भस्मबीज - भाग १७
पूर्वभाग
अभिजित, स्वाती आणि नेहा शाल्मला नदीत भस्मशैलाचा शोध घेत असताना अखेर गरुडाच्या मदतीने त्यांना उलट्या दिशेला तोंड केलेला नंदी सापडतो. त्याच वेळी कल्लेश्वर जलाकर्षण सिद्धीने नदीला पूर आणतो आणि अभिजित जीव धोक्यात घालून नंदी हलवून त्याखाली दडलेला साडेचारशे वर्षांपासूनचा भस्मशैल बाहेर काढतो. मात्र प्रचंड पाण्याचा लोंढा त्याच्यावर झेपावताना बघताच स्वाती बेशुद्ध पडते आणि नेहा भयभीत होऊन रडत अभिजितकडे पाहत राहते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १८ - कुळशपथ
समोरचं भयाण दृश्य सहन न झाल्याने स्वाती चक्कर येऊन बेशुद्ध पडली होती. आजी तिच्या शेजारी गुडघ्यावर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. मामा असहायपणे त्यांच्या जवळ उभे होते. आणि नेहा किनाऱ्यावर अभिजितच्या दिशेने पाहून जोरजोरात रडत होती.
फेसाळलेल्या पाण्याची ती उंच, गर्जणारी भिंत आता काही हातांवरच होती. अभिजितला जाणवलं, आता पळून जाणं शक्यच नाही. त्याने डोळे घट्ट मिटले, आणि लोंढा आपल्यावर आदळणार या अपेक्षेने शेवटच्या क्षणासाठी स्वतःला तयार करत त्याने मान खाली घातली, खांदे आकुंचित केले, हातातलं भस्मशैल मुठीत आणखी घट्ट आवळलं.
देवप्पाने बेशुद्ध स्वातीकडे, डोळ्यांत अश्रू दाटलेल्या नेहाकडे आणि मान खाली घालून उभ्या असलेल्या अभिजितकडे एक क्षणभर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणात बदलला. काळजीची जागा आता एका निर्धाराने घेतली.
देवप्पाने डोळे मिटले. हातातली काठी अभिजितच्या दिशेने उंचावली आणि आपली सारी साधनाशक्ती पणाला लावत त्याच्या ओठांतून गंभीर स्वर उमटला…
"ॐ नन्दिकेश महाबाहो, वज्रप्राकारसंस्थित।
आपद्भक्तयोर्मध्ये तिष्ठ, रक्ष तं महाबल॥"
मंत्राचा शेवटचा उच्चार होताच काठीच्या टोकातून एक तीव्र प्रकाश शलाका बाहेर पडली आणि विजेच्या वेगाने नदीच्या दिशेने झेपावली.
क्षणभर त्या प्रकाशाने संपूर्ण नदीपात्र उजळून निघालं. आणि पुढच्याच क्षणी त्या रोरावत येणाऱ्या प्रचंड, रौद्र जलप्रवाहाच्या आणि अभिजितच्या मध्ये एक विशाल, तेजस्वी नंदीची आकृती आकार घेऊ लागली. प्रकाशातून साकारलेला तो दैवी नंदी एखाद्या पर्वतासारखा भव्य होता. त्याचा विशाल देह शुभ्र तेजाने झळकत होता आणि त्याच्या डोळ्यांतून निघणारा प्रकाश नदीच्या फेसाळत्या लोंढ्यावर स्थिरावला होता. तो अभिजितच्या आणि त्या प्रचंड जलप्रवाहाच्या मध्ये अचल उभा राहिला.
आणि पुढच्याच क्षणी पुराचा तो प्रचंड लोंढा त्या तेजस्वी नंदीवर आदळला. त्याच्यावर आदळलेला जलप्रवाह त्याच्या विशाल देहावरून दोन दिशांना फुटला आणि दोन्ही बाजूंनी फेसाळत पुढे वाहू लागला.
अभिजितने मान खाली घातली होती. डोळे घट्ट मिटलेले होते. पुढच्या क्षणी पाण्याचा प्रचंड तडाखा आपल्याला वाहून नेणार, याची त्याला खात्री होती.
पण काहीच झालं नाही. एक क्षण गेला. दुसरा. अभिजितला आता स्वतःच्या हृदयाचं धडधडीशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. त्याने हळूहळू डोळे उघडले. लोंढा कुठे आहे?
आधी त्याला फक्त पांढरा प्रकाश दिसला. मग त्याची नजर वर गेली आणि जे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आलं, ते पाहून तो अक्षरशः स्तब्ध झाला.
त्याच्या समोर एक विशाल, तेजस्वी नंदी उभा होता आणि पाणी वेगाने त्याच्या दोन्ही बाजूने फुटून वाहत होतं.
देवप्पाचा आवाज त्या गडगडाटातूनही स्पष्ट ऐकू आला. "आता पळ! ही संधी फार वेळ टिकणार नाही!"
त्या शब्दांनी अभिजित भानावर आला. त्याने त्या तेजस्वी आकृतीच्या आश्रयाआडूनच, किनाऱ्याच्या दिशेने धावायला सुरुवात केली. तो जीवाच्या आकांताने शेवटचं अंतर पार करून किनाऱ्यावर, कोरड्या जमिनीवर येऊन धापा टाकत कोसळला. पाणी त्याच्या पायांपर्यंत पोहोचलं आणि थांबलं. ती शुभ्र आकृती हळूहळू विरून गेली.
"अभिजित सर!" नेहा धावत आली, त्याला उठवायला मदत करत, तिचे अश्रू अजूनही थांबले नव्हते.
चिखलाने माखलेला अभिजित धापा टाकत किनाऱ्यावर पडून राहिला. त्याच्या मुठीत अजूनही ते भस्मशैल घट्ट धरलेलं होतं. तो अजूनही त्या आकृतीच्या विचारात अडकलेला होता.
"तुम्ही बघितलंत का ते?" तो नेहाकडे बघत कसाबसा म्हणाला, "तो प्रकाश... ती आकृती..."
"बघितलं, सर," नेहाही तितकीच आश्चर्यचकित होती. "आम्ही सगळ्यांनीच बघितलं."
अभिजितने आपल्या हातातल्या त्या लाल दगडाकडे बघितलं, मग पुन्हा त्या शांत झालेल्या नदीकडे आणि पहिल्यांदाच, त्याला जाणवलं, हे युद्ध त्याच्या कल्पनेपेक्षाही खूप मोठं, खूप दैवी होतं.
आजींनी शुद्धीवर येणाऱ्या स्वातीच्या तोंडावर पाणी शिंपडलं. ती हळूहळू डोळे उघडत, गोंधळून म्हणाली, "अभिजित... अभिजित कुठे आहे?"
"इथेच आहे, सुखरूप," आजी म्हणाल्या, आवाजात सुटकेचा निःश्वास.
स्वातीने डोळे उघडून अभिजितकडे बघितलं; त्याच्या हातातलं ते कवच, त्याचा चिखलाने माखलेला समाधानी चेहरा आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती उठून धावतच त्याच्याजवळ गेली, काहीही न बोलता त्याला घट्ट मिठी मारली,
देवप्पा त्या सगळ्यांपासून थोडा दूर उभा राहून नदीकडे पाहत होता. काही वेळापूर्वी ज्या नदीने रौद्र रूप धारण केलं होतं, ती आता पुन्हा शांतपणे वाहत होती.
"साडेचारशे वर्षं..." देवप्पा हळू आवाजात पुटपुटला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.
"साडेचारशे वर्षं हे कवच सुरक्षित राहिलं. ते शोधण्याचे, त्याचा ठाव घेण्याचे कित्येक प्रयत्न झाले... पण प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले."
अभिजितने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. "म्हणजे कल्लेश्वरच्या आधीही कुणी हे शोधण्याचा प्रयत्न केला होता?"
देवप्पाने हळूच मान हलवली. "अनेकांनी."
त्याची नजर पुन्हा नदीवर स्थिरावली.
"मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून ऐकलं होतं. दोन पिढ्यांपूर्वी एक तांत्रिक इथे आला होता. कित्येक महिने या सहस्रलिंगांमध्ये काहीतरी शोधत फिरत होता. त्याला या जागेबद्दल कुठून माहिती मिळाली होती, कुणास ठाऊक."
"त्याआधी इंग्रजांच्या काळातही एक साहेब इथे आला होता. पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नावाखाली त्याने हा संपूर्ण भाग तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. दगड हलवले, माती उकरली, नदीपात्र धुंडाळलं. पण त्याच्या हातालाही काही लागलं नाही.”
“हे कवच योग्य रक्ताची, योग्य वेळेची आणि योग्य हेतूची वाट पाहत होतं."
अभिजितने आपल्या मुठीतला भस्मशैल पाहिला. देवप्पाच्या चेहऱ्यावरचा भाव मात्र हळूहळू बदलत गेला. काही क्षणांपूर्वी दिसणारा भावुकपणा नाहीसा झाला आणि त्याची जागा पुन्हा नेहमीच्या गंभीरतेने घेतली.
"पण अभिजित..." तो सावकाश म्हणाला, "आता खरी काळजी सुरू झाली आहे."
"इतकी वर्षं हे कवच सुरक्षित होतं, कारण ते कुणाच्याही हाती लागलं नव्हतं. आता ते तुझ्याकडे आहे."
देवप्पाचा आवाज अधिक गंभीर झाला. "आणि तू अजून पूर्ण तयार नाहीस. तुझी दीक्षा अपूर्ण आहे. तुझ्या शक्ती पूर्णपणे जाग्या झालेल्या नाहीत."
"पण हे कवच तर मिळालं ना आता आणखी काय हवंय?" अभिजित म्हणाला आणि अचानक चमकून तो काहीतरी आठवल्यासारखं हातातला भस्माशैल निरखून पाहू लागला.
"देवप्पा, मला वाटलं होतं, कवच मिळालं की त्यावर तो उरलेला मंत्र लगेच दिसेल. पण इथे तर काहीच नाहीये."
देवप्पाने मान हलवली, "आणि दिसणारही नाही, अभिजित. कारण हे कवच अजून जागृत नाही. हे फक्त एक भस्मशैल आहे सध्या, नुसता दगड. त्याच्यात जी शक्ती आहे, तो उरलेला मंत्र, ती जागृत करावी लागते आणि ते जागृत करणं कवच सापडण्याइतकं सोपं नाही."
तरीही अभिजितने एक प्रयत्न म्हणून, त्याला माहीत असलेला तो अर्धा मंत्र हळूच पुटपुटला. "ॐ हं पं रं क्ष्रौं कौं सं खं हरिहरपुत्राय नमः॥"
हातातलं भस्मशैल क्षणभरासाठी थोडंसं चमकलं; आतून एक अंधुक प्रकाश उमटला , जणू ते जागं होण्याचा प्रयत्न करत होतं आणि मग परत होतं तसं, निस्तेज, निर्जीव झालं. अभिजितने आशाळभूतपणे तो दगड आणखी जवळ धरला, पुन्हा तोच मंत्र म्हणून बघितला. पण यावेळी काहीच झालं नाही.
"देवप्पा," अभिजित म्हणाला, "बघितलंत? क्षणभर चमकलं ते. म्हणजे काहीतरी तर आहे यात."
देवप्पाने मान हलवली, "हो अभिजित. ते तुला ओळखतंय. पण ओळखणं आणि पूर्णपणे जागृत होणं, यात फार मोठं अंतर आहे" अभिजीतच्या हातातील भस्मशैल घेऊन त्याच्याकडे पाहत देवप्पा म्हणाला.
अभिजितचा चेहरा उतरला, तरी त्या क्षणिक चमकण्याने त्याच्या मनात एक नवी आशा रुजली होती. "मग आता?"
"उद्या यानाला ये, मग सांगतो" देवप्पा स्वातीची नजर चुकवत म्हणाला.
देवप्पा यलाप्पाशी हळूच कानडीत म्हणाला, "यल्लप्पा, मुंबैयल्ली इवर कुटुंब सुरक्षितवागि इरुवंते नोडिको."
"हौ देवप्पा, नानु व्यवस्था माड्कोळ्तेनी." असे म्हणत यल्लप्पाने त्याचा मोबाईल काढला आणि सगळ्यांपासून दूर होऊन फोनवर कानाशी काही तरी बोलत बोलत तो आणि देवप्पा निघून गेले.
देवप्पा आणि यल्लाप्पा निघून गेल्यावर, सगळे हळूहळू सावरले. भीतीचा भार उतरला, आणि एक थकलेली, समाधानी शांतता पसरली. आजींनी थर्मासमधून चहा ओतला, आणि सगळे तिथेच, ओलेत्या कपड्यांनिशी वाळूवर बसून राहिले.
"आता जरा शांत वाटतंय," स्वाती अभिजितच्या शेजारी बसत म्हणाली. "इतका भयंकर दिवस गेला, पण शेवटी सगळं ठीक झालं."
"हो," अभिजित म्हणाला, चहाचा घोट घेत. "आता ते कवच सुरक्षित आहे, आणि…"
तो थांबला. खिशात हात घातला. रिकामा.
काय झालं?" स्वातीने विचारलं.
"भस्मशैल... माझ्याकडे नाहीये." अभिजित उठून वाळूत शोधू लागला.
"काय?" स्वाती ताडकन उठली.
"शेवटचं कुठे बघितलं होतंस?" आजींनी विचारलं.
अभिजित डोळे मिटून विचार करत राहिला, आणि मग त्याचा चेहरा उलगडला. "देवप्पा. मघाशी बोलता बोलता त्यांनी तो माझ्या हातातून घेतलेला.”
"म्हणजे कवच आत्ता देवप्पांकडे आहे?" स्वातीने विचारलं.
आजी म्हणाल्या, "देवप्पांवर विश्वास ठेवायला हवा. उद्या कळेलच. चला, घरी जाऊया; सगळे थकलेले आहात."
सगळे उठले, सामान गोळा करत. पण घराकडे परतताना, अभिजितच्या मनात ती सूक्ष्म अस्वस्थता तशीच राहिली…देवप्पा काहीतरी लपवत होते.
घराकडे परतताना गाडीत सगळे शांत होते, पण स्वातीची नजर वारंवार अभिजितकडे वळत होती. काहीतरी वेगळं जाणवत होतं तिला, नेमकं काय ते तिलाही स्पष्ट सांगता येत नव्हतं.
रात्री जेवताना मामांनी सहज विचारलं, "उद्या नेमकं काय होणार, याची काही कल्पना आहे का, अभिजित?"
"काहीही असो," तो म्हणाला, देवप्पा जे सांगतील, ते मी करेन. आणि जर कल्लेश्वर पुन्हा आडवा आला, तर यावेळी मी मागे हटणार नाही."
त्याच्या करारीपणाने सगळेच क्षणभर चमकले. स्वातीने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. आधीचा अभिजित जो वडिलांशी साधं तलवारीबाबतीत बोलतानाही गडबडून गेला होता तो हा नव्हता.
नेहालाही ते जाणवलं, जेवण संपल्यावर स्वातीला बाजूला घेऊन हळूच म्हणाली, "स्वाती, तुलाही जाणवतंय का? सर... सर वेगळेच वाटतायत."
"वेगळे म्हणजे?" स्वातीने विचारलं, जरी तिलाही उत्तर अंदाजे माहीत होतं.
"आधी ते इतके... मऊ होते. भिडस्त. लगेच संकोचायचे." नेहाने शब्द जुळवत म्हटलं. "पण आजच्या त्या प्रसंगानंतर... त्यांच्या डोळ्यांत, त्यांच्या आवाजात, काहीतरी वेगळंच आहे. जास्त धारदार. जास्त बेधडक."
आजीही हे ऐकत होत्या, आणि त्यांनी दुजोरा दिला. "अगदी चालण्यातही फरक जाणवतोय; आधी तो जरा वाकून, संकोचून चालायचा."
"हे त्या कवचामुळे असेल का?" स्वातीने विचारलं, आवाजात एक अनामिक चिंता. "त्याला त्याने स्पर्श केला, आणि तेव्हापासूनच हा बदल दिसतोय."
मामा गंभीर होत म्हणाले, "असू शकतं. देवप्पा म्हणाले होते ना, ते कवच अजून पूर्ण जागृत नाही, पण अभिजितला ओळखतंय, प्रतिसाद देतंय. कदाचित त्याचाच हा एक परिणाम असेल; शरीरावर नाही, तर मनावर, स्वभावावर."
रात्री, झोपताना, स्वातीने त्याचा हात हातात घेतला. "अभिजित, तुला स्वतःला काही जाणवतंय का? बदलल्यासारखं?"
अभिजितने काही क्षण विचार केला. "जाणवतंय, थोडं. आधी जिथे मी घाबरायचो, संकोचायचो आता कशाचीच भीती वाटत नाहीये. जणू आतून कुणीतरी सांगतंय, 'घाबरायची गरज नाही.'"
************************************************************************************************************************
नेहा अभिजितचा विचार करत त्या रात्री बराच वेळ जागी राहिली आणि शेवटी कधीतरी झोपेने तिला घेरलं. मध्यरात्री तिला जाग आली पण डोळे उघडायच्या आधीच तिला जाणवलं, खोलीत ती एकटी नाही.
खोलीतली हवा अचानक, अतिशय थंड झाली होती. तिने अंगावर पांघरून ओढून कूस बदलायचा प्रयत्न केला. पण पाय हलले नाहीत. हातही नाही. एक थंड, बधीर जाणीव तिच्या मणक्यातून वर चढली. तिचंच शरीर, आता तिच्या ताब्यात नव्हतं. फक्त डोळेच हलत होते, आणि त्या डोळ्यांनी तिने खोलीच्या कोपऱ्याकडे बघितलं. तिथे स्थिर आकृती उभी होती पण तिचा आकार मानवी असूनही चुकीचा होता, जणू कुणीतरी माणसाचा साचा घेऊन तो थोडा जास्तच ताणला होता, सांधे जिथे वाकायला नकोत तिथे वाकलेले.
ती आकृती हलली. आवाज न करता, हवेतच तरंगल्यासारखी. ती जवळ येत होती.
नेहाचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने किंचाळायचा प्रयत्न केला; तोंड उघडलं, फुफ्फुसांत हवा भरली पण घशातून आवाजच बाहेर पडला नाही.
आकृती अंथरुणाच्या अगदी जवळ आली. इतकी जवळ की नेहाला तिच्या अंगातून येणारा वास आता स्पष्ट जाणवू लागला; कुजलेलं, ओलं, जुनं काहीतरी. मातीत खूप वर्षं गाडलेल्या गोष्टीचा वास.
आणि मग तिने मान वाकवली. तिची मान पुढे अनैसर्गिक कोनात कलंडली, आणि तो चेहरा नेहाच्या नजरेच्या पातळीवर आला. तिच्या ओळखीचा, फोटोत बघितलेला, त्या हसऱ्या, जुन्या फोटोतला चेहरा.पण आता त्यावर राख साचलेली, त्वचा भेगाळलेली, आणि डोळ्यांच्या जागी फक्त दोन खोल, काळे खड्डे, जिथून बारीक राख सतत गळत, अंथरुणावर, नेहाच्या चादरीवर पडत होती.
"किती मोठी झालीस, मला तुला बघायची खूप ईच्छा होती." त्या तोंडातून शब्द उमटले; ओठ हलत नव्हते, आवाज जणू त्या काळ्या खड्ड्यांतूनच थेट बाहेर येत होता. स्त्रीचा आवाज, पण त्यात दुसराच, खोल, गुरगुरणारा सूर मिसळलेला. "पण माझी विटंबना करून, मला बांधलं गेलंय?"
आणि ती आकृती भेसूर सुरात रडू लागली, "मला मुक्त कर...मला मुक्त कर."
नेहाच्या मनात एकच शब्द घुमत होता, वेड्यासारखा...मामी. मामी. मामी. आकृतीने हात उचलला राखेने माखलेली बोटं, नखं गळून पडलेली आणि नेहाच्या गालाच्या दिशेने सरकू लागला.
नेहाचं मन आता पूर्ण थिजलं होतं, फक्त एकच, शेवटचा, हतबल विचार मनात आला, "देवा, कुणीतरी...वाचवा."
आणि नेमक्या त्याच क्षणी, उशाजवळ ठेवलेला फोन कर्कश आवाजात वाजला त्या भयाण शांततेला चिरत. ती आकृती जागच्या जागी थिजली, जणू त्या आवाजाने तिलाही धक्का बसला आणि मग, एका दीर्घ, उदास सुस्काऱ्यासह, ती राखेच्या धुरासारखी हवेत विरून गेली.
************************************************************************************************************************
सकाळी नेहा उशिरापर्यंत खोलीबाहेर आली नाही. आजींनी दोनदा हाक मारूनही उत्तर न आल्यावर, ती स्वतःच तिच्या खोलीत डोकावल्या.
नेहा खिडकीजवळ बसलेली होती, गुडघ्यांत डोकं खुपसून, डोळे लाल, चेहरा फिकट.
"नेहा? बरं वाटत नाहीये का?" आजींनी जवळ जात काळजीने विचारलं.
नेहाने वर बघितलं, आणि तिचे डोळे पुन्हा भरून आले. "आजी..." तिचा आवाज कापत होता. "रात्री... रात्री मामी आल्या होत्या."
आजी जागच्या जागी थिजल्या. "काय म्हणालीस?"
नेहाने रात्रीचा सगळा प्रकार सांगितला. ती थंडी, ते बधीरपण, तो राखेने माखलेला चेहरा, आणि शेवटी ते शब्द, "माझी विटंबना करून, मला बांधलं गेलंय... मला मुक्त कर."
प्रत्येक वाक्यागणिक आजींचा चेहरा पांढराफटक होत गेला.
"आजी," नेहा अखेर म्हणाली, "याचा अर्थ काय?
शब्द जुळवत आजी म्हणाली, "तिचा आत्मा कदाचित अजून मुक्त झालेला नसेल. जर ती त्या बारा बळींपैकी एक असेल, तर कदाचित त्या सगळ्यांचेच आत्मे अजूनही त्या गुहेत, त्या भस्मबीजाच्याच बंधनात अडकलेले असतील."
"भस्मबीज पूर्णपणे रोखलं गेलं, तरच त्या सगळ्यांना मुक्ती मिळेल?" नेहाने विचारलं
"देवप्पांना विचारायला हवं याबद्दल, त्यांना अधिक माहीत असेल." आजींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
तेवढ्यात मामाने आजीला हाक मारली; मामा, अभिजित आणि स्वाती देवप्पाकडे जायला निघाले होते.
आजींनी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. अभिजितचा चेहरा गंभीर झाला. "देवप्पांना विचारतो याबद्दल, जर हे खरं असेल, तर आता थांबायचं नाही, मार्ग कितीही कठीण असो."
स्वातीने नेहाकडे बघून तिचा हात घट्ट धरला, काहीही न बोलता, पण त्या स्पर्शातून जे सांगायचं होतं ते पोहोचलं.
तिघेही निघून गेल्यावर, नेहा खिडकीबाहेर बघत राहिली, आकाशाकडे, जिथे कुठेतरी, दूर त्या यानाच्या गुहेत, तिची मामी आणि तिच्यासारख्याच अकरा जणी मुक्तीची वाट बघत असतील, या विचाराने तिचं काळीज पिळवटून निघत होतं.
************************************************************************************************************************
देवप्पाच्या घरी पोहोचल्यावर, अभिजितने पहिल्यांदा नेहाची घटना सांगितली.
देवप्पा गंभीर पणे म्हणाला, "भस्मबीज ज्या स्त्रियांचा बळी घेतं, त्यांचे आत्मे मुक्त होत नाहीत, त्याच्या त्या राखेत, त्या गुहेतच बद्ध राहतात, त्याच्या जागृतीसाठी त्याच्या शक्तीचा भाग बनतात."
मामांनी अखेर विचारलं, "मग लीलाला मुक्त करायचा काही मार्ग नाही का?"
देवप्पाने त्याच्याकडे बघितलं, त्याच्या नजरेत एक खोल दुःख होतं. "एकच शक्यता आहे. जर आपण योग्य विधीने, योग्य मंत्राने त्या गुहेत जाऊन आत्म्यांसाठी वेगळी प्रार्थना केली, वेगळा मुक्ती-विधी केला तर कदाचित काही होईल. पण हा विधी अत्यंत धोकादायक आहे, कारण भस्मबीज अजूनही पूर्ण जागृत नसला तरी सक्रिय आहे. आणि आत्ता आपण त्याच्या इतक्या जवळ जाणं म्हणजे स्वतःहून संकट ओढवून घेण्यासारखं आहे."
"एकदा कवच जागृत झालं, माझी दीक्षा पूर्ण झाली कि मग आपण हा विधी करू शकू का?" अभिजित म्हणाला.
"करू शकू, पण एका वेळी एकच लढाई. आधी तुझी तयारी पूर्ण होऊ दे."
देवप्पा त्या तिघांना घेऊन तो घराच्या मागच्या अंगणात गेला जिथून अभिजितच्या त्या दीर्घ, कठोर प्रवासाची खरी सुरुवात होणार होती.
अंगणात पोहोचल्यावर देवप्पाने एक जुनी, स्वच्छ केलेली जागा दाखवली; जमिनीवर एक वर्तुळ आधीच काढलेलं होतं, मध्यभागी एक हवनकुंड, त्यात लाकडं रचलेली, अजून न पेटवलेली.
"हे सगळं आधीच तयार केलं होतं का?" अभिजितने आश्चर्याने विचारलं.
"काल रात्रीच," देवप्पा म्हणाला.
"आज पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं काम करूया," देवप्पा म्हणाला, "कुळशपथ. यानंतरच बाकी सगळे कुळाचार खऱ्या अर्थाने सुरू होऊ शकतील."
अभिजितने मान हलवली, त्याच्या मनात एक अनामिक हुरहूर जाणवत होती.
देवप्पाने हवनकुंडाजवळ जाऊन तो पेटवला. मंद ज्वाला हळूहळू भडकत गेली, केशरी उजेड अंगणभर पसरला.
"बस इथे," देवप्पा म्हणाला, अग्नीसमोर अभिजितला बसवत. "आणि नीट ऐक. ही शपथ नुसते शब्द नाहीत. एकदा उच्चारलीस, की मागे फिरणं शक्य नाही. आधी मी तुला ही शपथ मराठीत समजावून सांगतो, कारण जे शब्द तुला उच्चारायचेत, त्यांचा पूर्ण अर्थ तुला समजायला हवा नुसते उच्चार पुरेसे नाहीत."
अभिजितने मान हलवली.
"शपथ अशी आहे, 'एन कैगे ओप्पिद धर्मवनु काय्वेनु.' याचा अर्थ 'माझ्या हाती जो धर्म, जे कर्तव्य सोपवलं गेलं आहे, त्याचं मी रक्षण करेन.' म्हणजे हे कवच, हे कुळ, ही जबाबदारी; हे सगळं आता तुझ्या हाती आहे, आणि त्याचं रक्षण करणं हे तुझं वचन."
'"कालु बंदडे पोराडुवेनु.' 'वेळ आली, तर मी लढेन.' म्हणजे जेव्हा संकट समोर उभं राहील, तेव्हा तू पाठ फिरवणार नाहीस, पळून जाणार नाहीस; तू लढशील, कितीही भीती वाटली तरी."
ते शब्द मनात साठवत अभिजितने दीर्घ श्वास घेतला.
"आणि शेवटचं, सर्वांत महत्वाचं; 'अवश्यकविद्धरे प्राणवन्नू कोडुवेनु.' 'गरज पडली, तर मी माझा प्राणही देईन.'" देवप्पाचा आवाज गंभीर झाला, प्रत्येक शब्दावर जोर देत. "अभिजित, हे शेवटचं वाक्य नुसतं तोंडदेखलं म्हणण्यासाठी नाही. जर तेराव्या रात्री, त्या अंतिम क्षणी, तुझ्या प्राणांची किंमत मोजूनच हे थांबवायचं असेल तर तू मागे हटणार नाहीस, हे वचन आहे."
अभिजित काही क्षण स्तब्ध बसून राहिला, त्या शब्दांचं खरं वजन आता त्याला जाणवत होतं.
"समजलं," तो हळू आवाजात म्हणाला. "आणि मी तयार आहे."
स्वातीने त्याच्याकडे बघितलं, तिच्या डोळ्यांत भीती आणि अभिमान दोन्ही एकाच वेळी दाटून आलं.
"हात पुढे कर." देवप्पा म्हणाला.
अभिजितने क्षणभर संकोचून हात पुढे केला. देवप्पाने एका लहान, तीक्ष्ण चाकूने अभिजितच्या तर्जनीच्या टोकावर एक बारीक चीर दिली. एक थेंब रक्त उमललं, गडद लाल, अग्नीच्या प्रकाशात चमकणारं.
"आता म्हण माझ्यामागोमाग," देवप्पा म्हणाला, आणि कन्नड शब्द सावकाश, स्पष्ट उच्चारात म्हणू लागला, "एन कैगे ओप्पिद धर्मवनु काय्वेनु..."
अभिजितने ते शब्द, अडखळत, पण पूर्ण एकाग्रतेने त्याच्यामागोमाग म्हटले. प्रत्येक शब्दागणिक, त्याचा हात अग्नीच्या दिशेने अधिकाधिक झुकत गेला.
"कालु बंदडे पोराडुवेनु..."
तो रक्ताचा थेंब आता त्याच्या बोटाच्या टोकावर तसाच थांबलेला होता, जणू तोही त्या शब्दांची वाट बघत होता.
"अवश्यकविद्धरे प्राणवन्नू कोडुवेनु."
शेवटचा शब्द उच्चारताच, देवप्पाने अभिजितचा हात हलकेच अग्नीच्या वर धरला. "आता अर्पण कर."
अभिजितने डोळे मिटले, आणि त्या रक्ताच्या थेंबाला अग्नीत पडू दिलं.
टप्.
तो थेंब ज्वालेला स्पर्श करताच, अग्नी क्षणभर विचित्र निळसर प्रकाशात उंच भडकला आणि एक गोड-कडवट धूर उठला, जो अंगणभर पसरत गेला.
स्वातीने श्वास रोखून धरला. मामांचे डोळे विस्फारले.
अग्नी हळूहळू पुन्हा नेहमीसारखा, केशरी झाला. पण अभिजितला त्याच्या हातात, त्याच्या रक्तात, काहीतरी हललेलं जाणवलं; एक सूक्ष्म, उबदार स्पंदन, जे आधी कधीच जाणवलं नव्हतं.
देवप्पाने दीर्घ श्वास घेतला, त्याच्या चेहऱ्यावर एक भारावलेलं समाधान.होतं. "झालं. आजपासून तू औपचारिकरीत्या तुझ्या कुळाशी, तुझ्या कुळदैवताशी बांधला गेला आहेस. हे बंधन आता कधीच तुटणार नाही."
अभिजितने डोळे उघडले, स्वतःच्या हाताकडे बघितलं ती जखम आधीच बंद होत होती.
"आता कसं वाटतंय?" देवप्पाने विचारलं.
"वेगळं," अभिजित म्हणाला. "जणू आतापर्यंत मी अर्धवट होतो, आणि आता... आता पूर्ण झाल्यासारखं वाटतंय."
नेमक्या त्याच क्षणी, आकाशात घिरट्या घालणाऱ्या गरुडाने अचानक एक भेदक, अस्वस्थ चीत्कार केला आणि देवप्पाचा चेहरा, आत्ताच झालेलं ते समाधान विसरून, क्षणार्धात दगडासारखा गोठला.
हा भाग पण खूप भारी.
हा भाग पण खूप भारी.
एक कळलं नाही, अभिजीतच्या पुढे नंदी होता आणि त्याच्या दोहो बाजूंनी पाण्याचा लोंढा जात होता, म्हणजे अभिजीतच्या ही दोन्ही बाजूंनी पाणी जात असणार. अशी वेगवान प्रवाहातून किनाऱ्यावर कस जाणार!
जबरदस्त झाला आहे हा भाग.
जबरदस्त झाला आहे हा भाग.
कुळशपथ प्रसंग भारीच जमला आहे. डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग.
एन कैगे ओप्पिद धर्मवनु काय्वेनु
कालु बंदडे पोराडुवेनु.
अवश्यकविद्धरे प्राणवन्नू कोडुवेनु
आता पुढचा प्रवास अधिक कठीण असणार अभिजितसाठी.
नेहाची पण काळजी लागून राहिली आता.
लवकर टाका पुढचा भाग.
धन्यवाद आबा., ऋतुराज.!
धन्यवाद आबा., ऋतुराज.!
@आबा. copy paste करताना एक ओळ गाळली गेली होती.
छान मस्तच. पुढील भागाच्या
छान मस्तच. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
अपेक्षेप्रमाणे छान झालंय भाग.
अपेक्षेप्रमाणे छान झाला आहे भाग.
मधेच देवप्पा double cross करणार का अस वाटलं, पण आतापर्यंत तरी हे पात्र त्याप्रकारे दाखवलं नाहीये, बघू काही twist असणार का?
शेवट cliffhanger नेहमी सारखा उत्कंठा वाढवणारा,
कल्लू च्या कावळ्यांनी काव काव केली असणारच ना
वाचतोय.
वाचतोय.
आता त्या एन्टिक तलवारीचे आणि भस्मशैलाचे काय अनुष्ठान असणार काय मंत्र-तंत्र असणार याची उत्सुकता आहे
प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला
प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला. Totally involved in the Story.
भस्मशैल वरून Tesseract ची आठवण झाली.
वाचतेय
वाचतेय
हाही भाग प्रभावशाली
उत्सुकता आहेच
पुढचे भाग लवकर येऊ द्या
मलापण राखेचा वास आला
So much involved
मधेच देवप्पा double cross
मधेच देवप्पा double cross करणार का अस वाटलं > मला पण तसेच वाटले आणि अभिजित ची काळजी वाटायला लागली.
खूप छान चालली आहे गोष्ट. पुढचे भाग लवकर येऊ द्या
कथा तर खूप उत्कंठा वर्धक सुरू
कथा तर खूप उत्कंठा वर्धक सुरू आहेच.
पण काय जास्त विशेष वाटले असेल ते म्हणजे तुमचा कथेच्या साठी केलेला अभ्यास आणि माहिती संकलन.
मराठी कथेमध्ये हा अभ्यास तसा दुर्मिळ असतो, ते पण जी कथा तुम्ही नेट वर टाकत आहेत की जिथून ती कधीची चोरी होऊन दुसऱ्याच्या नावावर तुम्हालाच येऊ शकते.
>>>जी कथा तुम्ही नेट वर टाकत
>>>जी कथा तुम्ही नेट वर टाकत आहेत की जिथून ती कधीची चोरी होऊन दुसऱ्याच्या नावावर तुम्हालाच येऊ शकते
खरच तुमच्या कथा दर्जेदार आहेत, copyrights बद्दल विचार करा.
छान सुरुय.
छान सुरुय.
एकदम तिथे पोहचतोय आम्ही.