विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..,
हाती टाळ मृदंग, चिपळ्या, झांजा घेऊन, ओठी अविरत हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांची पावले वर्षानुवर्षे पंढरीची वारी करण्यासाठी चालत आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी, असे अभिमानाने मिरवीत देखील आहेत.
वारी म्हणजे सर्वसाधारण पणे देहू, आळंदी येथून पायी जाणारी असेच आपल्याला माहिती आहे. मात्र, पंढरीच्या विठोबाला भेटायला आतुर असे त्याचे भक्त हे देश विदेशाच्या विविध भागांमधून वारी करण्यासाठी पंढरंपुरात पायी, खाजगी गाडीने, बसने, रेल्वेने दाखल होत असतात. त्या सगळ्यांना ओढ असते ती त्यांच्या आराध्य दैवताच्या दर्शनाची, कधी एकदा विठूरायाच्या चरणी डोकं टेकवतो अशी त्यांची अवस्था असते. रस्त्यात गाठणारा पाऊस असो, ऊन असो, की पावसामुळे झालेली, चिखलाची वाट असो, कशा कशाचीही तमा न बाळगता त्यांची पावले निरंतर चालत राहतात.
त्यांच्या या अवस्थेकडे बघून तुकोबांचे शब्द नकळत च ओठी येतात.
“भेटी लगे जिवा लागलीसे आस.”
विठूरायच्या भेटीची ओढ ही सगळ्याच संतांच्या अभंगांमधून व्यक्त होताना दिसते,
संत एकनाथांना तर सगळीकडे विठ्ठल भरलेला आहे असे वाटते, ते म्हणतात,
आम्हा नादी विठ्ठलू, आम्हा छंदी विठ्ठलू, आम्हा मनी विठ्ठलू, आम्हा ध्यानी विठ्ठलू, पंढरपूरला तर त्यांनी त्त्यांचे माहेरच मानले आहे, त्यांचा अभंग जगप्रसिद्ध गायक पं भीमसेन जोशी आर्ततेने गातात, “माझे माहेर पांढरी..” जसे की एक सासुरवाशीण जेव्हा आपल्या माहेरी येते त्यावेळी तिचा आनंद ती जसा व्यक्त करेल, तेच भाव या अभंगा तून व्यक्त होतात.
संत नामदेव तर म्हणतात, “पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मान्तरी.”
अशी जर संतांची अवस्था होत असेल आणि सामान्य वारकरी देखील त्याच भक्तीच्या लाटेवर स्वार होऊन पंढरीच्या वारीला जात असतील तर त्या भक्तांमधील भक्तीची ओढ किती तीव्र असेल हे, सामान्य भक्तांना कसे बरे समजणार.
“माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव” हे तर निव्वळ अनुभव घेतल्यावर च समजू शकेल.
तर अशा या विठ्ठल भक्त संतांच्या पालख्या घेऊन त्यांचे शिष्य विठूरायाला भेटण्यासाठी आणि आपल्या गुरूंचे विठ्ठला सोबत मिलन घडविण्यासाठी पंढरपुरात देरे दाखल होत असतात. आषाढी एकादशीला अखिल महाराष्ट्रातील अशी एकेका संतांची पालखी त्यांचे भक्त घेऊन येतात, आणि तिथे तयार होतो, भक्तांचा, वैष्णवांचा महा मेळा. तिथे वाहतो भक्ति चा महापूर. असे हजारोंच्या, लाखोंच्या संख्येने वारकरी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेथील भक्तिरसाचा महिमा काय वर्णवा.
लाखों वारकरी पंढरीला आषाढी एकादशी ला विठू माऊली च्या ओढीने पोहचतात, पण सगळे जण त्या दिवशी विठ्ठलाच्या चरणाशी पोहचतातच असे नाही, कारण, दर्शनरांगेमधे २४, ३६, ४८ तास उभे राहूनही प्रत्यक्ष एकादशीला तुम्हाला विठ्ठल दर्शन होईलच याची मुळीच शाश्वती नसते, आणि खऱ्या वरकऱ्यांना तर त्याची अजिबात भ्रांत नसते.
तरिही अशी कोणती बरे जादू आहे ज्यामुळे विठ्ठल भक्त पंढरीला जाण्यास आतुर असतो, हे आम्हा सामान्य जीवांना न उलगडलेले कोडे च आहे. कारण आम्ही तर, प्रत्यक्ष पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन नाही?” असा सामान्य विचार करणारे, सामान्य जीव.
मग काय बरे असेल? याचा शोध घेतल्यावर समजले की, भावनांचा भुकेला विठू राया देखील भक्तांना भेटण्यास आतुर झालेला असतो, आणि म्हणून वैष्णवांचा मेळा बघण्यासाठी एकादशीला तो कधी मंदिराच्या कळसावर, तर कधी भक्तांमधे मिसळून, नामाच्या गजरात विविध रुपे घेऊन तल्लीन होत असतो, त्यामुळे कोणास ठाऊक कधी तो आपल्या बाजूला देखील उभा असेल. तर असा दृढतर विश्वास, असे निस्सीम प्रेम, आणि अनन्य भक्ति करणारे भक्त जेव्हा एकत्र येतात. त्यावेळी प्रत्यक्ष त्या परब्रम्हालाही भक्तांमधील एक होण्याचा मोह आवरता येत नाही.
म्हणूनच मंदिरात जाऊन विठोबाचे दर्शन झाले नं झाले तरिही पंढरपूरच्या वारी वरून वारकरी कधीही विन्मुख होऊन परत येत नाही. वारी करून आल्यावर तो नव्या जोमाने, उत्साहाने, आपले नित्य कर्म करण्यास सुरुवात करतो. आणि त्यासाठीच वारकरी युगानूयुगे, जन्मोजन्मी चालतात. पंढरीची वाट.
#सुरपाखरू
>>>>त्यामुळे कोणास ठाऊक कधी
>>>>त्यामुळे कोणास ठाऊक कधी तो आपल्या बाजूला देखील उभा असेल
होय.
@सामो
@सामो