पुस्तक परिचय : The 1982-83 Bombay Textile Strike (Hub Van Wersch)

Submitted by ललिता-प्रीति on 5 October, 2026 - 07:09

The 1982-83 Bombay Textile Strike And the unmaking of a Labourers' City (Hub Van Wersch)

Social Anthropologist लेखकाने मुंबईत गिरणी कामगारांसोबत राहून, त्यांच्या मुलाखती घेऊन, तेव्हाची वर्तमानपत्रं पालथी घालून, तत्कालीन सामाजिक, राजकीय नेत्यांशी बोलून तपशीलांचं, माहितीचं वस्तुनिष्ठ ॲनालिसिस करून हे पुस्तक लिहिलं आहे.
पुस्तक दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिला भाग - The Story Of The Strike. यातलं पहिलं प्रकरण Significance of the Textile Industry जबरदस्त आहे. भारतातला आणि खासकरून मुंबईतला कापड गिरण्यांचा इतिहास, सामाजिक-व्यापारी महत्त्व, इथली सामाजिक वीण घडवण्यामागे या उद्योगाचा असणारा सहभाग, कापड उद्योग आणि तंत्रज्ञान, कामगार संघटना, जुने संप/संपांचे प्रयत्न, असं बरंच...बरंच...बरंच...काय-काय त्यात वाचायला मिळतं.
वाचताना कुठे कुठे पेशन्सशी हाणामारी करावी लागते. पण घडलं हे असं असं घडलं, हा लेखनाचा सूर पाहून आपण पुढे वाचत जातो. हे रिसर्च पद्धतीचं लेखन आहे याची सतत आठवण ठेवली तर जरा सोपं जातं.
पुढची दोन प्रकरणं (The Strike, Strike Strategies) प्रत्यक्ष संपाबद्दल बोलतात. पॉप्युलर मीडियामध्ये संपाचं, डॉ. दत्ता सामंतांचं जे जे वर्णन केलं गेलं ते किती दिशाभूल करणारं होतं ते इथे साधार दाखवून दिलं आहे. गिरणी कामगार आणि दत्ता सामंत ही युती घडली कशी, यामागचेही सविस्तर तपशील दिले आहेत. ते इंटरेस्टिंग आहेत. कुठलीही एक बाजू न घेता, चूक/बरोबरचा न्यायनिवाडा न करता, पण सौम्य भाषेत खणखणीत प्रतिपादन, ही पुस्तकातली सतत जाणवणारी गोष्ट. पहिल्या विभागातलं चौथं प्रकरण आहे The Aftermath. या प्रकरणात ललित वळणाचं लेखन करण्याला पुरेपूर वाव होता; पण लेखकाने आपला वस्तुनिष्ठ बाणा कुठेही सोडलेला नाही.

पहिला विभाग संपतो तेव्हा वाचक म्हणून existential प्रश्न पडू शकतात. त्यांनी रिसर्च केला वगैरे ठीके, आपण ते सगळं वाचायलाच हवं असं कुठेय, असं स्वतःलाच म्हणावंसं वाटतं. पण त्याचवेळी पुस्तकाचा दुसरा भाग ३३३ व्या पानाच्या आडून ‘कुकुक्क’ करत असतो.

दुसर्‍या भागात ५ कामगारांच्या केस स्टडीज आहेत. हे पाचही कामगार संपाची प्रत्यक्ष झळ बसलेले, काम सुटलेले, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतले आहेत. लेखकाने त्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतीचे प्रश्न एका परिशिष्टात दिले आहेत. मी आधी जाऊन ते प्रश्न वाचले. आणि existential शंका दूर सारून दुसरा भाग वाचायला सुरुवात केली. त्या पाच केस स्टडीज, त्यांचं ॲनालिसिस सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे.

पुस्तकात जागोजागी भरपूर आकडेवारी, तक्ते, टक्केवारी इ. आहेत. नुसतं त्या तक्त्यांची टायटल्स, कॉलम हेडिंग्ज, summaries वाचणं हा सुद्धा उत्तम टाइमपास होऊ शकतो. त्या तक्त्यांमधून, टेबल्समधून इ-त-के बारीकसारीक तपशील, तथ्यं समजतात, की ज्याचं नाव ते. लेखकाकडे तेव्हा जी जी माहिती, आकडे जमा झाले असतील त्यातून त्याने कसकशी छाननी केली असेल, या विचाराने धाप लागते.
केवळ या पाच कामगारांच्या मुलाखतींपुरतंच नव्हे, तर एकूण या रिसर्चसाठी लेखक मुंबईतल्या चाळींत, कामगारांसहित, कामगारांच्या परिस्थितीत वर्षभर राहिला. हे समजल्यावर मला त्या माणसाला दंडवत घालावासा वाटला.

प्रत्येक प्रकरणाला शेवटी भ-र-पू-र footnotes आहेत. सुरुवातीला काही पानं मी त्या footnotes इग्नोर केल्या होत्या. पण ते चुकीचं होतं, हे लक्षात आलं. मग इमानेइतबारे superscript चा नवीन आकडा दिसला की प्रकरणाच्या शेवटी जाऊन ती-ती तळटीप वाचायला सुरुवात केली. वाचताना त्याचा उपयोग होतोय हे दिसलंच लगेच.
पुस्तकात तीन बुकमार्क्स सतत ठेवावे लागले- प्रत्यक्ष पान नंबर, त्या प्रकरणाच्या तळटिपांचा पान नंबर आणि शेवटच्या परिशिष्टांचा पान नंबर. कारण हे सर्व पॅरलली वाचावं लागतं.
अशा तपशीलांमध्ये, आकडेवारीमध्ये, तळटिपांमध्ये मुख्य विषय हरवला आहे का? तर, अजिबात नाही. सोशल रिसर्च कसा असतो, कसा मांडायला हवा, आणि तो कसा consume करायला हवा, हे सगळं या पुस्तकामुळे समजतं.

गिरणी कामगारांच्या संपाकडे इतक्या अभ्यासू दृष्टीने इतर कुणीच पाहिलेलं नाही असं पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये आणि प्रस्तावनेतही म्हटलं आहे. एक परदेशी संशोधक मुंबईत येऊन, गिरणी कामगारांसोबत त्यांच्या चाळीत, त्यांच्या खोल्यांमध्ये राहून हे का करतो?
लेखकाचा मुंबईशी जुना संबंध आहे. त्याची पत्नी मराठी आहे. संप सुरू झाला तेव्हा तो आपल्या एका वेगळ्या संशोधनप्रकल्पासाठी मुंबईत आला होता. ’संपाची व्याप्तीच अशी होती, की मी त्यापासून दूर राहू शकलो नाही’ असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्याने या संपाची तुलना इंग्लंडमधल्या खाणकामगारांच्या संपाशी केली आहे. त्या संपाची व्याप्ती तुलनेने लहान होती. लेखक म्हणतो, ’मुंबईतल्या संपाच्या व्याप्तीइतका संप तिकडे झाला असता तर आजवर त्यावर आधारित अनेक अभ्यास, रिसर्च प्रोजेक्ट्स आले असते.’
आणि आपल्याकडे त्याची पूर्ण वानवा आहे.
या पुस्तकाबद्दल ५-६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा लोकसत्ता-बुकमार्कमध्ये वाचलं होतं. तेव्हापासून पुस्तक वाचनयादीत होतं.

मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप हा विषय मला कायमच खूप जवळचा वाटत आलेला आहे. घरातलं/परिचयातलं कुणी त्या संपात होतं का? माहितीतल्या कुणाला त्या संपाची प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष झळ बसली होती का? तर, नाही.
तरीही.
अर्धवट कळत्या वयात संपाबद्दलच्या बातम्यांच्या पेपरातल्या फक्त हेडलाइन्स वाचल्या गेल्या असतील/नसतील. तेव्हा दूरदर्शनवर ’कामगार विश्व’ कार्यक्रमात अधूनमधून गिरणी कामगारांच्या समस्यांवर नाटुकल्या दाखवल्या जायच्या, त्या पाहिल्या असतील. संपाचा social impact इ. समजण्याचंही तेव्हा वय नव्हतं. तरीही २०-२५ वर्षांनी एकदा मुंबईत फिनीक्स मिल कम्पाउंडमधल्या मॉलमध्ये गेले तेव्हा आधी त्या मॉलचा, खरं म्हणजे मॉल जिथे उभा आहे त्या जागेचा, भूतकाळच नजरेसमोर आला. कसं असेल तेव्हा इथलं चित्र, इथलं वातावरण, हा विचार डोक्यात आला. लालबाग-परळ भागात क्वचित कधी जाणं झालं तरी कायम हेच होतं. प्रस्तुत पुस्तकाचं उपशीर्षक- the unmaking of a Labourer's City- तिथे समोर दृश्यरूपात उलगडलेलं असतं. त्या रुपाकडे बघायचं की नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न. त्यात चूक/बरोबर काही नाही. पण माझ्या पोटात दरवेळी तुटतं.
असं पोटात तुटणं, हेच हे पुस्तक वाचण्यामागचं माझं एकमेव कारण होतं. नाहीतर या ५००+ पानी ठोकळ्याकडे कदाचित लक्षही गेलं नसतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!
मी 'अर्धी मुंबई' पुस्तकात वाचल्याचं आठवतं या संपाबद्दल (आणि जर बरोबर आठवत असेल, तर या संपात बेरोजगार झालेल्या कामगारांची मुलं नंतर ९० च्या दशकात अंडरवर्ल्डमधे दिसायला लागली असा उल्लेख आहे)

गिरणी कामगारांचा संप आणि मुंबईतील कापड गिरण्या उद्योग हे दोन जोडलेले प्रश्न आहेत. या उद्योगात खूप मोठ्या प्रमाणात कमी उत्पन्न गटातील कामगार होते आणि ते मुंबईतच होते. गिरण्या बंद पडू लागल्या तसे कामगार बेकार झाले आणि त्यांचेकडे दुसरे कोणते कौशल्य नव्हते. तसेच बरेच पन्नास+ वयोगटातील असावेत.
पुस्तक लिहून त्यांचे प्रश्न किंवा कोणत्या युनिअनमुळे, नेत्यांमुळे संप झाला, परिणाम काय झाले यावर लेखकाने आकडेवारी मांडली, शोधली तर चांगलीच गोष्ट आहे.
कामगारापुढे " माझी गिरणी बंद होणार आहे" हा प्रश्न होताच शिवाय अशा सर्वच गिरण्या बंद होणार तर मी जाणार कुठे हा मोठा प्रश्न होता. असो.
पुस्तक एक नोंद ठेवा झाला आहे.

माझ्या कळत्या वयात हा संप झाला होता. दत्ता सामंत कायम चर्चेत असायचे. त्यांची घणाघाती भाषणे, गिरणी कामगारांचे मोठमोठे मोर्चे आठवतात. तेव्हापासून मुंबईचं चित्र बदलायला लागलं. मोठ्या मोठ्या कंपन्या बंद झाल्या किंवा स्थलांतरित झाल्या. ज्या लोकाना निवृत्तीपर्यंत आपण इथेच काम करणार आहोत, ही खात्री होती, ते बिचारे अचानक रस्त्यावर आले. डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांनी गिरणी संपाच्या सामाजिक परिणामांवर काही संशोधन केलं होतं, असं कुठेतरी वाचलं होतं.

कल्याणच्या आसपासच्या नॅशनल रेऑन, सेंच्युरी रेऑन, प्रीमियर ऑटोमोबाईल, कळव्याची मुकुंद आयर्न आठवतात (चूक भूल देणे घेणे)
पुस्तकाबद्दल आणि पुस्तक सावकाशीने वाचते.

आवडले !

’मुंबईतल्या संपाच्या व्याप्तीइतका संप तिकडे झाला असता तर आजवर त्यावर आधारित अनेक अभ्यास, रिसर्च प्रोजेक्ट्स आले असते.’
+१ इतक्या प्रचंड संख्येने लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष झळ बसलेल्या या घटनेवर म्हणावे तसे डोक्युमेंटेशन झाले नाही असे वाटते, पुस्तक मिळ्वायचा प्रयत्न करेन.

गिरणी कामगारांचा संप आणि मुंबईतील कापड गिरण्या उद्योग
हा प्रश्न ह्याचे साहित्य जगातही पडसाद उमटले.
1 अधांतर | हे मराठी नाटक. एका मराठी कुटुंबाची कशी वाताहात होते. संजय नार्वेकर ह्याची मुख्य भूमिका असलेले नाटक.
https://www.youtube.com/watch?v=ECwRnB8n2z4
२ अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यू आता है.
नासिरुद्दीन चा कमाल अभिनय, तसा ह्या संपाचा सरळ संबंध नसेल पण...
https://www.youtube.com/watch?v=NNmww36OROs
३ त्याच वेळी माझ्या ऑफिसात एका बेकार विविंग मास्तरने त्याची कार भाड्याने लावली होती, हाही मराठी ख्रिस्ज्चन. त्याने अनेक गोष्टी ऐकवल्या, हा अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या आणि फुल ऑफ मॅनर्स असलेल्या ड्रायव्हरला घेऊन खूप मुंबई हिंडलो.
सहज आठवले म्हणून लिहिले.

परिचय आवडला.
मी ही फक्त मथळ्यात किंवा नंतर पॉप्युलर कल्चर मध्ये याचे संदर्भ, दत्ता सामंत- त्याचे राजकारण इ. वरवर वाचले आहे. हा लेख वाचल्यावर काय असेल पुस्तकात ही उत्सुकता वाटते आहे. बघतो.

वावे, हो, 'रिबोट' (जी. की. ऐनापुरे) ही कादंबरी गिरणी कामगारांच्या पुढच्या पिढीवर आधारित आहे. हातांना काम नसण्याच्या वैफल्यग्रस्त परिस्थितीत तरुण चुकीच्या मार्गाला कसे लागतात त्याचं सुरुवातीच्या काळातलं चित्रण आहे त्यात. ते पुस्तक वाचूनही मी खूप अस्वस्थ झाले होते. ('रिबोट' - कॅरममधल्या 'रिबाउंड'चं बम्बैय्या मराठी.)

केकु,
हे पुस्तक वाचताना अधांतर नाटक आठवतंच.

जयंत पवारांचा 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा कथासंग्रहही त्याच वैफल्यावर बोलतो. 'फिनिक्स'चा संदर्भ फिनिक्स मिलशीच आहे.

मला तर सत्या सिनेमा बघतानाही हा संप पार्श्वभूमीवर दिसत होता.

त्यांचेकडे दुसरे कोणते कौशल्य नव्हते. तसेच बरेच पन्नास+ वयोगटातील असावेत.
>>>
Srd, असं सरसकट म्हणता येणार नाही. सर्व वयोगटातले कामगार होते. काहींकडे इतर काही कौशल्यं होती. काहीजण पुन्हा गावी जाऊन शेती करायला लागले. काहींनी पॉवरलूम्सवर वेळीच काम करायला सुरुवात केली. तेव्हा ते व्यवसाय भिवंडीला शिफ्ट झाले.
यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी लेखकाने असंख्य तक्ते, आकडेवारी आणि त्यांचं अ‍ॅनालिसिस दिलं आहे. लेखक अनेक कामगारांच्या गावीही जाऊन आला.

  • मुंबईपासून त्या गावांचं अंतर,
  • मुंबईतल्या घडामोडी वेळच्यावेळी गावच्या कामगारांपर्यंत पोहचत होत्या का,
  • त्या पोहचण्यासाठी लागणारा वेगवेगळा वेळ,
  • त्यावर कामगारांची मनःस्थिती अवलंबून असणं, का,
  • त्याचे मुंबईतल्या संपाबद्दलच्या दैनंदिन घडामोडींवर काय काय परिणाम झाले,
  • ते कामगार मुंबईतच राहिले असते तर काय काय झालं असतं
  • असं बरंच बरंच काही!!

    आणि असं संपाच्या प्रत्येक पैलूच्या बाबतीत खोलात जाऊन अ‍ॅनालिसिस केलाय.

एक करेक्शन
२ अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यू आता है.
दिलेली लिंक चुकली आहे,
बरोबर लिंक ही आहे,
https://www.youtube.com/watch?v=caV9_8WTUuk
चुकीबद्दल क्षमस्व.

उत्तम परिचय. जबरदस्त वाटतं आहे पुस्तक. पण वाचण्याची हिंमत होणार नाही.
माझ्या एका आत्याच्या कुटुंबाला या संपाची झळ पोहोचली होती. त्यांना मूल नव्हतं, पण मतिमंद दिराची जबाबदारी होती. तिच्या शिक्षिकेच्या नोकरीमुळे निभावलं. अधांतर नाटक पाहताना सुद्धा सुन्न झाले होते.

फार छान परिचय.
जबरदस्त लिहिली आहे माहिती.
पण हे रिसर्च पद्धतीचे लिखाण आहे म्हणून कितपत वाचेन माहीत नाही.
या संपाबद्दल बरंच ऐकलं आहे पण ह्यात बरीच माहिती दिसतेय.
अधांतर, लालबाग परळ पाहून सुन्न व्हायला झाले होते