑप्शन्स देणाऱ्या आमच्या खानदानात असलं कौतुक परवडण्यासारखं नाही.

मध्यंतरी त्यांनी खास थंडीसाठी रेसिपी म्हणून नारळाचा एक गोटा घेऊन त्याला चौकोनी छिद्र पाडले. त्यातून बदाम आणि कायसेसे सुके मेवे नारळात कोम्बले. अनारकलीला भिंतीत चिणावे तसे ते छिद्र बंद केले. त्यानंतर तो गोटा उकळत्या दुधात शिजायला सोडला. आपण पुऱ्या तळताना झाऱ्याने त्यावर तेल उडवतो तसं त्या छिद्र सांभाळून नारळावर दूध टाकत होत्या. परंतु घरातल्यांना माझे असलं ज्ञानार्जन झेपलं नाही. परिणामी त्याचं पुढे काय झालं माहिती नाही.

इथे सगळे मजा म्हणून लिहित असतील अणि हौसेने ते पिडणारे व्हिडिओ पुनःपुन्हा बघत असतील जेणे करुन असेल व्हिडिओ आणखी आणखी फीड मध्ये यावे आणि मग मुद्दाम त्रागा करुन आम्हाला हसवायला लिहित असतील असं गृहित धरतो. मला तुमचा त्रागा वाचायला आणि हे अतरंगी प्रकार वाचायला मजा येते आहे.

फक्त खरेच त्रास वगैरे होत असेल तर ते व्हिडिओ बघायची सक्ती नाही. तो व्हिडिओ आला की लेफ्ट, राईट, अप, डाऊन काय जो प्लॅटफॉर्म असेल त्याप्रमाणे स्वाईप केलं की तो व्हिडिओ आणि अस पुरेसं स्वाईप केलं की तत्सम व्हिडिओ फीड मधुन गायब होतात. इंजिनला तुम्हाला जे आवडत नाही ते दाखवण्यात स्वारस्य नाही. न आवडणार्‍या गोष्टी बघायचे आणि आम्हाला हसवायचे अशी मुभा अर्थात तुम्हाला आहे. तेव्हा लिहित रहाच.

माझेमन , Happy
खास तुझ्यासाठी लिंक पाठवते आहे.
https://youtu.be/urQq62ohVj0?si=KMSGnGdKsY9m1nNM
त्या गोटा खोबऱ्याच्या रेसिपीची...

काही नाही, शेवटी खोबरे आणि ड्राय फ्रुट्स ची पावडर करून दुधात प्यायची म्हणे!

>> बाब्बो! म्हणजे मी महासुगरण आहे की!
मग काय! अर्थातच..
>> आता ते भिंतीवरल्या फ्रेममधे गेले असतील
मामी, लोल ( स्मायली कसे द्यायचे इथं?)

मध्यंतरी त्यांनी खास थंडीसाठी रेसिपी म्हणून नारळाचा एक गोटा घेऊन त्याला चौकोनी छिद्र पाडले. त्यातून बदाम आणि कायसेसे सुके मेवे नारळात कोम्बले. अनारकलीला भिंतीत चिणावे तसे ते छिद्र बंद केले. त्यानंतर तो गोटा उकळत्या दुधात शिजायला सोडला. आपण पुऱ्या तळताना झाऱ्याने त्यावर तेल उडवतो तसं ती छिद्र सांभाळून नारळावर दूध टाकत होती. परंतु घरातल्यांना माझे असलं ज्ञानार्जन झेपलं नाही. परिणामी त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. >>> हे भयाण आहे.

अनारकलीला भिंतीत चिणावे तसे ते छिद्र बंद केले >> Lol

>> बाळांनो राहिलं की
हो ते विसर्लेच होते.
>> त्यातून बदाम आणि कायसेसे सुके मेवे नारळात कोम्बले. अनारकलीला भिंतीत चिणावे तसे ते छिद्र बंद केले.
माझेमन फार हसले हा पॅरा वाचून.
असल्या हिंसक रेसिप्या खाऊन फोनवरून भुका लागल्याचे लाडिक आदेश देणार्‍या वंशजात तमोगुण वाढीला लागतील म्हणावं.

>> मध्यंतरी त्यांनी खास थंडीसाठी रेसिपी म्हणून नारळाचा एक गोटा घेऊन त्याला चौकोनी छिद्र पाडले. त्यातून बदाम आणि कायसेसे सुके मेवे नारळात कोम्बले.

https://youtu.be/urQq62ohVj0?si=KMSGnGdKsY9m1nNM
त्या गोटा खोबऱ्याच्या रेसिपीची...
काही नाही, शेवटी खोबरे आणि ड्राय फ्रुट्स ची पावडर करून दुधात प्यायची म्हणे!

<<

हा हा हा!

आणि सगळ्यात हाईट म्हणजे हा निर्बुद्ध नारळाचा गोटा तेवढ्याच निर्बुद्ध पद्धतीने शिजवल्यावर हिचा गोटा (तिचे हेड) नीट होऊन ती हुश्यार वगैरे झाली म्हणे!!

थँक यू थँक यू.

अमितव +१
मला नाही असले व्हिडिओ फीडमध्ये येत. आणि आलेच तरी मी आवडत नसताना बघणार नाही.
पापा मम्मी किचनची एक रेसिपी मला आवडली होती. पोहे बटाटा पराठे. विशेषतः त्यातलं रायतं भारी होतं! मला वाटतं अमितनेच ते पराठे लगेच करून इथे धागाही काढला होता.

मी आत्ताच इथली बहुचर्चित अशी नारळाच्या गोट्यात ड्रायफ्रूट्स भरून दुधात उकळून त्याची पावडर करून खायची अशी अचाट रेसिपी पाहिली. या सगळ्याअंती "...इसे ऐसे दूधमे पकाने से नारियल की तासीर चेंज हो जाती है" असे ऐकल्यावर माझे सिर कुठे फोडू असे झाले.

वावे +१. सेम!
ते पोहे बटाटा पराठे मी एक दोनदा केलेले. पण गाजराचे रायते/ तोंडी लावणे फारच आवडले आहे. ते अनेकदा केले जाते.
मी पापा मम्मी किचनच्या दोनच कृती बघितलेल्या आहेत आणि त्या दोन्ही करायला सोप्या आणि रुचकर होत्या. करुन बघितलेल्या आणि आवडलेल्या. त्या काकूंचे हिंदी आणि जलद बोलण्याची, प्रेमाने सगळं सांगण्याची पद्धत त्या दोने व्हिडिओत तरी भावलेली. कद्दुकस हा शब्द मला तिथेच समजलेला आणि आता पक्का लक्षात राहिला आहे.

^^माझे सिर कुठे फोडू असे झाले......^^

त्याच गोट्यावर ...

काही त्रासबिस होत नाही अमित. काही गोष्टी त्यांच्या बंडलपणासाठीच पाहायच्या असतात. अजून किती खालच्या पातळीवर जातात ह्या वरही लक्ष ठेवता येते. माईन्डलेस ॲक्टिव्हिटी लागते तेव्हा! Lol

माझेमन Lol मामी Lol
फीडतात भारी आहे.

मी सध्या कर्ली टेल्स आणि फराह खान यांचे एपिसोड नियमितपणे बघते. कालच डॉ नेनेंचे व्हिगन गलौटी कबाब पाहिले. पुस्तक येत आहे नेन्यांचे. त्याचे प्रमोशन. एकदम हुशार वाटतात आणि नेटका संसार करतात दोघेही.

अश्विनी काळसेकर हिच्या रेसिपी पण छान, खूपच गोड बाई आहे. मला सारस्वत कुकिंग शिकायचं होतं ते यात आहे. शिवाय आदित्य बल म्हणून एपिक वर येतो. तो लॉस्ट रेसिपीज दाखवतो. शोचे नावच लॉस्ट रेसिपीज आहे. त्याही करता येण्यासारख्या वाटल्या होत्या.

पापा मम्मी बरं वाटलं होतं. पकोडेवाली कढी का काही तरी करून पाहिले होते. तिच्या डूएबल आणि वेगळ्या वाटतात. पण मी सतत कुठलेही एकच चॅनल बघू शकत नाही. सतत उड्या मारते.

काय छळवाद आहे ती सुकं खोबरं वाली रेसिपी!! कोणा माफक शत्रूला त्रास द्यायचा असल्यास नक्की पाठवा.
आज मधुराज रेसिपी वर तिने सुंदर कुरकुरीत शेव बनवली आणि त्याची एकसंध एक पूर्ण वेटोळी चुरडून दाखवली.शेव घरी तळण्यापूर्वी श्वास रोखून चांगली होऊदे असा नवस करणारे आम्ही.शेवेचे एकसंध टाळून निघालेले वेटोळे(सॉरी मला चोख शब्द आठवत नाहीये, ममो वगैरे एक्स्पर्ट सुचवतील तो शब्द) जीवापाड जपत बाजूला ठेवणारे.

AI जनेरेटेड व्हिडिओ आहेत रेसिपीचे.
कहर कॉमेडी असतात
Tp म्हणून बघायचे कधीतरी.

एक साकोडे नावाची एक पकाऊ बाई आहे ती तर कहर आहे. म्हणजे कुठेतरी परदेशी असते. आषाढी पासून गटारी पर्यंत सगळे साजरे करते. साजरे म्हणजे साजरे करते मोठ्या प्रमाणावर. इतके काय काय रांधते ज्याचे नाव ते. सण असेल तर ही बहुदा मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी रांधायला घेत असेल, एकदम झगा मगा होऊन करते. तिच्या मुळे दोन चार घटस्फोट आरामात झाले असतील Proud आणि चौकोनी कुटुंब आहे. पोट्टी लहान आहेत.

तिची खरंच कमाल आहे.तिचा बिझनेस आहे केटरिंग चा.मेहनती असावी.मी असे व्हिडीओ बघून तिची साडी, टापटीप,उंची, लुक्स आणि उरकाचे कौतुक करून बाजूला ठेवून देते.असेल बुवा जमत एकेकाला.हे व्हिडिओ बहुधा ओव्हर काही दिवस बनवून मग तुकडे जोडत असतील.अर्थात आमच्या सासूबाई नोकरी सांभाळून एका दिवसात 4 फराळ पदार्थ करायच्या.1 डे मॅच म्हणायच्या त्याला.त्यामुळे जगात अशी माणसं आहेत यावर माझा विश्वास आहे.

शेवेच्या सर्कल ला योग्य शब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद.

साकोडे फार फेमस आहे बरं. ऑस्ट्रेलियात राहते आणि चंद्रकोर लावून लेटेस्ट मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये सिलेक्ट झाली होती. पण अगदी सुरवाती सुरवातीलाच बाहेर गेली. ती आणि घरचेच एकूणएक सगळं काम सांभाळतात म्हणे.

ते काम करताना ती एकटीच राबताना दिसते. नवरा दिसत नाही कधीच. पोरे लहान आहेत. इतर स्टाफ असेल तर माहीत नाही. पण एवढा सारा घाट कोणी घालत असेल असे वाटत नाही कोणत्याच सणाला. ते विकते का ती? केलेले प्रमाण विकण्याइतके नसते पण मग.

चवंगा शब्द अमानी लिहिला होता ममो ताईंच्या शेवेच्या धाग्यावर.

एक ओक आजी आहेत, त्या मस्त करतात पदार्थ. खासकरून लाडू वैगेरे. अजिबात चुकत नाही पदार्थ त्यांनी सांगितला तसा केला तर. एकदम सोबर, काही ताम्झाम नाही. जिन्नस आहे म्हणुन उगाच घातले असे पण नाही, अगदी मोजून, मापून आणि पुरवून.

त्या गावरान आज्या चेपलेल्या तव्यांवर वगैरे पनीर ची भाजी का करतात काय माहिती? गप आपलं ठेचा, पिठलं, भरली वांगी करावी <<<<
का? पनीरची (फाटलेले दूध/दूध फाडून केलेला पदार्थ) भाजी शहरी बायांनी नॉन स्टिक किंवा आणखी कसल्या स्पेसिफिक न चेपलेल्या भांड्यात करावी असं काही आहे का? तुम्हाला काय त्रास आहे त्यांनी त्यांच्याकडच्या तव्यात केला तर..

Rofl

त्या साकोडेबाईंची मला कमाल वाटते. म्हणजे ती छान पदार्थ करते, मस्त सजावट करते, रांगोळ्या काढते, व्यवस्थित भारतिय लूकमधे तयार होते, तिची मुलंही अगदी कलर कोऑर्डीनेटेड आऊटफिटस् मधे असतात. ते कुटुंब मला पुलंनी लिहीलेल्या परफेक्ट चौकोनी कुटुंबासारखं वाटतं. हे सर्व करायला किती हौस असेल नी मेहनत घ्यावी लागत असेल.

ते कुलकर्णी पाटील मराठी जोडपं अजून कुणाच्या फीडमध्ये आलं नाही का?

कोल्हापुरी साज लेऊन नऊवारी घालून अमेरिकन गार्डन सॉइल उकरून फुलकोबी लावणारी मराठमोळी बाई अजून कुणालाच कशी दिसली नाही? आणि बघून गालात हसली नाही?

बघितली आहे. मला पर्सनली ती बोलायला लागली की ऐकवत नाही. जाऊ द्या सगळे आपल्याला जमेल त्या पद्धतीने पैसे कमवायला बघतायत.

मला ही रीळं येतात- सगळ्या प्रकारात-

कर्ली टेल्स, 59 seconds with celebrity, अश्विनी काळसेकर, भाकरी टु ब्राऊनी, सरिता'ज् किचन, पाटील कुलकर्णी फार्म्स, भाग्यश्री करंदीकर काकू, आदित्य म्हणून कोणीतरी आहे त्याचं साधा माणूस, राजश्री मराठी, सुकीर्त चं कुठे काय खा यावर 1 मिनिटांत धावतं समालोचन, मधे धृव दातारचं फूड रीळ, मधेच पवन वाघूळकर, मधेच नव्या-जुन्या हिंदी मराठी मालिका, AI ची वर्कशॉप्स, डेटा सायन्समधे करियर, डॉ. भूषण शुक्ल, अमुकतमुक/ वुमन की बात, सौमित्र पोटे, अमोल परचुरे, गाणं....
काहीही चालू असतं. मी कुठेच रेंगाळत नाही.
असो. हे खादाडीवरून कुठच्या कुठे गेलं! अवांतरासाठी माफी करा.

भाकरी टु ब्राऊनी

>> मला त्या बाई आणि त्यांचा गोडगोड आवाज आवडतो. पदार्थ पण सोपे असतात. दडपे पोहे किंवा साधी भाजी वगैरे सुद्धा त्या अगदी नॉन जजमेंटल पद्धतीने गोड बोलत शिकवतात. त्यामुळे ज्या माणसाला अजिबात स्वयंपाक येत नाही, किंवा ज्याला काही काही बेसिक पदार्थ जमत नाहीत, त्याला awkward वाटत नाही.

Pages