प्रतिभावंतांच्या तऱ्हा

Submitted by हेमंतकुमार on 23 January, 2022 - 21:40

अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्‍या किश्शांची संख्याही भरपूर असते.

अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.

१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.

२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.

३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.

आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :

४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.

५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !

६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.

आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.

आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.

असे गमतीशीर किंवा तर्‍हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे सांगणार आहात त्याचा तुमच्याकडे काही पुरावा >>> अवघड आहे. हे जग सॉक्रेटिसांनी भरलेले आहे. सामान्य माणसे ऐकून घेतात. भलं बुरं स्वतः निवड करतात. मुळात आमच्या सारख्या सामान्यांना कुणी काही सांगायला येत नाही. आलेच आणि त्याला प्रश्न विचारले तर कसं व्हायचं!

साहित्यिक रवींद्र पिंगे यांची आज जन्मशताब्दी. हरहुन्नरी असलेल्या या लेखकाने आपल्या हयातीत देशी विदेशी अशा 500 प्रतिभावंतांची सुरेख व्यक्तिचित्रणे लिहिली. एकेकाळी त्यांची साप्ताहिक माणूसमधील अशी लेखमाला खूप लोकप्रिय झाली होती. कालौघात राजहंस प्रकाशनाने पिंग्यांच्या निवडक व्यक्तीचित्रणांचा संग्रह असलेले ‘निवडक रवींद्र पिंगे' हे दर्जेदार पुस्तक प्रकाशित केले. ते पुस्तक अतिशय वाचनीय असून माझ्या संग्रही आहे. त्याच्या वाचनातूनच प्रस्तुत धागा इथे काढण्याची प्रेरणा मिळाली. संबंधित पुस्तकाला प्रकाशक दिलीप माजगावकर यांनी लिहिलेली प्रस्तावना देखील समर्पक आणि वाचनीय आहे.

पिंग्यांनी व्यक्तीचित्रण, ललित लेखन, प्रवास वर्णन आणि अनुवाद हे साहित्यप्रकार लीलया हाताळले. वरील पुस्तकात त्यांनी स्वतःचे देखील आत्मचित्रण केलेले असून त्यात ते म्हणतात,
“मी सॉमरसेट मॉमसारखा लेखक आहे. लेखकांच्या दुसऱ्या पंगतीतील पहिली खुर्ची माझी !”

पिंगेंना अभिवादन !

माझे आवडते लेखक. आमच्या कॉलेजात आलेले आणि एक कथाही सांगितलेली. रवींद्र पिंगेना अभिवादन. चित्रदर्शी लिखाण होतं त्यांचं, कोकणावर लिहिताना डोळ्यासमोर उभं करायचे, त्यांचं उपळे गाव, आजूबाजूचा परिसर.

अन्जू +१
* उपळे गाव,
याचे वर्णन त्यांनी अतिशय बहारदार केलेले आहे. . . त्यांच्या लहानपणीच्या काळातील गावातील मिट्ट काळोख वगैरे...

समर नखाते : नाबाद 75 !
त्यानिमित्त त्यांच्यावर लिहिलेला अतिशय वाचनीय लेख :
https://www.weeklysadhana.in/view_article/Summer-Wholeness-and-Cinema!

“. . . झगमगटापासून कटाक्षाने दूर राहणारा समर. अत्यल्पतावादी. चहा कॉफीची चवही माहित नसलेला समर. साग्रसंगीत स्वयंपाक करून इतरांना खाऊ घालतो पण स्वतः मात्र अल्पाहारी. 'न-खाते न-पिते नखाते' हे त्याचे बिरुद आहे. . . “

रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाटक व चित्रपट या दोन कलांमधील फरक एका छान शब्दजोडीतून स्पष्ट केला आहे तो असा :
“नाटक ही श्रमाधारित कला आहे तर
चित्रपट ही भ्रमाधारित कला”.

त्यांची पसंती श्रमाधारितला असल्याने ते फक्त नाटकातच रमले.

लेखकांच्या तऱ्हा चर्चेत आल्या आणि सादत हसन मंटो नाही ताज्या संदर्भात !

किस्सा १ - मंटोच्या कथा वाचून तत्कालीन समाजात वादळ उठले होते, त्याच्या खोल दो आणि ठंडा गोष्त ह्या कथांवर त्याच्या विरुद्ध भारतात ३ आणि पाकिस्तानात ३ अश्लीलता पसरवणारे लेखन केल्याबद्दल खटले भरले गेले. त्याकाळी भर कोर्टात मंटो म्हणाला होता "माझ्या कथा घाण नाहीत तर तुम्ही राहता तो समाज घाण आहे".

किस्सा २ - अशाच एका खटल्यात साक्ष म्हणून मंटोचा मित्र असणारा सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज कोर्टात उभा होता. त्याने साक्ष दिली की मंटोची कथा अश्लील नाही पण पुढे पुस्ती जोडली की ही कथा तशी उत्तम साहित्यिक मूल्यं आणि चांगली भाषा असणारी पण म्हणली जाऊ शकत नाही ज्यावर मंटो उसळून म्हणाला होता की हे असले मित्र असता शत्रूंची गरजच काय !

किस्सा ३ - वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अतिरेकी मद्यपानाच्या व्यसनाने मृत्यू होण्यापूर्वीच मंटोने त्याचा स्वतःचा एपिटाफ (कबरीवर लावायचा स्मृती पर दगडी बोर्ड फलक) तयार करवून घेतला होता, त्यावर लिहिले होते की "इथे ह्या जागी मातीच्या ढिगाऱ्या खाली शांत पडून सादत हसन मंटो विचार करतोय की जगातील सगळ्या सर्वोत्तम लघुकथा लेखक कोण ? देव का मी ?"

* सादत हसन मंटो ताज्या संदर्भात !
>>> वा ! छान +1
जेम्स,
काही दिवसांपूर्वी इ मेल केली होती . मिळाली ?

नाही, मेलचा काहीतर problem आहे, लॉगइन करता मेल आयडी अस्तित्वात नाही म्हणून मेसेज येतो होता. आता सरळ केला आहे आयडी परत पाठवा मेल जमल्यास

शुभ्र काही जीवघेणे' हे अंबरीश मिश्र यांनी लिहिलेले एक व्यक्तिचित्रण संग्रह असलेले पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचले. या पुस्तकात बेगम अख्तर, मंटो, ओ. पी. नय्यर यांसारख्या प्रतिभावान कलावंतांच्या जीवनाचा आणि त्यांच्या संघर्षाचा वेध घेतला आहे.

हसन मंटो ह्यांची जीवन कथा वाचून हळहळ वाटली. अतिशय प्रतिभावंत कलाकार निव्वळ व्यसनापायी आणि धरसोड वृत्ती, तसेच लहरीपणामुळे अकाली गेला. फाळणीच्या वेळी भारताला की पाकिस्तानला निवडायचे असा प्रश्न समोर येताच एका रात्रीत त्यांनी पाकिस्तान निवडला.

त्यांची 'ठंडा गोश्त ' ही फाळणीवरची कथा वाचताना अंगावर काटा येतो.

हसन मंटो ह्यांची जीवन कथा वाचून हळहळ वाटली. अतिशय प्रतिभावंत कलाकार निव्वळ व्यसनापायी आणि धरसोड वृत्ती, तसेच लहरीपणामुळे अकाली गेला.

तो तसा नसता तर तो मंटो असता का ? हा मला वाटतं कळीचा प्रश्न ठरावा.

वरच्या पट्टीत गाणारे कैक शास्त्रीय गायक खासकरून रागदारी + उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय गाणारे दिग्गज गायक म्हणे समोरच्या (बैठकीत गिर्दी समोर ठेवलेल्या) फुलपात्राने झाकलेल्या तांब्यात म्हणे ऊन कोमट पाण्यात मिसळून व्हिस्की ठेवत असत. मधे मधे घोट घेऊन घशाला आराम पडावा म्हणून

ख.खो.दे.जा. आणि चू. भू.दे.घे (कारण हे कुठे वाचलेले नाही/ अनुभवलेले नाही) तर फक्त ऐकिवात आहे.

जेम्स,
असो. काही विशेष नाही. बऱ्याच काळाने तुम्ही माबोवर दिसला होता म्हणून केली होती. आता इथे प्रत्यक्ष संवाद झालाच आहे Happy
. .
* अंबरीश मिश्र यांनी लिहिलेले >>>
त्यांचे साधना साप्ताहिकातले लेख मी वाचत असतो.

जेम्स वांड यांनी वरती हसन मंटो यांची एलेजी लिहीलेली आहे. त्यावरुन हे आठवले.
---------------------
कुमार सर, अवांतर वाटल्यास कळवावे. जर वेळेत तुम्ही लिहीले व माझ्या लक्षात आले तर काढून टाकेन.
-----------------
रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमांमधून लॅरी किंग हे प्रसिद्ध झालेले आहेत. या मुलाखतकाराने नामवंत, गुणवंत, सौंदर्यसंपन्न, श्रीमंत, बुद्धीमान अशा ३०० कलाकारांना, खेळाडूंना, बिझनेसमधील व्यक्तींना १ प्रश्न केला तो हा की - "त्यांच्या पश्चात, लोकांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आठवावं असं या लोकांना वाटतं? "
.
या प्रश्नाला या ३०० लोकांनी जी उत्तरे दिली त्यातून " रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन - Remember Me When I'm Gone" हे पुस्तक जन्मास आलं. यातील उतारे अनेकविध प्रकारची आहेत- काही निखळ विनोदी तर काही अंतर्मुख करणारी तर काही त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेचा आदर वाढवणारी आहेत.पुस्तकात एकूण व्यक्तीमत्वांचे व्यवसायानुसार ९ भाग आहेत - चित्रपट तारे/तारका, खेळाडू, लेखक, व्यंगचित्रकार, विनोदसम्राट, बिझनेसमधील लोक, पत्रकार, संगीतकार आणि स्टेजवरील कलाकार. एक नक्की की अनेकांना या प्रश्नाने आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्यास भाग पाडले आहे.
.
आता सुरुवात करू यात की त्या त्या व्यक्तीला तिच्या थडग्यावर काय लिहीलेले आवडेल अशा काही उदाहरणांची -
भाग १ चित्रपट तारे तारका-
(१) जोआन बार्न्स - हुश्श! शेवटी एकदाची पार्कींगची जागा मिळाली बाई!
(२) शेली बर्मन -मी देखील तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे हे पटविण्याचा मी वर्षानुवर्षे व्यर्थ प्रयत्न केला की . आतातरी तुम्हाला ते पटेल अशी वेडी आशा आहे.
(३) फ्लोरेन्स हेंडरसन- जीवनाचा प्रारंभ श्रद्धा, आशा आणि प्रेम या मूल्यांनी झाला. जीवनाच्या अंतीम काळी श्रद्धा, आशा, प्रेम ही मूल्ये होती. मधल्या काळात मी संशयाच्या भोवर्‍यात गटांगळ्या खात होते.
(४) शर्ली नाईट - या जन्मी मला ही गोष्ट कळली की हिंसा हे कोणत्याही समस्येचे समर्थक उत्तर होऊ शकत नाही हे मला कळले याबद्दल मी उपकृत आहे परंतु या गोष्टीचे वाईट वाटते की बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळण्यासाठी एक जन्मदेखील पुरत नाही.
(५) जॅनेट लेह - ईश्वरी तत्त्व आपल्या वागणूकीमधून प्रकट करण्याकरता आयुष्य ही एक संधी तुम्हाला दिलेली असते. मी ते दर वेळेस प्रकट करू शकलोच असे मी म्हणू शकत नाही पण ईश्वर जाणतो की मी प्रयत्न केला.
(६) जॉर्ज चॅकीरीस - क्षण कितीही काळा असो, प्रेम आणि आशा यांना सदैव संधी असते.
(७) स्टेसी कीच - Here Lies Stacy Keach A georgia peach Lived At the beach Now out of Reach
.
भाग २ खेळाडू -
(८) बॉब कुसी - जेव्हा कोणाचं लक्ष नव्हतं तेव्हा त्याने त्याचे सर्वोत्तम देणे देऊ केले
(९) डोमिनो डिमॅजीओ - A guy who thrived on challenges large and small.
(१०) बॉबी नाईट- When my time on earth is done and i have breathed my last I want they bury me upside down So my critics can kiss my ass.
(११) जेरी कूसमॅन - पहीला आणि शेवटचा गडी बाद करणं सोपं होतं. मधल्या सर्वांनी माझे केस करडे केले.
(१२) टॉमी लासोर्डा - Dodger stadium was his address but every ballpark was his home.

भाग ३ लेखक-
(१३) जॅक कॅनफील्ड - त्याची प्रत्येक कथा ही दुखऱ्या जगावर केलेली मलमपट्टी होती.
(१४) फॅनी फ्लॅग - म्हणजे? पुस्तकांचा दौरा संपला म्हणायचा की काय?
(१५) क्लाईव्ह कसलर - It was a great party while it lasted I trust it will continue elsewhere
(१६) अँड्र्यू ग्रीले - May it be said When I am dead His sins were Scarlet His books were read
(१७) इव्हान हंटर - तो एखाद्या देवदूतासारखा लिहीत असे

सामो,
छानच आहेत !
* जोआन बार्न्स - हुश्श! शेवटी एकदाची पार्कींगची जागा मिळाली बाई!
>>> हे लयच भारी !!

हसन मंटोची ठंडा गोश्त वाचून मी त्यावर मीवापु वर लिहिले होते. मलाही सवंग वाटली होती, मी काही सोवळी नाही पण फोरप्लेचे वर्णन जास्त आणि क्लायमॅक्स किंवा कथेच्या शिखराचे, ह्यूमन इलेंमेंटचे कमी वाटले. तुम्ही ज्यावर विस्तृतपणे लिहाल तेच शेवटी लक्षात राहते.

पण तरीही त्या काळातील कथा त्यातील वातावरणनिर्मिती मुळे आपल्यापर्यंत जश्यास तश्या पोचवण्यात मंटो निर्भिड, मनस्वी आणि प्रामाणिक वाटतात. कलाकार मनस्वी असतात त्यामुळे हे आपोआपच येतं त्यांच्यात.

तुम्ही ज्यावर विस्तृतपणे लिहाल तेच शेवटी लक्षात राहते. >>> असंच काही नाही. कथेत येणारी एखादी भावना (जास्त करून कसलीशी वेदना) किंवा खटकेदार ट्विस्ट विस्तृतपणे लिहिलेले विसरायला लावू शकते. मंटो वाचला नाही त्यामुळे त्याबद्दल माहित नाही पण तकदीचा लेखक हे सहज साधू शकतो.

पण ह्या कथेबाबत तरी मला तसं वाटलं नाही माधव. बिल्ड अप जास्त वाटला आणि तो नेमका फोरप्लेचा होता. पण ह्या अंगवस्त्रास सेक्ससाठी क्लायमॅक्स तो नायक देऊ शकला नाही कारण तो एका अपराधबोधातून जात होता, तो म्हणजे दंगलीत बलात्कारासाठी उचललेल्या एका निरागस मुलीशी केलेल्या मृतदेहाशी संभोग. ती रखेल तेवढं त्याच्या पुरुषार्थाला आव्हान देत होती, किंवा तो दुसरीकडे तर गुंतला नाही याचा अंदाज घेत होती.

त्यामुळे हे बिल्ड अप असू शकेल. ठंडा गोश्त म्हणजे थंड पडलेला मृतदेह होता. योग्य- अयोग्य मी नाही ठरवत यात काही पण मनात जे नंतर रेंगाळले तो आधीचा भाग होता. शिखर नाही. त्या काळाच्या मानाने बोल्ड आणि अस्सल मात्र आहेच ! या लघुकथेवरून सगळा मंटो समजला असे मात्र मला वाटत नाही. अजून वाचायला हवं मंटोचं काहीबाही.

आवडत्या लेखकांच्या/ महान व्यक्तींच्या तऱ्हा म्हणले आणि आमचे हिंदी राजकीय व्यंग लेखणीचे अनभिषिक्त बादशाह हरिशंकर परसाई चर्चेत नाहीत असे व्हायला नको !

१. परसाई सात वर्षांचे असताना त्यांचे आईवडील लागोपाठ गेले (प्लेग) त्यामुळे लहानगा हरिशंकर एकदम पोक्त झाला आणि आपल्या लहानग्या भावंडांसाठी झटू लागला, जगाला हसवणारा हा माणूस स्वतः खळाळून कधीच हसला नाही !.

२. सामाजिक प्रश्नावर चाबूक ओढणाऱ्या परसाईजीना मुक्या जनावरांवर प्रेम/ भूतदया मात्र प्रचंड होती, इतकी का त्यांच्या घरात खुडमुडणाऱ्या एका उंदरासाठी ते रोज चपाती ठेवत, इतकेच नाही तर त्या उंदराचे फूड प्रेफरन्स सुद्धा त्यांनी आत्मसात केले होते.

images (32)_0.jpeg

मंटोचा अजून एक किस्सा ऐकला/ वाचला आहे.

एकदा मंटो आपल्या खोलीत रेडिओवर आकाशवाणी लावून गाणी ऐकत बसलेला होता मध्यम आवाजात, तो ज्या पलंगावर बसला होता तो खिडकीला लागून होता आणि खिडकी खाली गल्लीतली काही मवाली/ रोड रोमिओ टाईप पोरे येत्या जात्या बाया बापड्या अन् पोरीसोरींवर अतिशय खालच्या पातळीची "ग्राफिक डीस्क्रिप्शन ने परिपूर्ण" चर्चा करत होते. तितक्यात अजान झाली तशी ती पोरे चिडीचूप झाली, दोन मिनिटे कोणी काहीच बोलले नाही अन् तिसऱ्या मिनिटाला एक पोरगा ओरडून मंटोला म्हणाला.

"देवधर्म, समाजरीत, संस्कार, सौजन्य अन् सज्जनता आहे की नाही भडव्या तुझ्यात थोडीतरी"

चांगली चर्चा !
* ठंडा गोश्त व अन्य 1-2 वाचल्यात. आवडल्या होत्या. त्यावरचा एखादा लघुपटही पाहिल्यासारखे आठवते आहे.

* हरिशंकर परसाई चर्चेत
>>> वा, मस्त. चर्चेत आणले हे फार छान झाले . . .

1950-70 या काळात हिंदी चित्रसृष्टीतील अनेक नटनट्यांना चित्रपटात घेताना त्यांची मूळ नावे बदलून टोपणनावांनी त्यांचे चित्रपट-बारसे केलेले होते. तेव्हाच्या 3 प्रमुख अभिनेत्रींची नावे ‘’च्या बाराखडीतील होती.
त्यानुसार :

  • फातिमा राशीद झाली नर्गिस,
  • फ्लॉरेन्स इजिकेल >>> नादिरा आणि
  • नवाब बानो >>>> निम्मी.

यापैकी नर्गिस व नादिरा या नावांना अरबी/फारसी भाषांमधून विशिष्ट अर्थ आहेत :

  • नर्गिस = डॅफोडिल फूल = Narcissus. तसेच साहित्यात मादक, सुंदर व झुकलेल्या डोळ्यांसाठी याचा काव्यात्मक वापर होतो.
  • 'नादिरा' = दुर्लभ, अनोखे , अद्भुत.

“बाई वाड्यावर या”
निळू फुलेंचे नाव मराठी चित्रसृष्टीत अजरामर झालेले आहे. त्यांनी अनेक भूमिका वठवल्या असल्या तरी त्यांचे नाव उच्चारताच लोकांच्या तोंडात “बाई वाड्यावर या” हे वाक्य लगेच येते. परंतु फुल्यांची कन्या गार्गी यांनी या मुद्द्याला आक्षेप घेतलेला आहे. फुले यांनी कुठल्याही चित्रपटात ते वाक्य म्हटलेलं नाही असे त्या म्हणतात. प्रेक्षकांनी ते वाक्य शोधून दाखवावे असेही आवाहन त्यांनी केलेले आहे.

त्यांची ही प्रतिमा पुसली जाण्यासाठीच त्यांच्यावर आता चरित्रपट निघत आहे :
https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/nilu-phule-biopic-gar...

Pages