Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शांताबाईंची पुस्तके टाकली
शांताबाईंची पुस्तके टाकली आहेत कार्ट मधे. धन्यवाद!
बापरे. शिव्या खायची तयारी
बापरे. शिव्या खायची तयारी करतो.
आधी एक वाचून आवडतंय का बघा. हे फक्त प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते तसंच एखादी गोष्ट किती आवडावी हे प्रमाणही वेगळं असतं म्हणून लिहिलंय.
कविता आवडत असतील तर किनारे मनाचे ( निवडक शांताबाई - संपादन अरुणा ढेरे ) आणि / किंवा गोंदण वाचा.
भरत,
भरत,
काही लोकांसाठी म्हणजे लेखकांसाठी किंवा दिग्दर्शकांसाठी आवडनिवड नसते. म्हणजे ते जे जे निर्माण करतील ते कॉन्सुम करावेच असे माझे असते. ते चांगले वाईट हे ऑबकेवटिवली जज करणे अवघड असते. यालाच जोडून नावडतीचे मीठ देखील अळणी असं आहे माझं.
उदा. नूरी सेल्यों (याचा खरा उच्चार तुर्की देवालाच माहित), हिरोकाजू कोरीदा, आदिखंडेराव, प्रशांत बागड, अरुण खोपकर, कल्पना दुधाळ, राहुल पुंगालिया वगैरे वगैरे त्यादी मंडळीचे सगळं पाहावं आणि वाचावेच लागते.
मीठ अळणीवाले : अवधूत डोंगरे, प्रणव सखदेव, अनिल साबळे, २० खांडेकर उदाहरणार्थ
शांता शेळके अ गटात आहेत.
मला कविता वाचायला खूप आवडतात. मी जेवढी पुस्तकं घेतो त्यात निम्मी तरी कवितासंग्रह असतात.
<मी जेवढी पुस्तकं घेतो त्यात
<मी जेवढी पुस्तकं घेतो त्यात निम्मी तरी कवितासंग्रह असतात.> हे वाचून इतकं छान वाटलं ना! तुमचं आमचं जमलं.
<काही लोकांसाठी म्हणजे लेखकांसाठी किंवा दिग्दर्शकांसाठी आवडनिवड नसते> मीही एका लेखकाची काही पुस्तके आवडली म्हणून त्याची सगळी पुस्तके वाचायची किंवा विकत घ्यायची असा प्रकार केला आहे. पण त्यांना सगळ्यातलं सगळं जमतंच असं नाही किंवा आपल्याला ते आवडतं असं नाही हे लक्षात आलं. शान्ताबाईंच्या कथा आवडल्या नाहीत. त्यांनी गझलाही लिहिल्यात . त्याही आवडल्या नाहीत. कुसुमाग्रजांचे नंतरचे कवितासंग्रह तेवढे नाही आवडले. अर्थात त्यांच्या वयानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार त्यांच्या कविता बदलत गेल्या, त्यामुळे त्याही ठीकच आहेत. पण पुन्हा पुन्हा वाचाव्या असे वाटत नाही.
मी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री आणि गीतकार आणि मराठी कविताप्रेमी शान्ताबाईंवर एक लेख लिहिला होता. तो तुम्हांला आवडावा.
एखाद्याच्या x गोष्टी आवडल्या
एखाद्याच्या x गोष्टी आवडल्या आणि ती व्यक्ती सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाची असेल तर कधी कधी necessary evil म्हणून देखील त्यांचे सगळे वाचावे लागते. ऐकावे लागते. पाहावे लागते. आपले म्हातारे उर्फ आदिखंडेराव हे अजून एक उदाहरण. मला चांगदेव चतुष्टय किंवा अगदी कोसला देखील आवडत नाही. पण म्हाताऱ्याला सारून जाता येत नाही.
उदा. ह्रिदयनाथने सावरकरांच्या कविता गाणी संगीतबद्ध केल्या म्हणून रडून चालत नाही. जयोस्तुते बाकीचे सगळे बॅगेज बाजूला ठेवून आवडतं.
आपलं जमलं हे कळून मला देखील आनंद झाला. आपलं जमणारच होतं भरत.
जयोस्तुतेचे संगीतकार मधुकर
जयोस्तुतेचे संगीतकार मधुकर गोळवलकर आहेत.
मलाही हृदयनाथ संगीतकार म्हणून आवडतातच. आशा गायिका आणि तिच्या फाइटिंग स्पिरिटसाठी आवडते. बाकी गोष्टी आडव्या येत नाहीत. पण ते आवडतात म्हणून त्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडून किंवा खपवून घेत नाही.
ललित प्रभाकरच्या प्रेमात
ललित प्रभाकरच्या प्रेमात पडायला आणखी एक कारण
< ते जे जे निर्माण करतील ते कॉन्सुम करावेच असे माझे असते. > हे माझं शाम मनोहरांबद्दल झालं.
स्टीफन किंग हा माझा आवडता
स्टीफन किंग हा माझा आवडता लेखक आहे. काल रात्री जागून त्याची "1408" दीर्घकथा वाचून संपवली.
"1408" हा डॉल्फिन हॉटेल मधल्या १४व्या मजल्यावरील खोलीचा क्रमाक आहे. ह्या हॉटेलला १३वा मजला नाही. तसेच 1408 आकड्यांची बेरिज १३ येते. हे लेखक जेव्हा सांगतो तेव्हाच डोक्यात शिरते.
माईक एन्स्लीन हा कथेचा नायक व्यवसायाने लेखक आहे. त्याचे वैशिष्ट्य हे कि तो पछादलेल्या जागी एक रात्र काढायची आणि आलेल्या अनुभवांची नोंद करून मग पुस्तकरूपाने प्रकाशित करायचे. रूम "1408" ही भुताळी रूम आहे, त्या रूम मध्ये एक रात्र त्याला काढायची आहे.
पण हॉटेलचा मॅनेजर त्याला परावृत्त करायचा आटोकाट प्रयत्न करतो. त्य खोलीत गेस्टना आलेले अनुभव त्याला सांगतो, पण नायकही आता हट्टाला पेटलेला असतो. शेवटी हॉटेलच्या मॅनेजरला त्या खोलीची किल्ली त्याच्या हवाली करावी लागते.
पुढे काय होते? मूळातूनच वाचावे.
ही एक मनोवैज्ञानिक भीती कथा आहे, किंगने लिहिलेल्या "on writing" ह्या पुस्तकात "कथा कशी लिहिली जाते" त्याचे उदाहरण म्हणून ही कथा लिहिली होती.
ह्याच नावाचा कथेवर आधारित सिनेमाही तुम्ही बघू शकता. नेटफ्लिक्स वर आहे.
टवणे सर, खिडक्या अर्ध्या
टवणे सर, खिडक्या अर्ध्या उघड्या आणलंय.
हे पुस्तक मस्त आहे भरत.
हे पुस्तक मस्त आहे भरत.
टवणे सर, खिडक्या अर्ध्या
टवणे सर, खिडक्या अर्ध्या उघड्या आणलंय. >>> मस्त. वाचून सान्गा.
ललित प्रभाकरची मुलाखत ऐकताना तुमचे आमचे सेम असतं असं झालं.
काल एक परीक्षण लिहिलं होतं पण
काल एक परीक्षण लिहिलं होतं पण ते इथे दिसत नाही. चुकून दुसऱ्या धाग्यात पोस्ट झालं वाटतं.
देशांतराच्या गोष्टी सांगता... हे अजिता काळे यांचं पुस्तक ( १९९९) वाचनात आलं. लहानपणी आईबाबांच्या सुतिकागृहाच्या वातावरणात वाढलेली. बाबांनी तिला लवकरच लैगिंक ज्ञानाची पुस्तकं देऊन शहाणं केलेलं असतं.लेखिका डॉ होत नाही. मराठी विषयात बी.ए. एमए. करते. एका डॉक्टरशी ( अशोक) लग्न करते. दोन मुलं होऊन लहान असताना ते अमेरिकेत जातात. अशोक उच्चशिक्षण घेणार असतो दोन वर्षं. त्या वेळांत मुलं संभाळून ती सामाजिक सेवेची नोकरी करते. कुटुंब नियोजन खात्याचं काम. त्याच वेळी आजुबाजूच्या बायकांची मुलंही संभाळणे आणि गुड बेबीसिटर होते. आफ्रिका आणि मेक्सिकन महिलांचा प्रश्न असतो. तेराव्या वर्षी गर्भपातासाठी विचारणा करणाऱ्या तरुण आया. शिक्षण पूर्ण झाल्यावर अशोक तिकडेच राहायचा निर्णय घेतो. एका मोठ्या हॉस्पिटलात पण एका लहान खेड्यात चांगल्या पगाराची नोकरी अशोकला मिळते. तिकडे राहायला जातात. आता वेगळे अर्थार्जन करण्याची गरज अजिताला नसते तरीही ती ते काम चालू ठेवते. मुलांचं आयुष्य आता अमेरिकन झालेलं असतं आणि ते संभाळून घेतात. इथे पुस्तक संपतं पण अजिताने तीन देशांची सफर करून तिथला समाज आणि महिलांचे विश्व कसं आहे ते लिहिलं आहे. रशिया, इजिप्त आणि ग्रीस.
पुस्तकं वाचनीय आहे.
[ पु.लंनी हे पुस्तक वाचलं असतं तर अपुर्वाई गुंडाळून ठेवलं असतं हे माझं मत.]
केशवकूल, हॉटेलांत ज्या रुम
केशवकूल, हॉटेलांत ज्या रुम नंबरची आकड्यांची बेरीज १३ येते त्या नसतात किंवा भुताळी समजतात का? उदा नवव्या मजल्यावर चौथी खोली ९०४?
अजिता काळे नाव आणि हा जो
अजिता काळे नाव आणि हा जो अल्पवयीन मुलींच्या प्रेग्नंसीचा विषय आहे तो ऐकल्या वाचल्या सारखे वाटले .
कुम्पणापलीकडले शेत नावाचा कथासंग्रह ९०च्या दशकात प्रकाशित झाला होता. विदेशी भारतीयांच्या कथांचा प्रायोगिक संग्रह. त्यात पहिलीच कथा अजिता काळे यांची याच विषयावर होती. “गोष्ट टिना बिशपची”.
बरोबर त्यांनी इतर ठिकाणीही
बरोबर त्यांनी इतर ठिकाणीही अगोदर लेख लिहिले होते .
Srd
Srd
1408
ही चौदाव्या जो खरा तर १३वा असायला पाहिजे होता, मजल्यावरची खोली होती.
मी स्वतः १३ क्रमांकाच्या फ्लॅट कित्येक वर्षे रहात होतो. काही कडू काही गोड अनुभव. १३ हा माझा लकी नंबर आहे.
अजून एक जे मी तिथे लिहिले नव्हते. ही माझ्या मते भूताटकीची कथा नाही, कारण भूत म्हणजे कुणातरी माणसाचे वा प्राण्याचे असायला पाहिजे. त्या रूम मध्ये जे काही होते THE THING ते स्वयंभू अमानवीय होते.
मागचा आठवडा पूर्ण सुट्टीवर
मागचा आठवडा पूर्ण सुट्टीवर होतो. तेव्हा अन्न हे अपूर्णब्रह्म - शाहू पाटोळे, उदकाचिये आर्ती - मिलिंद बोकील, चिरंतनाचा गंध - विलास सारंग, गांधी का मरत नाही - चंद्रकांत वानखेडे ही चार पुस्तके वाचली.
प्रत्येकावर स्वतंत्र लिहिन सविस्तर
Manohar Malgaonkar यांनी
Manohar Malgaonkar यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील
The Sea Hawk - Life and battles of Kanhoji Angre(1979) चं पु.लं.नी केलेलं मराठी भाषांतर मिळालं ते वाचणार आहे.
Srd अजिता काळे ह्यांच्या
Srd अजिता काळे ह्यांच्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मला ह्या लेखिकेबद्दल खुप कुतुहल आहे. खुप पुर्वी कुठे तरी त्यांच्या रशिया भेटी वरील एक लेख वाचला होता. त्यांची शैली आवडली होती. कुठलाही अभिनिवेश नसलेली, अमेरिका आणि अमेरिकन्स ज्या काळात अप्रुपाचा विषय होता आणि सोव्हिएत रशिया हा जिव्हाळ्याचा विषय होता मराठी लोकांसाठी त्या काळातील हा लेख आहे. त्यांची मॅटर ऑफ फॅक्ट शैली त्या पार्श्वभूमीवर एकदम ठळक जाणवते आणि अपील होते. पण मग मी अमेरिकेत गेले २००५ च्या सुमारास तेव्हा कळले त्यांनी आत्महत्या केली. वाचुन खुप धक्का बसला होता. त्यांचे लिखाण वाचून मनात त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली होती तिच्याशी एकदम विसंगत असे हे वास्तव होते. कुणाला त्यांच्या बद्दल अधिक माहिती आहे का?
>>त्यांनी आत्महत्या केली. >>
>>त्यांनी आत्महत्या केली. >> अरेरे. त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली होती तिच्याशी एकदम विसंगत असे हे वास्तव होते.
फारच वाईट.
समर्पित जीवन जगणाऱ्या व्यक्तिने केलेली आत्महत्या हे विशेष आहे.
२००५ च्या सुमारास तेव्हा कळले
२००५ च्या सुमारास तेव्हा कळले त्यांनी आत्महत्या केली.
>>>
बाप रे.
मला ह्या लेखिकेबद्दल खुप
मला ह्या लेखिकेबद्दल खुप कुतुहल आहे. खुप पुर्वी कुठे तरी त्यांच्या रशिया भेटी वरील एक लेख वाचला होता. त्यांची शैली आवडली होती. कुठलाही अभिनिवेश नसलेली, अमेरिका आणि अमेरिकन्स ज्या काळात अप्रुपाचा विषय होता आणि सोव्हिएत रशिया हा जिव्हाळ्याचा विषय होता मराठी लोकांसाठी त्या काळातील हा लेख आहे. त्यांची मॅटर ऑफ फॅक्ट शैली त्या पार्श्वभूमीवर एकदम ठळक जाणवते आणि अपील होते. पण मग मी अमेरिकेत गेले २००५ च्या सुमारास तेव्हा कळले त्यांनी आत्महत्या केली. वाचुन खुप धक्का बसला होता.
>>
माझंही अगदी तसंच झालं. त्यांची एक मैत्रिण माझ्या छान ओळखीची आहे, पण "depression" मुळे आणि थेेरपी सुरु होती, एव्व्हढं कळलं. खुप details विचारणं मला प्रशस्त वाटलं नाही. त्यांच्या कविता पण वाचण्यासारख्या आहेत. त्यांची एक एकांकिका "सत्यकथे"मध्ये पण वाचल्याची आठवते.
काल इथे अजिता काळेचं नाव वाचल्यापासून त्यांचा विचार मनामध्ये येत होता, आज पर्णिकाची ही पोस्ट वाचून राहवलं नाही.
Srd आणि पर्णिका,
Srd आणि पर्णिका,
अजिता काळे यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. खूप आधी कुठल्यातरी मासिकात मी यांचे काहीतरी लेखन वाचल्याचे स्मरते.
यांची सध्या बुकगंगा वर "बेबीचं जग" आणि "देशांतरीच्या गोष्टी सांगता" ही दोन पुस्तके दिसत आहेत. त्यांची अनुक्रमणिका पाहूनच वाचावीशी वाटत आहेत. पण उपलब्ध नाहीत. पाहतो.
वरची चर्चा रोचक वाटली. ( ऐसी
वरची चर्चा रोचक वाटली. ( ऐसी अक्षरे इफेक्ट. आवडला शब्द).

एसआरडी एव्हढी पुस्तके वाचतात कि इतरांना सांगण्याइतका वेळच नसतो त्यांच्याकडे.
सविस्तर माझ्यासारखे एकादशीला वाचणारे लिहीतात.
अजिता काळे या नावाची नोंद घेतली.
कुंपणापलिकडचे शेत या पुस्तकाबद्दल आधी लिहीलेय का ? नसेल तर सांगाल का ?
टीप - बरहा मधे टंकलेलं आहे.
टीप - बरहा मधे टंकलेलं आहे. इथे टंकताना अक्षरे एकमेकात मिसळणे हा त्रास होतोय. काही चिन्हे ही त्या एडीटरची आहेत. आता संपादित करत बसत नाही. उच्चारांबद्दल संदिग्धता आहे तिथे लॅटिन लिपी वापरली आहे.
पुस्तकाचे नाव - प्रोजेक्ट हेल मॅरी , लेखक Andy Weir
हे पुस्तक जर अनुवादीत मिळालं असतं तर बरं झालं असतं. का ते पुढे सांगेन.
सूर्य मंद होतोय. शास्त्रज्ञांना हे लक्षात येतं. पेट्रोवा लाईन नावाची एक अदृश्य रेषा सूर्य ते शुक्र यांच्यादरम्यान आढळते. कारण शोधायला रेलॅंड ग्रेस निघतो. पण तो अवकाशयानात जागा होतो तेव्हा त्याला स्वतःचं नावही आठवत नाही. त्याचे दोन सहप्रवासी मृत पावलेले आहेत. लाखो मैल दूर, एकट्याने, त्याला एक अशक्य वैज्ञानिक कोडं सोडवायचं आहे आणि मानवजातीला नामशेष होण्यापासून वाचवायचं आहे. हा प्लॉटच थरारक आहे. या मांडणीचं कौतुक वाटलं. आता ही फुलवणार कशी ही उत्सुकता होती.
कथा दोन काळांमध्ये विभागली आहे. आजचा काळ म्हणजे आत्ता (अवकाशात) आणि तेव्हा (पृथ्वीवर काय घडलं होतं) या दोन धाग्यांनी विणत पुस्तक पुढे जातं. हे असे धागे विणणे फार आवडतं. लेखकाने फक्त कथाप्लॉटच शक्तीशाली ठेवावे हे अपेक्षित नाही. लेखक सतीश तांबे नेहमी घाटाबद्दल बोलतात. म्हणजे कथा कशी विणलीय, कशी उलगडते त्याबद्दल. शैली रंजक असेल तर आणखी मजा येते. धारपांची शैली रंजक नाही, कंटाळवाणी पण तीच त्यांचं बलस्थान बनून जाते. अवांतराबद्दल क्षमस्व.
रॉकी या कथेचा आत्मा आहे. आणि यावरून मला राकेश रोशनचा जादू आठवला. मार्शिअन जादूच्या आधीचा आहे का ? ग्रेस जेव्हा Tau Ceti ताऱ्यापाशी पोहोचतो, तेव्हा त्याला एक परग्रहवासी भेटतो ज्याला तो रॉकी म्हणतो. हे परग्रहवासी प्राणी fecholocation ( हा शब्दच माहिती नव्हता. असे अनेक शब्द येतात, डीक्शनरी घेऊन बसणे जिवावर येते आणि मग असे शब्द तसेच सोडून संदर्भ अर्थ लावत पुढे जावे लागते. यासाठी अनुवादीत मिळायला हवी होती कादंबरी) म्हणजे ध्वनी लहरींद्वारे संवाद साधतात. त्यांचीही सूर्यमाला त्याच संकटाला सामोरी जातेय. दोघे मिळून हे कोडं सोडवायला निघतात . दोघांचे जीवशास्त्र वेगवेगळे आहे, भाषा वेगळी आहे. पण विज्ञान आणि विश्वास यांच्या आधारे एक त्यांच्यात मैत्री फुलते.
आवडलेल्या बाबी
१. विज्ञान आणि कथा यांचा समतोल साधला आहे. Andy Weir डार्क ह्युमर वापरतो. आकर्षक कथाकथनामधे विनोद सहजपणे पेरतो. मी काही खूप विज्ञान काल्पनिका वाचलेल्या नाहीत. पण हे दुर्मिळ असावं. ही शैली बेहद्द आवडली. शैली मुळे काही कठीण शब्द, काही कठीण वैज्ञानिक उतारे नुसते नजरेखालून घातले जे समजले नाहीत तरी पुढे जाता आले. बहुतेक सायन्स फिक्शन एकतर खूप सायन्सी (वैज्ञानिक) असतात किंवा खूप कल्पनाविलास भरलेला असतो. इथे मात्र दोन्हीचा उत्तम मेळ (समन्वय) आहे.
२. नायक माणसासारखा आहे . मागच्या एका धाग्यावर अनकॅनी व्हॅली बद्दल लिहीले आहे. आता याचा चित्रपट येईल तेव्हां हा उत्सुकतेचा भाग असणार आहे.
रेलॅंड ग्रेस हा पारंपारिक नायक नाही. तो भित्रा आहे. हे फार मस्त वाटलं. असल्या मिशनवर जाणारे सगळे नायक हे महाथोर असतात. अशा मोहीमेचं मला काहीच वाटत नाही, मानवजातीचं कल्याण हे आता क्लिशे होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर नायकाचे ह्युमनपण दाखवलेय ही मला चतुराई पण वाटली आणि उत्तम विचारही वाटला.
तो स्वखुशीने या मिशनवर येत नाही. प्रशिक्षित अंतराळवीर अपघातात मरतात आणि नाइलाजाने त्याला पाठवलं जातं. या अपरिहार्यतेमुळे तो अधिक विश्वासार्ह वाटतो. आता इथे कुणी ना कुणी विचारेल कि असं प्रत्य्क्षात होईल का? तर मला माहीत नाही.
३. वाचनगती - सुरूवातीला इंग्रजीची एव्हढी सवय नसल्याने अडखळायला होतं. पण नंतर पाण्यात पडल्यावर पोहायला येतं तसं जमू लागतं. हळू हळू काही भाग नाही समजला तरी काही वाटेनासं होतं. म्हणजे अडत नाही. पुस्तक वेगवान, चुरचुरीत आणि हलक्या विनोदाने भरलेलं आहे. Weir ची शैली बिनधास्त, रोखठोक, थेट, बिनबोभाट , मुद्द्याला धरून, फाफटपसारा नसलेली म्हणूनच सरळ किंवा no nonsense आहे . वाचकाला धमाल येणं हाच हेतू, आणि तो साध्य होतो. (इथे पुन्हा अवांतराचा मोह. जे लेखक सिनेमा डोळ्य़ासमोर ठेवल्यासारखे आणि चुरचुरीत लिहीतात त्यात सुशिंची आठवण इथे येते. त्यांच्या सुरूवातीच्या कथा या सरळ सरळ हिंदी हिरो, हिंदी पिक्चर डोळ्यासमोर ठेवून लिहीलेल्या आहेत. पण नंतर त्यांच्या कथांवर सिनेमा निघाव्या अशा त्या आहेत. ज्या चीप आहेत त्यांचे आयुष्य संपले आहे. पण दुनियादारी , पहाटवारा या कादंबर्या पाहता त्यांनी विज्ञान काल्पनिका लिहीली असती तर अशीच असती. आहे पण त्यांची एक पण तिचं नाव वेशीपलिकडे आहे कि धुकं धुकं कि वेगळं हे आठवत नाही. त्यावर मराठीत चित्रपट निघणार नाही. हिंदीत धाडस करत नाहीत).
खटकणार्या गोष्टी ( माझ्या नजरेतून - सराईत वाचकांना नाहीत खटकणार).
अ. टू मच विज्ञान कधीकधी जड वाटतं. हे परीक्षण हास्यास्पद वाटेल. पण पुस्तक वाचताना मनोरंजनाचा उद्देश असेल आणि सायन्सचा क्लास सुरू झाला असे वाटले तर ? मला तरी असे झाले. पुस्तकात calculations, chemical reactions, propulsion आणि physics चे दीर्घ उहापोह आहेत. हे प्रभावी आहे, पण कधीकधी कथाच हरवते आणि ते रटाळ textbook वाटू लागतं. माझं मत बालीश असेल कदाचित. हा भाग नुसता नजरेखालून घातलाय. समजून घेण्य़ाचा प्रयत्न सोडून दिला. त्यामुळे यावरचं भाष्य कदाचित करण्याचा अधिकार नाही.
ब. भाषा शिकण्याचा वेग अवास्तव दाखवला आहे. ग्रेस आणि रॉकी लवकरच एकमेकांची भाषा शिकतात. कथेतला सगळ्यात मोठा कमकुवत भाग आहे. इतक्या काटेकोर विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर हे जरा खटकतं.
क. माझ्यासारख्या वाचकांना शेवट खूप घाईगर्दीने उरकल्यासारखा वाटू शकतो. जणू लेखकाला पुस्तक आवरायचं होतं. ही फेज येते कथा लिहीताना. नंतर प्रचंड मानसिक थकवा येतो. मग एकतर सोडून देणे किंवा कशीतरी पूर्ण करणे. दीर्घकाळ एका कल्पनेत अडकून पडणे हे तुरूंगात बंद झाल्यासारखे वाटते. त्यातून सुटण्याची धडपड सुरू होते. दीर्घकालीन लिखाण गंमत नाही. त्यातून एका जागी बैठक मारून बसणे. मुरली खैरनार यांनी एकदा माहिती दिली होती कि डॅन ब्राऊन हा पुस्तक लिहायला बसला कि ठराविक काळाने सरळ पुश अप्स काढतो आणि काही व्यायाम प्रकार करतो. दीर्घकाळ बसल्यानंतर हे फार इंटरेस्टिंग वाटलं. तब्येत चांगली तर उत्साहही टिकतो. अवांतर आहे पण मोह आवरत नाही.
पुस्तक वाचल्यावर चित्रपट बघावा का ? हा नेहमीचा मला पडणारा प्रश्न आहे. माध्यमांतर पचवण्याइतकी प्रगल्भता अजून नाही आलेली. आता मी जो सिनेमा पाहिला तसाच दिसला नाही तर अपेक्षाभंग होणार हे नक्की. तुम्हीही आधीच निर्णय घ्या.
मायबोलीकरांना ही माहिती अनावश्यक आहे तरी कर्तव्य म्हणून...
Andy Weir हा अमेरिकन सायन्स फिक्शन लेखक आहे. त्याचं पहिलं पुस्तक The Martian (२०११) खूप गाजलं. त्यावर हॉलीवूड चित्रपटही आला. Project Hail Mary (२०२१) हे त्याचं तिसरं पुस्तक. चित्रपट येतोय. ऋत्विक रोशनने यातल्या अभिनेत्याची मुलाखत घेतली आहे. ती पण पहा. (मी नाही पाहिलेली अद्याप)
निगेटिव्ह रुव्ह्यू मुद्दाम
निगेटिव्ह रिव्ह्यू मुद्दाम लिहावासा वाटत नाही. पण एक तरूण लेखक आहेत मांजराच्या डोळ्यांचे. एकदा ठाण्यात भेटही झालेली आहे. त्यांचे सोशल मीडीयातले लिखाण वाचलेले आहे अधून मधून. त्यांनी स्वतःच स्वतःचे एक पुस्तक रिकमेण्ड केले होते. ते वाचण्याचा प्रयत्न केला नेटाने वाचायचा प्रयत्न केला. पण नंतर नंतर आपण काही तरी भारी लिहीत आहोत या जाणिवेतून लिहीत असल्याचा उबग आला. सोडून दिले मग. नाव विचारू नका. पुस्तकाचेही आणि लेखकाचेही.
>>>. टू मच विज्ञान कधीकधी जड
>>>. टू मच विज्ञान कधीकधी जड वाटतं>>
विज्ञान कथा या कधीकधी अशक्य अशा वैज्ञानिक तत्त्वावर आधारित असतात तेव्हा वाचावेसे वाटत नाही. सगळा पायाच ढासळतो. कसा? तर Heisenberg's Uncertainty Principle ला छेद देणाऱ्या गोष्टी. किंवा त्यात काळही घुसवला तर आणखी अवघड होतं.
त्यांच कथा काल्पनिक म्हणून म्हटल्या तर मात्र स्विकार्य असतात.
Heisenberg's Uncertainty
Heisenberg's Uncertainty Principle हे वेगळ्या ठिकाणी सांगाल का ? हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे समजत नाहीत या टर्म्सस.
खूप डिटेलिंगच्या एकदा आहारी गेलं कि कुठे थांबावं समजत नाही. कदाचित मराठीत संपादक त्यासाठीच असावेत. हिंदी , इंग्रजीत असतात का ?
एखाद्या लेखकाने वैज्ञानिक कथा
एखाद्या लेखकाने वैज्ञानिक कथा पुस्तक लिहिलं आणि तो प्रकाशकाकडे गेला तर त्याच्याकडे असलेल्या सल्लागाराची मदत घेईल. की कसं आहे? चालेल का हे वाचकांना वगैरे. लेखकाचा आग्रह असेल की जसं आहे तसं स्विकारा. पण त्यातल्या वैज्ञानिक चौकटीत काटछाट करू देणार नाही. फारतर "शेवट बदला", किंवा "या पात्रावर अधिक प्रकरण लिहा" वगैरे मान्य करेल. संपादक नंतर येतो.
वैज्ञानिक कथा हा विषय आला म्हणून Heisenberg's Uncertainty Principle हे एक उदाहरण दिलं. काही वैज्ञानिक सत्याला खोडून कथा पुढे दामटू लागले की वाचवत नाही. हे थोडक्यात सांगितलं.
________________
कुंपणापलिकडचे शेत नाही वाचलं.
प्रोजेक्ट हेल मेरी (तसेच
प्रोजेक्ट हेल मेरी (तसेच आर्टेमिस, मार्शियन) वगैरे अँडी वायरची पुस्तके ठोस वैज्ञानिक तथ्यांवर आधारीत आहेत. त्यात आज अस्तित्वात नसलेली तेक्नॉलोऑजी क्वचितच असते. टाइम मशिन वापरून मागे पुढे जायचे, कुठलेही काम करू शकणारा रोबोट वगैरे त्याच्या पुस्तकात नसतात. आता कल्पनाविलास असणारच, न घडलेल्या काल्पनिक घटना असणारच. पण तो वैज्ञानिक तथ्यांशी व आज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाशी जवळजवळ १००% प्रामाणिक राहतो.
प्रोजेक्ट हेल मेरी वाचले तेव्हा मला प्रचंड आवडले होते. आज रात्री सिनेमा बघायला जाणार आहे.
सायलो नावाची तीन पुस्तकांची मालिक काही महिन्यांपुर्वी वाचली. वूल, शिफ्ट आणि डस्ट असे तीन भाग आहेत. जमिनीखाली एका प्रचंड मोठ्या सायलो (सिलिंडर, दंडगोल) मध्ये एक पूर्ण समाज राहत आहे. सगळ्यात वरचा मजल्यातून बाहेरचे जग दिसते - बाहेर काही कॅमेरे आहेत ज्यातून बाहेरचा परिसर दिसतो. बाहेर सगळे बेचिराख झालेले आहे. बाहेरचे जगात मनुष्याला जगणे शक्य नाही हे या सायलो मध्ये राहणार्या समाजाला सांगितलेले आहे. हे आता कधीपासून सायलोमध्ये राहत आहेत, किती पिढ्या गेल्या हे देखील विस्मरणात गेले आहे. जर कोणी सायलो सोडून बाहेर जायची इच्छा प्रकट केली (किंवा गंभीर गुन्हा केला) तर त्या माणसाला लगेच बाहेर पाठवले जाते. व त्याचे मरण कॅमेरामधून सर्व सायलोवासी पाहतात.
पहिल्या भागात सायलोत राहणारे लोक, त्यांच्यातली सामाजिक उतरंड, राजकारण/सत्ताकारण हे येते. बाहेर काय आहे, याची उत्सुकता हा भाग टिकवतो. पुढले दोन भागांबद्दल काही लिहित नाही कारण मग सस्पेन्स निघून जाईल आणि वाचयला मजाच येणार नाही.
आजचे जेफ बेझोस, एलॉन मस्क सारखे महा श्रीमंत, प्रचंड टेक्निकल ताकद असलेले ऑलिगार्क कदाचित या सायलो मध्ये जे (वा सायलोत येण्यापुर्वी) जे झाले आहे तसे काहितरी करतील असे मला खरेच वाटते. मस्कच्या मनात आले तर पृथ्वीवरला समाज सगळा उडवून, केवळ मोजके लोक अश्या सायलोत भरेल. आणि वर म्हणेल मी पृथ्वी वाचवायला लोड कमी केला (कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येची गरजच काय)! झ
एक नक्की वाचण्यासारखे सायन्स फिक्शन!
Pages