साप घुशी येती घरा||

Submitted by mi_anu on 21 July, 2026 - 06:38
Snake,cat, rodents

भल्या पहाटे(म्हणजे 7.45 ला) वर्क फ्रॉम होम दिवस.
अचानक नवरा जोरजोरात हाका मारायला लागला.नेहमी अश्या हाका ऐकू आल्या की मी पळत जाऊन बेसिन च्या कपाटावरचं लाल हिट काढते, पळत जाऊन ते ओरडणाऱ्याच्या 2 फुटावर ठेवून पळत पळत दुसऱ्या खोलीत पलंगावर पाय वर ठेवून बसते.(इतकं करून पण पालींना देवाने भिंती, छतावर चढण्याचं माझ्याकडे नसलेलं स्किल दिल्याने भीती असतेच.)

पण हिट घेऊन आले तर तो म्हणाला 'खोलीत साप आहे.आता मी दार उघडताना दारातून आत गेला'.आमच्या मागे शेत असल्याने खिडकीला जाळी लावेपर्यंत एक्झॉस्ट च्या खिडकीत उंदीर, कमोड वॉशरच्या नळावर सरडा, कधीतरी ते मागून सापासारखं आणि पुढून पालीसारखं दिसणारं हायब्रीड चमकदार काहीतरी दिसणं या अतिशय कॉमन गोष्टी होत्या.आता सर्व खिडक्यांना जाळी, वॉशिंग मशीन च्या ड्रेन च्या छिद्राला, बेसिन च्या पाईप ला, गॅलरी च्या ड्रेन ला बोरिक पावडर चं मॅरीनेशन करून दुहेरी जाड चिकटपट्टी बंद केलेल्या, गॅलरी च्या पत्र्याच्या लाटांमध्ये जुन्या चिंध्या घालून सील असं सर्व करून पण घरात साप येणे म्हणजे फारच टू मच अन्याय होता.अर्थात हे पाली आणि झुरळं यांच्यासाठीचे उपाय आहेत.त्यामुळे साप 'नॉट ऍप्लिकेबल टू मी' म्हणून बिनधास्त आत घुसला असावा.

'अश्या ओव्हर रिऍक्शन काय देतेयस?पटकन पातेलं आण.'
आतापर्यंत हा साप नक्की किती साईझ चा, कोणता, काळा की गोरा हे दोघांपैकी कोणीही विचारलं आणि सांगितलं नव्हतं.त्यामुळे वेगवेगळ्या आकाराची पाच पातेली घेऊन आले.
'हे काय?सापाला नैवेद्याचा स्वयंपाक नाही करायचाय.आणि भांडी किती छोटी आणलीस?चादर घेऊन ये.'
'अरे, साप किती मोठा आहे?कोणता आहे?पट्टे आहेत का? खोलीच्या बाहेर ये, गमबूट घाल.लांब हो.आधी फोटो व्हिडीओ काढू.साप चावला तर कोणता आहे सांगावं लागतं डॉक्टरांना.'
'हे घ्या.शुभ बोल नाऱ्या म्हटलं की मांडवाला आग लागली म्हणालीच पाहिजे बाई.द सिक्रेट वाच.आपण जे बोलतो ते मॅनीफेस्ट होतं. काशीस जावे नित्य वदावे.शुभ बोलावे.'(गडी लगेच लीडरशिप पेप टॉक द्यायला लागला.)
असे टिपिकल प्रेमळ संवाद झाल्यावर चादर आणली.
'बरोबर मी घेतो अंगावर तीच आणलीस ना चादर?ती गॅलरी च्या दारात पाल ब्लॉक करायला लावलेली जुनी फाटकी आण'
'इथे जीवावर बेतलंय पण चादरीचा मोह सुटत नाही.घ्या एकदाचे जुनी चादर.'

इतकी कचकच ऐकून वैतागून तो साप एका जुन्या लाकडी साईड टेबल सदृश रिकाम्या चौकोनात घुसला.आता आम्ही चादर बाजूला ठेवून तो चौकोन बंद करायला लाकूड शोधू लागलो.अगदी हुबेहूब झाकण म्हणून जोडी जुळेल असा चौकोन मिळाला पण ते साईड टेबल लांबी रुंदी वेगळी 1 सेंटीमीटर बाहेर आलेलं, त्यामुळे ते बंदच होणार नव्हतं.सापालाच दया आली आणि तो आम्हाला घाबरवून वर्क टेबलखाली नीट दिसेल अश्या जागी गेला.
'माझा कॉल आहे 8.30 ला.याला बाहेर काढायला हवं.'
'इथे रोम जळतंय.तुम्ही मीटिंग चं फिडल वाजवत बसा.'
त्या सापाला टेबलाखाली फळ्या रचून एका मर्यादेत ठेवून घरच्या छोट्या मेंबरला खुर्चीवर पाय वर करून खोलीच्या दुसऱ्या टोकाला लक्ष ठेवायला बसवून सर्पमित्र शोधायला गेले.

तोवर बाहेर सिक्युरिटी ला विचारलं.तो शूर गडी. मोठे मोठे बेडूक हाताने धरून बाहेर काढणारा.'अभी मैने साप पकडना बंद कर दिया है' म्हणाला.सर्पमित्र फोन नंबर घेतला होता तो 2 वर्षांपूर्वीचा होता.त्याला विचारलं अजून साप पकडता का?तर त्याने घराजवळ असलेल्या एकाचा नंबर दिला.
अगदी 5 मिनिटात रिक्षाने हे सर्पमित्र येऊन अगदी जाता जाता ओळखीच्या नातेवाईकाकडून लाडूचा डबा कलेक्ट करून पुढे निघून जावं तसं सापाला लहान पाणी बाटलीत घालून घेऊन गेले.वर 'घाबरू नका.साधा बिनविषारी कवड्या साप आहे.भिंतीवर चढता येणारा एकमेव साप.कधी दार उघडं राहून आत आला असेल.खिडक्या तुम्ही चांगल्या बंद केल्या आहेत.तिथून नाही आला.' सांगून गेले.
(भिंती आणि छत चढणारा तो महागुरू साप.आणि आम्ही याला लाकूड फळ्या,चादर घडी टाकून थांबवत होतो.अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हेच.)
'पण यापुढे येणार नाही म्हणून काय करावं लागेल?'
'पॅनिक होऊ नका हो.आला की मला बोलवा.साप मारू नका.तुमच्या सोसायटीत मी घोणस आणि नाग पकडलेले आहेत.परवा एका नागाला cpr पण दिला मी.'
(इथे मला बरेच प्रश्न पडले.असेल बुवा.नागाला चेस्ट मसाज दिला असेल.बहुतेक साप लोकांना ओठ नसल्याने माऊथ टू माऊथ दिला नसावा.)
(हा बघा कवड्या महाराजांचा व्हिडिओ.व्हिडिओ बघा.टेबलखालची धूळ बघू नका.तिथे काहीतरी होतं त्याच्या मागची धूळ आहे ती.या चॅनल वर काहीही अपडेट येत नाहीत.त्यामुळे लाईक सबस्क्राईब शेअर करू नका.केलं तर दात पाडेन.)
https://youtube.com/shorts/XdZkqkVjF8g?si=JqmSt20X6yD3Mk7D

असंच एक छान देखणं मांजर आमच्याकडे यायला लागलं. आम्ही त्याचं नाव अर्थशास्त्र ठेवलं.अर्थशास्त्र का, याला काही अर्थ नाही.त्यावेळी आमच्याकडे घरातला एक मेंबर अहोरात्र एका ca चा शेअर्स चा चॅनल बघायचा.त्याचा सुप्त परिणाम असेल.अर्थशास्त्र आलं, आता आजूबाजूला पाली, कोळी कमी होतील अशी आशा होती.म्हणून आम्ही तिला दूध द्यायला लागलो.एक भुरा बोका तिला भेटायला पण यायला लागला. पण ही मांजर अशी शिष्ठ की दूध आणि पोळी दिली तर नुसतं दूध शोषून पोळीचे तुकडे तसेच ठेवून निघून जायची.मारी बिस्कीट ला तोंड लावून नाक उडवून नको म्हणून निघून जायची.शिवाय शी करायला मात्र हक्काने यायची.(ती मागच्या वेळी शी करणारी कुत्री मांजर ती ही नव्हे.ही वेगळी.तिची सवय मोडली.आता ही नवी.)परत एकदा फिनेल, नीम फिनेल असे लेप टाईल्स ना चालू झाले.मग अर्थशास्त्र मॅटरनिटी प्लॅनिंग साठी आमच्या वॉशिंग मशीन मागे जागा शोधायला लागली.तेव्हा मात्र आम्ही दूध देणं बंद केलं आणि तिला हाकलून द्यायला लागलो.हल्ली मांजरी काहीही खात नाहीत.मांजरी उभ्या आणि शेजारी वरून पाल फिरत असते.उंदीर रात्री यायचे तसे येतात.मांजरांना कोणीतरी हे समजावून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या मूळ कि परफॉर्मन्स इंडिकेटर्स नुसार त्यांनी उंदीर आणि हे सर्व प्राणी अधून मधून खाणं अपेक्षित आहे.

या सर्व घोळात आमच्या घरी एक घूस यायला लागली.कोकोपीट,भाज्या देठ, कंपोस्ट कल्चर टाकलेल्या भरलेल्या प्लास्टिक कुंड्या उलट्या पाडणे, माती खणून ठेवणे असे भीतीदायक उद्योग चालू झाले.शिवाय उंदीर,घूस,बेडूक नामक बुफे डिनर खायला धामण नामक खादाड प्राणी येण्याची शक्यता वाढते.उंदराच्या वड्या आणून त्या काजू कतलीच्या तुकड्यावर चिकटवून इकडे तिकडे टाकून ठेवणे हा नवा उद्योग झाला.तुकडे गेलेले होते.पण घूस येत जात असल्याचे पुरावे पण दिसणं बंद झालं नव्हतं.घुशीने खणलेले खड्डे मी रोज नव्या दमाने बुजवून किंवा त्यात रोपं लावून तिचा पोपट करतेय. घूस तिकडे तिच्या व्हॉटसप वर 'एक रंगीत कपडे घातलेला राक्षस येऊन माझं बांधलेलं घर पाडून जातो' अश्या भावनिक पोस्ट टाकत असेल.कालच्या काजू कतली चे तुकडे आणि वरच्या वड्या गायब आहेत.आणि आम्ही 'उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर जाऊन' ची वाट बघतो आहे.

| समाप्त |

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठेतरी गुप्तधन असेल, ते सांगायला साप वारंवार येत असेल.
त्याच्याशी बोलून बघा. पुंगीची भाषा शिकून घ्या.

हेहे Happy
विनोदी आहे खरं. पण आम्ही सिरीयसली घेऊन घरातले एन्ट्री पॉईंट्स शोधतोय.

अनु , अस्थानी झाला विनोद. सॉरी त्याबद्दल.

या धाग्यावर आधी लिहीले होतं तसं घुशींचा बंदोबस्त एका गारुड्याने केला होता. अर्थात हे सर्व उद्योग वडील बघायचे. मला वेळ नसायचा, त्यांना उत्साह होता. त्यामुळं गारूड्याने घुशींना खायला काय दिलं हे सांगता येणार नाही. सापांचा बंदोबस्त आजूबाजूची बाग काढून फरशी केल्यानंतर झाला. जिना बाहेरून काढला होता, त्याला कामचलाऊ छत केलं होतं. मग त्या जिन्याला पक्के बांधकाम करून आत घ्यावं लागलं. वर मोठी टेरेस होती. ती ही सील केली. कारण धामन भिंत चढून छतामार्गे प्रवेश करते. नऊ फूटाची धामन घरात चिमणीची पिल्लं खायला आली होती. त्यामुळं नंतर पक्षी घरटी बांधणार नाही हा बंदोबस्त करावा लागला.

आता वडील पण नाहीत. नाहीतर त्यांनी सर्पमित्र बोलावून घरात पाणी टाकत बरंच काय काय केलं होतं ते विचारता आलं असतं. पाठीमागे एक बाल्कनी होती. ती ही बंद केली. आता घराचा किल्ला झाला आहे. पण साप, उंदीर, घुशी येत नाहीत. फरशीमुळं आता ईडलिंब, चिकू, पपई, गुलाब, मोगरा, वांगी. आंबा हे सर्व तोडावं लागल्याचं दु:खं आहे.

अरे वा.बरीच माहिती मिळाली.
आम्ही इतकं काही बहुधा करणार नाही.घरातली काही अडगळ साफ करू आणि जिथे गॅप दिसतील तिथे बोळे टाकून सील करू.

बापरे अनु

घोणस तर डेंजर प्रकार असतो.

गिरीपुष्प नामक झाड आहे ( उंदीर मारी असेही म्हणतात )त्याच्या फुलांच्या वासाने सरपटणारे प्राणी आणि उंदीर देखील येत नाहीत.
त्याचा कुणी स्प्रे बनवला असेल तर माहीत नाही.
गावाजवळच्या टेकड्यावर /डोंगरावर हे फुलले की गावात सापांचा वावर वाढतो.

काही लोकं थिमेट स्प्रे करतात.
पण एकतर ते शहरात मिळत नाही आणि विषारी प्रकार आहे.
सध्या तरी सापाला येण्याचे , लपण्याचे रस्ते बंद करणे आणि काळजी घेणे हातात आहे ते करताय तुम्ही.

आता तो बिनविषारी साप काही आदिवासी सारखा जीभ काढून ह्या ह्या ह्या नाचत कुकर च्या परिघात फिरलाय का?... ... हसून मेले.बाकी इवल्याशा सापाच्या पिल्लीसाठी तो कुकर वाया नै घालवायचा.

कोथिंबिरीचा डबा आणि कुकर
>>>> ओशन्स सीरिजमधल्या पुढच्या पिक्चरमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तुझं नाव दिसण्याची दाट शक्यता वाटतेय मला. आता एकच उपाय - सगळ्या दारांबाहेर अमरीश पुरीचे नगिनामधले मोठ्ठे मोठ्ठे कटआऊट्स लाव आणि लोक सकाळी वेंकटेश सुप्रभातम किंवा गायत्री मंत्र लावतात तसं पुंगीचं म्युझिक लावून ठेव.

ऑन अ सिरिअस नोट, सगळ्या दारांना गुळगुळीत उंबरठे आणि खिडक्यांना तसेच कट्टे करता येतील का?

महाग पडेल गं खूप Happy
त्यापेक्षा आधी सर्व होल पॉईंट सील करणं सोपं पडेल.

घर जमिनीवर आहे.>> उगाच म्हणतात, माणसाने जमिनीवर रहावे. (फालतु विनोद. पण वाया नव्हता घालवायचा.)

त्याच्यावर जुना कोथिंबीर ठेवायचा डबा होता ना छिद्र वाला तो ठेवला.(तेवढंच होतं ना ओट्यावर.आणि फार शोधाशोध करायला वेळ नव्हता.तो कुठे खाली गेला असता तर अजून जीवाला घोर.मग पटकन डबा ठेवला.डबा हलकाच होता, तो शेपूट बाहेर काढत होता म्हणून कुकर ठेवला^^^

तुला या वर्षीचे वीरचक्र घोषित केलेच पाहिजे.
कमीतकमी ते २६ जानेवारी la शूर वीर बालकांची हत्तीवरून मिरवणूक काढतात त्यात तरी तुला स्थान दिले पाहिजे..

हेहे
ते एकदमच बेबी होतं आणि गुळगुळीत फरशीवर हलत नव्हतं.त्यामुळे हिंमत झाली.नाहीतर नसल्या दम्याचा अटॅक आला असता बघून.

इथे बिनधास्त जोक करा मंडळी Happy मुळात सापावर कोथिंबीर डबा किंवा कुकर ठेवावा लागला हेच विनोदी आणि पथेटिक आहे.त्याला जगात ही भांडी काय आहेत कळलं असतं तर निव्वळ शरमेने मेला असता.

माझ्या आईने एकदा परात ठेवली होती नागावर . आम्ही बहिणी शेजारी पाजारी आवतन द्यायला गेलो मग.
नाग आईच्या परातीला नं घाबरता बाहेर पडला.
आम्ही चार लोकं घेऊन येईपर्यंत आईने एकटीनेच काठीने बडवला त्याला.

आम्ही चार लोकं घेऊन येईपर्यंत आईने एकटीनेच काठीने बडवला त्याला.
>>>
परात परत धुवावी लागेल या वैतागाने नागाला बडवल्याची शक्यता जास्त वाटतेय मला.

माझी आजी जिवंत झुरळ मुठीत पकडून घराबाहेर नेऊन टाकायची. एकदा झुरळ म्हणून ज्याला पकडलं तो विंचू होता हे खाली टाकल्यावर समजलं. तो ही बावचळला होता बहुतेक कारण चावला नाही.

बाबो.नागावर परात आणि हातात विंचू.डेरिंग वाल्या बाया.
माझया डोक्यात उगीचच आलं की फुलपाखरू पकडायला ती जाळी असते काठीवाली ती आणून ठेवावी.न करो पुढच्या वेळी परत आला तर अडकवायला आणि व्हिडिओ काढायला सोपे पडेल.कुकर खालून व्हिडिओ निघत नाही.(किंवा एखादे आत स्पाय कॅम बसवलेले भांडे.रिमोट ने शूटिंग करता येईल.) प्रत्येक समस्या ही एका नव्या ऑनलाईन खरेदीची संधी.

अनु, तू साप घरात ठेवुन क्लास ला गेलीस इथेच मी तुला वीर पुरस्कार देऊन टाकला>>>>>>>>>>>>सहमत

अग्गं परत? कुकर, कोथिंबीर डबा सगळंच हिलेरियस आहे. पण साप येणं नाही... कर बाई काही बंदोबस्त कायमचा.

अनु.... Lol Rofl कुकर काय अगं? Btw मी सापवाला कुकर (त्याच्याइतक्याच) जड मनाने टाकून दिला असता. कितीही धुतला तरी त्यामध्ये काही काळ सापाचे वास्तव्य होते हे विसरता येणे शक्य नाही.

फुलपाखराची जाळी कशाला आणि? छान तो केक वगैरेवर ठेवतात तो काचेचा cloche आण. जडही असतो तो बराच.

ठेवतात तो काचेचा cloche आण. जडही असतो तो बराच. >>> आणि मग शूटिंगही करता येईल Lol

अनु, तू साप घरात ठेवुन क्लास ला गेलीस इथेच मी तुला वीर पुरस्कार देऊन टाकला>>> होना! मी ही पुन्हा पुन्हा वाचलं. घरी दृश्य सर्प असताना गेलीस कशी Uhoh
काळजी घ्या & एंट्र्या ब्लॉक करा फायर वॉल सेट करा.

अनु, तू साप घरात ठेवुन क्लास ला गेलीस इथेच मी तुला वीर पुरस्कार देऊन टाकला>>>
तर काय? सर्वात महत्वाचं म्हणजे साप झाकताना घरात नसलेले मेम्बर आपण घरी नसताना घरी पोहोचण्याची शक्यता अफाट असते. आणि हेच मेम्बर नको तेव्हा कुतूहलाने किंवा नसलेला कामाचा उरक आणून नेमका कुकर उचलून ठेवायला जातील. वरून आपल्याला फोन करून झापतील की कुकरखाली साप झाकून ठेवल्यावर मला सांगायचं ना.

भुजंगप्रवण घरात एक सर्पपात्र नेहमी ठेवावं. >>> त्यापेक्षा घराबाहेर बोर्ड लावावा 'अनधिकृत प्रवेशास बंदी - नियमावरून. घुसखोरांना कुकरमध्ये बंदी बनवून चित्रीकरण केले जाईल'

अनु, धाडसी आहेस खरी! दंडवत तुला!

बाकी सगळ्याच पोस्ट्स हहपुवा आहेत! आणि मला काय जातंय इथे बसून हहपुवा म्हणायला... घरात साप हा प्रकारच डेंजर असतो. स्वानुभव.
२ महिन्यांपूर्वी आमच्या बागेत कवडेबुवा येऊन गेले. सर्पमित्र येऊन त्या पिल्लू कवडेबुवांना घेऊन गेले. फोटो देता येत नाहिये बहुतेक ५०३ कुलुप सुटलं तरी. जमलं तर देते.

हेहे.धमाल आहात सगळे. केक चं महाग भांडं काय Happy
हो खरं दुसरं कोणी यायचा धोका असतोच घरात किल्लीने. पण एक मेम्बर गावाबाहेर आणि दुसरा माझ्याबरोबर क्लासहून परत येणार होता.आणि त्यांना अश्या उपड्या भांड्यांखाली पाल किंवा बेडूक किंवा झुरळ असण्याची सवय आहे.कोणीही उचलून बघत नाही.(आणि आम्ही सगळी भांडी बेको ने धुवून साबणाने घासून परत वापरतो.नवा कपडा->घरात घालायचा कपडा->मेंदी लावताना घालायचा कपडा->फडकं->गळका नळ सील करायचे बोळे->तेल पुसायचं फडकं->नव्या वर्षी शेकोटीत जळण->कंपोस्ट बिन मध्ये राख या लाईफ सायकल वाले आम्ही.एक क्षुद्र साप किंवा बेडूक आला म्हणून भांडे फेकावे?कदापि नाही.

Pages