ना घर का ना घाट का... स्त्री म्हणून जगताना!

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 December, 2025 - 14:36

*चेतावनीपहिले दोन किस्से काहींना गलिच्छ आणि तिसरा अयोग्य वाटण्याची शक्यता आहे.
आपल्या जबाबदारीवर जपून वाचावेत
Happy
----------------------

परवाच्या दिवशी कॅन्टीनमध्ये जेवता जेवता अचानक तोंडात केस आला. मनातल्या मनात प्रचंड तिटकारा आला. पण तो चेहऱ्यावर न दाखवता कोणाच्या लक्षात यायच्या आत पटकन तो केस खेचून तोंडाबाहेर काढला. त्यासोबत मिक्स भाजीतील एक सिमला मिरचीचा अर्धवट चावलेला तुकडा देखील लटकून बाहेर आला. आपल्याच उष्ट्या अन्नाची किळस वाटली आणि त्याला केसासकट झटकून दूर फेकले तसे अघटीत घडले!

एखादी चुडेल हवेत फेर धरून नाचावी तसे तो सिमला मिरचीचा तुकडा माझ्या तोंडाभोवताली लटकू लागला. लंबकासारखा इकडून तिकडे बागडू लागला. थोडावेळ हे काय घडतेय समजेनासे झाले आणि मग अचानक बत्ती पेटली. तो माझाच केस होता. तो देखील तुटलेला नव्हता तर डोक्यावरचाच मोकळा केस घरंगळत तोंडात आला होता. त्याचे दुसरे टोक माझ्याच डोक्यात रुतले असल्याने तो माझ्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. अजून शोभा नको म्हणून मी निमुटपणे तो केस पिळून स्वच्छ केला आणि त्याला होते तसे डोक्यात खोचून ठेवले.

------------------------------------
------------------------------------

स्थळ - पुन्हा ऑफिसच. दुपारची साडेतीन चारची वेळ. चहापान आटोपले आणि निसर्गाच्या एकेरी हाकेला साद द्यायला वॉशरूममध्ये गेलो. ब्रेक असल्याने ती जागा डिमांडमध्ये होती. सहसा पुरुषमंडळी एक सोडून एक उभे राहतात आणि एकमेकांची प्रायव्हसी जपतात. पण गर्दीच्या वेळी नाईलाज असतो. एक जागा पकडून मी सुद्धा सुरू झालो. पाचेक सेकंद झाले तोच माझ्या शेजारचा 'खाली मुंडी पाताळ धुंडी' अचानक माझ्याकडे बघून दचकला, की तसा अभिनय केला, आणि मोठ्याने म्हणाला, "अरे डरा दिया आपने तो, मुझे लगा कही गलत जगह तो नही आ गया.." आणि ते ऐकून आजूबाजूचे सगळे खाली मुंडी दात काढून खिदळू लागले. मलाही हसण्यावाचून पर्याय नव्हता.

------------------------------------
------------------------------------

स्थळ - ट्रेनचे कंपार्टमेंट. नेहमी रिकामेच असते. बसायला जागा असूनही मी दारावर केस फडफडवत उभा राहतो. दोन स्टेशनसाठी काय ते बसायचे. पण त्या दिवशी ट्रेनचा गोंधळ असल्याने गर्दी होती. आजचे उभे राहणे नाईलाजाचे होते. दरवाज्यापासून थोडे आत, एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हाताने हॅण्डल पकडून मी निवांत उभा होतो. केसांची मागे मोळी बांधलेली असली तरी काही चुकार केस त्यातून निसटून हलकेसे भुरभुरत होते.

मी मोबाईलवर ईन्स्टा रील बघत होतो. इतक्यात अचानक शेजारचा माणूस तडतडला, "भाईसाहब, क्या कर रहे हो?"
.. आणि माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!
याला माझ्या ईन्स्टाशी काय प्रॉब्लेम आहे? थोडे रील होते म्हणा चावट, पण ती माझी पर्सनल स्पेस आहे. याला काय करायचे आहे म्हणत मी सुद्धा त्याला उलटे तडकावले, क्या हुआ भाई? क्या प्रॉब्लेम है??

"अरे पुरा बाल मूह पे आ रहा है.. संभाल के रखो ना" .. आणि मी ओशाळलो!
वर पाहिले तर डोक्यावरचा फॅन गरागरा फिरत होता. जो गरजेच्या वेळी नेमका बंद असतो. पण आता बघा...

असो, पण आता मला कळायला मार्ग नव्हता. किती केस मागच्या बछड्यात बांधले गेले आहेत, किती सुटे आहेत आणि त्यातील किती त्याच्या चेहऱ्यावर जात आहेत.
बरे त्याचा चेहरा पाहिला तर त्यावर असे भाव की कहां से आते है ये लोग.. एवढेच केस वाढवायचे होते तर लेडीज डब्यातच चढला असता.

बरे हेच केस जर एखाद्या महिलेचे असते, तर कदाचित तो काही तक्रार न करता किंवा आहे त्यात सुख शोधत निमूट उभा राहिला असता. पण ठीक आहे. मी पुरुष होतो आणि तो स्ट्रेट असावा. त्यामुळे तो देखील आपल्या जागी बरोबरच होता. म्हणून मग मी निमूटपणे जागच्याजागी जमेल तसे हात वर करत बांधलेले केस मोकळे करून पुन्हा एकदा करकचून घट्ट बांधायला घेतले. मुंबई लोकल ट्रेन गर्दीच्या डब्यात चार दिशांनी चार माणसे चिकटली असताना ते एक दिव्यच होते. पण इलाज नव्हता. ना घर का ना घाट का ही परिस्थिती मीच ओढवून घेतली होती.

------------------------------------
------------------------------------

स्थळ - आपलेच घर.
वेळ - रात्री जेवल्यानंतर स्वीट डिश खायची.
गुलाबजाम! जो मी कधीतरीच मूड येईल तेव्हाच खातो. दिवाळीत कोणीतरी फराळासोबत दिला होता. दोनेक आठवडे फराळ खाऊन झाल्यावर आता काहीतरी वेगळे हवे म्हणून गुलाबजाम आठवले. लुसलुशीत पदार्थाला सुरक्षित ठेवायला पत्र्याचा डब्बा होता. आणि त्याला पत्र्याचेच झाकण होते. त्या पत्र्याला जी काही भन्नाट धार होती तिने अंदाज चुकवला. थोडे झाकणं उचकटून तिथे बोट घालून झपकन वर खेचले आणि बोटाला रक्ताची धार लागली. गुलाबजाम खाण्याच्या नादात इतके उशीरा लक्षात आले की अचानक हातावर नजर पडली तेव्हा रक्ताने माखलेला हात बघून मी बेशुद्धच पडायचे शिल्लक राहिलो होतो.

मग चापूनचोपून त्यावर हळदीचा मारा केला. मग कधीतरी ते रक्ताचे ओहोळ थांबले. कधीतरी मी ते गुलाबजाम खाल्ले, कधीतरी झोपायला गेलो.. आणि तेव्हा मोकळे झालेले केस बांधायला म्हणून हेअर बँड टाईट करत केसांची पोनी हाताने खेचून घेतली आणि केसाने गळा कापणे म्हणजे काय या म्हणीचा प्रत्यय घेतला. थांबलेली रक्ताची धार पुन्हा सुरू झाली. आणि आता मात्र मी बेशुद्धच पडलो!

------------------------------------
------------------------------------

स्थळ - सोसायटी.
पात्र - मुलाचे मित्र. जे त्याच्याच वयाचे पहिल्या दुसऱ्या इयत्तेतील आहेत.

एक मित्र साळसूदपणे आपल्या आईला विचारतो – रुनूचे बाबा हे आई का दिसतात?

दुसऱ्या मित्राला घरी गंगावन (केसांचा विग/वेणी) सापडते. तो ते डोक्यावर घालून आरश्यात बघतो. आणि नाचायला लागतो. मी रुनूचे बाबा दिसतो, मी रुनूचे बाबा दिसतो..

हे आणि असे बरेच काही..
या सर्वांचे पालक माझ्या बायकोला हे किस्से हसत हसत मीठ मसाले लावत सांगतात.
आणि घरचे मला सुनावतात, तुझ्यामुळे मुलांना नको नको ते ऐकून घ्यावे लागते.

------------------------------------
------------------------------------

स्थळ - पुन्हा ऑफिस.
पण आतली वर्किंग प्लेस नाही तर बाहेरचा कॅम्पस.

लिफ्ट मधून बाहेर पडलो. आजूबाजूला ईकडल्या तिकडल्या वरच्या खालच्या इतर ऑफिसमधील अनोळखी मुलींच्या घोळक्यात थोडावेळ रमलो. मग उगाचच स्टाईल मारायला म्हणून "मै हू ना" मधील शाहरुखसारखी ऍक्शन करत एका हाताने गळ्यातले आयडी कार्ड काढायला गेलो. पण ते कुठेतरी केसांच्या आत फसले होते. आणि केस खांद्यावरच्या बॅगेखाली दबले होते. या जांगडगुत्यात आयडी कार्ड आणि केस यांचा जो गुंता झाला तो मला दोन हातांनी सोडवणे देखील अवघड झाले आणि सगळ्या स्टाईलचा पचका झाला. घोळक्यापासून दूर असा मी एकटाच मग तो सोडवत बसलो.

घरी असताना देखील बरेचदा केस, टी-शर्ट आणि चष्मा हे एकमेकांत मनसोक्त गुंतून घेतात. पण बाहेरच्या फजितीची त्याला सर नाही.

------------------------------------
------------------------------------

स्थळ – होम थिएटर.
चित्रपट ऐन रंगात आला होता, मनोरंजनाचे मीटर फुल स्पीड धावत होते, आणि खटकन बत्ती गुल झाली. मुंबईत अंधार झाल्यावर खरा त्रास पंधरा मिनिटांनी सुरू होतो. गर्मीने उकडायला लागते. वेळप्रसंगी अंगातून पाण्याच्या धारा येतात. अश्यावेळी पुरुष जन्माला यायचा फायदा उचलत मी नेहमीसारखे कपड्यांना शरीरापासून वेगळे केले. पण यावेळी परिस्थिती नेहमीसारखी नव्हती. वाढलेल्या केसांचा झुबका पाठीवर केरसुणी फिरवल्यासारखा गुदगुल्या करू लागला. स्त्री जन्माला आलो नसल्याने त्या केसांना माझ्या उघड्या शरीरावर लोळण्यापासून दूर कसे ठेवावे याचे उपाय मला माहीत नव्हते. इरिटेशन वाढू लागले तसे नाईलाजाने पुन्हा बनियान अंगावर चढवली. आणि एका हाताने न्यूजपेपर तर दुसऱ्या हाताने केसांचा झुबका फिरवत स्वतःला वारा घालू लागलो.

ता.क. – लग्नसमारंभासारख्या गरम हवेच्या ठिकाणी उघड्या पाठीचे ब्लाऊज घालणाऱ्या सर्व आयाभगिनींना आदरयुक्त प्रणाम!

------------------------------------
------------------------------------

स्थळ - शहरातील कुठलाही रस्ता. जो क्रॉस करताना आधी उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा, मग पुन्हा उजवीकडे बघा असे शिकवले जाते. मी हे लहानपणापासून पाळत आलोय. आता मात्र उजवीकडे बघताच केसांचा एक तडाखा डाव्या गालावर बसतो, तर डावीकडे बघताच दुसरा उजव्या गालावर बसतो. यात रस्ता क्रॉस करायची सारी मजाच हरवून जाते.
मान इकडे तिकडे हलवून विखुरलेले केस डोळ्यावर येत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तो वेगळाच!

------------------------------------
------------------------------------

स्थळ बाथरूम – इश्श्य!.. इथले सगळेच डिटेल देऊ शकत नाही. पण सहा वाजता जे आत जातो ते साडेसात वाजताच बाहेर येतो.

ही वेळ उदाहरण म्हणून दिली आहे. त्यामुळे सहा सकाळचे की संध्याकाळचे करू नये. किंबहुना आता डोक्यावरून आंघोळ रोजच करता येत नाही. आणि डोक्यावरून आंघोळ करायची नसेल तर करायचीच का? या मनात आलेल्या नकारात्मक विचारांना मोठ्या प्रयासांनी हाकलून रोज बाथरूममध्ये शिरावे लागते.
पण हे रोजच जमत नाही. प्रामुख्याने थंडीच्या मोसमात आळस केलाच जातो. त्यामुळे रोज आंघोळ करणाऱ्या आयाभगिनींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा!

बाथरूम डिटेल देऊ शकत नसलो तरी बाहेर आल्यावरचे देऊ इच्छितो. धुवा, पुसा, सुकवा, विंचरा, हेअर ड्रायर वापरा, पुन्हा विंचरा, पूर्ण सुकवा आणि मगच घराबाहेर पडा.

या आधी सुट्टीच्या दिवशी क्रिकेटचा सामना एन्जॉय करताना दोन इनिंगच्या ब्रेकमध्ये आंघोळपाणी उरकून घ्यावे अशी आमच्याकडे पद्धत होती. ती आता पुर्णपणे लोप पावली आहे. कारण त्या नादात दुसरी इनिंग सुरू होऊन रोहीत शर्माचे सिक्सर किंवा बुमराहचे यॉर्कर मिस करू शकत नाही.

------------------------------------
------------------------------------

स्थळ बेडरूम – इश्श्य!...
बिश्श्य.. वगैरे काही नाही. तिथे हल्ली दर विकेंडला बायकोच्या पाया पडावे लागते. पाय चेपावे लागतात. तेव्हा त्या बदल्यात ती माझ्या डोक्यावर तेल थापायचे काम करते. या आधी कधी अशी वेळ आली नव्हती. तिने विनंतीला मान दिला तर ठिक, अन्यथा फार भाव द्यायचा नाही हेच सुखी संसाराचे धोरण होते. पण एक दिवस झोल झाला. केसांचा घोळ झाला. त्याला जबाबदार मीच होतो. कारण आयुष्यात कधी कंगवा वापरला नव्हता. आपला हात जगन्नाथ म्हणत केसातून बोटे फिरवा आणि केस सेट करा हेच माझे हेअर स्टाईल स्टेटमेंट होते. ज्याचा एके दिवशी पुरता स्टीलमेट झाला. केसातून बोटे पुढे जायला तयारच नव्हती. गुप्तधनाच्या हंड्याला नांगर अडकून बसावा तशी बोटे केसांच्या जटांना जाऊन धडकली. बायकोने लगेच चान्स घेत डिक्लेअर केले की आता केस कापण्याशिवाय पर्याय नाही. या कारणासाठी धारातीर्थी पडलेल्या केसांची इतिहासातील उदाहरणे देऊ लागली. बायकांना सुद्धा गुंता झाल्याने लांबसडक केस कापावे लागले आहेत, मग तू तर एक क्षुद्र पुरुष आहेस याची मला जाणीव करून देऊ लागली.

मी घाबरलो तसे तिने माझ्याशी डील केले. बदल्यात ते मागितले जे तसेही तिला न मागता मिळतेच. त्याहून आणखी काही मागितले असते तरी दिले असतेच. कारण वर मी कितीही तक्रारींचा पाढा वाचला असला तरी केसांमुळे येणारे वेगळेपण मला आतून कुठेतरी सुखावतेच. किंबहुना म्हणूनच सारे त्रास झेलतो, सारे अपमान गिळतो, पण केस कापायला टाळतो.

IMG-20251214-WA0003.jpg

तर सध्या डीलप्रमाणे आमच्याकडे दर वीकेंडला हा असा वेणी-फनीचा कार्यक्रम होतो. जो वरवर दिसायला कितीही फनी वाटला तरी त्यात प्रचंड मेहनत असते. त्यामुळे हे आयुष्यभर करणार्‍या सर्वच महिलांना पुन्हा एकदा सलाम!

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

(अश्याच एका खर्‍याखुर्‍या जुन्या किस्स्यावर आधारीत - परतीचा पाऊस - ए शॉर्ट ऍण्ड स्वीट लव्ह स्टोरी - https://www.maayboli.com/node/85834 )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या लेखावर प्रतिसाद द्यायचीही भीती वाटू लागली आहे. एक तुमचा ड्युआयडी ठरवायच्या मागे लागले आहेत.
आणि दुसरा स्वतःच ड्युआयडी मी तुमचा नाही तर दुसर्‍याच कुणाचा ड्युआयडी आहे म्हणून जंग जंग पछाडतो आहे.

या दोन्हीही प्रवृत्तींना इग्नोर मारूयात. कुणाला काय वाटायचं असेल ते वाटो. माझा प्रतिसाद असा.

एक पिक्चर आला होता ज्यात हिरोचे वडील बायकांचे कपडे घालून डान्स करून पैसे कमवत असतात, ज्याची हिरोला लाज वाटत असते. लोक हिरोचा अपमान वडलांवरून करत असतात. पण नंतर तेच वडील सांगतात कि ज्याला जसं जगायचं आहे तसं हे जग का जगू देत नाही ? हे फारच भारी आहे. केस वाढवणे तर प्राचीन काळापासून सुरू आहे. केस कापणे कधीपासून सुरू झाले हे शोधायला पाहीजे. याचा ज्वलंत पुरावा म्हणजे धरम वीर या ऐतिहासिक पिक्चर मधे प्राण साहेब वेणी घालत असतात. चिनी पिक्चर मधे पण जो योद्धा असतो ते वेणी ठेवतो.
कुणाला केस खटकतात तो त्याचा प्रॉब्लेम समजावा.

म्हणच आहे कि
केस वाढवून देव आनंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हावे. तरी देव आनंद चे केस कापलेले असायचे. तरी अशा म्हणी असायच्या.

खटकणारी गोष्ट म्हणजे अशा गोष्टी जाहीरपणे मांडण्याची काय गरज आहे ? आपल्या मित्रांना, आजूबाजूच्या लोकांना सांगितले बास झाले. त्यांना पटले तर आपले जगणे सुसह्य होईल. आपण ज्यांच्या मधे वावरत नाही त्यांनी पाठिंबा देऊन आपल्या लाईफ मधे त्याचा काय उपयोग ?
एकदा एकाने फेसबुकवरचा एक लेख मला वाचायला दिला. त्यात त्या लेखाचा नायक गावी जाऊन कसल्या तरी जत्रेत स्त्री वेषात काही तरी गोंधळ कि जागरण करतो आणि हे दर वर्षी करतो. त्या वेळी त्याला काय अनुभव येतात याचं वर्णन केलं होतं. हे जाहीरपणे सांगण्याचं कारण समजलं नाही. त्यातला स्पर्शाचा पॅरा तर पटलाच नाही. हा मुलगा आहे महीत असताना कोण कशाला तसले स्पर्श करतील ? चेष्टा मस्करी करत असतील.

स्त्रिया त्यांना आलेलेअनुभव सांगतात तसेच अनुभव आपण पण सांगितले पाहिजेत असे पुरूषांना वाटू लागते का ? समाज माध्यमांमुळे भिंती गाळुन पडल्याचा परिणाम असेल का ?

लेख राहूदे मित्रा , अगोदर ,केसाला काय लावतोस ते सांग. महिन्याभरात माझे केस अर्धे झालेत.(लांबीने नाही, घनतेने).
इतकी जाड वेणी !!!! Tchwood

पहिले दोन किस्से गलिच्छ आहेत आणि तिसर्‍याचं प्रयोजन कळलं नाही आणि बाकी पुढेही असंच असावं असा समज झाल्याने वाचलं नाही.

स्वतःच्या लेखावर स्वतःचे ड्युआयडी विरोधी प्रतिसाद देतात यामागे काय स्ट्रॅटर्जी असते रे ऋन्म्या ?
काय लिहीतोय तुझं तुला कळतंय का ?
नूरी मधल्या पूनम धिल्लन सारखं डोक्याला फडकं बांधून जेवायला का बसत नाहीस ? त्यालाच कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणे म्हणत असतील.

स्वस्ति, अमितव, कुमार सर धन्यवाद Happy

अगोदर ,केसाला काय लावतोस ते सांग.
इतकी जाड वेणी !!!! Tchwood

>>>>>>

याचे माझ्याकडे काही उत्तर नसते. कारण काहीच लावत नाही. उलट आळशी असल्याने फार वाईट निगा राखतो केसांची.
अनुवंशिक गुणसूत्रे हेच कारण असावे.

ऑफिसमधील आणि इतर ओळखीच्या लोकांच्या मते हा कुठले स्ट्रेस घेत नाही म्हणून याचे केस गळत नाहीत.
पण आज ना उद्या वयानुसार गळतीलच केस म्हणून आहेत तोपर्यंत त्रास गैरसोय सहन करावी लागतेय किंवा चांगले दिसत आहेत की नाही याची पर्वा न करता केसांसोबत जगून घेत आहे.

ऋन्मेऽऽष बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर लिहित असतो. त्यामुळे मायबोलीवर variety आहे. प्रतिसाद वाचून जाणवते की - you can love him or hate him but cannot ignore him. Same as Shahrukh Khan. ऋन्मेऽऽष स्वतःला यामुळे मायबोलीचा शाहरुख म्हणवून घेऊ शकतो.

धन्यवाद तिता आणि ममोताई Happy

रेव्यू आपलेही प्रामाणिक फिडबॅक बद्दल धन्यवाद!

@ शर्मिला
केस लहान ठेवल्यामुळे रोजचं बरंच काम सोपं होतं हा शोध मला खूप पूर्वीच लागला.
>>>>>>

हो हे खरेच आहे.
बहुतांश स्त्रियांचे सौंदर्य लांब केसांनी वाढते अश्यावेळी छान दिसणे हवे आहे की कम्फर्ट हा निर्णय त्यांनाच घ्यावा लागतो.

पण बरेचदा आपल्या समाजात हा निर्णय त्यांना स्वतःला घेता येत नाही. बायकांनी छोटे केस ठेवणे बरेच घरात चालत नाही.

@ एक लेखक,
केस वाढवणे तर प्राचीन काळापासून सुरू आहे. केस कापणे कधीपासून सुरू झाले हे शोधायला पाहीजे.
>>>>>>

हो ना, मी सुद्धा घरच्यांना बरेचदा ऋषीमुनी काळापासून उदाहरणे देतो. पण आता तो काळ गेला म्हणतात. दाढी वाढवले असताना मला ते लोफर दिसतो म्हणतात तेव्हा इतिहासातील वीर पराक्रमी योद्ध्यांची उदाहरणे देतो. तेव्हा तू स्वतःला त्यांच्याशी कंपेअर करतो का म्हणून उलटे ऐकावे लागते. जो समाज स्वतःच काही मान्यता ठरवून चालतो त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नसतो.

..

त्यात त्या लेखाचा नायक गावी जाऊन कसल्या तरी जत्रेत स्त्री वेषात काही तरी गोंधळ कि जागरण करतो.... त्यातला स्पर्शाचा पॅरा तर पटलाच नाही. हा मुलगा आहे महीत असताना कोण कशाला तसले स्पर्श करतील?
>>>>>>

तुम्ही म्हणता ते पुस्तक मी वाचले नाही. पण ते खरेही असू शकते. कारण बरेचदा काही लोकं पेहरावावरून जज करतात. कोणी नाटकात स्त्रीपात्र वठवणारा नट असेल तर त्याची लैंगिकता तशीच असेल म्हणून त्याला हे करायला मजा येत असेल, किंवा त्याचे सेक्सुअल ओरिएंटेशन स्ट्रेट नसेल असे जज करणाऱ्या लोकांचे वाईट अनुभव येणे सहज शक्य आहे.
नटरंगमध्ये देखील असा सीन आहे ना?

उबो,
कानात डूल इच्छा तर आधीही होती. पण कानाला भोक पाडावे लागेल ना त्याची भीती वाटते.
आणि तसेही आमच्या बिल्डिंगच्या पोरांमध्ये मागे एकदा फॅड आलेले तेव्हा बरेच जणांनी ही स्टाईल केली होती. त्यामुळे आमच्याइथे तरी त्यातील वेगळेपण हरवले होते.

छान लिहिलं आहेस. प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.>>+1
"अरे पुरा बाल मूह पे आ रहा है.. संभाल के रखो ना" >>हे तर रोजच वाक्य आहे लेडीज डब्यातलं , ओशाळण्या सारखं काही नाही त्यात , आहेत केस तर उडणारच Happy

एव्हडी दाट वेणी चा राज काय विचारणार होते पण तुम्ही काहीच लावत नाही त्यावरून असं वाटतं काही गोष्टी हेरिडीटली असतात जसे की तुमचे हेयर.

<<<< हे तर रोजच वाक्य आहे लेडीज डब्यातलं , ओशाळण्या सारखं काही नाही त्यात , आहेत केस तर उडणारच >>>

हो, तिथले रोजचे असेल आणि समोरून समजून घेणाऱ्या सुद्धा असतील. इथे तशीच परिस्थिती नसते.

@ सायो,
<<< तिसर्‍याचं प्रयोजन कळलं नाही >>> हेच प्रयोजन. जे तिथे नॉर्मल आहे ते इथे नाही.

एवढे अस्वस्थ ? नक्कीच केसांवर कांहीतरी लिहिलं असणार आज माबोवर तिथल्या शाहरुखने !!!IMG_20251215_185003.jpg

Lol भाऊ ,अगदी वर्मावर बोट ठेवलंय, सॉरी केसांवर बोट ठेवलंय रुन्मेष यांनी Lol

*....केसांवर बोट ठेवलंय रुन्मेष यांनी * - माबोवर शाहरुखने काय लिहिलंय तें रोज वाचतातच ही खात्रीही महत्त्वाची ! Wink (. * you can love him or hate him but cannot ignore him. Same as Shahrukh Khan. * )

भाऊ Lol

एवढी जाड वेणी?
भाऊसाहेब आधी हेअर केअर रुटीन share करा बरं
(ऋ ला म्हणतेय )

ओह किल्ली.. मी एवढे मोठाले नाव बघून आधी कन्फ्युज झालो. म्हटले आता हा कोण नवीन आयडी Happy
तसेही माझ्या धाग्यावर नवनवीन आयडी येत जात राहतात Happy

धन्यवाद असामी

राज, शीर्षक एकवेळ क्लिकबेट असू शकेल. पण मिस लीडिंग म्हणू शकत नाही. कारण तुम्हाला जर शीर्षक वाचून कोणी ट्रान्सजेंडर आठवत असेल तर तश्या कॉमेंट प्रत्यक्षात देखील ऐकाव्या लागतातच.

पहिला अनुभव अर्धा वाचूनच इतकी किळस वाटली. म्हणून दुसरा अनुभव वाचायला घेतला.
पुढे काही वाचायची इच्छा मेली. आणि लेख वाचायचा सोडून दिला

पहिल्या अनुभवात मला वाटलेली किळस मी लिखाणातून पोहोचवायला यशस्वी ठरलो आहे असे एकंदरीत वाटत आहे.
यावर उपाय म्हणून सध्या मी न चुकता जेवायला जायच्या आधी केस बांधूनच मग जातो. घरी मात्र ती काळजी नेहमीच घेतली जात नाही. त्यामुळे जेवताना केस तोंडात सरकणे हा अनुभव घरी जेवताना येतो अधूनमधून

Pages