*चेतावनी – पहिले दोन किस्से काहींना गलिच्छ आणि तिसरा अयोग्य वाटण्याची शक्यता आहे.
आपल्या जबाबदारीवर जपून वाचावेत 
----------------------
परवाच्या दिवशी कॅन्टीनमध्ये जेवता जेवता अचानक तोंडात केस आला. मनातल्या मनात प्रचंड तिटकारा आला. पण तो चेहऱ्यावर न दाखवता कोणाच्या लक्षात यायच्या आत पटकन तो केस खेचून तोंडाबाहेर काढला. त्यासोबत मिक्स भाजीतील एक सिमला मिरचीचा अर्धवट चावलेला तुकडा देखील लटकून बाहेर आला. आपल्याच उष्ट्या अन्नाची किळस वाटली आणि त्याला केसासकट झटकून दूर फेकले तसे अघटीत घडले!
एखादी चुडेल हवेत फेर धरून नाचावी तसे तो सिमला मिरचीचा तुकडा माझ्या तोंडाभोवताली लटकू लागला. लंबकासारखा इकडून तिकडे बागडू लागला. थोडावेळ हे काय घडतेय समजेनासे झाले आणि मग अचानक बत्ती पेटली. तो माझाच केस होता. तो देखील तुटलेला नव्हता तर डोक्यावरचाच मोकळा केस घरंगळत तोंडात आला होता. त्याचे दुसरे टोक माझ्याच डोक्यात रुतले असल्याने तो माझ्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. अजून शोभा नको म्हणून मी निमुटपणे तो केस पिळून स्वच्छ केला आणि त्याला होते तसे डोक्यात खोचून ठेवले.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - पुन्हा ऑफिसच. दुपारची साडेतीन चारची वेळ. चहापान आटोपले आणि निसर्गाच्या एकेरी हाकेला साद द्यायला वॉशरूममध्ये गेलो. ब्रेक असल्याने ती जागा डिमांडमध्ये होती. सहसा पुरुषमंडळी एक सोडून एक उभे राहतात आणि एकमेकांची प्रायव्हसी जपतात. पण गर्दीच्या वेळी नाईलाज असतो. एक जागा पकडून मी सुद्धा सुरू झालो. पाचेक सेकंद झाले तोच माझ्या शेजारचा 'खाली मुंडी पाताळ धुंडी' अचानक माझ्याकडे बघून दचकला, की तसा अभिनय केला, आणि मोठ्याने म्हणाला, "अरे डरा दिया आपने तो, मुझे लगा कही गलत जगह तो नही आ गया.." आणि ते ऐकून आजूबाजूचे सगळे खाली मुंडी दात काढून खिदळू लागले. मलाही हसण्यावाचून पर्याय नव्हता.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - ट्रेनचे कंपार्टमेंट. नेहमी रिकामेच असते. बसायला जागा असूनही मी दारावर केस फडफडवत उभा राहतो. दोन स्टेशनसाठी काय ते बसायचे. पण त्या दिवशी ट्रेनचा गोंधळ असल्याने गर्दी होती. आजचे उभे राहणे नाईलाजाचे होते. दरवाज्यापासून थोडे आत, एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हाताने हॅण्डल पकडून मी निवांत उभा होतो. केसांची मागे मोळी बांधलेली असली तरी काही चुकार केस त्यातून निसटून हलकेसे भुरभुरत होते.
मी मोबाईलवर ईन्स्टा रील बघत होतो. इतक्यात अचानक शेजारचा माणूस तडतडला, "भाईसाहब, क्या कर रहे हो?"
.. आणि माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!
याला माझ्या ईन्स्टाशी काय प्रॉब्लेम आहे? थोडे रील होते म्हणा चावट, पण ती माझी पर्सनल स्पेस आहे. याला काय करायचे आहे म्हणत मी सुद्धा त्याला उलटे तडकावले, क्या हुआ भाई? क्या प्रॉब्लेम है??
"अरे पुरा बाल मूह पे आ रहा है.. संभाल के रखो ना" .. आणि मी ओशाळलो!
वर पाहिले तर डोक्यावरचा फॅन गरागरा फिरत होता. जो गरजेच्या वेळी नेमका बंद असतो. पण आता बघा...
असो, पण आता मला कळायला मार्ग नव्हता. किती केस मागच्या बछड्यात बांधले गेले आहेत, किती सुटे आहेत आणि त्यातील किती त्याच्या चेहऱ्यावर जात आहेत.
बरे त्याचा चेहरा पाहिला तर त्यावर असे भाव की कहां से आते है ये लोग.. एवढेच केस वाढवायचे होते तर लेडीज डब्यातच चढला असता.
बरे हेच केस जर एखाद्या महिलेचे असते, तर कदाचित तो काही तक्रार न करता किंवा आहे त्यात सुख शोधत निमूट उभा राहिला असता. पण ठीक आहे. मी पुरुष होतो आणि तो स्ट्रेट असावा. त्यामुळे तो देखील आपल्या जागी बरोबरच होता. म्हणून मग मी निमूटपणे जागच्याजागी जमेल तसे हात वर करत बांधलेले केस मोकळे करून पुन्हा एकदा करकचून घट्ट बांधायला घेतले. मुंबई लोकल ट्रेन गर्दीच्या डब्यात चार दिशांनी चार माणसे चिकटली असताना ते एक दिव्यच होते. पण इलाज नव्हता. ना घर का ना घाट का ही परिस्थिती मीच ओढवून घेतली होती.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - आपलेच घर.
वेळ - रात्री जेवल्यानंतर स्वीट डिश खायची.
गुलाबजाम! जो मी कधीतरीच मूड येईल तेव्हाच खातो. दिवाळीत कोणीतरी फराळासोबत दिला होता. दोनेक आठवडे फराळ खाऊन झाल्यावर आता काहीतरी वेगळे हवे म्हणून गुलाबजाम आठवले. लुसलुशीत पदार्थाला सुरक्षित ठेवायला पत्र्याचा डब्बा होता. आणि त्याला पत्र्याचेच झाकण होते. त्या पत्र्याला जी काही भन्नाट धार होती तिने अंदाज चुकवला. थोडे झाकणं उचकटून तिथे बोट घालून झपकन वर खेचले आणि बोटाला रक्ताची धार लागली. गुलाबजाम खाण्याच्या नादात इतके उशीरा लक्षात आले की अचानक हातावर नजर पडली तेव्हा रक्ताने माखलेला हात बघून मी बेशुद्धच पडायचे शिल्लक राहिलो होतो.
मग चापूनचोपून त्यावर हळदीचा मारा केला. मग कधीतरी ते रक्ताचे ओहोळ थांबले. कधीतरी मी ते गुलाबजाम खाल्ले, कधीतरी झोपायला गेलो.. आणि तेव्हा मोकळे झालेले केस बांधायला म्हणून हेअर बँड टाईट करत केसांची पोनी हाताने खेचून घेतली आणि केसाने गळा कापणे म्हणजे काय या म्हणीचा प्रत्यय घेतला. थांबलेली रक्ताची धार पुन्हा सुरू झाली. आणि आता मात्र मी बेशुद्धच पडलो!
------------------------------------
------------------------------------
स्थळ - सोसायटी.
पात्र - मुलाचे मित्र. जे त्याच्याच वयाचे पहिल्या दुसऱ्या इयत्तेतील आहेत.
एक मित्र साळसूदपणे आपल्या आईला विचारतो – रुनूचे बाबा हे आई का दिसतात?
दुसऱ्या मित्राला घरी गंगावन (केसांचा विग/वेणी) सापडते. तो ते डोक्यावर घालून आरश्यात बघतो. आणि नाचायला लागतो. मी रुनूचे बाबा दिसतो, मी रुनूचे बाबा दिसतो..
हे आणि असे बरेच काही..
या सर्वांचे पालक माझ्या बायकोला हे किस्से हसत हसत मीठ मसाले लावत सांगतात.
आणि घरचे मला सुनावतात, तुझ्यामुळे मुलांना नको नको ते ऐकून घ्यावे लागते.
------------------------------------
------------------------------------
स्थळ - पुन्हा ऑफिस.
पण आतली वर्किंग प्लेस नाही तर बाहेरचा कॅम्पस.
लिफ्ट मधून बाहेर पडलो. आजूबाजूला ईकडल्या तिकडल्या वरच्या खालच्या इतर ऑफिसमधील अनोळखी मुलींच्या घोळक्यात थोडावेळ रमलो. मग उगाचच स्टाईल मारायला म्हणून "मै हू ना" मधील शाहरुखसारखी ऍक्शन करत एका हाताने गळ्यातले आयडी कार्ड काढायला गेलो. पण ते कुठेतरी केसांच्या आत फसले होते. आणि केस खांद्यावरच्या बॅगेखाली दबले होते. या जांगडगुत्यात आयडी कार्ड आणि केस यांचा जो गुंता झाला तो मला दोन हातांनी सोडवणे देखील अवघड झाले आणि सगळ्या स्टाईलचा पचका झाला. घोळक्यापासून दूर असा मी एकटाच मग तो सोडवत बसलो.
घरी असताना देखील बरेचदा केस, टी-शर्ट आणि चष्मा हे एकमेकांत मनसोक्त गुंतून घेतात. पण बाहेरच्या फजितीची त्याला सर नाही.
------------------------------------
------------------------------------
स्थळ – होम थिएटर.
चित्रपट ऐन रंगात आला होता, मनोरंजनाचे मीटर फुल स्पीड धावत होते, आणि खटकन बत्ती गुल झाली. मुंबईत अंधार झाल्यावर खरा त्रास पंधरा मिनिटांनी सुरू होतो. गर्मीने उकडायला लागते. वेळप्रसंगी अंगातून पाण्याच्या धारा येतात. अश्यावेळी पुरुष जन्माला यायचा फायदा उचलत मी नेहमीसारखे कपड्यांना शरीरापासून वेगळे केले. पण यावेळी परिस्थिती नेहमीसारखी नव्हती. वाढलेल्या केसांचा झुबका पाठीवर केरसुणी फिरवल्यासारखा गुदगुल्या करू लागला. स्त्री जन्माला आलो नसल्याने त्या केसांना माझ्या उघड्या शरीरावर लोळण्यापासून दूर कसे ठेवावे याचे उपाय मला माहीत नव्हते. इरिटेशन वाढू लागले तसे नाईलाजाने पुन्हा बनियान अंगावर चढवली. आणि एका हाताने न्यूजपेपर तर दुसऱ्या हाताने केसांचा झुबका फिरवत स्वतःला वारा घालू लागलो.
ता.क. – लग्नसमारंभासारख्या गरम हवेच्या ठिकाणी उघड्या पाठीचे ब्लाऊज घालणाऱ्या सर्व आयाभगिनींना आदरयुक्त प्रणाम!
------------------------------------
------------------------------------
स्थळ - शहरातील कुठलाही रस्ता. जो क्रॉस करताना आधी उजवीकडे बघा, मग डावीकडे बघा, मग पुन्हा उजवीकडे बघा असे शिकवले जाते. मी हे लहानपणापासून पाळत आलोय. आता मात्र उजवीकडे बघताच केसांचा एक तडाखा डाव्या गालावर बसतो, तर डावीकडे बघताच दुसरा उजव्या गालावर बसतो. यात रस्ता क्रॉस करायची सारी मजाच हरवून जाते.
मान इकडे तिकडे हलवून विखुरलेले केस डोळ्यावर येत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तो वेगळाच!
------------------------------------
------------------------------------
स्थळ बाथरूम – इश्श्य!.. इथले सगळेच डिटेल देऊ शकत नाही. पण सहा वाजता जे आत जातो ते साडेसात वाजताच बाहेर येतो.
ही वेळ उदाहरण म्हणून दिली आहे. त्यामुळे सहा सकाळचे की संध्याकाळचे करू नये. किंबहुना आता डोक्यावरून आंघोळ रोजच करता येत नाही. आणि डोक्यावरून आंघोळ करायची नसेल तर करायचीच का? या मनात आलेल्या नकारात्मक विचारांना मोठ्या प्रयासांनी हाकलून रोज बाथरूममध्ये शिरावे लागते.
पण हे रोजच जमत नाही. प्रामुख्याने थंडीच्या मोसमात आळस केलाच जातो. त्यामुळे रोज आंघोळ करणाऱ्या आयाभगिनींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा!
बाथरूम डिटेल देऊ शकत नसलो तरी बाहेर आल्यावरचे देऊ इच्छितो. धुवा, पुसा, सुकवा, विंचरा, हेअर ड्रायर वापरा, पुन्हा विंचरा, पूर्ण सुकवा आणि मगच घराबाहेर पडा.
या आधी सुट्टीच्या दिवशी क्रिकेटचा सामना एन्जॉय करताना दोन इनिंगच्या ब्रेकमध्ये आंघोळपाणी उरकून घ्यावे अशी आमच्याकडे पद्धत होती. ती आता पुर्णपणे लोप पावली आहे. कारण त्या नादात दुसरी इनिंग सुरू होऊन रोहीत शर्माचे सिक्सर किंवा बुमराहचे यॉर्कर मिस करू शकत नाही.
------------------------------------
------------------------------------
स्थळ बेडरूम – इश्श्य!...
बिश्श्य.. वगैरे काही नाही. तिथे हल्ली दर विकेंडला बायकोच्या पाया पडावे लागते. पाय चेपावे लागतात. तेव्हा त्या बदल्यात ती माझ्या डोक्यावर तेल थापायचे काम करते. या आधी कधी अशी वेळ आली नव्हती. तिने विनंतीला मान दिला तर ठिक, अन्यथा फार भाव द्यायचा नाही हेच सुखी संसाराचे धोरण होते. पण एक दिवस झोल झाला. केसांचा घोळ झाला. त्याला जबाबदार मीच होतो. कारण आयुष्यात कधी कंगवा वापरला नव्हता. आपला हात जगन्नाथ म्हणत केसातून बोटे फिरवा आणि केस सेट करा हेच माझे हेअर स्टाईल स्टेटमेंट होते. ज्याचा एके दिवशी पुरता स्टीलमेट झाला. केसातून बोटे पुढे जायला तयारच नव्हती. गुप्तधनाच्या हंड्याला नांगर अडकून बसावा तशी बोटे केसांच्या जटांना जाऊन धडकली. बायकोने लगेच चान्स घेत डिक्लेअर केले की आता केस कापण्याशिवाय पर्याय नाही. या कारणासाठी धारातीर्थी पडलेल्या केसांची इतिहासातील उदाहरणे देऊ लागली. बायकांना सुद्धा गुंता झाल्याने लांबसडक केस कापावे लागले आहेत, मग तू तर एक क्षुद्र पुरुष आहेस याची मला जाणीव करून देऊ लागली.
मी घाबरलो तसे तिने माझ्याशी डील केले. बदल्यात ते मागितले जे तसेही तिला न मागता मिळतेच. त्याहून आणखी काही मागितले असते तरी दिले असतेच. कारण वर मी कितीही तक्रारींचा पाढा वाचला असला तरी केसांमुळे येणारे वेगळेपण मला आतून कुठेतरी सुखावतेच. किंबहुना म्हणूनच सारे त्रास झेलतो, सारे अपमान गिळतो, पण केस कापायला टाळतो.

तर सध्या डीलप्रमाणे आमच्याकडे दर वीकेंडला हा असा वेणी-फनीचा कार्यक्रम होतो. जो वरवर दिसायला कितीही फनी वाटला तरी त्यात प्रचंड मेहनत असते. त्यामुळे हे आयुष्यभर करणार्या सर्वच महिलांना पुन्हा एकदा सलाम!
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
(अश्याच एका खर्याखुर्या जुन्या किस्स्यावर आधारीत - परतीचा पाऊस - ए शॉर्ट ऍण्ड स्वीट लव्ह स्टोरी - https://www.maayboli.com/node/85834 )
लांब केस कोणाला सौंदर्याचे
लांब केस कोणाला सौंदर्याचे लक्षण वाटत असतील मला जंगलीच वाटतात. त्यामुळे केस नेहमी लहानच ठेवते. अगदी क्रु कटही आवडेल मला.
------
पहीले २ अनुभव काहीतरीच आहेत. बाकी ठीक.
-----------
काय करणार केस उडतातच हे विधान आणि त्याला अर्थ आहे का? दुसर्याच्या थोबाडावर, डोळ्यात आपले केस जाउ नयेत हे साधे बेसिक मॅनर्स आहेत. असो. भारतात आणि मॅनर्स ... म्हणजे आस्किंग टु मच आहे.
ऋ , सध्या मला धुरंदरमधल्या
ऋ , सध्या मला धुरंदरमधल्या रणविर सिंग च्या hair flip चे inst feeds येतायेत.
हम्म! लेखाचे टायटल काही मॅच
हम्म! लेखाचे टायटल काही मॅच होत नाही. लांब केस ठेवणे न ठेवणे ही वैयक्तिक आवड, फक्त ते दुसर्याला त्रास होईल असे स्त्री-पुरुष- नॉन बायनरी कुणीच ठेवू नयेत. माझ्या दोन सिनियर स्नेह्यांचे केस सत्तरीतही छान दाट आहे. सॉल्ट अँन्ड पेपर केसांचा कायम व्यवस्थित पोनीटेल बांधतात.
दुसर्याच्या थोबाडावर,
दुसर्याच्या थोबाडावर, डोळ्यात आपले केस जाउ नयेत हे साधे बेसिक मॅनर्स आहेत. >>> मॅनर्स असतातच गं धनश्री ,पण तू कधी लोकल च्या( मेट्रोच्या नव्हे) दारात उभी राहिली असशील तर लक्षात येईल, किती मॅनेज करणं कठीण असतं केस, भरभर वाऱ्याच्या पुढे . तरी पोरी चढताना अंबाडा बांधून ,क्लिप लावून, ट्रेन मध्ये युद्धावर चालल्यासारख्या पर्स ओढण्या केस सगळं सावरूनच चढतात.तरी हल्लीच्या लेयर आणि बटरफ्लाय कट मधून चुकार केस क्लिप च्या बाहेर येऊन वार्यावर उडतातच .तरी एखादी म्हणालीच केस मागून तोंडात जातायत तर मुली केस पुढे घेतात.
एव्हडा काही भारत मॅनर लेस नाहीये
पल्सिस खम्बाता कत मारा सगले.
पल्सिस खम्बाता कत मारा सगले.
सिमरन खरे असेल पण मला स्वतःला
सिमरन खरे असेल पण मला स्वतःला केसांबद्दल अजिबात ममत्व नाही. एकदा माझ्या लाडक्या मैत्रिणीला फार दिवसांनी भेटले म्हणुन मिठी मारलेली. तिचे कुरळे दाट केस होते पण किती दिवसात शांपू केलेला नव्हता माहीत नाही.
.
रोज शांपू करणे आपल्याकडे प्रचलित नाही. अमेरिकेत तरी आहे की नाही माहीत नाही. पण शांपू रोजच केला पाहीजे. विशेषतः धूळ, प्रदूषण, असलेल्या जागेत, जिथ केसांना, तेल लावले जाते तिथे. निदान एका आड एका दिवशी तरी मस्ट आहे.
.
मला रोज २ दा डोक्यावरुन आंघोळ लागते त्याशिवाय शिण जात नाही की स्वच्छ वाटत नाही.
अमेरिकेत तरी ठीक आहे धूळ घाम
अमेरिकेत तरी ठीक आहे धूळ घाम नाही.हो इथे कमीत कमी दिवसाआड तरी केस धुवावेत इतका चिकचिकाट असतो. पण लांब केस असणाऱ्यांना फक्त संडे च मिळतो सोवळं करायला.
ह्म्म्म!!
ह्म्म्म!!
काही रोचक आणि बुद्धीला चालना
काही रोचक आणि बुद्धीला चालना देणारे प्रतिसाद आले आहेत. पण आज बीजी असल्याने आताच बघत आहे.
<<<<<लांब केस कोणाला सौंदर्याचे लक्षण वाटत असतील मला जंगलीच वाटतात.
>>>>>>
हो, जंगली दिसतोस टाईप कॉमेंट झेलाव्या लागतात. कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते. नॉर्मल लांबीच्या केसांची चांगलीवाईट हेअर स्टाईल असेल तर कोणी त्यावर मुद्दाम कॉमेंट करत नाही. कोणी टकले असेल तर ते शक्यतो नाईलाजाने झालेले असते म्हणून त्यावर कोणी कॉमेंट करत नाही. पण ज्याचे केस लांब असतात त्याच्या रोजच्या हेअर स्टाईलवर सतत कॉमेंट येतात. केस वाढवताना त्या झेलायच्या आहेत अशी मनाची तयारी आधी करावी आणि मग वाढवायला घ्यावेत.
ऋ , सध्या मला धुरंदरमधल्या
ऋ , सध्या मला धुरंदरमधल्या रणविर सिंग च्या hair flip चे inst feeds येतायेत. Biggrin
>>>>>
हा हा.. कालच माझे फेसबुकचे फोटो बघून आमच्या ग्रुपवरचा एक जण म्हणाला की धुरंदर मराठीत आला तर रणवीरच्या रोलसाठी तुलाच घेतील.. तेव्हापासून असेही मूठभर मांस अंगावर चढले आहे
<<<<< माझ्या दोन सिनियर
<<<<< माझ्या दोन सिनियर स्नेह्यांचे केस सत्तरीतही छान दाट आहे. सॉल्ट अँन्ड पेपर केसांचा कायम व्यवस्थित पोनीटेल बांधतात.
>>>>>
येस, मी सुद्धा ऑफिसमध्ये तेच करतो.
पण मला वाटते बहुधा बायकांच्या आणि पुरुषांच्या केसांचा पोत वेगळा असतो. म्हणजे तुलनेत मऊ मुलायम सिल्की वगैरे.. की वर्षानुवर्षे मोठे केस ठेवल्याने तसा झाला असतो कल्पना नाही.
hair flip चे inst feeds
hair flip चे inst feeds येतायेत. Biggrin >> wow कसला भारी सीन आहे तो मी घरी येऊन परत शोधून बघितला . 🧿 नजर ना लगे रणवीर च्या केसांना आणि रुन्मेष तुमच्यापण.
दुसर्याच्या थोबाडावर,
<<<दुसर्याच्या थोबाडावर, डोळ्यात आपले केस जाउ नयेत हे साधे बेसिक मॅनर्स आहेत.
भारतात आणि मॅनर्स ... म्हणजे आस्किंग टु मच आहे.
>>>>>>
भारताची कल्पना नाही सामो, पण आमचे मुंबईकरांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत.
इथे लोकसंख्येची घनता इतकी आहे की अशी ठरवून फिजिकल स्पेस मेंटेन करणे अवघडच नाही तर कित्येक ठिकाणी अशक्य आहे.
लेखात उदाहरण ट्रेनचे आहे. सुदैवाने मी बालपणापासून उलट्या दिशेने प्रवास करणारा असल्याने आजवर फार गर्दी अनुभवली नाही पण पाहिली आहे.
जिथे पुरुष काय अगदी बायका सुद्धा जीवावर उदार होऊन ट्रेनच्या दाराला लटकतात, बसमध्ये क्षमतेच्या पलीकडे कोंबली जातात, शेअर रिक्षा नामक छोट्याश्या वाहनात रिक्षाचालका व्यतिरिक्त दोनच जण सुखासुखी बसावे इतकीच जागा असताना चार काय वेळप्रसंगी पाच जण कोंबली जातात. तिथे तुम्ही एकमेकाला स्पर्श केल्याशिवाय प्रवास करू शकत नाही.
दमट वातावरणामुळे लोकांना घाम येतो तरीही एकमेकांना चिकटून उभे राहणे हा नाईलाज असतो. अश्या वेळी मॅनर्स जपायला एकमेकांना न चिकटता उभे राहणे हे खरे आस्किंग टु मच आहे
हो हो. लोकल ट्रेन मधे वडापाव
हो हो. लोकल ट्रेन मधे वडापाव खायचा असल्यास दोन माणसं सोडून तिसर्याने तो हातात धरावा लागतो म्हणजे आपल्याला खाता येतो.
तसंच भांग पाडायचा असेल तर शेजारच्याचा हात सरळ होईल इतके अंतर असेल तर त्याला विनंती करावी लागते. आपला हात वळवून केसापर्यंत नेता येत नाही. त्यामुळं लेडीजचा डबा वेगळा आहे. नाहीतर बायकांचे केस पुरूषांना करायची पाळी आली होती.
तरी एखादी म्हणालीच केस मागून
तरी एखादी म्हणालीच केस मागून तोंडात जातायत तर मुली केस पुढे घेतात.
>>>>>
+७८६
कोणाला घ्यायला जमत नसतील तर आणखी चार लोकं मदत सुद्धा करतील. त्या उडणाऱ्या केसांवरून दोघांचे भांडण झाले तर जाने दो भाईसाब म्हणत दहा जण सोडवायला सुद्धा येतील. प्रॉपर मुंबईकरांचे हेच कल्चर आहे
वकील लोक यासाठीच लांब केस
वकील लोक यासाठीच लांब केस ठेवत नाहीत. नाहीतर उडून जाणार्या केसेस वरून त्यांच्यात भांडणं होतात.
गाडीतल्या म्हणजे लोकल गाडीतला
गाडीतल्या म्हणजे लोकल गाडीतला दुसऱ्याच्या केसांचा त्रास हा स्वतंत्र धाग्याचा विषय होऊ शकतो. खिडकी जवळ बसलेल्या मुलीचे केस आपण तिच्या बॅक साईडच्या सीटवर बसलेले असताना वाऱ्यामुळे सतत आपल्या मानेवर हुळहुळत राहतात. वाऱ्यावर अश्या उडणाऱ्या केसांमुळे ती एकदम हवेत असते पण आपल्याला ते असह्य होतं. सांगितलं तर गाडीत कोणी ही कोणाच ऐकत नाही, ती आपली मानसिकताच नाहीये. वाऱ्यामुळे केस उडतायत मी काय करू वगैरे उत्तरं येतात . मी अश्या सीटवर ह्या त्रासपायी कधी ही बसत नसे.
माझ्या उंचीमुळे उतरताना पॅसेज मध्ये उभी असले की पुढच्या मुलीचे केस बरोबर माझ्या नाकावर आणि ओठांवर फिरत, अगदी वैताग यायचा. ट्रेन मध्ये गर्दीमुळे एकमेकीना फार म्हणजे फारच म्हणजे अगदी नको इतकं चिकटून उभं राहायला लागतं त्यामुळे ते जास्त जाणवतं.
वाऱ्यामुळे केस उडतायत मी काय
वाऱ्यामुळे केस उडतायत मी काय करू वगैरे उत्तरं येतात.
>>>>
जनरल डब्याच्या तुलनेत लेडीज कंपार्टमेंटमध्ये अश्या चकमकी जास्त होतात. हे माझे स्वतःचे निरीक्षण नाही, पण असे म्हटले जाते.
लोकल ट्रेन अनुभवांवर धागा काढायला हवा. त्यात बरेच व्हरायटी येतील. लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी तर ते एक स्वतंत्र विश्व आहे.
किस्सा क्रमांक ३ मधील जागी आज
किस्सा क्रमांक ३ मधील जागी आज मी योगायोगाने पुन्हा उभा होतो आणि लक्षात आले की डोक्यावर फूल स्पीड फॅन फिरत होता ज्यामुळे केस वेडेवाकडे उडत होते. जे ट्रेन ने प्रवास करतात त्यांनी चेक करा. दरवाज्याच्या जरा आत फॅन असतात. मूळ किस्सा नंतर अपडेट करतो. हा महत्वाचा डिटेल आहे.
भरपूर केशसंभार आहे
भरपूर केशसंभार आहे
लकी यू
सांभाळून ठेवा हा ऐवज.
ह्या वयात टक्कल पडलेले खूप दिसत आहेत पुणे आणि पिंची मध्ये
धन्यवाद झकासराव
धन्यवाद झकासराव
पण ह्या वयात म्हणू नका.. इतकेही नाहीये.. अजून आयुष्याचा इंटरवल सुद्धा झाला नाहीये
ऋन्मेषजी , नवीन धागा काही
ऋन्मेषजी , नवीन धागा काही दिवस काढू नका. मी पुढचे भाग टाकणार आहे.
हुश्श.... किती मोठा लेख...
हुश्श.... किती मोठा लेख...
वाचला.. छान आहे..... केस तुझे...
मोबाईलवर बोलून टाईप करत आठवेल
मोबाईलवर बोलून टाईप करत आठवेल तसे किस्से छापत गेलो. एफर्टलेस असल्याने मोठा झाला. बोलून टाईपमुळे काम खूप सोपे झाले आहे.
तू आता हाफ स्लीव्ह पठाणी
तू आता हाफ स्लीव्ह पठाणी वापरत जा आणि मिशीही ठेव. नाव विचारलं तर हमज़ा अली मझारी सांग. मग लोक तुझ्याकडे आणि केसांकडे कौतुकाने बघतील.
पण चुकून चालत चालत
पण चुकून चालत चालत पाकिस्तानला गेलो तर ते लोक मारणार नाहीत? एव्हाना धुरंदर त्यांनी देखील पाहिला असेल..
@ ऋन्मेष,
@ ऋन्मेष,
>>'जंगली दिसतोस टाईप कॉमेंट झेलाव्या लागतात. / ज्याचे केस लांब असतात त्याच्या रोजच्या हेअर स्टाईलवर सतत कॉमेंट येतात. केस वाढवताना त्या झेलायच्या आहेत अशी मनाची तयारी आधी करावी आणि मग वाढवायला घ्यावेत.'>>
एकंदरीत हे भलतंच जोखमीचं प्रकरण आहे म्हणायचं... पण तुमच्या डेडिकेशनला सलाम!
>>'अरे डरा दिया आपने तो, मुझे लगा कही गलत जगह तो नही आ गया..'>>
हे राम 😂
>>'एक मित्र साळसूदपणे आपल्या आईला विचारतो – रुनूचे बाबा हे आई का दिसतात?'>>
🤦♂️
>>' या सर्वांचे पालक माझ्या बायकोला हे किस्से हसत हसत मीठ मसाले लावत सांगतात.आणि घरचे मला सुनावतात, तुझ्यामुळे मुलांना नको नको ते ऐकून घ्यावे लागते.'>>
धन्य ती माऊली आणि धन्य ती लेकरे 🙏
त्यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावरच तुम्हाला ही 'काहीशी विलक्षण' आवड जोपासता येत आहे...
>>'धुवा, पुसा, सुकवा, विंचरा, हेअर ड्रायर वापरा, पुन्हा विंचरा, पूर्ण सुकवा आणि मगच घराबाहेर पडा.'>>
करणाऱ्याचे ठीक पण हे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत वाट बघत बसणाऱ्याला हे किती कंटाळवाणे वाटते ह्याचा अनुभव मी माझ्या एका अगदी जवळच्या मित्रामुळे गेल्या ३-४ वर्षांत अनेकदा घेतलाय! हा मित्र म्हणजे एक अजब रसायन आहे! तो मुस्लिम आहे पण २०२० मध्ये त्याच्या बायकोला कॅन्सरचे निदान झाल्यावर ती ह्या आजारातून बरी व्हावी ह्यासाठी त्याने तुमच्या नवी मुंबईमधल्या खारघरच्या गुरुद्वारात 'डोक्यावरच्या आणि दाढीच्या केसांना ह्यापुढे ब्लेड/कात्री लावणार नाही असा नवस केला होता.'
आता ह्या नवसाला ५ वर्षे उलटली असून त्याच्या बायकोची तब्येतही व्यवस्थित आहे, पण 'घरकी खेती' मात्र काहीच्या काहीच वाढली आहे. आणि काय तो रोज सकाळी आणि संध्याकाळी असा दिवसातून दोन वेळा चालणारा त्या केशसंभाराचा आणि दाढीचा 'मेंटेनन्स'... बाप रे बाप... 😀
---
@धनश्री
>>"लांब केस कोणाला सौंदर्याचे लक्षण वाटत असतील मला जंगलीच वाटतात. त्यामुळे केस नेहमी लहानच ठेवते. अगदी क्रु कटही आवडेल मला.">>
व्यक्तिगत पातळीवर तुमच्या वरील वाक्याशी १००% सहमत आहे!
बाकी कोणी डोक्याचा तुळतुळीत गोटा करावा की गुढघ्यापर्यंत केस वाढवून फिरावे त्याच्याशी मला काहीही देणेघेणे नसते, पण स्वतःसाठी म्हणायचं तर क्रू कट सगळ्यात आवडता. एकेकाळी बाईक वरून खूप फिरायचो तेव्हा तर सात-आठ वर्षे माझी तीच हेअरस्टाईल असायची. कम्फर्टेबल तर वाटायचाच, वर सतत हेल्मेट काढण्या-घालण्यामुळे केसांचा 'अवतार'ही व्हायचा नाही. अजूनही तोच 'कट' करायला आवडेल पण बायको आणि आईला अजिबात आवडत नाही त्यामुळे त्या दोघी लैच 'कटकट' करतात म्हणून करायचा टाळतो 😂
महिलांच्या बाबतीत बोलायचे तर 'ब्लंट कट' सगळ्यात आवडता... डावी-उजवीकडे मान वळवताना वेट लाईन ज्याप्रकारे स्विंग होते ती अदा एकदम कातिल वाटते 😍
तू मुंबईतून चालत म्हणजे फार
मुंबईतून चालत म्हणजे फार लांब पडेल. पोहत जाता येतंय का ते बघ. थेट कराचीत जाता येईल.
केसपासुन सगलि लक्शनं सेमhttps
केसपासुन सगलि लक्शनं सेम
https://youtu.be/vJ2xU1Ue1uo?t=827
संजय भावे,
संजय भावे,
हौसला अफजाई बद्दल शुक्रिया
<<< करणाऱ्याचे ठीक पण हे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत वाट बघत बसणाऱ्याला हे किती कंटाळवाणे वाटते
>>>>>
छे हो, कोणी वाट बघत नसते. मी माझी मुले वगळता कोणासोबत कुठे जात नाही. आणि कुठे कुणासोबत जात असेल तेव्हा आंघोळ करत नाही. मलाच डोक्याला भूणभूण नको असते.
Pages