माझी न केलेली "मानस"परिक्रमा - आता खरी पूर्वतयारी (२)

Submitted by प्रज्ञा९ on 23 July, 2025 - 07:17

(डिस्क्लेमर : या भागात काही दुकानांची नावं मी लिहिली असली तरी तो फक्त तयारीचा भाग म्हणून सांगायच्या ओघात ती लिहिली आहेत. कोणत्याही दुकानाची जाहिरात नाही. माझा कोणत्याही दुकानाशी संबंध नाही.)
भाग १: https://www.maayboli.com/node/86961

फोटो काढले तो महिना होता डिसेंबर २०२४. जायचं असेल तर जुलै मधे हे तर ठरलं. मार्चपर्यंत (२०२५) विशेष काहीच चालू नव्हतं. उलट तुडूंब काम, लेकीची परीक्षा असंच चालू होतं. हो नाही करत मे महिन्याची सुट्टी लागली लेकीला आणि इकडे यांची कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली. मी जेमतेम ३-४ दिवस आईकडे जाऊन आले आणि माझाही कामाचा व्याप होताच! जूनमधे लेकीची शाळा सुरू झाली. एव्हाना व्हिसाची तयारी झाली होती. मॅक्स हॉलिडेज कामाला लागले होते. आषाढवारीच्या निमित्ताने आळंदी-पुणे पायी वारी करून नवर्‍याने मनातल्या मनात यात्रेचा श्रीगणेशा केला होता.
मग एक दिवस मला नवर्‍याचा फोन आला. "स्कॅन्ड फोटो मिळत नाहियेत. स्टुडिओत फोन कर". आणि मग २-३ तास खर्चून स्टुडिओच्या माणसाला हाताशी धरून विनंती करून ओरिजनल फोटो मिळाले एकदाचे!

आता शेवटचे २ वीकेंडस उरले होते आणि आम्ही खरेदीला निघालो. पहिली वारी अर्थात डिकॅथलॉन. त्या आधी कॅम्पात वाईल्डफ्राफ्ट मधे गेलो. तिथे खास ट्रेकर्स / अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स साठी लागणारं सगळं साहित्य असतं एवढंच मला माहिती होतं. मग तिथे गेलो आणि ट्रेकिंग बॅग्स, शूज असं बरंच काहीबाही बघून काहीही न घेता एसजीएस मॉलकडे मोर्चा वळवला. सांगितलं ना, पहिला प्रस्ताव पटत नाही. डिकॅथलॉनला गेलो आणि मग तिथे २-३ तास घालून थोडीफार खरेदी केली. त्यात बर्‍याच प्रकारचे एक्झरसाईझ बॉल्स बघून मी "टाचदुखीसाठी काही आहे का हो?" असा प्रश्न विचारून एक अ‍ॅक्यूप्रेशर बॉल पर्समधे पाडून घेतला. एव्हाना ४ वाजले होते, दुपारची भुकेची वेळ टळून चहाच्या वेळेकडे वाटचाल झाली होती. तसं तर मी फक्त कॉफी पिते, नवरा चहा-कॉफीपण पित नाही, पण अडल्या गरजेला किंवा पाहुण्यांबरोबर क्वचित घोटभर चहा/ कॉफी काहीही चालतं. तर...
"हां, डबे आणलेस ना? मस्त जागा बघून जेवूया."
"मी नाही आणले. मला वाटलं येऊ वेळेवर."
"कमाल आहे! इतका स्वयंपाक करून ११:३० नंतर निघालो, तर मला वाटलं तो घेशील जेवायचं बरोबर"
"नाही घेतलं. चल घरी"
"आंईं...... पाय दुखले गं माझे! भूकपण लागली. चला आता. किती वेळ खरेदी करता! मला सायकलपण नाही घेतली नवीन!"
आमची वरात घरी. ४ नंतर लंच + डिनर एकत्रच झालं. पण वेळ घालवून चालणार नव्हतं. आता लेकीला घरी अभ्यासाला बसवून (आणि तिची समजूत काढताना नाकी दम येऊनही) आम्ही पुन्हा डिकॅथ मधे (यू नो! डिकॅथ! हं!) आलो. आता मात्र उरक वाढवला. मगाशी सगळ्या वस्तूंच्या जागांचा अभ्यास केला होता तो कामी आला. जॅकेट, पोंचो अशी मोठी खरेदी केली. खरंतर नवरा कधीकाळी ४ वर्षं न्यूयॉर्कात होता आणि बर्फात घालायचे कपडे होते आमच्याकडे. पण आता कपड्याचंही वजन कमीच हवं होतं म्हणून पुन्हा सव्यापसव्य चालू होतं. इथे लवकर आवरलं आणि मग आम्ही लोकरीचा स्वेटर वगैरे घ्यायला बुधवारात प्रकाश डि. स्टोअरमधे गेलो.
"तुम्ही आता जिथे कुठे जात तिथून मला एखादा... काय तो तुमचा श्रफ का काय तो.. घेऊन या. सहज जमलं तरच आणा." -आई म्हणाल्या होत्या. त्यांना मॉर्निंग वॉकसाठी श्रग हवा होता. प्रकाशमधे थर्मल वेअरचा जोड, -३० मधे चालतील असे हातमोजे, पायमोजे, श्रग अशी खरेदी झाली. लेकीने समजुतीने अभ्यासाला बसायचं कबूल केलं म्हणून तिला छोट्या दुकानातून २ मस्त स्टोल्स घेतले. शिवाय डिकॅथमधे एक छान वुलन शर्ट-पायजमा मिळाला तोही घेऊन ठेवला होता. डिसेंबरातच आम्ही याच दुकानातून जेव्हा मला स्वटर्स घेतले तेव्हाच नवर्‍यालाही १ घ्यायला लावला होता बळंबळंच.
"बघ, तेव्हा घेतला होता म्हणून बरं की नै? आताचा तेवढा वेळ वाचला नाही का?"
"हो ना."
बायकोचं बरोबर आहे आणि आपण माघार घ्यायची वेळ आली की २ शब्दांत वाक्यच संपतं.

आता मोर्चा केबिन बॅगसाठी. तीही अर्थातच होती. पण भाओजींनी अजून काहीतरी इन्पुट्स दिले होते. त्यांना मॅक्स हॉलिडेज कडून काहीतरी गाईडलाईन्स मिळत होत्या. नवरा अर्थातच जास्त बैजवार वाचत नसावा (असं मला वाटत होतं. खखो तोच जाणे.) पण भाओजी नीट सगळं सांगत होते म्हणूनही आम्ही निश्चिंत होतो. मग पेशन्स संपले आणि आता पुरे असं वाटून आम्ही तिथूनही निघालो. एव्हाना १० वाजले होते. नाही म्हटलं तरी थोडी भूक लागलीच होती. घरी फोन करून लेकीला खाऊन घे म्हटलं.
"आपल्या जेवणाचं काय आहे?" मग मात्र मी सकाळपासूनचा धावपळीचा दिनक्रम सांगून "माउ आणि आई-बाबांना पुरेल इतकं आहे, बाकी काहीही नाहिये" म्हटलं. खरेदी बरीचशी निपटल्यामुळे तोही रिलॅक्स झाला होता. मग एक हॉटेल शोधून तिथे मस्त जेवलो. खूप दिवसांनी अनपेक्षितपणे डिनरडेट झाली!

मोठी खरेदी संपली होती. केबिन बॅगचा प्रश्न सोडवायचा होता याच कारण, बॅगची मापं सांगून "तश्शीच आणा हं" असा बहुधा आग्रह झाला असावा एजन्सीकडून. मधल्या काळात मी मायबोलीचं टुमणं वाजवतच होते. अनयाकडचे आंबे खाल्ल्यामुळे घरी ती सगळ्यांना (ऐकून तरी) माहिती होती. तिनेच कैलास- मानसपरिक्रमा करून लेखमालाही लिहिली आहे म्हटल्यावर जरा आधार वाटला. मग मीही इन्पुट्स द्यायला सुरूवात केली. मग! सोडते का काय! भले माझी मजल पर्वतीपण का नसेना! मी तिच्याशी बोलून नवर्‍याला तिचा नंबर दिला.
"कधीही फोन कर, मी जितकं जमेल तितकं सांगेन सगळं" म्हणून तिने मला आश्वस्त केलं. असंच बोलता बोलता एक दिवस नवर्‍याने "त्यांच्याकडून ती फिल्टरची बाटली आण" म्हणून ३-४ वेळा सांगितलं. मी म्हटलं अशीच कशी आणू? आधी तिला फोन करायला हवा, ती घरी कधी आहे ते विचारायला हवं... तिच्या बाबांना जरा बरं नव्हतं... एकदम बाटली कशी आणू?
"मी केला होता फोन त्यांना. जा तू कधीही आणि आण बाटली"
आं? कधी केला होता फोन? मला कसं माहिती नाही? तू बोलला का नाहीस? आणि तू चक्क माझ्या मैत्रिणीला फोन केला होतास? तेही मायबोलीवरच्या? कम्माल केलीस की? ----- हे सगळं मनात. कारण तो भयंकर नेमकं, मुद्द्याचं बोलतो. एरवी शांत आहे. पण किती शांत असावं माणसाने! त्यालाही काही लिमिट्स आहे की नाही! ---- हेही मनातच.

मग एका सुदिनी मी अनयाकडे गेले. अळूची पानं आणायची होती. बाटलीही आणली. तेव्हा ती म्हणाली, की "आमचा मस्त लाँग कॉल झाला आणि मी भरपूर माहिती सांगितली आहे!" मी थक्क झाले! मग अर्थातच माफक गॉसिपही केलं आणि घरी आले.

खव्याच्या पोळ्या मागच्या यात्रेतच हिट झाल्यामुळे याही वेळी ऑर्डर दिली होती. (तुम्हाला काय वाटलं, घरी केल्या?? अंहं! कैत्तरीच!) मूगडाळ भाजून दळून आणली . तूप कढवून ठेवलं. रात्री सगळं छान भाजून लाडवाचं मिश्रण करून ठेवलं. दुसरे दिवशी आई - बाबांनी लाडू वळून ठेवले होते. माझं रोज कामावर जाणं, लेकीची शाळा-ग्राऊंड, नवर्‍याचं हापिस हे सगळं चालूच होतं. तशातच मी एकापाठोपाठ एक करत सलग ३ दिवस इंटर्व्यू देऊन आले (पुढे काही विशेष न होता मी आहे त्याच ठिकाणी अजून काम करतेय तो भाग सोडुन देऊ.)

त्यात ओरिजनल कागदपत्रं, जी स्कॅन करून आधी पाठवली, तीच नेमकी आता सापडत नाहीत असा साक्षात्कार उद्या निघायचंय तर आज दुपार संपताना झाला.
"आता माळ्यावर काय बघायचंय?"
"प्रिंटर काढून बघायला हवा."
"का? त्याचं काय आता? कधीचाच बंद झालाय ना तो?"
"हो. स्कॅनर चालतोय पण. त्यानेच स्कॅन करून घेतली होती."
"आई गं तू रद्दीची पिशवी का ओतलीस?"
"अगं चुकून गेलंय का यात ते बघते."
"मग माझी हार्मोनिअमपण बाहेर काढून बघ. प्रिंटर त्याच्यावरच ठेवला होता बाबाने. स्कॅन करताना चुकून फटीतून गेलं असेल..."

इथून पुढचं लिहित नाही. तुमची तुम्ही कल्पना करा. एजन्सीत फोन करून हा घोळ सांगून झाला होता. पण नंतर त्या दिशेने काहीच बातमी नव्हती. नशिबाने, जुन्या आवृत्तीतल्या दोन्ही मूळ प्रती होत्या त्यावर निभेल असं वाटत होतं. शिवाय दिल्लीत जर पासपोर्टचं काम झालं तर मग प्रश्नच नव्हता. साधारण रात्रीचे ११ वाजून गेले असतील आणि मला "अय्या, चिवडा करायचा राहिलाच" हा साक्षात्कार झाला. मग ११ नंतर चिवडा करायची सुरूवात झाली. एव्हाना पॅकिंग आवरत आलं होतं. लेकीच्या जिवाची उलघाल होत होती. एक तर आमचा पसारा, तिची सकाळची शाळा, बाबा २ आठवडे नाही म्हणून नाराजी, त्यात कागदपत्र मिळत नाहीत तर बाबाला अडवतील का? चिनी लोक त्रास देतील का? याचा ताण ... पोर अगदी सुकून गेली. तशीच दमून झोपली. १ वाजेपर्यंत सगळं आवरून मी खोलीत आले. विस्थापितांच्या छावणीचं स्वरूप आलं होतं खोलीला. झोपण्यापुरती जागा करून घेतली. नवरा अजूनही लॅपटॉपवर काय करतोय म्हणून बघायला आले.
"बस इथे. हे बघून ठेव सगळं." म्हणून त्याने महत्त्वाची कागदपत्रं दाखवून ठेवली. हा क्षण मला सांभाळणं अवघड जात होतं.
"मेडिक्लेम सही केलेला असतो यात्रेआधीच. काही हेलिकॉप्टर इमरजन्सी वगैरे आली तर... आणि हे नंबर्स आहेत सगळे..."

मी गप्प आणि तो बोलतोय असं फार कधी होत नाही. आणि हे असं बोलणं मला ऐकवतही नाही. पण घेत होते ऐकून.
"सुखरूप परत यायचंय आणि यालच तुम्ही. मला यातलं काहीही वापरायची गरज पडायला नकोय." असं सांगून हुंदका गिळून मी आडवी झाले. झोप कुठली लागायला!

दुसरे दिवशी त्याला शिवाजीनगरपर्यंत मी सोडून आले. जाताना नणंदेच्या धाकटीसाठी चित्रकलेचे स्पेशल कागद बाबांनी वेगळ्या पिशवीत दिले होते. ती पिशवी नाशिक ला उतरताना बसमधे विसरायचा रिवाज पार पडला, पण चक्क मी गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता आणि हे नवर्‍याला समजलं होतं म्हणून ती पिशवी ताब्यात घेता आली. माझी जुनी सवय आहे ही. एसटीने जाताना नंबर मी घरी लोकांना कळवून ठेवते. या वेळी अगदी कळवून नाही ठेवला, पण एसटी निघाली आणि मी बसस्टॉपवर आले तर मलाही बस लगेच मिळाली घरी यायची. म्हणून मी लगेच फोन करून त्याला कळवलं... "ही बघ तुमची बस MHXX XXXX" बाहेर पडली ना? मलापण स्वारगेटपर्यंत बस मिळाली, मी निघाले." असा फोन केलेला त्याच्या लक्षात होता. त्यामुळे लगेच काम झालं.

एका छान प्रवासाची सुरूवात झाली.

.... क्रमश: ....

मायबोलीकर अनयाने या सगळ्या प्रवासात मला खूप मदत केली, सल्ले दिले, धीर दिला. एका क्षणी मी रडायच्या बेताला आले होते, पण तिने पार माझा ताणच घालवला. ते येईलच पुढे.

***
भाग ३: https://www.maayboli.com/node/86970

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्या मोठ्या प्रवासाला घरातलं एकच माणूस जात असेल तरी मानस यात्रा सगळ्यांचीच होते. तेही वाचायला आवडते आहे.

काय स्पीड! काय स्पीड!!
असा अवघड प्रवास, खडतर यात्रा म्हटली की काहीतरी गडबड होतेच. माझा ब्लॉग वाचून कोणी यात्रेला गेलं, की सुखरूप परत येण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं उगीचच वाटत असतं.
माझे उल्लेख वाचून छान वाटलं पण संकोचही वाटला.
ॐ नमः शिवाय

मस्त
नजरेसमोर उभे राहत आहेत प्रसंग

छान लिहिले आहेस. डिकॅथ आणि प्रकाश अगदी डोळ्यासमोर आले.

अवघड प्रोसेस आहे सगळी. घरच्या माणसांची ओढाताण लक्षात येत नाही इतर वेळेस.