तेलुगु पाककृती: दध्योजन (दहीभात)

Submitted by वामन राव on 27 October, 2025 - 11:02
तेलुगु पाककृती: दध्योजन (दहीभात)
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

तेलुगु पाककृतींच्या मालिकेत मागच्या वेळी किंचीत तामस गुणाची गरम-तिखट उग्गानी-बज्जी पाहिली होती. आजचा मेनू सात्विक गुणाचा दहीभात आहे.

मराठीत दहीभात, दध्योदन किंवा तेलुगुत पेरुगान्नम्, दध्योजनम्, दध्योजन, कर्डराइस हा पदार्थ, आंध्र-तेलंगाणातील देवळांत प्रसाद म्हणून देतात. नवरात्रात पंचमीला देवीला नैवेद्य दाखवतात, गणेशोत्सवात दहा दिवसांपैकी एकदा तरी असतोच. दहीभात हा श्रीकृष्णालाही आवडीचा आहे; म्हणूनच की काय, शाहीर होनाजी बाळांच्या घनश्याम सुंदरा श्रीधरा या अमर भूपाळीत दध्योदनाचा उल्लेख आहे!

चला तर मग, मुलायम, सात्विक, देवांना प्रिय असलेला दहीभात तेलुगु पद्धतीने कसा करायचा हे पाहूया.

साहित्य:

  • तांदूळ एक वाटी
  • दूध: एक वाटी
  • दही: दोन वाट्या
  • शेंदेलोण किंवा मीठ: एक चमचा / चवीनुसार

फोडणीसाठी:

  • चणाडाळ:एक चमचा
  • उडीदडाळ: एक चमचा
  • मोहरी: अर्धा चमचा
  • जिरे: अर्धा चमचा
  • मिरे: अर्धा चमचा
  • आलं: एक इंच, बारीक ठेचून
  • हिरव्या मिरच्या: दोन, लांब चिरून
  • वाळलेल्या लाल मिरच्या: दोन, तुकडे करून
  • कढीपत्ता: एक काडी
  • हिंग: पाव चमचा

सजावटीसाठी:

  • डाळिंब दाणे: दोन-तीन चमचे
  • (ऐच्छिक) कोथिंबीर: थोडीशी, बारीक चिरून

दध्योजन (दहीभात)साहित्य

क्रमवार पाककृती: 

तांदूळ स्वच्छ धुवून, अडीच वाट्या पाणी घालून मऊ शिजवून घ्या. गरम असतानाच किंचित घोटून घ्या. दाणे किंचित मोडायला हवेत पण अगदी पिठलं व्हायला नको. त्यात एक वाटी गरम दूध घालून हलवून ठेवा. थंड झाल्यावर दोन वाट्या दही घाला. नीट एकत्र करून घ्या. एका भांड्यात काढून ठेवा.

फोडणीच्या कढईत एक-दीड चमचा तेल गरम करा. त्यात चणाडाळ, उडीदडाळ, मोहरी, जिरे व मिरे क्रमाने घाला. एका मिनिटाने आलं घाला. किंचित परतून हिरवी मिरची, लाल मिरची व कढीपत्ता घाला. परतल्यावर गॅस बंद करून हिंग घाला.

फोडणी थंड झाल्यावर दहिभातावर घाला. शेंदेलोण घालून नीट हलवून एकत्र करा. आवडत असल्यास कोथिंबीर व डाळिंब दाणे घालून वाढा. तोंडीलावणी म्हणून वाळकाचे लोणचे किंवा आंब्याचे लोणचे वाढा.
तयार झालेले दध्योदन

.
तयार झालेले दध्योदन

पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. तुम्ही वेगळ्या पद्धतीने दहीभात करत असाल तर तेही लिहा.

अधिक टिपा: 
  • दही आंबट नको. ताजे, मधुर चवीचे, साजूक पण पूर्ण झालेले दही हवे.
  • दूध हे फुल क्रीम / फुल फॅट हवे. टोन्ड मिल्क नको.
  • मोहरी ही शक्यतो मोठी घ्यायला हवी. पांढऱ्या दहीभातात चांगली दिसते.
  • ताजे डाळिंबाचे दाणे अवश्य घाला. चवीला आणि दिसायलाही छान असतात.
  • ही आंध्र पद्धतीची पाकृ आहे; यात दूध घालतात.
  • तेलंगाणा पद्धतीचीत दूध घालत नाहीत आणि दही घातल्यानंतर भात पुन्हा थोडासा शिजवतात.
  • हा दहीभात जेवणात इतर पदार्थांबरोबर शेवटी थोडा घेता येतो. त्याचप्रमाणे, मर्यादित भूक असेल तर नुसता दहिभातही पूर्ण जेवण म्हणून घेता येतो. डब्यातही नेता येतो.

खास मायबोलीकरांसाठी दध्योदन -

दध्योजन (दहीभात)

---

मऊसुत शिजलेला भात -

शिजलेला भात

शिजलेल्या भातात दूध घातले -

शिजलेल्या भातात दूध घातले

फोडणी करताना -
फोडणी १फोडणी २

थंड झालेल्या दूध-भातात दही घातले -

थंड झालेल्या दूध-भातात दही घातले

दध्योजन तयार आहे -

यापूर्वी एकदा केलेले दध्योजन -

गच्चीबावलीतल्या एका कॉर्पोरेट रेस्टोमधले हे दध्योजन -

दध्योजन

मागच्या वर्षी विजयवाड्याला जाताना एका रेस्टॉरंटात खाल्लेले दध्योदन -

दध्योजन (दहीभात) १

.

दध्योजन (दहीभात)२

काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा.

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘गोपी सडासंमार्जन करून यमुनेवर पाण्याला निघाल्यासुद्धा! ऊठ आणि हा दहीभात खा पाहू!’
दही आणि मऊ भात उन्हाळ्यात खातात ना न्याहारीला! सोबत माळेचा पांढरा कांदा!

लोल हो. हे काय मोटिवेशनल गाणं समजलात? ते 'सुंदरा' सार्कॅस्टिक आहे हो!
'उजाडलं, लोक कामाला लागले, ब्यूटी स्लीप संपत नाही यांची! ती चरवी घेऊन दूध काय तुमचा कापडीकाका काढणार आहे?! मला मेलीलाही पाणी आणायला जायचंय. तो दहीभात कालवून ठेवलाय, उठा आणि तो गिळा एकदा! तोही आम्ही कालवून द्यायचा यांना! आळशीपणा तर असा आहे की भरवला तरी तुम्हीच पचवून द्या म्हणतील! या नंदांकडचं मेलं असंच!' असं त्याचं गद्य ट्रान्स्लेशन आहे. Proud

स्वाती Happy हसुन हसुन मेले.. Happy

खरे म्हणजे गाण्याला चुकीची चाल लावलीय. अशी गोड संथ आळवणी करुन कुठले पोर सकाळी ऊठणार आहे?? समस्त आयांना व बायकांना माहित आहे की लातोंके भुत बातोंसे नही मानते.

सुरेख लेख आणि फोटो!
दही भात आवडता आहे. फार फार पूर्वी तिरूपतीला देवळात दर्शन झाल्यावर प्रसाद म्हणून छोट्या द्रोणात काहीवेळा दहिभात असायचा. फार सुंदर चव असायची. आता मिळतो की नाही माहित नाही.

@स्वाती, गद्य ट्रान्स्लेशन भारी आहे Rofl

वामनराव, फोटो मस्त. आधी केलेला दहीभात आवडला. आत्ता केलेल्या भातात दही कमी आहे Wink

व्वा. दिलखुष झाला.

मी देखील जवळ जवळ रोजच रामदास कामत यांच्या आवाजातली घनश्याम सुंदरा भूपाळी ऐकतो, त्यामुळे सामो यांच्या प्रमाणे मलाही त्याच ओळी आठवल्या.

आमच्या लहान शाळेतल्या एक खूप जुन्या बाई म्हणजे मी दुसरीत असताना त्या bifurcated लुगडं घालून यायच्या शाळेला. त्या भाकरीला दशमी आणि दहीबुत्तीला दध्योदन म्हणत.

ऐसी अक्षरे दिवाळी अंकात चिन्मय धारूरकर यांचा एक (रडका) लेख आहे त्यात रोमन स्पेलिंग मुळे मराठी/उत्तर भारतीय लोक दाक्षिणात्य गोष्टींचे चुकीचे उच्चार करतात आणि तेच उच्चार कसे रुळतात यावर लिहिले आहे.

तसे काहीसे वाटले. शीर्षक वाचून.

गोव्यातल्या सगळ्या गावांचे असे झाले आहे. कुंकळे चेे कुंकलेम वगैरे.

ते सडासंमार्जन वाचताना दुसर्या स वरचा अनुस्वार पहिल्या स वर वाचला चुकून. पहाटेचं वर्णन म्हणून तेही ठीकच आहे म्हणा.

बाकी पहिले छूट कृतीमधे आलं घातलं ते बरं. नाहीतर नंतर " थोडं आलं घालावं" अशी कमेंट आली असतीच.

गोव्यातल्या सगळ्या गावांचे असे झाले आहे. कुंकळे चेे कुंकलेम वगैरे>>>>> ते पोर्तुगिजांनी केले. शेवटी म लावला, श साठी X आणि स साठी C वापरला. त्यामुळे शागुतीचा उच्चार लोक झाकुटी असा करतात Happy (कोकणात जिला सागुती म्हणतात तीच ही. झाकुटी म्हणजे काय ह्या मोहात पडुन पदार्थ मागवावा तर आपला चिकन रस्सा समोर येतो).
सिताराम हा शब्द citaram असा आजही जुन्या दुकानांच्या नामफलकात दिसतो. कुंकळ्ळीचे रोमन स्पेल्लिंग इतके भयंकर आहे की मला तो शब्दच वाचता येत नाही. ऑफिसातली गोवन मी सुट्टीत घरी पँजिमची जाते म्हणाली तेव्हा मला हे पँजिम आहे कुठे तेच कळेना Happy

असो, धागा काय आणि माझे विषयांतर काय.. माबोवर चालुन जाते म्हणुन बरे.

व्वा माझ्या आवडीचा पदार्थ आणि अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन. झकास.

खाली दध्योजन शब्दावर जरा अवांतर चर्चा करतो आहे, त्याबद्दल क्षमस्व.

आंध्रातील तेलगू लोक्स दध्योजन किंवा दध्योजनम् खरंतर दद्धोजनम् असं म्हणतात. ते लोक ज्ञान (dnyan) ला ज्ञान (jnan) असे म्हणतात! >> दध्योदन हा मूळचा शब्द आहे. भाषिक अपभ्रंश असल्यास माहीत नाही. पण त्या उच्चाराचा ज्ञ उच्चाराशी संबंध नाही. ओदन म्हणजे ओला (उद - पाणी) केलेला अर्थात शिजवलेला भात. कच्च्या तांदूळाला ओदन म्हणत नाहीत. उद ह्या शब्दापासून ओदन बनल्यामुळे त्यात JN असा उच्चार येण्याचा प्रश्न नाही. तो दध्योजन केवळ जन जोडशब्द असलेल्या शब्दांच्या परिचयामुळे चुकून केला गेलेला आणि अनेकांनी तसाच ऐकून वापरलेला उच्चार असावा.

ज्ञ हे संस्कृतात मुळाक्षर नसून जोडाक्षर आहे आणि ते ज् + ञ् अशा अक्षरांच्या संयोगाने बनते. त्याचा मुळातला उच्चार पण तसाच असावा. त्यामुळेच ज्ञा धातूपासून जानाति क्रियापद - त्याची मराठीत जाणणे वगैरे रूपे होतात. ञ अक्षर इंग्रजीत नसल्याने ज् + ञ् होणारे जोडाक्षर JN अक्षरांनी लिहिले जाते.

आता आपण मराठीत द्न्य असा उच्चार करतो, हिंदीत ग्य असा उच्चार करतात - हे त्या त्या भाषेतल्या लोकांना ते जोडाक्षर कसे ऐकू आले, कसे उच्चारणे सोपे वाटले, आणि बहुसंख्य लोकांनी कसे कॉपी केले ह्यावर झालेले बदल आहेत.

स्वगत: हायला! या पर्यटनाच्या नादापायी माझ्याच रेसिपीच्या धाग्याला विसरलो मी!

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार व उशिरा प्रतिसादासाठी क्षमस्व.

'या नंदांकडचं मेलं असंच!'

>>> व्वा! नंदा या शब्दावरचा श्लेष छान साधला आहे!

अशी गोड संथ आळवणी करुन कुठले पोर सकाळी ऊठणार आहे?

>>> मला हेच म्हणायचे होते, पण नेमके शब्दांत मांडता येत नव्हते. फोनमधल्या अनेक बऱ्याचश्या अलार्म टोन देखील अगदी मधुर असतात. त्या ऐकून अंथरुणातून उठण्याऐवजी पहाटेची साखरझोप अधिकाधिक गोड होत जाते.

फार फार पूर्वी तिरूपतीला देवळात दर्शन झाल्यावर प्रसाद म्हणून छोट्या द्रोणात काहीवेळा दहिभात असायचा. फार सुंदर चव असायची. आता मिळतो की नाही माहित नाही.

>>> दहीभात नेहमीच मिळतो. पुलिहोरा (चित्रान्न) सुद्धा मिळते. दोन्ही चविष्ट असतात.

आधी केलेला दहीभात आवडला. आत्ता केलेल्या भातात दही कमी आहे

>>> हं. फोटोत भाताची थोडी शिते दिसावीत म्हणून थोडे कमी घातले होते. नंतर पुन्हा घालून कालविले.

गोव्यातल्या सगळ्या गावांचे असे झाले आहे.

>>> पलोळें या गावाचे नाव रोमन लिपीत Palolem असे आहे, त्यावरून काहीजण पलोलेम असे म्हणतात.

@ हरचंद पालव, अवांतर सवांतर चर्चा आवडली. उच्चारभेद कळले. धन्स्.

@ऋतुराज, एकेकाळी अपूर्वाई वाचलीय पण "भात रूम"चा काही संदर्भ लक्षात येत नाहीय...

Pages