डाएट डाएट

Submitted by ऋतुराज. on 11 January, 2026 - 01:21

डाएट डाएट
Screenshot_20260111_113956_Chrome.jpg

नवीन वर्ष सुरू होताना बरेचजण नवनवीन संकल्प करतात. त्यात मुख्यत्वे "या वर्षात मी नियमित व्यायाम करणार" किंवा तत्सम व्यायामाशी निगडित एकतरी संकल्प हा असतोच असतो. या व्यायामाच्या संकल्पात चालणे, धावणे, पोहणे, एरोबिक्स, जिमला जाणे, झुंबा आणि यासारखे अनेक व्यायामाशी निगडित प्रकार येतात.
परंतु, व्यायामाबरोबरच आणि तितकाच आवश्यक असलेला, चौरस आहार म्हणजेच "डाएट" याला देखील या नववर्ष संकल्पात महत्वाचे स्थान असते.
आजकाल अनेक नवनवीन प्रकारचे डाएट आले आहेत. कीटो डाएट, विगन डाएट, इंटरमिटंट फास्टिंग....अशी यादी मोठी आहे.
त्यात आजकाल दररोज समाज माध्यमातून मधुमेह, हृदयविकार, स्थूलता आणि इतर आजारात कोणता आहार घ्यावा किंवा एकूणच आहार कसा असावा याबद्दल अनेक व्हिडिओ, माहिती यांचा सतत भडिमार चालू असतो. त्यातून नेमका आहार कसा निवडावा हा मोठा प्रश्न आहे.
लहान मुलांचा आहार, वृद्धांचा आहार, महिलांचा आहार, रुग्णांचा आहार यातही बरीच विविधता आहे. तसेच डाएटच्या नावाखाली अनेक नवीन उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून योग्य अयोग्य कसे निवडावे हा एक मोठा प्रश्न आहे.

तर डाएट, त्याबद्दलचे समज- गैरसमज, तुमचे सध्याचे डाएट, त्याबद्दलचे तुमचे अनुभव. काही अभिनव डाएट रेसिपी, टिप्स आणि डाएटबद्दल सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी हा धागा.

प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड खाण्याच्या बाबतीत मी पण किल्लीच्या बोटीत. Happy

तळलेले व मैद्याचे पदार्थ पटकन कमी करता आले.

गोड पदार्थ कमी करायला फार कष्ट पडत आहेत.
शिवाय सध्या शिपवर असल्याने रोज सकाळ संध्याकाळ समोर तीन चार वेगवेगळे स्वीट्स असतात.

If मी अनेकदा सुरु केले पण त्यात overeating होतंय.
अनेकदा सुटलं
कामाच्या अनियमित वेळा
कधी घरून कधी हॅपीसातून
ह्यामुळे बाई तू घड्याळ पाळ म्हटलं की माझ्या अंतर्मणाला राग येतो आणि आणखी उलटे परिणाम घडतात.
शक्यतो घरचे खाणे, junk टाळणे वगैरे जमत
Portion balance, चौरस आहार साधणे वगैरे मध्ये प्रगती आहे.
Touchwood पण त्यामुळेच की काय immunity चांगली आहे, एवढा विचित्र हिवाळा ऋतू असूनही कोणते आजार किंवा सर्दी खोकला नाही.
.
पण ज्या दिवशी गोड कमी किंवा बंद करायचा विचार करते
त्या आठवड्यात सलग रोज काहीतरी खाल्लं जातं
.
जरा शिस्तीची गरज आहे स्वतः ला
.
संकल्पच्या धग्यावर बहुतेक, वाचलं होतं की एक कोणतातरी जास्त खाल्ला जाणारा गोड पदार्थ बंद करयचा मग सवय सुटते, जसे खीर किंवा जिलेबी.
पण मला असा पदार्थ सापडत नाहीये स्वतः साठी विचार करूनही
एवढं वैविध्य पूर्ण गोड खाते Lol

सौरभ बोथ्रा चे डायट व्हिडीओ चांगले आहेत. तो त्या (योगा) विषयात आय आय टी तून शिकलेला आहे.
पोळी, भात, भाकरी चे प्रमाण एकूण च कमी ठेऊन भाजी, सॅलड, उसळी, दही, डाळ ह्यांचे प्रमाण जास्त ठेवा असे त्याचे मत आहे.
पर्स्नली मी पण अतरंगी ने लिहिल्या प्रमाणेच तेल, मैदा, साखर असलेले प्रकार कमी खाते. तळलेले टाळते.
योगा, इतर व्यायाम, चालणे, कधितरी पोहणे सुरू ठेवते..

भाकरी चे प्रमाण वाढवायचे आहे पण जमत नाहीये गणित. कोरड्या भाज्या भाकरी शी नाही खाता येत Sad

किल्ली Lol
गोड पदार्थ बाहेर चा का घर चा? जिलेबी तर बाहेर ची असेल ना? ती टाळा Wink

आशु आम्ही वाट्टेल ते घरी करून खातो. जिलबी घरी केलेलीच खाते मी, मस्त होते, बाहेरची नाहीच आवडत..
तुम्ही म्हणताय तसं बाहेरचं गोड बंद म्हटलं तर ६०% आधीच achieved आहे. पण आयडिया चांगलीये
बाहेरची खीर, बासुंदी, जिलेबी बंद हे जमलं असं म्हणू शकते Wink
...

उरेका moment --
लाडू...
आमच्याकडे घरच्या पेढा आणि बर्फीसाठी homemade लाडू,प्रसादाचे लाडू ह्यांचा स्टॉक असतो..
..
चला, no लाडू, उरलेला january आणि फेब्रुवारी, मार्च पाळावा असा संकल्प करतेय..

सकाळी अनशापोटी जिलेबी आणि मठ्ठा खायचं. दुपारच्या जेवणात पनीर, पुरी, भजी, दोन भाज्या, भात आणि बर्फी असावी.
रात्री दणकून खावं. स्वीट डिश म्हणून रसगुल्ला किंवा गुलाबजाम असावा. बिनधास्त खा.
ज्यांना चालते त्यांनी दोन पेग घ्यावेत. इतरांनी कोल्डड्रिंक्स घ्यावेत.

जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही.

व्वा, ऋतुराज! धागा काढून चांगले केलेस. हा सध्या माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. इथे नियमित येत राहीन.

मागच्या दीडेक महिन्यांपासून विशेषतः पोटाचा घेर कमी करण्यासाठी योग्य ती दिनचर्या, आहारविहार, व्यायाम, प्राणायाम असे करणे सुरु आहे. ०.१०८% फरक पडल्यासारखे वाटल्याने हुरूप खूप वाढला आहे! Lol

जौक्स् अपार्ट, व्यक्ती तितक्या प्रकृती हे आहाराबाबतीतही लागू आहे.

मी नेहमीच दोनदा किंवा तीनदा खातो. अधेमधे काहीही खात नाही. पण मागच्या दीडेक महिनांपासून - सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धे लिंबू, जिमला जाण्यापूर्वी कोणतेही एक कार्ब (एक ब्रेड किंवा दोन बिस्किटे, किंवा अर्धी पोळी इ) तासाभरानंतर जिमवरून आल्यावर कोणतेही एक प्रथिन (मोड आलेले कडधान्य, ताजे मटार, उडिदाचा एक लाडू इ.) नंतर माफक चौरस नाश्ता दुपारी फळे, सलाड वगैरे; संध्याकाळी जिमच्या वेळी सकाळप्रमाणेच रात्र आठ वाजण्याआधी मोफत चौरस जेवण.

शरीराच्या आकारात खूप फरक पडला असे नाही, पण ऊर्जापातळी वाढली आहे. रक्तदाब, साखरपातळी इ वर कसलाही अनिष्ट परिणाम झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

पुढे जसे अनुभव आले तसे लिहीत राहीन; सध्या हे माझे आवडते प्रथिन -

मोड आलेले मटार

विषय चांगला आहे.

अंगकाठी बारिक असलेल्या व्यक्तीचं वजन वाढलं तर त्याला ते रोजच्या आयुष्यात शरीरावर मोठं ओझं बाळगल्यासारखं वाटतं.. हे मी स्व- अनुभवातून सांगते. आधी वजन वाढत नव्हतं आणि जेव्हा बाळंतपणात ( नैसर्गिकरीत्या वाढतंच म्हणा तसं ते ) वाढलं तेव्हा छप्पर फाडके एकदम..!

पहिल्या बाळाच्या वेळी नाही जमलं वजन कमी करायला .. नोकरी सुरु केली लवकरच .. थोडेफार प्रयत्न केले मात्र ते तोकडे पडले.

दुसऱ्या वेळेस मी स्वतःलाच बजावले , ' अभी नही तो कभी नही' ..! ( त्यावेळी कामातून थोडी जास्त रजा घेतली ) दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर ६ महिन्यातच जीमला जायला सुरुवात केली. ( जीम कॉलनीतच असल्यामुळे जास्त दूर नव्हते .. हा एक फायदा झाला.) पण नुसता व्यायाम करून वजन प्रमाणात राहत नाही.. त्यासोबत आहारही प्रमाणात हवा हे तीन-चार महिन्यात ध्यानात आले.

३१ डिसेंबरला एक मैत्रिण दोन वर्षाने भेटली.. अगदी ओळखू येत नव्हती.. २५ किलो वजन कमी केले होते तिने वर्षभरात..! तिला पाहून प्रेरित झाले आणि मग.. तिने दिलेला डाएट चार्ट पाळायला सुरुवात केली.. सुरुवातीला एक महिना कठीण गेला .. नंतर मात्र चार एक महिने काटेकोरपणे पाळला .. त्याचा शरीराला फायदाच झाला .. तोटा असा काही नाही.. !

मी कुणी आहारतज्ञ नाही आणि जे माझ्या शरीराला झेपलं तितकं मी पाळलं.. ते इतरांनाही झेपेलं असा कुठलाही दावा मी करत नाही. फक्त माझा स्वानुभव मांडतेयं..

सकाळी ७.३० - एक ग्लास कोमट लिंबू, आलं रस पाणी ( साखर न घालता)

८ ते ९ - व्यायाम ( जीम )

९.०० ते १०.०० - नाश्ता ( ह्यात फक्त पोहे किंवा इडली, किंचित साखर घातलेले एक कप दूध ) इडली, पोहे केले नसतील त्या दिवशी एखादा पेरू, पपईच्या दोन फोडी, संत्र, मोसंबी .( जे घरात असेल ते फळ)

१२.३० ते १.३० - जेवण. ( जेवणात मिक्स धान्य पीठाची एक भाकरी ( गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ) , भाजी, ( कुठलीही भाजी मी फक्त दोन चमचे तेल घालून स्वतःसाठी वेगळी बनवायचे ) कोशिंबिर. भाकरी नसेल त्या दिवशी ब्राऊन राईस बनवायचे स्वतःसाठी. ..! डाळ/ वरणाचा माझा ३६ चा आकडा आहे. मला नाही आवडत कारण acidity. त्यामुळे ते आताही टाळते. लोणचं , तळलेला पापड वर्ज्य..!

संध्याकाळी ५.३० - लिंबू पाणी एक ग्लास / ताक.

६ वाजता जीमला किंवा चालायला जाणे.( साधारण एक तास )

रात्री ८ ते ९ - पपईच्या दोन ते तीन फोडी, झोपताना एक कप दूध ( साखर न घालता)

कमीत कमी रात्री ६ ते ८ तासाची झोप घ्यायचे .. दिवसा झोप यायची नाही कारण सवय नव्हती.

मध्ये जर भूक खूप जाणवली तर भाजलेले चणे , खजूर , ओलं खोबरं, तीळ वगैरे खात असे. कोमट पाणीच प्यायचे. फ्रिजमधले पाणी बंद .( आजही थंड पाणी पित नाही.)

हा आहार तक्ता साधारण ( फेब्रुवारी २०१७ ते मे २०१७ ) चार महिने मी काटेकोरपणे पाळला. दुसऱ्या बाळंतपणात वाढलेलं १५ किलो वजन त्यामुळे कमी झालं. त्यावेळी रजेवर होते आणि जीम किंवा चालायला जायच्या वेळी बाळाला ( तेव्हा बाळ साधारण ६ महिने ते सव्वा वर्षाचे होते ) सासू-सासरे बाळाला सांभाळायचे त्यामुळे मला तेव्हा हे शक्य झालं. आता मला विश्वासच बसत नाही की, मी खरंच हे असं डाएट पाळलं होतं. त्यावेळी स्वतःला खूप शिस्त लावली होती.

चहा मी आजही पित नाही. बिस्कीट / बेकरी पदार्थ आवडत नाहीत. नारळपाणी / ऊसाचा रस आवडतो. ऊसाच्या रसाच्या बाबतीत मी चिटींग करते. नवरा हसतो तरीही..!

ज्यावेळी हे डायट करत होते त्यावेळी वडापाव, समोसा, फरसाण ह्यांना हातही लावला नाही. तसंही आता नेहमी खात नाही. cold drink पूर्ण बंद. तळलेले पदार्थ टाळले. खूप गोड फळं टाळली. पेरू, पपई, संत्र, मोसंबी, द्राक्ष यांना पहिला मान दिला. पपईची झाडं मागच्या अंगणात होती. त्यांनी पोटाला खूप आधार दिला. मी त्या चार महिन्यांत चपातीही खाल्ली नाही. मी शक्यतो सकाळी नवऱ्याच्या डब्याला आणि घरच्यांसाठी मिक्स पिठाची भाकरी बनवायचे. चपाती बनवलीच नाही. भाज्या बनवताना कोबी, पालेभाज्या , कडधान्य सगळं आलटून- पालटून वापरायचे. चिकन, मासे खायचे .. पण कमी तेलात बनवलेले.

बरं हे सगळं पाळताना मी घरच्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय केला नाही. स्वतः बाजारात जाऊन मासे , चिकन आणून बनवून दिले. माझ्यासाठी त्यांच्या आहारात काही बदल केले नाहीत. ह्या काळात बाळाला स्तनपान हि चालू होते.

वजन बरंच कमी झाल्यावर मी माझ्यावरचे निर्बंध जरा कमी केले. त्यामुळे थोडे वजन परत वाढले. त्यामुळे काही जास्त फरक नाही पडला. रोजचा व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे वजन प्रमाणात राहिले. त्यानंतर करोना आणि
लॉकडाऊन लागले आणि बाहेर पडणं कठीण झाल्यावर व्यायामावर बंधन आली. आणि मग सगळंच गणित बिघडलं. आता पुन्हा ठरवतेयं की, उद्या पासून पुन्हा तसंच डाएट पाळू या पण तो उद्या उजाडतच नाही. ९ वर्षापूर्वीचा उत्साह आणि तेव्हाचे वय दोन्हीही आता माझ्याकडे उरले नाही.

तेव्हाचा आहार जो मी घ्यायचे त्याने वजन तर कमी झालेच सोबत उत्साह वाढला. पोटाची / तब्येतीची काहीच कूरकूर नव्हती. रोज शरीर हलकं- फुलकं वाटायचं. सगळ्यात जास्त फायदा हा झाला की, मासिक धर्म दोन- चार दिवस उशिराने यायचा तो अगदी वेळेवर यायला लागला. आधी पोटात खूप दुखायचे, उलट्या व्हायच्या ( अगदी सहन न होण्याइतके .. वेदनाशामक गोळी घेतल्यावर आराम पडायचा) .. ते पूर्णपणे बंद झाले अगदी आजपर्यंत.

माझ्यामध्ये त्याकाळात संतुलित आहार आणि व्यायामाचं एवढं वेडं संचारलं होतं की, प्रत्येक घास खाताना आता किती कॅलरीज आपल्या पोटात गेल्या हेच मनात यायचं. अजूनही येतं आणि त्यामुळे मी मनसोक्त खाण्यातला आनंद गमावला हे मला जाणवतं. हा एक तोटा धरते त्यात.!

आता जे असेल ते खाते मात्र प्रमाणातच. शक्यतो मैदा, तेलकट पदार्थ, मटण वर्ज्यच.. !

रात्री दोन चमचे मेथी, कलौंजी भिजत टाकून सकाळी गाळून घेऊन त्यात आल्याचा रस, हळद टाकून
कोमट करून पिते. नवऱ्यालाही देते.
आता मुले मोठी होताहेत .. त्यांच्या शाळा, ऑफीस, ज्येष्ठ व्यक्तींच्या जबाबदाऱ्या यामुळे जेवणाच्या वेळा नीट पाळता येत नाहीत. व्यायाम सध्या कमी झालायं.. पूर्वी एवढा वेळही नाही. लॉकडाऊन नंतर घरकामाला मदतनीस ठेवली नाही. ऑफीसला अर्धावेळ जाते त्यामुळे निभावून जातं. जमणार नाही असं वाटेल त्यादिवशी पर्याय शोधेन.

आहारात मात्र जे शरीराला / प्रकृतीला योग्य वाटत नाही , सोसत नाही ते घरात बनवणं टाळते. समुद्रजवळ असल्याने मासे जास्त खातो. पालेभाज्या, कडधान्य आहारात असतेचं. थोडी- फार चिटींग होते कधीतरी आहारात.. ठिक आहे तेवढं चालतं.. असं स्वतःलाच गोडी- गुलाबीने पटवून देते.

चाळीशी उत्तम हवी असेल तर पंचविशीत शरीराला जपायला हवे..( हे आता कळतंय..) साठीत शरीराची उत्तम साथ हवी असेल तर पस्तिशीत / चाळीशीत निरोगी जीवन शैली अंगीकारायला हवी .. हे माझ्यापुरतं मी मत बनवलयं.

उतारवयात आयुष्य जगायला १५ ते २० वर्ष आधीच कसे पैसे कमवायला कष्ट करतो.. तसंच शरीराच्या बाबतीत काहीसं हे सुद्धा..दोहरी खुशी..!

पुरेशी झोप, व्यायाम , निर्व्यसनीपणा आणि चौरस आहार.. हेच निरोगी आरोग्याचं चौकोनी लक्षण आहे हे मी मानते.

सगळंच अगदी तंतोतंत , काटेकोटपणे पाळता येईल असं नाही ( माणसंच आहोत साधू संत नाही आहोत..) .. मात्र प्रयत्न करायला काय हरकत आहे..

'ढूँढने से तो खुदा भी मिलता है, प्रयत्न केले तर निरोगी शरीर मिळेलच..!' असा आशावाद बाळगून आहे मी..!

अवांतर : 'आहारानंदी थाळी' ( लेखिका अमिता गर्दे) हे लोकसत्ता 'चतुरंग 'मध्ये नवीन वर्षात नवीन सदर सुरू झालेयं.. आहाराविषयी माहिती असणार आहे .. मी नियमित वाचेन..!

ह्यामुळे बाई तू घड्याळ पाळ म्हटलं की माझ्या अंतर्मणाला राग येतो आणि आणखी उलटे परिणाम घडतात.
>>> Lol अंतर्मनाला सांग की तुला भूक लागली मी खाऊ घालणार आहे बरं.

जोक्स अपार्ट खरंच आपलं शरीर सिग्नल देत असतं ते ऐकले की सोपं जातं. फक्त खरोखरची भूक, तहान आणि शुगर क्रेविंग्स यात फरक करता आला पाहिजे.

<<<मला नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे आयुर्वेदिक आणि अँलोपथिक जीवनशैलीमध्ये किती विरोधी समजुती आहेत!....
नक्की काय अनुसरावे?>>>>

सिमरन आयुर्वेदिक जीवनशैली ही त्या काळाशी सुसंगत जीवनशैली होती. कारण त्या काळातल्या लोकांनी निरक्षणातुन ती विकसित केली होती. अगदी मोजके म्हणजे राजा, प्रधान इ. एलीट मंडळी वगळली तर बहुतांश लोकांच्या जीवनात शारिरीक कष्ट अंतर्भूतच होते. म्हणजे साधी आंघोळ करायची तर वाहरीचे पाणी उपसुन किंवा नदी मध्ये पोहुन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे तर सगळ्यात फास्ट राईड म्हणजे घोडा देखील एका विवक्षित लेवल चा फिटनेस डिमांड करणारा. इतके कष्ट अंतर्भूत असलेल्या जीवनशैलीत क्विक (गुळातील ग्लुकोज)
आणि लॉंग टर्म (तुप) अशा दोन्ही प्रकारच्या इंधनांनी युक्त, कॅलरी डेन्स पदार्थ खाणे फायदेशीर होते म्हणुन ते खाण्याचा सल्ला दिलेला आहे.

आजची आपली जीवनशैली कमीत कमी शारिरीक कष्ट ह्या सुत्राभोवती ऑप्टिमाइझ केलेली आहे. मग त्या जीवनशैलीत इतके कॅलरी डेन्स पदार्थ काउंटर प्रोडक्टिव ठरतील. अगदी रोज तासभर व्यायाम केला तरीही. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीत आधुनिक (एविडंस बेस्ड) आहार सल्ले वापरणे योग्य.

क्रिश अशोक चा व्हिडिओ आवडला आणि पटला.
मी मध्यंतरी हातात वेळ होता म्हणून 2-3 न्यूट्रिशन आणि डाएट वरचे ऑनलाईन शॉर्ट कोर्सेस केले होते. त्या सगळ्यांमधून हेच समजलं होते. शक्यतो पॅकेज्ड फूड आणि बाहेरचे खाणे टाळायचे पण जर ते शक्य नसेल तर ते खाताना त्यासोबत काय खाताय हे बघायचे. म्हणजे जर बाजारातून आणलेलं व्हाईट ब्रेड किंवा पाव खायचा असेल तर त्यासोबत अंडी/ मिसळ ( वरचे फरसाण कमी करून ) किंवा उसळ, फळे, सँडविच करून भाज्या, सॅलड खावे. भाज्या/ सॅलड / उसळ/ फळे यांनी पोट भरलं की ब्रेड आपसुक एखादं - दोन स्लाइस इतकाच खाल्ला जातो.
आमच्याकडे गेले कित्येक वर्षे जेवताना शक्यतो एकच कार्ब प्रकार खाल्ला जातो. मुळात याचे कारण मला स्वतःला भात फारसा आवडत नाही हे आहे. भात फक्त पोळ्या / भाकरी करायचा कंटाळा आला की केला जातो
शिवाय भात किंवा फुलके कमी आणि सोबत मोठा वाडगा भरून घट्टसर डाळ, आणि वाटीभर भाजी आणि सलाड अशा प्रकारचे जेवण बऱ्याच वर्षांपासून केलं जात होते.
गेल्या दोनेक वर्षातला बदल म्हणजे मी स्वतः कॉफी मधली साखर पूर्ण बंद केली. गोड पदार्थ पूर्वी पण फारसे खात नव्हतेच, आता अजून कमी केले आणि घासभरच खाते.
तळलेले पदार्थ करायला मला आवडत नाही, म्हणून केले जात नाही. क्वचित कधीतरी बाहेरून आणून मात्र खरे मी समोसा किंवा छोले भटुरे सारखे तळलेले पदार्थ.
गेली दोनेक वर्षे घरी वेगवेगळे सलाड आणि सूप रात्रीच्या जेवणात खाण्याचे प्रमाण वाढले आहे.
बेकिंग करायला खूप आवडत असलं तरी हल्ली प्लम केक, क्वचित कधीतरी कुकीज शिवाय काही करत नाही.
गेली दोनेक वर्षे घरी सावर्डो ब्रेड बनवते आहे. पाव किंवा इतर ब्रेडचे प्रकार पण हे नैसर्गिक वाईल्ड यीस्ट वापरूनच करते. यातही पूर्ण मैदा न वापरता मैदा + ब्रेड चे पीठ + खपली गव्हाचे पीठ वापरून, किंवा फक्त ब्रेड चे पीठ वापरून तर कधी खपली गहू पीठ + ब्रेड पीठ वापरून ब्रेड बनवते. मी वापरत असलेल्या ब्रेडच्या पिठात २०% फायबर चे प्रमाण आहे असं लिहिलेलं आहे तर घरच्या रोजच्या चपातीच्या पीठात मात्र १०- ११% फायबर आहे.

कोणते डाएट करता किंवा काय खाता अथवा काय खाणे टाळता एवढ्याने वजनात किंवा एकंदर आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. किती सातत्याने हे डाएट करता, जेवणाच्या वेळा पाळता का, सोबत थोडातरी व्यायाम करता का आणि झोपेच्या वेळा पाळून पुरेशी झोप घेता का या गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होत असतो.
जेवणातले बदल वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी न करता जीवनशैली आरोग्यदायी बनवायचा प्रयत्न करणे जास्त चांगले.

आवडता विषय
पण वाचण्यापूरता/ बोलण्यापुरता Lol
माझे रेग्युलर आहार कंट्रोल होत नाही.
गोड खाउ आहे फार.
भात खाल्ल्याशिवाय जेवलो असे वाटत नाही.
प्रयत्न सुरू असतात.
काहीतरी अडचणी निर्माण होउन व्यायाम बंद।झाला की हळूहळू डाएट चे गाडे सरकते.

डाएट आणि व्यायाम आणि झोप ही त्रिसूत्री महत्वाची
फॅट लॉस साठी
डाएट मुळे 60 ते 80 टक्के फरक
बाकीचास व्यायामाने फरक असे म्हणतात
स्ट्रेस असेल तरीही वजन कमी व्हायला त्रास होतो
त्यामुळे त्यावर देखील काम केले पाहिजे

>>>>>>>>अरे वा धनश्री. मागे IF बद्दल बोलताना तुम्ही पण सुरू करणार असे लिहिले होते ते आठवले.
मानव माझा अजिबात कंट्रोल नाही.

रुपाली, तुमची पोस्ट फार आवडली. एकदम सॉर्टेड आणि स्केलेबल अप्रोच आहे. साधारण असं करायचा हेतू असतो पण कंटाळा येतो बर्‍याचदा आणि टिकत नाही.
तुमचे अभिनंदन.

जे माझा सल्ला अनुल्लेखाने मारतील त्यांच्या पोटाचा घेर तिप्पट होईल. >>> एले, तुमचा सल्ला मानला तरी तेच होईल. मग काय करावे? Happy

तुम्ही जिंदगी बद्दल जे लिहीले आहे ते पोटाबद्दल आहे अशी मला शंका आली Happy

मस्त धागा. फोटोतले सगळे हेल्दी दिसत आहे एकदम Happy वाचतोय.

चौकस आहार नव्हे, तर चौरस >>> Happy Happy हो धागा चौकस आहे. आहार नव्हे.

किल्लीची "बाहेरचे गोड खाणे बंद" वाली आयडिया आवडली Happy

युरोमध्ये होल व्हिट, ब्राऊन ब्रेड (तो गव्हाचा नसतो - कशाचा असतो नक्की माहीत नाही कडक असरो खूप) चव वेगळी असते, मऊपण कमी असतो. >>> इथे अमेरिकेत नुसते "होल व्हीट" लिहीलेले सुद्धा खात्रीशीर नसते. "१००% होल व्हीट" असेल तरच तो खरा होल व्हीट असतो असे वाचले आहे.

अमेरिकेतील पर्सेंटेज आणि बाकी आपले पर्सेंटेज यात काही साम्य नाही. तिकडे औषधांच्या किमती १२०० का १५०० टक्के खाली आल्या आहेत म्हणे, आणि पेट्रोल ही २०० टक्के स्वस्त झाले आहे. Lol सॉरी पण अगदीच राहवलं नाही. Proud

माबोकर मंदार गद्रे याचं या विषयावर पुस्तक आहे, आधुनिक भस्मासूर नावाने. पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे. ज्यांना रुची आहे त्यांनी नक्की वाचा. मला अजून त्यातले बरेचसे सल्ले अमलात आणायचे बाकी आहेत, त्यामुळे त्यावर मी जास्त काही न बोलणे सद्यस्थितीत योग्य ठरेल.

अमेरिकेतील पर्सेंटेज आणि बाकी आपले पर्सेंटेज यात काही साम्य नाही >> Lol एका नाटकातला संवाद आठवला.... पूर्वी काय एकेक वजनं असायची! पूर्वीचा एक किलो म्हणजे आताचा दीड किलो!

१००% होल व्हिट>> हो, इथेही असे लिहिलेले बघावे असे वाचले आहे.
आपल्याकडेपण बरेच जण 'अरे लेबल वाचा ना लोक हो' असा सल्ला देतात. कदाचित तिकडले व्हिडिओ/लेखन पाहुन अशी मला शंका आहे.
लेबल वाचायची सवय आहे. अनेक प्रॉडक्ट्सवर मुख्य घटक लिहुन पुढे फक्त 'अँड पर्मिटेड फूड ऍडिटीव्ह्ज' असे लिहिले असते. काहींवर घटक न लिहिता फक्त प्रथिने, कार्ब्स, फॅट यांची टक्केवारी असते. काहीजण 'नो हार्मफुल केमिकल्स लिहितात', म्हणजे जी आहेत ती त्यांच्या मतानुसार हार्मफुल्स नाहीत एवढंच. काही प्रोडक्ट्सवर सगळं प्रामाणिकपणे नमूद केलेले असते, ऑरगॅनिक प्रॉडक्ट असेल तर त्यातले काय काय घटक ऑरगॅनिक आहेत हे लिहिलं असतं.

दीड किलोचा किलो पूर्वीची वजनं... भारीच. पण शेकडा मात्र शंभरचा नसून एकशे वीस पंचवीस चा असे हे बघितले आहे.

ह्या no preservatives ला तिकडे ही फार काही अर्थ नाही. अर्थात एक विसाव्या शतकात सगळच फार्म टू टेबल अशक्य असल्याने थोड्या फार preservative ला माझी हरकत ही नाहीये. असो.
मी एकदा काहीतरी आंब्याचं ड्रिंक पीत होते. सवयीनुसार मी लेबल वाचल तर नो preservative असं लिहिलं होतं, पण त्याला आपल्याकडे टिन मधल्या आमरसाला preservative चा जो वास येतो तोच सेम येत होता. म्हणजे फायनल प्रॉडक्ट वाल्यांनी जरी काही घातलं नसलं तरी कच्च्या मालात वापरलं होतं. असो.

ममो, पोटॅशियम सॉर्बेट, सोडियम बेन्झोएट प्रिझर्व्हेटिव्ह्ज ज्या प्रमाणात ड्रिंक मध्ये वापरतात त्याचा वास येत नसावा. नो प्रिझर्व्हेटिव्ह ड्रिंकच्या पॅकेजिंग पद्धतीमुळे त्याला टिपिकल वास, चव येते. टिकायला म्हणुन UHT पध्दतीने त्यातील बॅक्टेरिया मारतात त्यातून रसावरही परिणाम होऊन वास, चवीत फरक पडतो. आणि टिकावे म्हणुन pH कमी करण्यास त्यात व्हिनेगर किंवा ऍसिडिटी रेग्युलेटर (ascorbic acid वगैरे) घालतात, त्यांना प्रिझर्व्हेटिव्ह म्हणत नाहीत. ते घातल्यानेही वास, चवीत फरक पडतो.

(मागच्या पोस्ट्स मध्ये मी युरोप असे लिहिलेय पण माझा अनुभव जर्मनी स्वित्झर्लंड पुरता मर्यादित आहे, खास करून त्याबद्दल पूर्वी वाचले आणि तिथल्या कलिग्ज बरोबर कधी कधी या विषयावर चर्चा झाली असल्याने.)

मानवदा,

The health factory चा zero maida bread मिळतो ना?

त्यावर कंटेंट पण लिहिलेले आहेत.

https://amzn.in/d/1vgpXDW

हा पर्याय मला त्यातल्या त्यात सेफ वाटला. जाणकारांनो कृपया प्रकाश टाका.

*माझा अनुभव जर्मनी स्वित्झर्लंड पुरता मर्यादित आहे * - पण, हे मानायचं कसं आम्ही, मानवपृथ्वीकर !!! Wink

Pages