(डिस्क्लेमर : हिमालय, कैलास हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. सर्वार्थाने उत्तुंग! तिथे अनेक कारणांनी लोक जातात आणि त्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मला हे या जन्मात तरी नक्की झेपणार नाही हे मी पूर्ण ओळखून आहे. पण तयारी करताना तो मानस-प्रवास घडत गेला आणि लिहावंसं वाटलं. कुठे काय घेतलं, काय तयारी केली, मग आपलं माणूस सुखरूप परत येईपर्यंत काय अवस्था झाली या सगळ्याचं हे वर्णन आहे. काही ठिकाणी थोडंफार गमतीचं, कधी तणावाचं, कधी हतबलही वाटणारंही आहे. पण कुणाच्याही श्रद्धा/ धार्मिक भावना यात दुखवायच्या नाहीयेत, आणि कुणाच्याही उत्साहावर विरजण घालयचं नाहिये. भविष्यात कधीही हा प्रवास करू इच्छिणार्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन सुरूवात करते. हर हर महादेव! )
मायबोलीवर अनया, पराग, रैना, साधनाताई अशा अनेकांनी हिमालय/ कैलास-मानस/ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अशी सुरेख प्रवासवर्णनं लिहिली आहेत. अक्षरश: चित्रदर्शी म्हणावी अशी एकेक सुंदर लेखमालिका वाचून "जावं का आपणही" असा मोह झाला होता! पण प्रत्यक्षात,
मला स्वतःला भटकंतीची फार हौस नाही. म्हणजे असंच हेलिकॉप्टरने उचलून वगैरे गंतव्य स्थळी नेऊन अलगद सोडलं तर चालेल, पण आधीपासून तयारी, सामानाची बांधाबांध, परदेशी किंवा तत्सम प्रवासासाठी कागदपत्रं जमवणं याचा मला बर्यापैकी कंटाळा आहे. आणि ते बरंचसं मूडवरही असतं म्हणा! तर ते असो. पण आमच्या भाओजींना, म्हणजे नणंदेच्या मिस्टरांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. आणि ते मस्त प्रवास प्लान वगैरे करून किंवा केसरीच्या मदतीने करतातही. त्यांची फार इच्छा होती, कि एकदा अमरनाथ आणि एकदा कैलास-मानस हे दोन्ही घडावं! आणि ईश्वरी कृपेने ते घडलंही! सोबतीला त्यांनी माझ्या नवर्याला घ्यायचं पक्कं केलं आणि मग संपूर्ण शहरी-आणि त्यातही आयटी नोकरदार- असलेल्या माझ्या नवर्याची तशी तयारी करायला सुरूवात झाली.
२०२३ मधे हे दोघं अमरनाथला जाऊन आले. पहलगाम च्या बाजूने चढाई आणि बालतालकडून उतरण असा काहीतरी प्लान झाला होता. नणंद नाशकात असते. त्यामुळे नवरा इथून नाशकात, मग तिथून दिल्ली, मग पुढचा प्रवास होता. पुण्यातून निघून तो अर्ध्या वाटेवर पोहोचला आणि लँडस्लाईडची बातमी सकाळच्या बातम्यांत झळकली! पण आता तयारी झाली आहे, आणि असं काही ना काही घडणार याची अगोदरच कल्पना दिलेली असते त्यामुळे "पुढचं पुढं बघू" असं ठरवून दोघांचा प्रवास सुरू झाला. आता या गोष्टीला २ वर्षं झाली, त्यामुळे सगळंच काही आठवत नाहिये. पण ३ दिवस थांबावं लागल्यामुळे "आलोच आहोत आणि तिथे जायला काही अडचण नाही तर वैष्णोदेवी करू" म्हणून प्लानमधे नसलेली यात्राही घडली होती! पण एकूणच तो प्रवास त्रासदायक झाला होता. म्हणजे अमरनाथाचं दर्शन झाल्यावर सगळाच शीण गेला हेही खरंच, "याचिसाठी केला होता अट्टाहास" अशी भावना होती हेही नक्की, पण आम्ही घरी बसून जी काही काळजी केली त्याला तोड नाही! कारण मुक्काम लांबल्यामुळे ऐन वेळी जिथे रहावं लागलं ते घर शब्दशः शत्रूशी संबंधित स्थानिकांचं होतं (हे आम्हाला नंतर पुण्यात येऊन सांगितलं, पण वर्णनावरून जोखीम समजली होती), वैष्णोदेवी करताना पाय दुखावल्यामुळे नवर्याच्या पायाचा एक्सरे काढावा लागला, शिवाय न्यूज चॅनेलवरचे किंचाळे लोक देत असलेल्या बातम्या अशा बर्याच कारणांमुळे आमची डोकी काळजीने बिघडली होती. शेड्यूल बदलल्यामुळे चालण्याचे दिवस कमी झाले आणि तट्टू करावा लागला. भयाण दर्या, अपरिचित आणि सतत बदलणारं हवामान, दुर्दैवाने नजरेसमोर घडलेला अपघात आणि डोळ्यासमोर एका यात्रिकाचा मृत्यू हे सगळं आजूबाजूला असताना मनोधैर्य टिकवणं कठीण खरंच ... पण एकदाची ती यात्रा सुफळ संपूर्ण झाली. ज्या दिवशी हे दोघं अमरनाथाचं दर्शन घ्यायला पोहोचले त्या दिवशी मीही शांत बसून शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं होतं. माझा नमस्कार इथूनच!
पुढचं वर्षं नीट गेलं आणि २०२४ मधे कधीतरी अचानक "कैलास परिक्रमा करूया का?" असा प्रश्न आला. नुसतीच "आहे आपली एक इच्छा" असणं वेगळं आणि ते पुन्हा मनात येऊन त्याचा पाठपुरावा करणं वेगळं. अमरनाथ यात्रेवेळी आम्हाला काहीही पूर्वानुभव नव्हता. डिकॅथलॉनमधे जाऊन खरेदी करून येणे, खव्याच्या पोळ्या-लाडूवगैरे खाऊचे पदार्थ देणे इतपतच काहीतरी केलेलं आठवतंय. बाकी व्हिसा वगैरे भानगडी नव्हत्याच. पण या वेळी मीपण जरा जास्त मनावर घेतलं. चीनचा व्हिसा वगैरे लागणार होता. मुख्य म्हणजे पूर्ण प्रवास परमुलुखात असणार होता. सरकारी व्यवस्था घ्यावी तर महिन्याभराची सुट्टी य दोघांनाही मिळणार नव्हती त्यामुळे मॅक्स हॉलिडेजकडून बुकिंग साठीची जमवाजमव सुरू झाली. लेटेस्ट फोटो पाहिजेत, २ वर्षांत वजन वाढलंय त्यामुळे पुन्हा कापडेखरेदी करावी लागेल...तर्हाच वाढल्या!
"हे काय? आज चक्क ब्लेझर? माझ्याबरोबर येताना? लक्ष्मी रोडवर निघालो असूनही?" हे प्रश्न मी गिळले. अनुभव हो अनुभव! आम्हां उभयतांच्या वाटणीचं मी एकटीच बोलते आणि त्यामुळे विचार करून गोष्टी ओळखायला वेळच मिळत नाही असं त्रांगडं होतं असं नवर्याचं म्हणणं. या वेळी धोरणीपणाने मी गप राहिले त्यामुळे "मी उगीचच का घालेन ब्लेझर? ऐकलं नाहीस का मगाशी ... फोटो लागणार आहेत... लक्ष कुठे होतं!" वगैरे संवाद टळला. एरवी माझ्याबरोबर येताना, त्यातही लक्ष्मी रोडसारख्या ठिकाणी, शक्य तेवढा कर्तव्यपूर्ती चेहरा करून "इकडची स्वारी" येते. वधस्तंभाकडे निघालेला वसंतसेनाघातकी चारुदत्त वगैरे..... असोच. पण एकदम असा संवाद टळत नाही ना! "उमाचे फोटो कुठे काढले होतेस? जरा बरे आले होते." याचं "बरे" म्हणजे "मस्त" हे आता मला समजलंय. त्यामुळे मी स्टुडिओचं नाव सांगितलं. खरं हे उगीचच होतं. कारण तिचे बिचारीचे युनिफॉर्म घालून, २ वेण्या कंपल्सरी असे साधे आयकार्ड फोटो होते! पण तेवढ्यात संधी साधून मी "तसंच जाऊ मग गावात खरेदीला. ऑन द वे आहे स्टुडिओ" म्हटलं. पण पहिला प्रस्ताव पटत नसतोच.
"म्हणजे मला कपडे बदलायला मिळणार नाहीत का शॉपिंगच्या आधी? ब्लेझर मिरवत येऊ? की तो अडकवायला कार आणू? आणि पार्किंगचं काय मग?"
"ओह तेही आहेच नै का! मग असं करू, महेशचौकात जाऊ, तिथे फोटो काढू. घरी येऊन तू साधे कपडे घाल. मग बाजारात जाऊ".
हे पटलं. आणि त्या घोळात शॉपिंग कॅन्सल झालं. पण फोटोंचं काम निपटलं! हा पहिला टास्क डिसेंबरात पार पडला. मग रोजच्या व्यायामाची भर पडली. तोवर मिस्टर सौरभ बोथ्रांनी आमच्या कुटुंबावर योगमोहिनी घातलीच होती. थोडे दिवस मीही केलं, मग माझं बंद झालं. पण नवरा, आई-बाबा (साबा-साबु) नियमित करत होते. वीकेंडला भरपूर चालणं सुरू झालं होतं. दोघा यात्रींची हळूह्ळू तयारी सुरू झाली. आम्ही अजून मेन फ्रेममधे फारसे नव्हतो.
.... क्रमश: ....
ही ललित लेखनाची माळ फक्त तयारी आणि घरच्यांची धावपळ आणि इतर गमती याभोवतीच गुंफली जाईल बहुतेक, त्यामुळे फोटो नाहीत. मेमरी कार्ड भरून फोटो आहेत, ते शेवटच्या लेखनात टाकायचा प्रयत्न करते, कारण बरंच फॉर्मॅटिंग करायचंय. आधी मुळात ते लॅपटॉपवर घ्यायचे आहेत! सांभाळून घ्या.
भाग २: https://www.maayboli.com/node/86965
प्रज्ञा, छान लय आहे लिखाणाला.
प्रज्ञा, छान लय आहे लिखाणाला. पुढचे भाग लवकर येऊ देत.
अरे व्वा! छान. पुढचे वाचेन.
अरे व्वा! छान. पुढचे वाचेन.
मला सुरुवातीला मानस परिक्रमा वाचून वाटलं की मानसपूजा असते तशी मनातल्या मनात कुठली नर्मदा परिक्रमा वगैरे आहे की काय.
छान सुरुवात!
छान सुरुवात!
छान लिहिताय प्रज्ञा.
छान लिहिताय प्रज्ञा.
मस्तच. वाचतोय
छान.
छान.
मानसपूजा असते तशी मनातल्या मनात >> हो. 'मानस' वर श्लेष आहे ना?
हो अमित.
हो अमित.
छान लिहिते आहेस प्रज्ञा.
छान लिहिते आहेस प्रज्ञा.
मस्तच. वाचते आहे.
छान लिहीत आहेस
छान लिहीत आहेस
मस्त सुरूवात
मस्त सुरूवात
छान सुरवात.
छान सुरवात.
हां म्हणजे तसाच अर्थ आहे तर.
'मानस' वर श्लेष >> हां म्हणजे तसाच अर्थ आहे तर.
भारी झालिये सुरुवात
भारी झालिये सुरुवात