भस्मबीज - भाग १५
पूर्वभाग
कल्लेश्वरला मधुकेश्वरातून आणलेला वीरगळ चुकीचा असल्याचे समजते आणि देवप्पावर झालेल्या हल्ल्यातील अपयशामुळे तो संतप्त होऊन स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतो. दरम्यान आजी आणि डॉ. हेगडेंच्या मदतीने शिलालेखाचा उलगडा होतो आणि ‘रक्तपुष्प प्रवाह’ म्हणजे शाल्मला नदी, तर हजारो नंदींपैकी विरुद्ध दिशेला तोंड केलेल्या एका नंदीखाली ‘भस्मशैल’ लपलेला असल्याचा धागा मिळतो. देवप्पा अभिजितला सिरसीला येण्यास सांगतो. अभिजितवर पिशाच्चांचे हल्ले तीव्र होत जातात आणि अखेर तो देवप्पाने दिलेला अर्धवट मंत्र उच्चारून त्यांना परतवतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १६ - नेहाचे गूढ
दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने देवप्पाला फोन लावला. सहा रात्रींचा तो संपूर्ण वृत्तांत त्याने एकामागोमाग सांगितला . पहिल्या रात्रीचे ते पावलांचे आवाज, त्यानंतरचं ते एकेकटं पिशाच्च, आणि शेवटी सहाव्या रात्रीचा तो सामूहिक हल्ला.
"आणि विचित्र गोष्ट म्हणजे," अभिजित पुढे म्हणाला, "पहिल्या पाच रात्री, मला तुम्ही दिलेला तो मंत्र आठवायचाच नाही. डोकं रिकामं व्हायचं, नुसती भीतीच उरायची. फक्त सहाव्या रात्रीच तो आपोआप ओठांवर आला."
"मला सगळं माहीत आहे अभिजित." देवप्पा म्हणाला.
"माहीत आहे? कसं?"
"दूर असूनही मला त्या रात्री जाणवायचं तुझ्यावर संकट आलंय म्हणून. देवप्पाचा आवाज आणखी गंभीर झाला. "आणि प्रत्येक वेळी, मी माझ्या परीने प्रयत्न करत होतो. तुझ्या मनाला तो मंत्र आठवावा म्हणून, मी तुला त्या दिशेने ढकलत होतो, माझ्या स्वतःच्या साधनेतून."
अभिजितला आश्चर्य वाटलं. "हो, मला जाणवलं तसं खरं. पण ते अस्पष्ट होतं."
"कारण तो प्रयत्न स्थूल नाही, सूक्ष्म आहे. पण पहिल्या पाच रात्री तो प्रयत्न पुरेसा पडला नाही, तुझी भीती त्याहून प्रबळ होती. आणि तरीही तू वाचलास, याचं कारण मंत्र नव्हता."
"मग?"
"मोहिनी." देवप्पाचा आवाज आता श्रद्धेने भरलेला. "जेव्हा मंत्र अपुरा पडला, तेव्हा तिनेच स्वतः तुझं रक्षण केलं, प्रत्येक वेळी. फक्त सहाव्या रात्री, जेव्हा धोका सर्वांत जास्त होता, तेव्हा माझा तो प्रयत्न आणि तुझी स्वतःची शक्ती दोन्ही एकत्र आले, आणि मंत्र अखेर तुझ्या ओठांवर आला."
अभिजित हे सगळं समजून घेत काही क्षण स्तब्ध राहिला, "म्हणजे मी एकटा कधीच नव्हतो. तुम्हीही दूरून लढत होतात, आणि मोहिनीही."
"हो आणि हेच समजून घे, अभिजित. हा जो अदृश्य धागा आपल्यात आहे, त्यावरही मर्यादा आहे. मी दूर बसून तुला वाचवू शकत नाही कायमचा."
देवप्पाचा आवाज किंचित खाली आला, जणू पुढचं वाक्य बोलायला त्याला स्वतःलाही कष्ट पडत होते. "हा जो सहाव्या रात्रीचा हल्ला होता, तो कल्लेश्वरची खरी ताकद नव्हती. ती फक्त चाचणी होती. त्याची खरी शक्ती पेलणं सध्या तरी तुझ्या आवाक्याच्या बाहेर आहे."
फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ त्या शब्दांवर विचार करत राहिला... देवप्पाचा तो अदृश्य, सूक्ष्म प्रयत्न, मोहिनीचं सतत असणारं रक्षण, आणि समोर वाढून ठेवलेली ती अजून न दिसलेली खरी लढाई.
************************************************************************************************************************
अभिजितने रात्री उशिरा बातम्यांचं चॅनेल लावलं, आणि स्क्रीनवर जे दिसलं, त्याने त्याला खूपच हतबल झाल्यासारखं वाटू लागलं.
दिल्लीत मेणबत्ती मोर्चा - महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरुद्ध देशव्यापी संताप.
कॅमेरा दिल्लीतल्या एका मोठ्या चौकावर फिरत होता. हजारो लोक, हातात मेणबत्त्या, फलक, घोषणा देत रस्त्यावर उतरलेले. वृत्तनिवेदक सांगत होती...गेल्या दोन आठवड्यांत, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अगदी उत्तरेकडच्या काही राज्यांतही अशाच घटनांमध्ये असामान्य वाढ नोंदवली गेली होती.
स्वाती त्याच्या शेजारी येऊन बसली, स्क्रीनकडे बघत तिचा चेहराही उतरला. "अभिजित, हे तर आता सगळीकडे पसरतंय."
"हो." अभिजितचा आवाज कोरडा झाला. "देवप्पा म्हणाले होते, जशी जूनची रात्र जवळ येईल, तितकं हे वाढेल. पण इतक्या वेगाने, इतक्या दूरवर पसरेल, असं वाटलं नव्हतं."
अभिजितने टीव्ही बंद केला, आणि बराच वेळ काळोख्या स्क्रीनकडे बघत बसून राहिला.
आता हा प्रश्न फक्त त्या बारा बेपत्ता स्त्रियांचा राहिला नव्हता, फक्त एका कुटुंबाचा किंवा एका गुहेपुरताही मर्यादित राहिला नव्हता. त्या अंधाराची सावली आता अख्ख्या देशाच्या रस्त्यांवर उतरली होती...मेणबत्त्यांच्या थरथरत्या उजेडात, हजारो अनोळखी चेहऱ्यांच्या संतापात आणि न्यायासाठी उठलेल्या आवाजांत.
पण त्या सगळ्यांना एक गोष्ट माहीत नव्हती, ते नेमकं कुणाविरुद्ध लढत होते.
"स्वाती, हा ताण, रात्रीची ती पिशाच्चं; आता मला हे सहन होत नाहीये. मला वाटतं आता उशीर करून चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर देवाप्पाला भेटणं आवश्यक आहे." अभिजित थकलेल्या स्वरात म्हणाला.
स्वातीचा चेहरा गंभीर झाला. "मला समजतंय, अभिजित."'
"मी ठरवलंय," अभिजित म्हणाला, आवाजात आता एक निर्णायक स्पष्टता. "आता वेळ दवडायची नाही. मी नेहालासुद्धा सांगतो. आपण या शुक्रवारी सुप्याला जाऊया आणि तिथून देवाप्पाकडे.
************************************************************************************************************************
निघायच्या दोन दिवस आधी, अभिजित तलवार आणायला सुप्याला जायचं ठरवत असताना, त्याच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता दाटून आली.
"बाबांना काय सांगू?" तो स्वातीला म्हणाला, बॅग भरता भरता हात थांबवत. "आधीच त्यांना संशय आलाय आणि आता अचानक जाऊन 'तलवार द्या' म्हणणं..."
त्याचा तो नेहमीचा भिडस्त स्वभाव आत्ता, या क्षणी, त्याला पुरता जखडून टाकत होता. वडिलांसमोर उभं राहून खोटं बोलणं, किंवा अर्धसत्य सांगणं दोन्ही त्याला जड जात होतं.
स्वातीने त्याच्याकडे बघितलं, त्याचा हा गोंधळ ओळखून. "मी बोलते त्यांच्याशी. तू काळजी करू नकोस फक्त माझ्या बरोबर उभा राहा."
निघायचा दिवस उजाडला. पण अडचण होती ती मुलांची. अथर्व आणि अनन्या दोघांच्याही परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यांना एवढ्या लांब घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता; ते दोघं घरीच राहणार होते.
"पण आपण दोघं नसताना हे घरी राहतील ना व्यवस्थित यावेळी?" स्वातीने पुन्हा एकदा काळजीने विचारलं.
"आई, मी अकरावीत आहे, चिल्लर नाही आता," अनन्या हसत म्हणाली. "सगळं मॅनेज करेन मी. अथर्वचाही अभ्यास बघेन. तुम्ही टेन्शन-फ्री जा."
"हो ना!" अथर्व लगेच मध्येच म्हणाला. "मागच्या वेळीही असंच म्हणाली होती. आणि दुसऱ्याच दिवशी मला भांडी घासायला लावली होती."
"अरे, दोनच ताटं धुवायला सांगितली होती," अनन्या लगेच म्हणाली.
"दोन ताटं? मग कढई, कुकर, तवा, डबे... ते सगळं कोणी धुतलं होतं?" अथर्वने भुवया उंचावत विचारलं.
अभिजित आणि स्वाती दोघेही हसले.
"ते घरचं काम आहे, शिक्षा नाहीये, ओके?" अनन्या नाक मुरडत, हातवारे करत म्हणाली.
अभिजित हसत म्हणाला, "ठीक आहे. भांड्यांवरून भांडू नका. दोघांनी काम वाटून घ्या आणि अभ्यासाला जास्त वेळ द्या."
शेवटी शेजारच्या काकूंना मुलांकडे लक्ष ठेवायला सांगितलं. सकाळ-संध्याकाळ फोन करायचं ठरलं. घरातल्या सगळ्या सूचना पुन्हा एकदा देऊन झाल्यावर निघायची वेळ आली. अभिजित दाराशी थांबला. त्याने आधी अथर्वच्या डोक्यावरून हात फिरवला, मग अनन्याजवळ जाऊन म्हणाला, "अभ्यास नीट करा. आणि दार कुणासाठीही उघडायचं नाही. अनोळखी माणसासाठी तर अजिबात नाही."
"बाबा, तुम्ही ना उगीच टेन्शन घेता, खाली वॉचमन काका २४/७ बसलेले असतात. कुणी अनोळखी माणूस बिल्डिंगमध्ये घुसलाच, तरी वरपर्यंत पोहोचूच देणार नाहीत, चिल मारा." अनन्या हसत म्हणाली आणि त्याच्या गळ्यात पडली.
त्याने काहीही न बोलता, तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला.
गाडीत बसताना त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं. अथर्व आणि अनन्या दारात उभे राहून हात हलवत होते. पण त्याच्या मनातली धाकधूक काही कमी होत नव्हती. मुलांना असं मागे सोडून जाण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही तो आणि स्वाती दोन-तीन दिवसांसाठी बाहेर गेले होते. पण यावेळी का कोण जाणे, घरापासून दूर जाताना त्याच्या मनावर एक अनामिक दडपण बसलं होतं.
ती काळजी मुलांबद्दल होती की पुढे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या अज्ञात संकटाबद्दल, हे त्यालाही समजत नव्हतं.
गाडी सोसायटीच्या गेटबाहेर पडली, मुंबईच्या रस्त्यांतून वाट काढत निघाली. स्वाती शेजारी बसून खिडकीबाहेर बघत होती, तिच्याही चेहऱ्यावर तीच अनामिक अस्वस्थता.
"नेहा कुठे भेटणार आहे आपल्याला?" स्वाती म्हणाली.
"आपण आधी सुप्याला जायचं, मग तलवार घेऊन सातारा; तिथे आपल्याला नेहा भेटेल, आणि तिथून एकत्र कुमठ्याला." अभिजित म्हणाला,
स्वातीने मान हलवली, आणि दोघेही काही वेळ शांत राहिले…मागे राहिलेल्या त्या आपल्या मुलांचा, आणि पुढे वाट बघणाऱ्या त्या अनिश्चित प्रवासाचा विचार करत.
सुप्याला पोहोचल्यानंतर जेवण आटोपलं. अभिजित आतल्या खोलीत काहीतरी शोधत होता. तेवढ्यात स्वातीने वडिलांच्या शेजारी येऊन हळू आवाजात विषय काढला.
"बाबा, एक सांगायचं होतं."
वडिलांनी तिच्याकडे पाहिलं.
"अभिजितला हल्ली बरं वाटत नाहीये. झोप नीट लागत नाही, तब्येतही जरा ढासळली आहे. आम्ही एका ओळखीच्या गुरुजींना दाखवलं. ते कर्नाटकातले आहेत. त्यांनी सांगितलं की आपल्या कुळाचारात कुठेतरी खंड पडला आहे आणि त्याचा परिणाम अभिजितच्या तब्येतीवर होतोय."
वडिलांनी कपाळावर आठ्या आणल्या. "कुळाचारात खंड?"
"हो." स्वातीने हळूच मान हलवली. "आपण खंडोबा आणि तुळजाभवानीची पूजा करतो; पण गुरुजी म्हणाले, त्याआधी आपल्या मूळ घराण्याशी संबंधित काहीतरी कुळाचार होता, जो कालांतराने विसरला गेला. तो पुन्हा सुरू केला, तर अभिजितचा त्रास कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे."
ती बोलताना जाणीवपूर्वक सावध शब्द वापरत होती. अभिजितवर आलेल्या संकटाचा उल्लेख तिने टाळला; पण सांगितलेल्या गोष्टीत खोटं काहीही नव्हतं.
"म्हणून आम्ही कर्नाटकात जाणार आहोत," ती पुढे म्हणाली. "काही विधी करायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्या घराण्यातली तलवार लागेल असं गुरुजींनी सांगितलंय. शस्त्रपूजेसाठी."
" तलवार?" त्यांनी विचारलं. "देवघरामागच्या त्या जुन्या कपाटातय, दर दसऱ्याला गावात सोनं लुटायच्या आदी तिला मान असतोय. आदी तिची पूजा आन मंगच सोनं लुटाय सुरुवात व्हती. जपून न्या आन जपून आणून ठिवा व्हती तशी, काय?"
"बरं बाबा" स्वाती म्हणाली
आतून अभिजित कापडात गुंडाळलेली ती तलवार घेऊन बाहेर आला. त्याने ती अलगद वडिलांसमोर ठेवली. वडिलांनी काही क्षण त्या तलवारीकडे पाहिलं आणि मग अभिजितकडे. जणू अभिजितने त्यांना सगळं सांगितलं नसलं, तरी आपला मुलगा ज्या कारणासाठी निघाला आहे, ते योग्यच असणार, याची त्यांना कुठेतरी मनोमन खात्री पटली होती.
************************************************************************************************************************
मुंबईतल्या घरात, त्याच रात्री
अनन्या तिचा अभ्यास करत जागी होती. टेबलावर पुस्तकं, वही आणि नोट्स अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. कानात इयरफोन्स होते आणि मोबाईलवर मंद आवाजात संगीत सुरू होतं. खिडकीबाहेरची रात्र मात्र अधिकाधिक गडद होत चालली होती.
अथर्व केव्हाच शेजारच्या बेडवर गाढ झोपला होता. घरात आई-बाबा नसल्यामुळे नेहमीपेक्षा काहीसं जास्तच शांत वाटत होतं. अनन्याने एकदा घड्याळाकडे पाहिलं, रात्रीचा एक वाजून गेला होता.
तिने पुस्तक बंद केलं आणि खुर्चीत मागे रेलली. "बस झालं आज," ती स्वतःशीच पुटपुटली. इयरफोन्स काढून तिने टेबलावर ठेवले.
तहान लागल्याने ती उठली, पाणी प्यायला स्वयंपाकघराकडे निघाली. हॉलमध्ये अंधार होता. फक्त खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या फिकट प्रकाशामुळे फर्निचरच्या अस्पष्ट सावल्या जमिनीवर पडल्या होत्या.
स्वयंपाकघरातुन पाणी पिऊन परत येताना तिची नजर सहज खिडकीच्या कठड्याकडे गेली आणि तिथे तिला एक चपातीचा तुकडा दिसला, अर्धवट कुरतडलेला. दुपारी तिने एक कावळा खिडकीच्या ग्रीलवर बसलेला पहिला होता. "त्यानेच टाकला असणार." ती पुटपुटली.
तिने तो तुकडा हाताने उचलला, कचऱ्याच्या डब्याकडे फेकायला आणि त्या स्पर्शाबरोबरच, तिच्या बोटांतून एक विचित्र, थंड शिरशिरी वर चढली; हातातून, मनगटातून, थेट डोक्यापर्यंत. अनन्याला अचानक पायाखालची फरशी असह्य थंड जाणवली. एसीही बंद होता; तरी त्या थंडीत काहीतरी अनैसर्गिक होतं. क्षणभर तिला वाटलं, पायाखालून बर्फाची लहरच सरकून गेली.
ती थबकली. नजर नकळत खाली गेली. आणि तिचा श्वास अर्ध्यावरच थांबला. फरशीवर तिच्या पावलांच्या मागोमाग बारीक राखेचे ठसे उमटले होते. एकामागोमाग एक. स्वयंपाकघरापासून अगदी तिच्या पायांपर्यंत.
अनन्या काही क्षण निश्चल उभी राहिली. तिने स्वतःच्या पायांकडे पाहिलं. पाय स्वच्छ होते. तिने चपला घातल्याही नव्हत्या; तरी फरशीवर उमटलेले ते ठसे मात्र जणू कुणीतरी राखेवरून चालत तिच्या मागोमाग आले होते. तिने हळूहळू मागे वळून पाहिलं. हॉल रिकामा होता. पण ते ठसे तिथे होते.
अनन्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात तिच्या नाकात एक उग्र वास शिरला. जळक्या राखेचा. तिने नकळत नाकावर हात ठेवला. वास अधिक तीव्र झाला. घरातली हवा अचानक जड झाली. जणू खोलीतलं सगळं ऑक्सिजन कुणीतरी हळूहळू शोषून घेत होतं. अनन्याला छातीवर अदृश्य वजन ठेवल्यासारखं वाटलं.
लिव्हिंग रूममधला बंद टीव्ही अचानक क्षणभर लुकलुकला. काळ्या स्क्रीनवर एक फिकट, राखाडी प्रकाश उमटला...आणि पुढच्याच क्षणी पुन्हा अंधार.
अनन्याने दचकून कानांवर हात ठेवले. भिंतीच्या पलीकडून काहीतरी ऐकू येत होतं. अगदी अस्पष्ट. कुणीतरी पुटपुटत असल्यासारखं. शब्द समजत नव्हते; पण तो आवाज थांबत नव्हता. मंद... संथ... एकसारखा. जणू कुणीतरी फार लांबून, एखाद्या जुन्या भाषेत, सतत काहीतरी म्हणत होतं. तिच्या मनाचं दार ठोठावत होतं, तिला आतून बोलावत होतं.
अनन्याचे डोळे अर्धवट मिटले, तिचं शरीर एका विचित्र तंद्रीत झुकू लागलं. ती त्या हाकेला ओ द्यायलाच निघाली होती आणि त्याच क्षणी, तो हातातला चपातीचा तुकडा तिच्या घामेजल्या बोटांतून निसटून खाली पडला.
अनन्या दचकून पूर्णपणे भानावर आली, धापा टाकत, गोंधळलेली. तिने खाली बघितलं; तो चपातीचा तुकडा आता जळून काळा झाला होता, त्याच्याभोवती फरशीवर एक बारीक, काळपट डाग.
ती किंचाळायचा प्रयत्न करत होती, पण आवाजच फुटत नव्हता. पाय जमिनीला जखडल्यासारखे झाले होते. तिने हलण्याचा प्रयत्न केला, पण शरीराने साथ दिली नाही.
आणि मग तिला जाणवलं...कुणीतरी तिला पाहत होतं. कुठून, हे तिला कळत नव्हतं पण ती नजर तिच्यावर स्थिर होती.
जणू कुणीतरी तिच्या आत डोकावून पाहतंय आणि तिच्यातलं काहीतरी वाचायचा प्रयत्न करतंय.
अनन्याच्या डोळ्यांत भीती दाटली. तिने पूर्ण ताकदीने किंचाळण्याचा प्रयत्न केला. पण आवाज फुटलाच नाही.
आणि अचानक, तितक्याच अचानकपणे, सगळं थांबलं...तो पुटपुटण्याचा आवाज बंद झाला. हवेतला तो जडपणा विरला. तिच्या नजरेसमोरची खोली पुन्हा नेहमीसारखी झाली होती. तिने खाली पाहिलं. राखेचे ठसे गायब झाले होते. एकही ठसा शिल्लक नव्हता. तिने घाबरून टीव्हीकडे पाहिलं. टीव्ही पुन्हा बंद, निर्जीव दिसू लागला.
तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि घाईघाईने बेडरूमकडे धाव घेतली. दार उघडून बघितलं; अथर्व गाढ झोपलेला, शांत, निवांत, जणू काहीच घडलं नव्हतं. तिने त्याच्या बाजूला बसकण मारली, त्याच्या पलंगाला टेकून, गुडघ्यांत डोकं खुपसलं. ते फक्त एक वाईट स्वप्न होतं, ती स्वतःलाच समजावत राहिली. थकवा असेल, अभ्यासाचा ताण असेल.
पण मनाच्या कुठल्यातरी खोल कोपऱ्यातून एकच उत्तर पुन्हा पुन्हा येत होतं...ते स्वप्न नव्हतं.
तिने मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर आई-बाबांचा नंबर दिसत होता. एक क्षण तिचं बोट कॉलच्या चिन्हावर थांबलं. नाही. आत्ता नाही. हे आई-बाबांना सांगणं म्हणजे जे घडलं ते खरं असल्याचं स्वतःसमोर मान्य करणं होतं. आणि त्यासाठी ती अजून तयार नव्हती.
त्या रात्रीची उरलेली वेळ तिने अथर्वच्या पलंगाला टेकूनच काढली. दार घट्ट बंद होतं. खोलीतला दिवा रात्रभर चालू होता आणि मनात एक अनामिक, न बोलता येणारी भीती.
************************************************************************************************************************
त्या पडक्या देवळाच्या एका अंधाऱ्या कोनाड्यात, कल्लेश्वर जमिनीवर बसला होता . त्याच्यासमोर जमिनीवर एक जुनं, मळकट कापड पसरलेलं होतं. कापडावर काळ्या रंगाने काही विचित्र रेषा, वर्तुळं आणि अस्पष्ट चिन्हं काढलेली होती. त्या सगळ्यांच्या मध्यभागी एक धूसर आकृती उमटलेली होती.
कल्लेश्वरने त्या आकृतीकडे पाहत कापडाच्या मध्यभागी तळहात ठेवला आणि डोळे मिटले. मग त्याच्या ओठांतून शब्द बाहेर पडू लागले. त्याचा आवाज सुरुवातीला इतका मंद होता की शब्द ओळखू येत नव्हते. मग तो हळूहळू स्पष्ट झाला.
बारे बारे मंगुवे, कण्णु मुच्चु, मनसु तेरे,
नन्न करेगे कानु कोडु,
नन्न मातु केळु,नन्न मातेगे बंधु नडु...
मनसु नन्नदागु, नेनपु नन्नदागु,
निद्दे नन्नदागु, हेज्जे नन्न कडे बागु...
बाऽ... बाऽ... फट्!
(ये बाळा ये, डोळे मिट, मन उघड,
माझ्या हाकेकडे कान दे,
माझे शब्द ऐक, माझ्या शब्दांच्या मागे चालत ये...
तुझे मन माझे होवो, तुझ्या आठवणी माझ्या होवोत,
तुझी निद्रा माझ्या अधीन होवो, तुझे पाऊल माझ्याकडे वळो...
ये... ये... फट्!)
कल्लेश्वरच्या ओठांवर एक विकृत स्मित उमटलं. त्याने पुन्हा तो मंत्र सुरू केला, यावेळी अधिक तीव्रतेने, त्याचा आवाज आता टिपेला पोहोचला होता. भोवतीची हवा तापू लागली, आणि त्या मळकट कापडावरची ती अस्पष्ट प्रतिमा क्षणभर हलल्यासारखी वाटली जणू ती जिवंत होत होती.
पण नेमक्या त्याच क्षणी, कल्लेश्वरचा चेहरा एकदम विस्कटला, वेदनेने वाकडा झाला. त्याने एक कर्कश आरोळी ठोकली, आणि मागे झेपावला, त्याचा हात त्या कापडावरून झटक्यात दूर झाला.
"बाबा!" जोगी घाबरून धावले.
कल्लेश्वर धापा टाकत जमिनीवर बसून राहिला, त्याच्या हातावर, ज्याने तो कापड धरलं होतं, एक ताजा, भाजल्यासारखा व्रण उमटला होता.
"अडथळा आला," तो रागाने थरथरत गुरगुरला, "तिच्याभोवती एक कवच आहे. मी आत शिरणार, तितक्यात मला बाहेर ढकललं गेलं."
कल्लेश्वरने त्या भाजलेल्या हाताकडे बघितलं, त्याच्या डोळ्यांत आता राग आणि एक नवं कुतूहल दोन्ही मिसळलेलं. "माहीत नाही अजून. पण जे काही आहे, ते साधं नाहीये."
"पण हरकत नाही," तो पुटपुटला, "आज नाही जमलं, तर परत प्रयत्न करेन. आणि जे कवच आज मला अडवू शकलं, ते कायमचं टिकणार नाही"
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्याहून निघाल्यावर अभिजित आणि स्वाती सातारला पोहोचले. एका छोट्याशा हॉटेलबाहेर नेहा आधीच त्यांची वाट पाहत उभी होती. खांद्यावर बॅग होती आणि त्यांची गाडी दिसताच ती हात हलवत पुढे आली.
"सर!" ती जवळ येत म्हणाली, "प्रवास कसा झाला?"
"ठीक झाला," अभिजित गाडीतून उतरत म्हणाला. "वडिलांना पटवलं. तलवारही मिळाली."
बॅग ठेवताना नेहाची नजर डिक्कीतल्या कापडात गुंडाळलेल्या तलवारीकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर एक वेगळाच भाव उमटला…कुतूहल, आदर आणि कुठेतरी आत दडलेली भीती.
"सन्कन्नाची तलवार..." ती हळू आवाजात म्हणाली. जणू त्या नावाचा उच्चार करतानाच त्या जुन्या शस्त्राचं वजन तिला जाणवलं होतं.
नेहा एकटीच गाडीच्या मागच्या सीटवर बसली. ती काहीशी संकोचून पुढच्या सीटवर बसलेल्या अभिजित आणि स्वातीकडे पाहत होती. तिच्या मनात काहीतरी होतं, पण ते बोलावं की नाही, याचा तिला अंदाज येत नव्हता. स्वातीने तिचा संकोच ओळखला. ती काही न बोलता मागच्या सीटवर तिच्या शेजारी येऊन बसली.
"नेहा, कशी आहेस?" स्वातीने हसत विचारलं.
नेहाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. "मी छान आहे. तू कशी आहेस?"
"मीही छान."
दोघी काही क्षण सहज गप्पा मारत राहिल्या. नेहाच्या चेहऱ्यावरचा ताणही हळूहळू कमी झाला.
काही वेळाने गाडीने सातारा मागे सोडलं आणि कुमठ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रस्ता हळूहळू घाटाकडे वळत होता. शहराची गर्दी मागे पडत गेली आणि दोन्ही बाजूंना डोंगररांगा, दाट झाडी आणि वळणावळणाचे रस्ते दिसू लागले.
पुढे कर्नाटकचा लांब प्रवास होता. मधुकेश्वर मंदिर होतं, शिलालेख होता आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे कदाचित अभिजितच्या घराण्याचं अनेक शतकांपासून दडलेलं रहस्य त्यांची वाट पाहत होतं.
************************************************************************************************************************
आजी आणि मामा घराच्या मागच्या पडवीत बसले होते, दोघेही शांत, काहीतरी गहन विचारात गढलेले.
"आई," मामा अखेर म्हणाला, आवाजात एक संकोच. "नेहा आता तीस वर्षांची होत आलीय. मला वाटतंय, आता तिला सगळं सांगून टाकावं."
आजींनी वर बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर एक तात्काळ अस्वस्थता उमटली. "सगळं म्हणजे?"
"तिच्या बाबांबद्दल. लीलाबद्दल. तिच्या जन्मदिवशी घडलेल्या घटनेबद्दल." मामाचा आवाज ठाम होता.
"आपण तिला नेहमी सांगत आलोय, तिचे बाबा आणि लीला अपघातात गेले. पण खरं तर त्यात बरंच काही अर्धवट आहे, आई. राजेशचा मृतदेह सापडला, हे खरं पण लीलाचा आजतागायत काहीच मागमूस लागला नाही. ना मृतदेह, ना कसलीच खूण. हे तिला कधीच सांगितलं नाही आपण."
आजी बराच वेळ गप्प राहिल्या, हातातला चहाचा कप थंड होत गेला.
"मला भीती वाटते," त्या अखेर म्हणाल्या, आवाज दाटलेला. "मला भीती वाटते की ती हे पचवू शकणार नाही."
"का?"
"विचार कर, तिने आयुष्यभर मानलंय की तिच्या जन्मानंतर काही महिन्यांनी तिचे बाबा आणि मामी एका साध्या अपघातात गेले, दुर्दैवी पण साधं, समजण्यासारखं दुःख. आणि आता जर आपण सांगितलं 'तुझ्या जन्माच्याच दिवशीच तुझ्या बाबांचा मृतदेह सापडला, आणि मामी कधीच सापडली नाही, आणि आम्हाला अजूनही कळलेलं नाही का' तर हे तिच्या मनाला किती मोठा धक्का देईल? इतकी वर्षं तिने जे शांतपणे स्वीकारलं होतं, ते अचानक एक न सुटलेलं कोडं बनून समोर येईल."
मामा तिच्या शेजारी सरकला, तिचा हात हातात घेतला. "पण आई, जर आपण सांगितलं नाही, आणि तिला दुसरीकडून काही कळलं तर..."
"तर मग सांगू. तिथेच, त्याच क्षणी." आजींनी त्याचा हात घट्ट धरला. "पण आधी नाही."
काही वेळ शांतता राहिली. मग मामाने हळू आवाजात विचारलं, "आई, खरं सांग, आपण हे सगळं लीलाच्या गायब होण्याचे कोडे सोडवण्यासाठी करतोय का?"
आजींनी त्याच्याकडे बघितलं, त्यांच्या डोळ्यांत एक जुनी, खोल वेदना आणि तितकीच जुनी आशा.
"दोन्हीसाठी," त्या म्हणाल्या. "अभिजित खरा आहे, त्याचं दुःखही खरं आहे, आणि त्याला मदत करणं हे माणुसकीचं कर्तव्य आहे. पण शेखर, मी खोटं बोलणार नाही पण जेव्हापासून अभिजितने ती बखर, ती तारीख, ते सगळं सांगितलं, तेव्हापासून माझ्या मनात एकच प्रश्न पुन्हा जागा झालाय. लीलाचा मृतदेह का सापडला नाही? राजेश सापडला, पण ती का नाही? जर हे भस्मबीज खरंच अस्तित्वात असेल, तर कदाचित त्याचं उत्तरही याच शोधाच्या शेवटी सापडेल."
मामाने डोळे मिटले. "आणि जर उत्तर भयंकर असेल तर?"
"तरीही उत्तर हवंय मला," आजी म्हणाल्या, आवाजात एक अटळ निर्धार. "तीस वर्षं अर्धवट सत्यासोबत जगण्यापेक्षा, एकदाचं पूर्ण उत्तर घेऊन जगणं बरं मग ते उत्तर कितीही भयंकर का असेना."
बापरे...
बापरे...
अजूनच डार्क मोड वर येते आहे कथा..
लवकर लवकर भाग येऊ देत...
नेहमीप्रमाणे हा भाग पण
नेहमीप्रमाणे हा भाग पण उत्कंठावर्धक!
अनन्याची काळजी लागून राहिली आहे, पण कदाचित मोहिनी रक्षण करतेय तिचं.
लवकर लवकर भाग येऊ देत... >>> +१
उत्कंठावर्धक....
उत्कंठावर्धक....
आता अनन्याचा घोर लागून राहिला पण सुष्ट शक्ती तिच्या आणि अभिजितच्या पाठी आहे त्यामुळे निश्चिंत.
नेहाबद्दलचे गूढ वाढत चालले आहे.
पुढचा भाग लवकर टाका.
तिचे बाबा आणि मामी एका साध्या
तिचे बाबा आणि मामी एका साध्या अपघातात गेले + आणि मामी कधीच सापडली नाही >>>> मामी कशी? आई ना ?
अरे बापरे! पु भा प्र
अरे बापरे!
पु भा प्र
वाटलच होत, अभिजीत बरोबरचे
वाटलच होत, अभिजीत बरोबरचे सगळे जण ह्यात ओढले जातील.
१३ वी कोण असणार नेहा, स्वाती की अनन्या?
नेहा ची आई पहिली होती का?
उत्कंठा वाढतेय आणि ह्या कथेत गुंतले जातोय .
काल भूत बांगला बघितला, थोड साम्य वाटल पण सिनेमा अगदीच टुकार आहे.
ह्या कथेचा दर्जा कित्येक पटीनं भारी आहे.
मला वाटत हे प्राचीन काळातील असुरला पुनर्जीवित करून त्याच्या कडून शक्ती प्राप्ती करायची, त्यासाठी बळी द्यायचे हे सूत्र बऱ्याच कथेत वापरलं जाऊ शकतं.
पण ह्या कथेत पौराणिक संदर्भ आणि आत्ताच्या वास्तवतेचा छान उपयोग केलाय.
ही कथा एवढी भरलीय डोक्यात की काल तो सिनेमा पाहिला आणि हा भाग पण रात्री वाचला. मधेच जाग आली आणि भिंतीवर दोन लुकलुकणारे ठिपके दिसले, काय घाबरलो ना राव, पण लगेच लक्षात आलं की ते smoke detector चे LED आहेत. काय पण डोक्यात भरलय, उद्या किचन मधे काही करपल तर उगाच राखेचा वास आला अस वाटेल.
नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक!
नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक!
लवकर लवकर भाग येऊ देत.........
… बारे बारे मंगुवे, कण्णु
… बारे बारे मंगुवे, कण्णु मुच्चु …
आले आले, साबर मंत्र आले ! कथा कर्नाटकात घडतेय, कल्लेश्वर कानडीच आहे म्हणून मंत्र कानडीत असणे एकदम लॉजिकल आहे. 👍
हिंदीतले - नवनाथी - कनफटा वगैरे ऐकले होते. हे नवीन.
जय हो !
मामी = मम्मी ?
धन्यवाद धनवन्ती, आबा.,
धन्यवाद धनवन्ती, आबा., ऋतुराज., माबो वाचक, किल्ली, manya, सामी आणि अनिंद्य!
@manya कथा वाचून भिंतीवरचे smoke detector चे दिवेही भयाण वाटू लागले, म्हणजे वातावरण मनात उतरलंय!

@ माबो वाचक आणि अनिंद्य, मामीच आहे. पुढच्या भागात खुलासा होईल.
@ माबो वाचक आणि अनिंद्य,
@ माबो वाचक आणि अनिंद्य, मामीच आहे. पुढच्या भागात खुलासा होईल.> उद्या खुलासा झाला तरी चालेल , धावेल