भस्मबीज - भाग २९

Submitted by नितनवे on 1 November, 2026 - 12:28

भस्मबीज - भाग २८
पूर्वभाग
भागवत यांनी तीस वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या पत्नीच्या प्रकरणासह अधिक मासाच्या अमावास्येला बेपत्ता झालेल्या बारा महिलांच्या घटनांचा एकत्रित तपास करण्याची मागणी इन्स्पेक्टर हेगडेंकडे केली. दरम्यान, अभिजितचे ४१ दिवसांचे वीरशास्ता व्रत सुरू होते; अनन्येला मात्र विहिरीतील घटनेची पूर्ण आठवण असून ती आईकडे सत्य सांगण्याचा आणि बाबांना भेटण्याचा हट्ट धरते. कल्लेश्वर आपल्या जखमा भरल्यानंतर स्मशानात गुरुजींचे आवाहन करतो आणि त्यांच्याकडून पंधरा रात्रींच्या उग्र तारा साधनेची दीक्षा मिळवतो. दुसरीकडे, देवप्पा मोहिनी शक्तीच्या साहाय्याने मल्लीच्या मनात संशयाचे बीज पेरू लागतो, जेणेकरून त्याला कल्लेश्वरच्या चंद्रिकेसंबंधीच्या वचनांबद्दल प्रश्न पडू लागतील. हेगडे जुन्या नोंदी तपासताना बारा महिलांच्या बेपत्ता होण्यामागचा समान धागा शोधतात आणि या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करण्यासाठी त्या यादी तयार करणाऱ्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २९ - शोधाची सुरुवात

हेगडेंनी समोरचा फोन उचलून मामांचा नंबर लावला, "भागवत, सिनियर इन्स्पेक्टर हेगडे बोलतोय. मला ज्याने ही यादी तयार केली त्याच्याशी बोलायचंय. कुठे भेटेल ही व्यक्ती?"
"नमस्कार हेगडे सर, अभिजित सध्या यानात राहतो. वाटल्यास मी तुम्हाला घेऊन जातो."
"नको, मला पत्ता द्या. मी बघतो पुढचं"

हेगडे यानात पोहोचले तेव्हा मामांनी दिलेल्या पत्त्यावरच्या घराच्या अंगणात एक माणूस काळ्या स्वच्छ धोतरात चटईवर बसून मंत्र म्हणत होता, आणि त्याच्या शेजारी एक धिप्पाड माणूस जेवणाचं ताट घेऊन उभा होता. हेगडेंनी आपली ओळख करून दिली तेव्हा अभिजितने डोळे उघडले, यल्लाप्पाला ताट खाली ठेवायला सांगितलं आणि नवख्या कानडीत म्हणाला, "बसा साहेब."

"तुम्ही अभिजित इनामदार का?"
"हो, मी अभिजित इनामदार"
हेगडेंनी वही बाहेर काढली आणि करड्या आवाजात म्हणाले, "ही यादी तुम्ही बनवली असं भागवतांनी सांगितलं, ती कशी बनवलीत ते मला सविस्तर सांगा."

अभिजितने सांगायला सुरुवात केली. हेगडेंनी त्याला प्रत्येक वाक्यावर मध्येच थांबवून तारीख, ठिकाण आणि वृत्तपत्राचं नाव विचारलं, आणि अभिजितने वहीकडे न बघता एकामागून एक उत्तरं दिली, ती ऐकताना हेगडेंच्या कपाळावर आठया उमटू लागल्या.
"तुम्ही पंचांग बघितलं, ठीक आहे," ते शेवटी म्हणाले. "पण योगायोग नाही हे सिद्ध करायला पंचांग ग्राह्य धरू शकत नाही. काहीतरी भक्कम पुरावा लागतो."

"माझी नेहा नावाची सहकारी आहे, भागवतांची भाची. तिला स्वप्नात दिसलं की पडक्या देवळाच्या आसपास काही हाडं पुरलेली आहेत."

"केवळ एखाद्याला स्वप्न पडले म्हणून मी फाईल उघडू शकत नाही, तिच्या मामांच्या पाठपुराव्यामुळे ती उघडलीय पण तपास पुढे न्यायला पुरावाच लागेल." इन्स्पेक्टर आता थकलेल्या सुरात म्हणाले.

त्यांनी वही बंद केली आणि निघायला वळले, तेव्हा यल्लाप्पा त्यांच्या मागे आला आणि कानडीत हळू आवाजात म्हणाला, "साहेब, पडक्या देवळाकडे एकटे जाऊ नका. जायचं असेल तर आमच्या देवप्पांना सोबत घेऊन जा." देवप्पा तेव्हा नुकताच प्रवेश करत होता त्याच्याकडे बोट दाखवत यल्लाप्पा गप्प बसला.

"जंगलात जायला पोलिसांना कुणाच्या सोबतीची किंवा परवानगीची गरज नाही." देवाप्पाकडे पाहत हेगडे म्हणाले.

"ठीक आहे साहेब. मी तुम्हाला थांबवणार नाही, फक्त काही गोष्टी सांगतो, मग तुम्ही ठरवा. ज्या बायका गायब झाल्या, त्यांची हाडं या जंगलातच आहेत, पण कुठे आहेत ते अजून कुणालाच माहीत नाही. पडक्या देवळाच्या पुढे जाल तर आणखी आत एक गुहा आहे, तिथे काहीतरी अनैसर्गिक आहे, कुणीतरी…जे तुम्हाला बघत असतं, आणि ती जागा तुमच्या पोलिसांच्या नकाशात नाही." देवप्पा म्हणाला.

"आणि तुम्हाला हे सगळं कसं माहीत?" हेगडेंनी विचारलं.

"माझी गोष्ट मी नंतर सांगेन, आता नाही. तुम्हाला एवढंच विचारतो, तुम्ही पंचांग बघितलंत का? अधिक मासाची पुढची अमावस्या कधी आहे?" देवप्पा म्हणाला.

हेगडेंच्या भुवया वर गेल्या, खिशातून फोन काढून तिथेच उभ्या उभ्या शोधू लागले, आणि स्क्रीनवर आलेली तारीख वाचताना त्यांचा चेहरा हळूहळू बदलत गेला. "जून," ते स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाले. "पुढच्या जूनमध्ये."

"तेराव्या बळीची तारीख" देवप्पा म्हणाला, "आपल्याकडे वेळ खूप कमी आहे."
************************************************************************************************************************
रात्री नदीकाठच्या त्या निर्जन स्मशानात कल्लेश्वराने राखेचं वर्तुळ आखलं आणि त्याच्या मध्यभागी दक्षिणेकडे तोंड करून मांडी घातली. समोर ठेवलेल्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश वाऱ्याअभावीही अधूनमधून थरथरत होता. त्याने डोळे मिटले आणि गुरुजींनी कानात सांगितलेला मंत्र म्हणत माळेचे मणी फिरवायला सुरुवात केली.

ॐ ह्ल्रीं ह्ल्रीं उग्र तारे क्रीं क्रीं फट्।

रात्र विलक्षण शांत होती. नदीच्या पाण्याचा आवाजसुद्धा कुठेतरी दूर हरवला होता. आजूबाजूच्या झाडांची पानं निश्चल होती. मात्र काही वेळाने, त्याच्या उजव्या कानाजवळ कोणीतरी अगदी हळूच कुजबुजलं.

“कल्लेश्वर...”

त्याची बोटं क्षणभर थबकण्याच्या बेतात आली, पण त्याने ती पुन्हा माळेवर फिरवली.

तो स्त्रीचा आवाज होता. इतका जवळ की जणू कोणीतरी त्याच्या खांद्यावर वाकून त्याच्या कानात बोलत होतं. त्याने डोळे उघडले नाहीत. गुरुजींची सूचना त्याला स्पष्ट आठवत होती. या साधनेत कोणताही आवाज ऐकू आला, कोणतीही आकृती दिसली किंवा स्वतःच्या नावाने कोणी हाक मारली, तरी आसन सोडायचं नव्हतं.

“कल्लेश्वर...”

यावेळी आवाज दुसऱ्या कानाजवळून आला. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, पण त्या आवाजाने त्याच्या विचारांमध्ये शिरकाव केला होता. ती कोण होती? त्याच्याच अंतर्मनाने निर्माण केलेला भास, की ज्या बारा स्त्रियांच्या आत्म्यांना त्याने आपल्या साधनेच्या चक्रात अडकवून ठेवलं होतं, त्यांच्यापैकी कुणीतरी?

तिसऱ्यांदा त्याचं नाव उच्चारलं गेलं तेव्हा आवाजात एक विचित्र ओळखीचा सूर होता.

“कल्लेश्वर... मला ओळखलं नाहीस?”

त्याच्या छातीत धडधडू लागलं. त्या आवाजात इतकी वर्षं वाट पाहिल्यानंतर अखेर समोर आलेल्या माणसाशी बोलावं, असा शांतपणा होता. आणि तोच शांतपणा अधिक अस्वस्थ करणारा होता.
कल्लेश्वराने मनात उमटलेला प्रश्न तिथेच दाबून टाकला. त्याने मंत्राचा जप अधिक वेगाने सुरू केला.

अचानक त्याच्या समोरच्या दिव्याची ज्योत उंच झाली आणि पुढच्याच क्षणी पुन्हा बारीक झाली. त्याला डोळे मिटलेले असतानाही राखेच्या वर्तुळाबाहेर कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. जमिनीवर पावलांचा आवाज नव्हता, श्वासाची चाहूल नव्हती; तरीही त्या उपस्थितीचं अस्तित्व त्याला स्पष्ट जाणवत होतं.
माळेचे मणी त्याच्या बोटांतून सरकत राहिले.

“तू आम्हाला विसरलास का, कल्लेश्वर?”

यावेळी आवाज स्मशानाच्या चारही दिशांनी एकाच वेळी येत असल्यासारखा वाटत होता. त्याने मंत्रोच्चार सुरू ठेवला, पण आता प्रत्येक शब्द उच्चारताना त्याला स्वतःचा आवाजही अनोळखी वाटू लागला.

त्याच्या मनात एक विचार चमकून गेला की बारा आत्म्यांपैकी एखादी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती का? की त्याने ज्या शक्तींना आपल्या नियंत्रणात असल्याचं समजलं होतं, त्याच आता त्याच्याशी खेळत होत्या?
त्याने तो विचारही झटकून टाकला.

एक... दोन... तीन...अखेर एकशे आठाव्या माळेचा शेवटचा मणी त्याच्या बोटांतून सरकला. इतका वेळ त्याची बोटं एकदाही थांबली नव्हती. त्याने माळ गुंडाळली आणि हळूहळू डोळे उघडले.
************************************************************************************************************************
व्रताचा पाचवा दिवस उजाडेपर्यंत अभिजितच्या दिनक्रमाला एक ठराविक लय आली होती: पहाटे ओढ्याच्या थंड पाण्यात स्नान त्यानंतर अंगणातल्या चटईवर बसून जप, आणि दिवसभर घराच्या कामांत आणि देवप्पाशी होणाऱ्या बोलण्यात नेहमीप्रमाणे रमणं. यल्लाप्पा दुपारी आणि रात्री सात्त्विक जेवण आणून ठेवायचा आणि काहीही न बोलता ताट उचलून परत जायचा.

आठवडा उलटेपर्यंत त्याच्या शरीरात सूक्ष्म बदल दिसू लागले होते. अनवाणी चालण्याने पायांचे तळवे कडक झाले होते आणि ओढ्याच्या दगडांवर चालताना आता त्याला टोचत नव्हतं, दाढी आणि केस न कापल्यामुळे चेहरा रापलेला आणि अनोळखी वाटू लागला होता, रात्री पाच तासांची झोप पुरेशी वाटू लागली होती, आणि भूक मंदावली होती.

मात्र गंध आणि चवीविषयीची संवेदनशीलता विलक्षण वाढली होती. साध्या भाताच्या वासातही अनेक सूक्ष्म सुगंधछटा दडलेल्या आहेत, याची त्याला पहिल्यांदाच जाणीव झाली.

मनात मात्र या काळात उलट गोष्ट घडत होती. आठव्या आणि नवव्या दिवशी त्याला विनाकारण चिडचिड जाणवली, कल्लेश्वराचा विचार आला की त्याच्या मुठी आपोआप आवळल्या जाऊ लागल्या, पण बाराव्या दिवसापर्यंत हा राग हळूहळू ओसरला आणि त्याच्या जागी एक थंड, स्थिर शांतता आली.
************************************************************************************************************************
त्या रात्री देवप्पाच्या झोपडीत तेल संपत आलेल्या दिव्याची शेवटची फडफड चालू होती. भिंतीला पाठ टेकवून देवप्पा डोळे मिटून बसला होता. त्याचा चेहरा घामाने भिजला होता आणि कपाळावरून ओघळणारे घामाचे थेंब हनुवटीपर्यंत येऊन थांबत होते. यल्लाप्पा दाराशी निःशब्द उभा राहून त्याच्याकडे चिंतेने पाहत होता. देवप्पा शेकडो पावलं दूर असलेल्या गुहेत बसलेल्या मल्लीच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, हे त्याला माहीत होतं.

मल्लीच्या मनावर कल्लेश्वराने इतकी वर्षं आपला प्रभाव ठेवला होता की त्याच्या विचारांमध्ये थेट हस्तक्षेप करणं धोकादायक ठरलं असतं. म्हणून देवप्पा त्याच्या मनात कोणताही नवा विचार रुजवत नव्हता; त्याऐवजी आधीपासूनच तिथे असलेल्या एका जुन्या आठवणीला तो केवळ हलकीशी चालना देत होता.

तिकडे गुहेत मल्ली चंद्रिकेची जुनी निळी साडी हातात घेऊन बसला होता. तिच्या आठवणींमध्ये हरवलेला असतानाच त्याच्या मनात एक विचार पुन्हा वर आला. हा विचार त्याला नवीन नव्हता, पण आज तो नेहमीपेक्षा अधिक अस्वस्थ करत होता.

बारा विधी पूर्ण झाले. भस्मबीजाचं अस्तित्व हळूहळू आकार घेऊ लागलं आहे. आता फक्त त्याचं अंतिम मूर्त स्वरूप प्रकट होणं बाकी आहे. मग चंद्रिकेचं अस्तित्व अजूनही मला का जाणवत नाही?

त्याने साडीवरून हात फिरवला आणि स्वतःशीच पुटपुटला, “बारा विधी झाले... मग चंद्रिका अजूनही का दिसत नाही?”

देवप्पाने डोळे उघडले तेव्हा त्याचा श्वास जड झाला होता. “आज पुरे,” तो थकलेल्या आवाजात यल्लाप्पाला म्हणाला.

“त्याच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली आहे. पण अजूनही त्याच्या विचारांवर कल्लेश्वराची पकड आहे. आपण घाई केली, तर कल्लेश्वराला आपल्या प्रयत्नांचा सुगावा लागेल. त्याला काहीही कळता कामा नये.”

सकाळी मल्ली नेहमीप्रमाणे कल्लेश्वराच्या जवळ गेला. त्याने हळू आवाजात विचारलं, “बाबा, बारा विधी पूर्ण झाले. आता तरी चंद्रिकेचं काहीतरी अस्तित्व जाणवायला हवं होतं ना? इतके दिवस झाले, पण तिची काहीच चाहूल लागत नाही.”

कल्लेश्वराचं लक्ष त्या वेळी आपल्या पुढच्या साधनेच्या तयारीत गुंतलं होतं. त्याने मल्लीकडे न पाहताच उत्तर दिलं, “वचन दिलंय ना तुला, मल्ली? तेरावी रात्र झाली की तुझी चंद्रिका तुला मिळेल. आता फक्त थोडी प्रतीक्षा कर.”

मल्ली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. कल्लेश्वराच्या शब्दांत नेहमीचा आत्मविश्वास होता, पण बोलताना त्याने मल्लीच्या डोळ्यांत पाहिलं नव्हतं.
************************************************************************************************************************
सुप्यात त्या रात्री अनन्याला बराच वेळ झोप येत नव्हती. अखेर तिने उशीखालून आपली वही काढली आणि पहिलं पान उघडलं. काही क्षण पेन हातात धरून ती विचार करत बसली. मग तिने एकामागोमाग एक मुद्दे लिहायला सुरुवात केली.

विहिरीजवळ माझ्या शरीराचा ताबा कुणीतरी घेतला होता. पण त्याच वेळी कोणत्यातरी शक्तीने मला वाचवायला आजोबांना मदत केली.
मुंबईतही असंच काहीतरी घडलं होतं. तिथेही कुणीतरी होतं. विहिरीजवळ आणि मुंबईत आलेली ती एकच आहे का? आणि ती प्रत्येक वेळी मला का वाचवतेय?
शेवटचा प्रश्न लिहिल्यानंतर ती बराच वेळ त्या पानाकडे पाहत राहिली. तिच्या मनात अनेक आठवणी एकमेकांशी जोडल्या जात होत्या, पण त्यातून नेमकं काय घडतंय याचा उलगडा होत नव्हता. तिने वही बंद केली आणि पुन्हा उशीखाली सरकवून ठेवली.

दुसऱ्या दिवशी संधी मिळताच तिने अथर्वला एकटं गाठलं.

“अथर्व, मुंबईत त्या रात्री नेमकं काय ऐकलं होतंस, ते मला नीट सांगशील?”

अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे अथर्व गोंधळला. त्याने आधी तिच्याकडे पाहिलं आणि मग नजर चुकवली.

“दीदी, मी आधीच सांगितलंय ना तुला आणि आईला. मला त्यारात्रीबद्दल सारखं विचारू नकोस, ते आठवलं तरी भीती वाटते खूप!”

“भिऊ नकोस. त्या रात्री काहीतरी घडलं होतं . तुला जे आठवतंय ते सगळं सांग.”

अनन्याच्या आवाजातला निर्धार पाहून अथर्वला अधिक वेळ टाळता आलं नाही. त्याने काही क्षण विचार केला आणि मग हळू आवाजात सांगितलं, “मी किचनमध्ये पाणी प्यायलो गेलो तर अचानक एकदम सगळं वातावरण थंड झालं. आणि कुणीतरी माझं नाव कुजबुजत होतं म्हणून मग मी धावत बेडरूममध्ये गेलो आणि दरवाजा बंद केला होता आणि कोणीतरी बाई बाहेरून म्हणत होती. कोणीतरी बाई बाहेरून म्हणत होती की, तुझी ताई कुठे आहे? ती नेहमी तुझ्याजवळ का असते? मी तिला न्यायला आले होते, पण आज ती इथे नाहीये."

तिने लगेच आपल्या वहीत ते शब्द उतरवून घेतले. थोड्या वेळाने तिने आईला गाठलं.

“आई, बाबांचा गेल्या बारा दिवसांत एकदाही फोन आलेला नाही. ट्रेनिंगला गेले आहेत हे ठीक आहे, पण एवढे दिवस? तिथे नेटवर्कच नाही का?”

स्वातीने उत्तर देण्याआधी नजर दुसरीकडे वळवली.

“त्यांचं काम सुरू असेल, अनन्या. कदाचित वेळ मिळाला नसेल.”

“पण एक फोन करायला किती वेळ लागतो?”

स्वातीने यावेळीही तिच्या प्रश्नाला थेट उत्तर दिलं नाही. तिने दुसऱ्याच विषयाकडे वळण्याचा प्रयत्न केला.

अनन्याने मात्र तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. आईच्या नजरेतली ती क्षणभराची अस्वस्थता तिच्या लक्षात आली होती. आईला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, की माहीत असूनही ती आपल्यापासून काहीतरी लपवत होती, हे तिला समजत नव्हतं.

पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. बाबांच्या अनुपस्थितीमागे केवळ ट्रेनिंगचं कारण नव्हतं. आणि आता तिला या सगळ्याचा शोध स्वतःच घ्यायचा होता.
************************************************************************************************************************
कुमठ्यात त्या रात्री हेगडेंनी आपल्या खोलीची जवळजवळ संपूर्ण जागा बारा प्रकरणांच्या फाईलींनी व्यापून टाकली होती. प्रत्येक फाईलमधील पहिल्या पानावर त्यांनी लाल पेनाने संबंधित महिलेच्या बेपत्ता होण्याची तारीख आणि शेवटचं ज्ञात ठिकाण नोंदवलं होतं. त्यानंतर ते तपशील एका मोठ्या कागदावर उतरवत होते. कधी एखादी तारीख दुसऱ्या तारखेशी जुळवून पाहत, तर कधी नकाशावर ठिकाणांमधील अंतर मोजत ते पुन्हा पुन्हा सर्व नोंदी तपासत होते.

कित्येक तास उलटून गेले, पण त्यांच्या हाती काही ठोस लागत नव्हतं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर मात्र एका गोष्टीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. बारा प्रकरणांपैकी पाच प्रकरणांमध्ये त्या महिलांचं शेवटचं ज्ञात ठिकाण यानाच्या फाट्याच्या आसपास, जंगलाच्या पायथ्याशी होतं. विशेष म्हणजे रोहिणी आणि विजया यांचा प्रवासमार्गही त्याच परिसरातून जात होता.

त्यांनी उरलेल्या फाईली पुन्हा तपासल्या. तीन वेगवेगळ्या प्रकरणांतील शेवटच्या साक्षीदारांनी जवळजवळ सारखंच वर्णन दिलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला एकटीच जंगलाच्या दिशेने जात होती आणि चालता चालता कोणाशीतरी बोलत असल्यासारखी दिसत होती. मात्र तिच्यासोबत दुसरं कोणीही असल्याचं कुणालाच दिसलं नव्हतं.

हेगडे काही वेळ त्या नोंदींकडे एकटक पाहत राहिले. तीन वेगवेगळ्या साक्षीदारांनी, वेगवेगळ्या वेळी, जवळजवळ एकसारखं वर्णन द्यावं, हा केवळ योगायोग असू शकत नव्हता. त्यांनी मोठ्या कागदावर त्या तीन प्रकरणांसमोर लाल प्रश्नचिन्हं काढली.

सकाळ होताच त्यांनी वन विभागाकडून त्या परिसराचा अधिकृत नकाशा मागवला. नकाशा मिळाल्यावर त्यांनी यानाचा फाटा, जंगलाचा पायथा आणि पडक्या देवळाचा परिसर काळजीपूर्वक तपासला. पडक्या देवळाच्या पुढे राखीव वनक्षेत्राची सीमा दर्शवणारी एक रेषा होती. त्या रेषेच्या आत मात्र सरकारी नोंदीत कोणत्याही मानवी वस्तीची किंवा पायवाटेची नोंद नव्हती. नकाशावर तो संपूर्ण भाग एखाद्या रिकाम्या जागेसारखा दिसत होता.

हेगडेंची नजर त्या जागेवर स्थिरावली. देवप्पाने सांगितलेले शब्द त्यांना आठवले, “तिथे अशी एक जागा आहे, जी पोलिसांच्या नकाशातही सापडणार नाही.”

त्यांनी नकाशा पुन्हा एकदा तपासला. मग लाल पेनाचं टोक त्या अनामिक प्रदेशाच्या सीमेजवळ ठेवलं आणि हळूहळू त्या रिकाम्या जागेभोवती एक मोठं वर्तुळ आखलं.

काही क्षण ते त्या वर्तुळाकडे पाहत राहिले. कदाचित बारा बेपत्ता स्त्रिया, जंगलाच्या दिशेने जाणारे शेवटचे प्रवास आणि नकाशावर अस्तित्वात नसलेली ही जागा; आता या तिन्ही गोष्टी एकाच बिंदूवर येऊन मिळत होत्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंदू जुळवण्याचा प्रयत्न... Connecting dots..... अप्रतिम शेवट केलाय ह्या भागाचा.

जबरदस्त चालली आहे कथा, प्रत्येक पात्र एक एक पाऊल पुढे टाकत आहे.

हा भाग सुद्धा मस्त जमलाय.
हेगडे आता नवीन काय शोधून काढणार आणि कशी मदत करणार या बाबत उत्सुकता.

सहमत...

फार फार सुंदर मांडणी! इतके भाग होऊनही कथेतला प्रवाह, नावीन्य आणि रोमांच टिकवून ठेवला आहे! ही all time classic कथा आहे! हळु हळु सर्व धागे एकत्र येत आहेत! अफलातून कल्पनाशक्ती.

साधारण किती भागांची कथा आहे ? कधी संपणार आहे?

अर्धवट कथा वाचायची भिती वाटते म्हणून पूर्ण होण्याची वाट बघते आहे.
मग बिंज रिडिंग करणार आहे एका बैठकीत.

>> साधारण किती भागांची कथा आहे ? कधी संपणार आहे? <<
मराठी मालिका जशा ५०० भाग सहज चालूनही ५०१ वा पाहिल्यावर नित्यनूतन वाटतात तसे तुमचे होईल त्यापेक्षा आत्ताच वाचून टाका.

… भाताच्या वासात अनेक सूक्ष्म सुगंधछटा….

क्या बात है ब्रदर. याला म्हणतात डीटेलिंग- detailing of the awakening senses. 👍

गज्जब !!

BTW, प्रत्येक कथाभागावरून मनातल्या मनात वेबसिरीजचा एक एक एपिसोड शूट करतोय मी… त्यातले कलाकार बदलूनही पाहतो मधूनच 🙂

Enjoying.

पुभाप्र.

पियू
ही कथा होणार पूर्ण. तू घे वाचायला.

ही कथा होणार पूर्ण.

>> अर्थात होणार. या कथेचे व्यसन लागलेले लोक आहेत मायबोलीवर. नाही केली पूर्ण तर लेखकाच्या घरी जाऊन आळीपाळीने मुक्काम ठोकून लिहायला लावतील एवढं वेड लावलंय हिने. मध्ये मायबोली बंद होती तेव्हा भस्मबीज आपल्या अपरोक्ष पुढे गेले नाही ना अशी काळजी वाटणारे लोक बघितले तेव्हाच कथा एकदम powerful आहे याची खात्री पटली. Happy

मुक्काम नाही
उपोषणाला बसू आम्ही.
हमारी कथा पूर्ण करो अशा घोषणा पण देऊ Lol

काळजी नसावी.
नितिन यांनी ह्या आधीच्या दीर्घकथा नियमित पणे भाग पोस्ट करून पूर्ण केल्यात.

नितिन, तुम्ही कथा आता पर्यंत खूप छान इथवर आणली आहे. आम्ही आतुर असतो पुढच्या भागासाठी पण तुम्ही घाई करू नका.
पुढचे भाग सुद्धा असेच उत्कंठा वाढवणारे असतील आणि शेवट सुद्धा थरारक असेल ही खात्री आहे.