ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ७
पूर्वभाग
डॅनियल क्रॉस मुंबईकडे निघताना त्याच्यावर गुप्तपणे नजर ठेवली जात असल्याची त्याला जाणीव होते, आणि “Some wars end late” हा संदेश त्याच्या भूतकाळाला पुन्हा जागं करतो.
माया सेन आणि कबीर सिंगापूरमध्ये लपून बसलेले असताना K-series आणि recovery operations बद्दल महत्त्वाचे खुलासे होतात.
कबीर सांगतो की Black Ember माहिती लपवत नाही, तर ती तुकड्यांत विखुरते, जेणेकरून पूर्ण चित्र कुणालाच दिसू नये.
मुंबईत आरव देशमुख, समीर नायर आणि विनायक राऊत लॉकर ३१७ उघडतात, पण त्यात अपेक्षित पुरावे नसून एक नकाशा, घड्याळ आणि गूढ संदेश सापडतो.
त्या नकाशातून त्यांना समजतं की refinery fire हा खरा उद्देश नव्हता; खरा हेतू म्हणजे इंधन वाहतूक वळवून बाजार, विमा आणि बंदर व्यवस्थेत नियंत्रित घबराट निर्माण करणं.
थांबलेल्या घड्याळावरचं “TIDE WINDOW - 10:17” हे कोरीव चिन्ह आणखी मोठ्या योजनेचा संकेत देतं.
शेवटी विनायकरावांना जाणीव होते की दुष्यंत देशमुख फक्त पुरावे लपवत नव्हता, तर विशिष्ट लोकांची दिशाभूल करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उभी करत होता.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ८ - TIDE WINDOW - 10:17
मुंबई.
सकाळ शहरावर पूर्णपणे उतरली होती. फोर्ट परिसरातून बाहेर पडताना गाड्यांच्या रांगा एकामागोमाग एक वाढायला लागल्या होत्या. अवजड ट्रकचे जड, कर्णकर्कश हॉर्न हवेत घुमत होते. दूर समुद्राकडून येणाऱ्या धुकट, दमट वाऱ्यात डिझेलचा एक संमिश्र वास मिसळला होता.
तिघांच्याही डोक्यात एकाच आकड्याचं चक्र अव्याहतपणे फिरत होतं. १०:१७
समीरने रीअर-व्ह्यू मिररमध्ये पुन्हा एकदा नजर टाकली. ती गडद राखाडी स्कोडा अजूनही मागेच होती.
आरवची नजर त्याच्या हातातील घड्याळावर गेली. स्थिर झालेले काटे. १०:१७. तो खालच्या आवाजात पुटपुटला, "TIDE WINDOW... हे नेमकं काय आहे?"
समीरने एक खोल श्वास घेतला, त्याची नजर रस्त्यावरून हलली नव्हती. "बंदरांमध्ये काही महत्त्वाच्या हालचाली पूर्णपणे भरती-ओहोटीवर अवलंबून असतात."
"विशेषतः मोठी मालवाहू जहाजं," विनायकरावांनी पुढे सांगायला सुरुवात केली.
त्यांनी बाजूला ठेवलेला नकाशा उघडला. त्या कागदावर लाल, निळ्या आणि काळ्या रंगाच्या रेषांचं जाळं पसरलं होतं. फ्युएल कॉरिडोर्स, शिपिंग लेन्स आणि डायव्हर्जन मार्कर्स.
"काही चॅनल्स समुद्रात इतके अरुंद असतात..." विनायकराव अतिशय शांतपणे म्हणाले, "...की चुकीच्या टाईडमध्ये जर एखादं जहाज तिथे अडकलं, तर संपूर्ण ट्रॅफिक कित्येक मैल मागे ढकललं जातं."
आरवच्या डोक्यात आता एकामागून एक चित्रं स्पष्ट तयार व्हायला लागली होती.
एक जहाज अडकणार...
त्यामुळे मागचं दुसरं जहाज थांबणार...
बंदरावर मालाचं उतरवणं ठप्प होणार...
पर्यायाने बाहेर ट्रक्सच्या रांगा लागणार...
माल साठवणुकीचा प्रचंड दबाव वाढणार...
आणि शेवटी इन्शुरन्स अलर्ट्स ट्रिगर होणार!
आणि या सगळ्यानंतर बाहेरच्या जगाला, सामान्य लोकांना काय दिसणार? फक्त एकच हेडलाईन “काही कारणांमुळे बंदरात उशीर.”
"पोर्ट्स पूर्णपणे बंद करण्याची गरजच नसते," समीरचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता.
विनायकरावांनी त्याचं वाक्य पूर्ण केलं, "फक्त 'अनिश्चितता' निर्माण करणं पुरेसं असतं."
ती राखाडी स्कोडा पुन्हा मिररमध्ये दिसली. या वेळी ती आधीपेक्षा थोडी जास्त जवळ आली होती. समीरची बोटं स्टिअरिंगवर अधिक घट्ट झाली.
"हे लोक जर फक्त ऑब्झर्व्ह करत असतील..." समीर बोलता बोलता अचानक थांबला, "...तर अॅक्चुअल प्लेयर्स कुठेतरी दुसरीकडेच मोठा गेम खेळतायत."
गाडी फ्लायओव्हरवर चढली. दूरवर सकाळीच्या कोवळ्या उन्हात समुद्र चमकत होता. त्याच्या बॅकड्रॉपला महाकाय क्रेन उभ्या होत्या JNPT कॉरिडोअर.
विनायकरावांनी ते जुनं घड्याळ पुन्हा हातात घेतलं. त्याची नजर घड्याळाच्या मागच्या बाजूवर स्थिरावली. "थांबा..." ते पुटपुटले. त्यांनी आपल्या अंगठ्याने घड्याळाच्या धातूच्या कडेला हलकासा दाब दिला. काहीच झालं नाही. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला.
क्लिक. एका बारीक मेटॅलिक आवाजासोबत घड्याळाचा मागचा भाग सैल झाला.
समीरने आरसा पाहत विचारलं "काय झालं?"
विनायकरावांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांचं पूर्ण लक्ष घड्याळावर केंद्रित झालं होतं. त्यांनी मागची प्लेट अत्यंत सावधपणे बाजूला केली. आत एका अत्यंत पातळ, ट्रान्सपरंट फिल्मवर काहीतरी दडवलेलं होतं.
आरव उत्सुकतेने पुढे झुकला. "हे काय आहे?"
"Navigation overlay ..." विनायकराव पुटपुटले.
त्यांनी ती पातळ फिल्म बाहेर काढली आणि विखुरलेल्या नकाश्यावर ठेवली. सुरुवातीला ती परफेक्ट अलाईन होत नव्हती. पण जशी त्याने ती फिल्म हलकीशी फिरवली, तसे नकाश्यावरचे काही मार्कर्स एकमेकांशी तंतोतंत जुळायला लागले. विनायकरावांची नजर अचानक एका अरुंद समुद्री मार्गावर येऊन खिळली - NHAVA CHANNEL.
गाडीत एका क्षणासाठी पूर्ण शांतता पसरली. समीरचा चेहरा पांढरा फटक पडला. "नाही... हे शक्य नाही."
विनायकरावांनी ती ट्रेसिंग फिल्म पुन्हा एकदा अॅडजस्ट केली. या वेळी, तो १०:१७ चा मार्कर थेट समुद्राच्या भरतीच्या नोंदीवर अचूक जाऊन बसला. आरवचा श्वास जणू रोखला गेला.
"म्हणजे त्यांचं टार्गेट पोर्ट नाहीच आहे..."
विनायकरावांचा आवाज आता कमालीचा शांत आणि थंड झाला होता, "त्यांचं टार्गेट 'टायमिंग' आहे."
आरवच्या अंगावर सरसरून काटा आला. "हे सगळं... हे एवढं मोठं साम्राज्य एका वेळेच्या काट्यावर उभं आहे?"
विनायकरावांनी गंभीरपणे नकारार्थी मान हलवली. "Black Ember कधीच घटनांवर थेट नियंत्रण ठेवत नाही," ते खिडकीबाहेर पसरलेल्या अथांग समुद्राकडे पाहत म्हणाले, "ते फक्त अशी एक परिस्थिती निर्माण करतात की, पुढच्या घटना घडणं अपरिहार्य होऊन जातं."
तेवढ्यात समीरचा फोन अचानक व्हायब्रेट झाला. त्या आवाजाने गाडीतील तिघेही ताठ झाले. समीरने स्क्रीनकडे पाहिलं. स्क्रीनवर कोणताही नंबर नव्हता... तिथे फक्त एक Internal Port Alert Code चमकत होता.
"काय झालं, समीर?" आरवने तातडीने विचारलं.
समीर काही सेकंद काही बोलूच शकला नाही. मग अत्यंत मंद, पण कापत असलेल्या आवाजात म्हणाला, "JNPT ने आत्ताच एक टेम्पररी नेव्हिगेशन अॅडव्हायझरी जारी केली आहे."
"कशासाठी?"
समीरने स्क्रीनवरच्या त्या शब्दांवरून नजर न हटवता उत्तर दिलं, “Unverified depth inconsistency.”
विनायकरावांच्या डोळ्यांत पहिल्यांदाच उघडी भीती चमकली. कारण आता 'थिअरी' संपली होती. जे कागदावर होतं, ते आता प्रत्यक्षात सुरू झालं होतं.
गाडीत अचानक एक सुन्न करणारी शांतता पसरली.
समीरच्या फोनच्या स्क्रीनवर अजूनही तोच संदेश लुकलुकत होता, जणू एखादा अदृश्य धोक्याचा इशारा:
TEMPORARY NAVIGATION ADVISORY
NHAVA APPROACH
UNVERIFIED DEPTH INCONSISTENCY
काही मिनिटांपूर्वीपर्यंत ते तिघे एका थिअरीबद्दल, एका पॅटर्नबद्दल बोलत होते. पण स्क्रीनवरचा हा अलर्ट काल्पनिक नव्हता; ती जमिनीवरची, प्रत्यक्ष हालचाल होती.
समीरने फोन लॉक केला, पण त्याच्या हाताच्या मुठींवर ताण स्पष्ट दिसत होता.
"हे रुटीन असू शकतं का?" आरवने शांतता भंग केली.
समीरने लगेच उत्तर दिले नाही. त्याची नजर रस्त्यावर खिळली होती, पण मन कुठेतरी वेगाने धावत होते.
"रुटीन अॅडव्हायझरीज येतात पण टाइमिंग... टाइमिंग खूप महत्त्वाचं असतं." तो शेवटी म्हणाला.
"आणि कोणत्या क्षणी ही अॅडव्हायझरी जारी होते, हे त्याहूनही महत्त्वाचं," विनायकराव मागच्या सीटवरून गंभीर आवाजात म्हणाले.
गाडी फ्लायओव्हरवरून उतरून पूर्वेकडच्या रस्त्याला लागली. दूरवर कंटेनर यार्ड्सचा अथांग पसारा दिसत होता. उंचच उंच क्रेन, एकावर एक रचलेले शेकडो कंटेनर्स आणि धुक्यात अंशतः हरवून गेलेली जहाजांची बाह्यरेखा. बाहेरचं जग रोजच्यासारखंच संथ आणि सामान्य वाटत होतं.
पण आरवला आता त्याच दृश्यात एक सुप्त भय दिसत होतं. जग नेहमीप्रमाणेच चालू होतं... पण कुठेतरी, याच जगाची लय जाणीवपूर्वक बिघडवली जात होती.
समीरने पुन्हा रीअर-व्ह्यू मिररमध्ये नजर टाकली. ती गडद राखाडी रंगाची स्कोडा अजूनही मागेच होती.
पण या वेळी, ती थोडी जास्त जवळ आली होती.
"ती अजूनही मागे आहे," समीरचा आवाज सावध होता.
आरवने नकळत आपल्या हाताच्या मुठी आवळल्या. "ते आपल्याला फॉलो करतायत?"
"कदाचित," विनायकराव म्हणाले, "किंवा फक्त आपल्यावर दबाव तयार करतायत."
समीरने अॅक्सिलरेटरवरचा पाय दाबला. गाडीचा वेग वाढला, पण मागे असलेल्या स्कोडानेही तितकंच अंतर राखून आपला वेग वाढवला.
आरवच्या छातीतली धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती.
"जर हा अॅडव्हायझरी खोटा असेल, तर पुढच्या तीस मिनिटांत चॅनेलवर बॅकलॉग सुरू होईल," समीर अचानक म्हणाला.
"आणि जर खरा असेल तर?" आरवने विचारले.
समीरच्या ओठांवर एक कटू हसू आले. "तर कुणीतरी खूप अनलकी आहे."
विनायकरावांनी पुन्हा नकाशा उघडला. त्यांची नजर किनारपट्टीच्या आणि भरती-ओहोटीच्या मार्किंग्जवर फिरत होती.
तेवढ्यात समीरचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. या वेळी त्याने एक क्षणही न गमावता कॉल उचलला.
"बोला."
दुसऱ्या बाजूने कमालीच्या वेगाने काहीतरी बोललं जात होतं. जसे शब्द कानावर पडत होते, तसा समीरच्या चेहऱ्यावरचा ताण आणखी गडद होत गेला.
"कोणतं vessel?" तो अचानक सीटवर ताठ बसला. "रिपीट करा."
गाडीत पुन्हा स्मशानशांतता पसरली. समीर काही सेकंद फक्त ऐकत राहिला. मग अतिशय धीम्या, पण गंभीर आवाजात म्हणाला:
"जोपर्यंत सोनार व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लिअरन्स देऊ नका."
कॉल कट झाला. आरवने उतावीळपणे विचारलं, "काय झालं?"
समीरने एक खोल श्वास घेतला. "एका इनबाउंड कार्गो वेसलने आपला अप्रोच स्लो केला आहे."
"का?"
"कॅप्टनला चॅनेलच्या डेप्थ रीडिंगमध्ये मिसमॅच दिसला आहे."
विनायकरावांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. "मिसमॅच किती आहे?"
"अजून क्लिअर नाही," समीरचा आवाज आता पूर्णपणे प्रोफेशनल्ससारखा झाला होता. "पण नियम असा सांगतो की, जर सोनार डेटा आणि रेकॉर्डेड खोली यात तफावत असेल, तर प्रोटोकॉलनुसार जहाजाची हालचाल थांबवावी किंवा संथ करावी लागते."
आरवने खिडकीबाहेर समुद्राच्या दिशेने पाहिले. धुक्यामुळे तिथे काहीच दिसत नव्हते, पण त्याला आतून जाणवत होते कुठेतरी, एका अथांग जहाजाचा वेग मंदावला होता. आणि त्याच सेकंदाला, कोट्यवधी डॉलर्सच्या जागतिक व्यापाराची चाकं उलटी फिरायला सुरुवात झाली होती.
तेवढ्यात विनायकराव अचानक पुढे झुकले . "समीर..."
"काय?"
"हे अॅडव्हायझरी जारी होण्याआधी, सोनार चेक कोण अॅप्रूव्ह करतं?"
समीर काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या डोळ्यांत पहिल्यांदाच खरी भीती चमकली.
"हार्बर कंट्रोल."
"आणि हार्बर कंट्रोलचा अॅक्सेस कोणाकडे असतो?" विनायकरावांचा प्रश्न हवेत तरंगत राहिला.
समीरने उत्तर दिले नाही. कारण उत्तर त्या तिघांनाही ठाऊक होते.
जर कोणी तिथपर्यंत पोहोचले असेल... तर Black Ember फक्त बाहेरून दबाव आणत नव्हते. ते सिस्टीमच्या आत, अगदी मुख्य केंद्रात घुसले होते.
पाँप! पाँप!!!
तेवढ्यात मागून एका प्रचंड हॉर्नचा आवाज घुमला. तो आवाज इतका जवळून आला, की समीर नायरने विचार न करता पूर्णपणे आपल्या 'इन्स्टिंक्ट'वर स्टिअरिंग डावीकडे वळवलं.
गाडी एका तीव्र झटक्यासह डावीकडे सरकली.
पुढच्याच क्षणी, एक अवाढव्य कंटेनर ट्रेलर त्यांच्या गाडीला अगदी घासून, मागे धातूचा कर्णकर्कश आवाज करत पुढे निघून गेला. हवेच्या प्रचंड दाबाने संपूर्ण गाडी हादरली. गाडीची चेसिस इतकी थरथरली, की आरवचा खांदा दारावर जोरात आपटला. एक तीक्ष्ण कळ त्याच्या हातातून सरसरून वर चढली.
समीरने दोन्ही हातांनी स्टिअरिंग घट्ट धरलं होतं. ट्रेलरचा मागचा अवाढव्य भाग त्यांच्या गाडीपासून अवघ्या काही इंचांवरून पुढे गेला होता. जर स्टिअरिंग वळवायला अर्धा सेकंद जरी उशीर झाला असता... तर ते थेट त्या महाकाय ट्रेलरच्या खाली चिरडले गेले असते.
“शिट!” समीरच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. त्याची छाती धडधडत होती.
त्याच गोंधळात, ती राखाडी स्कोडा अचानक लेन बदलून त्यांच्या अगदी बाजूला येऊन समांतर धावू लागली. तिची ती हालचाल कमालीची स्मूथ होती. त्यात कोणतीही घाई नव्हती, किंवा कोणताही पॅनिक नव्हता. जणू ती गाडी योग्य क्षणाचीच वाट पाहत होती.
क्षणभरासाठी आरवची नजर खिडकीबाहेर गेली. खिडकीच्या पलीकडे त्याला स्कोडाचा ड्रायव्हर स्पष्ट दिसला. डोळ्यांवर काळा चष्मा, चेहऱ्यावर कमालीची शांत, भावशून्य स्थिरता आणि कानाला लावलेला फोन.
तो आरवकडे किंवा समीरकडे पाहत नव्हता. पण त्याला अचूक माहिती होतं की ते दोघे त्याच्याकडेच पाहत आहेत.
आणि पुढच्याच क्षणी, स्कोडाने वेग वाढवला. ती गाडी त्यांच्या पुढे निघून गेली. पण जाता जाता, गाडीच्या मागच्या काचेवर चिकटवलेला एक छोटासा पांढरा स्टिकर आरवच्या नजरेतून सुटला नाही. त्यावर गडद अक्षरात लिहिलं होतं TW-17
विनायकरावांचा चेहरा पांढराफटक पडला होता. त्याच्या डोळ्यांत पहिल्यांदाच उघड, स्पष्ट भीती दिसत होती. समीरने झटकन ब्रेक दाबले. गाडी रस्त्याच्या कडेला एक जोराचा झटका खाऊन थांबली.
काही सेकंद गाडीत फक्त इंजिनचा संथ आवाज आणि तिघांच्या श्वासांचे ठोके ऐकू येत राहिले. आरवच्या अंगातून एक थंड लहर आरपार निघून गेली.
“TW…” आरव श्वास रोखून पुटपुटला.
त्याच क्षणी त्याच्या डोक्यात व्हॉल्टमध्ये पाहिलेलं ते कोरलेलं वाक्य विजेसारखं चमकून गेलं TIDE WINDOW - 10:17
विनायकरावांनी खिडकीबाहेर पाहत अतिशय मंद, थरथरत्या आवाजात म्हटलं, “ते आपल्याला सिग्नल देत आहेत…”
समीरने वळून त्याच्याकडे पाहिलं. “कशाचा?”
विनायकरावांची नजर अजूनही स्कोडा गायब झालेल्या त्या रिकाम्या रस्त्याकडे खिळली होती.
“हाच की... आपण योग्य मार्गावर आहोत.”
बंद खोलीत कागदपत्रांवर सुरू असलेला खेळ आता थेट रस्त्यावर उतरला होता. खेळ बदलला होता, आणि धोक्याची पातळीही.
कारण आता ते फक्त एका 'पॅटर्न'चा शोध घेत नव्हते… तर त्या पॅटर्नने आता स्वतःहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं होतं.
************************************************************************************************************************
जर्मनी.
एलिना व्होल्कोव्हा समोरच्या डिजिटल टेबलकडे अत्यंत शांतपणे पाहत उभी होती. डेटा विंडोज, शिपिंग इंडिकेटर्स, इन्शुरन्स फ्लक्चुएशन्स आणि मॅरीटाईम अलर्ट्स सगळी माहिती शांतपणे स्क्रीनवर वाहत होती... जणू तो जगाच्या नाडीचा थेट ठोका होता.
खोलीत कोणीही मोठ्याने बोलत नव्हतं. तिथे फक्त सर्व्हरचा एक मंद, एकसुरी आवाज आणि कीबोर्ड्सवर वेगाने पडणाऱ्या बोटांचे हलके आवाज घुमत होते.
तेवढ्यात एका अॅनालिस्टने त्याच्या समोरचा स्क्रीन enlarge केला.
“JNPT अॅडव्हायझरी कन्फर्म झालीये.”
एलिनाने आपली नजर वर केली. तिचा आवाज थंड होता, “व्हेरिफिकेशन?”
“अजून pending आहे.”
“सोर्स?”
“Internal maritime relay fragment.”
ती काही क्षण शांत राहिली. मग तिने पुढचा प्रश्न टाकला, “मीडिया पिकअप?”
“local shipping circles मध्ये चर्चा सुरू झाली आहे. पण अजून mainstream मध्ये आलेली नाही.”
“इन्शुरन्स रिस्पॉन्स?”
“मायनर मूव्हमेंट.”
एलिनाने संथपणे मान हलवली. घटना काय घडली, याच्याशी तिला देणेघेणे नव्हते... तिला फक्त त्या घटनेवर होणारी 'प्रतिक्रिया' मोजायची होती.
ती मुख्य स्क्रीनच्या आणखी जवळ आली. मुंबई किनाऱ्याजवळ एक लहान इंडिकेटर सतत ब्लिंक होत होता- NHAVA APPROACH.
त्याच्या अगदी खाली असलेली दुसरी ओळ आता मंद पिवळ्या रंगात चमकू लागली होती: DELAY CASCADE RISK
बाजूला उभ्या असलेल्या एका अॅनालिस्टने विचारलं, “मॅडम, ऑब्झर्व्हर एस्कलेशन आवश्यक आहे का?”
एलिनाने लगेच उत्तर दिलं नाही. ती काही क्षण त्या पिवळ्या ओळीकडे पाहत राहिली. मग अत्यंत शांतपणे म्हणाली, “नाही.”
तो अॅनालिस्ट थोडासा गोंधळला. “पण जर बॅकलॉग सुरू झाला तर..”
एलिनाने त्याच्याकडे न पाहताच त्याचं वाक्य मध्येच तोडलं, “बॅकलॉग महत्त्वाचा नाही.”
ती काही सेकंद थांबली, मग पुढे म्हणाली, “फिअर लॅग महत्त्वाचा आहे.”
खोलीत पुन्हा एकदा तीच सुन्न शांतता पसरली. एलिना आता इन्शुरन्सच्या आलेखाकडे पाहत होती. तिथला तो blue curve अत्यंत हलक्या हालचालीने वर सरकत होता.
“फॅक्ट्स नेहमी उशिरा पोहोचतात,” ती मंद वजनी आवाजात म्हणाली, “ पण मार्केट्स त्याआधीच पॅनिक होतात .”
तेवढ्यात एका तरुण अॅनालिस्टने धीर करून विचारलं, “पण मॅडम, जर हार्बर व्हेरिफिकेशन नॉर्मल आलं तर? म्हणजे तिथे काहीच गडबड नाही असं सिद्ध झालं तर?”
एलिनाने पहिल्यांदाच वळून त्या तरुण अॅनालिस्टकडे पाहिलं. तिची नजर अतिशय स्थिर आणि भेदक होती.
“तर मग काहीच घडलं नाही असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल,” ती पुढे म्हणाली, “पण एकदा रिअॅक्शन सुरू झाली, की त्यानंतर येणारं करेक्शन नेहमी उशिरा पोहोचतं. तोपर्यंत खेळ संपलेला असतो.”
त्या उत्तरानंतर खोलीत पुन्हा शांतता पसरली. कोणाकडेच दुसरा प्रश्न नव्हता.
एलिना स्क्रीनपासून दोन पावले मागे सरकली. तिची नजर आता एका दुसऱ्या छोट्या विंडोवर स्थिरावली होती. जिथे वेगवेगळ्या स्रोतांकडून आलेले अपूर्ण आणि विखुरलेले मूव्हमेंट रिपोर्ट्स दिसत होते . सिंगापूर, दुबई ट्रान्झिट, मुंबई कॉरिडोअर.
एका अॅनालिस्टने स्क्रीनवर नवीन नोटिफिकेशन उघडलं. “Possible legacy-routing pattern detected.”
एलिनाची नजर त्या ओळीवर खिळली. “कॉन्फिडन्स?”
“Low.”
“सोर्स कॉलिटी?”
“Unverified travel correlation.”
खोलीत काही क्षण शांतता पसरली. तो अॅनालिस्ट स्वतःचा अंदाज सांगत मंद आवाजात म्हणाला, “काही नसेलही कदाचित... Could be nothing.”
तिने ते नोटिफिकेशन बंद करू दिले नाही. “जर हा राउटिंग genuine असेल...” ती एका गूढ आवाजात म्हणाली, “...तर बोर्डवर कोणीतरी जुना खेळाडू परत आला आहे.”
खोलीतल्या एका ज्येष्ठ अॅनालिस्टने विचारलं, “Do we isolate the chain?
एलिनाने लगेच उत्तर दिलं नाही. ती काचेच्या मोठ्या खिडकीबाहेर पाहू लागली. पहाटेचा प्रकाश आता हळूहळू शहरावर उतरायला लागला होता. रस्त्यांवर सामान्य लोक त्यांच्या नेहमीच्या दिवसाची सुरुवात करत होते.
तिथे चालणाऱ्या कुणालाही साधी कल्पनाही नव्हती, की हजारो किलोमीटर दूर समुद्रात सुरू झालेला एक छोटासा तांत्रिक विलंब... अवघ्या काही तासांत जागतिक बाजारपेठा, विम्यातील कोट्यवधींचे दर आणि आंतरराष्ट्रीय सरकारांच्या बंद दाराआडच्या चर्चांमध्ये शिरणार होता.
खोलीत एलिनाचा आवाज पुन्हा घुमला, “अजून नाही.”
ती मागे वळली. “जर आपण खूप लवकर हालचाल केली तर त्यांना कळून चुकेल की, 'रिकव्हरी चेन' अजूनही आपल्यासाठी तितकीच धोकादायक आहे.”
खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. एका अॅनालिस्टने अगदी हलक्या आवाजात विचारलं, “मॅडम... आपल्याला त्यांची भीती वाटतेय का?”
एलिनाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक सूक्ष्म प्रतिक्रिया उमटली. ते हसू नव्हतं... ती एक जुनी आठवण होती.
“तरुण लोक चुका करतात,” ती अत्यंत शांतपणे खिडकीबाहेर पाहत म्हणाली, “पण जुने लोक...”
तिची नजर पुन्हा एकदा स्क्रीनवरच्या त्या ब्लिंक होणाऱ्या राउटिंग इंडिकेटरवर स्थिरावली, “...त्यांना हे बरोबर लक्षात असतं की त्यांनी भूतकाळात कोणाला, कुठे गाडलंय.”
************************************************************************************************************************
सिंगापूर.
दुपार जवळ येत होती. पावसाचं पाणी अजूनही जुन्या गोदामांच्या पत्र्यांवरून टपटप थेंबाथेंबाने खाली पडत होतं. बाहेरच्या अरुंद रस्त्यांवर दमट, ओलसर उष्णता पसरली होती. दूरवरून बंदराच्या दिशेने येणारे क्रेन आणि जहाजांचे धातूचे आवाज हवेत विरून जात होते.
माया सेन टेबलासमोर बसून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे डोळे न मिटता पाहत होती.
एका बाजूला शिपिंग अलर्ट्स (shipping alerts) चमकत होते, दुसऱ्या बाजूला इन्शुरन्स मूव्हमेंटचा डेटा (insurance data) बदलत होता, तिसऱ्या विंडोमध्ये सोशल मीडियावरील हालचाली (chatter) वेगाने अपडेट होत होत्या.
सगळी माहिती विखुरलेली आणि वेगवेगळी दिसत होती... पण मायाच्या डोक्यात आता त्या सगळ्या कड्या एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या होत्या.
JNPT अॅडव्हायझरी. डिलेड मूव्हमेंट. इन्शुरन्स अप्टिक. फ्युएल राउटिंग डिस्कशन.
ती अतिशय खालच्या, गंभीर आवाजात म्हणाली, “हे सुरू झालंय…”
कबीर खिडकीजवळ उभा होता. पडद्याच्या एका बारीक फटीतून तो खाली रस्त्यावर नजर ठेवून होता. त्याने लगेच तिच्या बोलण्याला उत्तर दिलं नाही.
“काय झालं?” मायाने वळून विचारलं.
कबीरची नजर अजूनही बाहेरच खिळली होती. “रिअॅक्शन फेज”
मायाने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. “एका छोट्या अॅडव्हायझरीमुळे इतकी मोठी रिअॅक्शन?”
कबीर शांतपणे म्हणाला, “लोक कधीच प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांना घाबरत नाहीत...” तो क्षणभर थांबला, “...लोकांना भीती वाटते ती त्या घटनेमुळे जन्माला येणाऱ्या शक्यतांची.”
Western corridor risk. Possible congestion exposure. Short-term volatility.
हे अजून उघड 'पॅनिक' नव्हतं. पण पॅनिक सुरू होण्याआधी जो एक अनामिक दाब निर्माण होतो, ही त्याचीच लक्षणं होती.
कबीर अचानक खिडकीच्या पडद्यापासून दोन पावले मागे झाला. “आपल्याला इथून आत्ताच्या आत्ता निघावं लागेल.”
माया एकदम ताठ बसली. “आत्ताच?”
“हो.”
“पण का?”
कबीर काही क्षण शांत राहिला. मग त्याने टेबलावर पडलेला जुना बर्नर हँडसेट उचलला. त्याची बॅटरी आधीच वेगळी करून ठेवली होती, तरीही त्याची नजर संशयाने त्याच हँडसेटवर स्थिरावली होती.
“प्रेझेन्स चेक्स कधीच दोनदा येत नाहीत,” कबीर म्हणाला.
माया गोंधळून जागेवरून उठली. “म्हणजे? मला नाही समजलं.”
“म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते येतात, तेव्हा ते आपण तिथे असण्याची फक्त खात्री करतात,” तो अत्यंत थंड आवाजात म्हणाला, “आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते येतात... तेव्हा ते संपूर्ण पेरिमीटर ब्लॉक करतात.”
तेवढ्यात खोलीत अचानक बाहेरून एक हलकासा धातूचा आवाज आला. जणू कोणीतरी इमारतीचं लोखंडी गेट अत्यंत हळूवारपणे बंद केलं.
दोघेही एकाच क्षणात जागेवर खिळले. कबीरने तोंडवर बोट ठेवून मायाला पूर्ण शांत राहण्याचा इशारा केला.
बाहेर पुन्हा आवाज झाला. या वेळी तो आवाज पायऱ्यांवरून येत होता. हळूवार. जपून टाकलेली पावलं.
मायाच्या छातीची धडधड वाढली, तिचा श्वास वेगवान झाला. “तुला खात्री आहे?” तिने अगदी हलक्या आवाजात कुजबुजत विचारलं.
कबीरने काही उत्तर दिलं नाही. तो मांजराच्या पावलांनी शांतपणे किचन काउंटरपाशी गेला. तिथून त्याने एक लहान, काळी पाऊच उचलली. मायाची नजर त्या पाऊचवर स्थिरावली.
“त्यात काय आहे?”
“इमर्जन्सी एक्झिटसाठी लागणारे पैसे.”
“आणि?”
कबीर काही क्षण थांबला, त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. “आणि... जुन्या सवयी.”
त्याने ती पाऊच आपल्या जॅकेटच्या आतल्या खिशात टाकली. मग खोलीतली मुख्य लाईट बंद केली. संपूर्ण फ्लॅट क्षणात अंधुक झाला.
बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये आता पावलांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. त्यात कोणतीही घाई नव्हती, किंवा कोणताही अनावश्यक आवाज नव्हता.
कबीरने मायाच्या जवळ येत अतिशय मंद आवाजात विचारलं, “या इमारतीला मागच्या बाजूने बाहेर पडायला काही एक्झिट आहे का?”
माया पूर्णपणे गांगरली. “म-मला माहित नाही.”
कबीरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तीव्र चिडचिड उमटली. “सेफहाऊस निवडताना सगळ्यात आधी त्याचे एक्झिट्स पाहायचे असतात, माया.”
माया काहीच बोलू शकली नाही. कारण तिला एकाएकी जाणवलं होतं कि ती अजूनही एका पत्रकारासारखा विचार करत होती... आणि कबीर एका सर्वायव्हरसारखा.
पायऱ्यांवरचं ते संथ चालणं आता अगदी दाराबाहेर येऊन थांबलं. खोलीत आता इतकी भीषण शांतता पसरली होती, की मायाला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. आणि मग दारावर एक हलकासा नॉक झाला. टक... टक... टक.
कबीर पूर्णपणे स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यांतील बदललेले भाव पाहून माया भीतीने थरथरू लागली. कारण कबीरच्या चेहऱ्यावर भीती होती... तो खरोखरच हादरला होता.
दाराच्या पलीकडून कोणताही मोठा आवाज आला नाही. फक्त काही सेकंदांची स्तब्धता. आणि मग, कॉरिडॉरमधून अतिशय संथ, सुशिक्षित इंग्रजीत एक आवाज खोलीच्या आत पोहचला:
“Mr. Kabir…”
मायाचा श्वास तिथेच अडकला.
“…we know you are inside.”
खोलीतला तो अंधार अचानक प्रचंड जड आणि गुदमरवून टाकणारा वाटू लागला. कबीरची नजर त्या लाकडी दारावर खिळली होती.
त्याच्या ओठांतून अतिशय अगतिक आणि थरथरत्या आवाजात एकच शब्द बाहेर पडला, “इम्पॉसिबल"
आणि पुढच्याच क्षणी फ्लॅटमधला मुख्य वीजपुरवठा अचानक कट झाला. सगळे स्क्रीन्स विझले आणि एक गडद, काळाकुट्ट अंधार त्या खोलीत पसरला.
जबरी
जबरी
प्लॉट अजूनच विस्तारत चालला
प्लॉट अजूनच विस्तारत चालला आहे.
पसारा मोठा आहे.
पसारा मोठा आहे.
सगळे कसे लिंक होणार ह्याची उत्सुकता आहेच.
शिवाय ह्याचे नेमके परीणाम आणि त्यातून कोणाचा कसा फायदा होतोय हे मला अजून लक्षात आलेलं नाही.
हळूहळू उलगडत आहे कथा.
झकासराव, सहमत...
झकासराव, सहमत...