दिवाळी अंक २०२५

Submitted by ऋतुराज. on 5 October, 2025 - 23:59

नमस्कार मायबोलीकर,
दसरा झाला आणि दिवाळी आता अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. बाजारात दिवाळी अंक यायला सुरुवात झाली आहे.
तर हा धागा यंदाच्या दिवाळी अंकासाठी. कोणकोणते दिवाळी अंक घेतले? त्यात काय काय वाचले? यावर चर्चा करायला हा धागा वापरू.
इथल्या मायबोलीकरांचे लेख, कविता, कथा कोणत्या दिवाळी अंकात छापून आले असल्यास त्याची माहिती इथे नक्की देऊया.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतबख/ मदबख असा फारसी शब्द आहे. अर्थ - स्वयंपाकघर.

एकोणिसाव्या शतकात तो मुदबख / मुदबक असा मराठीत वापरलेला दिसतो. मुदपाक हे त्याचं पुणेरी, ब्राह्मणी स्वरूप आहे. मूद आणि पाक या दोन शब्दांमुळे तो संस्कृतोद्भव वाटतो, पण तो तसा नाही.

सयाजीरावांच्या पाकपुस्तकांमध्ये जे रूप वापरलं आहे, तेच मी वापरलं आहे.

लेखात इतरही काही आज प्रचारात असलेल्या शब्दांची तत्कालीन रूपं आहेत. ती मी बदललेली नाहीत.

चिनूक्ष, काही काळाने / वर्षांनी तुझा लेख इकडे प्रकाशित करशील का? किंवा तुझे एखादे पुस्तक येऊ घातले असेलच.
तुझ्या लेखासाठी प्राची दुबळे, मंगेश काळे किंवा निळू दामले यांचे भयंकर लेख असलेला दिवाळी अंक विकत घ्यावा लागेल.

जाता जाता पूर्ण tangent : आदिबंध, आदिमुद्रा, आदिम असे शब्द वापरणाऱ्या लोकांना संसार नीट जमत नाहीत असे माझे निरीक्षण आहे.

एकोणिसाव्या शतकात तो मुदबख / मुदबक असा मराठीत वापरलेला दिसतो. मुदपाक हे त्याचं पुणेरी, ब्राह्मणी स्वरूप आहे. >>>

मुदबख / मुदबक सारखेच मुदपाक हे ही केवळ मराठी स्वरुप च तर आहे ना ! मुदबख / मुदबकचे अकोल्याचे ब्राह्मणी अथवा किंवा नागपुरी ९६कुळी मराठा अशासारखी स्वरुपे आहेत का ; शब्दांना अशी लेबले का लागावीत असा प्रश्न मनी आला.

वडोदरा- बडोदा, वॉशर - वायसर ह्यांकरताही जात / गाव / प्रांत निहाय वर्गीकरणे आहेत का

परकीय शब्दांचं संस्कृतीकरण पूर्वीपासून होत आलं आहे. ते निरागस नसतं. उदाहरणार्थ, झलाबिया - जिलबी - जलवल्लिका. जिलबी हा जनमानसात रुळलेला शब्द आहे. पण त्याचं संस्कृतीकरण होऊन जलवल्लिका झालं. घोडा हा देशी शब्द आहे. त्याचं संस्कृत रूप घोटक झालं. अशी रूपं तयार होतात, तेव्हा त्या शब्दांवर मालकी सांगितली जाते. जलवल्लिका हा शब्द संस्कृतात आहे, म्हणजे जिलबी आमच्याकडे होतीच, हे सांगणं सोपं जातं.
मुदबख / मुदबग या शब्दाचं रूपांतर मुदपाक होणं, हेही निरागस नाही. त्यात ’पाक’ हा शब्द आल्यानं त्याचं मूळ संस्कृतात असल्याचं भासवलं जातं. हे प्रकार पुणेरी आणि ब्राह्मणी आहेत, कारण या मागे विसाव्या शतकातली सावरकरांनी उचलून धरलेली आणि अत्रे वगैरेंनी पुढे नेलेली आणि पुण्यात फोफावलेली मराठीकरण चळवळ आहे. सावरकरांना इंग्रजी शब्दांचं वावडं नव्हतं, त्यांना फारसी / अरबी शब्द नको होते. मराठीकरण मंडळानं मात्र इंग्रजी शब्दांनाही हरकत घेतली. या तत्कालीन राजकारणाचं फलित म्हणजे विसाव्या शतकाच्या मध्यात मुदपाकखाना हा शब्द रुळू लागतो.

इतिहासाचं थोडंफार वाचन केलं की उगाच अस्मिता दुखावून घेण्याचे कष्ट वाचतात.

'मुदपाकखाना' यातला खाना हा फारसी शब्द तर घालवू शकले नाहीत ना? मग या मराठीकरण मंडळीचे कर्तृत्व गंडलेलेच आहे म्हणायचे. जलवल्लिका म्हणताना जिभेचीही जिलबी होते हे हे शब्द सुचवणाऱ्या महानुभावांना कळत नाही काय?

जलवल्लिका हा मध्ययुगीन शब्द आहे.
परकीय शब्द आणि त्यांचे समानार्थी, सोयीचे, ओळखीचे शब्द यांच्या वापराविषयी मी लेखात थोडक्यात लिहिलं आहे.
बडोद्याच्या पाकपुस्तकांवर विस्तृत लिहीन, तेव्हा हे मुद्दे अधिक चांगल्या रीतीने मांडता येतील.
असो.
हा या धाग्याचा विषय नाही.

मुत्पाक; मुत्बख; मुद्पाक-खाना
(पु.) [अ. मत्यख्] सैंपाकघर. “भात मुदपाख कोठीकडे केली मापें ८१” (राजवाडे ६|३९४).
मूळ शब्द अरबी आहे हेही लिहिले आहे. फारसी-मराठी शब्दकोश.
भाषा अशीच समृद्ध होत असते.
हा शब्द संकृतोद्भव आहे असे कुणी क्लेम केले आहे?
शब्द जगाच्या एका टोकापासून दुसऱ्य टोकाकडे प्रवास करत जातात.
सावरकर तसे तर हे असे.
किचन शब्दही काही वाईट नाही.
वर जो राजवाडे ह्यांचा संदर्भ दिला आहे तो कुठून आला आहे हे समजले तर गोष्टी स्पष्ट होण्यास नादात होईल.
पुण्याचे लोक सैपाकघराला मुदापाक खाना म्हणत नाहीत तर किचन म्हणतात हो.
वन रूम मुदापाकखाना!

होय अगदी मस्त पर्यावरणस्नेही गुळगुळीत महाग कागदावर छापलेले असतात आणि जवळजवळ संपूर्ण रंगीत. अगदी संपूर्ण पर्यावरणस्नेही.

महा अनुभवचा दिवाळी अंक वाचला.

श्याम मनोहरांची एक बोअरिंग महा कथा त्यात आहेय. ती नाही वाचली तरी चालेल.

मात्र मृदगंधा दीक्षित या मुलीची कथा नक्की वाचा. मी क्लीन बोल्ड. फ्रेश, बोल्ड. आणि इंटेल्जेंट. वा एकदम दिल खुशच झाला असे काही ताजे मस्त वाचल्यावर. आवडली लेखिका आपल्याला.

कथेचे नाव आहे : तोडू का हे कुलूप?

कथा जागोजागी कलटण्या देते आणि थपडा देखील देते. डोकं आउट करते आणि लेखिकेच्या कौशल्याकडे बघून आपण स्टीमित होतो.

दणदणीत शिफारस.

ऋतुराज , बोरिवली मॅजेस्टिकमध्ये सुद्धा १०% सवलत असते. बहुतेक सर्वच विक्रेत देतात सवलत. फुटपाथवरचे स्टॉलवाले काही किमान रकमेच्या खरेदीवर सवलत देत.

' मुक्त संवाद ' दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे.

यंदा यातल्या विशेष विभागात डॉ. अनुराधा सोवनी यांचा लेख आहे. त्यांचे वडील श्री. प्रभाकर वि. सोवनी हे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या विज्ञानप्रसारकांपैकी एक होते. ते जागतिक दर्जाचे भूगर्भशास्त्रद्न्य होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते. सृष्टीज्ञान हे नियतकालिक त्यांनी अनेक वर्षं निष्ठेनं चालवलं.

यंदा त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मायबोलीकर आर्फीचे ते आजोबा.

अंकात रेखा शहाणे, सुनील सुकथनकर, डॉ. शैलेंद्र भंडारे यांचेही उत्तम लेख आहेत.

अंक खालील लिंकवर वाचता येईल.

https://heyzine.com/flip-book/5d63163b03.html#page/6

हा मुक्तसंवाद असला तरी समतावादी कुठे आहे चिनुक्षा?

अंक काढणारी : कोरडे, देशमुख, दिवाण, महाजन, बरूरे, शेवडे, शास्त्री, कुवळेकर, विचारे, नाईक, नार्वेकर, मयेकर, शिंदे, केसरकर

अंकात लिहिणारी : देशपांडे, कुलकर्णी, पाठारे, आर्वीकर, पटवर्धन, काबरे, पोतदार, कुलकर्णी, जोशी, भवाळकर, शहाणे, दिवाण, महाजन, सोवनी, कुलकर्णी, भंडारे, तळेगावकर, शिवुरकर, सरदार, कुलकर्णी, अर्वीकर, नाईक, जाधव, म्हापसेकर, सुकथनकर, द्रविड, कोरडे, जोशी, काळे, आणि सातपुते.

यातली एखाददोन आडनावं सोडल्यास मला कुणी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले, जातीसमूहांचे, धर्माचे लोक दिसत नाहीत.

साला या भामट्या पुरोगामी लोकांइतकी चालू जमात नाही. समतावादी नाव दिलेय. खिक्क. सगळ्यात दांभिक जमात असेल तर ही आहे.

महाअनुभव च्या अंकातील सुहास पळशीकरांचा लेख, मोहन द्रविड यांचा लेख आणि श्याम मनोहरांची दीर्घकथा, ह्या तीन गोष्टी आवडल्या. फारच आवडल्या.
याव्यतिरिक्त आणखी दोन नावे बघून मी अंक उचलला होता ती म्हणजे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि मृद्गंधा दीक्षित. ते काही अपेक्षेप्रमाणे घडलं नाही.
मुकुंद कुलकर्णींचा संघावर एक लेख आहे. गुळमुळीत भाषेतलं नेहमीचंच गौडबंगाल कथन. बाकी, संघवाले 'संघ समजणार नाही' 'संघ समजणार नाही' हे पालुपद अजून किती वर्षांनी थांबवणार आहेत ? कंटाळा कसा काय येत नाही?

>> मृद्गंधा <<

मला तर हे बेहद्द आवडली. तिने एक्चुअली ही SCI-FI म्हणून लिह्यायला पाहिजे. कारण ती खरेतर खूप ठिकाणी श्रोडींगाराच्या मांजराच्या बॉक्सला खोलीचे रूपक धरून लिहिली आहे असे मला वाटले.
poor things (२०२३) या अतिशय लेयर्ड आणि वियर्ड चित्रपटाची आठवण आली.

एकूण मी पहिल्यांदाच हे नाव ऐकले आणि वाचले. त्यामुळे मला तर ती अधिकच आवडली. नाहीतर नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच.

सुहास पळशीकरांना सिरियसली घेण्याचे केव्हाच बंद केले आहे. हे जरा सेलिब्रेटेड अकॅडेमिक पत्रकार आहेत, बाकी एनालिसिस, इनसाइट काही वेगळं असं नाहीच. एखादी गोष्ट संयत अकादमिक भाषेत सांगितली म्हणून ती इनसाइटफूल होत नाही.
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ : यांची खेळघर नावाची एक सुमार कादंबरी वाचली होती त्यानंतर काही विशेष कधी आवर्जून वाचावे असे वाटले नाही.

श्याम मनोहर मला तर जांभया येतात. प्रत्येक (लहान) वाक्यातून त्यांना जे अट्टाहासाने दाखवायचे असते ते आता कंटाळवाणं वाटतं. हो हो करावेसे वाटते. एकदा प्रशान्त बागडांनी ते कसे बोगस लिहितात हे नीट उलगडून सांगितले आहे.

मुक्त संवाद अंक देखणा आहे. पाने उलटणे, उलटतानाचा आवाज वगैरे लहान लहान गोष्टी छान वाटतात. खाली स्लाईड बारने स्क्रोलही करता येत आहे.
अनुराधा सोवनींचा लेख वाचला. बाकी अंक ही वाचतो.

Pages