माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर !

Submitted by अनिंद्य on 12 May, 2022 - 03:54

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

4BD282D1-1FD5-4AA5-8419-0D78BD3E28FC.jpeg

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.

जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.

हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.

सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :

१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.

दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.

२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?

३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.

४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.

५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..

६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.

७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.

2962BDB9-033A-43E5-821D-FC667A1EDB73.jpeg८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...

९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.

१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.

११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.

१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !

१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !

मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.

कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.

ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड Happy )

आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..

समाप्त

* * *

(लेखातील चित्रे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol जुन्या काळातील कढ. मला वाटतं ते मिक्सर वर गुपचूप वाटून मग पुन्हा पाट्यावर टाकण्याची ॲक्टिंग करत असतील. तुम्ही पाककृती करून बघण्यापेक्षा असेच माईन्डलेस बघण्यासाठी असतात ते चॅनल्स. त्यांचं खेळपाणी आपण पाहायचं असं काही तरी.

लिझिकीने आणलेला ट्रेंड आहे. ती घोड्यावरून जाते, पाणी शेंदून काढते आणि तिचे पपीज कधीच मोठे होत नाहीत. मग तिची आजी हॅ हॅ करत ते आग आग लोणचं खाते. "म्हातारीला झळ लागायची" असं आपण मनात म्हणतो. लिझिकी आपल्याशी फटकून वागते, बोलत नाही. म्हातारी आपल्याच नादात असते. तरीही आपण यडं पाहिल्यासारखं पाहतो. Happy

मीही सध्या रेड सॉईल स्टोरीज बघते. बऱ्याचदा तुम्ही करून पाहू शकत नाही अशाच रेसिपीज असतात. आम्हाला फार बडबडही सहन होत नाही म्हणून रणबीर ब्रार क्वचित बघतो. संज्योत कीर आवडतो, सगळ्यात बेस्ट! खरंच करून पाहायचं असेल तर फार कमी जणं आहेत.

>> मग जेवण करणारी व्यक्ती हळू हळू मातीचे भांडे, मग लाकडाच्या पळ्या, मग पितळेची भांडी असे एकेक गोष्ट रिप्लेस करत जाते.
मग काड्या काड्या पायांचे आणि त्रिकोणी शरीरांचे पांढरे वारली हळूच सारवलेल्या मातीवर कुडावर उमटू लागतात. मग चूल दिसते, मग पाटा वरवंटा,>> बरोबर आहे. सगळ्या गावच्या चॅनलवर हे असंच दिसतं.

इथे त्यांच्या फॅन क्लबला आवडणार नाही पण रेड सॉइल स्टोरीजवाले पण हीच थीम फॉलो करत होते. त्यांच्या बऱ्याच रेसिपीज त्यांना मुंबईत बसून पण दाखवता आल्या असत्या असं बघताना जाणवतं.>>>

मी रेड सॉइलची फॅन नाहीय हे आधीच सांगते. त्यांना रेसिपी चॅनेल सुरु करायचे नव्हते, ते दोघेही शेफ वगैरे नाहीत. लि झिकि पासुन प्रेरणा घेऊन आपल्या कोकणातले गाव दाखवायचे हेत्यानी ठरवले असे सुरबातीच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. म्हणुन त्यांनी गावी येऊन पुर्ण सेटप तयार केला व विडिओ सुरु केले.

रणवीर ब्रार शेफ आहे. तो मुंबईत बसुन रेसिप्या दाखवतो. त्याला मार्केटात जाऊन भाजी निवडतानापासुन सुरबात करायची गरज वाटत नाही. त्याला पदार्थामागची रासायनिक प्रक्रिया सांगण्यात जास्त रस आहे. मी याची मात्र फॅन आहे Happy

मी आधी रेड सॉइल टाईप विडिओज खुप पाहायचे. मग कंटाळा आला. लिझिकि बंद पडली. तिच्या इथलीच दियांशी अजुन आहे पण आता तिचे विडिओ म्हणजे यश चोप्राचे स्विसि विडिओज वाटतात. ती गरिब होती तेव्हाच जास्त छान होती. या मंडळींपासुन प्रेरणा घेऊन आपल्याकडेही आता काहीजण पदार्थांवर पाव किलोभर उकळते तेल ओततात. भारतात कुठल्या प्रांतात अशी फोडणी देतात देव जाणे. वरुन दिल्या जाणार्‍या फोडणीत इतके तेल नसते.

हे सहज अवांतर. Happy तेल उकळत नाही पण लक्षात आले. तेलाला उत्कलन बिंदू नाही, ज्वलन बिंदू आहे. ते जळते आणि धूर येतो. अलिबाबात चोरांवर सुद्धा मर्जिनाने उकळते तेल घातले होते, तिथून प्रेरित असेल. पण एकोणचाळीस चोर अशा फोडणीनेच गेले. Proud

हो. एका सो कॉल्ड गावरान चॅनेलवर एका बाईने चुलीवर (कढईत) कॉर्न डॉग करून दाखवले. गावातल्या मुलांनी ते खाऊ नयेत किंवा बायकांनी ते बनवू नयेत असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण ते गावरान चवीच्या नावाने का खपवता?

हे फूड चॅनेलवाले 3 कॅटेगरीत मोडतात
- पितळी कढया, मातीचे तवे, लाकडी चमचे वगैरे रस्टिक लूकवाले
- संजीव कपूर, रणवीर ब्रारसारखे एलिट ज्यांची भांडी उत्तम दर्जाची आणि त्या त्या पदार्थासाठी योग्य असतात म्हणजे बिर्याणीसाठी देग, नॉनव्हेजसाठी लंगडी, चिनी मातीचे/सिरॅमिकचे तेलाचे बुधले
- स्क्रॅच पडलेली नॉन स्टिक भांडी, सिलिकॉनचे स्पॅचुलावाले. या स्पॅचुलाचे रंगरूप अत्यंत गरम पदार्थ किंवा मसालेदार भारतीय पदार्थ ढवळून बदलेले असते.

अशाच एका माझी आजी का आजी आपली ह्या चॅनेलवर त्या ६५+ आज्जीने नगेट्स बनवल्या. Proud त्या बाई काहीही बनवत असतात. दोन मिलियन फॉलोअर आहेत. अजून काय हवे. पिझ्झा बर्गर पास्ता सगळे बनवतात एकदम गावरान स्टाईल. म्हणजे बहुदा इटली वरून इकडे स्थलांतरित झाले असावेत त्यांचे पूर्वज.
अजून एक.. संक्रांत कशी रंगावर येते तशी यंदा दिवाळी चंपाकळी वर आली आहे. एकजात सगळ्या बाया तेच दाखवत आहेत चंपाकळी. वैताग.
बाकी हा धागा वर आला की अमांची फार आठवण येते.

अजून एक चॅनल आमच्या घरी खूप आवडायचं ते म्हणजे कोणीतरी दक्षिण भारतीय लोकांचा ग्रुप मोठ्या प्रमाणात जेवण बनवतो आणि ते लोक वृद्धाश्रम किंवा गरीब लोकांमध्ये ते अन्न नेऊन व्यवस्थित सर्व्ह करतात. त्यांचा हेतू चांगलाच आहे पण सगळे अन्न बनवताना फार जोरजोरात बोलत आणि आरडाओरडा करत असतात. त्यात भाषा अजिबात समजत नाही. त्यामुळे नंतर डोकं दुखतं. शिवाय मोठ्या प्रमाणात बनवतात त्यामुळे हायजिन फार मेन्टेन होत नाही ते खटकतं बघताना.

हेहे!! मजा आली हे वाचून.
शिवाय ते एक पूर्ण पीस चुरडून वाया घालवून दाखवणारे लोक, पदार्थ किती कुरकुरीत झालाय दाखवायला.जीव फार कळवळतो. इतकी मेहनत केलीय तर अशी मोडतोड का करायची पदार्थाची?एक छोटा तुकडा मोडून तो चुरडून दाखवा.
काल एक व्हिडिओ पाहिला(म्हणजे ट्रेंड बघून अल्गोरिदम ने तोंडात कोंबला) त्यात परातीच्या आजूबाजूला माश्या फिरत, कणकेवर बसत होत्या आणि मग त्या कणकेचा गोळा तोडून तो पोळपाटावर ठेवून त्यावर बऱ्यापैकी रंगीत आणि क्वेश्चनेबल स्वच्छता असलेले मडके फिरवून आपटून आपटून सपाट पोळी बनवली.ठिके आम्ही पण काय घरी हातमोजे घालून स्वयंपाक करत नाही, गरीब असतील पण किमान लोकांना दाखवताना तरी माश्या कमी असलेल्या जागी जाऊन शूटिंग करावे ना.

लिझिकी फारच सॉलिड होती.तिच्या कॅमेरा चे अँगल पाहून ती एकटी ट्रायपॉड वर कॅमेरा लावून हे सर्व करते यावर अजिबात विश्वास नाही.

सध्या मांजरे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे, पाप्या घेणारे दाढीमिशाळ बुवाजी किंवा त्यांचे लाड करून त्यांना फटके देणाऱ्या माजी हाही ट्रेंड आहे.आणि ते मांजरांना कपडे आणि टोप्या घालून विमानात बसवून न्यूयॉर्क पॅरिस ला हिंडवणारे आणि खांद्यावरून सगळीकडे घेऊन जाणारे लोक.मला पुढचा जन्म ते स्पॉंजकेक किंवा बटरकप माऊ बनून पाहिजे.त्यांची मांजरं इतकी शिस्तीची आहेत की मांजरांना हिप्नॉताईझ केलंय अशी शंका यावी.शिवाय सारखं काय कडेवर घेऊन फिरायचं?आणि सतत कपडे आणि टोप्या?घरीपण घरातले कपडे म्हणून बनियान बर्म्युडा घालत असतील ही माऊ. किंवा त्या जुन्या पिक्चर मधल्या श्रीमंत इफ्तेकार किंवा प्राण सारखे रेशमी प्रिंटेड हाऊसकोट.

कधीतरी चालू दे ना त्या मावांना. त्यापेक्षा मग मला स्वामींनी फूड स्टॉल वाल्यांचा बबन बोक्याचा व्हिडीओ आवडतो.

यात आणि एक पीळ प्रकार म्हणजे 'घर मे कुछ नही है?फिरभी मिठा खाने का मन कर रहा है?ये लिजीए एक आसान मिठाई.' म्हणून पुढचा 1 तास किमान 10 नाजूक, कौशल्य पूर्ण स्टेप्स करून घेवर बनवणाऱ्या बायका.

लिझिकिची टिम होती. तिने एकदा दखवलेली. त्यांना तिने जेवण वाढल्यावर समोर येऊन खायला सांगितले होते. तिच्या मार्केटिंग मॅनेजर टिममुळेच तर तिची वाट्लागली.

आणि ते बांबुचे घर , त्याचे छप्पर त्यावर नुसती गुलाब आणि कसलिकसले फुले, शेतात हात घालेल तिथे रताळी बटाटे वगैरे एकट्याचे काम नाही.

एक वर्षापुर्वी ती परत आली पण दोन विडिओ करुन गायब झाली. तिच्या तुलनेत दियन्शी आवडली मला. तिचा छोटा भाऊ आता मोठा झाला.

सुबह एक मिनिट मे चटपटा नाश्ता वाले किंवा अचानक मेह्मान आये तो ये बनाओ वाले तर डोक्यात जातात. विडिओत सांगणार नंतर की आदल्या दिवशी चार तास खपुन तयारी करा तेव्हा कुठे सुबह मे झटपट मिळणार.

आणि ते चुरुन दाखवतात ते बघितले की मी पुढे स्क्रोल करते. अन्नाची अशी नासाडी बघवत नाही. ते खात असतील नंतर पण तरी काय हा आचरटपणा….

आणि एक पीळ प्रकार म्हणजे 'घर मे कुछ नही है?फिरभी मिठा खाने का मन कर रहा है?ये लिजीए एक आसान मिठाई.' म्हणून पुढचा 1 तास किमान 10 नाजूक, कौशल्य पूर्ण स्टेप्स करून घेवर बनवणाऱ्या बायका >>>
अगदी अगदी
किंवा मग बिना मावा, खोया और मैदा बनाईएं ये मजेदार नाश्ता वाल्या बायका. जनरली असं म्हणून त्या रवा किंवा बेसनाचं इनो घालून काही तरी बनवतात.
किंवा आप के घर में अगर ये सब्जी पसंद नही तो इस तरह बनाईयें परवल/टिंडा/नवलकोल. एक की बजाय २ रोटी खाएंगे.
यांत एकाचवेळी आलं लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, रंगासाठी काश्मिरी मिर्च, जर्रासा गरम मसाला आणि ढीगभर तेल असतं. आणि जी काय तर्रीदार भाजी असते ती पाहता पोळीवाल्या ताईंचा पगार वाढण्याऐवजी डॉक्टरांची बिलं वाढण्याची शक्यता जास्त असते.

हो का, लिझिकी टीम दाखवली असेल तर बरोबर. लिझिकी चे मागे एकदा तिच्या pr टीम बरोबर काहीतरी लीगल भांडण झाले होते ना?
ते व्हिलेज कुकिंग वाले मला आवडतात.त्यांनी मोठ्या प्रमाणात पावभाजी, आणि एक मिक्स फ्रुट आईस्क्रीम बनवले होते ते दिसायला मस्त होते.
सध्या डॅनी पंडित चे व्हिडिओ बघतेय.आणि तो त्याच्या बरोबर चा तुंबाडची मंजुळा मधला मुलगा.अतिशय टॅलेंट वाली मुलं आहेत.व्हिडिओ वर खूप मेहनत घेतात.(प्राची इथेच उतर. पथकात कळलं नाही पाहिजे आपण बरोबर आलोय ते). तो दीपक रांगोळी वाल्यांवर बनवलेला झट पट पटापट चा व्हिडिओ पण खूपदा बघते.

पियू, तो village कुकिंग चॅनेल.
फार ओरडून बोलतात ते म्हातारे बाबा, पण तोच त्यांचा usp आहे म्हणे...

एखादा पदार्थ कुरकुरीत झाला आहे की नाही हे सांगण्यासाठी जसा तो पदार्थ चूरडून दाखवतात तसंच त्या पदार्थाला काट्या चमच्या ने खरवडून सुद्धा दाखवतात.
फूड चॅनेल मध्ये मला तरी सध्या संज्योत कीर भारी वाटतो. व्यवस्थित सांगतो मेन डिश बरोबर मसाला, चटणी रेसिपी पण नीट टिपासकट सांगतो. आता जरा जास्त ॲड करायला लागला आहे म्हणा.
लिझीकी चे व्हिडिओ आवडायचे. जबरदस्त होते. दियांशी चे व्हिडिओ पण आवडतात. भरभरून पदार्थ करते आणि मग ते सगळे कुटुंब खाऊन फस्त करतात ते पाहायला आवडते.
लिझीकीवर इथे एक धागा होता बहुतेक.
लंपन, चंपाकळी, भारीच
Lol

लिझिकीचा धागा वर आलेला पाहिला आणि तिथल्या हपांच्या कमेंटवरून इथे आले. धमाल सुरू आहे.

ते एक पप्पा मम्मी किचन नावाचं आचरट चॅनल पाहिलंय का? त्यात अर्थात पप्पा कधीच जेवण करत नाहीत (बहुतेक). मी पूर्वी काही व्हिडिओ पाहिले आहेत या बाईंचे. राजस्थानी आहे आणि रांधून झाल्याझाल्या परस्पर घूमर नाचायला जायचं असल्यागत पारंपारीक ड्रेस घालून कायच्याकाय विचित्र पदार्थ करते. सुरू कुठे करते आणि मग काहीतरी कॉम्प्लिकेटेड स्टेप्स घेऊन भलतीकडेच कुठेतरी पदार्थ जातो. हिचा आवाजही इला अरुणसारखा आहे. तो डोक्यात जातो.

हिची एक रात्रीच्या उरलेल्या चपातीची रेसिपी अशीच आचरट होती. चांगलीच लक्षात आहे.

तीन शिळ्या चपात्यांपायी या बाईनं दीडेएक लिटर दूध, बदाम, केशर, पिस्ते, साखर, दुधाची पावडर, कॉर्नस्टार्च, सुक्या नारळचा खिस, बडीशोप, तीळ, मिक्सर, अनेकानेक बोल्स, कढई , तवा इतक्या वस्तू वापरल्या. रबडी बनवली. आता या स्टेजला रबडी आणि शिळ्या चपात्या खाऊन टाकल्या असत्या तर चाललं असतं की. पण नाही. तो ऑप्शन इला अरुणला नव्हता कारण तिनं आधीच उकळत्या दुधातून त्या शिळ्या चपात्या बुडवून काढल्या होत्या. मग त्या चपात्या मिक्सरला लावून त्यांची पुन्हा कणीक बनवली. ( इथे माझा धीर खचला आणि माझ्या ममव मनात ( दुधात न भिजवता) मिक्सरमधून काढलेल्या शिळ्या चपात्या आणि त्यापासून तयार होणारा 'फोडणीची चपाती' हा अजरामर पदार्थ दरवळू लागला). या कणिकेत दूध घालून त्याची खळ केली. त्या खळीत बेकींग सोडा घालून त्याचे पॅनकेक्स बनवले आणि त्यावर रबडी घालून खा म्हणाली. तुम्हीही नक्की करून पहा - https://www.youtube.com/watch?v=lFlJ581dlfo&list=PLTtMvzuAVJj8xsPYj_uLu4...

मामी, वर्णन वाचूनच मला कसंतरी झालं... Uhoh
पोळीचा लाडू किंवा फोडणीची पोळी करायची सोडून हे काय भलतंच! खरंच एकदम भारी पदार्थ आहे तो, आणि मी बरेच वर्षांपूर्वी पुण्यात अ‍ॅमेनोरा किंवा तत्सम मॉलातल्या एका खाऊच्या दुकानात "चपातीचा चिवडा - २२० रुपये" ही पाटी वाचून गहिवरले होते! आपल्या शिळ्या पोळीच्या पदार्थाला मॉलात इतका मान बघून दुसरं काय होणार!

लंपन चंपाकळी निरीक्षण एक नंबर , ह्या वर्षी प्रत्येक जण करतेय चंपाकळी.
मामी वाचून ही कसतरी झालं. फोडणीची पोळी 220रुपये.. मॉल ची कमाल.
ह्यांचा एक ही पदार्थ कधी बिघडत नाही. तोंडात टाकल्या वर लगेच हाताने छान ची खुण झालीच पाहिजे.

भारीच आहे हा पण धागा. फारच मजा येतेय वाचायला. आधीच्या पानांवरच्या कमेंट्स पण वाचते आहे.
मी इतके फूड ब्लॉगर्स सबस्क्राईब केलेले नाहीत. पण अर्थात काहीकाही लोक फीड मधे येतातच.
त्या गावरान आज्या चेपलेल्या तव्यांवर वगैरे पनीर ची भाजी का करतात काय माहिती? गप आपलं ठेचा, पिठलं, भरली वांगी करावी आणि देवदेव करावं ते नाही. लेकीबाळी हो, पोराहो अशा हाका घालत वाट्टेल ते पदार्थ करतायत चीज वगैरे घालून डोक्यावरचा पदर सावरत.
लिझिकी एकेकाळी खूप पाहिले. आता बंद झालं का? Vlogers च्या बॅकस्टोरीज मात्र कळत नाहीत.
ओरडणारे बापे चॅनेल शोधते आता.
पापा मम्मी चॅनेल न आवडणारी या जगात मी एकटीच आहे असं वाटत होतं तिथल्या कमेंट्स वाचून. लोक अगदी गहिवरून लिहितात. मला ते ड्रेसिंग, आवाज, कायच्या काय इंग्रेडिएंट्स यातलं काहीच आवडत नाही. सुरुवातीला पापा निदान फ्रेम मध्ये असायचे बहुतेक. आता फक्त मम्मीच असतात. पापांचे नाव टेबलाच्या त्या बाजूला आहे म्हणून लिहिलं असावं.

>> "चपातीचा चिवडा - २२० रुपये"
त्यांच्याकडे फोडणीचा भात पण असतो.
तिथलं थालीपीठ, कट वडा सँपल आणि साबुदाणा वडा मस्त असतात. सगळ्यां पदार्थाना असाच मान आहे पण तिथं.

सगळ्यां पदार्थाना असाच मान आहे पण तिथं.>>>बाब्बो! म्हणजे मी महासुगरण आहे की! फो पो, उरलेलं वरण-भाजी-आमटी-जे_काय_हाती_लागेल_ते घालून थालिपीठ, उरलेल्या भाकरीची दहीभाकरी हे सत्त्व-रज-तम या गुणांइतकं मानाचं आहे आमच्याकडे Lol आणि ते रांधून खाऊ घालत असल्यामुळे मी महासुगरण!

प्रज्ञा आणि ममो, वाचूनच कसंतरी झालं असा संकुचित दृष्टिकोन बरा नव्हे. व्हिडिओ बघून घ्याच.

पप्पा मम्मी किचन नावाचं आचरट चॅनल ..

एकदा मी याच्या तावडीत सापडत होते पण वाचले.
असेच काही तरी चित्र विचीत्र पदार्थ करत होते, ज्यात चार अने की मुर्गी आणि बारा अने का मसाला असा प्रकार होता.

मला परवापासून वेगवेगळ्या लोकांच्या बेसन लाडवांच्याच रेसिप्या भरवल्या जात आहेत (“फीड”मध्ये येणे - याला काय म्हणावं मराठीत)! बाकीचे लाडू संपले का? बेसनाची साथ आली आहे. शिवाय लाडू चांगले झालेत की नाहीत याची दृश्य कसोटी म्हणून तो अर्धा तोडून दाखवतात. त्यापेक्षा शबरी बरी!

“फीड”मध्ये येणे - याला काय म्हणावं मराठीत ०> मला त्या रेसिप्या येऊन फीडतात. (फीड मध्ये येऊन पिडतात)

Pages