भस्मबीज - भाग १८
पूर्वभाग
अभिजितच्या हातात भस्मशैल सुरक्षित आल्यानंतर देवप्पा स्पष्ट करतो की ते अजून जागृत झालेले नसून त्यासाठी अभिजितची दीक्षा पूर्ण होणे आवश्यक आहे. नेहाच्या स्वप्नवत अनुभवातून लीलाचा आत्मा भस्मबीजाच्या बंधनात अडकलेला असल्याचे समोर येते आणि इतर अकरा बळींच्या आत्म्यांच्या मुक्तीचा प्रश्नही निर्माण होतो. त्यानंतर देवप्पा अभिजितची कुळशपथ विधीपूर्वक पूर्ण करून त्याला या संघर्षाची जबाबदारी आणि गरज पडल्यास प्राण देण्याची शपथ देतो. रक्त अर्पण केल्यानंतर अभिजितला आपल्या शरीरात नवं स्पंदन जाणवतं आणि तो स्वतःला आतून पूर्ण झाल्यासारखा अनुभवतो; मात्र त्याच क्षणी गरुडाचा भेदक चीत्कार ऐकून देवप्पाचा चेहरा अचानक गंभीर होतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १९ - आत्माबंधन
गरुडाचा तो चीत्कार ऐकताच देवप्पाचा चेहरा गोठला. त्याने हातातली अग्नी-सामग्री तशीच खाली टाकली आणि आकाशाकडे बघितलं.
"काय झालं?" अभिजितने विचारलं.
देवप्पाने डोळे मिटले, गरुडाच्या नजरेतून जे दिसत होतं ते बघायचा प्रयत्न केला आणि "कवच!" असे जोरात ओरडत दाराकडे धावत गेला.
सगळे त्याच्यामागे धावले. त्या वीस पावलांतही देवप्पाला असंख्य वर्षं गेल्यासारखी वाटली. घराचं दार उघडंच होतं. देवप्पा शपथ-विधीसाठी अंगणात गेला, तेव्हा त्याने ते नीट लावलं होतं, याची त्याला खात्री होती. देवघरात, जिथे देवप्पाने ते भस्मशैल एका तांब्याच्या पेटीत, संरक्षक मंत्रांनी संरक्षित करून ठेवलं होतं; तिथे आता काळा धूर दाटलेला होता.
एक हांडी जोगी त्या पेटीभोवती गुडघ्यावर बसून, हातात एक विचित्र, काळ्या धातूचा खिळा घेऊन, पेटीभोवतीच्या संरक्षक मंत्रांशी झुंजत त्या पेटीच्या कुलुपात खुपसायचा प्रयत्न करत होता , त्याच्या हातावर लाल, भाजल्यासारखे व्रण उमटत होते, तरीही तो थांबत नव्हता.
"थांब!" देवप्पा आत घुसत गरजला.
जोगी दचकून वळला, पण त्याचा हात त्या खिळ्यावरून हटला नाही. "उशीर झालाय, थेरड्या," तो गुरगुरला, "बाबांनी सांगितलंय; जर हे कवच हस्तगत करता आलं नाही, तर ते नष्ट करा."
देवप्पाने हातातली काठी उंचावली, पण अभिजित त्याच्याही पुढे झेपावला. त्याच्या हालचालीत आता नवी गती होती. "लांब हो त्या कवचापासून" अभिजित धारदार आवाजात म्हणाला.
जोग्याने त्याच्याकडे बघितलं, आणि अभिजीतची रागीट करारी मुद्रा बघून क्षणभर त्याच्या डोळ्यांत भीतीची एक लकेर उमटली पण त्याने तो खिळा पूर्ण ताकदीने त्या कुलुपात खुपसला.
धातूचा कर्कश आवाज झाला. पेटीभोवतीचे संरक्षक मंत्राक्षर एकदम भडकले, लालभडक ठिणग्यांचा एक स्फोट झाला आणि तो जोगी किंचाळत मागे फेकला गेला, त्याच्या हातावर ठिणग्या फोड आले होते.
पेटी अजूनही बंदच होती. सुरक्षित.
अभिजितने त्या जोग्याला जमिनीवर पाडून, त्याच्या गळ्यावर पाय दाबला. "कल्लेश्वरला सांग," तो गुरगुरला, "हे कवच आता फक्त एका माणसाचं ऐकतं आणि तो माणूस आज त्याच्या कुळाशी बांधला गेलाय, कायमचा. आता ते तोडणं तुझ्या बाबांच्याही आवाक्याबाहेर आहे."
जोगी थरथरत उठला, आणि लंगडत, दाराबाहेर पळून गेला.
अभिजितने ती तांब्याची पेटी उघडली, आतलं भस्मशैल तपासलं.
पण त्याच्या मनात एक नवी चिंता रुजली; देवप्पाचं घरही आता सुरक्षित नव्हतं. कल्लेश्वरने आपला पहिला प्रयत्न फसल्यानंतरही, दुसरा धूर्त डाव लगेच खेळला होता.
"देवप्पा," तो म्हणाला, "इथून पुढे तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहील."
देवप्पाने मान हलवली, "हो, अभिजित. आणि म्हणूनच आता जास्त वेळ नाही."
देवप्पा उठून उभा राहिला, खोलीत हळू पावलांनी येरझाऱ्या घालत म्हणाला, "अभिजित, कुळशपथ झाली, हे खरं आणि तो सर्वांत मोठा, सर्वांत महत्त्वाचा टप्पा होता पण इथून पुढे सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आता उरलेले कुळाचार; शस्त्रपूजा घाईत उरकून चालणार नाही. प्रत्येक विधी त्याच्या योग्य वेळी, योग्य पद्धतीने व्हायला हवा. त्याला किती दिवस लागतील, हे मीही आत्ता ठामपणे सांगू शकत नाही."
अभिजितने मान हलवली, ऐकत राहिला.
"आणि हे सगळं पूर्ण झालं, की मग खरी परीक्षा सुरू होईल... एकेचाळीस दिवसांचं मंडल व्रतम."
मामा चमकले. "एकेचाळीस दिवस?"
"हो. " देवप्पाचा आवाज गंभीर झाला.
"काळे किंवा निळे वस्त्र, अनवाणी चालणं, पूर्ण ब्रह्मचर्य, जमिनीवर उशीशिवाय झोपणं, केस-नखं न कापणं; हे व्रत तुझं शरीर आणि मन दोन्ही पूर्णपणे कवचाची शक्ती धारण करण्यासाठी सक्षम बनवेल आणि मग तो उरलेला मंत्र जागृत होईल."
"म्हणजे शपथ झाली, आता उरलेला कुळाचार, मग एकेचाळीस दिवस? आणि जर या एकेचाळीस दिवसांत एखादी चूक झाली, नियम मोडला गेला तर?" अभिजितने विचारलं.
देवप्पाचा चेहरा गंभीर झाला. "तर व्रत अशुद्ध होतं, आणि नव्याने सुरू करावं लागतं…पहिल्या दिवसापासून आणि आपल्याकडे इतका वेळ नाहीये की आपण चुका करत, पुन्हा पुन्हा सुरुवात करत बसू. जूनची ती अंतिम रात्र जवळ येतेय. तू एक दिवसाचा अवधी घे आणि सांग कधीपासून सुरुवात करायची."
************************************************************************************************************************
पडक्या देवळात, त्या रात्री उशिरा, तो जोगी लंगडत, थरथरत परतला. त्याचे हात अजूनही थरथरत होते, त्यावर फोड आले होते आणि त्वचा काळी पडलेली. "बाबा..." तो कल्लेश्वरसमोर गुडघ्यावर कोसळत कसाबसा म्हणाला, "कवच... मला जमलं नाही."
"काय झालं नेमकं?"
जोग्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला; तो देवप्पाचा घरातला संरक्षण-कवच, त्या लालभडक ठिणग्या, आणि शेवटी अभिजितचा तो नवा, धारदार आवाज आणि रागीट अवतार.
कल्लेश्वरने त्याच्याकडे बघितलं, नजरेत तिरस्कार भरला होता. त्याने त्या जोग्याला लाथ मारून बाजूला केलं,"ठीक आहे. थेट हल्ला आता व्यर्थ आहे. मला आता वेगळा मार्ग निवडावा लागेल."
************************************************************************************************************************
यानाच्या घनदाट जंगलात, कल्लेश्वरच्या पडक्या देवळापासूनही आत, घनदाट जंगलात, एका लपलेल्या गुहेत, मल्ली एकटाच गुडघ्यांत डोकं खुपसून, अंधाराशी सरावलेल्या डोळ्यांनी शून्यात बघत बसला होता. त्याच्याभोवती, त्या पिवळसर डोळ्यांच्या राखणदार आकृत्या नेहमीसारख्याच सावध उभ्या होत्या; त्याचं रक्षण करणाऱ्या, की त्याला कैद करणाऱ्या, हे त्याला आताशा नीट कळेनासं झालं होतं.
त्याच्या हातात चंद्रिकेची एक जुनी, विटलेली निळी साडी होती. काळाच्या ओघात तिचा निळा रंग जवळजवळ करडा झाला होता आणि कडांची वीण अनेक ठिकाणी उसवली होती; तरीही त्याने ती साडी इतकी वर्षं जपून ठेवली होती. रात्री झोपताना ती उशाशी ठेवायचा आणि दिवसा एकटाच बसला की नकळत ती छातीशी धरून ठेवायचा. जणू त्या जुन्या कापडाच्या तुकड्यात चंद्रिकेचा स्पर्श अजूनही शिल्लक होता आणि तिच्या आठवणींची उब त्याला आजही त्या साडीमधून जाणवत होती.
“आठवतंय तुला?” तो त्या साडीशी हळुवारपणे बोलू लागला. बोटांनी तिच्या जीर्ण झालेल्या धाग्यांवरून अलगद फिरवत तो म्हणाला, “पहिल्यांदा जेव्हा तू ही साडी नेसली होतीस. तू माझ्यासमोर येऊन म्हणाली होतीस, ‘मल्ली, बघ ना, कशी दिसतेय मी?’ आणि मी निशब्द होऊन फक्त तुझ्याकडे बघत राहिलो होतो. इतका वेळ की शेवटी तू हसत हसत मला चापट मारली होतीस.”
त्याच्या ओठांवर क्षणभर हसू उमटलं. पण पुढच्याच क्षणी ते विरलं आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
“तेहतीस वर्षं झाली, चंद्रिका... तेहतीस वर्षं. मी ही साडी अजूनही जपून ठेवलीय. कितीही वेळा स्वतःला समजावलं, तरी अधूनमधून ती जवळ घेतो आणि त्यात तुझा गंध शोधत बसतो. माहीत आहे मला... आता त्यात तुझ्या शरीराचा गंध उरलेला नाही. पण मनाला कोण समजावणार?”
गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या मनात एक प्रश्न हळूहळू धुक्यासारखा दाटत होता. तो प्रश्न नेमका काय होता, हे त्यालाही स्पष्टपणे सांगता येत नव्हते. कधी तो त्याला मनातून झटकून टाकायचा, तर कधी तोच प्रश्न पुन्हा एखाद्या सावलीसारखा त्याच्यासमोर उभा राहायचा.
बारा वेळा मी हा विधी केला, चंद्रिका. बारा वेळा बाबांच्या डोळ्यांत पाहून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. बारा वेळा ती रात्र संपल्यावर आकाशाकडे पाहिलं आणि स्वतःला विचारलं," आज? आजची रात्र?"
आणि बारा वेळा उत्तर तेच होतं ‘आणखी थोडं थांब, मल्ली. आपण जवळ आलोय.’
त्याने डोळे घट्ट मिटले आणि तो विचार मनातून दूर लोटण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तो हटला नाही. उलट, मनाच्या एखाद्या खोल कप्प्यातून तो आणखी स्पष्ट होत गेला.
त्या आठवणींसोबतच मल्लीच्या मनात आणखी एक आठवण उभी राहिली, जिला तो प्रत्येक विधीनंतर पुन्हा पुन्हा मनाच्या तळाशी गाडून टाकण्याचा प्रयत्न करायचा.
त्या राखेच्या वर्तुळात जागृत होणारी शक्ती हळूहळू आकार घेत असे आणि विधीचा शेवटचा, सर्वांत भयानक टप्पा सुरू होत असे. ती शक्ती त्याच्या देहाचा ताबा घ्यायची; त्याची इच्छा, त्याची संमती याची कुठलीच पर्वा न करता निर्दयपणे त्याला भोगायची आणि प्रत्येक वेळी, ते संपल्यावर, तो त्या राखेत, त्या थंड जमिनीवर विवस्त्र, तुटलेल्या अवस्थेत पडून राहायचा. शरीरावर ओरखडे, एक जळजळणारी वेदना, आणि मनात त्याहूनही खोल जखम.
पहिल्यांदा त्याने आक्रोश केला होता. त्या रात्रीनंतर सलग तीन दिवस त्याने अन्नाला हात लावला नव्हता. स्वतःच्याच शरीराची त्याला किळस वाटत राहिली होती आणि आरशात स्वतःचा चेहराही पाहण्याचं धाडस त्याला होत नव्हतं. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता; आयुष्यभर लोकांनी मला वेगळा म्हणून हिणवलं, झिडकारलं, बलात्काराला सामोरं जावं लागलं आणि अजूनही त्याची त्यातून सुटका झाली नव्हती.
त्या वेळी बाबा त्याच्याजवळ शांतपणे बसले होते. त्यांनी त्याच्या केसांवरून हळुवार हात फिरवला होता आणि अगदी मायेच्या स्वरात म्हटलं होतं, “हे सहन कर, मल्ली. चंद्रिकेसाठी. त्या बदल्यात जे मिळणार आहे, त्यासमोर ही किंमत फार मोठी नाही.”
आणि मल्लीने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता.
कारण त्या काळोख्या दिवसांत बाबांचा तो मायाळू स्पर्श आणि त्यांचा आश्वासक आवाज, एवढंच त्याचं उरलेलं जग होतं. गावाने नाकारलेला, कुटुंबाने झिडकारलेला आणि आता चंद्रिकेलाही गमावलेला मल्ली त्या एका माणसाच्या आधाराला घट्ट धरून राहिला होता. चंद्रिकेला परत मिळवण्याची ती आशा त्याच्यासाठी इतकी मोठी होती की तिच्यासाठी स्वतःला किती वेळा मोडावं लागेल, याचा विचार करण्याचीही त्याच्यात ताकद उरली नव्हती.
"मी हे सगळं भोगलं, चंद्रिका," तो त्या साडीशी हळू आवाजात बोलला, "प्रत्येक वेळी माझं शरीर, माझा मान, माझी इच्छा काहीच माझं उरलं नाही. लोकांनी मला आधीच नाकारलं होतं, आणि मग त्या शक्तीनेही मला फक्त भोगण्यापुरतं जवळ केलं. पण तरीही मी ते सोसलं, कारण तुझ्यासाठी कुठलीच किंमत मला जास्त वाटली नाही. तूच एक होतीस, चंद्रिका, जिने मला कधीच नुसतं 'साधन' म्हणून बघितलं नाही. मला माणूस म्हणून बघितलं."
त्याचे डोळे भरून वाहू लागले, आणि तो ढसाढसा रडू लागला. कित्येक वर्षांत साचलेलं ते दुःख, आज अखेर वाट मोकळी करून घेत होतं. मल्ली, त्या साडीत तोंड खुपसून, त्या रात्री, कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच, स्वतःसाठी रडला.
************************************************************************************************************************
भागवत निवासाच्या ओसरीवर, सगळे एकत्र बसले होते.
"अभिजित," स्वाती म्हणाली, "आता हे स्पष्ट झालंय की तुला आता पुढचे दोन-अडीच महिने इथे यानाला राहावे लागेल. मग आपण पुढे कसं करायचं? ऑफिस, मुलांची शाळा, बाबा-आई..."
अभिजितने दीर्घ श्वास घेतला. "याचा विचार मीही करत होतो. तू मुलांची परीक्षा संपल्यानंतर सुप्याला आईबाबांकडे जा आणि मी इथे यानाला येईन."
स्वातीने मान हलवली.
"आणि ऑफिस?" नेहाने विचारलं, आवाजात एक हलकीशी काळजी. "इतकी मोठी रजा...तुमची नोकरी..."
अभिजित हसला, "नोकरी गेली तर जाऊ दे, नेहा."
सगळे चमकून त्याच्याकडे बघू लागले. "आमची सुप्यात पुरेशी शेतजमीन आहे, आधी मला वाटायचं, नोकरी म्हणजे सगळं काही...पगार, स्टेटस, सुरक्षितता. पण आता... आता ही जबाबदारी त्याहून कितीतरी मोठी आहे.
"आणि बाबांना, आईला काय सांगायचं?" स्वातीने विचारलं.
"खरं सांगता येणार नाही, हे उघड आहे," अभिजित म्हणाला. "सांगू की कर्नाटकात एका महत्त्वाच्या ट्रेनिंगसाठी आलोय कंपनीकडून, बरेच महिने लागणार आहेत. बाबांना एवढं खरं वाटेल, आणि जास्त प्रश्नही विचारणार नाहीत ते."
नेहाने विचारलं, "आणि मी?"
"तुला परत जावं लागेल, नेहा," अभिजित म्हणाला, "तुझं स्वतःचं आयुष्यही आहे."
नेहाचा चेहरा किंचित उतरला, पण तिने मान हलवली. "समजतंय मला. पण फोनवर संपर्कात राहीनच, आणि सुट्टीच्या दिवशी येत राहीन बघायला."
सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर अभिजितने दीर्घ श्वास घेतला, आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर एक खरं, निर्धास्त समाधान उमटलं.
"मग ठरलं तर," तो म्हणाला. "मी देवप्पाला फोन करून हे कळवतो."
************************************************************************************************************************
त्या रात्री, एका तरुण जोग्याने धाडस करून कल्लेश्वरजवळ जाऊन विचारलं.
"बाबा, तेरावी बळी कोण असेल, हे आपल्याला कसं कळणार? आणि तिचा शोध कसा घ्यायचा?"
कल्लेश्वर त्या दगडी चौथऱ्यावर बसून होता, डोळे अर्धवट मिटलेले, त्याच्या ओठांवर एक संथ, आत्मविश्वासी हास्य उमटलं. "शोधायची गरजच नाही, पोरा” जणू ही गोष्ट त्याला फार पूर्वीच माहीत होती. "ती स्वतःच्या पावलांनी इथे चालत येईल."
जोग्याने गोंधळून विचारलं, "स्वतःहून?"
"हो" कल्लेश्वर म्हणाला, "दरवेळी असंच झालंय...बारा वेळा. कुणालाच शोधावं लागलं नाही. त्या स्वतःच, नकळत, या दिशेने ओढल्या गेल्या."
"आणि तुम्हाला हे आधीच कळेल, ती कोण आहे?"
"हो." कल्लेश्वरचा आवाज आता जवळजवळ भविष्यवाणी करणारा वाटत होता. "प्रत्येक वेळी, तो दिवस जवळ येऊ लागला की मला जाणीव होते. कुठेतरी, दूर, एक आत्मा अस्वस्थ होऊ लागतो, नकळत या दिशेने वळू लागतो. आणि यावेळीही, तसंच होईल."
तो उठून उभा राहिला, त्याची नजर दूर, अंधाऱ्या जंगलाच्या पलीकडे, जणू तिकडेच कुठेतरी त्याला ती जाणीव आधीच होऊ लागली होती.
************************************************************************************************************************
त्या रात्री, सगळे जेवण आटपून, दिवसभराच्या त्या भावनिक, थकवणाऱ्या घडामोडींनंतर, एकेक करून आपापल्या खोल्यांत झोपायला गेले. आजींनी शेवटचं दार-कडी तपासली, दिवे मालवले, आणि घरभर एक शांत, गाढ काळोख पसरला.
नेहाही तिच्या खोलीत, अंथरुणावर पडून, बराच वेळ छताकडे बघत राहिली, डोक्यात अजूनही तोच विचार घोळत होता, मामी, बंधन, तिची मुक्ती. हळूहळू डोळे जड होत गेले, आणि झोप कधी लागली, तिचं तिलाही कळलं नाही. आणि झोप लागताच, तिला एक स्वप्न पडलं. पण ते स्वप्नांसारखं वाटतच नव्हतं; इतकं स्पष्ट, इतकं जिवंत की तिला वाटलं, ती प्रत्यक्षच तिथे उभी आहे.
एक गुहा, आजूबाजूला अतिशय घनदाट जंगल. गुहेच्या तोंडाशी चांदण्याच्या फिकट प्रकाशात तिला एका सुंदर स्त्रीचा मृतदेह पडलेला दिसला. विखुरलेले केस, निश्चल पडलेले शरीर, चेहऱ्यावर मरणाआधीच्या वेदना आणि भयाची खूण. आणि त्या मृतदेहावर मांडी घालून, एक माणूस बसला होता, अंगावर राख फासलेली, केस जटांत बांधलेले, पण डोळ्यांत एक विचित्र, अतृप्त भूक. तो मंत्र जपत होता, सतत, एका लयीत, त्याचे ओठ सतत हलत होते. नेहाला आता मंत्र स्पष्ट ऐकू येऊ लागला.
"ॐ ह्रीं क्रीं फट् प्रेतराज्ञ्यै, कालरात्र्यधिष्ठात्र्यै नमः।
रक्तमांसास्थिमज्जास्था, शवगर्भे निवासिनी।
उत्तिष्ठ उत्तिष्ठ दुष्टात्मिके, चिताभस्मनिवासिनी।
कङ्कालमालाधारिण्यै, पिशाचान्नप्रिये नमः।
एतत् प्रेतं पुनरुत्थाप्य, मह्यं देहि क्षणादिमाम्॥"
त्या अघोरीच्या भयंकर आवाजातील मंत्राचा उच्चार ऐकून नेहाचा थरकाप उडाला, तिला त्याक्षणी तिथून पळून जायचे होते पण त्या स्वप्नात तिला हलताही येईना. जणू ती त्या गुहेपुढे फक्त एक अदृश्य साक्षीदार म्हणून उभी होती.
रात्र गडद होत गेली आणि हळूहळू, झाडांतून, अंधारातून, पिशाच्च आकृत्या बाहेर येऊ लागल्या एक, दोन, मग एकामागोमाग असंख्य आणि त्यांनी त्या अघोरीभोवती एक वर्तुळ तयार केलं. कदाचित त्या विधीत कुणाचाही व्यत्यय येऊ नये म्हणून, एक अभेद्य कडं उभं करत होत्या. त्या आकृत्या बघून नेहाचे शरीर झोपेतच थरथर कापू लागले.
आणि मग, तो मृतदेह हलला. त्यातून हळूहळू, एक धूसर, पारदर्शक आकृती वर उठली, त्या सुंदर स्त्रीचा आत्मा, तिचाच चेहरा, पण डोळ्यांत आता असीम वेदना आणि याचना. त्या आकृतीने हात जोडले आणि अघोरीसमोर गुडघ्यावर बसली. "सोडून द्या मला," ती विनवत होती, आवाज क्षीण, तुटका. "कृपा करा, बाबा. मला मुक्ती द्या. माझी जिवंतपणी जेवढी विटंबना झाली तेवढी पुरे, मला आता सोडा."
अघोरीने तिच्याकडे बघितलं, त्याच्या ओठांवर एक तुच्छ, निर्दय स्मित उमटलं. "मुक्ती?" तो हसला, "तू आता मुक्त होण्यासाठी नाहीस. तू आता माझ्या शक्तीचा भाग आहेस."
तिने आणखी विनवणी केली, हात पसरून, त्याच्या पायांशी लोळण घेतले पण अघोरीने डोळे मिटले, आणि एक वेगळ्याच छंदात, अधिक गडद मंत्र म्हणायला सुरुवात केली.
बंधामी ते आत्मानं, अस्मिन् गुहागर्भे चिरम्।
न मुक्तिस्ते कदाचित् स्यात्, यावद्बीजं प्रवर्तते॥
त्या मंत्राच्या पहिल्या उच्चारासरशीच, त्या स्त्रीच्या आत्म्याभोवती एक काळं, अदृश्य बंधन आवळू लागलं. आणि नेमक्या त्याच क्षणी, तिने नेहाकडे करूण नजरेने बघितलं.
नेहाच्या मनात शब्द उमटू लागले. "तिथे, आम्ही सगळ्या तिथेच आहोत. आमची हाडं... तिथेच..."
तिचे शब्द आता जवळजवळ ऐकू येईनासे झाले, त्या बंधनाच्या काळ्या धुक्यात विरत गेले. पण जाण्यापूर्वी तिने आपला हात, त्या पारदर्शक, धूसर बोटांनी, गुहेच्या डावीकडे कातळाच्या विचित्र चिरा असलेल्या एका मोठ्या, वैशिष्ट्यपूर्ण खडकाकडे निर्देश केला.
नेहाने त्या दगडाकडे बघितलं, त्याचा आकार, त्याची जागा मनात साठवायचा प्रयत्न केला पण स्वप्नातल्या त्या गोंधळात, त्या भीतीत, तो तपशील तितका महत्त्वाचा वाटलाच नाही तिला. फक्त एक विचित्र, अस्पष्ट प्रतिमा म्हणून तो मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात साठून राहिला.
आणि मग, एका शेवटच्या, दुःखी किंकाळीसह, ती आत्मा कायमची विरघळून गेली.
नेहा दचकून जागी झाली. इतक्या अचानक की काही क्षण तिला कळेचना, ती नक्की कुठे आहे...ते जंगल, की तिची स्वतःची खोली.
तिचं संपूर्ण अंग घामाने भिजलेलं होतं, कपडे अंगाला चिकटले होते. छातीत हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला वाटलं, आत्ता ते फासळ्यांतून फुटून बाहेर येईल.
तिने अंधारात हाताने चाचपडत लाईटचं बटण शोधलं, बोटं थरथरत होती, दोनदा चुकीच्या जागी हात गेला. शेवटी दिवा लागला, आणि तो मंद, ओळखीचा उजेड बघूनही तिला धीर येईना. तिची नजर सतत खोलीच्या कोपऱ्यांकडे, दाराकडे भिरभिरत राहिली, जणू ते स्वप्नातलं दृश्य आत्ताही तिथे कुठेतरी लपलेलं असेल.
शेवटी, कसाबसा श्वास स्थिर करत, तिने उशाजवळचा फोन घेतला. अजूनही हात थरथरतच होते आणि त्या स्वप्नातले शब्द आणि तपशील विसरण्याआधी टिपून घ्यायला सुरुवात केली.
या भागातही डीटेलिंग झकास आहे.
या भागातही डीटेलिंग झकास आहे. 👍
अघोर साधक, स्मशानजोगी, त्यांच्या आराध्यदेवता यथा ढाक्याची पिशाचमाया, दातिया पीठाची धूमावती, कलकत्त्याची स्मशानकाली, वामकाली कामाख्या, ढाकभैरवी, जखीणी, तंत्र तारा… त्यांच्या चित्रविचित्र अर्चना वगैरे बद्दल फार आधी वाचले होते, ते सगळे - सगळे आठवले.
खतरनाक!
खतरनाक!
अभिजीत चं व्रत पूर्ण होऊ देत
आणि तोपर्यंत नेहा,स्वाती सर्वजण सुरक्षित राहू देत
खूपच थरारक होत चालली आहे की
खूपच थरारक होत चालली आहे की कथा.
तुमची सर्वच वर्णने, माणसांची, जंगलाची, त्या गूढ वातावरणाची आणि त्या क्रूर अभद्रपणाची... अतिशय परिणामकारक आहेत. ते अघोरी मंत्र तर मी वाचूच शकले नाही...
तो गरुड मला फार आवडला आहे
हा भागही छानच. उत्तरोत्तर कथा
हा भागही छानच. उत्तरोत्तर कथा अधिकच रंजक होत चालली आहे.
अप्रतिम
अप्रतिम
अभिजीत मधला बदल योग्य प्रसंगातून दाखवला आहे, भस्मशैलच सामर्थ्य काय आहे ह्याची झलक दिसते.
"थेट हल्ला आता व्यर्थ आहे. मला आता वेगळा मार्ग निवडावा लागेल." >>>>कल्लू अभिजीत च्या कुटुंबियांना त्रास देणार बहुतेक ( त्याला मी कल्लू च म्हणणार आहे, कल्लेश्वर म्हणताना खूप सन्मान दिल्या सारख वाटत. ह्या पात्रा बद्दल तेवढाच राग लेखकाने निर्माण केलाय, जेवढा संघर्ष मधल्या आशुतोष राणाने लज्जा शंकर बद्दल केला होता).
नेहा बहुतेक स्वतः हून ओढली जाणार याना गुहेकडे
जून १५ ला अमावास्या, सध्या कथा फेब्रुवारी मधे आहे, ४१ दिवसांच व्रत लवकर सुरू करावं लागेल.
मल्ली ला सुद्धा कल्लू चे खरे
मल्ली ला सुद्धा कल्लू चे खरे इरादे लक्षात येऊ दे आणि तो ही ह्या सगळ्याचा शेवट करण्यात सहभागी होऊ दे.
ह्या भागात लेखकांनी पुढच्या शक्यता थोड्या फार उलगडल्या आहेत पण कथा पुढे काय वळण घेणार, किती थरारक असणार ह्याची उत्सुकता आहे.
छान चालली आहे कथा.
छान चालली आहे कथा.
हांडी जोगी म्हणजे काय?
वा अगदीच गुंतवून ठेवलीय कथे
वा अगदीच गुंतवून ठेवलीय कथे मध्ये.. रोज ४ वेळा मायबोली उघडते यासाठी.
१३वी स्त्री कोण...? या भागात नेहा पण मागे एका भागात अनन्या कि अनघा अभिजित ची मुलगी तिला पण रात्री भयानक अनुभव येतो न.. त्याचा काय पूढे संदर्भ आहे का.. लहान मुलीचा बळी नको.. भीतीदायक आहे..
सणानिमित्त अजून एक भाग मिळेल
सणानिमित्त अजून एक भाग मिळेल का आज ??
