दिवाळी अंक २०२५

Submitted by ऋतुराज. on 5 October, 2025 - 23:59

नमस्कार मायबोलीकर,
दसरा झाला आणि दिवाळी आता अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. बाजारात दिवाळी अंक यायला सुरुवात झाली आहे.
तर हा धागा यंदाच्या दिवाळी अंकासाठी. कोणकोणते दिवाळी अंक घेतले? त्यात काय काय वाचले? यावर चर्चा करायला हा धागा वापरू.
इथल्या मायबोलीकरांचे लेख, कविता, कथा कोणत्या दिवाळी अंकात छापून आले असल्यास त्याची माहिती इथे नक्की देऊया.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या माझ्या प्रतिसादात मला कौतुकमिश्रित काही प्रश्न पडले.. कदाचित गैरसमज झाला असावा .. मला जे वाटलं होतं बहुतेक ती नावं नसावीत .. असो.

महाराष्ट्र टाइम्सचा दिवाळी अंक वाचनीय वाटला. 'शहरांचे पाऊल ' अडते' कुठे? ' या सदराखाली नागपूर, नाशिक, छ. संभाजीनगर , कोल्हापूर, सोलापूर, मुंबई ह्या शहरांतील विकास, समस्या ह्यांचा आढावा घेतलायं.

जीए : अखेरच्या काळातले, बलुचिस्तान : गोष्ट न संपणाऱ्या संघर्षाची हे लेख वाचायचे बाकी आहेत.

'भाषाभगिनींच्या कथाविश्वात ' सदराखाली कन्नड, हिंदी, गुजराती आणि बंगाली ह्या चार वेगवेगळ्या भाषेतल्या लेखकांच्या मूळ कथा मराठीत अनुवादित आहेत. ' देव आणि अपघात' हि मूळ कन्नड भाषेतली बानू मुश्ताक ह्यांची कथा वाचली. बानू मुश्ताक या ' बुकर' विजेच्या कन्नड कथालेखिका आहेत. त्यांची लेखनशैली अप्रतिम..! अंकातल्या या कथेतलं वर्णन अंगावर आलं. बाकीच्या कथा वाचतेय..!

आवडला महाराष्ट्र टाइम्सचा दिवाळी अंक..!

योगी९०० , कथा वाचली. जाम आवडली. मस्त आहे. भाषा, कथेचा वेग, संवाद छान आहेत. शेवटचा ट्विस्ट आवडला.
मिपावर माझे अकाउंट नाही म्हणून येथे प्रतिसाद देत आहे. तुमच्या इतर कथा असतील तर वाचायला आवडतील.

मी परवाच्या शनिवारी वाचनालयातून ( मुं म ग्रं सं) लोकमत दीपो त्सव घेतला. जे अंक शिल्लक होते, त्यातला हाच एक बरा वाटला. दिवाळी आधीच्या शनिवारी अंक दिले होते तेव्हा मी गेलो नाही. आणि दिवाळीत वाचनालयाला अर्थात सुट्टी होती.
सभासद संख्या रोडावत चालल्याने यंदा त्यांनी फक्त ५५ अंक घेतलेत. काही अंकांच्या एकापेक्षा जास्त प्रती घेतल्यात. माहेर- मेनका १०-१०, मौज - सुवासिनी ८, नवल - मानिनी - धनंजय - आवाज- चंद्रकांत - अक्षर- मानिनी ५ , जत्रा - ऋतुरंग - महाराष्ट्र टाइम्स - लोकसत्ता - वसुधा- गृहलक्ष्मी ४. दीपावली घेतलेला नाही. तिथे असेल असं समजून मी मॅजेस्टिक मध्ये तो पाहिला नाही.
मग बाजूच्या मॅजेस्टिक प्रदर्शनातून भास ११.२४ आणि १०.२५ महाअनुभव. अक्षर, शब्दालय हे घेतले. माझ्या मावसबहिणीच्या नातीला द्यायला म्हणून पासवर्स, वयम आणि कुल्फी घेतले.
वयमचं मुखपृष्ठ पाहताना अमांची आठवण आली. त्या अंकाबद्दल मुखपृष्ठापासून लिहायला सुरुवात करायच्या. मग आधी गेल्या वर्षीचा दिवाळी अंकांचा धागा शोधून त्यांचे प्रतिसाद नजरेखालून घातले.
तर आर्थिक गणित जुळत नसल्याने वयम् चा हा शेवटचा छापील अंक असेल असं प्रकाशकीयात म्हटलं आहे.- या अंकाची किंमत २९० रुपये आहे. पृष्ठे ११४. छान ग्लॉसी रंगीत कागदांवर छापला आहे (हे चांगलं आहे). संपादिका शुभदा चौकर. संपादकीयात विंदांच्या पणत्या या कवितेचा उल्लेख आहे. ती शोधली तर हे मिळालं.
अंकातला मजकूर इंटरेस्टिंग वाटतो आहे. गप्पाटप्पांमध्ये अमुकतमुकचा ओंकार जाधव आणि कार्तिक आर्यन यांंच्याशी मारलेल्या गप्पा आहेत.
द्यायच्या आधी वाचता आला, तर इथे लिहेन.

मुक्त शब्द मॅजेस्टिककडे आला नव्हता. मुंम तर घेतच नाहीत.

माबो वाचक
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अजून डोक्यात कथा लिहायच्या कल्पना आहेत. जसा वेळ मिळेल तसे लिहीत राहीन.

लोकमत दीपोत्सवचा अंक वेगळा वाटला.
प्रसिद्ध व्यक्तींकडून प्रश्न मागवून त्याची उत्तरे चॅटजीपीटी / ग्रोक कडून मिळवून माणसांकडून संपादित करून छापली आहेत.
बदलती मानवी मूल्ये आणि नव्या सामाजिक रचना , कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी कल्याणाशी संबंध , हवामान बदल आणि शेती ; २५ वर्षांनंतरच्या भारतात व्यक्तिस्वातंत्र्य - लोकशाही , समता , बंधुता, मौखिक परंपरा संपतील का? प्रज ननाला नकार देणार्‍या मानवी प्रवृत्तीचा मानवजातीच्या भविष्यावर परिणाम आणि त्यामागची कारणे, माणसात व समूहात आलेले दुभंगलेपण. याशिवाय काही प्रश्न ए आयचा मानवी जीवनावर परिणाम याबद्दल आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला प्रश्न वंचितांच्या समूहाबद्दल असला तरी वाचताना रोहित आर्याच समोर आला. मग इतरही अनेक आले.
सर्व तर्‍हेच्या संधी आणि साधनांपासून वंचित राहिलेले समूह जेव्हा विद्रोह करतात तेव्हा त्यांना शिक्षा करून चिरडून टाकले जाते आणि हेच समूह गप्प बसून सोसणे पत्करतात तेव्हा मात्र त्यांच्याबद्दल व्यवस्थेला सहानुभूतीचा कृतक पाझर फुटलेला दिसतो, असे का?

अंकातले लेख उलट सुलट नावाच्या विभागात दिले आहेत.
शर्मिला फडके - कन्नौजची अत्तरे आणि नीरजा पटवर्धन - सॅन्टा फे या मायबोलीकरांचे लेख आहेत.
हा विभागही इंटरेस्टिंग आहे.

सुट्टीमध्ये एकतरी दिवाळी अंक वाचायचा असं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे साप्ताहिक सकाळचा अंक वाचून झाला.

गुरू ठाकूर आणि गौतम पंगू ह्यांच्या कथा आवडल्या. गुरू ठाकूरांच्या कथेचा विषय वेगळा आणि छान आहे.
मलो फ्लॉवर्स ही योगिनी वेंगुर्लेकरांची कथा रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवरची आहे. ती ही आवडली फक्त जरा लांबल्यासारखी वाटली. बाकी दोन कथा ठिक ठाक.

रत्ना पाठक ह्यांच्या मुलाखतीत अपेक्षेप्रमाणे रोखठोक मतं आहेत पण मुलाखत फात त्रोटक आणि एकूणच नीट मांडणी नसलेली वाटली. गुजराथी लेखक ध्रुव भट ह्यांचं मी एकच अनुवादित पुस्तक वाचलं आहे आणि ते ही मला फार आवडलं नव्हतं. त्यामुळे त्यांची मुलाखत वरवर चाळली.

रोहन नामजोशी ह्या मिलेनियल लेखकाने लिहिलेला जेन-झी बद्दलचा लेख खूप एकांगी वाटला. जेन-झीचे दोष तेव्हडे लिहिले आहेत. जेन-झीच्या एकूण हुशारीबद्दल आणि उत्साहाबद्दल फारसं लिहिलेलं नाही. डॉ. आशुतोष जावडेकरांचा मीना प्रभू ह्यांच्या बद्दलचा लेख "गेलेल्या माणसाबद्दल चांगलच बोलावं" हे तारतम्य बाळगून लिहिलेला वाटला. प्रेरणास्त्रोत हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्लचा लेख हा नेहमीप्रमाणे प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या वेगळ्या पैलूविषयी माहिती देतो. "सांग दर्पणा" हा नार्सिसिझम बद्दलचा लेख माहितीपूर्ण आहे. तो वाचून आंतरजालावरच्या एक दोन लेखक लेखिकांची प्रकर्षाने आठवण झाली!
गेल्यावर्षीच्या दिल्ली साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दलचा लेखही चांगला आहे. सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या अत्यंत विचित्र राजकारणाच्या पार्श्वभुमीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या समंजस वर्तणुकीबद्दल वाचून चांगलं वाटलं. अंकात बर्‍याच कविताही आहेत पण त्या वाचल्या नाहीत. साहित्याच्या मधे पानं-दोन पानं लेखाच्या स्वरूपातल्या जाहिराती आहेत आणि त्या फार रसभंग करतात.

पण एकंदरीत अंक आवडला. आता उरलेलेही वाचेन.

लोकप्रभा दिवाळी अंक वाचला.
निकोबार बांधता येईल? विजया जांगळे - ग्रेट निकोबार प्रोजेक्टमुळे तिथे काय उत्पात होईल याचा आडाखा. वाचल्यावर वाटलं , निकोबारच कशाला अख्ख्या भारतभर - जगभर होऊन जाऊ दे काय ते.
गुकेशची लढाई - सिद्धार्थ खांडेकर. मॅग्नस कार्लसनचं गुकेशबद्दलचं वक्तव्य, मग त्यावरून गॅरी कॉस्पो रोव्हचं विश्वनाथन आंदबद्दलचं वक्तव्य , त्या दोघांनी या दोघांना कमी लेखणं, भारत बुद्धिबळातली नवी महासत्ता होते आहे हे पाश्चिमात्यांना, विशेषतः अमेरिकेला न रुचणं, असलं सगळं आहे. माझा भाचा बुद्धिबळपटू आहे. सगळ्या घडामोडींचा माग ठेवत असतो. त्याला विचारलं तर त्याने हे अर्धसत्य आहे. कार्लसन नंतर गुकेशबद्दल चांगलंही बोलला असं सांगितलं.

नक्षलवादी चळवळ का माघारली - देवेंद्र गावंडे . लोक सत्तेत याबद्दल यांची वार्तापत्रे आणि मतयुक्त लेख येत असतात.
७/११ बाँबस्फोटा मागील सत्य काय? निशांत सरवणकर - हे लोक सत्ताची क्राइम बीट सांभाळतात. लेख वाचून काहीही नवीन मिळत नाही.
निनावी रंग - उज्ज्वला दळवी हा लेख फार आवडला. रंगाच्या छटांना वेगवेगळ्या भाषांत नावं असणं वा नसणं, त्यावरून डोळ्यांना अधिका धिक रंग समजणे - आपल्या डोळ्यांना रंग कसे दिसतात - त्यावरून रंगदृष्टिदुर्बलता - त्याचेही फायदे - रंगांचा विशेषण म्हणून वापर - जसं आपण भाषेला गोड , कठोर, तरल अशी चव, स्पर्श या संवेदनांवरून विशेषणं लावतो, तसं उदबत्तीचा वास सोनेरी, वगैरे.
स्मृतींचे रंग - मायबोलीवर वास आणि चवींशी जोडलेल्या आठवणींची चर्चा झाली आहे. तसंच.
रंगांचा वांशिक अनुभव उदा: लाल रंग = रक्तपात. वास्तू आणि रंगयोजना. सांस्कृतिक रंगभेद. प्राण्यांना रंग दिसतात का? रंग आणि अभ्यास- अभ्यास करताना काही जण वेगळ्या रंगाने महत्त्वाचा मजकूर हायलाइट करतात.

विगथनायिका पी के रोझी हाही लेख आवडला.

वि देशी मेट्रोंची विविधरंगी सफर - आशुतोष उकिडवे. मुंबई पुणेकर सध्या मेट्रोची नवलाई पाहून हरखून जात आहेत. तसा हा लेख वाचून मी हरखून गेलो. यात तिथल्या माणसांचे , अधिकार्‍यांचेही अनुभव आले आहेत. दुबईतली मेट्रो विनाचालक असते. कॅनडात एका मेट्रो स्टेशनवर ऊब मिलवायची - ( रेडियेटरची) म्हणजे आपल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पंखे असतात, तशी सोय आहे. फ्रेंच मेट्रो स्टेशन्सची सजावट आणि लंडन मेट्रोचा करडा उदासपणा. न्युयॉर्कची पाथ मेट्रो. फ्रेंच मेट्रो स्टेशनवरचं लुटालुटीचं भय. बाबागाडीचा तुटलेला सेफ्टी बेल्ट लप वणार्‍या माणसाला अधिकार्‍याने ताब्यात घेणं. गाडीत लोकांना आपली चित्रे दाखवून पैसे मागता ना ,मी भीक मागत नाही, असं ठणकवणारा चित्रकार. पूर्व आशियातल्या मेट्रोमधला जिवंत रसरशीतपणा. आणखी कुठेतरी दर मिनिटाला मेट्रो.
व्हर्च्युअल ह्युमन्स - यावर मायबोलीवर एक कथा आली आहे.
पोलिसांचा तिसरा डोळा - मुंबई पोलिसांच्या खबर्‍यांबद्दलचा लेख वाचून फार काही मिळालं नाही. पहिल्याच प्रसंगात अमृतसर एक्स्प्रेस ने मुंबई कायम ची सोडून जाणार्‍या खबर्‍याला पोलिस अधिकारी मुंबई सेंट्रलवरून बोरिवलीला कारने वीस मिनिटांत आणतो आणि त्याने दिलेल्या खबरीमुळे अ तिरेकी पकडले जाऊन बॉम्बस्फोट टळतात यातलं वीस मिनिटे पचलं नाही.
दखनी भाषा - हिंदी उर्दूची आई - आजी (?)

या अंकात कथा नाहीत म्हणून बरं वाटत होतं. तर शेवटी आहेतच. पहिल्या कथेत जी एं पासून प्रेरणा घेत लेखिकेने कथेतल्या पात्रांना नियतीच्या चरकात पिळलं आहे. एका दिवसात त्यांचं जेवढं म्हणून वाईट होईल तेवढं करते. त्यात नावीन्य शून्य.
एक झाड फूलपाखरांसाठी हा लेख आवडला. झाडं लावणार्‍यांनी अवश्य वाचावा.

मुंमग्रंसं अजूनही दिवाळी अंकांचं वाचन सुरू आहे. मागच्या वेळी गेलो तेव्हा समोर असलेल्या अंकांतून निवडायला अडमतडम तडतड बाजा करावं अशीच स्थिती होती. नवल घेतला. घेतलाच आहे, तर मन लावून वाचावा म्हटलं.
पहिलीच कथा - आगंतुक - रमा गोळवलकर. अनुक्रमणिकेत ही चातुर्यकथा या गटात आहे . रहस्यकथा, भयकथा, विज्ञानकथा, गूढकथा, असे इतर गट आहेत.
कथेचा नायक त्रिविक्रम ठाकूर हा पंतप्रधानांच्या सुरक्षा चमूचा वरिष्ठ अधिकारी. त्याच्या वर्णनात बहिरी ससाणा, डॉबरमन कुत्रा, रानडुक्कर, चित्ता असे प्राणी आले आहेत. पूर्वेकडे पहा या धोरणात झारखंड मध्ये काहीतरी होतेय म्हटल्यावर ही कथा अगदीच इंटरेस्टिंग असेल असं मी ठरवून टाकलं. झारखंडमधल्या घनदाट जंगलात आंतरराष्ट्रीय परिषद. तिथे पंतप्रधानांसाठी अतिथीगृह . कथेला साजेसं दीड पान चित्र आणि अर्धा पान मजकूर झाल्यावर पुढील मजकूर वाचायला १०५ पानांची उडी घ्यावी लागली.
तिथे परिच्छेदात जागतिक पातळीवर वाढणारं भारताचं प्राबल्य आणि सामान्य घरातून आलेला नेता हे सगळं ठीक आहे. पण पुढल्या वर्षी झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका म्हणून तिथे पूर्ण कायापालट , विकास करून टाकायचा ; असं कुठे होतं होय?
तर आपला हा सुरक्षा अधिकारी त्रिविक्रम पंतप्रधानांच्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी निश्चित बंगलीचा लँडस्केपिंग आणि गार्डन डिझायनर सुद्धा आहे. तर हिरवळीच्या लाद्यांत त्याला जांभळ्या छटेच्या काही लाद्या दिसतात.
आता इथे झारखंड पोलिसांच्या श्रीप्रभा उपाध्याय या एसीपीची एंट्री होते. तिच्या वर्णनात फक्त विशेषणं आहेत. प्राण्यांचे उल्लेख नाहीत. दोघे एकमेकांमधलं काय काय टिपतात त्याचं वर्णन. आणि पुढची संपूर्ण कथाभर या दोघांतलं subtle flirting.
मग त्रिविक्रमचा भूतकाळ आय आयटी पवई . ते इंजिनीयरिंग अर्ध सोडून हिमालयाच्या कुशीतल्या आश्रमात साधना आणि नाथ पंथाची दीक्षा. मग इंजिनीयरिंग पूर्ण करून थेट देशाच्या सुरक्षेत . आय पी एस केलं का पॅरॅलल एंट्री ते लिहिलं नाही.
मग छिन्न मस्तिका देवीचा जयंत्योत्सव. त्यानिमित्ताने बळी दिलेल्या कोंबडे, बकरे, रेडे यांच्या रक्ताचे पाट वाहून नदीचं पात्र लालेलाल होतं असं कसं बरं लिहिलं असेल लेखिकेने?
तर या श्रीप्रभा त्या जांभळ्या गवताच्या शोधासाठी त्रिविक्रमला स्थानिक मदत म्हणून आल्या आहेत. झारखंडच्या प्रयोगशाळेने लगेच त्या गवताची चाचणी करून ते कृत्रिम झुडूप असल्याचं सांगितलंय. या झुडुपाचं बारसं त्रिविक्रम करतो आणि त्याला आगंतुक नाव ठेवतो.. ज्या रोपवाटिकेतून हे सगळं आलय त्याच्या मालकाचं नाव सरताज भागलपुरी. अर्थात पुढे सरताजची चौकशी. श्रीप्रभाने त्याच्या थोबाडीत मारणं. मग दोन चीनी लोकांनी त्याच्या रोपवाटिकेचा काही भाग भाड्याने घेतल्याची त्याची कबुली. त्या चीनी इसमाचा फोटो पाहून त्रिविक्रमला तो चीनचा सर्वाधिक घातक गुप्तहेर झियागो असल्याचं त्रिविक्रम लगेच ओळखतो. कृत्रिम वनस्पती तयार करणार्‍या चीनी गुप्तहेराला हे काम करायला कोणी भारतीय हस्तक मिळाला नाही की त्याला आत्मनिर्भर राहायचं असेल ?
तर आपला त्रिविक्रम थेट गृहमंत्र्यांशी संदेशांचं आदानप्रदान करून इस्रो आणि दोन आय आयटीतून तज्ज्ञांना रांचीच्या प्रयोगशाळेत बोलवतो. या सगळ्या मंडळींच्या रस्तोगी, पटनाईक, सभानायकन, सदासिवन, गोस्वामी , मिश्रा आणि पासवान या नावांतून राष्ट्रीय एकात्मता आणि समरसताही साधली आहे. रोपवाटिकावाल्यालाही सरताज हे साजेसं नाव आहे.

तर आपले नायक नायिका रोपवाटिकेत जातात आणि तिथे ती जांभळी वस्तू त्रिविक्रमवर हल्ला करू पाहते. तिथे कुजबूज , ती ऐकून त्याचं भाषांतर क्षणात आपणहून करणारं स्मार्टवॉच असा हायफाय मामला आहे. तर हे आगंतुक सुद्धा हायफाय आहे. सेल्फ ग्रोइंग रोबोटिक गवत - मांसाहारी वनस्पती - नॅनो टेक्नॉलॉजी - आर्गॉन वायूवर पोसणं - क्लोनिंग. जैवरासायनिक पदार्थ , विषारी द्रव अशा गुणांनी युक्त अशा त्या वस्तूचं वर्णन करताना लेखिका कृत्रिम प्रज्ञा हा शब्द लिहायला विसरली.

आता थोडं मागे जाऊ. त्रिविक्रम आणि श्रीप्रभा यांना बंगलीच्या परिसरात काही सुगंध जाणवत असतो. त्या सुगंधाचा शोध घेत घेत ते एका मातीच्या टेकाडा वर असलेल्या अवाढव्य वारुळाशी पोचतात. मग तो कुदळ आणि ती फावड घेऊन ते वारुळ खणतात. तिथे असतं एक चिलखत. ते त्रिविक्रमला अगदी त्याची त्वचाच असल्यासारखं सहज बसतं. वारुळातून नागही येतो. श्रीप्रभा त्याला पकडून चक्की पाणी पाजते आणि दूर सोडून येते. तर नागोबाने बाहेर येता येता दोन कड्या सोडलेल्या असतात.
आता हे काय असेल असा प्रश्न या दोघांसारखाच आपल्यालाही पडतो. तर तो सोडवायला त्रिविक्रमचे आध्यात्मिक गुरू तिथे प्रकट होतात. तर ते चिलखत आणि कड्या म्हणजे कर्णाची कवचकुंडलं आहेत. गुप्तहेर, चातुर्य, विज्ञान तंत्रज्ञान यांच्या जोडीला मायथॉलॉजीजी आली. मग थोडं rewriting of Mahabharat. तर हे कवच फक्त अंतराळात मिळणार्‍या शुद्ध कार्बनचं बनलं आहे. तर ते आगंतुक या कवचाला घाबरतं आणि त्याच्या स्पर्शाने जळूनही जातं. इतकंच नाही तर घाबरून शरण येतं आणि चीनी गुप्तहेर झियागोची माहितीही देतं. हे कसं ते लिहिलेलं नाही. पुढे लगेच झियागोला अटक. आगंतुकचं चीनी नाव स्मग. चीनी चित्रकथांतून रंगवलं जाणारं ड्रॅगनचं काल्पनिक पात्र. संपली कथा.
ते स्मग शोधून जिथे आहे तिथून नष्ट केल्याशिवाय अशी कशी संपली कथा ? अंकातली पानं संपली की काय असा प्रश्न मला पडला होता.
पण हे सगळं लिहिताना कथा पुन्हा वाचली तेव्हा कळलं की त्या कवचामुळे चीनचं हे अस्त्र चक्क आपल्या ताब्यात येतं. पुढच्या दिवाळी अंकात याचा सिक्वेल लिहायला भरपूर वाव आहे की नाही?

नवलमधल्या इतर काही कथा वाचल्या. त्या आवडल्या. आय थिंक सो आय अ‍ॅम - अविनाश भागवत , मायबोलीकर आशिष महाबळ यांची कथा आणि मायबोलीकर पूनम छत्रे यांचा विचित्र नेमानेम हा लेख हॉलीवुड अभिनेते जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल विचित्र नेमानेम हा लेख हे एकटे राहणारे वृद्ध, त्यांना केअरगिव्हिंग याबद्दल आहे. अवि नाश भागवतांच्या कथेतही वृद्ध जोडप्याचा मृत्यू आहे. त्यांच्या आणि आशिष महाबळांच्या कथेत रोबोट आहेत, हेही आणखी एक साम्य.

हॉलीवुड अभिनेते जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल विचित्र नेमानेम हा लेख हे एकटे राहणारे वृद्ध,
>>> मी ह्यावर दुसरं काही वाचून ऐकून आहे. फार वाईट वाटले आणि समहाऊ समजून घेता आले.

Pages