आउटडोअर सायकलिंग ( खेळ/ व्यायाम /छंद ) व संबंधित फिटनेस अ‍ॅप्स इत्यादी

Submitted by रानभुली on 12 May, 2025 - 10:27

आउटडोअर सायकलिंग हे निव्वळ व्यायामापेक्षा वेगळेच प्रकरण आहे. म्हणून हा धागा.

कॉलनीतल्या कॉलनीत सायकलिंग , परीसरातले सायकलिंग, शहराच्या आजूबाजूच्या सायकलिंगच्या ट्रीप्स आणि लांब अंतराच्या सायकलच्या ट्रीप्स असे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या सायकलची वेगवेगळी जॉमेट्री, त्यातून घडणारा व्यायाम, आनंद, वेग याची गोडी लागलेल्या सर्वांना इथे चर्चा करण्याचे नम्र आवाहन.

सायकल सोबत वेगवेगळे सेन्सर्स, सायक्लोमीटर्स (काँप्युटर्स) वापरत असाल तर त्याची आणि सायकलिंगशी संबंधित अ‍ॅप्सची चर्चा करण्यासाठी धागा.

गुगल मॅप्स मधे आपल्याकडे तरी सायकलिंग हा ऑप्शन दिसत नसल्याने स्ट्राव्हा आणि इतर अ‍ॅप्स वर अवलंबून रहावे लागते. जीपीएस आणि नेव्हीगेशन वाले सायक्लोमीटर्स असतात त्यातही मॅप्स असतात. ते अचूक असतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा हा धागा मध्ये मध्ये बघते.. जोरात चालू आहे.

परंतु पावसात चालवणं बरच धोकादायक वाटत.. विशेष करून ट्रक सारखी अवजड वाहन बाजूने वेगात जाणारी असतील तर.. tc

काल सकाळी आणि संध्याकाळी मिळून ४५+ किमी झालं.
येताना १७ - १८ किमी चालवत आणि उरलेले सायकल हातात घेऊन चालत. (भाज्या घेत वगैरे).
मधल्या ब्रेकमुळे सकाळी जाताना तेव्हढा उत्साह नव्हता. येतान सुरळीत झालं सर्व.
Screenshot_20250610_062336_OnelapFit.jpg

लंडनमधे सायकलींनी कार्सना मागे टाकले.
https://www.youtube.com/watch?v=OunBRdTIe3w

स्कँडेनेव्हियन देशांत पूर्वीपासूनच सायकलचा वापर जास्त आहे. तिथे रिन्युएबल एनर्जीचा वापरही सर्वात जास्त आहे.
पुण्या - मुंबईत कधी होईल हे ?

शेवटचा ट्रेक घोरावडेश्वर मंदीराचा केला. सायकलने पायथ्यापर्यंत जायचं. तिथे लावायची आणि मग चढणच आहे.
त्यानंतरही थोडी फार चालवली सायकल.

पण नंतर व्हिटॅमिन डिफिशियन्सी मुळं खांदा, हात प्रचंड दुखायला लागले. फिजिओथेरपी चालू करावी लागली. व्हेज असल्याने बी ६, बी १२, कॅल्शियम डिफिशियन्सी आणि डी ची तर आहेच. त्यातच हिमोग्लोबिन काउंट खूप कमी झाल्यने सायकलिंग थांबलं. डाव्या हाताने हँडल धरून टांग मारून बसताना डाव्या हातात झिणझिण्या येऊ लागल्या. अक्षरश" ड्डाव्या हाताने टायपिंग सुद्धा अवघड झालेलं. एका बोटाने करावं लागत होतं.
आता सध्या फिजिओ + मेडिसीन + व्यायाम चालू आहे.

पण सायकलिंग बंद नाही करणार. आता हा छंद झालाय.

काळजी घे रानभूली..
बाकी सायकलिंगचे पण वेड / अगदी व्यसन म्हणावे इतके असते हे माझ्या मुलाकडे बघून कळतेय...

खूप जास्त स्ट्रेच करू नकोस, exercise होईल, exersion होणार नाही हे बघ.

माझे 1200 किमी officially झाले.
तसे तर 2000 किमी होऊन गेले आहेत. पण रेकॉर्ड केलेले एव्हढेच. सुरुवातीला कुठलाही मीटर नव्हता. नंतर स्वस्त चायनीज सायक्लोमीटर वापरला. पण तो मोबाईलला कनेक्ट होत नाही. ते रेकॉर्ड्स गंगेला मिळाले.

Screenshot_20251111_102058_OnelapFit.jpg

या वर्षी एप्रिलपासून पाऊस होता. साधारण मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून मधे डावा हात, खांदा आणि पाठीचा स्नायू यात असह्य वेदना व्हायला सुरूवात झाली. त्या आधी डावा हात पिरगाळल्यासारखा दुखायचा, पण त्याकडे दुर्लक्ष केलेलं. आधी तीन चारदा सायकलवरून पडणे झाल्यामुळं असेल असं वाटत होतं.
पण पावसाळा वाढला, सायकलिंग पण कमी झालं आणि डाव्या हातात झिणझिण्या वाढल्या. अगदी बोटांमधे आणि नखांमधेही झिणझिण्या येऊ लागल्या. शेकल्यावर थोडं बरं वाटायचं.
खूप वेळ बसल्यावर पाठीत ऊसण भरल्यासारख्या वेदना सुरू व्हायच्या. शेवटी डॉक्टरांकडे जायचा निर्णय घेतला.
व्हिटॅमिन्स, सप्लीमेंट्स आणि गेले पाच सहा महीने फिजिओ थेरपीमुळे झिणझिण्या बंद झाल्या. पण अद्याप एका जागी खूप वेळ बसता येत नाही.

पण रात्री हातावर नकळत झोपल्याने होणार्‍या वेदना कमी झाल्या. झोपमोड कमी झाली. त्यामुळं खूप फरक पडला.
गेल्या दोन महीन्यांपासून पुन्हा थोडी थोडी सायकल चालू केली. डॉक्टरांनी मनाई केली होती. सायकलमुळे फरक पडला.
डॉक्टरांचे म्हणणे खरेच आहे. शिरांवर ताण यायला नको. पण ती काळजी घेतली.
खड्ड्यामधे चाक आपटलं किंवा जर्क बसला कि दुखतो हात. पण वेदना खूपच कमी आहेत.
आता सुरूवात जिथून झाली, म्हणजे हात पिरगळल्यासारखा वाटायचा तिथपर्यंत रिव्हर्स झालंय दुखणं.
बहुतेक अजून एक दोन महीने फिजिओ सांगतील डॉक्टर. आयुष्यभर व्यायाम घरी करणे माझ्याकडून होणार नाही हे ही तितकंच खरं. Happy

सायकल सुरू केली तेव्हांपासूनचा हिशेब काढला. एकूण तीन हजार किमी सायकलिंग झालं आहे.
सायकलिंग कॉम्प्युटर घेतला तेव्हांपासून फारशा राईड्स झालेल्या नाहीत.

आज धायरी गावाबाहेरच्या ( कि जांभुळवाडी हद्द ?) डोंगरावरच्या खंडोबा मंदीराला भेट दिली. सकाळी पानशेतच्या रस्त्यावर अर्ध्या रस्त्यापर्यंत राईड केली. आज थकवा आला. पाणी, पिठलं भाकरी असं करून सिंहगडला जायचा बेत होता. त्याऐवजी खंडोबा मंदीर बघितल. पोहोचेपर्यंत संध्या़काळचे चार वाजत आले होते.
सुंदर परीसर आहे. वर चढायला पायर्‍या केल्या आहेत. रेलिंग पर्यंत चढल्यावर विश्रांती घेतली आणि बिबट्याच्या वेळा झाल्याने माघारी फिरलो ( इथे काही वर्षांपूर्वी बिबट्या दिसल्याच्या बातम्या आहेत. याच महीन्यात धायरीत बिबट्या दिसला होता).

आज कॅमेरा नव्हता. पुन्हा मंदीरात जाईन तेव्हां इथे फोटो टाकीन.

खूप दिवसांनी बाहेर पडल्याने छान वाटलं. हात दुखावला थोडा. पण बाहेर पडणं गरजेचं झालेलं.

आज चांगली दमछाक झाली. उन्हाचा त्रास नाही झाला पण काल उन्हं नसताना जास्त अंतर कापलं होतं.
आज पहिला डोंगर चढल्यावर कडेला बसून जेवण केलं. त्यानंतर सायकल चढायचं नावच घेईना. पुढच्या चाकातली हवा कमी झाली कि आधीपासूनच कमी होती ते लक्षात नाही आलं.

Screenshot_20251221_171153_Gallery.jpg

त्यातच चढाच्या सुरूवातीला सायकल उभी करून फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. उभ्या चढावर एकदा सायकल उभी केली कि मग पायडल मारता येत नाही हा नियम मधल्या ब्रेकमुळे विसरले.

आज रविवार मुळे खंडोबाला जाणार्‍यांची गर्दी होती. काही जण मोटरसायकल्स चढाच्या खाली लावून आमच्याकडे कुतूहलाने बघत होते. ( हा धागा वाचून आलेले असतील असे वाटत नाही, आणि असले तरी सायकलवाल्यांच्यात आम्ही मोटरसायकलवाल्यांना एंटरटेन करत नाही. Happy )
जे फोटो काढले ते काढताना भारी वाटले होते. आता साधारण वाटले. थोड्या वेळाने अपलोड करीन. Screenshot_20251221_171026_Gallery.jpg

काल संध्याकाळी घरी पोहोचले. आज विश्रांतीचा दिवस होता. पण सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास सिंहगडाच्या दिशेने सायकल निघाली.
पहिला हॉल्ट आयएटी कॅन्टीन मधे घेतला. तिथे ताक घेतल. चेन पडलेली बसवताना हात काळे झाले होते. सोबत प्यायचं पाणी होतं त्याने हात धुवायचे नाहीत म्हणून हा हॉल्ट घेतला. तिथे स्वच्छ हात धुतल्यानंतर पुढचा हॉल्ट घाटाच्या सुरूवातीला वळणावर जे हॉटेल आहे तिथे घेतला. ताक घ्यायचं होतं. पण एव्हाना पोटात खड्डा पडला होता. सगळा मेन्यू पालथा घातला. शेवटी जे नको तेच ऑर्डर करावं लागलं. मिसळपाव. जंक फूड. पण ते नाही तर मग सरळ जेवण होतं. जेवण केल्यावर चढण शक्यच नव्हती. नंतर ताक घेतलं.

तिथून वरपर्यंत जमेल असं वाटत नव्हतं. पण हिय्या केला. मग थोडा बरा चढ आला. तिसर्‍या गिअरवर सहज चढत होती. नंतर ते घातकी वळण आलं. पहिला हेयरपिन टर्न. तिथे सायकल पुढेच सरकेना. मग पहिल्या गिअरवर आणली. झिकझॅक चालवल्यावर वर चढली. पुढे चढ एव्हढा तीव्र नव्हता. एक किमी झालं, मग पुन्हा असाच टर्न आला. तो ही पार केला. आता परत जायचे विचार येऊ लागले. त्याकडे दुर्लक्ष केलं. असं करत कर अडीच किमी झाले. आता वर चढवेना. थांबून दोन तीन फोटो क्लिक केले.
बिबट्याचं चित्रही दिसलं. मग अवसान गळालं. तरी तिसरा किमी अजून वर चढले. तिथलं सर्वात अवघड वळण आलं. झिकझे़क चालवायची तर समोरून एकामागोमाग एक कार्सची रांग लागली.
Screenshot_20251231_153322_Gallery.jpg
बास मग मनोबल संपलं. आता काहीही केल्या मन हिय्या करेना. मग मरत उलट्या दिशेने सायकल आणली. येताना मात्र खूप मजा आली.
चढताना जो काही वेळ लागला तो पाच ते सात मिनिटात खाली पार केला. तिथून थेट डोणजे पर्यंत पायडल न मारताच सायकल आली. येताना खडकवासल्याच्या नव्या चौपाटीवर थांबून कोकम आणि लिंबू सरबत घेतलं. एकदम फ्रेश !
सार्थक झालं इयर एण्डचं. Screenshot_20251231_153218_Gallery.jpg

काल ५००० स्टेप्स झाल्या.
- मूड्मध्ये सकारात्मक फरक पडला. प्रसन्न वाटले.
- चांगले विचार, कल्पना सुचू लागल्या.
- औषधांमुळे विचार भयंकर मंदावलेत. त्यांना पुश मिळाला.

ग्रेट !
हे वाचताना मलाही खूप उर्जा मिळाली.
कीप इट अप !

मस्तच रानभुलीजी. आमचा पण ग्रुप जातो दर रविवारी. एकट्याला जायला कंटाळा येतो ग्रुप असली की जरा मजा मस्ती होते. आर्धी राईड करून झाली की आम्ही थांबतो आणि वडापाव, मिसळपाव, जिलेबी असे पौष्टिक पदार्थ खातो.

वडापाव, मिसळपाव, जिलेबी असे पौष्टिक पदार्थ >> बोकलत Lol
दर रविवारी राईड हा मस्त आहे उपक्रम. नावापुढे जी नको प्लीज बोकलतजी Proud

आज पहाटे लवकर बाहेर पडायचं होतं. पण पहाटे थंडी होती आणि अंधारही होता. त्यामुळं सोलो रायडिंगचा विचार रद्द केला. दोघं तिघं जमल्यावर सुरू करेपर्यंत पाच वाजले. आता तीन तास होऊन गेलेत. ब्रेक घेतलाय. सोमि ब्रेक आज ब्रेक झाला. Proud
अजून थोडा वेळ पुढे जाऊन माघारी येईन. जमल्यास पुन्हा सिंहगडचा किल्ला अजून थोडा चढून बघेन.

काल सगळी कामं मार्गी लावल्याने आज निवांत वेळ मिळाला.

धनश्री, थँक्स फॉर युवर कन्सर्न. कुत्रे माझ्याशी फ्रेंडली वागतात. घरी कुत्रं असलं कि शक्यतो त्यांना वास येतो.
@एक लेखक,
बिबळ्या कि बिबट्या ? हसण्यावारी नका नेऊ हो. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातून लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगताहेत.
https://www.youtube.com/watch?v=qDc3rCocYL8

आज पायाचे तुकडे पडणे, पाठ टेकणे या शब्दांची प्रचिती आली. सकाळी खेड शिवापूरला जाऊन आलो. घरी आल्यावर पराठा, चीज, दूध ड्रयफ्रूटस असा नाश्ता ( कि जेवण) केलं. आणि सिंहगडला निघाले.
आज साडेपाच किमी चढण चढले. तीन वळणांवर सायकल पुढे जाईना. तरीही तशीच पुढे नेली. घाट सुरू होतो तिथून जवळपास तीन तास लागले एव्हढे अंतर पार करायला. साडेपाच किमी झाल्यावर दोन बसके कठडे दिसले. त्याच्या खालून ओढा वाहत असेल. रंग ओला होता पण पर्वा न करता बसले त्याच्यावर. समोर सिंहगड दिसला. फोटो घेतले. कॉम्प्युटरने मान टाकली. रीडींग्ज सेव्ह झाले कि नाही माहीत नाही. नाहीतर आजचे किमान शंभर किमी वाया गेले.

येताना वेग सुसाट मिळाला. ब्रेक्स लागत नव्हते. मग सतत दोन दोन मिनिटाला ब्रेक्स लावतच खाली आले. वर गेले तरच पिठलं भाकरी घ्यायची ह पण केलेला असल्याने जेवायला थांबले नाही. पण सिंहगड चौपाटी (नवीन) इथे ताक / कोकम साठी थांबल्यावर गरम गरम खेकडा + पालक भजीचा मोह आवरला नाही. तेल खूपदा वापरलेलं नव्हतं. त्याला वास नव्हता. तेव्हढ्यासाठी बाहेर भजी घेत नाही.

तिथून मग मांडीत गोळे आलेले. चढावर अक्षरशः ओढत आणली सायकल. डीआयएटी पर्यंतचा चढ, त्यानंतर खडकवासला गावाच्या शेवटपासून ते किरकटवाडी पर्यंतचा चढ कसा बसा पार पाडला. मग एक बेंच बघून बसकण मारली. सोबत ड्रायफ्रूट्स + डिंकाचा लाडू होता.पण बॅग उघडून आत हात घालून आतला डबा काढा. त्यातून लाडू काढा, मग पुन्हा बंद लावा एव्हढे त्राण राहिले नव्हते. पाण्यावर भागवलं आणि मग उतार लागला.
पुढे सपाट रस्ता. धायरीनंतर मग उतारच उतार.

घरी आल्या आल्या हार्ड सरफेस वर पाठ टेकवून पडले. टेबलवर सकाळी पाण्याचा ग्लास भरून ठेवला होता. तोच स्वतःहून माझ्याकडे आला तर बरं होईल असं वाटत होतं. आत्ता थोडी एनर्जी आलीय. आता गरम पाण्याने अंग शेकलं कि मग बरं वाटेल.

हा आतूनगुलाबी असलेला पेरू. नांदेडमधून येऊन चढ चढल्यावर कॅनॉलवरचा पूल पार केला कि जे वळण लागतं ते संपल्यावर पेरूवाले बसलेले असतात.
Screenshot_20260104_224931_Gallery.jpg
आणि हे राहुल रॉयचं पोस्टर ! झूम करावं लागेल.
Screenshot_20260104_224507_Gallery.jpg
समोर ढगात सिंहगड आहे. दिसला तर दिसला.
Screenshot_20260104_224335_Gallery.jpgScreenshot_20260104_224102_Gallery.jpgScreenshot_20260104_224619_Gallery_0.jpg
गावरान बोरं,काळी मैना चा फोटो आलाच नाही/ Happy
भजी संपवेपर्यंत गावरान मेवा संपला होता. खूप वर्षांनी बघायला मिळाला हा मेवा.
Screenshot_20260104_224746_Gallery.jpg

लाह्या पीठ आणि दुधाची भुकटी जवळ ठेवायची. मिसळून पाण्याने भिजवून एक गोळा करून खायचा. किंवा भाकरीचं ज्वारी पीठही घेता येईल. न्यायला सोपे.

Screenshot_20260113_113851_OnelapFit.jpg

. किल्ल्याच्या धाग्यावर 2500 किमी हे टार्गेट लिहिले होते. तेव्हा 1500+ किमी झालेले. आठवड्यातून पाच दिवस 40/50 किमी आणि एकदा डोंगर, चढ करून निम्मे टार्गेट पूर्ण झाले.

खरं तर खूप सावध टार्गेट आहे. जास्त चालवली तर हातावर भार येतो.

Pages