भस्मबीज - भाग १५

Submitted by नितनवे on 17 August, 2026 - 11:45

भस्मबीज - भाग १४
पूर्वभाग
अभिजितने मधुकेश्वर मंदिरातील लपलेल्या वीरगळामागच्या शिलालेखाचा शोध मामांना घ्यायला सांगितला, पण त्याच रात्री कल्लेश्वरच्या जोग्यांनी कवचाचा माग मिळवण्यासाठी वीरगळ चोरून नेला. पण तो वेगळाच वीरगळ असतो. आजी आणि मामांना मात्र योग्य वीरगळ सापडतो आणि डॉ. हेगडेंच्या मदतीने त्यावरील शिलालेखाचा अर्थ उलगडतो. त्यात १६२० मधील एका तृतीयपंथी साधकाच्या आत्मत्यागाचा आणि गूढ ‘भस्मशैलाचा’ उल्लेख असतो. दरम्यान कल्लेश्वरचे जोगी आणि पिशाच्च देवप्पाच्या घरावर हल्ला करतात, पण देवप्पा मोहिनी मंत्राच्या शक्तीने त्यांचा प्रतिकार करतो. हल्ल्यानंतर देवप्पाला जाणवतं की खरी लढाई आता जवळ आली आहे.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १५ - मंत्रशक्ती

याना जंगल - देवाप्पावर हल्ला झाला ती रात्र

त्या पडक्या देवळात कल्लेश्वर समोर तीन जोगी खाली मान घालून उभे होते. त्यांच्या मागे जुन्या, मळकट कापडात गुंडाळलेला एक दगड पडला होता.

कल्लेश्वर काही क्षण त्या दगडाकडे नुसता पाहत राहिला.

"हा कुठून आणलात?"

त्यापैकी एकाने घाबरत उत्तर दिलं, "मंदिराच्या आवारातून. वडाच्या झाडाखाली होता."

कल्लेश्वरने हाताने खूण केली. जोग्यांनी तो दगड उचलून त्याच्यासमोर आणला. कल्लेश्वरने त्यावरून हळूहळू हात फिरवला. त्याच्या बोटांना दगडावरची कोरीव अक्षरं जाणवत होती. काही क्षण त्याच्या डोळ्यांत उत्सुकता चमकली. मग ती अचानक नाहीशी झाली.

त्याने दगडाच्या कोरीव भागाकडे बारकाईने पाहिलं. "यात काही नाही."

कल्लेश्वरने पुन्हा दगडावर हात फिरवला. त्याच्या बोटांनी कोरीव अक्षरांचा माग घेतला. "हा फक्त वीरगळ आहे." त्याच्या आवाजातला राग आता स्पष्ट जाणवत होता. त्याने दगडावर जोरात हात आपटला, "मला हा दगड नको होता!"

तीनही जोगी दचकले. "बाबा..."

"मधुकेश्वरात काहीतरी लपवलं आहे. मला त्याचा माग हवा होता. तुम्ही हा भलताच दगड उचलून आणलात!"

तेवढ्यात एक कावळा समोरच्या दगडावर येऊन बसला, त्याने मान वाकवली आणि लालसर डोळ्यांनी कल्लेश्वरकडे पाहिलं. कल्लेश्वरची नजर त्याच्या डोळ्यांत खिळली. आणि क्षणार्धात त्याचा चेहरा रागाने आणि पराभवाच्या शरमेने लाल झाला.

"पळाले," तो पुटपुटला, स्वतःशीच, विश्वास न बसल्यासारखा. "माझी माणसं पळाली?"

हांडी जोगी कोपऱ्यात गप्प उभे राहिले, कल्लेश्वरचा राग त्यांनी आधीही बघितला होता, पण आजचा त्याचा अवतार वेगळाच होता.

"तीन जोगी जखमी," कल्लेश्वर गुरगुरला, त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. "चार पिशाच्च...चार वर्षांची माझी साधना एका क्षणात राख करून टाकली!"

त्याने हातातली मानवी कवटी संतापाने जमिनीवर आपटली, काडकन्! कवटीचे तुकडे दगडी फरशीवर विखुरले. जोगी भीतीने आणखी मागे सरकले.

"त्या म्हाताऱ्या देवाप्पाकडे अजूनही इतकी शक्ती आहे?" तो जवळजवळ स्वतःलाच विचारत होता.

एका रात्रीत त्याला दोन ठिकाणी अपयश आले होते.

कल्लेश्वर गाभाऱ्यात येरझाऱ्या घालू लागला. त्याच्या प्रत्येक पावलासोबत सभोवतालचा अंधार अधिकच जड होत गेला. हळूहळू त्याच्या भोवती काळा धूर दाटू लागला जणू त्याच्याच रागाचं मूर्त रूप.

"चूक झाली माझी," तो अखेर म्हणाला, " मी भावनेच्या भरात गेलो. या हांडी जोगिंवर विश्वास ठेवला आणि देवाप्पाच्या शक्तीला कमी लेखले."

तो हळूहळू त्यांच्याकडे वळला. त्याची नजर इतकी थंड आणि क्रूर होती, की तिघांच्याही अंगावर काटा आला.

"आता मलाच काहीतरी करावे लागेल." एका नव्या, थंड योजनेने कल्लेश्वरचे डोळे आता चमकत होते.
************************************************************************************************************************
"डॉ. हेगडे, तुम्ही जे केलंत, त्याचे शब्दांत आभार मानणं शक्य नाही." आजीनी मेसेज पाठवला.

पलीकडून हेगडेंचा रिप्लाय आला, "सुलक्षणाताई, मी गेली तीस वर्षं शिलालेखांचा अभ्यास करतोय. असंख्य शिलालेख वाचले, त्यांचा अर्थ लावला; पण हा शिलालेख काहीतरी वेगळाच आहे. मी त्यातून जे वाचलंय, त्यावरून मला असं वाटतंय की हे केवळ इतिहास संशोधनापुरतं मर्यादित नाही. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात, ते जरा जपून करा."

अभिजीतला हे सांगायला हवं असे म्हणत आजींनी नेहाकडून अभिजितचा नंबर घेतला आणि त्याला फोन लावला. संध्याकाळी, ऑफिसमधून घरी परतत असताना, अभिजितचा फोन वाजला. "हॅलो?"

"अभिजित? मी सुलक्षणा भागवत बोलतेय. नेहाची आजी."

अभिजित क्षणभर चमकला; आतापर्यंत आजींशी त्याचा थेट संवाद कधीच झाला नव्हता, सगळं नेहामार्फतच.

"नमस्कार आजी! तुम्हाला नंबर नेहाकडून मिळाला वाटतं?"

"हो, तिला विचारला मी आत्ताच." आजींचा आवाज किंचित घाईत, "तुझ्यासाठी चांगली बातमी आहे, तू सांगितलेला आणि तो चोरीला गेलेला वीरगळ हे वेगवेगळे आहेत. तू सांगितल्याप्रमाणे मामांना आणि मला बनवासीत तो वीरगळ सापडलाय...मधुकेश्वर मंदिराच्या मागच्या उपमंदिराजवळ. एका तृतीयपंथी साधकाचं चित्रण आहे त्यावर, हातात खंजीर सदृश्य हत्यार आणि त्याच्या मागे, भिंतीच्या तळाशी, एक शिलालेखही सापडला."

"काय सांगताय आजी! आणि त्या शिलालेखावर काय लिहिलंय?" अभिजीतला आपली उत्सुकता आवरता येत नव्हती.

"जुनी कन्नड मोडी. मला वाचता आली नाही, म्हणून डॉ. रामचंद्र हेगडेंची मदत घेतली; पुरातत्व खात्यातले, धारवाडचे, जुनी ओळख आहे माझी त्यांच्याशी. त्यांनी लिप्यंतर करून दिलंय."

"आधी त्या साधकाबद्दल थोडं; कुणालातरी वाचवताना बलिदान दिलं, नाव कुठेच नाही, फक्त 'नाम न ज्ञायते, कर्म एव स्मर्यते' अशी ओळ आहे." आजींनी क्षणभर श्वास घेतला. "आणि त्याखाली एक श्लोक आहे, संस्कृतमध्ये. वाचून दाखवते."

तिने सावकाश, स्पष्ट उच्चारात तो संपूर्ण श्लोक वाचला, अभिजितने ते शब्द मनात साठवत ऐकलं, आणि शेवटी विचारलं, "आणि याचा अर्थ?"

"डॉ. हेगडेंनी ढोबळ अर्थ सांगितलाय, पण अभिजित, खरं सांगू का? हे नुसतं शब्दशः भाषांतर आहे. यातलं प्रत्यक्ष काहीच अजून स्पष्ट नाही."

अभिजितचा उत्साह किंचित मावळला. "म्हणजे आपण अजूनही अंधारातच आहोत."

"अजून तरी हो," आजी म्हणाल्या. "पण मला असा वाटतंय कि हे उत्तर मी शोधून काढेन. पण त्याआधी, आता काही गोष्टी थेट बोलणंच बरं."

"बोला आजी, अजिबात हरकत नाही."

"मी स्वतः तुमच्या घराण्याची बखर लिप्यंतरित केली. सन्कन्नांची कहाणी, ते बिजासुराशी दिलेलं युद्ध हे सगळं माझ्याच हातातून गेलंय. आणि आता हा शिलालेख, हा वीरगळ, हे कवच..." त्या क्षणभर थांबल्या. "मला वाटतं, मी यात इतकी खोलवर गुंतलेय, आता मला संपूर्ण गोष्ट, सुरुवातीपासून, तुझ्याच तोंडून ऐकायचीये."

अभिजित काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, "बरोबर आहे तुमचं, आजी. तुम्ही इतकी मदत केलीत, तुम्हाला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे."

तो रस्त्याच्या कडेला एका बाकावर बसला, आणि दीर्घ श्वास घेऊन अभिजितने सांगायला सुरुवात केली.

त्याला पडलेली ती स्वप्न, जिल्हा अभिलेखागारातला तो शोध, अधिक मास अमावस्येला बेपत्ता झालेल्या बारा स्त्रिया, मग देवप्पाची पहिली भेट, यानाची गुहा, बारा कोरीव खुणा आणि रिकामी तेरावी. आणि मग मल्लीची कहाणी, चंद्रिका, तो अन्याय, आणि कल्लेश्वरने त्याला दिलेलं ते खोटं आश्वासन.

आजी शांतपणे मध्येच एखादा दीर्घ श्वास सोडत ऐकत राहिल्या.

अभिजितने पुढे सांगू लागला, सुप्याच्या वाड्यातला तो माळ्यावरचा भयंकर प्रसंग, बखर सापडणं, रस्त्यावरचा तो प्रसंग आणि शेवटी तो खंडोबा मंदिरात घडलेला दृष्टांत.

"आजी, तुम्ही आणि मामांनी आत्तापर्यंत आमच्यासाठी जे काही केलंत, त्याबद्दल मी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. तुमच्या मदतीशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचलोच नसतो. पण आता पुढचा मार्ग खूप धोकादायक आहे. त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही दोघांनीही यापुढे कोणताही धोका पत्करू नका. तुम्ही आतापर्यंत जे केलंत, तेच आमच्यासाठी खूप मोठं आहे."

"हा शोध आता फक्त तुमचा उरलेला नाही, अभिजित. हा आता काही कारणांसाठी आमचाही झालाय आणि आता यातून आम्ही माघार घेणार नाही" आजींच्या आवाजातली ती अनपेक्षित तीव्रता पाहून अभिजित विस्मयचकित झाला.

"आजी, नेहाच्या संबंधित आहे का काही?" अभिजितने विचारलं.

फोनवर एक क्षणभर शांतता पसरली. इतकी की अभिजितला वाटलं फोन कट झाला की काय. "नंतर सांगेन ते," आजी अखेर म्हणाल्या.

फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ त्या शब्दांवर विचार करत राहिला; आजींच्या आवाजातली ती अनपेक्षित तीव्रता, आणि तो अर्धवट सोडलेला खुलासा, त्याच्या मनात एक अनुत्तरित प्रश्न सोडून गेला.

आजींचा फोन ठेवल्यावर अभिजितने लगेच देवप्पाला फोन लावला.

"देवप्पा, नेहाच्या आजींनी फोन केला होता. एक वीरगळ सापडलाय बनवासीत, शिलालेखही. पण श्लोकाचा पूर्ण अर्थ अजून लागलेला नाही.

पलीकडे देवप्पाचा आवाज आला, त्यात एक विलक्षण, न लपवता येणारा उत्साह होता, "वीरगळ सापडला?" तो जवळजवळ हसतच म्हणाला, "अभिजित, तुला कल्पना नाही, हे किती मोठं आहे. चारशे वर्षांत, कधीच, कुणालाच ही जागा सापडली नव्हती. फक्त आख्यायिकाच उरली होती, आणि तीही अर्धवट."

अभिजितला त्याच्या आवाजातला तो कंप जाणवला.

"श्लोकाचा अर्थ अजून लागलेला नाही, हे मी ऐकलं," देवप्पा पुढे म्हणाला, "पण अभिजित, तो लागेलच. आता एवढं जवळ आल्यावर, बाकीचं थांबणार नाही. मला खात्री आहे." त्याच्या आवाजात एक दुर्दम्य आशा होती.

"बरं झालं फोन केलास," देवप्पा म्हणाला, गंभीर आवाजात,"मलाही तुला काहीतरी सांगायचं होतं."

त्याच्या आवाजातला तो बदल अभिजितला लगेच जाणवला. "काय झालं, देवप्पा?"

"काल रात्री माझ्या घरावर हल्ला झाला."

अभिजितचा श्वास अडकला. "काय? तुम्ही ठीक आहात ना?"

"मी ठीक आहे. यल्लाप्पा आणि धर्म-शास्त रक्षकांनी मदत केली, आणि मोहिनी-मंत्राने ते हल्ले परतवले. पण अभिजित, हा फक्त इशारा होता. कल्लेश्वर आता उघडपणे हल्ला करायला लागलाय."

अभिजितच्या मनात भीतीची एक थंड लाट उठली. "म्हणजे आम्ही? आम्हाला काही धोका आहे का?"

"असू शकतो. म्हणूनच आता तयारी आणखी घाईने करायला हवी." देवप्पाचा आवाज गंभीर झाला. "ऐक नीट. मी तुला एक मंत्र देतो आत्ता. जर कल्लेश्वरने काही संकट निर्माण केलं, अचानक हल्ला केला, तर हा मंत्र म्हण. तो तुमचे रक्षण करेल."

"सांगा."

देवप्पाने सावकाश, स्पष्ट उच्चारात तो मंत्र म्हणून दाखवला.

"बस्स एवढाच" अभिजित म्हणाला.

"हो, कारण हा पूर्ण मंत्र नाही, मंत्राचा फक्त अर्धा भाग आहे. मंत्राचा पुढचा भाग कवचावर लिहिला आहे जो मलाही माहित नाही."

देवप्पा पुढे म्हणाला, "वेळ आलीये तू सिरसीला यावं. फक्त कवचासाठी नाही; तुझे कुळाचार, तुझी उरलेली तयारी, हे सगळं आता प्रत्यक्ष समोरासमोरच पूर्ण करावं लागेल. फोनवरून यापुढे शक्य नाही."

"कधी येऊ?"

"शक्य तितक्या लवकर. आणि…" देवप्पा क्षणभर थांबला, जणू पुढचे शब्द जपून निवडत होता. "येताना एक गोष्ट आणायला विसरू नकोस."

"काय?"

"सन्कन्नाची तलवार. तुझ्या वाड्यात आहे ती. आता तिची खरी गरज आहे."

"ती तलवार... तिचा काय उपयोग?" अभिजित आश्चर्याने म्हणाला.

"ती फक्त एक जुनी वस्तू नाहीये, अभिजित. ती तुझ्या कुळाचं जिवंत प्रतीक आहे. शस्त्रपूजेसाठी ती हवीच, पण त्याहून जास्त ती तलवार सन्कन्नाच्या रक्ताला, त्याच्या शक्तीला अजूनही धरून आहे. आणि ती शक्ती आता तुझ्याही रक्तात जागी व्हायला हवी."

फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. मनात दोन गोष्टी एकाच वेळी घुमत होत्या; देवप्पाच्या घरावरचा तो हल्ला, जो आता या धोक्याचं गांभीर्य अधोरेखित करत होता, आणि ती तलवार, जी सुप्याच्या वाड्यात, कुठल्यातरी कोपऱ्यात, त्याची वाट बघत होती.

दुसऱ्याच रात्री अभिजितचा फोन वाजला...आजींचा नंबर.
"अभिजित," आजींचा आवाज उत्साहाने भरलेला, इतका की तो फोनच्या पलीकडूनही स्पष्ट जाणवत होता. "मोठी बातमी आहे. मला वाटतं मी तो श्लोक उलगडलाय.

पलंगावर लोळत पडलेला अभिजित अचानक उसळून बसला. "सांगा, आजी. लवकर सांगा."

"रक्तपुष्प प्रवाह म्हणजे शाल्मला नदी. तिच्या काठाने पूर्वी सावरीच्या झाडांची दाटी होती म्हणे... शाल्मली वृक्ष, ज्याला संस्कृतमध्ये कधीकधी 'रक्तपुष्प' म्हणतात, त्याच्या गडद लाल फुलांमुळे. उन्हाळ्यात, फुलण्याच्या हंगामात, ती झाडं इतकी लाल होऊन जायची, की नदीचं पाणीही तांबूस भासायचं."

"हे अगदी सिरसीच्या नावासारखंच आहे. सिरसी हे नाव शिरीष झाडावरून पडलं, तसंच या नदीलाही तिच्या काठावरच्या झाडांवरून नाव मिळालं."

"आणि या शाल्मला नदी संदर्भात आणखी शोध घेतल्यावर मला सहस्रलिंगाचे काही जुने फोटो सापडले, या नदीत असलेल्या हजारो दगडांवर शिवलिंग कोरलेली आहे आणि प्रत्येक शिवलिंगासमोर एक नंदी."

अभिजितच्या मनात चित्र स्पष्ट होत गेलं, "म्हणजे," अभिजित हळूहळू, स्वतःच्याच शब्दांत ते जुळवत म्हणाला, "म्हणजे या नदीत आपल्याला असा एक नंदी शोधायचाय , जो त्याच्या स्वतःच्याच समोरच्या शिवलिंगाकडे न बघता, त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून आहे. हजारो नंदींमध्ये फक्त एकच असा."

"बरोबर," आजी म्हणाल्या.

अभिजितने दीर्घ श्वास घेतला. "आजी, तुम्ही हे सगळं एका दिवसभरात केलंत?"

"हो. डॉ. हेगडेंनी शब्द दिले, मी त्यांचा अर्थ शोधला आणि आता माझ्याकडे एक कारणही आहे, जे आधी नव्हतं, ज्यामुळे थांबणं शक्यच नव्हतं."

"आजी, हे इतकं मोठं काम केलंत तुम्ही," तो म्हणाला. "आता आपल्याला नेमकं काय शोधायचं, हे पूर्णपणे कळलंय."

"हो. पण आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण नदीचे पाणी ओसरल्याशिवाय हे शिवलिंग दिसत नाहीत आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हे पाणी ओसरू लागते."

"आणि त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की कल्लेश्वरला कळण्याआधी हे काम उरकावे लागेल कारण मागच्या वेळेसारखा तो आता बेसावध नसणार"

************************************************************************************************************************

देवप्पा म्हणाला होता तेच खरं ठरत होतं, शिलालेखाच्या शोधानंतर हल्ले अधिक तीव्र होऊ लागले.

पहिल्या रात्री ते नुसतं आवाजाने सुरू झालं. अभिजितला नुकतीच झोप लागली होती आणि अचानक त्याला छताकडून कुणीतरी चालत असल्याचा आवाज आला. अनवाणी पावलं, ओलसर, चप्-चप् आवाज करत, थेट त्याच्या डोक्यावरून सरकत. पण वरच्या मजल्यावर तर कुणीच राहत नव्हतं.

अभिजितने डोळे उघडले आणि कान टवकारले. आवाज लगेच थांबला. त्याने काही क्षण तसाच पडून राहून पुन्हा डोळे मिटले आणि काही क्षणांतच तो आवाज पुन्हा सुरू झाला. यावेळी तो अधिक जवळून येत होता जणू ती पावलं आता छतावरून उतरून, भिंतीवरून, त्याच्याच खोलीच्या दिशेने सरकत होती.

दुसऱ्या रात्री ते आणखी भयानक झालं. मध्यरात्री अभिजितला जाग आली, आणि त्याला जाणवलं की खोलीत कुणीतरी आहे. कोपऱ्यात, अंधारात, एक आकृती उभी होती...काटकुळी, विवस्त्र, त्वचा सडल्यासारखी, आणि तिचे लांबसडक केस चेहऱ्यावर पसरलेले.
ती पिशाच्चासारखी आकृती निश्चल उभी होती. तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. फक्त केसांच्या फटीतून तिची नजर अभिजितवर रोखलेली होती.

अभिजितने स्वातीला उठवायचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज फुटेना, हातही हलेना; तीच जुनी, गोठवणारी अवस्था. त्या पिशाच्चाने हळूहळू मान वर केली, केस बाजूला सरकले, आणि त्याचा चेहरा दिसला...डोळ्यांच्या जागी फक्त दोन काळे खड्डे, आणि तोंड कानापर्यंत फाटलेलं, त्या फाटलेल्या तोंडातून लाळ ओघळत होती आणि ती अभिजितकडे पाहून हसत होती. तिच्या त्या हसण्यासोबत खोलीभर कुजलेल्या मांसासारखी असह्य दुर्गंधी पसरली.

"काय शोधतोयस सांग मला, सांग…," ते खरखरत्या आवाजात म्हणालं आणि मग ते जमिनीवर सरपटत त्याच्या पलंगाच्या दिशेने सरकू लागलं.

अभिजितने प्राणपणाने हालचाल करायचा प्रयत्न केला, त्याच्या मनात पुसटशी जाणीव होऊ लागली कि देवप्पा त्याला मंत्र म्हणायला सांगतोय. पण अभिजितला तो मंत्र आठवेचना आणि नेमक्या त्या क्षणी, खोलीत तो शुभ्र प्रकाश उमटला. पिशाच्चाने एक भेदक किंकाळी फोडली. ते मागे सरकलं आणि क्षणार्धात विरून गेलं.

अभिजित धापा टाकत जागा झाला. स्वाती शेजारी झोपलेली. खोली रिकामी. पण हवेत ती दुर्गंधी अजून रेंगाळत होती.

तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दर रात्री ते पिशाच्च पुन्हा पुन्हा येत राहिलं. कधी ते छतावरून चालत त्याच्या खोलीभोवती घिरट्या घालत असे, कधी खोलीच्या कोपऱ्यात निश्चल उभं राहत असे, तर कधी थेट त्याच्या अंथरुणाशेजारी येऊन बसत असे आणि त्याच्या कानाशी काहीतरी कुजबुजत असे.
प्रत्येक वेळी त्याच्या मनात देवप्पा त्याला मंत्र म्हणायला सांगायचा.पण अभिजितला तो मंत्र आठवायचाच नाही. शेवटी तोच शुभ्र प्रकाश उमटायचा आणि ते पिशाच्च मागे हटायचं; पण प्रत्येक रात्री तो प्रकाश उमटायला थोडा अधिक वेळ लागत होता. जणू अभिजितचं संरक्षण करणारी शक्तीही त्या वाढत्या अंधाराशी झुंजत होती.

अभिजितला आता झोप लागेनाशी झाली. डोळे मिटले की ते पिशाच्च पुन्हा समोर उभं राहायचं आणि जागं राहण्याचा प्रयत्न केला, तरी काही तासांतच थकवा असह्य व्हायचा. दिवसेंदिवस त्याची अवस्था खालावत गेली. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली, हातपाय थरथरू लागले आणि ऑफिसच्या कामातही त्याचं लक्ष लागेनासं झालं.

एकदा नेहाने ऑफिसमध्ये त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं आणि शेवटी काळजीने विचारलं, "सर, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही... तुम्ही अगदी वेगळेच दिसताय."
अभिजितने काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही स्वतःच्या आवाजातला थकवा जाणवला.

घरी स्वातीने रात्री त्याला जवळ घेऊन झोपण्यास सुरुवात केली. तिला माहीत होतं की अभिजितला नेमकं काय त्रास देतंय, हे तो तिला सांगत नव्हता; पण काहीतरी गंभीर घडतंय, याची तिला आता खात्री झाली होती. ती त्याला घट्ट धरून ठेवायची, जणू तिच्या स्पर्शाने त्याच्याभोवतीचं ते अदृश्य सावट दूर राहील.
पण तिच्या मनातही आता एक असहाय भीती घर करू लागली होती. कारण अभिजितला बाहेरून काही झालेलं दिसत नव्हतं; तरी कुणीतरी त्याला आतून पोखरत होतं, आणि ते थांबवण्यासाठी स्वातीला काहीच करता येत नव्हतं.

सहावी रात्र आली आणि यावेळी ते टोकाला पोहोचलं.
अभिजितची मध्यरात्री अचानक झोप उडाली. डोळे उघडताच त्याचा श्वास अडकला. ते पिशाच्च यावेळी एकटं नव्हतं. खोलीभर अशा अनेक आकृत्या उभ्या होत्या; कोपऱ्यात, छताला उलट्या लटकलेल्या, जमिनीवर रांगत येणाऱ्या. त्यांचे चेहरे अस्पष्ट होते; पण त्या सगळ्यांची नजर अभिजितवरच खिळलेली होती.

आणि मग त्या सगळ्या आकृत्यांच्या तोंडून एकाच वेळी कुजबुज ऐकू आली. "सांग आम्हाला... काय शोधतोयस? सांग..."
एक आवाज थांबला की दुसरा सुरू व्हायचा. मग तिसरा. क्षणात ती कुजबुज शेकडो आवाजांत मिसळली. "सांग आम्हाला... काय शोधतोयस?"
"काय शोधतोयस?" "सांग..."

अभिजितने कानांवर हात ठेवले. पण आवाज बाहेरून येत नव्हता. तो जणू त्याच्या डोक्याच्या आतच घुमत होता. प्रत्येक शब्दासोबत त्याच्या कपाळात वेदनेची तीव्र लहर उठत होती. श्वास घेणंही कठीण झालं. त्याचं भान हळूहळू सुटू लागलं. आता संपलं. हा विचार त्याच्या मनात चमकून गेला. आता आपण वेडे होणार... किंवा मरणार.

आकृत्या त्याच्याभोवती अधिकच जवळ येऊ लागल्या. त्यांचे कुजके चेहरे, काळे डोळे आणि फाटलेली तोंडं अंधारातून पुढे सरकत होती. अभिजितने डोळे घट्ट मिटले. आणि त्या शेवटच्या क्षणी, हतबल होऊन, त्याच्या ओठांतून आपोआप काही शब्द बाहेर पडले. देवप्पाने त्याला दिलेला तो अर्धवट मंत्र. जो गेल्या काही दिवसांत त्याने पाठ केला होता.

"ॐ हं पं रं क्ष्रौं कौं सं खं हरिहरपुत्राय नमः|"

मंत्राचा शेवटचा शब्द उच्चारताच खोलीत एखाद्या स्फोटासारखा एक प्रचंड शुभ्र प्रकाश उसळला. क्षणभर संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली. भिंती, छत, खिडक्या सगळं त्या तेजात न्हाऊन निघालं.

आकृत्यांनी एकाच वेळी किंकाळी फोडली. काहींनी डोळे झाकण्याचा प्रयत्न केला. काही मागे सरकल्या. काहींचे काळे देह त्या शुभ्र प्रकाशात जळू लागले. त्यांच्या अंगातून काळसर धूर निघाला आणि क्षणार्धात त्या एकामागोमाग एक राखेच्या लोटांसारख्या हवेत विरून गेल्या.

काही क्षणांत खोली पुन्हा शांत झाली. अभिजित धापा टाकत होता. त्याच्या अंगातून सगळी शक्ती निघून गेल्यासारखी झाली होती. तो पलंगावरच कोसळला. कपाळावर आणि मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. बराच वेळ तो तसाच पडून राहिला.

स्वातीला या सगळ्याची कुठलीच जाणीव नव्हती. ती त्याच्या अगदी शेजारी शांतपणे झोपली होती; जणू काही क्षणांपूर्वीची ती भयाण झुंज त्या खोलीत नव्हे, तर एखाद्या अदृश्य, वेगळ्याच प्रतलावर घडून गेली होती. तो ज्या अंधाराशी झुंजत होता, त्याचा स्पर्शही या जगाला झाला नव्हता.

पण यावेळी त्याच्या मनात भीतीसोबत आणखी एक भावना, एक नवी जाणीव जन्माला आली होती; तो मंत्र काम करत होता. अर्धाच असूनही. आणि जर अर्ध्या मंत्राने इतकी शक्ती मिळत असेल, तर पूर्ण मंत्र, ते कवच ते मिळाल्यावर काय होईल?

भस्मबीज - भाग १६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग सुद्धा जबरदस्त. उत्कंठावर्धक.
आता नेहाबद्दल उत्सुकता ....

रक्तपुष्प प्रवाह म्हणजे शाल्मला नदी. तिच्या काठाने पूर्वी सावरीच्या झाडांची दाटी होती म्हणे... शाल्मली वृक्ष, ज्याला संस्कृतमध्ये कधीकधी 'रक्तपुष्प' म्हणतात>>>>>>>
ह्या आणि अशा अनेक संदर्भामुळे कथा अधिक रंजक झाली आहे.

लवकर टाका पुढचा भाग...वाट पाहतोय.

हा भागही छानच. कथेतल्या डीटेलिंग मुळे अजूनच मजा येते. तो श्लोक व मंत्र या गोष्टी. माझ्या मते नदीचे पाणी कमी व्हायची वाट न पाहता शोध घ्यायला हवा होता. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कथेत भाषेची घाटवळणे रोचक आहेत. काव्य- पद्यांची तर विशेषच 👌

मराठी+ कन्नड़ मोडीतल्या नोंदी-श्लोक झाले, संस्कृत कूट झाले, पौराणिक, काम्य / तंत्रसाधनेचे मंत्रही झाले.

आता पुढे कल्लेश्वराच्या मुखी साबर मंत्र येतील की काय ?

It would be fun to read ahead 👍

धन्यवाद धनवन्ती, आबा., किल्ली, ऋतुराज., माबो वाचक, झकासराव, सामी आणि अनिंद्य.

@अनिंद्य, तुमची कथेची समज म्हणा किंवा अंदाज पण खरंच आश्चर्यकारक आहे!
तुम्ही कथेतले इतके बारकावे आणि संदर्भ अचूकपणे हेरता, की कधी कधी पुढे काय येणार आहे हे माझ्याआधीच तुम्हाला कळतंय की काय असं वाटतं!

छे हो. एका भाषाप्रेमी वाचकाचे सहज निरीक्षण होतं ते.

तुम्ही उत्तम, संदर्भांसकट लिहिताय. कथा रंगते आहे आणि आम्हां सर्व वाचकांना पुढे काय नी कसे होईल याची उत्सुकता लागून आहे.

पुभाप्र.

खरं आहे. कथा एवढी सुंदर लिहिली आहे, की काल्पनिक आहे हे माहित असूनही वाचक अगदी गुंतले आहेत ह्या कथेत. त्याच कारण म्हणजे ह्यातील बारकावे आणि वास्तवाशी संदर्भ खूप विचारपूर्वक (आणि अभ्यासपूर्वक) वापरलेत. १६ व्या शतकातील कागदपत्रे शिलालेख मोडी लिपीत असण, त्याचं लिप्यंतर करणं पण भाषा तीच वापरणं ह्या सारख्या गोष्टी ह्या कथेला एक वेगळा दर्जा देतात.

आता पुढे अभिजीतचा सिरसी पर्यन्त प्रवास कसा होईल, तिथे काय घडणार, त्याच्या बरोबर स्वाती, अनन्या, नेहा आणि आता आजीची पण काळजी वाटायला लागली आहे.